Pages

Total Pageviews

Monday, June 25, 2012

सायकल चालवणारा क्रिस

मी राहत असलेल्या 'San Antonio ' ह्या शहरी सार्वजनिक वाहतूक सेवा अर्थात 'public transport service' बेताच्या सोयीचीच होती. तुम्हाला जर कुठे बस ने जायचे असेल तर आधीपासून योजना आखायला लागायच्या. कारण बस ची 'फ्रीक्वेन्सी' ही दर एका तासाने अशी होती. अमेरिका हा कितीही विकसित देश असला तरीही काही प्रमुख शहरं सोडली तर सगळीकडे हीच तऱ्हा आहे. गाडी घेण्याची संस्कृती असलेल्या देशात ( ह्याचा संबंध कृपया श्रीमंतीशी लावू नये) गाडी न घेणाऱ्यांचे वांदे नाही झाले मगच आश्चर्य! आणि अमेरिकन सामान्य माणसं न्याहाळणाऱ्या माझ्यासारख्या मुलाला गाडी घेऊन कसे चालेल? त्यामुळे 'गाडी घेणे' ह्या गोष्टीला कधीही मी प्राधान्य दिले नव्हते. आणि मॉटेल मध्ये कामाला जाताना मी बस सेवेचा उपयोग (?) करायचो. पहिली बस आमच्या विद्यापीठाच्या दारातच यायची आणि मला एका park and ride ला सोडायची. तिकडून दुसरी बस एका bus -stop वर सोडायची जिथून आमचे मॉटेल हे १० मिनिटे चालायच्या अंतरावर होते. हा सगळा खटाटोप माझे दीड तास कुर्तडायचा! पण बसने जाताना अमेरिकन वल्ली दिसायचे आणि तितकीच मजा यायची! पण वीकेंड्सला ही दुसरी बस घोळ घालायची. तिचे वेळापत्रक खूपच वेगळे असायचे. त्यामुळे मॉटेलला पोचायला आधीची बस जरी वेळेत पकडली तरीही दुसऱ्या बससाठी ताटकळत उभं राहायला लागायचं. आणि अशा वेळेस मॉटेल मालकाने जर रविवार म्हणून लवकर बोलावलं तर सगळ्या वेळापत्रकावर पुनःविचार!

