Pages

Total Pageviews

Wednesday, January 25, 2012

मैफलींची भैरवी - पं. भीमसेन जोशी

 माझ्या आयुष्यात ९ डिसेंबर २००७ ह्या दिवसाची नोंद 'अविस्मरणीय' आणि 'अवर्णनीय' अशीच होईल. माझं वय आत्ता फक्त २४ जरी असलं आणि साधारण ७० वर्षापर्यंत जरी आयुष्य जगेन असं म्हटलं तरीही 'त्या' दिवशी आलेला अनुभव परत उघड्या डोळ्याने बघायला मिळेल का, ह्याचे उत्तर मात्र नकारार्थीच वाटते! दिवसच तसा होता तो. त्याच्या आदल्या दिवशी, शनिवारी, काही सेकंदातच मी ठरवून टाकले होते की काहीही झाले तरी चालेल, आपण पुण्याला सवाई गंधर्व संगीत महोत्सवाला जायचेच! ६ डिसेंबर, गुरुवारी सुरु झालेल्या ह्या संगीत सोहळ्याची चर्चा सगळीकडे दरवर्षीप्रमाणे सुरु होती. पेपरला बातम्या येत होत्या, इंटरनेटवर प्रतिक्रिया येत होत्या ( आता इतिहासजमा झालेल्या 'ओर्कुट' वर लोक त्यांचे अनुभव सांगत होते.) कुणी पं शिवकुमार शर्मा ह्यांनी वाजवलेल्या 'दुर्गा' रागात रमले होते, तर कुणी अजय चक्रवर्थी ह्यांच्या गाण्याची तारीफ करीत होते. काही लोक जसराजांच्या रंगलेल्या मैफलीचे वर्णन करीत होते आणि त्यातून बाहेर कसे येता येत नाही हे आनंदाने सांगत होते. मी मात्र गेल्या काही वर्षांची शोकांतिका उजळीत होतो. कॉलेज, परीक्षा आणि तत्सम क्षुल्लक  कारणांमुळे अनेक संगीत मैफली चुकवलेला मी, त्यावर्षी सवाईला जाऊ शकलो नव्हतो. कारण होते माझे 'ग्रेज्युएशन'चे शेवटले वर्ष. पण एका गोष्टीने माझे लक्ष सवाईकडे वळवून घेतले होते. ती होती एक अफवा!
                    
तसं पाहिलं तर पुणेकरांना बोलण्याची फार हौस! आणि ह्यामुळे, त्या शहरात रोज किती अफवा पसरत असतील ह्याची पुणेकरांनासुद्धा गिनती नसेल! पण ह्या अफवेकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणा ठरला असता. ती अफवा म्हणजे,  'ह्यावर्षी सवाईला पं. भीमसेनजी गातील अशी शक्यता आहे.' आणि ही गोष्ट मला पुण्याहून येणाऱ्या नातेवाईकांमुळे  समजली.
भीमसेनजी गाणार! गेल्या काही वर्षांपासून ज्या एका व्यक्तीमुळे आपण 'व्यक्त' होत आलो आहोत ती व्यक्ती गाणार! ज्या एका व्यक्तीमुळे आपण एका उच्चकोटीच्या   आनंदला हसून, रडून, नाचून, गाऊन, डोलून आणि स्वतःचे अस्तित्व विसरून दाद देत आलो आहोत ती व्यक्ती गाणार! त्यांच्या गाण्याची केवळ शक्यता वर्तवली गेली होती तरीही माझी ही अवस्था.
                                 
आणि ह्या अवस्थेत मी रविवारी सकाळी ४ ला उठलो. न कंटाळता उठायला लावणारी पहाट होती ती! लगेच आवरले, थोडासा नाश्ता केला आणि ५ च्या पुण्याच्या गाडीत बसलो. ' ते खरच गातील का?' - हा विचार सारखा मनात. २००३ नंतर पहिल्यांदा ऐकणार होतो मी त्यांना. १० वी, १२ वी, सी.इ.टी, ह्या परीक्षा, त्या परीक्षा, कॉलेज  वगैरेमुळे त्यांच्या अनेक मैफली चुकल्या होत्या माझ्या. भारतात जेव्हा कुठल्याही मुलाचा/ मुलीचा जन्म होतो तेव्हा परीक्षेचे कवच त्याच्या भोवती त्याच्या नकळत घातले जाते. कला, क्रीडा, नृत्य, शिल्प ह्या शत्रूंपासून त्याचे संरक्षण हे कवच नित्याने करीत असते. ८.१५ च्या सुमारास डेक्कनला उतरलो. आणि तिथून चालत रमण- बाग येथे जाण्यास निघालो. चालता चालता 'इअर-फोन्स' मधून 'राम रंगी रंगले' सुरु होतेच! साधारण ८.४५ ला मी तिकिटाच्या रांगेत उभा होतो आणि सवाईच्या त्या प्रचंड समुदायात शामिल झालो. लोकांचा समुदाय हा वर्षभर फक्त मोर्च्याच्या ठिकाणी किंवा दंगलीच्या वातावरणात आम्हा शहरी लोकांना बघायला मिळतो. पण हा समुदाय एवढ्या शिस्तीत जमलेला बघायचे भाग्य केवळ सवाईलाच! मी गेलो तेव्हा श्रीकांत देशपांडे गात होते. हातोडीने हाणल्या सारखे ते 'तोडी' चे स्वर काही मला ऐकवेना. किराणा घराण्याचे आत्ताचे गायक हे भीमसेन जोशी ह्यांची नक्कल कशी करतात ह्याचाच प्रत्यय येत होता. मी मात्र तेवढ्यात मागे असलेल्या दुकानातल्या वडा आणि कॉफी ह्याचा आस्वाद घेऊ लागलो. मग ह्यांचे गाणे संपेपर्यंत फोटोंचे प्रदर्शन बघ, विकायला ठेवलेली पुस्तकं चाळ अश्या गोष्टी मी केल्या. त्या सुरु असतानाच सतारीचे सूर कानी पडले. विख्यात सतारवादक उस्ताद विलायत  खान ह्यांचे पुत्र उस्ताद शुजात खान व्यासपीठावर बसले होते. शुजातला मी पहिल्यांदा त्या दिवशी ऐकले आणि ती मैफल मी अजूनसुद्धा विसरलो नाही. त्याने सतारीला गायला लावीत 'रहिया बिलावल' हा राग वाजवला आणि नंतर पहाडी वाजवून वादनाचा शेवट केला. त्याचे वादन ऐकताना  एकाच प्रश्नाने मनात घर केले होते. त्या सतारीच्या तारेला जाणवत तरी असेल की आपल्याला छेडले जात आहे? इतका अलगद हात आहे शुजातचा!
                                                                           
