Pages

Total Pageviews

Thursday, May 31, 2012

मुलीचा बाप! - भाग २ (अंतिम भाग)

" तुला आठवतंय? आज बरोबर चार वर्ष झाली मी तुला प्रोपोज केलं होतं . चार वर्ष कशी गेली कळले देखील नाही. काय काय झाले रे ह्या वर्षात.... माय्क्रोबायोच्या कचाट्यातून आपण दोघेही सुटलो. मग माझे वर्षभर जॉब करणे आणि MBA साठी तयारी करणे. मग दोन वर्षांचं MBA आणि आता मी देखील नोकरीला तयार. आणि माझा बच्चू अजून फिरतोच आहे. तुझे हे फिरणे कधी कमी होणार रे?" मला ही बच्चू म्हणायची हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

मला रोमेंटिक वगेरे होणे जमत नाही. त्यामुळे एकदम लाडात येऊन फिरतीचीच नोकरी करणाऱ्या माणसाला फिरणं कधी कमी होणार असं विचारल्यावर तो त्याचे काय उत्तर देईल? तरीही उत्तर अपेक्षित असतेच. पण आज मी जरा गंभीर मूड मध्ये होतो. जसा जसा माझा व्यवसाय वाढत होता तसा त्यात माझा खर्च देखील वाढू लागला होता. दूर कुठेतरी अमेरिकेत मंदी आल्यामुळे इकडे आमच्या देशात महागाई वाढली आहे असं सांगत होते. पेट्रोल आणि डीझेलचे भाव वर चढत होते. खाद्यपदार्थ तरी कुठे स्वस्त होते? एकाएकी माझा मासिक खर्च वाढतो आहे आणि बचत दिवसेंदिवस कमी होत चालली आहे ह्याची जाणीव मला आता होत होती. अख्ख्या देशाची तीच परिस्थिती होती म्हणा. माझ्या contacts कडून पैसे उशिरा येणं माझ्या पुढील यात्रांसाठी तापदायक ठरत होतं. शिवाय एकंदर भाव वाढल्यामुळे मला प्रत्येक यात्रेसाठी लागणारी किंमत वाढवावी लागत होती. मी जिथे राहायची सोयकरायचो तिथे देखील किमती वाढल्या होत्या. काही ठिकाणी मला संबंध चांगले ठेवायसाठी नफ्याची 'margin 'कमी ठेवायला लागत होती. पर्यायाने माझ्याकडे येणारे उत्पन्न हे घटत होते. चांगल्या 'customer base ' मुळे कंपनी नफ्यात तर होती. पण कमी 'margin ' मुळे मला धंदा पुढे वाढवता येत नव्हता. नवीन ऑफिस बांधायची योजना पुढे ढकलली जाणार होती. आणि मी मनात योजलेल्या सर्वगोष्टी ...मग ते नवीन ठिकाणी फिरायला जाणं असो किंवा नंतर कधी आंतरराष्ट्रीय यात्रा काढणं असो. मध्ये लग्न देखील करायचं होतं. लग्नात मला नटायची आणि पैसे खर्च करायची हौस नसली तरी हिला होती. एकदाच लग्न होतं म्हणून ते थाटामाटात पार पडलं पाहिजे असा तिचा विचार होता. आणि आपण कितीही तत्व बाळगणारे असलो तरीही होणाऱ्या बायकोचे मन आपल्याला मोडवत नाहीच! आणि ह्या पार्श्वभूमीवर ही मला फिरणं कमी कधी होणार असं विचारात होती. किती स्वप्नाळू असतात ह्या मुली. पण तरीही फोनवर वैतागलेले भाव कुठे दिसतात? त्या भावांना विसंगत असणारा माझा आवाज सौम्य ठेवत मी बोलू लागलो.
" फिरणं कमी करून कसं चालेल? आपल्याला पुढे हे वाढवायचे आहे ना. आपण सारं जग फिरणार आहोत की नाही? आठवतोय ना तुला कॉलेजला जाताना झालेला आपला संवाद? आता तर तुला पण नोकरी लागली आहे. म्हणजे आपल्याला पुढे विचार करायला हरकत नाही. दोघेही कमवणारे होणार आहोत आपण. मला वाटतंय आपण आता हे घरी सांगायला हवं. " उत्तरं द्यायचं सोडून ती फक्त खदखदली.

" हसू नकोस! मी तुला खरं ते सांगतोय. अजून किती दिवस आपण फोनवर बोलत राहायचं? घरचे समोरासमोरच राहत असल्यामुळे आपल्याला कुठे जाता पण येत नाही. एकदा सगळं सांगून टाकूया. घरच्यांची परवानगी मिळाली तर एक लेवल पार!"

माझी दोन दिवसानंतर उत्तर कर्नाटक यात्रा होती. त्या भागाबाद्दलची माहिती वाचून रात्री मी तिला फोन केला होता. उद्याचा एक दिवस होता आणि नंतर परत मी एक आठवडाभर बाहेर. ह्या यात्रेसाठी म्हणावे तितके लोक आले नाहीत ह्याची एक चिंता होतीच. आणि त्या नंतर लगेच दीड आठवड्याने जयपूर योजले होते. ह्या दोन ट्रिप्स वर पुढचा बिझिनेस अवलंबून होता. कर्नाटकात माझं काही लक्ष लागेना! सकाळी फिरणं झालं की दुपारच्या जेवणावेळेस, संध्याकाळी चहा प्यायला थांबलो की....किंवा रात्री जेवणं झाल्यावर लोकं झोपायला गेली की...सतत एकाकी वाटत होतं. सारखा 'पुढे काय' हा विचार मनात येत होता. मी एकट्याने ३ वर्षात ही छोटीशी कंपनी इथपर्यंत तर आणली. पण आता मला गरज होती आधाराची. माझ्या खांद्यावर कुणाचा हात नसला तरी चाललं असतं पण खांद्यावर अनुष्काने डोकं जरी ठेवलं असतं तरी बरं वाटलं असतं. महागाई वाढली नसती तर ज्या पद्धतीने मी कंपनी पुढे नेत होतो ....लग्नाला उभं राहता आलं असतं. आणि पुढील आयुष्यात कुणीतरी आपल्या बरोबर आहे ह्या खात्रीनेच मी पुढची पावलं बिनधास्तपणे टाकू शकलो असतो! आता तर हिला नोकरी पण लागली होती. माझं बऱ्यापैकी नाव झालं होतं हे खरं. फक्त बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे लोकं एकूणच साशंक होते! आणि ३ दिवसात जरी मुंबईला घरी परत जाणार असलो तरीही त्या रात्री हुबळीला मला अनुष्काची आठवण येऊ लागली....

