Pages

Total Pageviews

Tuesday, April 10, 2012

आठवणी आजोबांच्या

सकाळचे ९ - ९.३० वाजले आहेत. मी बेडरूम मधून डोळे चोळत चोळत बाहेर येतो. आईने 'तोंड धु' असा आदेश दिलेला आहे. परंतु  मी जातो हॉल मध्ये. हॉल सुरु होतो तिथल्या भिंतीआड उभा राहून मी कोपऱ्यातल्या सोफ्याकडे बघतो. सोफ्यावर पायांचा त्रिकोण करून पेपर वाचत एक व्यक्ती बसलेली आहे. पेपर इतका पसरलेला आहे की कंबरेपासून  डोक्यापर्यंत सारे काही त्याच्या आड गेले आहे. मी गालातल्या गालात हसतो....हळूच तिकडे जातो...आणि पेपरवर हात मारून तो उस्कडून टाकतो. आपल्या वाचनात विघ्न आणू पाहणाऱ्या ह्या राक्षसाला शिक्षा न करता ती व्यक्ती त्याला उलट प्रश्न विचारते, " काय! झाली का झोप?" माझ्या आयुष्यातील पहिली ३ ते ४ वर्ष दिवसाची सुरुवात मी ही अशी करायचो. आजोबा म्हटलं की मला सर्वप्रथम ती त्यांची पेपर वाचतानाची मूर्ती आठवते.  
लहानपणी आईची कुशी आणि खांद्यावर असणारा बाबांचा हात ह्या व्यतिरिक्त दोन गोष्टी असल्या की मुलांचे भाग्य उजळते. त्या म्हणजे आजीची मांडी आणि आपला चिमुकला हात हातात घेणारा आजोबांचा हात. ह्याच आजोबांचा सहवास मला आयुष्यातील पहिली १० वर्षे मिळाला हे माझे केवढे मोठे भाग्य!

मग माझी अंघोळ झाली की आजोबांच्या अंगावर सदरा चढायचा. " शिवम बघायला जायचं का?" माझ्या ह्या प्रश्नावर मान होकारार्थी हलवून आजोबा तयार. शिवम नावाची बिल्डींग त्यावेळेस बांधकामाच्या अवस्थेत होती. आणि समोरच्या त्या बिल्डींगमध्ये आम्ही दोघे जायचो. रोज माझे तेच प्रश्न. " हा हॉल आहे का...ही बेडरूम आहे का....इथे काय असेल...इकडे लोक रहायला कधी येतील...ही बिल्डींग कधी पूर्ण होईल?" आणि रोज माझ्या ह्या त्याच त्याच प्रश्नांची उत्तरं न कंटाळता आणि न रागावता देणारे माझे हे आजोबा.आमचा हा दौरा झाल्याशिवाय मी शाळेत जात नसे. माझे वय त्यावेळेस ३  होते. आणि हा उद्योग जवळ जवळ वर्षभर ती बिल्डींग पूर्ण होईपर्यंत चालला. आजोबांचा माझ्यावर किती जीव होता ह्याची सुरुवात ही इथे आहे. आज देखील ती बिल्डींग आमच्या समोर उभी आहे. आजोबा मात्र नाही. कधी कधी गच्चीत उभं राहून ती बिल्डींग न्याहाळतो. आणि आजोबांच्या आठवणी सुरु होतात.
आजी-आजोबा म्हटलं की पहिला विचार येतो तो गोष्टींचा. माझ्या लहानपणी देखील ह्या दोघांनी गोष्टींची मक्तेदारी स्वतःकडे अगदी स्वखुशीने घेतली होती. सुदैवाने महाभारतातील किचकट नातेसंबंध आजीमुळे माझ्या लक्षात आहेत. महाभारत आणि रामायण ह्या दोन्ही गोष्टींचे खाते होते तिच्याकडे. आजोबांमुळे मात्र लहान वयातच शिवाजी महाराज माझ्या आयुष्यात आले. महाराजांनी अफझलखानाचे  पोट कसे फाडले, शाहिस्तेखानाची बोटं कशी तोडली, आग्र्याहून चतुराईने पेटाऱ्यातून कसे निसटले ह्या गोष्टी मला इतिहास हा विषय म्हणून शिकायच्या आधीपासून माहिती होत्या. आणि म्हणूनच कदाचित नंतर इतिहास माझा आवडता विषय झाला. नंतर ७ वी मध्ये शिकताना जंजिऱ्याच्या सिद्धीचा पराभव चिमाजी आप्पाने केला ही ओळ आली.  बऱ्याच वर्षांपूर्वी सांगितलेल्या आजोबांची तेव्हा प्रकर्षाने आठवण झाली.