त्याची सही घ्यायला 'back stage ' गेलो. सही घेऊन मागे वळतोच इतक्यात निवेदक श्री. आनंद देशमुख ह्यांनी एक सूचना केली. ती सूचना ऐकताना मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मीच काय पण माझ्यासारखे तिथले हजारो लोक टाळ्यांच्या जल्लोषाने त्या सूचनेचे स्वागत करीत होते आणि 'आपण बरोबर ऐकलं ना' ह्या संभ्रमात देखील होते! भीमसेन जोशी ह्यांना गायची परवानगी त्यांच्या डॉक्टरांनी दिली होती. पण फक्त अर्धा तास. तेवढ्यात माझा मित्र कृतार्थ मला भेटला. " च्यायला, हा कुठला डॉक्टर आहे रे. ह्याला पैसे द्यायला मी तयार आहे. अर्ध्या तासाची 'लिमिट' दोन तास करायला लावू त्याला",मी म्हणालो. खळखळून हसून कृतार्थने दाद दिली. तो देखील साहजिकच एकदम खुश होता.
लगेच लोकांचे फोन सुरु झाले. " अरे, ऐक! कुठे असशील, कसा असशील, थेट इकडे ये. अण्णा गाणार आहेत!" मी देखील घरी आईला फोन करून ही बातमी सांगितली. एकाएकी सवाईमध्ये माणसांची गर्दी वाढू लागली. ह्या माणसाने आपल्या सात सुरांमुळे लोकांवर काय जादू केली आहे ह्याचेच दर्शन तेव्हा घडत होते.
जसा वेळ पुढे जाऊ लागला तशी लोकांमध्ये अस्वस्थता वाढू लागली.कधी एकदा अण्णांची गाडी येईल ह्याकडे लोकांचे लक्ष लागले होते. त्यामुळे व्यासपीठावर गात असलेल्या अजय पोहनकरांच्या गाण्याकडे लोकांचे जरा दुर्लक्ष झाले. लोकांना त्या 'पहिल्या षड्जाची' आस अधिक होती. आणि इतक्यात आम्हाला ती गाडी येताना दिसली. टाळ्यांच्या कडकडाटाने लोकांनी त्या गाडीचे स्वागत केले. आणि आम्ही बरेच लोक त्या गाडी भोवती उभे राहिलो. पोहनकरांनी देखील गाणं लवकर संपवलं.           
                               
गाडी भोवती गर्दी वाढताच पोलिसांना बोलावले गेले. आम्ही मात्र गाडीची काच खाली कधी केली जाईल ह्याची वाट बघत होतो. तेवढ्यात भीमसेन ह्यांच्यासाठी कपभर कॉफी मागवली गेली. आणि त्या निमित्ताने 'त्यांचे' दर्शन सगळ्यांना झाले. धीर, गंभीर, शांत अश्या नेहमीसारख्या त्यांच्या अवस्थेत ते बसले होते. भोवती असलेल्या गर्दीने त्यांना अजिबात विचलित केले नव्हते आणि त्यांना त्या गर्दीची तक्रार देखील नव्हती. लोकांसाठी गाणारा हा गायक आपल्या चिंतनात मग्न होता! :)
काही क्षणात त्यांच्यासाठी 'wheel -chair ' आणण्यात आली आणि तेव्हा ह्या महागायकाच्या वयाची साऱ्यांना आठवण झाली. हा माणूस तब्बल ८६ वर्षांचा होता! भीमसेनांना त्या खुर्चीत बसवले गेले आणि ती खुर्ची व्यासपीठावर नेली गेली. हे क्षणच इतके भावूक करणारे होते की काही लोकांना आपले अश्रू आवरले नाही. एका गायकाची तळमळच ती. शेवटच्या क्षणापर्यंत गावं असं वाटणाऱ्या पिढीतले गायक ते!
                            
आणि भीमसेन व्यासपीठावर बसले. काही मिनिटे चाललेल्या टाळ्या थांबल्या आणि मग मात्र एकदम शांतता पसरली. गेल्या अनेक दशकांची आम्हाला सवय! मग त्यांचे वय ८६ असेल तरी काय झालं. ते 'भीमसेन जोशी' आहेत ह्याची साक्ष पटत होती. तबल्याला भारत कामत, हार्मोनियमला सुधीर नायक, तंबोऱ्यावर माधव गुडी, आनंद भाटे आणि श्रीनिवास जोशी. पण मैफल सुरु करायच्याआधी भीमसेन एक वाक्य बोलले  ज्यात त्यांचे व्यक्तिमत्व आढळले - " मागच्यावर्षी शब्द दिल्याप्रमाणे थोडी संगीताची सेवा करू इच्छितो.....ते किती जमेल काय...मला आत्ता सांगता येत नाही ...आपण ठरवावं." मला ओरडून सांगावेसे वाटले, " पंडितजी, आम्ही कोण ठरवणार ह्याबद्दल...आपले सूर कानी पडणं हेच आमचं भाग्य आहे....आम्हाला असे लज्जित करू नका!"
आणि होयचं तेच झालं. स्पष्ट, दमदार षड्जाने सुरुवात झाली. थोडी आलापी सुरु झाली आणि सर्वांच्या लक्षात आले. हा राग मुलतानी. आलापित त्यांची साथ अधून मधून श्रीनिवास करीत होता. आणि पंडितजींनी त्यांचा ख्याल सुरु केला - ' गोकुल गांव का छोरा'. तीच बढत, तिची तार षड्जापर्यंत अलगद राग उलगडत जाणारी शैली आणि वयाची ८६ वर्ष पूर्ण केली तरी 'भीमसेन जोशी' आहेत असं सांगणारे ते त्यांचे सूर! त्यांच्या प्रत्येक जागेला आम्ही दाद देत होतो, एकमेकांकडे बघून हसत होतो, माना डोलवत होतो. आणि त्यांचा ताना सुरु झाल्या. प्रत्येक तान रसिकांकडून 'वाह वाह' घेऊन जात होती. लोकांचे डोळे हळू हळू पाणावत होते. इथे कुणीही कुणाला ओळखत नव्हते. पण त्यांच्या सुरांची भाषा सर्वांना 'connect ' करत होती. ह्या ८६ वर्षांच्या 'म्हाताऱ्याने' आम्हाला बांधून ठेवले होते.  ' कंगन मुन्दारिया मोरी' ह्या द्रुत तीनतालातील बंदिशीने त्यांनी मुलतानी संपवला तेव्हा मीच काय, माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना आपली आस्व आवरता आली नाही. नंतर सुरु झालं अभंग! 'अवघाची संसार, सुखाचा करीन', ह्या ज्ञानोबांच्या अभंगाने वेगळाच रंग भरला. भीमसेनांच्या मैफलीत अभंग ऐकणे ही एक पर्वणी असतेच पण ह्यावेळेस तो अभंग किती समर्पक होता. ८६ वर्षांच्या त्या आयुष्यात त्यांनी 'आनंदे भरीन तिन्ही लोकी' हे वाक्य आपल्या सुरातून साध्य केलं आहे की! पण हा अभंग ऐकताना एक गोष्ट माझ्या ध्यानी आली. त्यांच्या आत्तापर्यंतच्या अभंगात 'विठ्ठला' ही हाक अगदी जोशपूर्ण असायची. त्यांच्या जुन्या ध्वनिफितीत तसे जाणवेल देखील. तरुणपणी विठ्ठलाला दिलेली हाक ही त्या वयाला अनुसरून वाटते. त्यादिवशी त्यांनी गायलेले 'विठ्ठला...' ह्यात एक वेगळेच समर्पण जाणवले. उरलेल्या शेवटच्या वर्षात कसल्याच अपेक्षा न ठेवता देवाला मारलेली एक करूण हाक! अभंग ऐकताना मात्र आमचा  अश्रूंचा बांध फुटला. इतका वेळ पाणावलेले डोळे आता अश्रू ढाळत होते. शेवटची दहा मिनिटे भीमसेनजींनी 'रस के भरे तोरे नैन' ही त्यांची आवडती भैरवी गायली. योगायोग असा की मी त्यांची कॅसेटवर सर्वात पहिली भैरवी ऐकली ती हीच. आज प्रथम प्रत्यक्ष ऐकत होतो. ऐकता ऐकता त्यांच्या व्यक्तिमत्वाला वंदन केलं. हवेत हात जोडले आणि त्यांना नमस्कार  केला. आणि माझ्या मनात अनेक विचार सुरु झाले.
                       
