Pages

Total Pageviews

Showing posts with label सरोद. Show all posts
Showing posts with label सरोद. Show all posts

Friday, February 8, 2013

जेसिका


टेक्सस मधल्या सेन एनटोनिओ ह्या शहरी विद्यार्थी म्हणून असताना माझ्या विद्यापीठातील संगीत विभागाबरोबर जवळ जवळ एक वर्ष काम करायची मला संधी मिळाली. ह्या वर्षभरात अनेक गोष्टी करायला मिळाल्या. मग ते हिस्पनिक संस्कृतीचे 'मरियाची संगीत' ह्या विषयीचे लेक्चर असो, किंवा तिथे मी वाजवलेला पियानो असो. मित्र डेविड ( उल्लेख आधीच्या ब्लॉग मध्ये आहे ) बरोबर मारलेल्या गप्पा असो किंवा त्याच्या बरोबर केलेले सहवादन असो. आणि त्यांच्या 'वर्ल्ड म्युजिक' क्लास मध्ये मी केलेले पियानो वादन आणि नंतर दिलेले एक छोटेसे लेक्चर ही तर अगदी अविस्मरणीय आठवण! ( उल्लेख आधीच्या ब्लॉग मध्ये). ह्या सर्व अनुभवांच्या जोरावर ह्याच 'वर्ल्ड म्युजिक' विषयाचे प्रोफेसर डॉ. मार्क ब्रील ह्यांच्याशी चांगली ओळख झाली होती. त्यांनी मग माझ्यावर अजून एका विषयाची जवाबदारी सोपवली. विद्यापीठ दर वर्षी विशेष कलाकारांना बाहेरून बोलावते आणि इथल्या विद्यार्थ्यांना त्यांची कला अनुभवायला मिळते. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ( सर्व... फक्त संगीत नव्हे!) हे अगदी फुकट अनुभवायला मिळतं आणि जर बाहेरून कुणी येणार असेल तर मात्र तिकीट असतं. ह्याची काळजी घेतली जाते की हे सर्व कलाकार विविध संगीत प्रकारातले आहेत आणि त्यामुळे दर महिन्यात एक असे साधारण वर्षाला ७-८ संगीत प्रकार ( सुट्टीचे महिने सोडून) मुलांना अनुभवायला मिळतात. २०११ च्या मार्च महिन्यात वेळ होती भारतीय संगीताची. भारतातील एक सरोद वादक येणार होते आणि इथल्या मुलांना भारतीय वाद्य संगीत अनुभवायला मिळणार होते. ह्या कार्यक्रमाचा प्रचार ( मार्केटिंग) तिथलीच एक विद्यार्थिनी, जी 'म्युजिक मार्केटिंग' ह्या विषय शिकत होती, करणार होती. माझ्यावर जबाबदारी होती तिला मार्गदर्शन करायची आणि एकंदर सर्व भारतीय लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचवायची. ठरलं तर मग! भेटायचं आणि तयारीला लागायचं! ह्या मुलीचं नाव जेसिका. अतिशय उत्साही मुलगी.
मला प्रोफेसरने तिचा फोन नं आणि इ -मेल आधीच दिला होता. प्रत्यक्ष भेटून ठरवणं तेवढं शिल्लक होतं. तिला लगेच समजावं आणि एकंदर कार्यक्रमाची रूपरेषा काय असावी ह्याचा अंदाज यावा म्हणून मी बरोबर काही 'ऑनलाइन लिंक' देखील तयार ठेवल्या होत्या. आणि ठरलं तर मग! 'येत्या शनिवारी भेटूया' असा मेसेज आला. वर, " ह्या शनिवारी इट वूड बी रेनिंग .. बी रेडी विथ य्युअर रेनवेअर" असे देखील सांगण्यात आले. भारतातला पाऊस ( त्यातून परत मुंबईतला!) अनुभवलेला असल्यामुळे ह्या सूचनेकडे मी विशेष लक्ष न देता शनिवारी आम्ही ठरवलेल्या ठिकाणी , म्हणजेच कॉलेजच्या 'starbucks ' मध्ये गेलो. आणि समोरून "hello aaaaashay " असे ओरडत ओरडत ती जवळ जवळ धावतच आली! आणि आल्या आल्या कडकडून मिठी मारली! हो कडकडूनच! तो क्षण मी एन्जॉय केला हे वेगळे सांगायला नकोच म्हणा! डोळा मारा पाश्चात्य देशातली ही 'सहजपणे' पाळली जाणारी रीत आहे. त्यामुळे ही मिठी मारण्याची क्रिया अगदी नैसर्गिक असते. आपल्या देशातील बऱ्याच मुलामुलींनी ह्याचे अनुकरण केले आहेच. परंतु बऱ्याच वेळेस 'आपण एका मुलीला ( किंवा मुलाला ) मिठी मारतोय' हे मनात असल्यामुळे ती तितकी 'सहज' येत नाही! ( अर्थात माझ्या नंतर येणाऱ्या पिढ्यांनी स्वतःला 'update ' केले देखील असेल!) असो..
" सो .. डॉ . ब्रील मला म्हणाले की भारतीय संगीत ह्यावर भाष्य करणारा आपल्या कॅम्पस मध्ये तू आहेस.. .आणि मला हा इव्हेंट मार्केट करायचा आहे. मी म्युसिक मार्केटिंग शिकते आणि हा कार्यक्रम मार्केट करताना, प्रमोट करताना मला एक वेगळाच अनुभव येईल.. आय एम एक्सायटेड!"
"कुणाचा कार्यक्रम आहे? आणि कधी आहे?" मी विचारले.
" कार्यक्रम मार्च मध्ये आहे. आमचा विचार सुरु आहे की शहरातल्या इंडियन लोकांपर्यंत पोचायचं, इंडियन जेवण मागवायचं, पोस्टर्स छापून सगळीकडे लावायची ... आणि मेक धिस अ ह्यूज सक्सेस!" ती फार उत्साहात होती. शिवाय कार्यक्रम होता मार्च मध्ये आणि आम्ही भेटत होतो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. दूर भारतातून कुठलासा एक कलाकार येणार होता. तिथलं संगीत वेगळं , वाद्य वेगळं पण कार्यक्रम व्यवस्थित आयोजित करायची इच्छा आणि नियोजन मात्र जबरदस्त! हे पाहून मात्र मला आमच्या इंडियन स्टुडंट असोसियेशन (ISA) च्या कार्यक्रमांची आठवण झाली. मी स्वतः ह्या आमच्या संस्थेत कार्यरत होतो पण प्रत्येक वेळेस मग १५ ऑगस्ट असो, दिवाळी असो कि आणखी काही असो... कामाला सुरुवात आठवडा आधीपासून होत असे आणि पुढे ही तयारी कार्यक्रमाच्या एक दिवस आधी रंगात येत असे. आणि हे कशासाठी तर आपल्या स्वतःच्याच उत्सवांसाठी!
परंतु तिने पुढे कुणाचा कार्यक्रम आहे हे सांगितल्यावर तिला थोडं जमिनीवर घेऊन येणं प्राप्त होतं!
" आम्ही एका भारतीय कलाकाराला बोलवत आहोत. तो ...आय गेस ..'सरोड'... वाजवतो. आमच्या वर्ल्ड म्युजीक क्लास मध्ये दर वर्षी ४ ते ६ फॉरेन कलाकार असतात ज्यामुळे इथल्या मुलांना जगातले उत्तम दर्जेदार संगीत ऐकायला मिळते .. दे बिकम ग्लोबल इन म्युजीक यु नो", ती सांगत होती. संगीत शिकवताना असलेली ही वैश्विक भावना! अशा विद्यापीठातून जो कुणी उत्तीर्ण होत असेल त्याचा कान सर्व प्रकारच्या संगीतासाठी अगदी तयार होत असेल! सगळीच मुलं काही तशी नसतील पण जी काही थोडीफार असतील ती मात्र नक्कीच चांगली 'कानसेन' होत असतील! आपल्याकडे संगीत शिकवणारे 'मास्तर' किंवा 'गुरुजी' ह्या भावनेने शिकवतील का हा विचार काही क्षण का होईना माझ्या मनात आला आणि तिने उच्चारलेल्या 'सरोड' चे 'सरोद' करीत मी पुढे विचारले.
" मला जर बघायला मिळेल का.. तुम्ही आतापर्यंत कुठले कलाकार बोलावले आहेत ते?"
"येस .. व्हाय नॉट ... टेक दीज लीफलेट्स.....ही घे अजून काही", ते सर्व पुढे करीत ती म्हणाली. मी पाहतो तर वेगवेगळ्या देशातून अनेक कलाकार ह्या कार्यक्रमांच्या सत्रात सहभागी झाले होते. त्यांची माहिती होती, त्यांचा संगीत प्रकार लिहिला होता आणि ते कधी येउन गेले ही तारीख होती. आणि शेवटी त्यांनी ह्या भारतीय कलाकाराबद्दल उल्लेख केला होता, अर्थात येत्या मार्च महिन्याचा. मी सर्व कलाकारांबद्दल त्या 'लीफलेट्स' वर लिहिलेली वर्णनं वाचली आणि मला लक्षात आलेली आणि किंचित खटकलेली गोष्ट तिला बोलून दाखवली.
" तुम्ही विविध प्रकारच्या कलाकारांना बोलवत आहात... थिस इज रिअली गूड! पण तुम्ही इतर कलाकारांच्या पोस्टर्स वर जसं वर्णन केलं आहे तसंच इंडिअन म्युजिक बद्दल पण करा.. आय मीन.. ", मी बोलायला सुरुवात केली. तिने भुवया थोड्या उंचावल्या आणि एका हातावर आपली मान टेकवून ऐकू लागली. दुसरा हात केसांशी खेळण्यात गुंतला होता.
" हा कलाकार बघ ना ", मी हातात एक पोस्टर घेऊन सांगू लागलो. " Be prepared for an exciting evening full of energizing music .... असं वर्णन आहे. आता ह्या पोस्टर मध्ये बघ ( मी दुसऱ्या एका कलाकाराचे पोस्टर उचलले ..) ... इकडे देखील तुम्ही energy , excitement वगेरे adjectives वापरली आहेत. आणि आता आपल्या कलाकाराचे वर्णन बघ... "
ह्या पोस्टर वर मात्र ' music that takes you to the world of spirituality and self -understanding ' असं वर्णन केलं होतं. वर्षानुवर्ष शास्त्रीय संगीत हे एका वर्गापर्यंत सीमित का होऊन बसले ह्याची जणू साक्षच! आणि पुढे मी तुला म्हणालो की जर आपल्याला ह्या कार्यक्रमाला बऱ्याच लोकांना बोलवायचे असेल तर ह्या संगीताचे तसे मार्केटींग होणे गरजेचे आहे!
" हो .. ते खरं आहे. पण भारतीय लोकांचे काय? ते तर येतीलच ना? इतर लोकांचं आपण बघून घेऊ", ती म्हणाली. तिला अर्थात कार्यक्रम 'भरायचा' देखील होता आणि त्यामुळे तिला सर्वात जास्त अपेक्षा होती ती भारतीय लोकांकडून. पण एक शास्त्रीय मैफल आहे असे कळल्यावर भारतीय लोक तिकीटासाठी रांग लावतील हा तिचा गैरसमज मी काही क्षणातच दूर केला.
"भारतात ह्या संगीताबद्दल सतत ह्याच प्रकारचं वर्णन केलं जातं . शास्त्रीय म्हणजे काहीतरी वेगळं, कठीण, गूढ. शास्त्रीय संगीतामुळे देवापर्यंत पोचता येतं असं आमचे कलाकार सतत सांगत आले आहेत. त्यामुळे हा आपला प्रांत नाही असंच सामान्य माणसाला वाटत आलेलं आहे. पण ह्या संगीतात पण तितकीच excitement असू शकते... हे जर आपण लोकांना दाखवून दिलं तर मात्र आपण अधिक लोकांना आकर्षित करू शकू. भारतीयच नव्हे.. तर इतरही लोक ह्या कार्यक्रमाला येतील", मी म्हणालो. ती लक्ष देऊन ऐकत होती पण तरीही तिला पूर्णपणे पटतंय असं वाटत नव्हतं.
" बट यु नो आशय... ही माहिती म्हणजे ह्या कलाकाराचा review झाला ना .... तोच मी ह्या पोस्टर द्वारे मार्केट करतेय! आपण तो बदलायचा?"
" हो.. त्यात काय विशेष? आपण स्वतः असं वर्णन लिहूया. कारण भारतीय संगीत, विशेषतः वाद्य संगीत हे नक्कीच exciting असतं. तुला demo ऐकायचा आहे का? आणि मी माझे हुकुमी एक्के बाहेर काढले. laptop उघडला आणि youtube वर आशिष खान आणि झाकीर हुसैन ह्यांचा video सुरु केला. आणि माझी अपेक्षा खरी ठरली. अवघ्या २ मिनिटात ती ऐकण्यात गुंग झाली! आणि शेवटी ह्या दोन्ही उस्तादांनी अति द्रुत लयीत वाजवून वादन संपवलं तेव्हा कुठे ती भानावर येउन टाळ्या वाजवत म्हणाली, " It was amazing !" पाच मिनिटांच्या ह्या video मधल्या दोन्ही उस्तादांच्या 'सवाल - जवाब' मध्ये झाकीरने पाव सेकंदात हातोडी काढून तबल्यावर फिरवून एक आवाज काढला आहे. तो तर तिला कमालीचा आवडला! "How did he do that ", असं माझ्याकडे बघून तिने म्हटलं! शास्त्रीय संगीताचे मार्केटिंग आता वेगळ्या पद्धतीने होणार होते ह्याची मला खात्री पटली! डोळा मारा


हाच तो video !!! :)

पुढे मग थोडा वेळ video मधले हे कलाकार कोण, ते कुठे राहतात वगेरे विषय झाले. रवि शंकर, अली अकबर खान ह्यांचा विषय नसता निघाला तर नवल! पुढे कॅलिफोर्निया मधले 'अली अकबर कॉलेज ऑफ म्युजिक' बद्दल पण तिला थोडे सांगितले आणि त्याबद्दलचे videos दाखवले गेले. त्या दिवसाचे आमचे session संपले. " Thank You Aashay ..you did give me a lot of information ", असं म्हणत म्हणत तिने मला पुन्हा एकदा मिठी मारली. मिठी मारताना मात्र तिच्या मागे लांब एक भारतीय मुलगा येताना मला दिसला. त्याच्या चेहऱ्यावरच्या त्या 'तसल्या' हसण्याकडे बघून माझ्या मिठीमुळे माझ्याबद्दल बोलायला आणि 'आमच्या दोघांबद्दल' बरीच स्वप्न रंगवायला ह्याला पुढे भरपूर वाव मिळणार आहे हे माझ्या ध्यानात आले! पुढील मिटिंगची तारीख ठरवून मी घरी परत आलो.
मला देखील होमवर्क मिळाले होते. ह्या कार्यक्रमाचा प्रचार शहरात कुठे करायचा, कुणाला सांगायचे हे सारे बघायचे होते. विद्यापीठात दोन संस्था होत्या. एक आमची इंडियन स्टूडंट असोसिएशन (ISA) आणि दुसरी म्हणजे अमेरिकेत जन्म झालेल्या आणि तिकडे वाढलेल्या मूळ भारतीय मुलांनी सुरु केलेली इंडियन कल्चरल असोसिएशन ( ICA ). माझे मित्र दोन्ही संस्थांमध्ये होते. गंमतीचा भाग म्हणजे ICA वाल्यांनी ह्यासाठी जास्त उत्सुकता दर्शवली आणि आम्ही जमेल तितकी आणि जमेल तिकडे पोस्टर्स लावू आणि आमच्या घरी देखील सांगू अशी आश्वासनं दिली. त्या नंतर आमच्याच शहरात राहणारा आणि सरोद हेच वाद्य वाजवणारा स्टीव मिलर. स्टीव बद्दल आधी लिहिले आहेच. हा माझा हुकुमी एक्का होता. कारण हा स्वतः आली अकबर खान ह्यांच्याकडे सरोद शिकला होता आणि ह्याच्या ओळखीचे बरेच कलाकार आणि विशेष म्हणजे भारतीय संगीत ऐकणारे कलाकार ह्या सर्वांपर्यंत मला पोचता येणार होते. त्याने लगेच होकार कळवला आणि मदतीचे आश्वासन दिले! स्टीवमुळे मला शहरातल्या एका 'योग इन्सटीट्यूट' ( मी 'योगा' म्हणत नाही. सॉरी !!!) चा पत्ता मिळाला होता आणि त्याच्या बरोबर तिकडे जायचे भाग्य देखील लाभले होते. त्यामुळे त्यांना देखील मी ह्या कार्यक्रमाबद्दल सांगितले आणि ते देखील आनंदाने त्याचा प्रचार करायला तयार झाले. आणि शेवटी 'इंडिया असोसिएशन ऑफ सेन एनटोनियो' ही भारतीय लोकांची भलीमोठी संस्था! ह्या सगळ्यांनी मदत करायचे मान्य केले. ह्या व्यतिरिक्त शहरात काही 'डान्स इन्सटीट्यूटस' देखील होत्या. पण त्यांच्याकडून काही विशेष मदत मला मिळाली नाही. पण कार्यक्रम आहे ही बातमी आता बऱ्याच लोकांपर्यंत जाणार ह्याची खात्री पटली होती!
जेसिकाला साहजिकच ह्याचा फार आनंद झाला होता. तसं बघायला गेलं तर सेन एनटोनियो हे शहर संगीत, कला वगेरे साठी अजिबात प्रचलित नाही. टेक्सस मधील मौज-मस्ती करायचे ठिकाण अशा नजरेने त्याकडे पाहिले जाते. ह्यांची बास्केटबॉल टीम अगदी प्रसिद्ध आणि त्यामुळे शहरात ह्या खेळाचे चाहते खूपच! परंतु संगीत, कला वगेरे म्हटलं की इकडच्या लोकांचे बोट ह्युस्टन किंवा ऑस्टीन कडे वळते. नेमकी ह्याच गोष्टीची काळजी जेसिकाला होती. शिवाय कार्यक्रम होता सोमवारी! परंतु झालेला प्रचार पाहून तिला बरं वाटलं. दुसऱ्यांदा झालेल्या भेटीत भारतीय संगीताबद्दलची अजून थोडी माहिती माझ्याकडून देण्यात आली. हिंदुस्थानी संगीत पद्धती, कर्नाटकी पद्धती, तबला, सरोद ह्यांची माहिती तिने घेतली. राग म्हणजे काय, त्यांची गायची, वाजवायची वेळ, ऋतु संबंधित राग वगेरे बरंच काही. ती हे सगळं लिहून काढत होती आणि डॉ. ब्रील ह्यावर नंतर कार्यक्रमाच्या वेळेस बोलणार होते.
आणि मग कार्यक्रमाचा दिवस उजाडला. मार्च मधला टेक्सन उकाडा सहन करीत बरीच लोकं कार्यक्रमाला आली होती. हॉल जवळ जवळ ८० टक्के भरला होता. स्टीव मिलर बऱ्याच कलाकारांना घेऊन आला होता. बरेच भारतीय चेहरे होते. विद्यापीठाच्या संगीत विभागातील विद्यार्थी आले होते. कार्यक्रम बरा झाला. टेक्सस मध्ये नाव कमावलेले तबलजी ह्या कार्यक्रमाला देखील साथीला होते. पण त्यांनी देखील निराशाच केली. पण इथल्या लोकांना 'एक वेगळा अनुभव' ( केवळ) म्हणून हा कार्यक्रम आवडला. कार्यक्रम झाल्यावर विद्यार्थ्यांनी कलाकारा भोवती चांगलीच गर्दी केली. आणि रवि शंकर, सतार, सरोद, भारतीय संगीत ह्याबद्दल खूप प्रश्न विचारले. हे बघून मात्र नक्कीच आनंद वाटला आणि असे श्रोते तयार केल्याबद्दल रवी शंकरांना मनातल्या मनात वंदन केलं!
" धन्यवाद आशय!!! एका सोमवारच्या संध्याकाळी.. सेन एनटोनिओ सारख्या शहरी .. ह्या कार्यक्रमासाठी इतकी माणसं जमणं ... it means a lot for us !!!" जेसिका मला आनंदाने सांगू लागली. आणि जाता जाता परत एकदा कडकडून मिठी मारली! परंतु ह्या मिठीमुळे आमच्याबद्दल पुढे काहीही स्वप्न रंगवली जाणार नाहीत ह्याची मला खात्री होती. कारण 'भारतीय' संगीताचा हा कार्यक्रम ऐकण्यात विद्यापीठातील 'भारतीय' विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व मी एकट्याने केले होते!


- आशय गुणे स्मित

Saturday, November 5, 2011

अमेरिकन मुलांना दिलेले भारतीय संगीताचे धडे


  समूहात राहून एका ठराविक साच्यात आयुष्य जगायचे हा माझा स्वभाव नाही. एकतर आपण स्वतःचे व्यक्तिमत्व विसरून जातो आणि दुसरं म्हणजे आपला वैयक्तिक  विकास काहीच होत नाही. अमेरिकेत बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांचे असेच काहीतरी असते. सोमवार ते शुक्रवार विद्यापीठात काम केले की वीकेंडला पार्टी करायची. फार-फार तर पब्स आणि डिस्को मध्ये जाऊन यायचे आणि उरलेला वेळ आपण जाऊ  ती जागा न पाहता त्या जागेत स्वतःचे हवे तेवढे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे! ;) पब्स आणि डिस्को किव्हा पार्टी करणे ह्याला माझा विरोध अजिबात नाही. आणि का असावा? त्यातसुद्धा एक वेगळीच मजा असते! पण सारख्या ह्याच गोष्टी करून त्यात धन्यता मानण्यात काहीही अर्थ नाही.
हे 'असले' विचार असल्यामुळे मी समूहात राहून सुद्धा माझे स्वतःचे एक अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात होतो. आणि त्यात बऱ्यापैकी यश देखील आले. मी जिथे जातो तिथल्या सामान्य माणसाशी बोलण्यात मला खूप आनंद मिळतो. एकतर त्या जागेची जीवनपद्धती समजते आणि दुसरे म्हणजे 'माणूस' ह्या प्राण्यातले बरेच समान धागे सापडतात. दुसरी मला एक अतिप्रिय असलेली गोष्ट म्हणजे संगीत. ह्या जगात किती भाषा आहेत मला माहिती नाही. परंतु 'सात सुरांची भाषा' अखंड जगात एक असो  हाच केवढा मोठा चमत्कार आहे! सामान्य माणसाशी बोलायच्या माझ्या स्वभावामुळे अनेक वल्ली मला भेटल्या. त्यातील काहींबद्दल मी लिहिण्याचा प्रयत्न देखील केला आहे. आणि अजून बऱ्याच लोकांचे चित्रण करणे बाकी आहे.  ( पहा : http://relatingtheunrelated.blogspot.com ) संगीताबद्दल मी हेच म्हणीन! अनेक अनुभव आले .....त्यातील एक अनुभव आपल्याला सांगावासा वाटतो. भारतीय संगीतासाठी काहीतरी करावे ही इच्छा अमेरिकेत पाउल ठेवले त्यादिवशीपासून होतीच. पण मी ह्युस्टन ह्या शहरी असताना तिथल्या विद्यापीठात संगीत विभाग नव्हता. एक पियानो ठेवलेला असायचा. मी अनेक तास तो वाजवत बसायचो. एक 'उत्कृष्ट वादक' इथपासून ते 'एक विक्षिप्त माणूस' इथपर्यंत माझी ख्याती तेथील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये पसरली होती! पण काही कारणांसाठी मी विद्यापीठ बदलले आणि ' san  antonio ' ह्या शहरी बस्तान बसवले. तेथील विद्यापीठात मात्र संगीत विभाग होता! 
   मी विद्यापीठाच्या 'बुक- स्टोर' मध्ये काम करताना जॉर्ज नावाचा माझा एक मित्र झाला होता. माझे नशीब इतके थोर की तो संगीत शिकणारा विद्यार्थी निघाला. त्यालाच मी गळ घातली....माझी तुमच्या प्रोफेसरांशी भेट घालून दे ना! तोसुद्धा लगेच तयार झाला! आणि एके दिवशी आम्ही आमची वेळ जमवली आणि तो मला संगीत विभागात घेऊन गेला. त्या इमारतीत शिरल्याक्षणी मी जे पाहिले ते  मी अजून विसरू शकत नाही! कुणी गिटार वाजवतंय, कुणी जिन्यात बसून संगीताच्या चर्चेत गर्क आहे, कुणी फ्ल्यूटचा रियाझ करतोय. पुढे चालत गेलो तर एक मुलगी मुक्तकंठाने गात होती! बाहेरचे जग आणि आतले हे संगीताचा अभ्यास करणारे जग.....किती फरक! वास्तविक हे सारे त्यांना काही नवीन नाही....संगीताचा विभाग म्हणजे संगीताचाच अभ्यास झाला पाहिजे ना! परंतु, माझ्या देशातील पुस्तकांना वाहिलेले विद्यापीठ इतके दिवस मनात. डोक्यात 'आपलेच संगीत श्रेष्ठ' अशी समजूत करून ठेवलेले आपल्याकडचे प्राध्यापक मुलांना सुरांच्या 'विहिरीत' पोहायला लावतात! आणि मग जेव्हा त्या पोराला सागरात पोहायची वेळ येते तेव्हा त्याला तेथील मुक्ततेचे असे नवल वाटते! असो, आपण जीवनात 'खुलेपण' केव्हा आणू हा वेगळा विषय झाला! 
 " How can I help you ?" चेहऱ्यावर नैसर्गिक हास्य आणून तिथल्या 'receptionist ' ने आम्हाला विचारले. पुढचे काम जॉर्जने केले. " हा माझा मित्र आशय. हा संगीत विभागाचा विद्यार्थी नाही. परंतु हा त्याच्या देशात, म्हणजे भारतात शास्त्रीय संगीत वाजवतो आणि ह्याला आपल्या विभागासाठी काहीतरी करायचे आहे. ह्याला काही मदत मिळू शकेल का?" " व्ह्य नॉट!" ती उद्गारली. " आम्ही आमच्या विभागात नेहमी काहीतरी नवीन विचार आणण्याचा प्रयत्न करीत असतो. तू जर तुझ्याकडचे ज्ञान  देणार असशील तर आम्हाला आनंदच आहे. थांब मी तुला डॉ. ब्रील चा e -mail  देते. ते 'world  music ' शिकवतात. ते तुला नक्कीच मदत करतील."  आणि दोन वाक्यात माझे काम झाले. पुढे ब्रील साहेबांना e - mail  केलं आणि त्यांचे ही लगेच उत्तर आले. मला एका बुधवारी दुपारी १ ला भेटायला बोलावले. त्यंच्या ऑफिस चे वातावरण सुद्धा विलक्षण! मंद प्रकाश पसरलेला. टेबलवर काही मोजकेच कागद. ( सहीसाठी तंगवून न ठेवण्याचे लक्षण! ;) ) आणि वातावरणाला साजेसे संगीत! अमेरिकन लोकं मेहनती अश्यामुळे असतील कदाचित.....अश्या वातावरणात काम करायला कुणाला नाही आवडणार! " ये, बस...", दाढीदीक्षित डॉ. ब्रील म्हणाले. मी माझी ओळख करून  दिली. "मी भारतातून बायो शिकायला जरी आलो असलो तरी ते माझ्या मिळकतीसाठी....माझ्या  आयुष्यात अव्वल स्थान हे संगीतालाच आहे." त्यांना माझे म्हणणे पटले. " तू असं कर... आमच्या वर्गात नवेंबर महिन्यात आम्ही भारतीय संगीत शिकवणार आहोत. एक अक्खा आठवडा आहे. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी माझे क्लासेस होतात. तर तू बुधवारी लेक्चर दे. एवढंच काय, तू आमच्या वर्गात इतर वेळेला पण येऊ शकतोस...मुलांशी गप्पा मारू शकतोस. आम्ही एक रेकॉर्ड ऐकतो आणि नंतर त्यावर चर्चा करतो.....तू काहीतरी वाजव आणि आपण त्याच्यावर चर्चा करू!" हे सगळे मला अनपेक्षित होते. पहिल्याच भेटीत हा एवढा प्रतिसाद! ' बघूया.... काहीतरी करू....जमवुया...." ही भाषाच नाही कुठे. कुठला मी भारतातून आलेला मुलगा....आणि कुठले हे प्रोफेसर. पण अमेरिकेत ' talent ' ला कदर आहे ती अशी! नंतर मी त्यांच्यापुढे  विद्यापीठात एक 'म्युसिक क्लब' काढायचा प्रस्ताव मांडला. त्याला देखील " अरे तू फक्त प्रस्ताव घेऊन ये....मी लेगच सही देतो", असे आश्वासन दिले! 
पुढचे काही दिवस मी हवेत होतो! आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी करायला मिळतंय हा आनंद माझ्या मनात संचारला होता. आणि मी काय पेश करायचे हा विचार करू लागलो.
आणि तो दिवस उजाडला. त्या दिवसाआधी शनिवारी मी ह्युस्टनला उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचा तबला ऐकला होता आणि त्यांच्याबरोबर फोटो देखील काढला होता. त्यामुळे कदाचित, आत्मविश्वास दुप्पट होता आणि एकदम अनोळखी लोकांसमोर कसे बोलावे ह्याचे दडपण वाटत नव्हते. खुद्द झाकीर ने अमेरिकेत घेतलेल्या workshops  आणि दिलेले interviews मी त्यादिवसात पाहून घेतले. आणि ह्या अमेरिकन लोकांसमोर कसे बोलायचे ह्याचा अंदाज मनात करून घेतला. आणि बरोबर २ वाजता लेक्चर द्यायला पोचलो. डॉ ब्रीलने माझी ओळख करून दिली. " सोमवारी आपण भारतीय संगीताबद्दल ओळख करून घेतली. आज आपल्याकडे भारतातून इकडे शिकायला आलेला एक मुलगा आहे. त्याचे नाव आशय. तो आपल्याला पियानोवर वाजवून दाखवेल आणि नंतर अजून आपली थोडी ओळख वाढवेल." सर्व मुलांनी माझे टाळ्या वाजवून स्वागत केले. आणि मी पियानो वाजवायला सुरुवात केली.
" आमच्या संगीतात आम्ही काही ठराविक सूर वापरून राग मांडतो. त्याच्या पलीकडे कुठले सूर वापरले तर ती एक घोर चूक मानली जाते. हे म्हणजे ५-६ रंगांनीच चित्र रंगवल्या सारखे आहे. सुरुवातीला मर्यादा वाटतात पण एकदा बढत करायला घेतली तर त्याच्यासारखी मजा नाही", मी सांगू लागलो. पहिल्या रांगेत बसलेल्या २-३ मुली अगदी आश्चर्याने ऐकत होत्या. त्यांच्यासाठी हे अगदीच नवीन होते. आणि मी 'राग शुद्ध सारंग' सुरु केला. सुरुवातीला हळुवार लयीत सूर छेडले, व नंतर हळू हळू लय वाढवीत गेलो. नोम-तोम चे आलाप झाले, छोट्या ताना झाल्या आणि वादन संपवलं तेव्हा २० मिनिटे उलटून गेली होती! टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढ्या उत्साहाने भारतातसुद्धा कुणी टाळ्या वाजवल्या नव्हत्या.....तो क्षण काही औरच होता! :) आणि मी उठलो आणि व्यासपीठावर जाऊन पोचलो. आता मला लेक्चर सुरु करायचे होते. 
 सुरुवातीला शेहनाईचा विडीओ दाखवला. बिस्मिल्लाखान  ह्यांनी वाजवलेल्या  राग मुलतानी ने वातावरण सूरमय झाले!
 माझ्या वाजवण्याने जो काही संगीताचा अपमान झाला असेल तो भरून निघाला! आणि हळू हळू पोरांचे चेहरे कुतूहल दर्शवू लागले. कुठले आहे हे वाद्य? कोण आहे हा वाद्य-फुंकणारा माणूस? शेवटी मी स्वतः त्यांना कलाकाराचे नाव सांगितले आणि म्हणालो - " he is the pied-piper of India". वर्गात हशा झाला. त्यानंतर बासरी सुरु झाली. हरिप्रसाद चौरासियांनी वाजवलेला 'राग हंसध्वनी' मी त्यांना दाखवला.
 त्या वर्गात, उत्कृष्ट ध्वनी-योजनेत बासरीने लगेच रंग भरला. पोरांचे हात ताल धरू लागले! माना हलू लागल्या. काही मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य प्रकट झाले. मी हे सारे आनंदाने पाहत होतो. 
नंतर मी पोरांना सारंगी आणि वायोलिन च्या दोन चित्रफिती दाखवल्या. सारंगीवर उस्ताद सुलतान खान ह्याने वाजवलेले हे लोकगीत होते - 
आणि वायोलिन वर वी. जी जोग ह्यांची ही चित्रफित:  
 ह्याच्यात झाकीरने केलेल्या तबल्याच्या साथीला साऱ्यांनी माना डोलावल्या. पण मला त्यांना वायोलिन दाखवायचे होते म्हणून मी तबल्याकडे थोडावेळ दुर्लक्ष केलं. पण पुढील १० मिनिटात झाकीर काय मजा करणार आहे ह्याची मला तेव्हा कल्पना नव्हती! ह्यानंतर तार- वाद्य दाखवायची वेळ आली. रवी शंकर आणि अली अकबर खान ह्यांच्यामुळे ही वाद्य अमेरिकेत लोकप्रिय देखील आहेत. त्यात मी अली अकबर खान ह्यांचे हे वादन दाखवले- 
अली अकबर ह्यांच्या कॅलिफोर्निया मधल्या कॉलेज बद्दल सुद्धा मी त्यांना माहिती दिली. आणि नंतर विलायत खान ह्यांची सतार ऐकवली. ह्या सतारीवर तिथले लोक मात्र कमालीचे फिदा झाले! तार एवढ्या अलगद कशी काय छेडली जाऊ शकते ह्याचे आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते! काही काही मागे बसलेले उत्साही तरुण हवेत सतार वाजवावी अश्या रीतीने बोटे फिरवत होती. सात-समुद्र पार असलेले संगीत, केवळ सुराच्या ताकदीमुळे काय चमत्कार घडवू शकते हे मी आनंदाने पाहत होतो!
त्यानंतर मी शिवकुमार शर्मांची संतूर वर एक पहाडी धून ऐकवली. त्याला देखील प्रचंड दाद मिळाली!
आणि नंतर आला तबला. ताल-वाद्य म्हणून मी पखवाज सुद्धा दाखवला. पण खरी मजा आणली झाकीर हुसैन ने! त्याची ही चित्रफित मी दाखवली तेव्हा समोर बसलेल्या लोकांच्या माना, हात, पाय आणि नंतर एकूण शरीर तालमय होऊन गेलं! ही मुलं तो तालाचा अविष्कार पाहून बाक वाजवू लागले. एकमेकांकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहू लागले. आनंद share करू लागले! झाकीरने सामान्य लोकांपर्यंत तबला पोचवला ह्याचे अजून कुठले उदाहरण मी देऊ? कोण कुठली ही अमेरिकन लोकं आणि कुठलं हे दूर-देशातील संगीत!
 शेवटच्या चित्रफितीने मात्र ह्या साऱ्यावर कळस चढवला! बासरी आणि तबला ह्यांच्यातील  बातचीत त्यात दिसते. हे त्या पोरांना इतके आवडले की त्यांनी टाळ्यांचा कडकडात केला! 
३ वाजले होते. वेळेत माझे लेक्चर संपले. माझ्या आयुष्यातला कधीही न विसरणारा तो एक तास! ७ सुरांनी माझे मन आणि त्या अमेरिकन अनोळखी मुलांचे मन जोडणारा तो एक तास! एक भारतीय म्हणून मनात गर्व वाटणारा तो एक तास. आणि त्या अमेरिकन लोकांची दाद देण्याची प्रवृत्ती दाखवून  देणारा तो एक तास.
पुढे कधी संगीत विभागाच्या जवळून गेलो तर मुलं विचारायची, " तूच न तो ज्याने आम्हाला त्या दिवशी भारतीय संगीताबद्दल सांगितले. इट वॉज टू गुड!" आणि माझा दिवस पुढे आनंदात जायचा! 
आज ४ नवेम्बर २०११. एकदम लक्षात आले की ह्या घटनेला एक वर्ष झाले. म्हणून लिहावेसे वाटले! 

- आशय गुणे