गोष्टींवरून आठवले. फक्त गोष्टी सांगणे असं शक्यतो होत नसे. तर त्यातल्या  प्रात्यक्षिकांना आजोबांना सामोरे जावे लागे. मग त्यांच्या दिवणाभोवती उश्या उभ्या केल्या जात आणि त्याला पुण्याच्या लाल महालाचे स्वरूप दिले जाई. आत बसलेला शिवाजी अर्थात मी. मग त्या लाल महालाच्या 'खिडकीत' त्यांनी त्यांची फक्त बोटं ठेवायची. आणि आतून मी त्यावर वार करणार. आणि ती तुटलेली बोटं घेऊन तो जवळ जवळ ६५ वर्षांचा शाहिस्तेखान हॉलच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत पळ काढायचा. जी गोष्ट शाहिस्तेखानाची तीच अफझलखानाची. पण प्रतापगड घरी रचायचा कसा? त्यासाठी पनवेलचे गांधी उद्यान निवडले जाई. आता त्याचे नुतनीकरण झाले. पण तेव्हा तिकडे एक मोठी घसरगुंडी होती. वरती जिथे मुलं उभी राहून आपल्या आई-वडिलांकडे बघून हातवारे करतात तिथे एक छतासारखी उभारणी होती. तो प्रतापगड. मग महाराज, अर्थात मी, तिकडून खाली उतरणार. पायथ्यावर अफझलखानाला मिठी मारणार आणि त्याचे पोट फाडणार. हे सगळे नाट्य ह्या माणसाने अगदी आनंदाने पार पडले. आणि अनेक वेळेला होऊनही न कंटाळता! कधी शिवाजी महाराजांच्या गोष्टींवरून गाडी महाभारताकडे येई. असाच एक प्रसंग आठवतो. आजोबांना बकासुराची भूमिका पार पाडावी लागली होती. आणि त्यांना हरवणारा भीम म्हणजे मी. त्यादिवशीचा भीम जरा जास्तच जोशात होता. आजोबांना हलके गुद्दे मारण्यापासून त्याला समाधान होईना. आणि त्याने चक्क लाथांचा प्रहार सुरु केला. आजोबा मात्र काही न बोलता लाथा सहन करीत होते. काही कामासाठी किचन मधून आजी बाहेर आली तेव्हा मात्र मला बाजूला सारण्यात आले आणि प्रचंड ओरडा बसला. आजोबा मात्र शेवटपर्यंत चेहऱ्यावर स्मित ठेवून होते. नातवासाठी सारे काही हसत हसत सहन करीत....            
एरवी आजोबांचा पारा लगेच चढायचा. मनासारखी जर कुठली गोष्ट झाली नाही किंवा कुणी काही न आवडेल असं बोललं की ते लगेच भडकायचे. परंतु माझ्या अनेक त्रास होणाऱ्या गोष्टींना मात्र त्यांनी कधीही ओरडायचा सूर लावला नाही. मी आणि माझा मित्र शाळेतून येतेना, बस मधून उतरलो की आमची दप्तरं आजोबांच्याकडे देऊन अगदी बेभान पळत सुटू. तेव्हा पाठीवर ओझं असून सुद्धा हा माणूस आमच्या मागे पळायचा. मागून 'हळू, हळू ' असं सांगायचा प्रयत्न करायचा. आम्ही कुठले ऐकणारे होतो? एकदा मात्र पळत पळत बिल्डींग खाली येताच आईने पाहिले आणि दोन प्रश्न विचारले. " आजोबा कुठे आहेत?" "दप्तर कुठे आहे?" आणि काय प्रकार सुरु आहे हे आईला तेव्हा कळले. दुसऱ्या दिवशी आम्ही आमची दप्तरं आमच्या खांद्यावर घेऊन पळू लागलो. पण आजोबांनी स्वतः कधीच ही गोष्ट घरी सांगितली नाही.
