Pages

Total Pageviews

Wednesday, October 14, 2015

अर्धा-दशक लहान बायको

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो. लग्नासाठी मुलगी पहायची म्हणजे तिच्या घरच्यांच्या आधी तिला भेटले पाहिजे हे माझे तत्व निरुपयोगी ठरले होते. कारण ह्या आधी जवळ जवळ डझनभर मुलींच्या घरच्यांना मी तसदीच देऊ शकलो नव्हतो! शेवटी 'आम्ही सांगत होतो' ह्या ध्रुवपदाने सुरु होणारी गाणी मला ऐकावी लागली आणि घरच्यांनी सगळी सूत्र हातात घेतली. परंतु तिथे देखील लगेच यश मिळाले नाही. शेवटी हा दिवस उजाडला.
दार उघडले गेले. माझ्या स्वागताला ( खरं तर गराडा घालायला) एक आजोबा, एक पन्नाशीतले वाटणारे गृहस्थ, त्यांची बायको, एक आजी आणि दुसरी एक स्त्री एवढे सगळे एकदम आले. सुरुवातीचे पाणी वाटप झाले. आणि तिथे बसलेल्या आजोबांची मान माझ्याकडे वळली.
"काय करता?"
" मी ई- कॉमर्स क्षेत्रात काम करतो", मी उत्तर दिले.
" ई …?" आजोबांनी कदाचित तेवढंच ऐकलं. आणि तोच शब्द ताणून मला प्रश्न केला. तेवढ्यात,
" काय झालं आबा? काय झालं ", असं विचारत लगबगीने एक बाई धावत बाहेर आल्या. ताणून धरलेल्या 'ई' चा परिणाम असावा. शेवटी त्या क्षेत्राचे पूर्ण नाव मी पुन्हा एकदा सांगितले.
" काय कॉमर्स वगेरे केलंय का?" आजोबांनी पुन्हा माझ्या समोर पंचाईत उभी केली. ह्या क्षेत्राचा कॉमर्स शिक्षाणाशी काहीही संबंध नाही हे सांगायचा मी प्रयत्न करणार तेवढ्यात सुदैवाने विषय बदलला गेला. मग काही घरगुती, काही स्थानिक, काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय (!) अशा विषयांवर माझ्या बसण्याची दाखल न घेता बरीच चर्चा झाली. हल्ली 'आपल्यात' उशीरा लग्न कशी होऊ लागली आहेत इथपासून इथले रस्ते कधीही दुरुस्त होत नाहीत इथपर्यंत आणि विरार लोकल म्हणजे एक दिव्यच इथपासून आता आमचा मनोहर आला आहे ना, बघा कसा पाकिस्तानवर हल्ला करतो ते, इथपर्यंत! पाकिस्तान बद्दल बोलताना त्या उत्साहात ह्यांना आता ठसका वगेरे लागतो की काय ह्याची मला एकदम काळजी वाटली. परंतु विषय 'आता अच्छे दिन येणार आहेत' पर्यंत गेला तेव्हा एका आश्वस्त मुद्रेत आजोबा गेले आणि भोवती बसलेल्या सर्वांनी होकारार्थी मान हलवली.
पुढे पारिवारिक पातळीवरच्या वाटाघाटी सुरु झाल्या. एखादी कंपनी समोरच्या क्लायंटने आपल्या बरोबर बिझनेस करावा म्हणून तो म्हणतो ते सगळे जसे ऐकते तसे माझ्याकडचे करत होते. त्या साऱ्या संभाषणात मला एवढेच शब्द ऐकू आले - 'मुलगी पसंत आहे'
" पण तुम्हाला वयाबद्दल काही म्हणायचे नाही ना? म्हणजे … तुमचा मुलगा २८ वर्षांचा आणि आमची मुलगी २२ वर्षांची … ", मुलीकडल्यांकडून एक शेवटचा प्रश्न आला.
"नाही हो", आईने सूत्र हातात घेतली. "आपल्या पिढीला कुठे त्रास झाला? आणि हे आता वाटते हो … पुढे एकदा पस्तीशी वगेरे ओलांडली की दोघेही एकाच लेव्हल वर येतात."
ह्या घरातले सगळे आता माझे नातेवाईक झाले होते.
लवकरात लवकर लग्न झालं पाहिजे असे संकेत मला आधीच मिळाले होते. ते संकेत समोरच्या पक्षाला दिले गेले. समोरच्या पक्षाचे प्रतिनिधी आणि आमचे प्रतिनिधी हे प्रत्येक निर्णय घेण्याआधी वाटाघाटी करायचा आव आणायचे. परंतु समोरचे प्रतिनिधी एकच वाक्य पाठ करून आले होते. 'आमची काही हरकत नाही' ह्या त्यांच्या ठरलेल्या वाक्याने चर्चा संपायची. त्यामुळे लग्नात ज्या पक्षाची बाजू वरचढ ठरते तो 'वर' पक्ष असे मला लहानपणापासून वाटायचे ते काही अगदी खोटे नव्हते ह्याची प्रचीती मला माझ्याच लग्नात येत होती. आणि ३० डिसेंबर २०१४ ही तारीख ठरली. माझ्या बऱ्याच मित्रांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ३१ डिसेंबर नाही निवडली म्हणून! ( माझ्यासाठी नव्हे!).
बाकी माझी एकूण घडण ही इतकी नीरस का झाली आहे हे मला सांगता येत नाही. म्हणजे आयुष्यातल्या एका दिवसासाठी चेहरा गुळगुळीत करणे, त्यावर रंगकाम करणे हे आपण का करतो असा मला प्रश्न पडला. अजूनही त्याचे उत्तर मिळाले नाही. त्या एका दिवसासाठी घेतलेल्या कपड्यांचे पुढे काय झाले हे आता मला चांगलेच माहिती आहे. परंतु तरीही असे करावे लागते. आणि ह्याचे उत्तर 'असे करावे लागते' असेच असते! त्यात पुन्हा आपण त्यांच्यासाठी आणि त्यांनी आपल्यासाठी केलेली खरेदी असते. मग दोन्ही बिलांची घरातल्या गप्पांमध्ये होणारी तुलना आणि आपण दिलेलंच सरस हे ठरवायचा आटापिटा! आणि ह्या साऱ्यात रस दाखवला नाही तर 'पुढे तुझे कसे होणार' ह्याबद्दल व्यक्त होणारी चिंता. एकूण काय तर लग्न ह्या घटनेनंतर आयुष्यात प्रचंड बदल होणार आहे असे उगीचच सांगितले जाते. तसं काही होत नाही हे अर्थात काही आठवड्यांच्या कालावधीत समजतच. ही अवस्था म्हणजे आपल्याला पोहायला जाताना पाण्यात बुडू नाही म्हणून अगदी पाठीला डबा बांधायचा आणि उडी मारल्यावर खोली ३ फुटाची आहे असे समजण्यासारखे असते. पण ह्या साऱ्या गोंधळात खरेदी वगेरे वैताग देणाऱ्या प्रक्रियेत मित्स कधी कधी आमच्या बरोबर असायची.
मित्स म्हणजेच माझी बायको. तिचे नाव मिताली. परंतु ' एवढे मोठे नाव' कुठे घेत बसायचे म्हणून मला सगळे मित्स म्हणतात असं मला लग्न ठरल्याच्या काही दिवसातच सांगितले गेले होते. वर, आमच्या ग्रुप मध्ये आम्ही सर्वांना अशी नावं ठेवली आहेत असं देखील मला सांगण्यात आलं होतं. मला आठवलं की आमच्या कॉलेज मध्ये काही उत्साही मुलींनी असा प्रकार करायचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनाच सर्वांनी नावं ठेवल्यामुळे त्यांनी हा नाव ठेवण्याचा प्रयत्न बाजूला ठेवला! परंतु आता मला हेच नाव वापरावे लागणार होते. असो.
लग्नाची खरेदी होत असताना नुसता मी आणि माझा परिवारच नाही तर अख्खं जग त्यात सामील होतंय असं मला काही दिवसात जाणवू लागलं. रिसेप्शनसाठी शर्ट घेताना अचानक माझा मोबाईल वाजला. मोबाईल बघितला तर शर्ट हातात घेऊन त्याच्याकडे बघतानाचा माझा फोटो मला फेसबुक वर दिसला. माझ्या होणाऱ्या बायकोने मला तेवढ्यात tag केले होते. आणि तो फोटो अपलोड करून २ मिनिटं ही झाली नाही तर त्यावर चार उत्साही मुला-मुलींचे कमेंट आले होते. 'हे माझे ग्रुप-मेट्स. नेहमी ऑनलाईन असतात' हे वाक्य माझ्या कानावर पडले. आणि पुढील दोन ते तीन दिवस माझ्या नकळत माझे बरेच फोटो फेसबुक वर येऊ लागले. आणि त्यामुळे माझे ऑफिसातले सहकारी आणि माझे इतर मित्रही प्रत्येक खरेदी बद्दल विचारायला लागले. शेवटी सुरुवातीला विनंती आणि नंतर विनवण्या करून मी तिला हा सारा प्रकार थांबवायला सांगितला. आणि लग्ना नंतर पुढे आयुष्यभर जे करायला लागणार होतं ( आणि आता करायला लागतंय) ह्याचा माझा सराव सुरु झाला. तिने देखील, नाखुशीने का होईना, पण हे सगळं थांबवलं. परंतु फेसबुकचा उल्लेख अधून मधून होयचा. म्हणजे एखादा शर्ट घेताना ' हा फेबुकवर छान दिसेल' अशी प्रतिक्रिया यायची. क्वचित कधीतरी फेसबुक स्टेटस मध्ये मी tagged असायचो. पण जेव्हा 'thinking about someone special' ह्या स्टेटस मध्ये मला tag केले गेले तेव्हा मात्र मी हे देखील थांबवायला सांगितले आणि माझ्या नीरस असल्याबद्दल पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले!
आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. इतके दिवस मित्राचे किंवा मैत्रिणीचे लग्न होताना त्याला/तिला ज्या गोष्टीसाठी हसायचो ती गोष्ट आज मला करायला लागणार होती. स्टेजवर वेळेचे ओझे डोक्यावर घेऊन येणाऱ्या सर्वांकडे बघून हसायचे होते आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायचे होते. ह्यावर भर घालायला माझे काही मित्र ' आम्ही जेऊन घेतो' हे मुद्दाम सांगत होते.हे सगळं सुरु असताना साधारण ८ ते १० मुलामुलींचं टोळकं स्टेज चढून वर आलं. औपचारिक ओळख झाल्यावर असं कळलं की हा हिचा कॉलेजचा ग्रुप आहे. त्यांची ओळख आणि त्यांनी आमचे अभिनंदन केल्यावर फोटो काढायची वेळ आली आणि मला जवळ जवळ पन्नासाव्या वेळेस हसायची संधी मिळाली. त्यात अजून एकदा हसायची भर पडली जेव्हा त्यातील एकाने आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्यावर आमचा सर्वांचा एक फोटो घेतला. आणि तेवढ्यात त्यातील एकाने सर्वांना थांबायची खूण केली. स्टेजच्या डाव्या बाजूला जो ग्रुप पुढे यायला व्याकूळ होता तो अधिक व्याकूळ झाला. क्षणभर कुणाला काही कळेना. ज्याने थांबायची खूण केली त्याने हातात काठी सारखं काहीतरी घेतलं. आणि दुसऱ्या क्षणी तिला ताणून लांब केले. आणि अगदी टोकावर स्वतःचा मोबाईल अडकवला. आणि गुढी उभारण्याच्या पोझ मध्ये ते सारे एका हातात धरले. त्या सबंध घोळक्यात मीच एकटा संभ्रमित दिसत होतो. आणि कानाला कांठळ्या बसाव्यात अशा आवाजात त्यातील तीन जणं ओरडले -- " सेल्फ़ीssssssss"
मला सेल्फी काय आहे ते माहिती होतं. परंतु त्यासाठी देखील यंत्र उपलब्ध आहेत ह्याची माहिती मला नव्हती.