एकदा असंच रविवारी मला ८ वाजता बोलावण्यात आलं. आणि त्यामुळे लवकरची बस पकडावी लागणार होती. आणि दुसऱ्या बसच्या stop वर तब्बल ५० मिनिटे उभे राहावे लागणार होते. दुसऱ्या बसचा प्रवास अगदी १० मिनिटांचा असला तरीही ते अंतर चालणं म्हणजे जवळ जवळ ५ मैल! आणि तिकडे उतरल्यावर मॉटेल पर्यंत चालणं अजून २ मैल. आधीच अख्खा दिवस lab मध्ये प्रयोग करण्यात जाणार होता. त्यानंतर परत ७ मैल चालणे? त्यामुळे मी मित्राची सायकल बरोबर घेतली. अमेरिकेत बसने जाताना तुम्ही बरोबर सायकल घेऊन जाऊ शकता. ही सायकल बस पुढे असलेल्या एक लोखंडी खाच्यात अगदी घट्ट, व्यवस्थित बसते. आणि तुमचा stop आला की ड्राइव्हरला सांगून तुम्ही ती काढायची आणि परत सायकल चालवत चालवत पुढे जायचे. असं बरीच लोकं करतात. आणि एकंदर गर्दी कमी असल्यामुळे आणि त्यामुळे डोक्याला ताप अधिक नसल्यामुळे ड्राइव्हर शांतपणे तुम्हाला असं करू देतो. ( हो! त्याच्या चेहऱ्यावरची मुद्रा न बिघडवता!)
तुम्ही एक गोष्ट ठरवता. आणि तुमच्या नकळत त्या गोष्टीने तुमच्यासाठी पुढे बरेच काही ठरवून ठेवलेले असते. त्या दिवशी मी 'सायकल नेणे' ह्या गोष्टीने असेच काहीतरी केले आणि मला क्रिस ही वल्ली भेटली!
मोठा विलक्षण अनुभव आणि तितकीच विलक्षण वल्ली!
माझी शिफ्ट रात्री १० च्या ऐवजी रात्री ८ ला सुरु झाली. दोन तास जास्त काम करून तितके अधिक डॉलर मिळतील ह्यापेक्षा मॉटेल manager च्या बायकोच्या हाथचे जेवण मिळेल ह्याच उत्सुकतेने मी रविवारी लवकर शिफ्ट करायला तयार असायचो! ह्या बाबतीत मी स्वतःला नशीबवान समजले पाहिजे. ही फेमिली स्वतःच्या जेवणाबरोबर माझे देखील अख्खे ताट तयार ठेवायचे. ते देखील अगदी भरपूर! शिवाय घरी काही गोड-धोड असेल तरीही. हे जेवण जरी गुजराती पद्धतीचे असले तरीही भारतीयच ना! आणि भारतीय विद्यार्थी असलेल्या माझ्यासारख्याला जर अशी मेजवानी मिळत असेल तर भाग्ययोगच! पुढे पुढे मी त्यांचा लाडका झाल्यानंतर मला जवळ जवळ रोज काहीतरी खायला मिळायला लागले. त्यांच्याबद्दल पुढे कधीतरी लिहीनच!
तर जेवण वगेरे करून ११ च्या सुमारास मी गल्ल्यावर बसलो. रविवार असल्यामुळे गर्दी कमीच! आणि एक उंच, गोऱ्या वर्णाचा माणूस मॉटेल मध्ये आला. चाळीशी जवळ आली असावी असं त्याच्याकडे बघून वाटत होतं. एक निळसर टी- शर्ट आणि विटलेली कधीतरी निळी असेल अशी जीन्स घालून आणि एका हातात bag घेऊन आणि दुसऱ्या हातात सिगारेट पकडून धूर सोडत त्याने प्रवेश केला. no smoking ' चा बोर्ड पाहून 'ओह! आय एम सॉरी' म्हणून तो परत बाहेर गेला आणि सिगारेट फेकून आत आला.

