टेक्सस मधल्या सेन एनटोनिओ ह्या शहरी विद्यार्थी म्हणून असताना माझ्या विद्यापीठातील संगीत विभागाबरोबर जवळ जवळ एक वर्ष काम करायची मला संधी मिळाली. ह्या वर्षभरात अनेक गोष्टी करायला मिळाल्या. मग ते हिस्पनिक संस्कृतीचे 'मरियाची संगीत' ह्या विषयीचे लेक्चर असो, किंवा तिथे मी वाजवलेला पियानो असो. मित्र डेविड ( उल्लेख आधीच्या ब्लॉग मध्ये आहे ) बरोबर मारलेल्या गप्पा असो किंवा त्याच्या बरोबर केलेले सहवादन असो. आणि त्यांच्या 'वर्ल्ड म्युजिक' क्लास मध्ये मी केलेले पियानो वादन आणि नंतर दिलेले एक छोटेसे लेक्चर ही तर अगदी अविस्मरणीय आठवण! ( उल्लेख आधीच्या ब्लॉग मध्ये). ह्या सर्व अनुभवांच्या जोरावर ह्याच 'वर्ल्ड म्युजिक' विषयाचे प्रोफेसर डॉ. मार्क ब्रील ह्यांच्याशी चांगली ओळख झाली होती. त्यांनी मग माझ्यावर अजून एका विषयाची जवाबदारी सोपवली. विद्यापीठ दर वर्षी विशेष कलाकारांना बाहेरून बोलावते आणि इथल्या विद्यार्थ्यांना त्यांची कला अनुभवायला मिळते. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ( सर्व... फक्त संगीत नव्हे!) हे अगदी फुकट अनुभवायला मिळतं आणि जर बाहेरून कुणी येणार असेल तर मात्र तिकीट असतं. ह्याची काळजी घेतली जाते की हे सर्व कलाकार विविध संगीत प्रकारातले आहेत आणि त्यामुळे दर महिन्यात एक असे साधारण वर्षाला ७-८ संगीत प्रकार ( सुट्टीचे महिने सोडून) मुलांना अनुभवायला मिळतात. २०११ च्या मार्च महिन्यात वेळ होती भारतीय संगीताची. भारतातील एक सरोद वादक येणार होते आणि इथल्या मुलांना भारतीय वाद्य संगीत अनुभवायला मिळणार होते. ह्या कार्यक्रमाचा प्रचार ( मार्केटिंग) तिथलीच एक विद्यार्थिनी, जी 'म्युजिक मार्केटिंग' ह्या विषय शिकत होती, करणार होती. माझ्यावर जबाबदारी होती तिला मार्गदर्शन करायची आणि एकंदर सर्व भारतीय लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचवायची. ठरलं तर मग! भेटायचं आणि तयारीला लागायचं! ह्या मुलीचं नाव जेसिका. अतिशय उत्साही मुलगी.
मला प्रोफेसरने तिचा फोन नं आणि इ -मेल आधीच दिला होता. प्रत्यक्ष भेटून ठरवणं तेवढं शिल्लक होतं. तिला लगेच समजावं आणि एकंदर कार्यक्रमाची रूपरेषा काय असावी ह्याचा अंदाज यावा म्हणून मी बरोबर काही 'ऑनलाइन लिंक' देखील तयार ठेवल्या होत्या. आणि ठरलं तर मग! 'येत्या शनिवारी भेटूया' असा मेसेज आला. वर, " ह्या शनिवारी इट वूड बी रेनिंग .. बी रेडी विथ य्युअर रेनवेअर" असे देखील सांगण्यात आले. भारतातला पाऊस ( त्यातून परत मुंबईतला!) अनुभवलेला असल्यामुळे ह्या सूचनेकडे मी विशेष लक्ष न देता शनिवारी आम्ही ठरवलेल्या ठिकाणी , म्हणजेच कॉलेजच्या 'starbucks ' मध्ये गेलो. आणि समोरून "hello aaaaashay " असे ओरडत ओरडत ती जवळ जवळ धावतच आली! आणि आल्या आल्या कडकडून मिठी मारली! हो कडकडूनच! तो क्षण मी एन्जॉय केला हे वेगळे सांगायला नकोच म्हणा! पाश्चात्य देशातली ही 'सहजपणे' पाळली जाणारी रीत आहे. त्यामुळे ही मिठी मारण्याची क्रिया अगदी नैसर्गिक असते. आपल्या देशातील बऱ्याच मुलामुलींनी ह्याचे अनुकरण केले आहेच. परंतु बऱ्याच वेळेस 'आपण एका मुलीला ( किंवा मुलाला ) मिठी मारतोय' हे मनात असल्यामुळे ती तितकी 'सहज' येत नाही! ( अर्थात माझ्या नंतर येणाऱ्या पिढ्यांनी स्वतःला 'update ' केले देखील असेल!) असो..