लग्नात मला जी काही लोकं भेटायला आली त्यांच्यापैकी सेल्फीचा आग्रह मात्र ह्याच ग्रुप ने धरला होता. इतर बरीच लोकं येत होती. काही परिचित, काही अपरिचित आणि बरीचशी त्या वेळेपूर्ती परिचित! आता हेच बघा ना. मित्सच्या पुण्यातील एका काकांचे ज्येष्ठ मित्र आम्हाला भेटायला स्टेज वर आले. साधारण सत्तरी जवळ आलेल्या ह्या व्यक्तीची ओळख 'मंगळूरला असतात आणि बऱ्याच वर्षांनी पुण्यात आले आहेत' अशी झाली. आता हे काका पुण्यातच बऱ्याच वर्षांनी आले होते तर ते पुढे मुंबईला कधी येतील आणि आलेच तर आमच्या घरी कधी येतील हा प्रश्नच होता म्हणा! पण हाच तो तात्पुरता परिचय आणि लग्नात नेमकी ह्या अशाच लोकांची संख्या सर्वाधिक असते! माझ्यात मात्र स्टेज वर उभं राहून राहून दूरदृष्टी निर्माण झाली होती. म्हणजे आतापर्यंत मला आपण काही तासांनी जेवणार आहोत असे दिसू लागले होते. मात्र आता मी उद्या विमानात बसलो आहे, केरळला जाणारे विमान, त्या विमानात एयर-हॉस्टेस कशा असतील .… आणि एकदम " हे आपटे साहेब", असं म्हणत सासरेबुवांनी कुणाला तरी समोर उभे केले!
तर अशाप्रकारे लग्नाचा शेवट प्रचंड दगदग आणि कंटाळवाणा झाला हे मान्य करावे लागेल. दुसऱ्या दिवशी लगेच लवकर उठून कोचीला जाणारे विमान पकडायचे होते.

आम्ही विमानात बसलो. नाही म्हटलं तरी महिनाभर भरपूर दगदग झाली होती. सतत काहीतरी कामं असायची. भरपूर लोकांकडे जाणं, बऱ्याचदा त्यांच्याकडे जेवणं, त्यांचा तो वाट्टेल तसा आग्रह करणं आणि एवढं सगळं करून घरी उशिरा पोहोचून सकाळी वेळेवर कामावर जाणं. बरं, ही नातेवाईक मंडळी लग्नाला तर येणार होतीच. काही तर घरापासून अगदी जवळ राहणारी होती. पण तरीही 'आमच्याकडे जेवायला या' हे होतेच. आणि ते देखील त्यांच्या स्केड्युल प्रमाणे! नवरा मुलगा असलो तरीही मला कोणतीही सवलत नाही. एका उत्साही काका-आजोबांनी शेवटच्या क्षणी, 'आज जरा मला वेळ नाही मिळत आहे, उद्या ये' सांगून अशीच माझी पंचाईत केली होती. आणि अशा वेळेस आई नेमकी त्यांची बाजू घ्यायची. ' नेहमी कुठे बोलावतात ते' हा तिचा पवित्रा! ( तसं नेहमी कुणीच बोलवत नाही म्हणा!) तेव्हा पासून लग्न होईपर्यंत धावपळीतून अजिबात आराम मिळाला नव्हता. लग्न सुरु असताना मी झोपी जातोय का काय ह्याची मला भीती होती. परंतु सारखे 'सावधान' करणे सुरु असल्यामुळे तो प्रसंग टळला!
विमानात बसल्यावर हे सारे आठवून मी एक समाधानी सुस्कारा टाकला. परंतु कोची पर्यंत एक झोप होईल ह्याचा आनंद क्षणात मावळला.
" अरे झोपतोयस काय! आपल्याला एक सेल्फी काढायला हवा!"
" आत्ता? इथे?"
"अरे मग काय! सीटबेल्ट ची अनौंसमेंट होण्याआधी …. एक सेल्फी तो बंता है …. चल चल …लवकर … पुढे फोन स्विचऑफ करायला सांगतील …. आणि मग कोची पर्यंत नेट पण बंद होईल! त्याच्या आत आपण विमानात बसलोय हा सेल्फी फेसबुक वर नको टाकायला?"
हा एक सक्तीचा प्रोटोकॉल असल्यासारखी ही मला का सांगत होती देव जाणे! आणि त्याच क्षणी मी तो 'सेल्फी' 'फेस' केला!

आमचं फ्लाईट साधारण सकाळी ११ च्या सुमारास कोचीला उतरलं. मी जवळ जवळ तासभर का होईना झोप मिळवली होती. आता हनीमूनला जाताना प्रवासात झोपेला महत्व द्यावं हे मला देखील मान्य नव्हतंच! त्यामुळे आमच्या गप्पा देखील झाल्या. लग्न होण्या आधीच्या दोन-तीन महिन्याच्या काही आठवणी काढल्या गेल्या. काही विषयांवर गप्पा झाल्या, हसणं झालं, खिदळणं झालं. आणि विमानतळावर परत एकदा ….
" सेल्फी!!!"
'कोची विमानतळावर सेल्फी' हे शीर्षक लिहून फोटो फेसबुक वर गेला होता. आणि एका गहन हिशोबाकडे माझे लक्ष गेले.
" आपण मुंबईला विमानात सेल्फी काढलेला ना … त्याला बघ … १४८ लाईक्स आले पण", ही खूप उत्साहाने सांगत होती.
" बरं, मग?"
आणि…
" अरे मग काय … लोकांना आवडला फोटो… तुला काहीच कसं वाटत नाही… आणि त्यात तुझे मित्र खूप कमी आहेत … माझ्याच मित्र-मैत्रिणींकडून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत … तुम्ही कुणीच फेसबुक वर नसता का? करता काय मग दिवसभर?"
शेवटच्या ' करता काय मग दिवसभर?' ह्या प्रश्नाला 'काम' असे उत्तर देण्याचा मोह मी टाळला. उगीच सहजीवनाच्या दुसऱ्याच दिवशी खटका नको उडायला! शिवाय आता काढलेल्या ह्या सेल्फीला किती 'लाइक्स' आले ह्याची मोजणी काही वेळेनंतर होणार होतीच. हॉटेलकडे घेऊन जाणाऱ्या कॅब मध्ये दर दोन मिनिटांनी फेसबुकवर फोटोची पाहणी होत असताना माझ्या हे लक्षात आले. त्यामुळे मी खिडकी बाहेर पाहू लागलो आणि माझी अरसिकता पुन्हा एकदा सिद्ध झाली.
हॉटेल मध्ये साधारण १ च्या सुमारास आम्ही चेक-ईन केलं आणि रूम मध्ये शिरतानाच माझा मोबाईल जवळ जवळ अर्धा मिनिट वाजत राहिला. अनलॉक करून पाहतो तर पंचवीस एक फोटोंनी माझ्या मोबाईल मध्ये शिरकाव केला होता. हिनेच पाठवले होते. पण एवढे?
" हो! एअरपोर्ट पासून हॉटेल पर्यंत काढले", तिने उत्तर दिले. अच्छा, म्हणजे माझे पाहणे सुरु होते तेव्हा हिने टिपणे सुरु केले होते. ह्या फोटोंमध्ये रस्त्यावर असलेली रहदारी, एअरपोर्टच्या बाहेर थोडीशी मोकळी जमीन, केरळ मधली एक बस, रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक गाय, रस्त्यावर मल्याळी अक्षरात लिहिलेले एक होर्डिंग इथपासून हॉटेल बाहेर ठेवलेल्या तीन कुंड्या, हॉटेलचे नाव ठळकपणे असलेला बोर्ड वगेरेचा समावेश होता. आता मल्याळी अक्षरं सोडली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुद्धा होत्या. काही वेळाने मला लक्षात आले की ही मल्याळी अक्षरं फेसबुक मधल्या 'अपलोड' साठी होती. ' केरळ मध्ये आहोत ह्याचे प्रुफ' असे स्पष्टीकरण बायकोकडून मिळाले.

कॅमेराच्या नजरेतून पाहण्याआधी मी हॉटेल भोवती असलेले सौंदर्य माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहून घेतले. सकाळी वॉकला आलो होतो. कोणतेही चित्र कॅमेऱ्यात टिपण्याआधी ते आपल्या डोळ्यांनी टिपले गेले पाहिजे. त्याच्यासाठी काही सेकंदाचा अवधी हवा. तरंच एक सुंदर फोटो तयार येईल …. इतक्यात माझा फोन वाजला. एवढ्या सकाळी कुणाचा मेसेज म्हणून whatsapp उघडले तर बायकोचा मेसेज! एक चहा किंवा कॉफी असलेला कप आणि त्यातून वाफा येत आहेत, शेजारी एक गुच्छ ठेवलेला आहे आणि संदेश झळकतोय … गुड मॉर्निंग! हा मेसेज माझीच बायको मला का पाठवतेय हे काही मला कळेना. आणि ते सुद्धा ५०० मीटर लांब असलेल्या हॉटेलच्या खोलीतून! मोबाईल खिशात ठेवून मान वर केली तर समोरून ही चालत येत होती …. म्हणजे हिने येता येता हा मेसेज फॉरवर्ड केला होता!!
" गुड मॉर्निंग…", मी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. " छान होता ना मेसेज … आताच आला मला", समोरच्या दृश्याचा फोटो काढीत हिने माझ्या नैसर्गिक शुभेच्छांचा निकाल लावला. आणि ' मी तुला फोटोच्या नव्हे खऱ्या शुभेच्छा देतो आहे' असं मी सांगेपर्यंत ७ फोटो काढून झाले होते. मीच तो नाद सोडून दिला. त्यानंतर रोज सकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान माझ्या फोन मध्ये त्याच्या शेजारी ठेवलेल्या फोन मधून शुभ सकाळ वगेरे चे मेसेज येऊ लागले.