वास्तविक तिला मी आधी आवडलो. कॉलेजच्या सुरुवातीला कदाचित वर्गातील मुलं चिडवतील म्हणून आम्ही एकत्र जायचो नाही. पण कॉलेज मधून येताना तिचे इशारे सुरु होयचे. मी आणि माझा एक मित्र असे यायचो. ट्रेननी येत असल्यामुळे रेल्वे स्टेशन पर्यंत त्याची सोबत असायची. ही आमच्या पुढेच चालत असायची. पण आम्ही मागून येतो आहे ह्याची तिला कल्पना असायची. त्यामुळे मध्येच थांबून बुटाची लेस बांध, हातातली बाटली खाली पाड आणि ती उचलायला उगीच जास्त वेळ लाव असल्या गोष्टी सुरु होयच्या. मला आहे कधीच लक्षात आले नाही. पण माझ्या मित्राला हे सारे इशारे लगेच समजले. " साल्या, लाईन देते आहे बघ तुला", असं त्याच्या तोंडून येऊ लागले. मला देखील आता संशय येऊ लागला होता. वर्गात तोपर्यंत मित्रांना हे देखील माहिती नव्हते की ही मुलगी माझ्या घरासमोरच राहते आणि हिच्या बापापर्यंत माझी पोच आहे! ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी झाल्या. कॉलेजच्या पहिल्या वर्षी अगदी सुरुवातीला झालेल्या ह्या गोष्टी आहेत. एक- दीड महिना असंच चाललंय हे लक्षात घेऊन एकदा घरी चालत येताना मीच तिला हाक मारली आणि आपण चालत एकत्रच जाऊया असं सांगितलं. त्या दिवशी तिच्या चेहऱ्यावरचे ते 'लाजून हासणे' मला अगदी काल झाल्याप्रमाणे लक्षात आहे. मग हे एकत्र चालणे आम्ही पुढे वर्षभर सुरु ठेवले. वर्गातील मुलं काय म्हणतील ह्याची आता मला परवा नव्हती....तिला तर केव्हाच नव्हती! ह्याच दरम्यान माझे दादांबरोबर चर्चा रंगवणे सुरु झाले होते. आणि तिच्या घरी येणे-जाणे वाढले होते. घरी असताना ती आमच्या चर्चा कान देऊन ऐकायची. मधून मधून बोलायची देखील. मग मध्येच किचन मध्ये जाऊन चहा, सरबतआण वगेरे सुरु असायचं. असं करत करत एस.वाय उजाडलं. आणि एके दिवशी दुपारी घरी येताना तिने मला सांगितले, " मला तू आवडतोस. एका मित्रापलीकडे. तू जवळ नसलास की सारखं तुझ्याबद्दल कुतूहल असतं...तू काय करतो आहेस ह्याबद्दल माहिती करून घ्यायची इच्छा सारखी मनात असते. माझे इतर खास मित्र आहेत. पण कॉलेज संपवून ते घरी गेले की त्यांच्याबद्दल जाणून घ्यावेसे नाही वाटत. तू समोर राहतोस तरी लांब असल्यासारखे वाटते. तू काय करत असशील हा विचार मनात असतो." होकारार्थी उत्तर द्यायला मी तब्बल दोन महिने लावले. आणि त्यानंतर सगळ्या प्रसंगी अनुष्का माझ्या बरोबर उभी राहिली होती.

जयपूरला जायच्या आधी मी तिला मेसेज पाठवला होता. 'आल्यावर आपण घरी सांगायचे का? आता सर्वांना कळलेले बरे. मग आपल्याला पुढची पावलं उचलताना एकत्र निर्णय घेता येतील '. जयपूरचा माझा दौरा होता १२ दिवसांचा. जयपूर आणि राजस्थानची प्रमुख शहरं बघायची होती. आणि दुसऱ्याच दिवशी माझा फोन वाजला. भर दुपारी कुणाचा मेसेज आला हे बघायला मी फोन हातात घेतला. बघतो तर अनुष्का! आज हिची ऑफिसला दांडी दिसते आहे असं म्हणून मी मेसेज वाचायला घेतला आणि हादरलोच! ' आपल्या बद्दल दादांना कळले आहे. ते माझ्यावर प्रचंड भडकले आहेत. तुला हे सांगण्यासाठी मला त्यांनी फोन दिला होता . पण आता फोन त्यांच्याकडे असणार आहे. म्हणून मेसेज करू नकोस. सांगायचं हे आहे की दादांनी माझ्यासाठी मुलगा बघितला आहे. पुण्याचा आहे. एका सोफ्टवेर कंपनीत कामाला आहे. माझ्या मावशीनी घरी सुचवलं. इतके दिवस त्यांच्या फक्त मनात होतं पण तुझा मेसेज वाचल्यापासून त्यांनी आता घाई करायला सुरुवात केली आहे. कदाचित २ दिवसात ते घरी येतील. मला बघायला. तू आल्यावर भेटू....लव यु ...मिस यु .....
प्रथमच इतक्या निरुत्साहात यात्रा संपवून मी घरी आलो. अशा प्रसंगी आपल्या आवडीच्या गोष्टी देखील आपली साथ देत नाहीत.

आलो आणि तडक दादांकडे गेलो. चेहऱ्यावर स्मित ही न ठेवता त्यांनी मला खुणेने आत जाऊन बसायचा इशारा दिला. आणि मी आत जाऊन बसल्याक्षणी मला प्रश्न केला, " मी काय ऐकतो आहे ते खरं आहे का?"
" नाही...म्हणजे....", मी शब्दांची जुळवाजुळव करू लागलो. " मला नीट उत्तर हवं आहे", दादा गरजले. " आणि नीट उत्तर नसेल तर मी तुला सांगतो. आम्ही अनुष्कासाठी मुलगा बघितलेला आहे. पुण्याचा आहे. आणि आम्ही त्याच्याशी तिचे लग्न लाऊन देणार आहोत." असं म्हणून दादा मागे वळले. आणि ताड-ताड पावले टाकीत ते जेव्हा आत जाऊ लागले तेव्हा मी धैर्य गोळा करून म्हणालो, " पण का? तिला मी आवडतो. मग मी का नाही? मला देखील ती.....", आणि तेवढ्यात ते झपकन मागे वळले आणि मी परत शांत झालो.
" अरे लग्न म्हणजे काय गम्मत वाटली का तुला?" ( कुठल्याही मराठी सीरिअल मध्ये शोभेल अशा वाक्याने दादांनी सुरुवात केली) " लग्नाआधी किती तरी पूर्वतयारी करावी लागते. हे एवढं सोपं नाही आहे."
" माझी तयारी आहे दादा. तुम्ही सांगाल ते करायला आम्ही तयार आहोत. आम्ही एकमेकांना आता चार वर्षापासून ओळखतो. मला खात्री आहे मी जे बोलतो आहे ते अनुष्काला देखील पटेल. आम्ही तुमची आणि माझ्या घरच्यांची परवानगी घेणार होतोच.....म्हणजे तुम्हाला सांगणार होतोच. ( परवानगी हा शब्द वापरल्याबद्दल मी मनातल्यामनात डोकं आपटून घेतलं!)