एक १५ वर्षांचा मुलगा गाणं शिकायसाठी घराबाहेर पडतो काय, गुरूच्या शोधात ग्वालियर, दिल्ली काय थेट जलंधरला जातो. तिकडे त्याला कळतं की आपला गुरु आपल्याच गावजवळ कुंदगोळ ह्या गावी आहे. मग गाडी मागे फिरते....भीमसेन नावाचा १५ वर्षांचा मुलगा सवाई गंधर्वांचा शिष्य बनतो. पण गुरु त्याच्याकडून अनेकप्रकारचे कष्ट करुन घेतात.  त्या मुलाला अंगात ताप असूनसुद्धा मैलभर चालून मोठमोठ्या घागरीतून गुरुसाठी पाणी आणावे लागते आणि मग गुरु गाणं शिकवतात. पण ह्यासार्वातूनच 'भीमसेन जोशी' तयार होतात. कणभर चूक स्वर लागल्यामुळे गुरु अडकित्ता फेकून मारतात आणि तो कपाळावर लागल्याची खूण त्यांच्या डाव्या डोळ्यावर आयुष्यभर राहिली. पण ह्याबद्दल काहीही न बोलता, त्यांची गुरुभक्ती कायम ठेवून त्यांनी 'सवाई गंधर्व' महोत्सव सुरु केला. वर्गात शिक्षकांनी ओरडलं, किंवा मारलं की त्या शिक्षकावर 'खुन्नस' काढणाऱ्या आमच्या पिढीला एवढे उदाहरण पुरेसे आहे! :) 


  भीमसेनांचे गाणे संपले तेव्हा मागे साथीला बसलेल्या त्यांच्या शिष्यांच्या देखील आपले अश्रू आवरता आले नाहीत. एवढेच काय, स्वतः भीमसेन देखील आपले अश्रू आवरू शकले नाहीत. काय वाटलं असेल त्यांना त्या क्षणी? आयुष्य सार्थक ही भावना की अजून बरेच गायचे आहे ही? माझ्यामते दुसरीच. कारण ह्या गायकांचे आयुष्य सार्थक कधीही होत नाही. कारण असमाधानी वृत्ती हीच ह्या लोकांचा पाया असते!
सवाईला असलेल्या काही लोकांनी ह्या मैफलीचे ध्वनिमुद्रण केले आणि नंतर ते इंटरनेटवर अपलोड देखील केले. त्यामुळे माझ्या 'कॉम्पुटर'मध्ये ते अगदी सोन्यासारखे जपून ठेवले आहे मी. जेव्हा जेव्हा ते ऐकतो, तेव्हा आपोआप नतमस्तक होतो,डोळ्यात अश्रू येतात आणि असा गायक पुन्हा अनुभवायला मिळेल का हा सदैव प्रश्न पडतो. ह्या मैफलीनंतर भीमसेन कधी गायले नाहीत. त्यांच्या आयुष्यातली ही शेवटची मैफल. मैफलींची भैरवीच म्हणूया आपण. ही भैरवी अनुभवायची नियतीने मला संधी दिली. माझे भाग्य म्हणू की अभाग्य?    
 
                       
    