ही गोष्टच नाही पण आजोबांनी अजून बऱ्याच गोष्टी घरी कधी कळू दिल्या नाहीत. म्हणजे मी बाहेर असताना त्यांच्याकडून विकत घेऊन किती chocolates खाल्ली ह्याची गिनती! किंवा उरसात गेल्यावर घरून बंदी असलेले 'बाहेरचे पदार्थ' त्यांना पटवून कसे खाल्ले. बाकी मी देखील हुशार होतो. पहिले आई बरोबर उरसात जायचो. आणि कुठे काय खायला आहे ह्याची यादी करून ती पाठ करून ठेवायचो. मग दुसऱ्या दिवशी तीच यादी आजोबांसमोर मांडायचो. ही माझी उरसात जायची दुसरी इनिंग असायची. आजोबा मात्र काहीही न बोलता आपल्या नातवासाठी हे सारे पदार्थ खायला घ्यायचे. हा आमच्यातला गुप्त करारच होता.   
पण सर्वात ज्या गोष्टीने मला आजोबांशी 'connect ' केलं असेल ती म्हणजे क्रिकेट! आजोबांना क्रिकेटचे अगदी प्रचंड वेड होते. आणि आमच्या दोघांचा आवडता क्रिकेट खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. ह्या संदर्भात मला आजोबा आठवतात ते १९९६ चे. वर्ल्ड कप बघतानाचे. आम्ही दोघांनी सचिनने रचलेला धावांचा डोंगर पाहिला. त्याला दाद दिली आणि तो बाद झाला की निराशा देखील व्यक्त केली. मला आठवते भारत वि. ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपची मैच. ऑस्ट्रेलियाने बऱ्याच धावा केल्या होत्या. आपला सचिन गोलंदाजांवर तुटून पडला. चौकारांचा आणि षटकारांचा अगदी पाउस पाडला. पण आता जिंकतोय असं वाटणार तेव्हा तो नौवदच्या आसपास  बाद झाला. आणि पुढे आपले फलंदाज काहीही करू शकले नाहीत. सचिन बाद झाल्यावर तो आजोबांचा चेहरा मला अजून स्वच्छ लक्षात आहे. मी शाळेतून आलो किंवा बाहेरून आलो आणि सचिनची सेंच्युरी झालेली असेल की आजोबा दारातच घोषणा करायचे , " सचिनची सेंच्युरी झाली!" इथे मात्र मला सांगणे हे एक निमित्त असे. घरी आजीला क्रिकेट मध्ये रस नसल्यामुळे आपल्या आवडत्या खेळाडूबद्दल झालेला आनंद व्यक्त कुणासमोर करायचा? बाकी, आम्ही जसं क्रिकेट बघितलं तसं ते खेळलो देखील. सुदैवाने घरातला हॉल मोठा होता. बूट ठेवायचे कपाट stumps बनत आणि अख्खा हॉल म्हणजे मैदान. कधी कधी मला लहर आली की आम्ही दोघेच...मग ते दुपारचे भर उन का असेना.... खाली क्रिकेट खेळायला जात असू. आमच्या त्या क्रिकेटची आठवण तिकडे दुकान असलेला न्हावी अजून काढतो. काही वर्षांनी, आजोबा गेल्यानंतर, जेव्हा जेव्हा क्रिकेटचा सामना टी.व्ही वर लागत असे तेव्हा मी आपला आजोबांचा फोटो टी.व्ही समोर आणून ठेवत असे....

