९०च्या त्या दशकात, लहानाचे मोठे होणं ही फार भाग्यवान गोष्ट होती! ह्याचे कारण ....ज्या लोकांनी त्या काळात बालपण घालवले त्यांना आठवेल...सायकल हे आपलं वाहन होतं, दुचाकी आस-पास विपुल असत..... घरी 'लॅंडलाइन' असणं गर्वाने सांगितले जायचे, आणि मित्रांना त्यावर घरी फोन करणे नित्याचे असत......मोबाइल हे श्रीमंतीचे लक्षण मानले जात आणि त्यांनी 'पेजर' ची जागा अजुन घेतली नव्हती! खूप कमी मित्रांच्या घरी 'केबल' असत! शाळेत, मुलीशी बोलणं, ह्याचा अर्थ काहीतरी 'सुरू' आहे असा घेतला जात, व 'शिक्षा मिळणे' ही गोष्ट 'शरमेने' मान्य केली जायची! 'इंग्रजी' माध्यमाची मुलं सुद्धा 'मॅडम'....त्या कितीही मोठ्या असल्या तरी त्यांना 'मिस' असच म्हणून, उगीच त्यांना तरुण असल्याचे भास होऊ देत! ( असे असल्यावर 'मॅडम' तरी मुलांच्या चुका कशाला सुधारतील? )
मी 'आठवीत' असताना , 'केबीसी' ने इतिहास घडवला होता...रात्री ९ वाजता सर्व रस्ते रिकामे दिसत! तर ह्याची 'लहान मुलांची आवृत्ती' माझ्या बालपणी घडली! 'जंगल बुक' च्या निमित्ताने! :) होय! तो दिवस असायचा रविवारचा, आणि ती वेळ असायची सकाळी १० ची! एक पिवळी 'अंडर-पॅंट' नेसलेला हा 'मोगली' नावाचा मुलगा आमचा सर्वांचा लाडका झाला होता. ही आमच्या रविवार सकाळची अगदी आनंदाची सुरूवात असे! मोगली चे पराक्रम आमच्यासाठी फार आनंद देणारे ठरत! आत्ता विश्वास बसत नाही....पण...त्या सकाळी १० वाजता, कुणीही पोर बाहेर खेळताना दिसत नसे! एक-दोन वर्षानंतर, ह्याच मोगली ची जागा 'मिकी माऊस' व 'डोनाल्ड डक' ने घेतली! अर्थात 'डिसनी अवर' ने! हा 'आवर' 'आवरणे' खरच कठीण जात! ह्यात 'प्लूटो' ह्या कुत्र्याला, बरेच प्रयत्न करून काहीही मिळत नसे, तर 'गुफी' ह्याच्या आवाजावर आम्ही निदायत 'फिदा' होत असु! दुसरीकडे, 'अंकल स्क्रूज' आणि त्याचे 'पुतणे' खजीना शोधत बसत, तर 'डोनाल्ड डक' नेहमीच बदडला जाई! मिकी आणि मिनी ह्यांची प्रेम कहाणी त्या वयात सुद्धा आमच्या मनात एक विचित्र भावना निर्माण करून जायची! पुढे तर ह्या डिसनी ची जागा 'सबकुछ कार्टून' अश्या 'कार्टून नेटवर्क' ने घेतली. पण हा प्रकार घरी यायला घरी 'केबल' असणे जरूरीचे होते....आणि लहान वयात आम्हाला त्याची परवानगी नव्हती! म्हणून 'दूरदर्शन' मध्ये आम्ही समाधान मानले! पण ह्या चिमुकल्या वयात ह्या 'दूरदर्शन' ने बर्याच गोष्टी 'जवळून' दाखवल्या आणि ह्या 'दोन वाहिन्यांशी' आमची चांगलीच गट्टी जमली होती!
थोड्या काही वर्षांनी ह्याच रविवार सकाळी ११.३० वाजता 'महाभारत' सुरू होत असे! आणि ह्या मालिकेने घरातील सर्वांसाठी एक तास एकत्र बसणे जणू योजलेच होते! काय मज्जा यायची! त्यातले 'तत्व' काय, हा विचार करण्याचे ते वय नव्हते, पण ह्या 'कथे' बद्दल नक्कीच काहीतरी 'वेगळ' असा वाटायच! मला, 'भीम' ह्या व्यक्ती बद्दल विशेष आकर्षण होते.....आणि असं पण, मुलांचा कल हा 'शक्ति'कडे असतोच!