Monday, January 16, 2012

पायल इनामदार- भाग २


" काय रे? काय झाले एकदम?" आश्चर्यचकित होत तिने विचारले. "एवढा दचकून काय पाहतो आहेस?" 
" काही नाही ग. असाच एक विचार आला मनात." मी उत्तर दिले.
" मी हे सांगितले म्हणून तू एवढा दचकलास?का रे? एरवी तुझ्याशी बोलताना वाटले होते की तू एकदम frank  असशील", पायल म्हणाली. मी काहीच बोललो नाही आणि चूक करून बसलो. कुणी असं बोलल्यावर गप्पं बसणं म्हणजे एका अर्थाने त्याला किंवा तिला दुजोरा देण्यासारखेच असते. आणि नेमके तेच झाले. मी काही बोलत नाही हे पाहून पायलसुद्धा काही सेकंद गप्पं बसली. शेवटी मीच तिला म्हणालो.
" असं काही नाही ग. तू  उगीचच काही वाटून घेऊ नकोस. मी आपला वेगळ्या  विचारात होतो. म्हणून एकदम काही बोललो नाही."  आणि कसाबसा तिला शांत करीत आम्ही घरी आलो. वास्तविक मी कुठल्याही विचारात-बिचारात नव्हतो. तिने सांगितलेल्या तिच्या बॉयफ्रेंडबद्दलच्या कथेने माझ्या मनात घर केले होते. आणि पुढील काही दिवस प्रसाद नावाचा तो आता संसारी झालेला मुलगा माझ्या मनात उतरला होता. आणि उगीचच, पायल माझ्या मनातून उतरली होती. 
 कोण असेल तो? कसे भेटले असतील दोघे? तिला नक्की तो आवडला असेल का? की बाकी पोरांसारखे त्याने हिला फसवून आपल्या नादाला लावले? कशावरून हिने स्वतःच्या फायद्यासाठी ह्याला आपल्या बरोबर ठेवून घेतले नसेल....मुलींना आपली बिलं भरायला नाहीतरी कुणीतरी लागतोच! आणि ह्याच्याकडे 'बाईक' असेल ना! नाही...पण हिने तर आपल्याला कधी तिचे तिकीट पण काढायला लावले नाही? नाही, पण तो खूप पैसेवाला असेल. आपण कुठे आहोत? पण ते असुदे. म्हणून काय एकत्र राहायचं? म्हणजे ह्यांचे मनसुबे तरी काय होते? ही लोकं एकमेकांच्या जवळ गेली असतील कितीवेळा! की त्याच्यासाठीच हा सारा खटाटोप? पण मुलाबरोबर झोपता यावे असा विचार करणाऱ्या पायलने बोलताना आपल्याला साधा हात देखील लाऊ नये? पण पायल, तू असं करायला नको होतंस! हे आणि असे असंख्य विचार माझी पाठ सोडत नव्हते.पण बाकी ती आपल्याशी कशीही असो, ती एका मुलाबरोबर राहिली होती. दुसऱ्याने हाताळलेल्या, वापरलेल्या मुलीबरोबर आपण बोलतो आहोत इतके दिवस ह्या विचाराने मी कमालीचा अस्वस्थ झालो!
       आणि होयचे तेच झाले. माझ्या बोलण्यात तुटकपणा येऊ लागला. मला एकीकडे वाटत होते तिच्याशी बोलावे. आमचे ठरलेले विषय मांडावे. बसने एकत्र प्रवास करावा, थोडी फार खरेदी एकत्र करावी, तिचे फैशनबद्दल सल्ले घ्यावे - वाटले तर थोड्या शिव्यादेखील  खाव्या! पण कसलं काय! तो प्रसाद डोळ्यासमोर यायचा! विशेष म्हणजे तिलाही हे जाणवत होते की मी धड बोलत नाही आहे. बऱ्याचदा ती बोलायला यायची, दोन-तीन गोष्टींवर आम्ही माफक बोलायचो आणि नंतर विषय सापडत नाही म्हणून गप्पं बसून राहायचो. हे गप्पं बसणं अत्यंत अस्वस्थ करणारं असायचं. पण त्याला इलाज नव्हता. तिच्या चेहऱ्यावर, मी काही बोललो नाही, की निराशा दिसून यायची. पण बिचारी काही न बोलताच निघून जायची. आणि एके दिवस  तिच्या विचारांचा बांध फुटला. बस मधून उतरून घरी चालत येत असताना, सवय झालेल्या त्या अबोल वातावरणात तिने मला सुनावले. " मला वाटलं नव्हत तू असा आहेस ते. मुलीला बसायला जागा दिलीस म्हणून मी तुला gentleman समजत होते. पण ही व्याख्या आता बदलायला हवी मला. तुला काय वाटतं? मला काही कळत नाही? तू सुद्धा इतर सर्व लोकांसारखाच आहेस! तुमचे विचार कधीच बदलणार नाहीत. माझंच चुकलं." आणि लालबुंद झालेली पायल आपले डोळे पुसित निघून गेली.
    रात्रीचे ८.३० वाजले होते. पायलचे ते वाक्य कानात घुमत होते आणि तिचा तो चेहरा डोळ्यासमोरून जायला तयार नव्हता! शेवटी मीच ठरवले, लोकं काहीही विचार करो, आपण जाऊया. घरून निघालो. ९ च्या सुमारास हिच्या घरी जाणे बरोबर दिसले नसते. पण मला त्याची परवा नव्हती. चौथ्या माळ्यावर गेलो. दार वाजवले. आणि काही क्षणातच मी पायल समोर बसलो होतो. तिची कहाणी ऐकत.
    " हो. प्रसाद आणि मी 'live  in  relationship ' मध्ये होतो." हे असं बोलून झाल्यावर तिने माझ्याकडे एकदा नीट पहिले. आणि मी पुढे बोलणार असे लक्षात येताच मला थांबायचा इशारा करून ती म्हणाली, " आणि मला ह्यात काहीच गैर वाटत नाही. का रे? तुला गैर वाटतं काही ह्यात?" आता मात्र मला बोलणं प्राप्त होतं.
" हो अर्थात! अशी लोकं लग्नाआधी एकत्र राहायला लागली तर लग्न ह्या गोष्टीला अर्थच काय उरला?" मी म्हणालो.
" पण मग लग्न हे काय एकत्र राहण्यासाठी करतो का आपण?" पायलने जणू प्रश्नांची बंदूकच रोखून धरली होती माझ्याकडे.
" हो अर्थात.....म्हणजे नुसतं एकत्र राहण्यासाठी नाही...पण लग्नानंतर एकत्र राहणे हीच संकल्पना आहे ना. ती एका प्रकारची परवानगी आहे. एकत्र राहण्याची". मी नाही म्हटलं तरी शब्दांची जुळवाजुळव करीत होतो.
" आणि ही परवानगी कोण देतं?" - पायल
"अर्थात समाज", मी म्हणालो.
"आणि समाजाला माहिती असतं की ज्या दोन व्यक्तींना आपण एकत्र राहण्याची परवानगी देतो आहे त्या दोन व्यक्ती एकमेकांसाठी बनल्या आहेत की नाही?" प्रश्नात्मक बंदूक परत माझ्यासमोर.
" त्याची काळजी समाज कशाला करेल? त्या दोन व्यक्तींचा प्रश्न आहे ना तो. त्यांनी  एकमेकांना समजून घेऊन संसार चालवायचा ना."
" चल मग एक गोष्ट तर तू मान्य करतोस", हसत हसत पायलने सुरुवात केली, "... की एकमेकांना समजून घेणे ही गोष्ट तर वैयात्तिक आहे. पण मग 'एकमेकांना समजून घेणे' ह्यासाठी लग्न हे झालेच पाहिजे का? एखाद्या व्यक्तीशी लग्न करणं योग्य आहे का हे ठरवण्यासाठी मी जर त्या व्यक्तीला आणि त्याने मला ओळखायचा आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला तर?"
"हो ना! पण त्यासाठी एकत्र राहणं आवश्यक आहे का? लग्नआधी ३-४ महिने जाणून घायचे एकमेकांना! एकमेकांना भेटायचे. कुठेतरी जेवायला जायचे. आणि स्वभाव जाणून घ्यायचे ", माझ्या दादाने केलेल्या गोष्टीची आठवण झाली मला एकदम.
" अरे एवढ्या कमी वेळात स्वतःला तरी ओळखू शकशील का तू? एकत्र जेवताना, कॉफी पिताना अगर अशा ठिकाणी किती ओळखणार तू दुसऱ्याला? जसा तुला स्वतःला ओळखायला एकांत हवा तसा दुसऱ्याला ओळखायला देखील हवा ना!"
हे काही मला अगदीच पटत नव्हतं असं नाही. पण आतून कुठून तरी आवाज येत होता...हे बरोबर नाही! मी नकारात्मक मान हलवतोय हे माझ्या लक्षात आले. आणि त्याला उद्देशून पायल पुढे बोलू लागली.
"मूळात एकत्र राहणे असं म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं तुझ्या? एकत्र राहणे म्हणजे एकत्र झोपणे असे नाही. तो फक्त त्यातला एक भाग झाला!" हे वाक्य अगदीच अनपेक्षित होते.पहिल्यांदाच एक मुलगी माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलत होती. इतके दिवस मुलींना सभ्यतेच्या पडद्यामागे पुरुषांनी ठेवल्यामुळे एका मुलीच्या तोंडून साधं 'साल्या' ऐकलं तरी ती मुलगी वाईट ठरत आली आहे. इथेतर तसल्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या गेल्या होत्या.
" पण मग एकत्र झोपणे ह्या गोष्टीचे तू समर्थन करतेस?" भांबावलेल्या अवस्थेत मी विचारले.
" तूच बघ ना, 'एकत्र राहणे' ह्या विषयावरून 'एकत्र झोपणे' ह्या विषयाकडे तू किती लगेच आलास. ह्याचा अर्थ तुझ्या विचारात तो एकच भाग अडून बसलाय!" पायलचा पारा, नाही म्हटलं तरी, थोडा चढला.
" पण मग तुझं म्हणणं तरी काय आहे?"