" तुम्ही लाख सांगाल रे....पण ह्याचा अर्थ आम्ही परवानगी द्यायची का? आम्ही पण आमच्या मुलीसाठी काहीतरी विचार केलेले असतातच ना. असं उद्या कुणीही परवानगी मागायला आलं तर काय आम्ही हो म्हणायचं का?"
" अहो पण दादा....मी कुणीही आहे का? तुम्ही मला ओळखता. मी गेली अनेक वर्ष तुमच्याकडे येतो आहे. आपलं बोलणं होतं. तुम्ही माझा स्वभाव जाणता....मी काय करतो...कसा आहे....हे सगळं तुम्हाला माहिती आहे...", मी माझी बाजू मांडायला सुरुवात केली. पण माझे वाक्य मधेच तोडून दादा म्हणाले.
" नुसतं तुला ओळखून काय फायदा? मी कसा विश्वास ठेवू की तू लग्नाला पात्र आहेस? तुमच्या घरी आमची मुलगी देऊन तिच्या सुखी राहण्याची काय हमी आहे? ओळख तर माझी इथल्या दहा बिल्डींग मधल्या मुलांशी आहे!" दादा बऱ्यापैकी आक्रमक स्वरात बोलत होते. " अहो, पण तिला मी आवडतो...."
४-५ सेकंद का होईना पण माझ्या ह्या विधानाने दादा शांत झाले. आणि मला समजावू लागले. " लग्न हे केवळ तिला तू पसंत आहेस म्हणून लावून देऊ का मी?"
"म्हणजे?" मी विचारले.
" हे बघ....लग्न व्यवस्थित पार पाडायला सर्व निकषांनी विचार करावा लागतो. आम्हाला आमची मुलगी द्यायची आहे....ते आम्ही विचार केलेल्या कुटुंबातच देणार ना. त्यातच तिचा फायदा आहे...तिला सुख आहे...सगळीकडून विचार करावा लागतो त्यासाठी."
" पण दादा...आमच्या घरी कुणीतरी आम्हाला मुलगी देत आहे असा नाही माझा विचार...नाही माझ्या आई-बाबांचा! आम्ही तिला नक्कीच एक सदस्याप्रमाणे वागवू...नव्हे...वागवलेच पाहिजे ", मी स्पष्टपणे सांगितले.
" हे बघ...ही पुस्तकी वाक्य माझ्यासमोर नको आळवू...मी तुझ्या घरच्यांना ओळखतो. त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. तुझे विचार पण मला माहिती आहेत. पण तो माझा मुद्दा नाही", दादा म्हणाले. मुळात ह्या माणसाचा मुद्दाच काय आहे हे मला कळत नव्हते. ह्यांना माझ्याशी प्रोब्लेम नव्हता....माझ्या घरच्यांशी नव्हता...अनुष्काला मी आवडतो हे माहिती होते....पण मग ह्यांची अडचण काय होती? हे अशे इतका वेळ कोड्यात का बोलत होते? मी त्यांच्याकडे पाहत राहिलो. शेवटी तेच पुढे बोलले.
" माफ कर...मी जरा स्पष्ट बोलतो. आतापासून ३-४ वर्षानंतर माझ्या मुलीला तू जगातील परिस्थितीप्रमाणे सुखी ठेवू शकशील? ते तर सोड....तुझे मनसुबे काय आहेत...लग्न करायला निघाला आहेस...पुढचा काहीतरी विचार तरी केला असशील ना?"
" दादा, मी लगेच लग्न करायचं असं म्हणताच नाही. मी आमच्या प्रेमाची कबुली द्यायचे केवळ म्हणतोय. पण पुढचं विचारलंत तर... तुम्हाला देखील माहिती आहे की पुढील ३-४ वर्षात मी माझे स्वतःचे ऑफिस उघडणार आहे...."
"म्हणजे तुझे ऑफिस सुद्धा नाही सुरु झाले अजून. आणि हो....१-२ वर्षांची ३-४ वर्ष कशी झाली? तुला काय वाटतं....आम्ही आमच्या मुलीला अशा मुलाकडे सुपूर्त करावं ज्याच्याकडे स्वतःचे साधे ऑफिस पण नाही? उद्या आम्हाला कुणी विचारले तर आम्ही काय सांगणार? " ( ह्या एवढ्या बोलण्यात 'मुलीला सुपूर्त करणे' ही गोष्ट मला कमालीची खटकली! जर मुलीला दुसऱ्या कुटुंबात देणे हीच भावना असेल तर तिला स्वातंत्र्य देणं ह्या गोष्टीला काय अर्थ आहे? परवा पर्यंत पंजाबी ड्रेस घालणारी मुलगी आज जीन्स घालू लागली म्हणजे ती स्वतंत्र झाली असं नाही.....असो..असा विचार करणारा मुलगा तरी मिळेल का तुम्हाला दादा?)
" दादा तुम्हाला माहिती आहेच. सध्या मार्केट जरा डाऊन आहे...मला माझ्या सगळ्या योजना थोड्याशा पुढे ढकलाव्या लागत आहेत. मलाच काय...महागाईमुळे सर्वांची हीच परिस्थिती आहे. आणि मी...."
" हेच....हेच तर मला म्हणायचे आहे. तू ऑफिस बांधशील नंतर..मग घर कधी घेशील....गाडी कशी घेशील...पुढचे खर्च कशे manage करशील? आणि केव्हा करशील?" कालपर्यंत माझी व्यावसायिक मजल ठिकठिकाणी पोहोचल्यामुळे माझ्या पाठीवर थाप मारणाऱ्या दादांना अचानक काय झाले हे काही मला कळेना! आणि ह्या गोष्टी मी कधीच विकत घेणार नाही असं देखील नव्हत. मी थोडक्यात समाधान मानणारा असतो तर एके दिवशी भारताबाहेर यात्रा काढीन असं ठरवलं तरी असतं का?
" दादा.....माझं ऐका. ती वेळ येईल. सध्याची परिस्थिती बघता थोडी उशिरा येईल...पण येईल...मी प्रयत्न करतो आहेच...आणि हे तुम्हाला देखील माहिती आहे ना! आता अनुष्काचे पण MBA झाले आहे. ती पण नोकरी करत आहे. काही वर्षात तिची पण growth होईलच. आम्ही दोघे मिळून संसार करू. माझा तर customer base पण तयार आहे....फक्त आताची एक phase आहे...."
" ती MBA आहे रे...पण तुझे काय? तू तर graduate आहेस. म्हणजे तिच्यापेक्षा एक डिग्री कमी. असं कसं चालेल. उद्या लोकांनी विचारले तर आम्ही काय सांगायचे? मुलगा फक्त graduate आहे?"
" अहो पण दादा! माझा travel and tourism चा बिझिनेस आहे. त्यात मी MBA करून कसं चालेल....त्यापेक्षा परदेशी भाषा शिकून माझा पुढे समृद्ध होण्याचा विचार आहे. पुढे शिकणार नाही असं नाही....पण जे उपयोगाचे आहे...तेच शिकायचे आहे मला... "
" पुढे कुणी बघितलं आहे? आमच्याकडे जे स्थळ चालून आलंय त्यात आम्हाला ह्या त्रुटी दिसत नाहीत. त्याला चांगला पगार आहे....शिवाय पुण्यात मोठे घर आहे. पगार चांगला असल्यामुळे अजून एक घर घेण्याचा मनसुबा आहे...गाडी आहे." ( चालून कसलं आलंय स्थळ...मावशीने तर सुचवलं आहे....मला काय माहिती नाही काय?)
" काय करतो तो?" मला माहिती असूनसुद्धा मी विचारले. " पुण्यात जोमेट्रिक सोफ्टवेर मध्ये कामाला आहे", दादांनी सांगितले. " म्हणजे दुसऱ्यांची कामं करणारच ना?" मी दादांना दोन मिनिटांसाठी त्यांचच तत्वांनी का होईना मात दिली होती. पण शेवटी काकू त्यांच्या मदतीला आल्या.

" दुसऱ्यांची कामं करतो का नाही तो आमचा प्रश्न आहे. पण मिळणाऱ्या पैशात तो अनुष्काला सुखी ठेवू शकेल ही आम्हाला खात्री आहे." आम्ही पै पै साठवले आणि संसार पुढे नेला असं म्हणणाऱ्या काकूंनीच जेव्हा हा पवित्रा घेतला तेव्हा मला पुढे काहीच बोलवेना. मी काहीही न बोलता परत घरी आलो. रात्री अनुष्काला फोन लावला. सुदैवाने फोन तिच्याकडे होता. झाला प्रकार तिला माहिती होताच. पण मी पुन्हा सांगितला. मला शांत करत ती पुढे बोलू लागली. तिच्या आवाजात एक वेगळाच खंबीरपणा होता त्या दिवशी. " हे बघ. आपण खूप स्वप्नाळू असतो. प्रेमात पडताना आपल्याला नाही समजत की आपण पुढे काय करणार आहोत. पण पुढे विचार केला की हेच समजतं की लग्न करणं इतका सोपं नाही. त्यात पुढे खूप गोष्टी plan कराव्या लागतात. आपल्या ह्या rate ने आपण settle कधी होणार? ह्याचा तू विचार केला आहेस का? मी तरी विचार नव्हता केला. पण चालू परिस्थिती जगत राहिलो तर मला नाही वाटत आपण settle होऊ. कारण हे बघ, प्रेम वगेरे त्या ५० वर्षांपूर्वीच्या concepts आता नाही राहिल्या. आता आपल्याला जास्त practical होण्याची गरज आहे. मला माझ्या बाबांचे बोलणे पटले आहे. आणि हीच practical गोष्ट मानून मी तुला सांगते मला विसरून जा. आपण पुढे एकत्र नाही राहू शकत......"