पण इथपर्यंत भागलं नाही. माझ्या फोन मध्ये आता काही नव्या मेसजेस नी देखील शिरकाव करायला सुरुवात केली होती. ह्यांची विशेषता अशी की हे संदेश काही विशिष्ट व्यक्तींच्या भोवतीच विणले जायचे. त्यात डॉ. कलाम, अब्राहम लिंकन आणि स्वामी विवेकानंद ह्यांचा सामावेश होता. मला खात्री आहे की ही माणसं आज जर जिवंत असती तर त्यांनी ह्या सर्वांवर अब्रु-नुकसानी पासून चुकीची माहिती पसरवल्याचा खटला नक्कीच भरला असता. म्हणजे I am not handsome but I can give my hand to someone who need help... Because beauty is required in heart not in face....असं कलाम कधी म्हणाले असतील असं वाटत नाही. हिच शिक्षा विवेकानंदांना देखील दिली होती. म्हणजे एक इंग्रज माणूस विवेकानंदांना विचारतो की तुमच्या देशात स्त्रिया 'shake hand' का करत नाही? तेव्हा विवेकानंद त्याला उलटा प्रश्न विचारतात की तुमच्या देशात तुम्ही राणीला 'shake hand' करता का …. आमच्या देशात प्रत्येक स्त्री राणी सारखी आहे --- गुड मॉर्निंग, असा तो संदेश पाहून मी चकित झालो. मला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण झाली. काही मोठ्या लोकांनी ( काका वगेरे) WhatsApp वर ग्रुप काढलेला. अजून देखील आहे. पण त्यात मी नाहीये. त्यात देखील अशाच संदेशांचा भडीमार होयचा. काही लोकसंगीत प्रकार कसे त्याचा कवी माहिती नसतो पण ती वर्षानुवर्ष पुढे सरकत आपल्या पर्यंत येतात तसंच बहुदा ह्या संदेशांचे पुढे होणार आहे. मी दहावी-अकरावीत असताना ( म्हणजे बारा वर्षांपूर्वी) ई-मेल चेक करायला महिन्यातून एकदा सायबर कॅफे मध्ये जावे लागे. तेव्हा काही फार महत्वाची ई-मेल येत नसत , नुसती फॉरवर्ड असत. त्यात एक ई-मेल असे सांगायचे की भारतातील राष्ट्रगीताला UNESCO ने जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत म्हणून सन्मानित केलंय. बारा वर्षांनी जेव्हा WhatsApp वर हाच मेसेज एका काकाने फॉरवर्ड केल्यावर मी सभात्याग करतात तसा ग्रुप-त्याग केला! इतकी वर्ष झाली तरी वाजपायी ह्यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग आणि आता मोदी हे कुणीच हा सन्मान स्वीकारायला गेले नाहीत ही साधी गोष्ट कुणाच्याही लक्षात न यावी? पण काका लोकांचं ठीक आहे. त्यांच्या हातात एकदम हे तंत्रज्ञान आले. पण शाळेपासून मोबाईल बरोबरच मोठ्या झालेल्या माझ्या बायकोला देखील अशा मेसेजसची चिकित्सा करावी वाटू नये ह्याचे मला आश्चर्य वाटले.

परंतु आश्चर्य वाटण्याची ही एक सुरुवात होती असं मला काही दिवसात कळलं. कोचीहून आम्ही आता मुन्नारला आलो होतो. तिथे आम्हाला जे हॉटेल मिळाले होते ते एकदम डोंगरात बसलेले असे होते. तिथली ती शांतता आठवली ना की आपण शहरात जन्माला आलोय ह्याचा प्रचंड पश्चाताप होतो! डोंगराचा तो भाग 'U' ह्या आकाराचा असल्यामुळे दोन बाजूंमध्ये प्रचंड मोकळी जागा होती. आमचं हॉटेल एका बाजूला तर दूर दुसऱ्या बाजूला पायथ्याशी एक मंदिर होते. परंतु परिसर इतका शांत की दूर मंदिरात लावले गेलेले दाक्षिणात्य संगीत अगदी स्पष्ट ऐकू येत होते. मी त्या जागेचा शांत उभं राहून, डोळे मिटून अनुभव घेताना हिने नेहमीप्रमाणे फोटो मोहीम सुरु केलीच! त्या दिवशी रात्री जेवायला बसलो होतो.
" काय शांत परिसर आहे … मुंबईला जावेच वाटत नाही ", मी म्हणालो. ही मोबाईल मध्ये काहीतरी टाईप करत होती. त्यामुळे माझ्याकडे न बघता 'हं' एवढा प्रतिसाद आला. त्यामुळे काही सेकंदांनी मी देखील माझे सूप चे बाउल न्याहाळू लागलो. आणि तेवढ्यात …
" ओह्ह्ह …. मोदी… "

टी.वी वर पंतप्रधान कुठेतरी बोलत होते त्याची बातमी दाखवत होते.
" तुला आवडतं का राजकारण?" मी विचारलं.
" ओह्ह प्लीज … नाही आवडत … खूप बोरिंग आहे पॉलीटिक्स", ती म्हणाली. " बट आय फाईंड मोदी वेरी कूल ", हे देखील पुढे जोडले तिने.
पंतप्रधान कूल कसे असू शकतात हा विचार मी मनात दाबून धरला.
" पण तुला माहितीय का …. मी वोट द्यायला गेले होते ना.… तर मला लिस्ट मध्ये मोदींचे नाव कुठेच दिसले नाही… … आय वॉस सो कंफ्युज्ड…"
पुढच्या क्षणी मला पाणी द्यायला धावलेल्या दोन वेटर्सना मी खुणेने मागे सारले होते. इतका प्रचंड ठसका लागला होता मला. पुढे मला सांगितले गेले की नेमके तिला कमळ असलेले बटण दाबा ही जाहिरात आठवली आणि कदाचित ते म्हणजे मोदी असं समजून तिने आपले मत व्यक्त केले होते. आणि तिच्या सुदैवाने ते बरोबर निघाले. मी हे सारे ऐकून घेतले. मग तिला समजवायला सुरुवात केली की कमळ ही भाजपची निशाणी आहे. आणि तू मत मोदींना नाही तर भाजपला दिले आहेस. त्यानंतर खासदार कोण, आमदार कोण आणि मोदी निवडणुकीला कुठून उभे होते वगेरे सर्व मी तिला समजावले. मोबाईल कडे पाहणे आणि माझ्याकडे पाहणे ह्याचा समन्वय साधत मान खाली-वर करीत ती सारे ऐकत होती. मागच्या निवडणुकीच्या वेळेस ती १७ वर्षांची असल्यामुळे तिची मत द्यायची संधी हुकली होती. राज्याच्या आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत तिला रस नव्हता. त्याचे कारण तिच्या शब्दात सांगायचे तर 'तेव्हा फेसबुक, ट्विटर नसल्यामुळे मला काहीही माहिती नव्हते'.
" मी गाडी चालवते तर रस्त्यावर खड्डे असतात…. आमच्या घरी पुण्यात २४ तास पाणी येत नाही… गाडी चालवते तर सारखा ट्राफिक असतो … सो मी ठरवले की आता चेंज हवा ", तिने शेवट केला.
" पण ह्यातली कोणती कामं केंद्र सरकार करतं?" मागवलेल्या आईस-क्रीमचा फोटो काढून WhatsApp वरून पाठवणे हे माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर होते. त्यामुळे विषय तिथेच संपला. तो अजून सुरु राहिला असता तर कदाचित मी तिला सोशल मिडियाच्या पलीकडे जाउन रोजचा पेपर वाच वगेरे सांगणार होतो. परंतु ज्या प्रकारे सोशल मिडियावर चाललेल्या चर्चा अचानक संपतात (किंवा संपवल्या जातात) तसा आमचा हा विषय संपला.

आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे. आमच्या घरी टी.वी सर्वप्रथम आला तेव्हा ऐकलेली … किंवा आपण म्हणू पाहिलेली ही गाणी आहेत.

" आमच्याकडे टी.वी आला तेव्हा सुपरहिट मुकाबला वर हे गाणं सर्वप्रथम पाहिलं ", मी एका गाण्याबद्दल हिला सांगत होतो. हिला त्याचे फार काही वाटले नाही. जी गोष्ट गाण्यांची ती गोष्ट इतर बऱ्याच गोष्टींची! तिला 'मिले सूर मेरा तुम्हारा' किंवा 'बजे सरगम' असे जुने विडीयो लावले की कंटाळा येतो . मला कधी कधी जुन्या दूरदर्शनच्या जाहिराती बघायला आवडतात. त्याने मी मधूनच सायकल आणि स्कूटर रस्त्यावर फिरत असलेल्या माझ्या लहानपणात जातो. धारा, लिरिल, बोर्नविटा, डेअरी मिल्क, रस्ना, फेविकॉल, निरमा, अमूल हे आयुष्याचा भाग नव्हते झाले अशा माझ्या बालपणी डोकावतो. हिला त्याचे विशेष काही वाटत नाही. मी आणि माझी बहिण आमचा landline फोन वाजला की तो कोण पहिले उचलतोय ह्यासाठी शर्यत लावायचो हे तिला सांगितल्यावर आपला नवरा नक्कीच लहानपणी वेडा होता अशा नजरेने ती पाहते. Landline फोन नंतरचा कॉर्डलेस फोन किंवा पेजर वगेरे चा प्रवास तिने अनुभवलेला नसावा. कारण त्याबद्दल घरी कधी विषय निघाला तर ती त्यात सहभागी होत नाही. घरी कधी दूरदर्शनच्या सिरियलच्या आठवणी निघाल्या की ही काही मिनिटांमध्ये आतल्या खोलीत निघून जाते. हिच्या आठवणी ह्या ह्रितिक रोशन पासून सुरु होतात आणि बऱ्याचशा नंतरच्या हिरो-हिरोइन्स पर्यंत येउन पोहोचतात. हिला श्रीमान-श्रीमती मध्ये रस नाही पण फ्रेंड्स मध्ये आहे. ज्या गोष्टी मला कॉलेज संपताना मिळाल्या त्या तिच्याकडे दहावीतच आल्याचे माझ्या लक्षात येत होते. ह्या साऱ्या यादीत इंटरनेट, फेसबुक आणि मोबाईल फोन ह्याचा देखील समावेश होता. तिने सायबर कॅफेचा उपयोग केवळ प्रिंट काढायला केला होत. तिला कळायला लागणाऱ्या वेळेत तिच्याकडे कॉम्पुटर आणि इंटरनेट हे दोन्हीही आले होते. त्यामुळे जुन्या टी.वी विडीयो गेम्स बद्दल बोललं तर तिला काही कळायचं नाही. पण तिला कॉम्पुटर गेम्स बद्दल सगळी माहिती होती. एकूणच असं की हे सगळं तिच्याकडे एकदम आलं होतंं. माझ्यासारखी ती कोणत्याही प्रक्रियेला सामोरी गेली नव्हती.

तिला खेळाची देखील आवड होती. पण तिचे फेडरर-प्रेम हे साम्प्रासला न बघता निर्माण झाले होते आणि सचिन तेंडुलकरची शेवटची दहा वर्ष तिने पाहिल्यामुळे तो निवृत्त झाला तरी तिचे आयुष्य सुरळीत सुरु होते.