" मला एक स्मोकिंग रूम हवी आहे."
" माफ करा. आमच्याकडच्या स्मोकिंग रूम्स संपल्या आहेत. तुम्हाला बाहेर येऊन स्मोक करावे लागेल. मी नॉन-स्मोकिंग देतो. चालेल?"
"चालेल", तो म्हणाला. औपचारिकता पूर्ण झाल्यावर मी त्याला त्याच्या खोलीची चावी दिली आणि इकडून तिथपर्यंत कसे जायचे हे अभिनय करून सांगितलं. आणि समान घेऊन जाता जाता त्याचे लक्ष मी पार्क केलेल्या सायकलीकडे गेले आणि त्याचा चेहरा खुलला!
" ही तुझी बाईक आहे का?" मी हो असे सांगितल्यावर तो अजून खुश झाला आणि अजून चढ्या आवाजात म्हणाला, " कूल! तुला बाइक्स चालवायला आवडते का? इट इज वन ऑफ दि एक्सायटिंग थिंग्स टू डू!"
अमेरिकन माणूस आपल्यासमोर त्याच्या आवडी-निवडी चे गाठोडे उघडतो हे माझ्यासाठी नवीन नव्हते. ' आय लाईक धिस...आय डोंट लाईक धिस....' अमेरिकन माणसाशी बोलताना अशी वाक्य दर पाच मिनिटाला आपल्याला ऐकू येतात. आता हा काय बोलतोय म्हणून मी हसरा चेहरा ठेवायचा प्रयत्न करीत त्याच्याकडे बघू लागलो.
" बाईक चालवणे म्हणजे निसर्गाच्या किती तरी जवळ जाण्यासारखे आहे.आय एन्जोय इट सो मच...इट इज रिलाक्सिंग! मला कामातून वेळ मिळाला की मी नेहमी बाईक चालवत जातो...अगदी दूर दूर पर्यंत!"
हो, बऱ्याचदा असे बाइकस्वार अमेरिकन रस्त्यांवर दिसतात. खूप चांगल्या पद्धतीने सायकल मेंटेन केलेली असते, खांद्यावर bag आणि सायकलला अडकवलेली पाण्याची किंवा गेटोरेडची बाटली असा त्यांचा थाट असतो! रस्त्याच्या एका कडेने, कुठल्याही गाडीच्या मध्ये न येता एका ठराविक वेगाने ही माणसं सायकल चालवण्याची मजा घेत असतात. खाण्या-पिण्याच्या stock संपला की नजीकच्या gas station cum convenience store मध्ये थांबायचे आणि सगळा stock refill ! ह्या लोकांवर भारतीय विद्यार्थ्यांची प्रतिक्रीय अगदी मोलाची असते - " काय वेडपट माणसं आहेत. एवढ्या उन्हात सायकलिंग? ह्या लोकांना काही काम -धंदे आहेत की नाही?" असो, ह्या लोकांना बघून आपण आत्तापर्यंत आयुष्य एन्जोय केलं का असाच प्रश्न आपल्याला पडतो हे देखील खरच!
" रिअली? इट मस्त बी कुल!" त्याच्या बोलण्याला मी दाद दिली. मी अकरावी नंतर सायकल चालवली नव्हती. भारतीय शहरात जर तुम्ही सायकलने कॉलेजला गेलात ना तर ह्या चार पैकी काहीतरी समजले जाते. एक तर हा गावातून आला आहे किंवा हा गरीब आहे नाहीतर हा 'modern ' नाही! किंवा हा low standard चा आहे. आणि हे तर मी शाळेत जाताना होतं. आता तर शाळेत जाणारी मुलं पण वाहनं वापरतात.
" आय एम क्रिस!" त्याने माझ्याशी हात मिळवला आणि मी देखील स्वतःचे नाव त्याला सांगितले. " नाईस टू मीट यु!" आम्ही दोघेही एकमेकांना म्हणालो.
जवळ जवळ तासाभराने मी क्रिसला बाहेर सिगारेट पिताना बघितले. रात्रीचे बारा वाजून गेले होते. मॉटेलची एक चक्कर मारून आणि सारे दरवाजे व्यवस्थित लावले आहेत का हे सगळं बघून मी गल्ल्यावर परतलो होतो. कुणीही चोरी करायला आत येऊ नये म्हणून ही दक्षता घ्यावी लागते. थोड्यावेळाने क्रिस आत आला.
" खूप व्यस्त असते का रात्री? बरीच लोकं येतात?"
" नाही. आज रविवार आहे. त्यामुळे फार पब्लिक नाही. आराम आहे", मी म्हणालो.
उत्तरा दाखल क्रिस ने त्याचे दोन्ही ओठ एकमेकांना जोडून एक घट्ट चेहऱ्याचे भाव दर्शवून मान डोलावली. एका टीपीकल अमेरिकन सारखी.
" पण मला तुझी बाईक आवडली. तू तिला खूप चांगल्या रीतीने मेंटेन केले आहेस", तो म्हणाला. माझ्या रुममेट चे श्रेय घेऊन मी त्याला धन्यवाद दिले.