ह्याच क्रिकेटने आम्हाला शेवटपर्यंत जोडून ठेवले होते. मला अजून आठवते. १९९७ सालचा तो सप्टेंबर महिना. शेवटचा सप्टेंबरचा आठवडा. आजोबांनी आजीला सांगितले होते की त्यांच्या छातीत दुखत आहे. ( हे आजीने मला नंतर सांगितले) . आजीने त्यांना डॉक्टरकडे जायचा सल्ला देखील दिला होता. आणि दिनांक २७ सप्टेंबरचा तो शनिवार. मी शाळेतून जरा उशिरा आलो म्हणून खिडकीत माझी वाट बघत बसणारे माझे आजोबा. घरी आलो तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. मला आणायला यायची तयारी त्यांनी केली होती. पण तुमची तब्ब्येत बरी नाही ना, म्हणून आजीने त्यांना घरीच थांबायला सांगितले. मी जेवलो आणि क्रिकेट खेळायचा प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडला. आणि त्यांनी तो स्वीकारला! जवळ जवळ तासभर आम्ही खेळलो. हे सगळे त्यांची छाती दुखत असताना देखील. आणि दोन दिवसांनी, २९ सप्टेंबरच्या सोमवारी आजोबा फिरायला बाहेर पडले. आणि त्यांच्या छातीचं दुखणं वाढलं. आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागले. मंगळवारी सकाळी बसने शाळेत जाताना ते हॉस्पिटल वाटेत दिसले तेव्हा मी बसमध्ये त्यांना उद्देशून बोललो होतो, " लवकर बरे व्हा....मी दुपारी येतो आहे." पण दुपारी हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत आजोबा आम्हाला सोडून गेले होते. Heart Attack च्या एका झटक्यामुळे  ते आता मला कधीही भेटणार नव्हते.
त्यादिवशी मी घरी आलो. थेट बेडरूममध्ये गेलो. कंबरेवरचा पट्टा काढला. आणि देवाऱ्यातल्या देवांवर उगारला. सगळे देव खाली पडले. आणि माझ्या आजोबांना माझ्यापासून दूर नेलेस म्हणून एकेका मूर्तीला बडवून काढले. ह्या गोष्टीचे मलाच आश्चर्य वाटते आता. पण तेव्हा त्यांच्यावरच्या प्रेमापोटी माझ्या लहान मनाने मला हा पवित्रा घ्यायला लावला होता. त्यानंतर काही महिने घरी कुणी काही बोललं की मी खिडकीत जाऊन आकाशात बघून बोलत असे, " का गेलात? प्लीज परत या...इकडे मला सगळे ओरडतात."  लहान वयात सारे काही शक्य वाटते. नाही का?   
अमेरिकेत ह्युस्टनला असताना सहज श्रीकृष्ण ही 'सीरिअल' बघत होतो. कृष्ण आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलतो ती घटना सुरु होती. अचानक आजोबांची आठवण झाली. मनातल्या मनात कृष्णाला वंदन करीत, चेहऱ्यावर आनंदाचे ते विलक्षण भाव ठेवून आजोबांनी सांगितलेली ती गोष्ट. " आणि कृष्णाने तो पर्वत आपल्या करंगळीवर उचलला...." ती त्यांची मूर्ती डोळ्यासमोरून जाईना. अचानक डोळ्यात आस्व आली. ओघळू लागली आणि काही केल्या थांबेना. रात्रीचे २ वाजले असतील. खोली बाहेर पडलो आणि खूप रडलो. त्यादिवशी आजोबांसाठी काहीतरी लिहिले पाहिजे हे मनापासून वाटू लागले. आज ते लिहिले.    

-आशय गुणे

Image Credits:
1. http://sonofdavinci.deviantart.com/art/Grandfather-Sketch-68644333
2. http://www.dreamstime.com/royalty-free-stock-photo-grandfather-and-grandson-image11603125
3. http://www.bettysportraits.com/PictureGallery11.htm