पण एवढं असून सुद्धा ही दरी मी भरून काढायचा प्रयत्न करू शकत होतो. परंतु ती दहावीतच असताना फेसबुक तिच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्याच्या जवळ जवळ चार एक वर्ष तरी आधी इंटरनेट! त्यामुळे ही दरी भरून काढणं मला नक्कीच जड जात होतं. आणि ते वापरण्यात मी नक्कीच कमी पडत होतो. म्हणजे फेसबुक आणि एकूण सोशल मिडिया हे तुमच्या आवडी जोपासणाऱ्या, सम-विचारी लोकांना शोधणारे आणि त्या नंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून मैत्री करायसाठी उत्तम माध्यम आहे एवढेच मला माहिती होते! परंतु त्याच्या पलीकडे देखील त्याचे भरपूर उपयोग आहेत हे मला काही दिवसात समजले. निमित्त होते एका रविवारी - लग्नाला दोन महिने झाले म्हणून (!) - दिवसभर फिरायला जाण्याचे. तिला एव्हाना नोकरी देखील लागली होती. परंतु ती जिथे जायची तिथे मेट्रो ने जावे लागत नव्हते. आणि ही पुण्याची असल्यामुळे तिला मेट्रो मध्ये बसायचे आकर्षण होते. पण आमचा अख्खा दिवस साऱ्या जगाने पाहवा अशी तिची योजना होती! त्यामुळे मेट्रो मध्ये बसायच्या आधी घाटकोपर स्टेशनवर 'excited to ride mumbai metro for first time' असा स्टेटस फेसबुक वर लिहिला गेला आणि 'with' मध्ये माझे नाव! त्या नंतर दोन मिनिटे नाही झाली की 'and the ride begins' म्हणून पुन्हा फेसबुक स्टेटस…. सोबत मी होतोच! पाच मिनिटांनी मी तिला खाली दिसणारी रहदारी दाखवणार तेवढ्यात एका सेल्फीची फर्माईश! मग पुढे 'mumbai metro selfie' अशा नावाने पुन्हा आम्ही फेसबुकवर! एव्हाना अंधेरी स्टेशन आले आणि उतरायची वेळ झाली. मुंबई मेट्रोच्या ब्रिज वरून दिसणारी मुंबई बघायचीच राहिली.… पण हे सगळं संपलं नव्हतं! त्यानंतर जेवताना प्रत्येक डिशचा काढलेला फोटो आणि प्रत्येक वेळेस त्याचा फेसबुकवर मांडलेला पंचनामा हे काही संपत नव्हतं. दिवसाचा शेवटचा टप्पा हा पिक्चर बघण्याचा होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पिक्चर बघताना देखील साधारण दर १५ ते २० मिनिटांनी मोबाईल बाहेर काढला जात होता. थेटरात बसलेले बहुतांश तिच्या वयाचे लोक मला हेच करताना आढळत होते. आणि मला अपेक्षित होते तेच झाले. घरी परत येताना पिक्चर बद्दल काही बोलताच आले नाही. कारण बहुतांश गोष्टी तिच्या नीट लक्षातच नव्हत्या!

बाकी इंटरनेट आणि मोबाईल हे आता अविभाज्य घटक वगेरे राहिले नव्हते. तर ते एक शारिरिक विस्तार झाले होते! त्यामुळे काही मजेशीर गोष्टी देखील होयच्या. माझा एक चुलत भाऊ अमेरिकेत असतो. तिथे कुठे फिरायला गेला तर तिथले फोटो आमच्याशी शेअर करतो. त्यातलाच एक फोटो पाहताना हिने प्रतिक्रिया दिली होती
" अरे… ही झाडं बघ ना … Farmville सारखी आहेत!"
तशीच एक प्रतिक्रिया तिने चर्चगेटच्या रस्त्यांवरून जाताना एका sweet-shop कडे पाहून दिली होती. तिथल्या डब्यांमध्ये विविध प्रकारच्या गोळ्या ठेवलेल्या पाहून तिची प्रतिक्रिया होती की त्या candy crush saga ह्या खेळासारख्या होत्या. दोन्ही वेळेस मला हेच सांगावे लागले की ह्या दोन खेळांची संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून निर्माण झाली आहे. असाच एक प्रसंग फेसबुक नवीन आले तेव्हा मी अनुभवला होता. तेव्हा मी कॉलेजला होतो. फेसबुकची संकल्पना मूळ अमेरिकन. तिथल्या जीवनपद्धती मुळे निर्माण झालेल्या सर्व गोष्टी ह्या माध्यमातून आपल्याला दिसतात. त्यात एक 'poke' असा पर्याय आहे. ह्याचा अर्थ बोटाने हलकेच टोचणे. म्हणजे तिथे कामानिमित्त एकमेकांपासून लांब गेलेली माणसं फेसबुक वर प्रतिसाद द्यायची थांबली तर आपण त्यांच्या प्रोफाईल वर जाउन हे poke चे बटण क्लिक करायचे. पण हीच गोष्ट आमच्या बिल्डींग मधल्या दहावीतल्या दोन पोरांनी ( एक पहिल्या आणि दुसरा दुसऱ्या मजल्यावर राहणारा) सुरु केली तेव्हा मला हसावं का रडावं हेच कळेना! शिवाय ते एकमेकांना बाहेर सागायचे देखील,
" अरे … मी तुला poke केलंय हं … घरी गेल्यावर मला परत कर"

आता जाणवतं की ही देखील त्या वेळेस नववी-दहावीतच तर होती! मग वाटलं की फेसबुकची मूळ संकल्पना ह्या मुलांना समजली आहे का? फेसबुक किंवा एकंदर सगळ्याच प्रकारचा सोशल मिडिया हा संपर्क तुटलेल्या मित्र-मैत्रिणींशी पुन्हा संपर्कात येण्याचं साधन आहे हे त्याचे भारतातले विश्लेषण झाले. पण ह्याचा मूळ हेतू 'नेटवर्किंग' हा आहे. आपल्यात ज्या विशेष आवडी-निवडी आहेत आणि ज्या कालांतराने आपल्या स्वभावात प्रवेश करतात त्या आवडी-निवडी आपल्या पारंपारिक मित्र-वर्तुळात असतीलच असं नाही. सोशल मिडिया मात्र तसे वर्तुळ जमवतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक खुलवतो. फेसबुक हे आपण नेहमीच भेटतो त्या मित्र-मैत्रिणींबरोबर फोटो काढायची जागा नाही. फेसबुक काय WhatsApp आणि गेला बाजार 'एसएमएस' ह्या माध्यमांची सुद्धा आपण अशीच भेसळ केली! ह्या दोन्हींचा वापर रोजचे महत्वाचे संदेश पाठवणे हा आहे. त्यात आपण मोठ्ठाले निबंध पाठवून त्याचा वेगळाच उपयोग केला. मी वय वर्ष ४० आणि पुढे असलेल्या लोकांबद्दल एकवेळ समजू शकतो. कारण हे सारं त्यांच्या आयुष्यात एकदम आलं. काहींच्या तर उतारवयात! परंतु तंत्रज्ञाना बरोबर वाढणाऱ्या वयोगटाकडून असे निश्चित अपेक्षित नाही. त्यामुळे ही ऑफिस मध्ये गेल्यावर तिच्या तिथल्या मैत्रिणी बरोबर कॉफी पिताना फोटो काढून फेसबुकवर का टाकते माहिती नाही! रक्षाबंधन किंवा भाऊबीज साजरी झाल्यावर स्वतःच्या भावाला फेसबुक वर tag करायची विशेष गरज आहे का? ' मला हा दागिना खूप आवडला … त्यामुळे तू मला तो घेऊन दे' अशा एका वाक्यात हिने मला tag केलेलं! गम्मत म्हणजे तसा विषय त्या दिवसानंतर एकदाही आमच्या घरी चर्चेत आलेला नाही. मग एकदा लग्न होऊन दोन महिने झाले म्हणून एका स्टेटस मध्ये मी होतो. तोच मी बाहेर जेवायला गेलो की पण असायचो. म्हणजे तिच्या बरोबर तर असायचो पण ती फेसबुक वर एकटी पडू नये न …म्हणून तिकडे पण बरोबर असायचो! हल्ली मॉल मध्ये गेलो की मध्येच एके ठिकाणी सेल्फी साठी उभं रहावं लागतं. कधी मध्येच 'माझा फोटो काढ ना' ची फर्माइश होते आणि मग एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला ती आणि मधून जाणारी माणसं असं चित्र होतं! काही लोकं सौजन्य दाखवतात आणि फोटो होऊ देतात आणि आपल्याला आणखी खजील करतात. आणि मी विचार करू लागतो की ह्या फोटोंचे पुढे होते काय? म्हणजे एकदा असंच मॉल मध्ये काढलेल्या फोटोबद्दल मी हिला विचारलं. तर तेव्हा समजलं की तो फोटो जुन्या फोन मध्ये होता आणि आता तो फोन एकदम खराब झाल्यामुळे सापडणं कठीण आहे. मग हे फोटो काढले कशाला होते? त्याचा काही विशिष्ट अल्बम बनवला गेला का? फोटो ही एक आठवण की एक क्षणिक सोय? ह्या आणि अशा बऱ्याच प्रश्नांना मी सामोरे जात असतो. उत्तर सापडणं अवघड आहे.

परंतु एका घटनेने माझे थोडेसे मत-परिवर्तन झाले. एका पारिवारिक कार्यक्रमाला आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. माझ्या लहान बहिण-भावंडांचं हिच्याशी फार छान जमतं. सर्व बऱ्यापैकी सारख्या वयाचे असल्यामुळे असेल. त्या दिवशी प्राथमिक गप्पा झाल्यावर ठरलेलं फोटो सेशन सुरु झालं. ह्यांचे बरेच फोटो काढून झाल्यावर आम्हा मोठ्या बहिण-भावांना त्यात ओढले गेले. आम्ही अगदी पहिले नाही वगेरे म्हटले तरीही शेवटी त्यात सामील झालो. मोबाईलच्या चांगल्या दर्जामुळे फोटो देखील छान येत होते. आणि तेव्हा मनात विचार आला की आपले असे फोटो किती आहेत? काही लहानपणीचे वाढदिवसाचे वगेरे, थोडेफार शाळेतले ( शाळेनेच काढून दिलेले) काही कॉलेज मधले आणि थोडेफार नवीन फोन ने काढलेले. आपण अशा बऱ्याच कार्यक्रमांना मित्र-मैत्रिणींबरोबर, बहिण-भावांबरोबर उपस्थित राहिलो आहे? पण ते क्षण आपण टिपू शकलो नाही. आपल्याकडे जुना कॅमेरा होता, रोल फिरवायला लागायचा आणि त्यावेळेस ह्या सर्व कारणांमुळे फोटोची सवय नव्हती. अगदी फार जुनी गोष्ट नाही ही. पण आता तंत्रज्ञान आहे तर असा उपयोग का करू नये? तीच गोष्ट आपल्या लहानपणीच्या फोटोंची! काही मोजके फोटो सोडले तर आपल्याकडे आपलं लहानपण उलगडणारे फोटो नाहीत. पण आज आई-वडील आपल्या मुलांची वाढ फोटोच नव्हे तर विडीयो वर देखील टिपू शकतात. आणि हे साठवलेले क्षण अगदी पंधरा वर्षानंतर पुन्हा अनुभवू शकतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना नावं ठेवणे किंवा त्यांच्या संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही.