मी केलेले सारे विचार व्यर्थ होते. घेतलेला प्रत्येक निर्णय तिच्याशी share केल्याच्या आठवणी मात्र मनात होत्या. मी माझे ऑफिस बांधण्यासाठी बाजूला ठेवलेली रक्कम व्यर्थ? तिच्या इच्छेने लग्न व्हावे म्हणून साठवून ठेवलेले पैसे व्यर्थ? पुढे हिला बरोबर घेऊन सारे जग फिरुया....समृद्ध होऊया...असे केलेले विचार व्यर्थ? सतत हिला, हिच्या आई-वडिलांना समोर ठेवून घेतलेले निर्णय व्यर्थ? उगीच माय्क्रोबायोला admission घेतली. गेलो असतो १२ वी नंतर I.T ला आणि झालो असतो इंजिनिअर. काय ते काम केले असते आणि मिळवला असता लठ्ठ पगार! माझ्याही मागे मुली आल्या असत्या...नव्हे...मुलीचे बाप आले असते! मुलीचा बाप खरच एक अजब व्यक्तिमत्व आहे. मुलीचे लग्न होईपर्यंत बाळगलेली तत्व एकदम शिथिल करणारा आणि त्याला 'practical'पणा ह्याचे गोड कवच बांधून मिरवणारा एक दुष्ट प्राणी! आणि मुली काय वेगळ्या असतात? त्या पण तसल्याच. शेवटी त्यांना घरच्यांचेच ऐकावे लागते. बिघडलेली मुलं सोडा. पण ह्या जगात जो मुलगा इमानदारीत प्रेम करतो..आणि खरोखर कुणाच्यात 'involve ' होतो त्याला स्वतःला सावरून घ्यायला खूप वेळ लागतो. मुलींचं तसं नसतं. त्या पाण्यासारख्या असतात. ज्या रंगात मिसळतात त्या रंगाच्या होऊन जातात.

अनुष्का आता पुण्यात असते. ती तिच्या नवऱ्याबरोबर खुश आहे हे माझ्या मित्राकडून समजलं. रोज तो तिला गाडीने ऑफिसला सोडतो. मग तो स्वतः ऑफिसला जातो. संध्याकाळी pick - up ' करायला देखील येतो. विकेंडला अस्सल पुणेरी लोकांप्रमाणे हॉटेल मध्ये जेवण होतं. अमेरिकन कंपन्या खूप दयाळू आहेत. त्याच्याकडून भरपूर काम करून घेतलं तरी पैसे देखील तितकेच देतात. भरपूर! हे सगळं मी देऊ शकलो असतो का? नक्कीच नाही!
काही महिन्यांनी काश्मीरला यात्रा नेली होती. शिकारयात बसले होतो सगळे. काश्मिरी संतूरचा आस्वाद घेत असल्यामुळे लोक पण खुश होते. तेवढ्यात दोन गृहस्थ ( जे माझ्या बरोबरच आले होते) बोलताना मी ऐकलं. दोघेही software मधले आहेत हे काही क्षणातच मला कळले. " च्यायला...महागाई वगेरे ठीक आहे...पण रुपये आणि डॉलरचा दूरचाच संबंध बरा ...५६ रुपये डॉलर ....पगार चांगला मिळतोय. उगीच देशाच्या सुधारणेने डॉलर यायचा ४६ वर आणि आपले वांदे होयचे! जागतिक अर्थकारणामुळे माझ्यासारख्या सामान्य माणसावर किती 'खोलवर'चा परिणाम झाला आहे हे माझ्या लक्षात आले आणि किंचित हसून मी वाजत असलेल्या संतूरला दाद देऊ लागलो!