" सो .. डॉ . ब्रील मला म्हणाले की भारतीय संगीत ह्यावर भाष्य करणारा आपल्या कॅम्पस मध्ये तू आहेस.. .आणि मला हा इव्हेंट मार्केट करायचा आहे. मी म्युसिक मार्केटिंग शिकते आणि हा कार्यक्रम मार्केट करताना, प्रमोट करताना मला एक वेगळाच अनुभव येईल.. आय एम एक्सायटेड!"
"कुणाचा कार्यक्रम आहे? आणि कधी आहे?" मी विचारले.
" कार्यक्रम मार्च मध्ये आहे. आमचा विचार सुरु आहे की शहरातल्या इंडियन लोकांपर्यंत पोचायचं, इंडियन जेवण मागवायचं, पोस्टर्स छापून सगळीकडे लावायची ... आणि मेक धिस अ ह्यूज सक्सेस!" ती फार उत्साहात होती. शिवाय कार्यक्रम होता मार्च मध्ये आणि आम्ही भेटत होतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. दूर भारतातून कुठलासा एक कलाकार येणार होता. तिथलं संगीत वेगळं , वाद्य वेगळं पण कार्यक्रम व्यवस्थित आयोजित करायची इच्छा आणि नियोजन मात्र जबरदस्त! हे पाहून मात्र मला आमच्या इंडियन स्टुडंट असोसियेशन (ISA) च्या कार्यक्रमांची आठवण झाली. मी स्वतः ह्या आमच्या संस्थेत कार्यरत होतो पण प्रत्येक वेळेस मग १५ ऑगस्ट असो, दिवाळी असो कि आणखी काही असो... कामाला सुरुवात आठवडा आधीपासून होत असे आणि पुढे ही तयारी कार्यक्रमाच्या एक दिवस आधी रंगात येत असे. आणि हे कशासाठी तर आपल्या स्वतःच्याच उत्सवांसाठी!
परंतु तिने पुढे कुणाचा कार्यक्रम आहे हे सांगितल्यावर तिला थोडं जमिनीवर घेऊन येणं प्राप्त होतं!
परंतु तिने पुढे कुणाचा कार्यक्रम आहे हे सांगितल्यावर तिला थोडं जमिनीवर घेऊन येणं प्राप्त होतं!
" आम्ही एका भारतीय कलाकाराला बोलवत आहोत. तो ...आय गेस ..'सरोड'... वाजवतो. आमच्या वर्ल्ड म्युजीक क्लास मध्ये दर वर्षी ४ ते ६ फॉरेन कलाकार असतात ज्यामुळे इथल्या मुलांना जगातले उत्तम दर्जेदार संगीत ऐकायला मिळते .. दे बिकम ग्लोबल इन म्युजीक यु नो", ती सांगत होती. संगीत शिकवताना असलेली ही वैश्विक भावना! अशा विद्यापीठातून जो कुणी उत्तीर्ण होत असेल त्याचा कान सर्व प्रकारच्या संगीतासाठी अगदी तयार होत असेल! सगळीच मुलं काही तशी नसतील पण जी काही थोडीफार असतील ती मात्र नक्कीच चांगली 'कानसेन' होत असतील! आपल्याकडे संगीत शिकवणारे 'मास्तर' किंवा 'गुरुजी' ह्या भावनेने शिकवतील का हा विचार काही क्षण का होईना माझ्या मनात आला आणि तिने उच्चारलेल्या 'सरोड' चे 'सरोद' करीत मी पुढे विचारले.
" मला जर बघायला मिळेल का.. तुम्ही आतापर्यंत कुठले कलाकार बोलावले आहेत ते?"