" आपल्याकडे लग्न कसं ठरवलं जातं? आपल्याला कुठून तरी स्थळ समजतं. आपले नातेवाईक मुलगी किंवा मुलगा सुचवतात. आणि बऱ्याच वेळेला त्यांच्यावर विश्वास ठेवून दोन्ही परिवार एकमेकांना भेटतात. मुलगा आणि मुलगी एकमेकांना बघतात. आणि एक....फार फार तर दोन बैठकीत पसंती कळवली जाते. ह्यात कळणार कसं....मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी बनले आहेत की नाही?"
" हो पण.... आपले नातेवाईक काय वाईट स्थळ सुचवणार आहेत?" मी मध्येच तिचे वाक्य तोडले. " पण मुळात माणसाचे, चांगला किंवा वाईट, असे दोनच भेद आहेत का?" ती म्हणाली. " मुळात स्वभाव...किंवा गुण जुळणं..ही फार मोठी गोष्ट आहे ना. हे कसं समजणार त्यांना?"
" ह्यासाठीच बहुदा आपण पत्रिका बघतो ना. ते ३६ गुण जमावे लागतात." जणू काय हा एक रामबाण उपाय आहे, अशा थाटात मी म्हणालो.
" मग हेच ३६ गुण जर आपण स्वतःच जमवले तर? एकत्र राहून, एकमेकांना समजून घेण्याच्या प्रयत्नात आपण ३६ काय....७२ गुण जमवू शकू!" ह्या वाक्यावर माझे उत्तर नसल्यामुळे एक विजयाचा भाव तिच्या चेहऱ्यावर मला दिसला. पण तरीही कुठेतरी मनात ही गोष्ट घर करायला तयार नव्हती. पायल face reading  करत असावी. कारण काही सेकंदात ती लगेच मला म्हणाली, " पण लोकांच्या डोळ्यासमोर बेडरूम येते ना लगेच."
" हो मग. येणारच! बरोबर आहे का ते?" - मला विरोध करायला एक मुद्दा मिळाला.
" हे बघ. मी तुला आधीच सांगितले. live - in म्हणजे फक्त ते नव्हे. तो त्यातला एक भाग झाला. आणि जर मी कुणाबरोबर राहत असीन, त्याला समजून घेत असीन, तर ती व्यक्ती माझ्याशी प्रणय करण्यात कशी आहे हे ही तपासायला हवेच की! कारण प्रणय हा देखील भावी आयुष्यातील महत्वाचा भाग आहे, नाही का? त्यात सुद्धा वृत्ती पटायला हवीच की. आणि मी कशाला, पत्रिकेतील योनी हेच सांगते की."
डोक्याला झिणझिण्या येऊ पाहणारी वाक्य होती ही. शेवटी मीच काहीतरी विचारायचे म्हणून विचारले. " मग प्रसादचे काय झाले?" 
" प्रसाद आणि मी गोदरेज मध्येच भेटलो. खूप गुणी मुलगा होता तो. होता कशाला, आहे अजून. त्याचा सर्वात चांगला गुण जर मला आवडला तर तो परिस्थिती हाताळायचा. सेल्स सारख्या क्षेत्रात असूनसुद्धा ह्याच्या वागण्यात frustration कधीही दिसले नाही. एवढ्या लोकांना भेटायचे, त्यांची नाटकं सहन करायची,  वर बॉसची targets वेगळीच. इतर सारे सेल्स मैनेजर दिवसाखेरीस वैतागायचे. पण ह्याचे तसे नव्हते. अख्खा दिवस दगदगीत, धावपळीत गेला तरी संध्याकाळी बाहेर खायला जाणे, सिनेमाला जाणे, कॉफी प्यायला जाणे, पार्टी करणे ह्याची उर्जा त्याच्यात होती. तेवढा उत्साह त्याच्यात असायचा. आमची मैत्री वाढत गेली. एकमेकांविषयी आकर्षण वाढले.पण मला माझ्या ताईसारखे होयला नको होते. माझ्या ताईच्या ऑफिसमध्ये देखील तिला एक मुलगा आवडला. आवडला आणि तिचे त्याच्याशी लग्न देखील झाले. आम्हाला तरी कुठे माहिती होते पुढचे. मुलगा चांगला वाटला म्हणून आमच्या बाबांनी लाऊन दिले लग्न. काही वर्षात माझ्या ताईचे झाले promotion . ती झाली 'senior  sales  manager ' आणि ह्याच्या एक position वर गेली. हिला पगार देखील जास्त मिळू लागला. ही गोष्ट त्याला आणि त्याच्या घरी आई -वडिलांना सहन होईना. आता हा मुलगा एवढा egoist  असेल आम्हाला कुठे माहिती होते? पण हे आधीच जाणून घेतले असते तर? माझ्या ताईला नोकरी गमवावी नसती लागली. म्हणून मी म्हणते स्वभाव जाणून घ्यावा. आणि प्रसादच्या बाबतीत मला हाच अनुभव आला. त्याला ego problem नव्हता. परंतु त्याला लोकांना धीटपणे सामोरे जाता येत नव्हते."
" म्हणजे?" मला ह्याचे आश्चर्य वाटले. ह्या मुलीला प्रसादचा उत्साह, त्याचा परिस्थिती हाताळण्याचा स्वभाव वगैरे आवडून देखील हा एक गुण कसा काय खटकला असेल?        
" सर्वप्रथम आम्ही इथे आलो तेव्हा लोकांना वाटले होते आमचे लग्न झाले आहे. बिल्डींगमध्ये लोकांनी एक नवे जोडपे ह्या समजुतीने आमचे खूप लाड देखील केले. आम्हाला घरी जेवायला बोलावणे, आमच्या घरी येऊन गप्पं-गोष्टी करणे, काहीतरी खायला करून पाठवणे, नवीन पदार्थ करणे. शनिवार-रविवारचे भरपूर उद्योग केले आम्ही. आम्ही देखील एकत्र राहत असल्यामुळे सगळीकडे एकत्र जायचे असे ठरले होते. पण नंतर नंतर लोकं आम्हाला मूल-बाळ कधी वगैरे विचारू लागली. सुरुवातीला काही वाटत नसे. पण नंतर नंतर हे विषय वाढू लागले. आमचा एकत्र राहण्याचा उद्देश हा नव्हता. आणि त्यामुळेच आम्हाला हे विषय न आवडेनासे झाले. आणि शेवटी आम्ही आमचे नाते सांगायचे ठरवले. शेजारच्या करमरकर काकूंशी माझे खूप चांगले जमायचे. ' तू मला मुलीसारखी आहेस' असं  बऱ्याच वेळेस त्या मला म्हणायच्या. आणि मी त्यांना आमच्या नात्याबद्दल सांगितले. आणि लगेचच ही बातमी अख्ख्या बिल्डींगमध्ये पसरली. लोकं आम्हाला नावं ठेवू लागली. एकाएकी लोकांची वर्दळ कमी झाली. प्रसादला हे सहन होईना. त्याला लोकांशी गप्पा मारण्यात तितकाच रस होता. त्याला त्यांच्याशी संबंध चांगले ठेवायचे होते. त्यामुळे लोकं आमच्याबद्दल काहीही बोलले तरीही तो त्यांच्या गप्पांमध्ये शामिल होत असे. आणि मला नेमके हेच खटकत असे. एकदा असेच आम्ही बाहेरून जेऊन घरी येत असताना पहिल्या मजल्यावरचा रमेश आम्हाला भेटला. त्याच्या लग्नाबद्दल विषय सुरु झाला. कधी लग्न करतोयस वगैरे आम्ही त्याला विचारले. पण जाता जाता त्याचे एक वाक्य कानावर पडले. तो प्रसादला म्हणाला, " तुझी काय साल्या मजा आहे!" आणि प्रसादने चक्क माझ्यासमोर त्याला हसत हसत प्रतिसाद दिला. नंतर मी भडकून विचारले असताना त्याचे उत्तर अजून धक्कादायक होते. " relations maintain करण्यासाठी असं करावं लागतं."  लग्नाआधीच एवढे मोठे compromise ? मी ह्यातून वेगळे होयचे ठरवले. बोलून प्रश्न सोडवायचा ७-८ दिवस प्रयत्न केला. पण मला हा स्वभाव पटणे शक्य नव्हते. प्रसादने काही roommates धरले आणि पौड रोड वर राहायला गेला. आणि मी इथे एकटीच राहू लागले.आणि मी ह्या सर्व लोकांना सामोरे जाऊ लागले. मला मुलगी मानणाऱ्या करमरकर काकू अचानक मला घरी घ्यायला तयार नव्हत्या. " आमच्या घरी लहान मुल आहे. त्याच्यावर काय परिणाम होईल?" बिल्डींग मधले इतर पुरुष देखील मला दिवसाला एक टोंबणा मारल्याशिवाय गप्पं बसत नसत. मी हे सर्व माझ्या आर्थिक फायद्यासाठी केलं हा काही लोकांचा समाज होता. तर काही लोकांकडून,'ही त्यातली दिसते आहे, अशी प्रतिक्रिया मिळायची.  प्रसाद गेल्यापासून बिल्डींगमधल्या कार्यक्रमांना, घरच्या पूजेला, गणपतीला वगैरे मला बोलावणे येणे बंद झाले. बिल्डींगमधले एरवी माझ्याशी खेळणारे छोटे पंटर जेव्हा माझ्याशी बोलायला यायचे तेव्हा खिडकीतून त्यांच्या आया त्यांना परत बोलवत. आता सर्वांना माहिती आहे माझ्याशी बोलायचे नाही ते. कांबळे काकांना बिल्डींगचे पैसे द्यायला जायचे तेव्हा चेहऱ्यावर हास्य ठेवत प्रसादची चौकशी करायचे. अजूनही करतात. -" इतके दिवस एकटं राहणं बरं नाही मुलींनी. कुणीतरी बघा" - असा खोचक सल्ला द्यायलासुद्धा ते विसरले नाहीत. शेवटी मीच ठरवलं. ह्यांच्या कुणाशीही संबंध ठेवायचा नाही. आपला प्रसाद बरोबर राहायचा हेतू वाईट नव्हता ना, झालं तर मग!"     आणि पायलची गोष्ट ऐकून मी घरी परत आलो. सकाळी कामाला जायचे होते म्हणून लगेच झोपलो. दुसऱ्या दिवशी कामाला निघताना वाटेत कांबळे काका भेटले. ऑक्टोबर महिन्याची उष्णता शरीराला पोळ्वत होती. कांबळे काकांनी माझ्याकडून दोन मिनिटे मागितली आणि मला वाटेत थांबावे लागले. त्यांनी मला निमंत्रण दिले.
 "आमच्याकडे देवी बसवली आहे. तर दर्शनाला नक्की या! वाट बघतोय!" 