- आशय गुणे

Wednesday, May 30, 2012

मुलीचा बाप - भाग १

आमच्या छोट्या शहरी एक बऱ्यापैकी मोठा तलाव आहे. शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सर्वांना तसा तो जवळ देखील आहे. तलावावर कमळांची सुंदर गादी तयार झालेली आहे आणि म्युन्सिपालटी ने थोडीशी दया दाखवून ती अनुभवायला तिकडे बसायची सोय देखील केली आहे. काठावरच छोटं देऊळ असल्यामुळे अनेक आजी-आजोबांची सकाळची फेरी आणि नंतर चर्चासत्र इकडेच रंगतात. आत अनेक देव असल्यामुळे 'वारांची वारी' अगदी ठरलेली! संध्याकाळी देखील कसली तरी व्याखानं, मध्येच एखादा गाण्यांचा कार्यक्रम, कुणाचा तरी कौतुक सोहळा, पत्त्यांचे सामने, कॅरम खेळणे हे इथल्या छोट्याशा व्यासपीठावर नित्याने होते असते. काही पोरांनी इथे क्रिकेट खेळणे देखील सुरु केले होते. पण सारखा बॉल, आणि त्यामुळे तो विकत घेताना खर्च होणारे पैसे, पाण्यात जाऊ लागल्यामुळे ते बंद झाले. पण ह्या तलावाची खरी सुंदरता रात्री अनुभवायची! थंड हवेची मजा घेत, रात्रीची ती शांतता अनुभवता समोर कमळांनी पांघरलेली ती चांदण्यांची चादर न्याहाळण्यात एक वेगळाच आनंद असतो! ह्याच वातावरणाची मजा घेण्यासाठी आम्ही वेळात वेळ काढून इथे येत असतो. आम्ही म्हणजे 'आम्ही दोघे' ह्या अर्थी नाही तर आम्ही लहानपणीपासूनचे मित्र! अर्थात 'आम्ही दोघे' देखील येऊ शकलो असतो. पण तसं आता तरी होऊ शकणार नाही.
ह्याच संदर्भात आमचा विषय सुरु होता. "काय झाले रे?" एका मित्राने शेवटी विचारलेच. काही सेकंदांच्या शांतते नंतर मी म्हणालो.
"काय होणार? नाही झालं....", मी म्हणालो.
"अरे पण का? तुमचं तर... आणि ती काय म्हणाली? ती तर तयार होती ना?"
"नाही रे... ती काहीही म्हणाली तरी शेवटी बाप म्हणेल तेच मुली करतात. दादांनी तिच्यसाठी कुणीतरी शोधून ठेवलेला आहे रे. आणि मी विचारल्यामुळे आता लग्नाची घाई करणार आहेत ते ", मी वस्तुस्थिती सांगितली.
" कोण आहे बे तो ...त्याला इथे यायच्या आधीच त्याची तंगडी तोडू आपण. मी माझ्या मित्रांना बोलावू का?" आमच्यातला एक टग्या नेहमी मारामारीला तयार! पण त्याबद्दल सांगायचा अजून थोडा आग्रह झाल्यानंतर मी एकदाचे सांगितले.
" अरे कुणीतरी सोफ्टवेअर कंपनीत आहे रे. तिच्या मावशीची ओळख निघाली. तिनेच सुचवलं स्थळ. च्यायला ह्या मावश्या, आत्या उगीच मध्ये-मध्ये करत असतात बे. ह्यांना काय कळतंय...दिसला कुणीतरी लठ्ठ पगाराचा पोरगा...द्या त्याचा reference ...त्यांचा बहुतेक ह्याच्यासाठीच जन्म असतो ", माझं बोलणं आता चढत्या आवाजाचं होत होतं.
" तुमचं बरं आहे रे...च्यायला कामं दुसऱ्याची करता...आणि मिळालेल्या पगारावर उडत असता...", हे वाक्य आमच्या 'Infosys ' मध्ये काम करणाऱ्या मित्राला उद्देशून होतं. " दादांनी घोळ केला म्हणायचं..."
दादा मिरासदार! गेली अनेक वर्ष आमच्या घरासमोर राहणाऱ्या मिरासदार कुटुंबाचे प्रमुख. पण गेल्या काही आठवड्यात हा माणूस माझ्यासमोर आला तर चेहऱ्यावरची रेष देखील न हलवता निघून जातो. जगातल्या काही मोजक्याच लोकांना देव कपाळावर असंख्य स्पीड ब्रेकर्स चिकटवून जन्माला घालतो. मिरासदार त्यातलेच एक. अर्थात गेले काही आठवडे ते स्पीड ब्रेकर्स जरा जास्तच स्पष्ट दिसत होते. आणि मी समोर आलो तर खूपच! माझ्याकडून पापच तसं घडलं होतं. आणि त्याची शिक्षा अर्थात हा असा चेहरा बघून मी भोगत होतो! त्या रात्री मी तळ्यावरून जरा लवकरच घरी आलो. एक तर हा विषय मला पुढे ढकलायचा नव्हता आणि दुसरं म्हणजे चार दिवसात आसामला जायचं होतं. त्याची तयारी करायची होती. हो, तुम्ही हे मराठीत वाचत असलात आणि मी देखील मराठीत लिहिलं असलं तरीही, मी एक व्यवसायी आहे. सध्या छोटाच आहे पण चालू गतीने ३-४ वर्षात माझं स्वतःच ऑफिस उभं राहणार आहे. आणि नंतर देशाच्या काना-कोपऱ्यात मी माझ्या tours नेणार आहे. मला भटकंतीची प्रचंड हौस. आणि त्याच आवडीमुळे मी ह्या धंद्यात पडलो. तसं माझं शिक्षण सुद्धा झालं आहे. मी science graduate आहे. पण नंतर ठरवलं आवडीच्या मार्गाने जाऊया. उगीच 'मास्टर' हे फक्त नावाआधी जोडण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आवडीच्या क्षेत्रात मास्टर झालेलं बरं. माझी पहिली टूर मी श्रीवर्धनला नेली होती तेव्हा सहभागी होणाऱ्या पहिल्या काही लोकांमध्ये मिरासदार काका देखील होते. मला आशीर्वाद दिले होते त्यांनी. तसा मी १० वी झालो तेव्हा आमच्या समोर नवीन झालेल्या बिल्डींग मध्ये हे कुटुंब राहायला आलं. त्या दिवसात आम्हा मित्रांचा एक उद्योग असे. कुठेही नवीन इमारत उभी राहताना दिसली की त्यात कुणी मुलगी असलेली फेमिली राहायला येईल अशी आस लावून बसायचं! ती बिल्डींग झाली तेव्हा मी नशीबवान असलो पाहिजे कारण हे कुटुंब आले! १० वी ह्या 'राहू' नंतर १२ वी चा 'केतू' नशीबात आलाच! मात्र ते झाल्यावर मी मैक्रोबायोला प्रवेश घेतला आणि अनुष्का मिरासदार माझ्या आयुष्यात आली! आता समोरच्याच बिल्डींगमध्ये राहणं असल्यामुळे बरोबर कॉलेजला जाणं आलंच! आणि कॉलेज पर्यंतची वाट तुडवीत आम्ही पुढची वाट एकत्र चालायची स्वप्न रचू लागलो....
कॉलेजची वर्ष सहसा बिघडवणारी. शाळेपर्यंत किंवा बारावी पर्यंत मुलीकडे ढुंकून न पाहणारी मुलं ही 'निळ्या' रंगाच्या प्रेमात पडतात ती कॉलेज मध्येच! डोळा मारा बारावी पर्यंत वर्गात प्रथम क्रमांक काढणारी पोरं वास्तवातले विश्व पाहून खाली आपटतात ती कॉलेज मध्येच! लायब्ररीला घर मानणारी मुलं मैदानाच्या प्रेमात पडतात ती कॉलेज मध्येच. भारतीय पेहराव ( कपाळावरच्या टिकली सकट!) पसंत करणाऱ्या मुली जीन्स, टी-शर्टला कुरवाळू लागतात ते देखील कॉलेज मध्येच! थोडक्यात काय, प्रगती काय किंवा अधोगती काय....कॉलेज मध्येच होते. माझीही झाली. मला अभ्यासात कधीही रस नव्हता. पण इतर गोष्टींची आवड लागली कॉलेजमध्ये. संगीत हा माझा सर्वात आवडता विषय! अगदी शाळेपासून मी त्यात बुडालेलो आहे. सुरुवात शास्त्रीय संगीताने झाली. पण नंतर एकंदर चांगलं संगीत मी ऐकू लागलो. त्यात लोकसंगीत प्रथम क्रमांकाने. लोकसंगीतात ऐकायला मिळणारे एकाच भाषेचे त्या भागानुसार झालेले वेगवेगळे उच्चार, त्या भाषेतील गोडवा, त्या परंपरागत चालत आलेल्या चाली ह्यामुळे मराठी बोली भाषा माझ्या आयुष्यात आली! आणि महाराष्ट्रातील अनेक भाग आम्ही ती ऐकायला मिळावी म्हणून अक्षरशः पिंजून काढू लागलो. माझ्या बरोबर एक-दोन उत्साही मित्र होतेच. शिवाय महाराष्ट्राबाहेरचे संगीत देखील मी कान देऊन ऐकू लागलो. उत्तर भारतातील पहाडी, मध्य-प्रदेशातील लोकसंगीत, उर्दू कव्वाली, राजस्थानी मांड, बंगाली राविन्द्र्संगीत आणि भटियाली इत्यादी माझ्या कानी पडू लागले. त्यामुळे ह्या प्रांतातील भाषा आणि पर्यायाने ह्या सर्व भागातील लोकसंस्कृती मला आकर्षित करू लागली. आणि मग त्या प्रांतात जाऊन तिथले संगीत ऐकणे हा माझा छंद झाला. भीमसेन जोशींचे 'तुंगा तीरदी' हे भजन तुंगभद्रा नदीच्या काठी ऐकताना आपण ह्या उत्तर कर्नाटक संस्कृतीचा एक भाग आहोत असेच वाटायचे. हेच बाकी बऱ्याच ठिकाणचे. आणि तेव्हा मला जाणवलं की पर्यटन आणि भटकंती ह्यातच काहीतरी केलं पाहिजे. कॉलेजची वर्ष आटोपली आणि मी माझी स्वतःची travel company काढायच्या मागे लागलो. आणि जंतूंचा विषय शिकायला आलेला मी पार बिघडलो!
ह्याच संगीत ऐकण्याच्या निमित्ताने मिरासदार काकांशी प्रथम ओळख झाली. ११ वी सुरु असताना कुमार गंधर्वांची एक दुर्मिळ रेकॉर्ड मी शोधत होतो. 'तारी दे गारी' हे मध्य भारतातल्या माळवा प्रांतातील एक सुंदर लोकगीत आहे. कुमारांच्या आवाजात ते प्रथम मी रेडिओवर ऐकलं आणि त्याच्या प्रेमात पडलो. आणि आपल्या 'collection ' मध्ये ह्या आणि त्यांनी गायलेल्या इतर लोकगीतांचा समावेश करायचा हे मी ठरवून टाकलं! आणि एके दिवशी घरी येताना समोरच्या बिल्डींगमधून हेच गाणं ऐकू येऊ लागलं! तळ मजल्यावर असल्यामुळे तिथल्या gallery च्या बाहेर मी उभा होतो. तेवढ्यात आतून " काय पाहिजे " असा आवाज आला. ह्या मिरासदार काकू. गाणं ऐकतोय असं सांगताच आतल्या काकांनी 'वा वा' ओरडत मला दाद दिली आणि मला आत बोलावलं. माझं आता काही खरं नाही ह्या विचारात मी आत गेलो आणि काकांनी चक्क समोर बसवून ते गाणं मला परत ऐकायला दिलं. मी त्यांचे आभार मानले आणि एकमेकांकडे असलेल्या गाण्यांची देवाणघेवाण करूया असा प्रस्ताव समोर ठेवला.
"आजच्या पिढीतल्या लोकांना भारतीय संगीतात आवड आहे हे ऐकून बरं वाटलं....तू शास्त्रीय संगीत पण ऐकतोस का?"
"हो...कानाला चांगलं वाटेल ते सारं काही मी ऐकतो", मी म्हणालो.
" आमच्या घरी कुठले ते पाश्चात्य सूर ऐकायला येतात. जरा समजावा त्यांना...", असं काका म्हणाले इतक्यात आतून आवाज आला, " बाबा प्लीजच!" इंग्रजीतल्या प्लीजला 'उगीचच' च्या ऐटीत 'प्लीजच' कोण म्हणतोय हे बघायला मी त्या दिशेने मान वळवली. आणि अनुष्का मला त्या दिवशी प्रथम दिसली. अख्खं कपाळ दिसेल असे सगळे केस मागे खेचून त्याची वेणी बांधलेली आणि चष्मा घातलेली ही मुलगी रात्रीचे ८ वाजल्यापासूनच night dress घालून होती. रात्रीच्या ड्रेस मध्ये मुली अधिक सुंदर दिसतात हे चेतन भगत म्हणतो ते काही खोटं नाही! प्रथम दर्शनास प्रेम होतं वगेरे वर माझं विश्वास नाही. पण एकमेकांबद्दल कुतूहल नक्कीच वाढतं. तिने माझ्याकडे बघून गंभीर असलेला चेहऱ्यावर किंचित हास्य आणलं. आणि त्यादिवशी आमची ओळख झाली. पण माझ्यासाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे मुलीच्या बापाच्या नजरेत चांगली 'image ' ठेवणे! आणि नंतर माझे त्यांच्याकडे जाणे वाढले. त्याला थोडेफार कारण अनुष्काचे होतेच! परंतु ही व्यक्ती किती हरहुन्नरी आहे हे मला नंतर समजू लागले. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणे हा उद्देश सुद्धा असायचा. नंतर मी आणि अनुष्काने एकाच कॉलेजमध्ये मैक्रोबायोसाठी प्रवेश मिळवला आणि माझे मिरासदार कुटुंबाशी संबंध दृढ होत गेले. सुरुवातीला संगीत हा विषय असायचा. त्यानंतर लोककला, राजकारण, समाज, अंधश्रद्धा...कुठलाही विषय घ्या ...आम्ही चर्चेस नेहमी तयार! साधारण एफ. वाय संपेपर्यंत माझी आणि दादांची चांगलीच जोडी जमली होती. अधून-मधून काकू देखील चर्चेत सामील होत असत.
एकदा असाच गोव्याला जायचा प्लान झाला होता. जायच्या दोन दिवस आधी मी दादांना भेटायला गेलो होतो. त्यावेळेस गोव्याचा लोकजीवनावर आमची दोन तास चर्चा रंगली होती. शेवटी मी त्यांना पटवून दिलं कि गोव्याच्या संगीतात पोर्तुगीज सुरांचा तितकाच समावेश आहे जितका भारतीय सुरांचा! माझ्याकडे गाणीच तशी होती. पण खिलाडूवृत्तीने दादांनी आपली हार मान्य केली होती आणि तुझ्या 'ज्ञानाला माझा सलाम' अशी दाद देखील दिली होती. आणि नंतर एका टिपीकल पालकाप्रमाणे अनुष्काला 'ह्याच्याकडून काहीतरी शिका' असा उपदेश देखील दिला होता. अनुष्का मी सांगतो ते सारे ऐकू लागली होती हे दादांना कुठे माहिती होतं! ते एस.वाय चे दिवस होते.
दादांचं वाचन अवांतर होतं. ते स्वतः एका बऱ्यापैकी मोठ्या कंपनीत काम करत होते पण त्या कंपनीचे विदेशी व्यवहार काही फार नव्हते. तरीही एकंदर जगाच्या घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. टाईम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाईम्स हे दोन्ही पेपर ते रोज वाचायचे. त्यामुळे आता शिक्षण झाले की पुढे काय करायचे ह्या विषयावर त्यांच्याशी बोलताना फार माहिती मिळायची. एकंदर मायक्रोबायोला भारतात फार कमी पगाराच्या नोकऱ्या आणि कॉलेज मध्ये काही विशेष न शिकवलं गेल्यामुळे आम्ही सारे सदैव संभ्रमात! एकतर नोकरी करताना नक्की काय करायचं, आयुष्यभर प्रयोगच करत राहायचं का? कुणीतरी आम्हाला सांगितले की परदेशात जा....उत्तम संधी आहेत. पण ते तरी खरं आहे का? आश्चर्य म्हणजे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला दादांकडून मिळाली.
" आपल्याकडे मध्यमवर्गातल्या लोकांना त्यांच्या मुलांना परदेशी पाठवायचे आहे. त्यातच त्यांना धन्यता वाटते. पण तिकडे परिस्थिती काय आहे ह्याचा आपण आधी अभ्यास करतो का? तुला माहिती आहे त्या देशातली मुलं महागाईमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना आपण लागतो....कमी पैशात काम करणारे. आणि आपण त्यांच्या त्या थोडक्या डॉलर पगाराच्या मोहात पडतो कारण आपल्या मनात गुणिले ५० हे गणित असतं. पण मिळणारे डॉलर तिथल्या हिशोबाने अगदी तुटपुंज! हां, जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात झोकून द्यायचे आहे...नवीन शोध लावायचे आहेत तर मात्र तुम्ही परदेशातच गेलं पाहिजे. कारण अशा झपाटलेल्या माणसांचे आपल्या देशात कौतुक होत नाही....त्यांना थोडा कमी पैसा चालतो....कारण त्यांचे काम हेच त्यांचे आयुष्य असते. तुमची मैक्रोबायो ही संशोधनावर जोर देणारी 'field ' आहे. त्यामुळे तुला जर झोकून द्यायचे
असेल तरच परदेशी जायचा विचार कर. मी अनुला पण हेच सांगतो आहे. नीट विचार करून निर्णय घ्या. तू graduate झालास की तेच पुढे केलं पाहिजेस असं नाही. तुला हे सारे छंद आहेत....ते जोपास ना...तुला भटकंतीची आवड आहे...त्याच्यात काहीतरी कर....तुझ्याकडे असलेलं हे ज्ञान तुला खूप पुढे घेऊन जाऊ शकेल. 'वल्ली अमेरिकेतल्या' हे पुस्तक वाचतोय सध्या. त्यात हेच सगळं दिलंय", दादा मला सल्ला देत होते.
" आणि आज-काल तुम्हा मुलांना ना झटपट पैसा पाहिजे रे. सगळं काही लगेच! आमच्याकडे बघ....मी ह्यांच्याशी लग्न केलं तेव्हा काहीही नव्हत. पै- पै साठवून आम्ही हा संसार उभा केला", काकूंनी मध्येच आपलं एक मत व्यक्त केलं. " हो ना. वास्तविक आपल्या देशात हा जो पैसा आला आहे तो ह्या बाहेरच्या कंपन्या आल्या आहेत म्हणून. कॉम्पुटर इंजिनिअर परदेशी कंपनीला सर्विस पुरवतात आणि ह्या परदेशी कंपनी आपल्याकडून काम करवून घेतात. त्यांना तिथून कमी डॉलरमध्ये काम करून मिळतं....तुम्हाला २५,००० रुपये मुळात मिळतात कारण तुमच्यामागे त्या कंपनीला त्यांच्या हिशोबाने ५०० डॉलरच खर्चावे लागतात. हेच काम त्यांनी तिथल्या माणसाकडून करवून घेतलं तर तिथली माणसं २००० डॉलर मागतील. जी गोष्ट कॉम्पुटर इंजिनिअरची तीच गोष्ट कॉल-सेंटरची. आणि एवढे पैसे बघून आपली लोक त्या क्षेत्रांकडे वळतात...आवड असो व नसो... आता मला सांग....त्यामुळे इतर क्षेत्र मागे पडली आहेत. सगळ्यांना कॉम्पुटर मध्ये जायचे आहे. आणि ह्या कंपन्या कुठलेही इंजिनिअर असो...त्यांना शेवटी कॉम्पुटर मध्ये खेचतात! पैशासाठी आपण असं करायला तयार देखील होतो. त्यामुळे काय झालंय...आपल्याकडे नवीन काहीतरी करायची...झपाटून जायची प्रवृत्ती नाही राहिली. भारतात कुठलाही शोध लागला नाही.....तुमच्या क्षेत्रातच बघ ना....एकही मुख्य शोध नाही....ह्याची कारणं ही इथे आहेत. पैसा कमवायचा नाही असं मी म्हणत नाही. पण आपल्यातल्या माणसाला हरवू नका....जर आवडीच्या क्षेत्रात काम केलं तर पैसे नक्कीच मिळतील."
दादांची ही वाक्य ऐकून खूप धीर आला होता. अनुष्का देखील हे सारं ऐकत असायची. तेव्हा आमच्यातल्या प्रकरणाची दाद न लागू देणे ही खबरदारी आम्ही घेत होतो. तरीही दादांचे बोलणे सुरु असताना तिच्याकडे लक्ष जायचं. गंभीर चेहरा करून ती तिच्या बाबांकडे बघत असायची. ते तिचे एकटक बघणे सुद्धा किती सुंदर दिसायचे....असं वाटायचं तिच्याकडे पाहत राहावं. खूप प्रेम होतं तिचं तिच्या बाबांवर! शेवटी दादांचा हा सल्ला उपयोगी पडला. घरून सुद्धा काही दडपण नव्हते. त्यामुळे मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात पाउल ठेवायचे ठरवले. Graduation झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आणि योगायोगाने माझ्या वाढदिवसाला श्रीवर्धन आणि इतर परिसर अशी tour काढली. सुट्टीत त्याची जाहिरात देखील केली होती. बसची व्यवस्था झाली आणि नंतर तिकडे राहण्याची सोय पण केली. खूप माहिती जमवली आणि अख्ख्या यात्रेत सर्वांना ती माहिती मिळावी अशी व्यवस्था केली. ह्याच टूरला दादांनी मला आशीर्वाद दिला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील. आणि मग मी झपाटून गेलो. फेसबुकचा वापर केला, सगळीकडे contacts बनवले. 'Deal ' केल्या. आणि बघता बघता मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी ह्या यात्रा नेऊ लागलो. माझी संगीताची माहिती, लोककलांची माहिती मला नंतर उपयोगी पडू लागली. ज्या भागात जाऊ तिथल्या लोक-कलाकारांना मी पाहुण्यांसमोर त्यांची कला सादर करण्याची संधी देऊ लागलो. लोकं त्यामुळे खुश असायची. मला आता एक चांगला 'customer base ' मिळाला होता. आणि अडीच ते तीन वर्षात मी माझ्या पायावर उभा देखील राहिलो होतो. पुढे ऑफिस बांधायचे होते. महाराष्ट्राबाहेर आता माझी मजल मध्य प्रदेश पर्यंत गेली होती. तिथल्या संस्कृतीची ओळख असल्यामुळे माझे 'contacts ' लगेच जमायचे आणि त्यांच्याशी भागेदारी चांगलीच बहरायची. पुढे देशातच नव्हे पण जगभरात हिंडायची मला आता खात्री झाली होती.
" होईल रे! काळजी करू नकोस. तू ज्या प्रकारे प्रगती करतो आहेस....नक्की होईल!" दादांनी प्रोत्साहन सुरूच ठेवले होते. अधून-मधून काकू पाठीवर थाप मारायच्या. त्यांचं ते आम्ही मिळून संसार केला आणि पैसे जमवले हे कडवं असायचं अधून-मधून. एकूण काय, मी आता मिरासदार कुटुंबात एकदम हिट झालो होतो!
" शेवटी मराठ्यांनी दिल्लीवर चाल केलीच! वा! अभिनंदन! आज मला फार अभिमान वाटतो तुझा. तू त्या थोड्यांपैकी आहेस जे स्वतःची दिशा स्वतः ठरवतात. आणि नंतर ती कायम ठेवून पुढे घोडदौड सुरु ठेवतात! आता पुढे काय काय करायचा विचार आहे?" दादांनी मला विचारलं. मी दिल्लीतल्या महाराष्ट्र मंडळाशी संपर्क साधून तिकडे पाहुण्यांची राहायची सोय केली होती. दिल्ली, आग्रा, मथुरा अशा तीन शहरांची ती यात्रा होती. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यादिवशी यात्रा संपवून घरी आलो आणि अनुष्का MBA झाल्याचा निकाल लागल्याचे कळले. घरी आईस-क्रीम खायला बोलावले असताना दादांनी हा प्रश्न मला विचारला. मी माझे देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यात यात्रा घेऊन जाण्याचे मनसुबे सांगितले. आणि ६-७ वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर यात्रा सुरु करायचा विचार बोलून दाखवला. दादांनी प्रसन्न मुद्रेने शुभेच्छा दिल्या होत्या.
आणि मी दादांना बाबा म्हणण्याची स्वप्न आता रंगवू लागलो होतो.
- आशय स्मित

Tuesday, May 1, 2012

Oba....the Cab Driver.

I began the summer of 2011 with a visit to Austin, Texas for a concert - a concert which was in my planning cards since January. The mention of that concert on a website in the beginning of the year made me decide that I would be attending it under any circumstances. No surprises, as it featured two of my favorite instrumentalists - Pandit Shivkumar Sharma and Ustad Zakir Hussain. Alright...Alright...no adjectives here, as I am aware of the limitations of my blogging space! ;) I worked extra hours, constricted my spending, bought home cheap food, opened a new saving account ( there was a scheme in Chase Bank that if I would open a new saving account, I would earn 100 dollars, provided I used that later) - all to fund my trip to Austin. Those 100 dollars came handy to block a ticket on the very first row of the auditorium ( right in front of the maestros!). Rest of the money was saved for a bus trip from San Antonio to Austin ( and vice-versa)  and  traveling expenses within Austin. This was going to be my first visit to Austin with no idea about the city beforehand. Hence the possibility of using a cab was not ruled out! The concert was awesome to say the least ( no..no adjectives!). But what I also remember about this day is my encounter with an interesting personality. This person was a sincere, hardworking cab driver who helped me reach the concert venue from the Austin Greyhound bus station.

I reached Austin at 1 pm and still had four hours for the concert which was to start sharply at 5 pm. Austin is a bubbling city and hence exploring Dowtown was on my plans. From my previous experience with Greyhound bus stations at San Antonio and Houston, I thought the one at Austin would also be located in Downtown. But I was mistaken! The one at Austin is way outside the city. Hence in order to make any further plans, I thought of first relocating myself to downtown. And as there was no bus stop around ( for the city-buses) I decided to approach a Yellow Cab. And after walking a few steps, I did find one. Inside this cab was a weak cab driver reading a newspaper and smoking a cigarette. Dressed in a casual half-pant and a funky Tee, this man had on himself a glimpse of a typical Sunday afternoon. I asked him to take me to Sixth Street, Downtown, as this was the only place I ( and perhaps everyone outside Austin) was aware of. As the concert featured Indian Music, I decided to opt for an Indian Restaurant for lunch. And there started our conversation.
"Are you Indian?" He turned back and asked.
"Yes", said I.
" I have dropped a lot of Indians to this restaurant. I have a lot of Indian friends....some of them are my friends...some of them are my friends' friends", he recommended a restaurant for me. It seemed that he was ready for a conversation and hence I also chipped in.
"Cool! Most of them must be students at the University."
"Yes", said he
"So I hope you have had a good experience of my countrymen!" I jokingly made a statement with an obvious intention of progressing with the conversation. I like talking to new people, knowing about them and this person looked as if he was ready for the same.

"Yes sir! They are nice .... and very much social. I have had a good experience of them...always roaming in groups....you would hardly see them alone! But Sir, I would tell one thing....please do not mind....they are a group of people, along with the Chinese, who refuse to pay us tips! But they do not know, that tip is a source of income for us! Perhaps, this is not a culture in our part of the world, but it is definitely a culture here!"
Was this an indication to me, I wondered. Does a lone Indian, wandering freely in a cab, makes him think that I could afford to give him a hefty tip? For what he did not know were my extreme cost cutting measures since the past couple of months in order to make this trip happen. ;) I smiled back as a gesture. What else could I do? I had experienced frowning faces of American waiters whenever I used to enter any restaurant. The fact that this brown guy would not pay us a tip reflected ( and rightly so I realized later!) on the their faces.

The cab was speeding on the freeway. Typical Texan countryside surrounded us. I could see an IHOP somewhere. McDonalds was making an inviting gesture. A gas station, a typical Texan 'Whataburger' and then for some distance a beautiful yet a vacuuming countryside. I opened my wallet and found out that I did not have enough cash with me. 
"Can I pay you by my debit card?" I asked.
" Yes sir! But personally I would ask you to pay cash. Because when you swipe the card, we have to give some amount to the card company....if you pay us in cash, that money is not taxed! These companies take a lot of money from us!" 
Somehow I felt some truth in him saying this. However I was helpless. I did not have much cash then and hence opted for the card mode. Austin downtown was making its presence felt now. The countryside now made way to the tall buildings. The freeway turned broad. Exit boards indicating directions to places became prominent. And suddenly we were in a clutter of buildings, vehicles, people, restaurants, clubs, buses - in an urban environment!

" Where do you wanna go after this?" He asked me when we reached the destination. He had obviously guessed that I did not come to Austin to eat in an Indian Restaurant. I gave him the destination address.He asked me to call him after I finished my lunch so that he would come back and take me there. Carefully judging the time factor, I was now convinced that searching for buses and then planning my trip further was of no use. I asked him for his number and his name. "Oba!" said he. "Call me after you are done with your lunch. What is your name?"
"Andy", said I.
 Lunch was an Indian buffet. The waitress was an Indian girl, perhaps studying at the University and working part time to fill her pockets. The hospitality towards her fellow countryman was, as a result, part time!
After a contented yet heavy lunch at the Indian Restaurant, I was ready for the journey towards the concert place. The concert was about to start at five and the organizers had asked people to come by four, so that everybody enters the auditorium by five and the concert begins in time. I finished my lunch by two, after a good forty minutes of time spent at the table! Yeah, I spent a lot of time, giving justice to each and every morsel of food! Not knowing the bus service and not wanting to be late for the concert, I decided to honor Oba's offer. Also, the fact that he was a talkative guy, led me to go with my decision. I called Oba and he did turn up - exactly in five minutes.
"Hello Andy. Welcome back! We will go with the shortest route possible and avoid the toll road! If we go by the toll road, the cab driver himself has to pay the toll!" I first asked him to take me to a Chase Bank ATM so that I could replenish my wallet and pay Oba with cash. He found out an ATM and after I was done, set his electronic meter to the destination. I was really impressed and surprised by this gesture of his.
I was secretly beaming for the fact that the 'toll' system has taken a 'toll' of the Americans as well! As we were going past the Downtown roads, Oba decided to give me a glimpse of the University campus. He knew that I was a student at San Antonio, so he decided to explain the University campus to me.

"This is the largest campus in Texas! People come to this University for their undergraduate studies....there are good universities in Texas elsewhere, but people want to come here! This is all because of the sixth street....people can study on weekdays and drink and enjoy on weekends!"
" Do you go and party on the sixth street?" I asked.
"Ohh yes, at times. But I am not crazy to waste my time on drinking and partying. We all have a family to look after. We cannot waste our time and money like this!" he replied.
As the road progressed, Oba, with an enthusiasm of a university student showing-off his campus, began again, "This is the building which is the main library. You know.. each department has its own library... but still this building is the headquarters of them all.... now, this is the law department and this is the Science department."
"But I have heard that you should be an intelligent guy, to get admitted to this university", I chipped in.
"Yes!" said he." This is one of the best universities in the country. I see a lot of Indian students on campus every time I come here. They have high cut-offs... so getting an admission is indeed difficult." The university shuttle, moving at a very slow pace, resulted in our cab going slowly behind it. I observed the sprawling university campus. Calculations began in mind, that how much bigger this campus is as compared to the university of mine. We left downtown and took the freeway. The topic of the university was left behind and Oba asked me for what I was at Austin.

"I am here to attend a concert", I replied. "There is an Indian Association here which organizes cultural stuff  and this year I made it to Austin for the first time", I replied.
"You have a good cultural presence here", Oba interrupted me and then continued talking. "I have seen a lot of Indian events happening around .... I have dropped a lot of Indians at these places... many times. You guys have a good population in this city. So what is the concert about? Who is coming?" I gave him some details about the concert.
"Sounds interesting!", came his reply.
" So where are you from?" I asked. "I am from Africa. Do you know the country Guinea?" he asked. I replied in the affirmative. "So when did you come here?" I asked with more curiosity.
"I came here twelve years ago. I came here for school. I spent some time in Philadelphia, then some in Phoenix. Then I spent quite a lot of time at Denver. I was working in a company... but then due to this recession .... I lost my job,as the company opted for bankruptcy. Hence, I took up driving the cab."
His life was a good candidate for a story. The cab was completely surrounded by the countryside now. Barring some vehicles, there was hardly anybody on the roads. It was a peaceful, calm surrounding. No hustle of the city....a perfect time for a conversation. I decided to extend the conversation with this interesting personality.
I asked him if driving a cab makes him earn enough. " No sir! We have to pay the company five hundred  dollars a week. Any amount over that is ours. So if we have few customers coming up, we end up earning very less amount of money. That is difficult for us, as we have to run a family."
So the company it seemed ended up taking 2000 dollars a month from every cab driver so that he or she could use their name. That is a huge amount of money, I wondered! Having seen, Micheal Moore's documentary on capitalism, I asked him, "Do you think, this is because of the capitalist economy?"

"Yes!" came his reply and he began to elaborate. "This is the worst system for workers. You see... this is an immigrant country. People here do not care if you live here or you are not from here. Everyone here looks to snatch money from the workers. The people who have money make the people not having money work for them. They exploit them and become rich. It is we, who live in difficult times and  struggle to meet up the expenses. Very bad for the workers. Hence I asked you to preferably pay cash. Otherwise, the credit card company would again charge us and make money."
"So are the common people happy here?" I asked with a mix of curiosity, shock and sorrow.
"You see Andy. The people do not like it this way. The government all the time announces that it is fair, but it announces only at the time of elections!" It was clear that politicians all over the world are the same! How many times we have encountered politicians in India giving assurances? The answer is yes, during the elections! Oba continued, " Do you know.....when President Obama was campaigning for the elections, there was a rumor that he is following socialist principles! But when the rumors became strong, the trend of people voting for Obama in fact increased! So, it shows that the people here do not favor capitalism!"
 Man!! The same point was  raised in Moore's documentary. Is Moore correct? I began wondering.
"So what do you want to do ahead?" I asked him, as we were nearing the concert hall.
" I would like to go back to Philadelphia. I like the cold weather. I do not like the weather at Texas. There I would start a business of import-export between Guinea and the United States. I also would like to build up a family. After all, we are family oriented people. I would like to keep my parents happy and would like to live with them for the entire life." Oba elaborated his dreams.
I could observe Cedar Park High School's board from a distance. Surrounded by a vast countryside and a vast open space was this school campus. We had to drive way inside to reach the entrance. Kurta-clad men and Saree-clad females were seen getting down from their vehicles. Huge made-up faces of the ladies made me feel convinced that I was at the right place. The excitement of seeing my favorite artists perform was surging inside. One side of my mind was busy imagining which 'Raag' Panditji would play or which 'tukda' will the Ustad roll out from his sleeve!  

As I prepared to get down after paying the fare and of-course the tip, Oba had a piece of advice for me.
"Andy, you have a lot of people from your country here. There must be a lot of Indians in this concert today. Talk to them. Do not feel shy. Make new contacts. You will know that later... there are benefits. These contacts would help you get into a good work position. Always keep this mind. Enjoy the concert. Thank You. Bye." I thanked him....for all those kind words he gave me. He himself had lost his job and  yet he could advice me how to progress on the job front. This requires a lot of courage. I see a lot of people getting into frustrations, seeing others get a job and prosper. But this guy was an altogether different person! I whispered to God and asked him to help Oba's dreams get a direction which he wanted. Because people of such feelings, such maturity, are indeed rare to find these days!
Destiny gave me another opportunity to learn something. This time it was from a person I never knew before and I do not know, if I would meet him later. But your day passes on a happy note, when you gain such experiences. I remembered my tenth standard Hindi textbook chapter no 1. It had a guy called Satish, talking to a cab driver in Australia called David. The experience Satish gets from the life of David was resonant to the experience I got from Oba's life. Life is interesting on such days.
That I experienced Oba's life story on Labor Day ( 1st May) was a coincidence or an eye-opener?







- Aashay 



Image Credits:
1. http://blog.travelpod.com/travel-photo/rama0999/1/1246826585/austin-greyhound.jpg/tpod.html
2. http://www.binghamtonyellowcab.com/
3. http://www.fishingkaki.com/forum/viewtopic.php?highlight=&p=186803
4. http://www.amillionlives.net/austin-tourism-travelling-options-in-the-american-musical-city.html
5. http://thecountrynotthestate.wordpress.com/2011/11/30/armenia/
6. http://www.terratrc.org/blog/reading-the-fine-print-when-shopping-online
7. http://www.greateraustinhomes.com/owner-financed-homes-in-cedar-park-texas/