"येस .. व्हाय नॉट ... टेक दीज लीफलेट्स.....ही घे अजून काही", ते सर्व पुढे करीत ती म्हणाली. मी पाहतो तर वेगवेगळ्या देशातून अनेक कलाकार ह्या कार्यक्रमांच्या सत्रात सहभागी झाले होते. त्यांची माहिती होती, त्यांचा संगीत प्रकार लिहिला होता आणि ते कधी येउन गेले ही तारीख होती. आणि शेवटी त्यांनी ह्या भारतीय कलाकाराबद्दल उल्लेख केला होता, अर्थात येत्या मार्च महिन्याचा. मी सर्व कलाकारांबद्दल त्या 'लीफलेट्स' वर लिहिलेली वर्णनं वाचली आणि मला लक्षात आलेली आणि किंचित खटकलेली गोष्ट तिला बोलून दाखवली.
" तुम्ही विविध प्रकारच्या कलाकारांना बोलवत आहात... थिस इज रिअली गूड! पण तुम्ही इतर कलाकारांच्या पोस्टर्स वर जसं वर्णन केलं आहे तसंच इंडिअन म्युजिक बद्दल पण करा.. आय मीन.. ", मी बोलायला सुरुवात केली. तिने भुवया थोड्या उंचावल्या आणि एका हातावर आपली मान टेकवून ऐकू लागली. दुसरा हात केसांशी खेळण्यात गुंतला होता.
" हा कलाकार बघ ना ", मी हातात एक पोस्टर घेऊन सांगू लागलो. " Be prepared for an exciting evening full of energizing music .... असं वर्णन आहे. आता ह्या पोस्टर मध्ये बघ ( मी दुसऱ्या एका कलाकाराचे पोस्टर उचलले ..) ... इकडे देखील तुम्ही energy , excitement वगेरे adjectives वापरली आहेत. आणि आता आपल्या कलाकाराचे वर्णन बघ... "
ह्या पोस्टर वर मात्र ' music that takes you to the world of spirituality and self -understanding ' असं वर्णन केलं होतं. वर्षानुवर्ष शास्त्रीय संगीत हे एका वर्गापर्यंत सीमित का होऊन बसले ह्याची जणू साक्षच! आणि पुढे मी तुला म्हणालो की जर आपल्याला ह्या कार्यक्रमाला बऱ्याच लोकांना बोलवायचे असेल तर ह्या संगीताचे तसे मार्केटींग होणे गरजेचे आहे!
" हो .. ते खरं आहे. पण भारतीय लोकांचे काय? ते तर येतीलच ना? इतर लोकांचं आपण बघून घेऊ", ती म्हणाली. तिला अर्थात कार्यक्रम 'भरायचा' देखील होता आणि त्यामुळे तिला सर्वात जास्त अपेक्षा होती ती भारतीय लोकांकडून. पण एक शास्त्रीय मैफल आहे असे कळल्यावर भारतीय लोक तिकीटासाठी रांग लावतील हा तिचा गैरसमज मी काही क्षणातच दूर केला.
"भारतात ह्या संगीताबद्दल सतत ह्याच प्रकारचं वर्णन केलं जातं . शास्त्रीय म्हणजे काहीतरी वेगळं, कठीण, गूढ. शास्त्रीय संगीतामुळे देवापर्यंत पोचता येतं असं आमचे कलाकार सतत सांगत आले आहेत. त्यामुळे हा आपला प्रांत नाही असंच सामान्य माणसाला वाटत आलेलं आहे. पण ह्या संगीतात पण तितकीच excitement असू शकते... हे जर आपण लोकांना दाखवून दिलं तर मात्र आपण अधिक लोकांना आकर्षित करू शकू. भारतीयच नव्हे.. तर इतरही लोक ह्या कार्यक्रमाला येतील", मी म्हणालो. ती लक्ष देऊन ऐकत होती पण तरीही तिला पूर्णपणे पटतंय असं वाटत नव्हतं.
" बट यु नो आशय... ही माहिती म्हणजे ह्या कलाकाराचा review झाला ना .... तोच मी ह्या पोस्टर द्वारे मार्केट करतेय! आपण तो बदलायचा?"