Thursday, January 5, 2012

पायल इनामदार - भाग १

आमच्या बिल्डींगच्या चौथ्या मजल्यावर ती राहायची. सदैव आपल्या विश्वात. मी तिला बिल्डींगच्या इतर सदस्यांशी बोलताना कधी बघितलं नाही. तसेच बिल्डींग बाहेरचे कुणी तिच्या ब्लॉक मध्ये आल्याचे देखील मला स्मरत नाही. सकाळी ९ च्या सुमारास ती घरून बाहेर पडायची. बहुदा कामाला जात असावी. आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास पायऱ्या चढताना दिसायची. पण त्या दिवसात तिने एकदाही माझ्याकडे  पाहिले नाही. सदैव मान खाली घालून जात असे. जिन्यातच काय पण बिल्डींगच्या आवारात देखील ती कधीही कुणाकडे पाहून हसल्याचे मला आठवत नाही. एक मात्र होते. ती समोरून गेल्यानंतर वातावरणात एक अस्वस्थ शांतता पसरायची. गप्पा मारत असताना समोर उभा असलेला माणूस अगर माणसं २-३ सेकंद शांत होत, एकमेकांकडे बघत आणि मग संभाषण पुढे चालू करीत. तिच्या समोरून चालत जाण्याने बायकांमध्ये कसलीशी कुजबुज चाले. पायल इनामदार ह्या मुलीचे दर्शन हे सर्वप्रथम ह्या वातावरणात झाले. पण तिच्याबद्दल जाणून घ्यायला मात्र थोडे दिवस जावे लागले.