हेच विचार डोक्यात ठेवून मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. वर सांगितल्याप्रमाणे मी ई-कॉमर्स क्षेत्रात कामाला आहे. ह्या क्षेत्राची प्राथमिक ओळख म्हणजे आपण जे व्यवहार दैनंदिन आयुष्यात करतो तेच व्यवहार इंटरनेट वरून करणाऱ्या कंपन्यांचे क्षेत्र. तसं मी हॉटेल बुकिंग इंटरनेट वरून करून देणाऱ्या कंपनीत कामाला आहे. त्याच दिवशी आमच्या कंपनीत दोन मोठ्या पदांवर नियुक्ती झाली. ही दोघं म्हणजे नुकतीच कॉलेज मधून बाहेर पडलेली २३ वर्षांची मुलं! गुगल ह्या वेबसाईट वर कंपनी अगदी पहिल्या पानावर झळकावी ( आणि लोकांच्या नजरेस पडावी) ह्याची एक सोपी पद्धत त्यांनी interview मध्ये सुचवलेली होती. कंपनी मध्ये कुणालाही आजपर्यंत ह्याचा अंदाज आला नव्हता. त्यामुळे आता माझ्या बरोबरीच्या पदावर माझ्याहून ५ वर्षांनी लहान असलेली दोन मुलं दाखल झाली होती. आणि ह्याचा आम्हाला फायदाच होत गेला. ह्या मुलांकडे नवीन कल्पना भरपूर होत्या. इंटरनेट क्षेत्रात वावर आमच्यापेक्षा अधिक होता. फक्त सकाळच्या मिटिंगला मोबाईल बाजूला ठेवणं त्यांना जमत नव्हतं. कुणी दोन -तीन मिनिटं बोलायचं थांबलं की लगेच मोबाईलवर फेसबुक वगेरे बघितलं जायचं. मिटिंग मध्ये स्वस्थ बसणं जरा अवघड जायचं. इंटरनेट सर्व्हिस थोडीशी मंदावली की लगेच नापसंती व्यक्त केली जायची. पण आमच्या क्षेत्रात एकूण ह्या वयाच्या मुलांनी कंपनी सुरु केल्याची देखील उदाहरणं येत होती. भारतातले बरेच नवीन CEO हे पंचवीस वर्षांच्या जवळचे होते हे मध्ये एका अहवालात प्रसिद्ध झाले होते. म्हणजे ह्यांची कल्पनाशक्ती विसाव्या वर्षी जागृत होत गेली होती. अशी ही उदाहरणं आम्हाला देखील एक सकारात्मक आव्हान देत होती.

अशाच मन:स्थितीत मी घरी आलो. बायको किचन मध्ये चहा करत होती. तिच्या हातातून चहा चा कप घेतला आणि खिशातून मोबाईल बाहेर काढून म्हणालो,
"सेल्फी!"

जुळवून घ्यायला सुरुवात झाली होती.

- आशय गुणे :) 