पण सर्वात नवल मला ज्या एका गोष्टीचं वाटतं, ती म्हणजे, आमचे मनोरंजन हे 'दोन वाहिन्या', एवढेच होते! पण तरीही आम्ही त्याची मज्जा पूर्णपणे लुटली! ह्याचे कारण असे असेल, की त्या वेळेच्या मालिका, ह्यात बर्याच गोष्टी अश्या होत्या, ज्या आमच्या वयाला पूरक होत्या! आमच्या भावनांना पूरक होत्या! 'राजेशाही' ची ओळख पटवून द्यायला ' ग्रेट मराठा' आणि 'टिपु सुलतान' होते, 'दैवी' गोष्टींची झलक दाखवायला, 'महाभारत' आणि 'जय हनुमान' होते! मला खास आठवतोय, 'द ग्रेट मराठा' मधला महाजी शिंदे, ज्याला घोड्यावर पाहून एक वेगळेच शौर्य मनात यायचे! मला 'भीम आणि दुर्योधन' ह्यांचे गदा-युद्ध सुद्धा ह्याच भावनेने बघितल्याचे आठवते! चौथीत असताना तर, मी आणि माझा वर्गमित्र, आदल्या दिवशी महाभारतात काय झाले, ह्याची 'अभिनया' सहित चर्चा करायचो! ;) ह्या पार्श्वभूमीवर मला आजची लहान (?) मुलं वर्गात काय चर्चा करतात ह्याची जबरदस्त उत्सुकता आहे! असो!
'वीकडेझ' च्या त्या खास 'सीरियल' कोण विसरेल बाबा?! एक होती 'तेहकिकात' जेव्हा एक 'सॅम डिसिल्वा' नावाचा डीटेक्टिव, त्याच्या 'गोपी' नावाच्या सचिवा बरोबर, 'नैसर्गिक नियमांचे' पालन करून शोध लावत असे! त्याची जागा नंतर, 'राजा' नावाच्या एका डीटेक्टिव ने घेतली, ज्याची मदत करायचे एक 'रॅंचो' नावाचे माकड! लहान मुलांना मजा वाटेल की नाही ह्याने? विनोदी मालिकांनी तर आपला झेंडा अजुन वर लावला होता! तरुण 'शेखर सुमन' ला 'देख भाई देख' मध्ये कोण विसरेल? गैर-हिंदी भाषिकांना हिंदी शिकवणारा, 'जबान संभाल के' चा 'पंकज कपूर' सुद्धा चांगलाच आठावतो! पण, विनोदी मालिकांचा फड जर कुणी जिंकला असेल, तर तो 'श्रीमान श्रीमती' ह्या मालिकेने! त्यात केशव कुलकर्णी, ह्याचे निरागस विनोद न विसरता येणारे असेच आहेत! त्यात बाकी सार्या कलाकारांचा अभिनय देखील छान होता! मी अजुन सुद्धा ही मालिका, कधी कधी 'यू-ट्यूब' वर बघतो! ;) त्यातल्या 'केशव' चे निधन लवकर झाले... नाहीतर ही मालिका अजुन खूप वर्षे नक्कीच चालली असती! काही अश्या 'मालिका' आहेत.....ज्या मे पूर्णपणे नाही बघू शकलो...पण त्यांच्या आठवणी मधून मधून जाग्या होत असतात! त्या म्हणजे...'टाइगर'. 'शक्तिमान', 'चंद्रकांता', 'जल्दी-जल्दी' , 'विजय' .....पण हो! हे सगळे 'दोन वाहिन्यांमुळे!' आणि दोन वाहिन्यांमध्ये!