" हो.. त्यात काय विशेष? आपण स्वतः असं वर्णन लिहूया. कारण भारतीय संगीत, विशेषतः वाद्य संगीत हे नक्कीच exciting असतं. तुला demo ऐकायचा आहे का? आणि मी माझे हुकुमी एक्के बाहेर काढले. laptop उघडला आणि youtube वर आशिष खान आणि झाकीर हुसैन ह्यांचा video सुरु केला. आणि माझी अपेक्षा खरी ठरली. अवघ्या २ मिनिटात ती ऐकण्यात गुंग झाली! आणि शेवटी ह्या दोन्ही उस्तादांनी अति द्रुत लयीत वाजवून वादन संपवलं तेव्हा कुठे ती भानावर येउन टाळ्या वाजवत म्हणाली, " It was amazing !" पाच मिनिटांच्या ह्या video मधल्या दोन्ही उस्तादांच्या 'सवाल - जवाब' मध्ये झाकीरने पाव सेकंदात हातोडी काढून तबल्यावर फिरवून एक आवाज काढला आहे. तो तर तिला कमालीचा आवडला! "How did he do that ", असं माझ्याकडे बघून तिने म्हटलं! शास्त्रीय संगीताचे मार्केटिंग आता वेगळ्या पद्धतीने होणार होते ह्याची मला खात्री पटली!
हाच तो video !!! :)
पुढे मग थोडा वेळ video मधले हे कलाकार कोण, ते कुठे राहतात वगेरे विषय झाले. रवि शंकर, अली अकबर खान ह्यांचा विषय नसता निघाला तर नवल! पुढे कॅलिफोर्निया मधले 'अली अकबर कॉलेज ऑफ म्युजिक' बद्दल पण तिला थोडे सांगितले आणि त्याबद्दलचे videos दाखवले गेले. त्या दिवसाचे आमचे session संपले. " Thank You Aashay ..you did give me a lot of information ", असं म्हणत म्हणत तिने मला पुन्हा एकदा मिठी मारली. मिठी मारताना मात्र तिच्या मागे लांब एक भारतीय मुलगा येताना मला दिसला. त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या 'तसल्या' हसण्याकडे बघून माझ्या मिठीमुळे माझ्याबद्दल बोलायला आणि 'आमच्या दोघांबद्दल' बरीच स्वप्न रंगवायला ह्याला पुढे भरपूर वाव मिळणार आहे हे माझ्या ध्यानात आले! पुढील मिटिंगची तारीख ठरवून मी घरी परत आलो.
मला देखील होमवर्क मिळाले होते. ह्या कार्यक्रमाचा प्रचार शहरात कुठे करायचा, कुणाला सांगायचे हे सारे बघायचे होते. विद्यापीठात दोन संस्था होत्या. एक आमची इंडियन स्टूडंट असोसिएशन (ISA) आणि दुसरी म्हणजे अमेरिकेत जन्म झालेल्या आणि तिकडे वाढलेल्या मूळ भारतीय मुलांनी सुरु केलेली इंडियन कल्चरल असोसिएशन ( ICA ). माझे मित्र दोन्ही संस्थांमध्ये होते. गंमतीचा भाग म्हणजे ICA वाल्यांनी ह्यासाठी जास्त उत्सुकता दर्शवली आणि आम्ही जमेल तितकी आणि जमेल तिकडे पोस्टर्स लावू आणि आमच्या घरी देखील सांगू अशी आश्वासनं दिली. त्या नंतर आमच्याच शहरात राहणारा आणि सरोद हेच वाद्य वाजवणारा स्टीव मिलर. स्टीव बद्दल आधी लिहिले आहेच. हा माझा हुकुमी एक्का होता. कारण हा स्वतः आली अकबर खान ह्यांच्याकडे सरोद शिकला होता आणि ह्याच्या ओळखीचे बरेच कलाकार आणि विशेष म्हणजे भारतीय संगीत ऐकणारे कलाकार ह्या सर्वांपर्यंत मला पोचता येणार होते. त्याने लगेच होकार कळवला आणि मदतीचे आश्वासन दिले! स्टीवमुळे मला शहरातल्या एका 'योग इन्सटीट्यूट' ( मी 'योगा' म्हणत नाही. सॉरी !!!) चा पत्ता मिळाला होता आणि त्याच्या बरोबर तिकडे जायचे भाग्य देखील लाभले होते. त्यामुळे त्यांना देखील मी ह्या कार्यक्रमाबद्दल सांगितले आणि ते देखील आनंदाने त्याचा प्रचार करायला तयार झाले. आणि शेवटी 'इंडिया असोसिएशन ऑफ सेन एनटोनियो' ही भारतीय लोकांची भलीमोठी संस्था! ह्या सगळ्यांनी मदत करायचे मान्य केले. ह्या व्यतिरिक्त शहरात काही 'डान्स इन्सटीट्यूटस' देखील होत्या. पण त्यांच्याकडून काही विशेष मदत मला मिळाली नाही. पण कार्यक्रम आहे ही बातमी आता बऱ्याच लोकांपर्यंत जाणार ह्याची खात्री पटली होती!
जेसिकाला साहजिकच ह्याचा फार आनंद झाला होता. तसं बघायला गेलं तर सेन एनटोनियो हे शहर संगीत, कला वगेरे साठी अजिबात प्रचलित नाही. टेक्सस मधील मौज-मस्ती करायचे ठिकाण अशा नजरेने त्याकडे पाहिले जाते. ह्यांची बास्केटबॉल टीम अगदी प्रसिद्ध आणि त्यामुळे शहरात ह्या खेळाचे चाहते खूपच! परंतु संगीत, कला वगेरे म्हटलं की इकडच्या लोकांचे बोट ह्युस्टन किंवा ऑस्टीन कडे वळते. नेमकी ह्याच गोष्टीची काळजी जेसिकाला होती. शिवाय कार्यक्रम होता सोमवारी! परंतु झालेला प्रचार पाहून तिला बरं वाटलं. दुसऱ्यांदा झालेल्या भेटीत भारतीय संगीताबद्दलची अजून थोडी माहिती माझ्याकडून देण्यात आली. हिंदुस्थानी संगीत पद्धती, कर्नाटकी पद्धती, तबला, सरोद ह्यांची माहिती तिने घेतली. राग म्हणजे काय, त्यांची गायची, वाजवायची वेळ, ऋतु संबंधित राग वगेरे बरंच काही. ती हे सगळं लिहून काढत होती आणि डॉ. ब्रील ह्यावर नंतर कार्यक्रमाच्या वेळेस बोलणार होते.
आणि मग कार्यक्रमाचा दिवस उजाडला. मार्च मधला टेक्सन उकाडा सहन करीत बरीच लोकं कार्यक्रमाला आली होती. हॉल जवळ जवळ ८० टक्के भरला होता. स्टीव मिलर बऱ्याच कलाकारांना घेऊन आला होता. बरेच भारतीय चेहरे होते. विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थी आले होते. कार्यक्रम बरा झाला. टेक्सस मध्ये नाव कमावलेले तबलजी ह्या कार्यक्रमाला देखील साथीला होते. पण त्यांनी देखील निराशाच केली. पण इथल्या लोकांना 'एक वेगळा अनुभव' ( केवळ) म्हणून हा कार्यक्रम आवडला. कार्यक्रम झाल्यावर विद्यार्थ्यांनी कलाकारा भोवती चांगलीच गर्दी केली. आणि रवि शंकर, सतार, सरोद, भारतीय संगीत ह्याबद्दल खूप प्रश्न विचारले. हे बघून मात्र नक्कीच आनंद वाटला आणि असे श्रोते तयार केल्याबद्दल रवी शंकरांना मनातल्या मनात वंदन केलं!
" धन्यवाद आशय!!! एका सोमवारच्या संध्याकाळी.. सेन एनटोनिओ सारख्या शहरी .. ह्या कार्यक्रमासाठी इतकी माणसं जमणं ... it means a lot for us !!!" जेसिका मला आनंदाने सांगू लागली. आणि जाता जाता परत एकदा कडकडून मिठी मारली! परंतु ह्या मिठीमुळे आमच्याबद्दल पुढे काहीही स्वप्न रंगवली जाणार नाहीत ह्याची मला खात्री होती. कारण 'भारतीय' संगीताचा हा कार्यक्रम ऐकण्यात विद्यापीठातील 'भारतीय' विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व मी एकट्याने केले होते!
- आशय गुणे