" बाईकची काळजी घेणे खूप महत्वाचे असते. माझ्याकडे 'ट्रेक' बाईक आहे आणि आय लव्ह इट! वीकेंड्सला मी भरपूर मैल सायकल चालवतो. खूप फ्रेश वाटते. तू किती मैल चालवतोस?"
क्रिसच्या ह्या प्रश्नाने मी भानावर आलो. एक तर ही सायकल माझी नव्हती. मी ही सायकल चालवत जास्त लांब म्हणजे विद्यापीठापर्यंत गेलो होतो. हे अंतर पाच मैल पण नसेल!
" आम्ही नजीकच्या देवळात जातो", मी उगीचच ठोकून दिले. आता क्रिस ने पुढे मला देवळापर्यंत किती अंतर आहे हे नाही विचारले म्हणून मी त्या देवळातल्याच देवाचे आभार मानले!
" पण हल्ली वेळ नाही मिळत अजिबात. बरेच दिवस झाले मी कुठे गेलो नाही", क्रिस किंचित हसला.
" हम्म.. खूप बिझी असशील ना तू? वीकेंडला सुद्धा वेळ नसतो?" मी उगीचच सहानुभूती दाखवली.
" हो ना. एका manager ला किती वेळ असेल? माझे बरेच दिवस फिरण्यात जातात. टेक्सास मध्ये फिरत असतो मी. सगळीकडेच काही सायकल नेता येत नाही. आणि नेली तरी खूप चालवता येत नाही". तो म्हणाला.
" तू manager आहेस?" मी बऱ्यापैकी आश्चर्याने विचारले. Manager आणि सायकल? माझ्या मनातील चक्र सुरु झाली. मला हा माणूस एका बाजूला टाय आणि कोट आणि प्रचंड कामात आहे असा दिसू लागला आणि दुसरीकडे खांद्यावर bag घेऊन घाम गाळत- गाळत सायकल चालवणारा! ह्या दोन्ही चित्रांचा मेळ काही मला घालता येईना! शेवटी मलाच राहवलं नाही आणि मी संभाषण पुढे नेले.
"केव्हापासून चालवतो आहेस बाईक?"
"गेल्या तीन वर्षांपासून." तो 'ब्रेकफास्ट - सकाळी ६. ०० ते ९.०० ' ह्या बोर्डकडे बघत होता आणि काही सेकंदात म्हणाला, " माझ्याकडे गाडी होती. ती विकली आणि मी बाईक विकत घेतली."
अमेरिकन माणसाचे बोलताना ' beating around the bush ' शक्यतो नसतं. त्यामुळे तो जे बोलतो ते अगदी थेट. अशामुळे कधी कधी विषय निघालेला नसलं तरीही त्याच्याकडून बरंच काहीतरी सांगितलं जातं. आता त्याने गाडी विकली हे एकदम सांगणं मला त्यातलाच प्रकार वाटला.
" तू गाडी विकलीस आणि सायकल विकत घेतलीस?" मी आश्चर्यचकित होऊन त्याला विचारले. एक तर हा Manager होता. दुसरीकडे ह्याने सायकल घेतली इथपर्यंत ठीक. पण गाडी विकून सायकल घेणे? पण मी दोन वाक्यात कुणाला ही मूर्ख ठरवत नाही. त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घेतो. कदाचित म्हणूनच मला अशी माणसं भेटत असावी.
क्रिस जोरात हसला आणि सांगू लागला.
" माझा जन्म एका श्रीमंत परिवारात झाला. San Fransisco ला आमचे एक मोठे घर होते. माझे सारे लहानपण गाडीतून हिंडण्यात गेले. माझ्याकडे एक अगदी लहानशी बाईक होती. पण मी ती आमच्या गार्डन मध्ये चालवायचो. बाहेर जाताना सदैव गाडी! बट आय मिस्ड राईडिंग ए बायसइकल इन माय चाईल्डहूड!" मी आश्चर्याने ऐकत होतो. " माझ्या कॉलेजच्या शिक्षणाच्या वेळेस सुद्धा हीच परिस्थिती होती. मी एक Mustang विकत घेतली होती. त्यामुळे मला बाईक चालवायला नाही मिळाली." त्याला सायकल चालवायला मिळाली नाही ही गोष्ट तो वारंवार ठसवत होता हे मला जाणवले. त्याला साऱ्या सुख-सोयींचा पश्चाताप होत होता की काय? " मग तू नवीन बाईक घ्यायचे ठरवलेस?" मी विचारले. माझ्यातली हीच गोष्ट मला आवडत नाही. मी कधी कधी दुसऱ्याचे वाक्यच पूर्ण होऊ देत नाही.
" नाही नाही...", त्याने एक स्माईल दिली आणि पुढे बोलू लागला. माझे हे मध्येच बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नव्हता. " मला ही नोकरी लागली आणि मी ती गाडी वापरणे सुरु ठेवले. आणि पुढे काही वर्षांनी मी एक नवी,कोरी गाडी घेतली. पण कुठे तरी सदैव ही बोच होती की आपण सायकल कधीही नाही चालवू शकलो!" मी किंचित हसलो. अजून काय करू शकणार होतो मी? नवी कोरी गाडी घेऊन सुद्धा ह्या माणसाला कसले वाईट वाटत होते? सायकल न चालवण्याचे?
" मग बत्तिसाव्या वर्षी एकदा समर मध्ये ( उन्हाळ्यात) मी गाडी चालवत घरी चाललो होतो. खिडकीतून बाहेर नजर गेली तर दोन व्यक्ती सायकल चालवत चालले होते. उन्हाळ्याची मज्जाच घेत होते म्हण ना! आजू-बाजूच्या दुनियेशी काहीही घेणं-देणं नाही. एका स्पीड मध्ये चालले होते. त्यांचा आनंद हा माझ्या 'मेकानिकल' आनंदापेक्षा कितीतरी पट जास्त होता. आणि तेव्हाच मी ठरवून टाकले..."
"काय?" मला अपेक्षित असलेली गोष्ट बाहेर पडणार होती म्हणून मी आधीच विचारले.
" की मी आतापासून सायकल चालवणार आहे. माझा तेह्त्तीसावा वाढदिवस आठवड्यानंतरच होता. एक आठवडा थांबलो आणि वाढदिवसाच्या दिवशी मी एक सायकल विकत घेतली. आणि असलेली गाडी विकून टाकली. कोण उगीचच मोहात पडेल!"
" मग तू ऑफिस मध्ये कसा जातोस?" मी विचारले.
" सायकलने bus -stop पर्यंत जायचे आणि बसला सायकल लावायची...प्रवास झाला की परत सायकलवर बसायचं आणि तिकडून ऑफिसला जायचे."
" आणि हे सारं तुझ्या बायकोला मान्य आहे?" हा माझा प्रश्न बावळटपणाला शोभेल असा होता. त्यावर क्रिस ने काहीसे त्रासिक चेहऱ्यानेच उत्तर दिले.
" का मान्य नसेल? तिच्याकडे तिची स्वतःची गाडी आहे. ती घेऊन ती कामाला जाते. मला जे वाटतं ते मी करतोय. ती कशाला काय म्हणेल?" आपल्याकडे ' सौ. जोशी ह्यांचा नवरा सायकल चालवतो' अशी अफवा शहरभर पसरली असती असं माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि त्या अफवेत 'Manager असून' हे धृवपद पण चिकटल असतं! तेवढ्यात एक मोठा परिवार राहायला आला आणि त्यांना दोन खोल्या द्यायच्या म्हणून मी थोडा बिझी झालो. क्रिस वरती निघून गेला.

लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिस मला पुन्हा भेटला. कॉफी पिताना त्याने मला त्याचे पुढचे मनसुबे सांगितले. तो एक 'bikers ' club ' जॉईन करणार होता. आणि त्याला बऱ्याच ठिकाणी सायकल चालवत जायचे होते. वेळ काढून मी हे सगळं करणार आहे असं त्याने मला सांगितलं.
" इट वॉझ नाईस स्पिकिंग विथ यु.... तुझा आता एक मित्र आहे. काही हवे असल्यास मला कळव. हे घे माझे कार्ड", त्याने मला त्याचे कार्ड दिले.
" गुड बाय सर! Have a Nice Day !" आणि मी एका विलक्षण पाहुण्याचा पाहुणचार संपवला. आणि त्याचे कार्ड नीट बघितले. त्याच्यावर 'Manager ' हे लिहिले होते.
दोन दिवसानंतर भारतात एका मित्राला फोन केला. बोलता बोलता एका दुसऱ्या मित्राचा विषय निघाला. ह्या आमच्या दुसऱ्या मित्राने होंडा सिटी घेतली असं मला समजलं. माझा हा मित्र फोनवर बोलू लागला.
" तो आधीपासून brilliant होता रे. नोकरी चांगली मिळाली....गाडी घेतली आहे आता...एक- दोन वर्षात लग्न पण करेल. अजून काय हवे? त्याची तर लाईफ फुल सेट आहे रे!"
दूर माझ्या देशात आयुष्य जगण्याची चौकट अजून सैल झाली नव्हती.
-आशय गुणे



Image Credits:
1. http://texastrails.biketexas.org/bikes-and-buses-past-present-and-future/415
2. http://wallpaperstock.net/sketch-of-a-smoker-wallpapers_w10050.html
3. http://www.bikingvietnam.com/store/vietnam_Bikes_shop.htm
4. http://www.clker.com/clipart-14850.html

2 comments: