" काय रे? काय झाले एकदम?" आश्चर्यचकित होत तिने विचारले. "एवढा दचकून काय पाहतो आहेस?"
" काही नाही ग. असाच एक विचार आला मनात." मी उत्तर दिले.
" मी हे सांगितले म्हणून तू एवढा दचकलास?का रे? एरवी तुझ्याशी बोलताना वाटले होते की तू एकदम frank असशील", पायल म्हणाली. मी काहीच बोललो नाही आणि चूक करून बसलो. कुणी असं बोलल्यावर गप्पं बसणं म्हणजे एका अर्थाने त्याला किंवा तिला दुजोरा देण्यासारखेच असते. आणि नेमके तेच झाले. मी काही बोलत नाही हे पाहून पायलसुद्धा काही सेकंद गप्पं बसली. शेवटी मीच तिला म्हणालो.
" असं काही नाही ग. तू उगीचच काही वाटून घेऊ नकोस. मी आपला वेगळ्या विचारात होतो. म्हणून एकदम काही बोललो नाही." आणि कसाबसा तिला शांत करीत आम्ही घरी आलो. वास्तविक मी कुठल्याही विचारात-बिचारात नव्हतो. तिने सांगितलेल्या तिच्या बॉयफ्रेंडबद्दलच्या कथेने माझ्या मनात घर केले होते. आणि पुढील काही दिवस प्रसाद नावाचा तो आता संसारी झालेला मुलगा माझ्या मनात उतरला होता. आणि उगीचच, पायल माझ्या मनातून उतरली होती.
कोण असेल तो? कसे भेटले असतील दोघे? तिला नक्की तो आवडला असेल का? की बाकी पोरांसारखे त्याने हिला फसवून आपल्या नादाला लावले? कशावरून हिने स्वतःच्या फायद्यासाठी ह्याला आपल्या बरोबर ठेवून घेतले नसेल....मुलींना आपली बिलं भरायला नाहीतरी कुणीतरी लागतोच! आणि ह्याच्याकडे 'बाईक' असेल ना! नाही...पण हिने तर आपल्याला कधी तिचे तिकीट पण काढायला लावले नाही? नाही, पण तो खूप पैसेवाला असेल. आपण कुठे आहोत? पण ते असुदे. म्हणून काय एकत्र राहायचं? म्हणजे ह्यांचे मनसुबे तरी काय होते? ही लोकं एकमेकांच्या जवळ गेली असतील कितीवेळा! की त्याच्यासाठीच हा सारा खटाटोप? पण मुलाबरोबर झोपता यावे असा विचार करणाऱ्या पायलने बोलताना आपल्याला साधा हात देखील लाऊ नये? पण पायल, तू असं करायला नको होतंस! हे आणि असे असंख्य विचार माझी पाठ सोडत नव्हते.पण बाकी ती आपल्याशी कशीही असो, ती एका मुलाबरोबर राहिली होती. दुसऱ्याने हाताळलेल्या, वापरलेल्या मुलीबरोबर आपण बोलतो आहोत इतके दिवस ह्या विचाराने मी कमालीचा अस्वस्थ झालो!
आणि होयचे तेच झाले. माझ्या बोलण्यात तुटकपणा येऊ लागला. मला एकीकडे वाटत होते तिच्याशी बोलावे. आमचे ठरलेले विषय मांडावे. बसने एकत्र प्रवास करावा, थोडी फार खरेदी एकत्र करावी, तिचे फैशनबद्दल सल्ले घ्यावे - वाटले तर थोड्या शिव्यादेखील खाव्या! पण कसलं काय! तो प्रसाद डोळ्यासमोर यायचा! विशेष म्हणजे तिलाही हे जाणवत होते की मी धड बोलत नाही आहे. बऱ्याचदा ती बोलायला यायची, दोन-तीन गोष्टींवर आम्ही माफक बोलायचो आणि नंतर विषय सापडत नाही म्हणून गप्पं बसून राहायचो. हे गप्पं बसणं अत्यंत अस्वस्थ करणारं असायचं. पण त्याला इलाज नव्हता. तिच्या चेहऱ्यावर, मी काही बोललो नाही, की निराशा दिसून यायची. पण बिचारी काही न बोलताच निघून जायची. आणि एके दिवस तिच्या विचारांचा बांध फुटला. बस मधून उतरून घरी चालत येत असताना, सवय झालेल्या त्या अबोल वातावरणात तिने मला सुनावले. " मला वाटलं नव्हत तू असा आहेस ते. मुलीला बसायला जागा दिलीस म्हणून मी तुला gentleman समजत होते. पण ही व्याख्या आता बदलायला हवी मला. तुला काय वाटतं? मला काही कळत नाही? तू सुद्धा इतर सर्व लोकांसारखाच आहेस! तुमचे विचार कधीच बदलणार नाहीत. माझंच चुकलं." आणि लालबुंद झालेली पायल आपले डोळे पुसित निघून गेली.
रात्रीचे ८.३० वाजले होते. पायलचे ते वाक्य कानात घुमत होते आणि तिचा तो चेहरा डोळ्यासमोरून जायला तयार नव्हता! शेवटी मीच ठरवले, लोकं काहीही विचार करो, आपण जाऊया. घरून निघालो. ९ च्या सुमारास हिच्या घरी जाणे बरोबर दिसले नसते. पण मला त्याची परवा नव्हती. चौथ्या माळ्यावर गेलो. दार वाजवले. आणि काही क्षणातच मी पायल समोर बसलो होतो. तिची कहाणी ऐकत.
" हो. प्रसाद आणि मी 'live in relationship ' मध्ये होतो." हे असं बोलून झाल्यावर तिने माझ्याकडे एकदा नीट पहिले. आणि मी पुढे बोलणार असे लक्षात येताच मला थांबायचा इशारा करून ती म्हणाली, " आणि मला ह्यात काहीच गैर वाटत नाही. का रे? तुला गैर वाटतं काही ह्यात?" आता मात्र मला बोलणं प्राप्त होतं.
" हो अर्थात! अशी लोकं लग्नाआधी एकत्र राहायला लागली तर लग्न ह्या गोष्टीला अर्थच काय उरला?" मी म्हणालो.
" पण मग लग्न हे काय एकत्र राहण्यासाठी करतो का आपण?" पायलने जणू प्रश्नांची बंदूकच रोखून धरली होती माझ्याकडे.
" हो अर्थात.....म्हणजे नुसतं एकत्र राहण्यासाठी नाही...पण लग्नानंतर एकत्र राहणे हीच संकल्पना आहे ना. ती एका प्रकारची परवानगी आहे. एकत्र राहण्याची". मी नाही म्हटलं तरी शब्दांची जुळवाजुळव करीत होतो.
" आणि ही परवानगी कोण देतं?" - पायल
"अर्थात समाज", मी म्हणालो.
"आणि समाजाला माहिती असतं की ज्या दोन व्यक्तींना आपण एकत्र राहण्याची परवानगी देतो आहे त्या दोन व्यक्ती एकमेकांसाठी बनल्या आहेत की नाही?" प्रश्नात्मक बंदूक परत माझ्यासमोर.
" त्याची काळजी समाज कशाला करेल? त्या दोन व्यक्तींचा प्रश्न आहे ना तो. त्यांनी एकमेकांना समजून घेऊन संसार चालवायचा ना."
" चल मग एक गोष्ट तर तू मान्य करतोस", हसत हसत पायलने सुरुवात केली, "... की एकमेकांना समजून घेणे ही गोष्ट तर वैयात्तिक आहे. पण मग 'एकमेकांना समजून घेणे' ह्यासाठी लग्न हे झालेच पाहिजे का? एखाद्या व्यक्तीशी लग्न करणं योग्य आहे का हे ठरवण्यासाठी मी जर त्या व्यक्तीला आणि त्याने मला ओळखायचा आणि समजून घ्यायचा प्रयत्न केला तर?"
"हो ना! पण त्यासाठी एकत्र राहणं आवश्यक आहे का? लग्नआधी ३-४ महिने जाणून घायचे एकमेकांना! एकमेकांना भेटायचे. कुठेतरी जेवायला जायचे. आणि स्वभाव जाणून घ्यायचे ", माझ्या दादाने केलेल्या गोष्टीची आठवण झाली मला एकदम.
" अरे एवढ्या कमी वेळात स्वतःला तरी ओळखू शकशील का तू? एकत्र जेवताना, कॉफी पिताना अगर अशा ठिकाणी किती ओळखणार तू दुसऱ्याला? जसा तुला स्वतःला ओळखायला एकांत हवा तसा दुसऱ्याला ओळखायला देखील हवा ना!"
हे काही मला अगदीच पटत नव्हतं असं नाही. पण आतून कुठून तरी आवाज येत होता...हे बरोबर नाही! मी नकारात्मक मान हलवतोय हे माझ्या लक्षात आले. आणि त्याला उद्देशून पायल पुढे बोलू लागली.
"मूळात एकत्र राहणे असं म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं तुझ्या? एकत्र राहणे म्हणजे एकत्र झोपणे असे नाही. तो फक्त त्यातला एक भाग झाला!" हे वाक्य अगदीच अनपेक्षित होते.पहिल्यांदाच एक मुलगी माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलत होती. इतके दिवस मुलींना सभ्यतेच्या पडद्यामागे पुरुषांनी ठेवल्यामुळे एका मुलीच्या तोंडून साधं 'साल्या' ऐकलं तरी ती मुलगी वाईट ठरत आली आहे. इथेतर तसल्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या गेल्या होत्या.
" पण मग एकत्र झोपणे ह्या गोष्टीचे तू समर्थन करतेस?" भांबावलेल्या अवस्थेत मी विचारले.
" तूच बघ ना, 'एकत्र राहणे' ह्या विषयावरून 'एकत्र झोपणे' ह्या विषयाकडे तू किती लगेच आलास. ह्याचा अर्थ तुझ्या विचारात तो एकच भाग अडून बसलाय!" पायलचा पारा, नाही म्हटलं तरी, थोडा चढला.
" पण मग तुझं म्हणणं तरी काय आहे?"
" आपल्याकडे लग्न कसं ठरवलं जातं? आपल्याला कुठून तरी स्थळ समजतं. आपले नातेवाईक मुलगी किंवा मुलगा सुचवतात. आणि बऱ्याच वेळेला त्यांच्यावर विश्वास ठेवून दोन्ही परिवार एकमेकांना भेटतात. मुलगा आणि मुलगी एकमेकांना बघतात. आणि एक....फार फार तर दोन बैठकीत पसंती कळवली जाते. ह्यात कळणार कसं....मुलगा आणि मुलगी एकमेकांसाठी बनले आहेत की नाही?"
" हो पण.... आपले नातेवाईक काय वाईट स्थळ सुचवणार आहेत?" मी मध्येच तिचे वाक्य तोडले. " पण मुळात माणसाचे, चांगला किंवा वाईट, असे दोनच भेद आहेत का?" ती म्हणाली. " मुळात स्वभाव...किंवा गुण जुळणं..ही फार मोठी गोष्ट आहे ना. हे कसं समजणार त्यांना?"
" ह्यासाठीच बहुदा आपण पत्रिका बघतो ना. ते ३६ गुण जमावे लागतात." जणू काय हा एक रामबाण उपाय आहे, अशा थाटात मी म्हणालो.
" मग हेच ३६ गुण जर आपण स्वतःच जमवले तर? एकत्र राहून, एकमेकांना समजून घेण्याच्या प्रयत्नात आपण ३६ काय....७२ गुण जमवू शकू!" ह्या वाक्यावर माझे उत्तर नसल्यामुळे एक विजयाचा भाव तिच्या चेहऱ्यावर मला दिसला. पण तरीही कुठेतरी मनात ही गोष्ट घर करायला तयार नव्हती. पायल face reading करत असावी. कारण काही सेकंदात ती लगेच मला म्हणाली, " पण लोकांच्या डोळ्यासमोर बेडरूम येते ना लगेच."
" हो मग. येणारच! बरोबर आहे का ते?" - मला विरोध करायला एक मुद्दा मिळाला.
" हे बघ. मी तुला आधीच सांगितले. live - in म्हणजे फक्त ते नव्हे. तो त्यातला एक भाग झाला. आणि जर मी कुणाबरोबर राहत असीन, त्याला समजून घेत असीन, तर ती व्यक्ती माझ्याशी प्रणय करण्यात कशी आहे हे ही तपासायला हवेच की! कारण प्रणय हा देखील भावी आयुष्यातील महत्वाचा भाग आहे, नाही का? त्यात सुद्धा वृत्ती पटायला हवीच की. आणि मी कशाला, पत्रिकेतील योनी हेच सांगते की."