Saturday, February 14, 2015

प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २

आणि दुसऱ्याच दिवशीपासून मला ह्या वेबसाईटचा मला मुलगी शोधून देण्याचा प्रयत्न लक्षात आला. मला मुलगी कोणत्या वयोगटातील अपेक्षित आहे ह्याची माहिती मी त्यांना आधीच दिली होती. त्याप्रमाणे रोज दोन इ-मेल मला येऊ लागले. एका इ-मेल मध्ये मला आठ ते नऊ मुली दिसायच्या. ह्या मुली त्यांच्यामते मला अनुरूप ( match) होत्या. अहो, एक ठीक पण नऊ मुली मला एकाच दिवशी अनुरूप कशा असतील? पण आपण आता choose from the display ह्या इंटरनेटच्या विश्वात आलो आहोत ह्याचा मला साक्षात्कार झाला. आणि असे असून सुद्धा मी त्या नऊ च्या नऊ मुली उत्सुकतेने न्याहाळू लागलो. मुलीचे फोटो इंटरनेट वर पहायची अधिकृत संधी फुकट कोण घालवेल? शिवाय हे फोटो पाहणं एका चांगल्या उद्देशासाठीच होतं की! काही दिवसांनी 'आज कुणाचा फोटो बघायला' मिळतोय अशी देखील माझी अवस्था झाली होती आणि हे नाकारण्याचे काहीच कारण नाही. ह्या व्यतिरिक्त अजून एक इ-मेल मला रोज यायचा. तो म्हणजे अमुक एक मुलगी माझी photo match आहे असे सांगणारा इ-मेल. आता मी मुलगा आणि ती मुलगी एवढा साधा-सरळ नैसर्गिक फरक असताना मी कुण्या एका मुलीचा photo match कसा होऊ शकतो हे मला कळेना! ह्या मेल मध्ये मात्र एकाच मुलीचा फोटो असायचा. थोडक्यात काय, तर मला ह्या मुलींमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी आणि मी एक पाऊल पुढे टाकावं ह्या आस्थेने ते 'वेबसाईट' हे सृजनकार्य करत होतं. एक पाऊल पुढे म्हणजे 'तुम्हाला ह्या मुलीमध्ये आवड निर्माण झाली आहे का' ह्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे द्यायचे! पण जुन्या सवयी जाता जात नाहीत. शिवाय त्या लहानपणीच्या असल्या तर नाहीच नाही! आता लहानपणापासून मुली फक्त पाहत आलो असल्यामुळे पाय जमीनीवरच घट्ट रोवलेले असायचे. त्यामुळे पुढचं पाऊल टाकण्याचा प्रश्नच नव्हता! साहजिकच इथेही तेच झाले.
शेवटी मग माझ्याकडून काहीच हालचाल होत नसल्याने त्या वेबसाईट वाल्यांनी माझी चौकशी करायला मला फोन करायला सुरुवात केली.
" सर, आम्ही पाहतोय की तुम्ही फक्त प्रोफाईल सुरु करून ठेवली आहे. परंतु तुम्ही निष्क्रिय दिसता आहात", त्यांनी विचारले.
" हो… म्हणजे नाही … मला रोज ई-मेल येतात आणि त्यात माझ्या match चा उल्लेख असतो. मी ते पाहतो", मी उत्तर दिले.
" सर, पण तेवढं करून कसं चालेल? ( ही बाई अगदी माझी समजूत काढल्यासारखी बोलत होती!) तुम्हाला जर पुढे तुमची पसंती पाठवायची असेल तर तुम्हाला त्या मुलीला इ-मेल करावे लागेल, तिला फोन करावा लागेल. ते तुम्ही कसं करणार?"
"म्हणजे?"
" सर, त्यासाठी तुम्हाला आमचा paid member व्हावे लागेल. त्याची किंमत अमुक अमुक हजार आहे…", ती अगदी गोड आवाजात सांगत होती. ह्या साऱ्या प्रकारात मी paid membership चा विचारच केला नव्हता. त्यात काही विशेष नाही म्हणा कारण पुढे देखील करणार नव्हतो! मला जवळ जवळ एक महिना विचार करायला लागेल असे मी तिला सांगितले.
" धन्यवाद सर, तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल", ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला. वेळ किमती आहे हे माहिती असून सुद्धा ही मंडळी अचानक का फोन करतात काय माहिती! पण मी देखील 'सेल्स' मध्ये असल्यामुळे दुसऱ्याच्या 'टार्गेट' बद्दल आणि ते 'अचीव' करण्यासाठी केल्या जाणाऱ्या खटपटीबद्दल मला सहानुभूतीच आहे.
दोन दिवसांनंतर त्यांचा पुन्हा फोन आला. पुन्हा मला माझ्या नाकारतेपणाची जाणीव करून देण्यात आली. मी काहीच करत नाही, मुलींना अप्रोच करीत नाही, निष्क्रिय आहे, कुठल्याच मुलीने अजून मला अप्रोच केलं नाही वगेरे लडिवाळ तक्रारी त्या फोनवर बोलणाऱ्या मुलीने केल्या. आणि शेवटी ह्या सगळ्या समस्येवर एक रामबाण उपाय ( तिच्यामते) असल्याचा दावा करीत तिने मला एक नवीन 'ऑफर' ऐकवली.
" कसं आहे न सर, आम्हाला माहिती आहे तुम्ही बिझी असता, तुम्हाला वेळ नसतो…. आणि त्यामुळे न सर , आम्ही तुमच्या साठी एक खास ऑफर घेऊन आलो आहे. तुम्ही जर तीन महिन्याची आमची अमुक अमुक हजार फी भरलीत आणि त्यात अजून अमुक हजार रुपये टाकले न तर केवळ (?) एवढ्या हजारात …. एक अतिरिक्त सेवा पुरवू!" अतिरिक्त सेवा ऐक्यावर माझे लक्ष्य एकदम ती काय सांगते आहे हे ऐकण्यात गेले. कारण इतका वेळ हजाराचे आकडे ऐकू येत असल्यामुळे मी लक्षच देत नव्हतो.
" आम्ही न तुमच्यासाठी खास रिलेशनशिप ऑफिसर ठेवू. तो तुमच्याकडून जाणून घेईल की तुमची नक्की requirement काय आहे." तिचा तो requirement शब्द ऐकून ती आधी दुकानात काम करीत असणार ह्याची मला खात्री पटली आणि मी जोरात हसणं कसं-बसं आवरलं! " जेव्हा ह्या ऑफिसरला कळेल की तुम्हाला मुलीकडून काय अपेक्षा आहेत, तुमच्या आवडी-निवडी काय आहेत तेव्हा तो तुमच्यासाठी योग्य प्रोफाईल शोधेल. आणि ह्या ऑफिसर्सन खूप वर्षांचा अनुभव असतो ह्या क्षेत्रांमधला… त्यामुळे ते तुम्हाला अगदी योग्य match शोधून देतील. आणि तुम्हाला खरं सांगू का सर…. पण तुम्हाला हे नीट नाही जमणार …पण आमच्या अनुभवी ऑफिसर्सना नक्कीच जमेल! आणि इतकेच नाही… ते तुमच्या वतीने मुलीशी संपर्क साधतील आणि तुम्हाला दोघांना एकेठिकाणी भेटवतील आणि तुमच्यात संवाद सुरु करून देतील.… "
लग्न अर्थात आम्ही करायचे! कारण तेवढंच बाकी ठेवलं होतं ह्या सेवेने! भारत देशात वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगार संधी कशा उपलब्ध झाल्या आहेत ह्याचा साक्षात्कार मला तेव्हा झाला.
परंतु ह्या टेलीफोन कॉल नंतर माझे डोळे उघडले. आपण किती निष्क्रिय आहोत ह्याची जाणीव झाली. इतके निष्क्रिय की स्वतःचे लग्न लावून द्यायला देखील कुणीतरी नियुक्त करायला लागत आहे. त्या दिवशी मी निश्चय केला. आपली होणारी बायको आपणच शोधायची! कुणाचाही आधार न घेता. रोज अर्धा तास वेबसाईट वर घालवायचा, मुलींच्या प्रोफाईल चाळायच्या आणि त्यातून पसंत पडणाऱ्या मुलींना कसला ही संकोच न बाळगता डायरेक्ट पसंती कळवायची! पुढचं पुढे बघू!
त्याच दरम्यान माझ्या वयाच्या मित्र-मैत्रिणींच्या लग्नाच्या, लग्न ठरण्याच्या आधीच्या आणि एकूण ह्या प्रक्रियेच्या बऱ्याच कहाण्या कानी पडत होत्या. एका मैत्रिणीच्या लग्नासाठी बोलणी होताना तर तिच्या घरी मी स्वतः उपस्थित होतो. माझी 'बेस्ट फ्रेंड'. बऱ्याच विषयांवर आम्ही इतके वर्ष गप्पा मारलेल्या. त्यामुळे आवडी-निवडीच्या हिशोबाने एकमेकांना चांगले ओळखून. कॉलेज मध्ये असताना तर 'चिडविण्याच्या यादीत' आमचे जोडी म्हणून पहिले नाव असायचे. तर 'माझे लग्न ठरताना तू सुद्धा तिकडे हवा' ही तिची विनंती मी नाकारू शकलो नाही. प्रथमिक बोलणी झाली की मला काय वाटतंय, मुलगा कसा आहे ह्याचा रिपोर्ट मला द्यायचा होता. आणि मग ती त्यावर विचार करून घरच्यांशी बोलून निर्णय घेणार होती. त्यादिवशी सकाळी मुलाकडले आले. प्राथमिक ओळखी झाल्या. माझ्या मैत्रिणीच्या आई-वडिलांना माझे तिथे असणे काहीही गैर वाटले नव्हते तरीही 'हा हिचा मित्र' अशी ओळख झाल्यावर त्या मंडळींचा चेहरा जरासा गंभीर झाला. आणि लग्नाची बोलणी होताना जे नाट्य घडतं ते माझ्या मैत्रिणीने पार पाडलं. एका ट्रे मधून सर्वांसाठी उपमा आणि नंतर कॉफी - ' हे हिने स्वतः केलंय' असा सगळीकडून जयघोष होत असताना - ती घेऊन आली. सुरुवातीला हवामान, ट्राफिक, वेळेत पोहोचणे कसे अवघड आहे, मुंबईत आलेले परप्रांतीय लोक इथपासून 'केंद्रात सरकार कसे काम करत नाही' ( 'अच्छे दिन' यायचे होते तेव्हा!) ह्या मध्यमवर्गातील आवडत्या विषयांवर मुला-मुलीकडल्या बापांनी बोलून घेतले. दोन्हीकडच्या आई 'हो ना', 'खरंय' ह्या पलीकडे बोलत नव्हत्या. माझी मैत्रीण आणि तिचा होणारा नवरा गप्प होते. मग हिच्या वडिलांनी प्रश्न केला. वास्तविक त्यांना माहिती होते तरी विचारले.
" काय करता तुम्ही?" ह्या अशा प्रसंगात मुलीचे वडील मुलाला 'अहो' वगेरे म्हणतात आणि मुलीचा उल्लेख मात्र 'अगं' असा होतो. हे मी ऐकले होते पण आज अनुभवत होतो. मुलगा अपेक्षेप्रमाणे एका आय. टी कंपनीत कामाला होता. ह्या त्याच्या उत्तराला माझ्या मैत्रिणीच्या आजोबांपासून सर्वांनी 'वा' असा प्रतिसाद दिला. " हल्ली काय आय.टी खूप जोरात आहे", असे दहा वर्षापूर्वीचे वाक्य सुद्धा ते आजोबा बोलून गेले. आणि सगळीकडे प्रस्सनता पसरली. आणि काही मिनिटात काहीसा संकोच ठेवून मुलीच्या वडिलांनी प्रश्न विचारला. " फॉरेनला जाता … म्हणजे पाठवू शकतात … बरोबर ना? आय. टी मध्ये?"
हा प्रश्न ऐकल्यावर मुलाच्या बापाची कळी खुलली! आणि पुढे होकारार्थी उत्तर देऊन विषय परदेशातल्या 'सुख समाविष्ट' जीवनाकडे कधी गेला हे आम्हालाच कळलं नाही. शेवटी विषय संपला तो मुलाच्या बापाच्या वाक्याने. " आम्हाला मुलगी पसंत आहे. काय ते तारखेचं नक्की करूया!"
" हो … हो … नक्की करूया! माझ्यामते वर्षाखेरीस करू! काय गं?" त्यांनी माझ्या मैत्रिणीला प्रश्न विचारला. मी पाहत होतो. ती एकदम भानावर आली. ह्या अशा प्रसंगी नाही किंवा बघुया असं म्हणणं तिला परंपरेने वर्ज्य ठरवलं होतं. ती आता न्यु-यॉर्क ला राहते. रोज मला candy crush किंवा तत्सम 'फेसबुकी' खेळांच्या रिक़्वेस्ट पाठवत असते! त्या दिवशी गप्पं असलेला तिचा नवरा तिकडे कामात गुंतलेला असतो. आपल्याला तिकडे नियमानुसार नोकरी करता येत नाही हे तिला आणि तिच्या परिवाराला माहितीच नव्हते.
पण काही वेळेस वेगळा प्रसंग देखील घडत होता. कॉलेज मध्ये प्रेमात पडलेले माझे काही मित्र वास्तवाच्या चटक्याने भानावर येत होते. माझ्या एका मित्राचे कॉलेज मध्ये त्याच्याच वर्गातील एका मुलीशी अफेयर सुरु झाले. दोघांची गाडी रुळावरून अगदी डोलत डोलत चालली होती. अगदी दोघांनी एकाच कंपनीत नोकरी पत्करली. साऱ्या कंपनीत ह्यांचे लग्न होणार आहे हे माहिती होतं. कॉलेज पासून 'पुढचा विचार' करणं आता कंपनीत असताना सुद्धा सुरु झालं होतं. अर्थात अधिक व्यापक पद्धतीने! त्याच वेळेस मुलीला कंपनीने काही आठवड्यांसाठी युरोपला पाठवले. काही महत्वाचे काम होते. एयरपोर्ट वर आनंदाने सोडायला गेलेल्या लोकांमध्ये मी देखील होतो. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि ती निघून गेली. दोघांच्या ही घरी माहिती होतं आणि त्यामुळे दोघांचे आई-वडिल हे आनंदाने पाहत होते. पण ती तिथे असताना तिला काय झाले कोणास ठाऊक! कदाचित तिथल्या दृष्टीस येणाऱ्या श्रीमंतीला भुलून तिने परत आल्यावर त्याच्या पगाराची चौकशी करायला सुरुवात केली. हीच चौकशी तिच्या आई वडिलांकडून सुद्धा येऊ लागली आणि त्यामुळे त्याला अधिक व्यापक स्वरूप निर्माण झाले. एरवी तिच्याशी बोलताना सुद्धा 'युरोप' हा विषय तिच्याकडून अधिक येऊ लागला. आणि शेवटी ती लग्न करू शकणार नाही असाच निर्णय तिने जाहीर केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा निर्णय सांगायच्या एका आठवड्या नंतरच तिच्यासाठी स्थळ आलं आणि तिने ते पसंत देखील केलं. ती आता लंडनला असते. आमच्याशी विशेष संपर्क नाही. मित्राची अवस्था पहिले काही महिने फार बिकट होती. पण एकूण इतक्या लगेच तिच्याकडे स्थळ सुद्धा चालून आलं ह्याचा अर्थ 'लग्न' ह्या नाटकाची सूत्र किती आधीपासून कुणीतरी सांभाळत होतं हेच दिसून आलं.
ह्या व्यतिरिक्त स्वतःच्या गर्लफ्रेंड ना सांभाळतानाचे 'वास्तव' आता काही मित्र स्वतःहून सांगत होते. ते वास्तव त्यांना पटू लागले होते असं म्हणूया हवं तर. कॉलेज मध्ये असताना ज्या प्रश्नांचा विचार देखील केला नव्हता ते प्रश्न आता एकदम विचारले जाऊ लागले. बहुतांश गर्लफ्रेंड्स ह्या दिवसातून तीन वेळेस तरी पगार ह्या विषयावर घसरायच्या. कुणाच्या गर्लफ्रेंड्स मॉल मध्ये लटकणाऱ्या महागड्या ड्रेस कडे बोट दाखवायचे. कधी कधी हेच बोट दुसऱ्या मुलींकडे अर्थात त्यांनी घातलेल्या ड्रेसकडे जायचे. अशा वेळेस त्या मुलीकडे अधिकृत रित्या पाहणे माझे मित्र सोडत नसणार ह्याची मला खात्री आहे. परंतु 'हे मला कधी घेऊन देणार' वगेरे ऐकल्यावर त्यांना मानसिक त्रास नक्कीच होत होता. कधी कधी तर 'तुला त्याच्या एवढा पगार कधी मिळणार' वगेरे विचारल्यावर त्यांचे डोकेच फिरायचे. मग त्यांची भांडणं. हे सारे मग माझ्या कानावर यायचे. मग ह्या प्रश्नांवरून चर्चा पाच वर्ष पुढे काय, दहा वर्ष पुढे काय इकडे जायची. त्यातून फ़्रसट्रेट होऊन काही मित्रांनी टपरीवाल्यांना चांगले दिवस देखील आणले होते.
अशी ही पार्श्वभूमी होती जेव्हा मला ह्या वेबसाईट वाल्यांचा फोन येत होता. एकंदर 'प्रेम विवाह', 'गर्लफ्रेंड' वगेरेचे ( काही लोकांचे) कटू सत्य समजत होते. शिवाय उद्या आपण एखादं स्थळ चालून आलं म्हणून लग्न केलंच आणि पुढे हे असे अनुभव मला आले तर? हा विचार सुद्धा डोक्यात होता. त्यामुळे आता आपण स्वतः शोध घ्यायचाच हे मी ठरविले!
तसं पहिले काही दिवस अगदीच विचित्र वाटलं. समोर फोटो दिसतायत. त्यानंतर 'स्व' बद्दल लिहिलेला तो मजकुर वाचायचा. पण ही व्यक्ती आपली बायको होणार अशा प्रकारचा विचार एकदम कसा करायचा? पण काही दिवस गेले आणि मी अशा अर्थाने विचार करायला सज्ज झालो. आणि तेव्हा मला 'मुलगी' ह्या रहस्याचे बरेच पैलू अनुभवायची संधी मिळाली.
आता मी स्त्रियांच्या किंवा मुलींच्या विरोधात वगेरे लिहितो आहे असे समजण्याचे काही कारण नाही. बऱ्याच मुलींना खाली लिहिणार आहे तसे अनेक अनुभव मुलांबद्दल देखील आले असतील. आणि मी मुली ( आणि अर्थात मुलीच!) बघत असल्यामुळे मला त्यांच्याच प्रोफाईल दिसणार.
ह्या मुलींच्या प्रोफाईल चाळल्या की मला नेहमी एक प्रश्न पडत आलेला आहे. बऱ्याच मुलींनी आपल्याला इथे योग्य स्थळप्राप्ती होणार नाही हे आधीच मनात ठेवलेलं असतं काय? कारण तसं नसतं तर त्यांनी प्रोफाईल मध्ये सर्वात लक्षवेधक गोष्ट - अर्थात फोटो - नीट आणि आपण लग्नासाठी इथे आलो आहोत अशा थाटात तरी लावला असता! काही मुलींचा फोटो हा तिरका का लावलेला असतो माहिती नाही. काहींचा आपण त्यांच्याकडे बघू तर त्या कुठे तरी दुसरीकडे बघत असतात आणि आपल्याला त्यांच्या चेहऱ्यातला केवळ गाल आणि कान दिसो असा फोटो असतो. काही मुली फोटोत सुद्धा फोनवर बोलत असतात तर काही दूर एका खांबाला टेकून उभ्या असतात. काहीच्या फोटो मागे समुद्राच्या उंच उडणाऱ्या लाटा तर काहींच्या फोटो मागे घनदाट जंगल! ( असे फोटो पाहिल्यावर त्या काय करतात वगेरे बघायचे धाडसच झाले नाही माझे!) काही मुली तर फोटो म्हणजे कपाळ ते हनुवटी एवढाच भाग आला पाहिजे ह्या समजुतीने वेबसाईट वर येतात तर काही मुली स्वतःबद्दलचे रहस्य टिकवून ठेवायच्या प्रयत्नात असतात आणि त्यामुळे फोटोच लावत नाहीत. त्यांच्या फोटोवर लिहिलेलं असतं - not visible without permission. ( लग्नानंतर सगळ्या गोष्टींसाठी बायकोची परवानगी घ्यावी लागते ह्या गोष्टीची सुरुवात ह्या मुली लग्नाआधीच करीत असव्यात!) टेडी बेअर मांडीवर घेऊन बसलेल्या मुलींचे फोटो पाहिले तर बालविवाह आपल्याकडे अजून वैध आहे की काय असाच मला प्रश्न पडत आलेला आहे.
जी गत फोटोंची तीच गत स्वतःबद्दल लिहायच्या जागेबद्दलची! अर्थात 'about me' ची. ह्या जागेवर लिहिताना बऱ्याच मुलींना 'लग्ना संबंधितच माहिती लिहा' असे बजावले पाहिजे असे मला राहून राहून वाटते. शिवाय ह्याच जागी त्या त्यांच्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत हे देखील लिहित असतात. त्यामुळे आमच्यासाठी ही जागा अतिशय महत्वाची ठरते.
ह्या जागेत लिहिण्याची बहुतांश मुलींची पद्धत ही एकसारखी आढळलेली आहे. सर्वप्रथम काही ठरलेल्या विशेषणांनी स्वतःचे वर्णन आटपायचे आणि थेट गाडी 'माझे मित्र-मैत्रिणी माझ्याबद्दल काय म्हणतात' इथे न्यायची! हे म्हणजे आपण नोकरीचा अर्ज करताना काही लोकांचे 'रेफरन्स' चिकटवतो तसे हे अनामिक रेफरन्स! बरं ही विशेषणं इतकी वैश्विक का असावीत ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही. उदाहरणार्थ, आमची राणी फार साधी, निरागस मुलगी आहे. ती दिसायला चांगली आहे, तिचे मन छान आहे आणि ती एक 'ग्रेट ह्युमन बिंग' आहे. ( हे आणि पुढची सारी उदाहरणं मूळ इंग्रजीतून भाषांतरीत आहेत!)
दुसरीकडे एकीने लिहिलं होतं की मी 'हैप्पी गो लकी' आहे, ' and I am full of life' आणि मला असा मुलगा अपेक्षित आहे जो मला मी आहे तशी स्वीकारेल(!) एका मुलीने लिहिले होते की ती 'simple living high thinking' ह्या तत्वाने आयुष्य जगते आणि तिला असे लोक आवडतात जी पाठीमागे न बोलता सरळ तोंडावर बोलून मोकळी होतात आणि मला असा मुलगा हवा आहे जो माझ्यासारखा fun loving असेल!
(मला हा fun loving शब्द काय असतो माहिती नाही. fun म्हणजेच मजा ही सर्वांना आवडतेच की! त्यामुळे मुद्दाम 'मी fun loving' आहे असं वेगळं लिहायची काय गरज आहे? किंबहुना, 'fun hating' व्यक्ती जगात चुकून सुद्धा अस्तित्वात असेल असं मला वाटत नाही! )
'Down to Earth' अर्थात पाय जमिनीवर असणे हा देखील मुलींचा स्वतःबद्दल सांगायचा आवडता गुण आहे. एका केस मागे सारीत फोटो असलेल्या मुलीने ती easy going आहे असे स्वतःबद्दल लिहून ठेवले होते. म्हणजे काय कुणाला माहिती! मला हे समजले नाही की मी माझ्या सारख्या सामान्य आणि गुण-दोष असलेल्या मुलींना शोधायला ह्या वेबसाईट वर आलो की भोवतीचे जग जिंकून वैश्विक रूप धारण केलेल्या स्त्री-संतांना? बर, ह्या गुणांचा नेमका लग्नाशी कसा संबंध जोडायचा? म्हणजे एखादी मुलगी down to earth आहे हे वयाच्या चोवीसाव्या वर्षी कसे काय सिद्ध झाले? तसे होण्यासाठी असे काय अनुभव घेतले ह्या मुलींनी देव जाणे!
काही मुली स्वतःबद्दल लिहिताना एक विशिष्ट विरोधाभास घेऊन येतात. ह्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे ' मी एक liberal मुलगी आहे आणि मला traditional गोष्टी आवडतात. किंवा माझा परिवार हा liberal with traditional views असा आहे. ह्या संभ्रमित आणि वैश्विक गुणांमुळे भारावून गेलेल्या अवस्थेत आपण नंतरच्या कॉलम्स मध्ये प्रवेश करतो. कौटुंबिक पार्श्वभूमी, आवडी-निवडी, नक्षत्रांच्या संबंधित माहिती, शिक्षण आणि आवडी-निवडी वगेरे माहिती झाली की आपण शेवटच्या कॉलम पर्यंत येउन पोहोचतो - मुलाकडून अपेक्षा!!
मानसिक दृष्ट्या सक्षम असाल तरच पुढे वाचा - अशी सूचना ह्या वेबसाईट वाल्यांनी आम्हा मुलांना हे वाचायच्या आधी दिली पाहिजे! तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या पदावर असाल, चांगली नोकरी करत असाल, चांगला पगार असेल, बॉसने स्तुती केली असेल तरीही एकदा हा कॉलम वाचलात की आपण आयुष्यात काहीच करू शाकेलेलो नाही अशी भावना मनात येईल! इथे सुरुवातीला जात, शिक्षण, वय, उंची, गोत्र, शिक्षण ह्या गोष्टी आपण सहज रित्या पार करतो. पण जेव्हा विषय येतो वार्षिक उत्पन्नाचा तेव्हा आपण गप गुमान त्या प्रोफाईल मधून बाहेर पडून दुसऱ्या प्रोफाईल मध्ये शिरतो. बहुतांश मुलींनी मुलाकडून अपेक्षित वार्षिक उत्पन्न हे १० लाखाच्या खाली लिहिलेले नसते. काहींनी ते अगदी वीस लाखापर्यंत नेउन ठेवलेले असते. बरं, ह्या मुलींच्या यादीत ज्या मुलींचा पगार तेवढा असतो त्यांनी ही अपेक्षा केली तर मला त्याचं काही नवल वाटणार नाही. परंतु वार्षिक उत्पन्न दोन लाख देखील नसलेल्या मुली जेव्हा वीस लाखाच्या अपेक्षा ठणकावून सांगू लागतात तेव्हा हुंडा ही परंपरा उलट्या बाजूने सुरु झाली की काय असा प्रश्न मनात उपस्थित होतो! मी एक प्रोफाईल पहिली होती. त्यात मुलीने वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा किमान ४ लाख/वर्ष ते कमाल २० लाख/वर्ष एवढी ठेवली होती. परिस्थितीशी जुळवून घेण्याची काय ती विलक्षण क्षमता! ही मुलगी चार लाख प्रति वर्ष चे आयुष्य जगू शकत होती आणि वीस लाख प्रती वर्षाचे सुद्धा! ह्या अशा मुली शक्यतो आय.टी कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलांवर नजर ठेवून असाव्यात. कारण बाहेरच्या देशातून पैसे येत असल्यामुळे का होईना, पण एवढा पगार तेच घेऊ शकतात. भारतीय कंपनीत, जिथे बहुतांश भारतीय मुलं काम करतात, पगाराचा हा आकडा गाठायला बरीच बढती गाठावी लागते. पुण्यात बऱ्याच मुली अशाप्रकारचे अप्रत्यक्ष इशारे त्यांची प्रोफ़ाइल वाचणाऱ्या मुलांना देत असतात. स्थायिक होण्याचे ठिकाण 'पुणे किंवा अमेरिका' (!) असे आढळले की आपण ह्या अप्रत्यक्ष इशाऱ्याला समजून जायचे! ह्या संदर्भातील एक 'भयंकर' अपेक्षांची मागणी करणारी परंतु तेवढीच संभ्रमात असलेली प्रोफाईल माझ्या नजरेत आली आणि आपण ह्या साऱ्या प्रकाराकडे विनोदाच्या दृष्टीने देखील पाहू शकतो अशी प्रेरणा मला देऊन गेली.