 मी माझ्या जागेत राहायला आल्याच्या दोन महिन्यानंतर बिल्डींग मधल्या काही उत्साही लोकांनी सत्यनारायणाची पूजा करायचे ठरवले. लगेच निमंत्रणे गेली आणि हौशी मंडळी कामाला लागली. मला मात्र एकूण पूजेमध्ये काहीही रस नसल्यामुळे मी लोकांना पूजेला बोलवायचे काम अगदी स्वखुशीने स्वीकारले! एक रविवार धरला आणि 'आर एस वी पी' ( म्हणजे काय माहिती नाही...आपण येणार की  नाही ह्याची खात्री करणे त्याला फेसबुकच्या भाषेत असं म्हणतात! ) करायला सुरुवात केली. तीन मजले  झाले आणि चौथ्या मजल्यावरच्या दुसऱ्या ब्लॉकची बेल वाजवली. दारावर कुणाच्याही नावाची पाटी नव्हती. आणि एका साधारण 'तिशी गाठत आलेली आहे' अश्या दिसणाऱ्या मुलीने दरवाजा उघडला. गोरा वर्ण,बेताची उंची आणि अगदी आकर्षक चेहरा! सुटे सोडलेले केस आणि दुपारचे बारा वाजत आलेले असताना देखील अंगावरचा 'नाईट- गाऊन', आज रविवार आहे ह्याची साक्ष देत होता! पण मला पाहता त्या चेहऱ्याने आश्चर्याचे रूप धारण केले. आणि अनपेक्षितता दर्शवत मला प्रश्न केला, " काय हवंय?" "काही नाही, मी आपल्याला बिल्डींग मधल्या सत्यनारायाणाचे आमंत्रण द्यायला आलो आहे! पुढच्या रविवारी आहे. या नक्की!" तिने उत्तरादाखल फक्त मान डोलावली. मीच थोडे संभाषण पुढे न्यायचा प्रयत्न केला. " मी इथे दोन महिन्यापूर्वी राहायला आलो. सध्या एकटाच आहे. आपल्याला बऱ्याचवेळेस पहिले आहे. पण आज ओळख करून घेऊ म्हंटल", असं म्हणत मी माझे नाव सांगितले. तिची देहबोली, कधी एकदा दरवाजा बंद करते, हे दर्शवत होती! " मी पायल. पायल इनामदार." तिने आपली ओळख करून दिली. काही सेकंद शांततेत गेले. पुढे काहीच बोलणे होत नाही हे समजून मी परत एकदा पुजेची आठवण करून देऊन जिना उतरणार तेवढ्यात चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या करमरकरांनी मला पहिले. त्यांच्या कपाळावरच्या सदैव असणाऱ्या आठी आणखीनच घट्ट झाल्या आणि आपली मान हलवीत ते आपल्या घरी शिरले.

 " काय हो! तुम्ही पूजेला आला नाहीत!" पूजेनंतर काही दिवसांनी ती मला बस मध्ये भेटली. ऑफिस मधून घरी येत होतो. "बरीच लोकं आली होती आपल्या बिल्डींग मधली. छान झाली पूजा!" ( आता पूजा ही छान वगैरे कशी होते माहिती नाही....एक चेहऱ्या वरची सुरकुती न हलत धडाधड बोलत सुटणारा पुजारी....त्यातून ती प्रसाद खाल्ला नाही तर तुमच्या घरी दारिद्र्य येईल अशी वैचारिक दारिद्र्य दाखवणारी ती सत्यनारायणाची कथा....तरी पूजा झाली ह्याचा उल्लेख 'छान झाली' असाच करायचा असतो! असो...) "नाही, नाही आले", असे एवढे माफक उत्तर तिने दिले. वास्तविक पाउण तासाच्या त्या बस प्रवासात निदान वेळ घालवायला तरी काहीतरी बोलणे शक्य होते. पण उतरेपर्यंत ती एक अक्षर बोलली नाही. तेच कशाला, उतरून झाल्यावर बिल्डींगपर्यंत तो पंधरा मिनिटांचा रस्ता देखील तिने न बोलताच तुडवला. फक्त एक औपचारिकता म्हणून ती माझ्याबरोबर चालत होती. आणि गेटपाशी आमच्या शेजाऱ्यांनी, म्हणजेच कांबळे काकांनी आम्हाला पाहिले. एरवी हसण्याचा थोडासा प्रयत्न करीत माझं स्वागत करणारे कांबळे आज मात्र, ज्याला थंड चेहरा म्हणतात, तश्या चेहऱ्याने माझ्याकडे बघत होते. पायलचे आमच्या कुणाकडेच लक्ष नव्हते. नंतर जिना चढताना मी परत काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. " तुम्ही कुठे आहात नोकरीला?" मी कुठे नोकरी करतो हे तिला सांगितले आणि ती जाता जाता म्हणाली. " मी गोदरेज मध्ये आहे. सेल्स मैनेजर आहे."