डोक्याला झिणझिण्या येऊ पाहणारी वाक्य होती ही. शेवटी मीच काहीतरी विचारायचे म्हणून विचारले. " मग प्रसादचे काय झाले?"
" प्रसाद आणि मी गोदरेज मध्येच भेटलो. खूप गुणी मुलगा होता तो. होता कशाला, आहे अजून. त्याचा सर्वात चांगला गुण जर मला आवडला तर तो परिस्थिती हाताळायचा. सेल्स सारख्या क्षेत्रात असूनसुद्धा ह्याच्या वागण्यात frustration कधीही दिसले नाही. एवढ्या लोकांना भेटायचे, त्यांची नाटकं सहन करायची, वर बॉसची targets वेगळीच. इतर सारे सेल्स मैनेजर दिवसाखेरीस वैतागायचे. पण ह्याचे तसे नव्हते. अख्खा दिवस दगदगीत, धावपळीत गेला तरी संध्याकाळी बाहेर खायला जाणे, सिनेमाला जाणे, कॉफी प्यायला जाणे, पार्टी करणे ह्याची उर्जा त्याच्यात होती. तेवढा उत्साह त्याच्यात असायचा. आमची मैत्री वाढत गेली. एकमेकांविषयी आकर्षण वाढले.पण मला माझ्या ताईसारखे होयला नको होते. माझ्या ताईच्या ऑफिसमध्ये देखील तिला एक मुलगा आवडला. आवडला आणि तिचे त्याच्याशी लग्न देखील झाले. आम्हाला तरी कुठे माहिती होते पुढचे. मुलगा चांगला वाटला म्हणून आमच्या बाबांनी लाऊन दिले लग्न. काही वर्षात माझ्या ताईचे झाले promotion . ती झाली 'senior sales manager ' आणि ह्याच्या एक position वर गेली. हिला पगार देखील जास्त मिळू लागला. ही गोष्ट त्याला आणि त्याच्या घरी आई -वडिलांना सहन होईना. आता हा मुलगा एवढा egoist असेल आम्हाला कुठे माहिती होते? पण हे आधीच जाणून घेतले असते तर? माझ्या ताईला नोकरी गमवावी नसती लागली. म्हणून मी म्हणते स्वभाव जाणून घ्यावा. आणि प्रसादच्या बाबतीत मला हाच अनुभव आला. त्याला ego problem नव्हता. परंतु त्याला लोकांना धीटपणे सामोरे जाता येत नव्हते."
" म्हणजे?" मला ह्याचे आश्चर्य वाटले. ह्या मुलीला प्रसादचा उत्साह, त्याचा परिस्थिती हाताळण्याचा स्वभाव वगैरे आवडून देखील हा एक गुण कसा काय खटकला असेल?
" सर्वप्रथम आम्ही इथे आलो तेव्हा लोकांना वाटले होते आमचे लग्न झाले आहे. बिल्डींगमध्ये लोकांनी एक नवे जोडपे ह्या समजुतीने आमचे खूप लाड देखील केले. आम्हाला घरी जेवायला बोलावणे, आमच्या घरी येऊन गप्पं-गोष्टी करणे, काहीतरी खायला करून पाठवणे, नवीन पदार्थ करणे. शनिवार-रविवारचे भरपूर उद्योग केले आम्ही. आम्ही देखील एकत्र राहत असल्यामुळे सगळीकडे एकत्र जायचे असे ठरले होते. पण नंतर नंतर लोकं आम्हाला मूल-बाळ कधी वगैरे विचारू लागली. सुरुवातीला काही वाटत नसे. पण नंतर नंतर हे विषय वाढू लागले. आमचा एकत्र राहण्याचा उद्देश हा नव्हता. आणि त्यामुळेच आम्हाला हे विषय न आवडेनासे झाले. आणि शेवटी आम्ही आमचे नाते सांगायचे ठरवले. शेजारच्या करमरकर काकूंशी माझे खूप चांगले जमायचे. ' तू मला मुलीसारखी आहेस' असं बऱ्याच वेळेस त्या मला म्हणायच्या. आणि मी त्यांना आमच्या नात्याबद्दल सांगितले. आणि लगेचच