अजुन एक, कधीही ने विसरणारी बाब, जी ह्या कृत्रिमता नसलेल्या दशकात होती, ती म्हणजे त्या वेळेच्या जाहिराती! नुसती लोकांनी एक वस्तू घ्यावी....आणि जाहिरात करणारा मोकळा व्हावा ही भावना तेव्हा नव्हती! आणि संगीत, हा त्यातला एक 'अदब' असलेला भाग होता! त्यातील 'हमारा बजाज' ही एक अशीच जाहिरात इतकी मनात बसली, की आज असा अगदीच कुणी असेल ज्याला ही माहिती नाही! 'धारा' च्या त्या जाहिरातीत, 'जले...बी...' म्हणणारा तो गोंडस मुलगा पण आपल्याला आठवत असेल! त्यात माझ्या आवडती होती 'पूरब से सूर्य उगा' गाणं असणारी 'शिकायला प्रोत्साहित' कॅरणारी जाहिरात! त्यात, आपण लहानपणी शिकवलेल्या मुलाने 'पेंट-ब्रश' हातात घेऊन नवीन व्यवसाय सुरू केलेला बघून, आजोबांना झालेला आनंद! भाटियार रागतील ते गाणे, विसरणे अशक्य! नंतर, 'लिरिल' साबणाने, धबधाब्यात नाचणारी प्रीती झिंट, व 'कॉम्प्लां' पिणारे लहान 'शहीद कपूर' आणि 'आयेशा टाकिया'.....नंतर, ' ये बात कुछ हजब नही हुई', असा म्हणणारा तो, व चटकन, 'हाजमोला, सर' उत्तर देणारी ती....त्याच्या विशिष्ट आवाजात 'लीज्जत पापड' म्हणणारा तो 'ससा'.....आपले दात किती मजबूत आहेत, हे सांगणारा, विकको वज्रदन्ती वापरणारा तो म्हातारा......आपल्या प्रीयकराने क्रिकेट खेळताना मारलेल्या शतका नंतर, भर मैदानात 'डेरी मिल्क' खात नाचणारी ती तरूणी'......आणि 'ये फेवीकोल का जोड हैं....' म्हणणारा तो.....अश्या किती तरी आठवणी आहेत!
अजुन एक खास लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे, दोन 'सीरियल' मध्ये असलेले 'फिलर्स'! त्या सार्या कलाकारांना आपण कसे विसरू शकतो, ज्यांनी मिळून 'मिले सूर मेरा तुम्हारा' गायले! राष्ट्रीय एकात्मता दाखवण्याची ह्याच्याहून चांगली कल्पना तरी काय असु शकेल! परवाच कुठे तरी नवीन 'मिले सूर' चे चित्रीकरण बघितले.....पण बर्यापैकी शून्य कामगिरी केलेले काही लोकं त्यात बघून, आणि कृत्रिम आवाज काढलेले बघून, हे काही जास्त दिवस चालायचे नाही, ह्याची खात्री पटली! भारताचे तमाम मोठे खेळाडू..... मशाल घेऊन धावताना आठवतात.....त्यात, पी. टी. उषा चे हरणांच्या बरोबर, धावताना केलेले अचूक चित्रीकरण सुंदरच! पण त्यात खास असा आठवतो तो म्हणजे सुनील गावसकर चा चेहरा! अगदी हसतमुख असा धावणारा गावसकर, मला क्रिकेट आवडते म्हणून कदाचित....लक्षात राहिला आहे! नंतर नाही विसरलो मी 'बजे सरगम' ह्या सुंदर गीताला!
आपण बर्याचदा आपल्या आई-बाबांना , आजी-आजोबांना....ते बदलत नाहीत ...स्वतःच्या काळातील गोष्टी सोडत नाहीत! पण जेव्हा मी ह्या माझ्या बालपणाबद्दल विचार करतो....तेव्हा माझ्या मनात नेहमी तुलना सुरू होते.....तुलना होते आजच्या मुलांच्या बालपणाशी! विचार येतो.....आपण किती सुखी होतो....आपण किती निरागस होतो....! मग मोठ्यांनी असा विचार करण्यात काहीही गैर नाही ना! पण मग जाणवते....की ह्या दशकाबद्दल आपल्या मनात अजुन जागा आहे....कारण ते कलात्मक होते, नैसर्गिक होते, पण त्यात आपले बालपण मिसळलेले होते!
No comments:
Post a Comment