 त्या दिवशी पायल इनामदार बद्दल थोडी माहिती तर मिळालीच पण तिच्याबद्दल असलेल्या उत्सुक्तेबद्दल वाढ देखील झाली. एवढ्या चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर असलेली ही मुलगी एवढी एकाकी का? बिल्डींगच्या कुठल्याही समारंभात हिचे येणे नाही, कुणाशी बोलणे नाही आणि घरी देखील ही एकटी. नक्की प्रॉब्लेम काय आहे? आणि माझी उत्सुकता थोडी अजून वाढू देण्यासाठी दुसरा दिवस उजाडला. रविवार सकाळ. आरामात उठून समोरच्या दुकानातून ब्रेड आणायला बाहेर पडलो आणि येता येता कांबळे भेटले परत. " काय म्हणताय काका!" ?(आमची आपली जुनी सवय....समोरच्या व्यक्तीचा चेहरा कितीही 'थंड' वगैरे असेल किंवा आपल्याला निरुत्साही करणारा असेल तरीही 'काय म्हणताय' हे विचारायचे! वास्तविक हे असले चेहरे काहीही म्हणत नसतात....नुसते वेड लागल्यासारखे आपल्याकडे पाहत असतात!) "काही नाही...कुठे दुकानात का? आणि एकटाच चालला आहेस?" आता ह्यांच्या प्रश्नातील रोख न कळण्याइतका मी बावळट नक्कीच नव्हतो. काल पायल  बरोबर चालत येणे त्यांना आठवत असणार! " अहो काका, मी एकटाच राहतो, तुम्हाला चांगलेच माहिती आहे की!" ( मी तरी उत्तरं देणे कशाला सोडतोय!) माझ्या चेहऱ्यावर किंचित हास्य असावे. नाहीतर कांबळे काका असे उखडले नसते. " तुम्हाला मजा वाटेल. पण तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय. तुमच्यासारखा आधी सुद्धा होता एक. कुठे गेला तो आता? दिसतोय? दोन महिन्यापूर्वी आला आहात. तुम्हाला आधीचे माहिती तरी आहे का काही? पण मी तरी कशाला बोलू. त्यांच्या घरी तुम्ही देखील जात असाल! आम्हालाच काळजी!" मोठ्या माणसांबद्दल मला नितांत आदर आहे. परंतु ज्या काही लोकांचे बोलणे ऐकून हिंसक विचार मनात येतात त्यात मला कांबळे काकांचा उल्लेख नक्कीच करावा लागेल. कसाबसा राग आवरत मी तिथून घरी आलो. पुण्यात राहणाऱ्या ह्या माझ्या शेजाऱ्याला मुंबईत राहणाऱ्या माझ्या आई-बाबांपेक्षा माझी काळजी अधिक...मी तरी काय करणार म्हणा! त्यातून मी 'bachelor ' आणि नोकरी निमित्त आलेला आणि एकटा रूमवर राहणारा. माझ्यावर संशय घ्यायला वाव अधिक! पण ब्रेड-आम्लेट खाताना 'माझ्यासारखा आधीसुद्धा होता' ही काय भानगड आहे ह्याचा विचार मी करू लागलो!
पायल आणि माझी घरी यायची बस ही एकच आहे हे काही दिवसात मला कळले. इतकेच काय, माझ्या कंपनीपासून बस सुरु झाली की काही मिनिटे पुढे ती चढायची. पण तरीही बोलण्यात काहीच प्रगती नव्हती. हां, नुसतं बघणं इथपासून किंचित हसण्यापर्यंत प्रगती झाली होती. पण एकदा मी तिला बसायला जागा दिली तेव्हापासून कदाचित ती माझ्याशी बोलू लागली. अगदी मनमोकळ्या गप्पा नव्हे पण माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागली. माझ्या सांगण्यावर प्रतिक्रिया देऊ लागली आणि कधी कधी तर खळखळून हसू देखील लागली! आणि नंतर आमच्या गप्पा वाढू लागल्या! ऑफिसचे किस्से, बॉसच्या गोष्टी, पगारवाढीची अपेक्षा हे सर्वश्रुत विषय यायला लागले हळू हळू. पण घर जसे जवळ येई तशी ती थोडी सावध होत असे. आणि उतरायच्यावेळी तर अगदी गप्पं! एवढेच काय, तर बिल्डींग मधल्या कुणाचाही विषय निघाला तरी ती एकदम गप्पं होई! एरवी तेंडुलकर श्रेष्ठ की द्रविड ह्या विषयावर द्रविडची बाजू उचलून धरणारी ( शेवटी मुलगीच ती!) ही, करमरकर काका, पाटील काकू किंवा कांबळे काकांचा विषयात अजिबात भाग घेत नसे! एकूण चमत्कारिकच वागणं होतं हे! पण हळू हळू बोलणे वाढले. आणि पुढील एक दोन आठवड्यात मला अगदी चिडवेपर्यंत वगैरे हिची मजल गेली! मला देखील हिच्याशी गप्पा मारण्यात मजा येऊ लागली! आणि त्या दिवसात पायलचा उलगडा होऊ लागला.
" काय विचित्र शर्ट घातला आहेस तू! हा काय तुझ्या ऑफिसला शोभेल? आणि म्हणे मिटिंग आहे!" सकाळी ऑफिसला जाता जाता पहिली प्रतिक्रिया मला ही मिळाली. आदल्या दिवशी सांगितल्याप्रमाणे माझी मिटिंग होती आणि मला फैशन फारशी कळत नाही ह्याचा प्रत्यय मला त्या दिवशी आला! एकंदर टाप-टीप राहणे वगैरे माझ्या स्वभावात कमीच. पण मुलीचा सहवास या स्वभावात बदल आणू शकतो हे काही दिवसात मला जाणवू लागले. तिने मला शर्टबद्दल सांगितल्यापासून  मी देखील आरश्यासमोर जा-ये करू लागलो, पण तरीही अगदी भरपूर बदल घडला नाही माझ्यात. तिच्या लेखी मी outdated कपडे घालत होतो आणि मला फैशन अजिबात कळत नव्हते! " काय रे! हे असे कपडे घालतात का! जरा थोडा ट्रेंडी राहत जा की!"

वास्तविक मी त्या दिवशी चांगला टी-शर्ट घातला होता. पण बाईसाहेबांना त्याचा रंग  नाही आवडला! " अरे, मुंबईत राहतोस ना! तरीही फैशनचे देणे नाही तुला! तुझ्या बायकोचे काय होईल रे! ह्या असल्या वातावरणात कुजेल बिचारी", जोर-जोरात हसत पायल मला म्हणाली! ह्यावर मी काही बोलत नाही हे कळताच लगेच तिने मला विचारले, " काय रे, आहे वाटतं कुणीतरी! सांग की, लपवतोयस कशाला?"
" अगं, नाही आहे कुणी. आणि असल्या फैशन नसलेल्या मुलाला कोण पसंत करेल? मी आपला आहे तसाच बरा आहे!" ह्या विषयात एकमेकांकडे थोडी वाक्य फेकली जात असतानाच मी तिला विचारले, " तुझा आहे का कुणी बॉयफ्रेंड?"
"होता रे!" अगदी निर्विकार चेहऱ्याने तिने मला उत्तर दिले.
"होता म्हणजे?" मी अगदी आश्चर्याने विचारले. आधी कुणीतरी बॉयफ्रेंड होता आणि तो आता नाही हे धीटपणे सांगणारी ही पहिली मुलगी मी पाहत होतो!
" प्रसाद नाव होते त्याचे. ४ महिन्यांपूर्वी आम्ही ठरवले की आम्ही मित्रच राहिलेले बरे. त्याचे आता लग्न झाले."
" हो का. बर,बर!" ही भलतीच बिनधास्त होती तर. "कुठे राहायचा तो? इकडे पुण्यातच का?" मी आपला संवाद पुढे नेला थोडा.
" हो रे. तो तुमच्या मुंबईचाच होता. इकडे आला होता नोकरीला.माझ्याच कंपनीत होता तेव्हा ओळख झाली. नंतर त्याने दुसरीकडे नोकरी धरली."
" कुठे जवळच होती का नोकरी? भेटायचे वांदे झाले असतील ना मग?" मी विचारले.
" नाही रे. आम्ही एकत्रच तर राहत होतो."
माझ्या हातातून सामानाची पिशवी एकदम खाली सरकली. मला एकदम कांबळे काकांचे वाक्य आठवले. मी तिच्याकडे काही सेकंद पाहत राहिलो.