ही बातमी अख्ख्या बिल्डींगमध्ये पसरली. लोकं आम्हाला नावं ठेवू लागली. एकाएकी लोकांची वर्दळ कमी झाली. प्रसादला हे सहन होईना. त्याला लोकांशी गप्पा मारण्यात तितकाच रस होता. त्याला त्यांच्याशी संबंध चांगले ठेवायचे होते. त्यामुळे लोकं आमच्याबद्दल काहीही बोलले तरीही तो त्यांच्या गप्पांमध्ये शामिल होत असे. आणि मला नेमके हेच खटकत असे. एकदा असेच आम्ही बाहेरून जेऊन घरी येत असताना पहिल्या मजल्यावरचा रमेश आम्हाला भेटला. त्याच्या लग्नाबद्दल विषय सुरु झाला. कधी लग्न करतोयस वगैरे आम्ही त्याला विचारले. पण जाता जाता त्याचे एक वाक्य कानावर पडले. तो प्रसादला म्हणाला, " तुझी काय साल्या मजा आहे!" आणि प्रसादने चक्क माझ्यासमोर त्याला हसत हसत प्रतिसाद दिला. नंतर मी भडकून विचारले असताना त्याचे उत्तर अजून धक्कादायक होते. " relations maintain करण्यासाठी असं करावं लागतं." लग्नाआधीच एवढे मोठे compromise ? मी ह्यातून वेगळे होयचे ठरवले. बोलून प्रश्न सोडवायचा ७-८ दिवस प्रयत्न केला. पण मला हा स्वभाव पटणे शक्य नव्हते. प्रसादने काही roommates धरले आणि पौड रोड वर राहायला गेला. आणि मी इथे एकटीच राहू लागले.आणि मी ह्या सर्व लोकांना सामोरे जाऊ लागले. मला मुलगी मानणाऱ्या करमरकर काकू अचानक मला घरी घ्यायला तयार नव्हत्या. " आमच्या घरी लहान मुल आहे. त्याच्यावर काय परिणाम होईल?" बिल्डींग मधले इतर पुरुष देखील मला दिवसाला एक टोंबणा मारल्याशिवाय गप्पं बसत नसत. मी हे सर्व माझ्या आर्थिक फायद्यासाठी केलं हा काही लोकांचा समाज होता. तर काही लोकांकडून,'ही त्यातली दिसते आहे, अशी प्रतिक्रिया मिळायची. प्रसाद गेल्यापासून बिल्डींगमधल्या कार्यक्रमांना, घरच्या पूजेला, गणपतीला वगैरे मला बोलावणे येणे बंद झाले. बिल्डींगमधले एरवी माझ्याशी खेळणारे छोटे पंटर जेव्हा माझ्याशी बोलायला यायचे तेव्हा खिडकीतून त्यांच्या आया त्यांना परत बोलवत. आता सर्वांना माहिती आहे माझ्याशी बोलायचे नाही ते. कांबळे काकांना बिल्डींगचे पैसे द्यायला जायचे तेव्हा चेहऱ्यावर हास्य ठेवत प्रसादची चौकशी करायचे. अजूनही करतात. -" इतके दिवस एकटं राहणं बरं नाही मुलींनी. कुणीतरी बघा" - असा खोचक सल्ला द्यायलासुद्धा ते विसरले नाहीत. शेवटी मीच ठरवलं. ह्यांच्या कुणाशीही संबंध ठेवायचा नाही. आपला प्रसाद बरोबर राहायचा हेतू वाईट नव्हता ना, झालं तर मग!" आणि पायलची गोष्ट ऐकून मी घरी परत आलो. सकाळी कामाला जायचे होते म्हणून लगेच झोपलो. दुसऱ्या दिवशी कामाला निघताना वाटेत कांबळे काका भेटले. ऑक्टोबर महिन्याची उष्णता शरीराला पोळ्वत होती. कांबळे काकांनी माझ्याकडून दोन मिनिटे मागितली आणि मला वाटेत थांबावे लागले. त्यांनी मला निमंत्रण दिले.
"आमच्याकडे देवी बसवली आहे. तर दर्शनाला नक्की या! वाट बघतोय!"
No comments:
Post a Comment