आम्ही आमच्या बहिणीसाठी एक स्थळ शोधतोय. मी अमेरिकेत राहते आणि माझी चुलत बहिण फ्रान्सला राहते. सुदैवाने आम्ही दोघी पी.एच.डी झालेल्या मुलांशी विवाहबद्ध आहोत. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की आम्ही एका उच्चशिक्षित मुलाची अपेक्षा करतो आहोत. परंतु ही आमची अट नाही. आम्ही देशाबाहेर राहणाऱ्या मुलाची अपेक्षा करतो आहोत. परंतु ही आमची अट नाही. आम्ही मध्य महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित आणि लिबरल परिवारातील मुली आहोत. त्यामुळे आम्हाला आमच्याच पोट-जातीतील मुलगा अपेक्षित आहे. त्यामुळे इतर सदस्यांनी इथे पसंती दर्शवू नये! धन्यवाद! आणि ह्या मागण्यांवर शिक्कामोर्तब करीत त्यांनी प्रत्येक देशातील चलनाची आकडेवारी देत पगाराची मागणी केली होती. त्यांना पंधरा ते वीस लाख प्रति वर्ष भारतीय रुपये, चाळीस हजार ते एक लाख इंग्लंडचे पौंड, दोन लाख चाळीस हजार ते तीन लाख सत्तर हजार प्रति वर्ष अरबी दिनार, ऐंशी हजार ते दीड लाख ऑस्ट्रेलिया डॉलर आणि ऐंशी हजार ते दीड लाख अमेरिकन डॉलर ह्यांच्यापैकी कोणतीही 'परिस्थिती' मान्य होती. आणि शेवटचे गणित होते पन्नास लाख ते एक करोड प्रति वर्ष ह्या चलनाचे. चलन होते 'PKR'. गुगल सर्च केल्यावर अर्थ उलगडला - पाकिस्तानी रुपये!!! म्हणजे ह्या मुलीची पाकिस्तानला जायची पण तयारी होती! परंतु पुणे सोडून मुंबई किंवा नागपूरला जायची तयारी नव्हती.
पुढे काही दिवसांनी मला काही पसंती दर्शविणारे प्रस्ताव आले. वरील त्रुटी नसलेल्या देखील काही प्रोफाईल होत्या. स्वतःबद्दल वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या, मतं व्यवस्थित मांडणाऱ्या आणि स्पष्ट, योग्य अपेक्षा सांगणाऱ्या ह्या प्रोफाईल्स होत्या. त्यामुळे मी काहींना पसंती पाठवली. आणि ही प्रक्रिया सुरु झाली. परंतु कधी मी प्रस्ताव नाकारायचो तर कधी तिकडून नकार यायचा. ह्याची बरीच कारणं होती अर्थात. कधी कोणत्या मुलीला तिच्या नोकरीमुळे मुंबईत येणे शक्य नसायचे तर कधी लग्न लवकर करायचे कारण असायचे जे अर्थात मला नको होते. आणि एके दिवशी एक प्रस्ताव चालून आला. मुंबईचीच मुलगी होती. रसिका नावाची. स्वतःबद्दलचा मजकूर नीट लिहिलेला, स्पष्ट मतं मांडलेली आणि अपेक्षा बऱ्यापैकी नोंदवलेल्या. प्रोफाईल वाचून माझे प्राथमिक समाधान झाले आणि मी पसंती परतवून भेटण्याचे निश्चित केले.
वाशीचा इनओर्बिट मॉल हे भेटण्याचे ठिकाण ठरले. आम्ही एकमेकांचे नंबर घेतले होतेच. तिची नोकरी ही वाशीत असल्यामुळे आणि मला देखील ते शक्य असल्यामुळे आम्ही भेटायचे ठरवले. वॉट्सएप वर आधी थोडे बोलणे झाले होते. परंतु तेव्हा आपण एका अशा मुलीशी बोलतो आहोत जी आपली कदाचित बायको होऊ शकेल ह्यावर विचार करणे जड जात होते. संध्याकाळी साडे सहाला आम्ही तिथल्या कॉफी शॉप मध्ये कॉफी मागविली आणि गप्पा सुरु केल्या. काय करतेस, कसा होता आजचा दिवस, निघायला उशीर होणे, बॉस चांगला/वाईट, घरी जायला उशीर वगेरे विषय हाताळले गेले. हे विषय बोलताना असे अजिबात वाटत नव्हते की दोन अनोळखी लोक पहिल्यांदा बोलत आहेत. नेहमीचंच कुणीतरी बोलतंय असं वाटत होतं. परंतु मध्येच असे जाणवायचे की आपण इथे ह्या मुलीशी लग्नासाठी बोलायला म्हणून आलो आहोत आणि ही कदाचित आपली बायको होऊ शकेल. तेव्हा मात्र तो विचार झटकून टाकावासा वाटायचा! शेवटी मी स्वतः विषय सुरु केला. नाहीतर गप्पांची गाडी थांबलीच नसती.
" मग…. लग्नाबद्दल तुझे काय विचार आहेत? तू ह्या कल्पनेकडे कशी बघतेस?"
मला वाटत नाही माझा प्रश्न फार अवघड होता. परंतु तिच्याकडे काही विशेष उत्तर नव्हते ह्या प्रश्नाचे. म्हणून तो प्रश्न माझ्याकडे परतवला गेला.
" मला वाटतं माझ्या बायकोने मला कॉमप्लीमेंट करायला हवे …माझ्यावर अवलंबून राहिलेले मला आवडणार नाही. आणि त्यासाठी मला तिला आणि तिला मला व्यवस्थित जाणून घेणे आवश्यक आहे. सो, मला असं वाटतं की कॉफी शॉप मध्ये भेटून काही होणार नाही. रोज थोड्या गप्पा झाल्या पाहिजेत, दिवसभराच्या गोष्टी शेअर करून बघायला हव्या… बाहेर थोडे एकत्र फिरले पाहिजे …आणि मुव्हीला जाणे वगेरे सोशल इव्हेंट्स सुद्धा एकत्र पार पाडले पाहिजेत. तरच आपण एकमेकांना नीट ओळखू शकू. माझा डेटिंग ह्या कंसेप्ट वर विश्वास आहे … अर्थात … आपण त्याचा फार चुकीचा अर्थ घेतो!"
मी 'चुकीचा अर्थ घेतो' एवढं म्हणेपर्यंत तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव माझ्या नजरेत पडले. तिचा चेहरा गंभीर झाला आणि शांत शब्दात ती म्हणाली,
" मला नाही वाटत माझ्या आई-वडिलांना हे पटेल!"
"पण तुला?" हा माझा प्रश्न पूर्ण होईपर्यंत ती टेबलवरून उठून निघून गेली होती. एकूण चमत्कारिक प्रसंग होता हा. माझ्याकडून काही अपशब्द बोलला गेला का, काही गैरवर्तन झाले का ह्याची मी उजळणी केली आणि तसं काही घडल्याचे माझ्या आठवण्यात आले नाही. आणि पुन्हा मी एक नवा शोध घेण्यास प्रारंभ केला.
असेच काही दिवस गेले आणि पूर्वा नावाची एक मुलगी मी पाहत असलेल्या यादीत आली. आवडी-निवडी माझ्याशी जुळणाऱ्या होत्या. काही प्रमाणात विचार आणि एकंदर स्वतःबद्दल आत्मविश्वासाने लिहिलेला मजकूर. ह्या वेळेस भेटण्याचे ठिकाण होते दादर. दादरच्या प्रीतम हॉटेल जवळ असलेल्या एका कॉफी शॉप मध्ये मी आणि पूर्वा भेटलो. आता मात्र मी थोडा सरावलेलो होतो. विषयाला कसे यायचे माहिती झाले होते. सुरुवातीची प्रस्तावना नेमकी किती वेळ सुरु ठेवायची हे मला आता माहिती झाले होते. बोलण्यात असे आले की पूर्वा ही एक फ्रीलान्स चित्रकार होती. नोकरी करता करता छोटे मोठे प्रोजेक्ट्स हाती घ्यायची. लग्न झाल्यावर काही दिवसांनंतर ती नोकरी सोडून केवळ ह्या क्षेत्रात काम करणार होती. मला हा आत्मविश्वास भावला आणि त्याला माझी काहीच हरकत नसणार होती. बोलता बोलता मी देखील माझ्या आवडी-निवडी सांगितल्या. नोकरीतील बऱ्यापैकी वर्ष पार पडल्यानंतर मला लेखक म्हणून काम करायचे होते. अर्थात ही गोष्ट काय पाच वर्षात होणार नव्हती. चांगली सेटलमेंट आल्यावरच होणार होती. अगदी मुद्द्याला धरून चांगले बोलणे झाले आमचे आणि आम्ही पुढे भेटायचे ठरविले. मनात मिश्र भाव ठेवून मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी माझ्या मोबाईल मध्ये मेसेज झळकला.
' मला वाटत नाही आपलं जमेल. मला एक वेल सेटल्ड मुलगा हवा आहे. तो जर वेल सेटल्ड असेल तरच मी माझ्या योजना पुढे नेऊ शकते. तुला पुढे नोकरी सोडायची आहे असे तू सांगितल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतो आहे. धन्यवाद!'
इतक्या लवकर विचार बदलला! प्रभावित करणारे घरचेच असणार असं म्हणायला खूप जागा होती. एकूण काय, मुलाने स्वतःच्या आवडी-निवडींचा विचार करू नये. त्याने फक्त कमवावे. असो.
मी आता अशा एका पातळीवर होतो जिथे मला प्रोफाईल वरून मुली सापडत होत्या. परंतु वाटाघाटीत गाडी अडत होती. काही मुलींचे म्हणणे होते की पहिल्याच बोलण्यात घरच्यांना समाविष्ट करायचे जे मला अजिबात मान्य नव्हते तर काहींना माझे घरी न सांगून परस्पर स्वतः निर्णय घेऊन मुलींना भेटणे मान्य नव्हते. काहींचे सारे निर्णय 'घरचेच घेतात' ह्या स्वरूपाचे होते आणि त्या 'फक्त भेटून घे' असं घरच्यांनी सांगितलं ह्या सदरात मोडत होत्या. फक्त भेटून ये म्हणजे काय? लग्न गृहीत धरलं आहे असा अर्थ काढायचा का? काही मुलींचे वडील भेटायच्या दिवशी सकाळपासून reminder calls द्यायचे आणि मुलीशी बोलायला निर्माण केलेला माहोल उध्वस्थ करायचे. माझे विचार स्पष्ट होते. हा निर्णय आयुष्यातील सर्वात महत्वाच्या निर्णयांच्या सदराची सुरुवात आहे. इथून पुढे सारे निर्णय जर मिळून घ्यायचे असतील तर ह्या निर्णयात घरच्यांचा प्रभाव सुरुवातीलाच का आणायचा? आपल्या क्षमतेनुसार, आकलनानुसार हा निर्णय आपण नक्कीच घेऊ शकतो. पुढे घरच्यांशी बोलायचे आहेच. त्यांना अंधारात ठेवा असे मला मुळीच म्हणायचे नव्हते. परंतु ही गोष्ट बऱ्याच मुलींना पटणारी नव्हती. कदाचित आपल्याकडे मुलींना 'तुझे डोके कुणाच्या तरी खांद्यावर ठेवायचे आहे' ह्याच प्रकारचे धडे दिले जातात म्हणून असे होत असेल. तुमची देखील ,मान ताठ असू शकते ही शिकवण फार कमी मुलींना मिळते. दुसरी मला जाणवलेली गोष्ट म्हणजे मुलाचा पगार हा मुलीपेक्षा जास्त (च) पाहिजे हा हट्ट मुलीकडले अधिक करतात. बऱ्याच मुलींची देखील हीच समजूत असते. जी गोष्ट पगाराची तीच गोष्ट डिग्रीची!
मी ह्या साऱ्या गोष्टी फार शिथिल ठेवल्या होत्या. माझ्या बायकोचा पगार जास्त असेल तर मला त्रास होणार नव्हता, तिची डिग्री जास्त असेल तरीही नव्हता. परंतु माझे हेच विचार माझी गाडी मात्र अडवत होते कारण ते पलीकडल्या व्यक्तीला पटणारे नसायचे.
आणि काही दिवसांनी एक अनपेक्षित घटना माझ्या आयुष्यात घडली. मुंबईच्या 'एन.सी.पी.ए' ला एक प्रायोगिक नाटक बघायचा योग आला. एक मुलगी माझ्या शेजारी येउन बसली. मी 'लहरी महंमद' असल्यामुळे बहुतेक वेळेस नाटक, गाणं वगेरे अनुभवायला एकटा जात असतो. त्या वेळेस झाले असे की शेजारी बसलेली मुलगी देखील एकटीच आली होती. एकमेकांकडे पाहून अस्तित्वाची दाखल घेण्यापलीकडे प्रथम काहीच झाले नाही. परंतु नंतर दाद देताना आम्हाला एकमेकांची साथ मिळाली. श्रोत्यांकडून वारंवार होणारा खोकण्याचा आवाज, गंभीर विधानाच्या वेळेस देखील हसणे, क्षुल्लक गोष्टींना टाळ्या वाजवणे आणि मध्ये मध्ये बोलणे ह्या गोष्टींकडे आम्ही मिळून नाक मुरडले. नाटक झाल्यावर आमचे थोडे बोलणे झाले, काही प्रमाणात थट्टा-मस्करी झाली आणि एकमेकांना 'बाय' म्हणून आम्ही निघालो. मी बससाठी उभा राहिलो. थोड्या वेळाने पाहतो तर ती त्याच बससाठी आली. त्या दिवशी ती यायच्या आधी माझी बस आली असती तर हा दिवस बघायला मिळाला नसता! पुन्हा बोलणे झाले आणि असे कळले की ती नवी मुंबईतच राहते आणि त्यामुळे सोबतच जायचे ठरले. बऱ्यापैकी रात्र झाली होती म्हणून ती लेडीज मध्ये न जाता माझ्याबरोबर आली. आणि त्या रात्री ट्रेन नवी मुंबईत शिरेपर्यंत आम्ही आमची आयुष्य उलगडायचा प्रयत्न केला. नंतर अनेक नाटकांना आम्ही एकत्र गेलो. येता-जाता गप्पा मारल्या. त्या निमित्ताने एकत्र जेवलो. कुणीही काहीही ठरविले नव्हते. जे घडत होते ते सारे अनपेक्षित होते. परंतु कुणीतरी ठरविल्यासारखे! मुली पाहताना मनाशी ठरविलेला माझा 'फ्लो' आपोआप 'फॉलो' केला जात होता. आमच्या सर्व आवडी-निवडी सारख्या नव्हत्या! आमचे विचार देखील बऱ्याच बाबतीत भिन्न होते. चर्चा तर कधीच एकमताने संपायच्या नाहीत. परंतु कुठे तरी काहीतरी 'क्लिक' होत होते. निदान असे जाणवत तरी होते. जवळ जवळ वर्ष - दीड वर्ष ह्या स्थितीतील आनंद लुटल्यानंतर एका संध्याकाळी नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर 'मरीन लाइन्स'ला समुद्र किनारी तिने मला विचारले - औपचारिकता म्हणून! मी देखील हो म्हटले - औपचारिकता म्हणून!
स्थळ शोधण्याचा प्रयत्न सफल झाला होता. परंतु काही विशेष प्रयत्न न करता. स्वतःहूनच!
- आशय गुणे स्मित