Pages

Total Pageviews

Showing posts with label लग्न. Show all posts
Showing posts with label लग्न. Show all posts

Wednesday, October 14, 2015

अर्धा-दशक लहान बायको

प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात एक असा दिवस येतो जेव्हा त्याची चौकशी आणि उलटतपासणी एकदम होते! आणि साहजिकच तो दिवस त्याला स्वच्छ आठवतो. म्हणूनच ह्या गोष्टीची सुरुवात 'तो दिवस मला स्वच्छ आठवतो' ह्याच वाक्याने करतो आहे. अनेक मुलीकडल्यांच्या - पोलिस स्टेशनच्या पायऱ्या चढाव्या तशा - पायऱ्या चढून आणि तिथे 'चौकशी' शिवाय काहीही हाती न लागून आम्ही ह्या घराचे दार वाजवले. आधी एवढे अनुभव घेतल्यामुळे आमच्या घरच्यांचे चेहरे 'इथे तरी न्याय मिळेल काय' असे झाले होते. मी मात्र 'आता पुढे काय' असे भाव ठेवून होतो. लग्नासाठी मुलगी पहायची म्हणजे तिच्या घरच्यांच्या आधी तिला भेटले पाहिजे हे माझे तत्व निरुपयोगी ठरले होते. कारण ह्या आधी जवळ जवळ डझनभर मुलींच्या घरच्यांना मी तसदीच देऊ शकलो नव्हतो! शेवटी 'आम्ही सांगत होतो' ह्या ध्रुवपदाने सुरु होणारी गाणी मला ऐकावी लागली आणि घरच्यांनी सगळी सूत्र हातात घेतली. परंतु तिथे देखील लगेच यश मिळाले नाही. शेवटी हा दिवस उजाडला.
दार उघडले गेले. माझ्या स्वागताला ( खरं तर गराडा घालायला) एक आजोबा, एक पन्नाशीतले वाटणारे गृहस्थ, त्यांची बायको, एक आजी आणि दुसरी एक स्त्री एवढे सगळे एकदम आले. सुरुवातीचे पाणी वाटप झाले. आणि तिथे बसलेल्या आजोबांची मान माझ्याकडे वळली.
"काय करता?"
" मी ई- कॉमर्स क्षेत्रात काम करतो", मी उत्तर दिले.
" ई …?" आजोबांनी कदाचित तेवढंच ऐकलं. आणि तोच शब्द ताणून मला प्रश्न केला. तेवढ्यात,
" काय झालं आबा? काय झालं ", असं विचारत लगबगीने एक बाई धावत बाहेर आल्या. ताणून धरलेल्या 'ई' चा परिणाम असावा. शेवटी त्या क्षेत्राचे पूर्ण नाव मी पुन्हा एकदा सांगितले.
" काय कॉमर्स वगेरे केलंय का?" आजोबांनी पुन्हा माझ्या समोर पंचाईत उभी केली. ह्या क्षेत्राचा कॉमर्स शिक्षाणाशी काहीही संबंध नाही हे सांगायचा मी प्रयत्न करणार तेवढ्यात सुदैवाने विषय बदलला गेला. मग काही घरगुती, काही स्थानिक, काही राष्ट्रीय तर काही आंतरराष्ट्रीय (!) अशा विषयांवर माझ्या बसण्याची दाखल न घेता बरीच चर्चा झाली. हल्ली 'आपल्यात' उशीरा लग्न कशी होऊ लागली आहेत इथपासून इथले रस्ते कधीही दुरुस्त होत नाहीत इथपर्यंत आणि विरार लोकल म्हणजे एक दिव्यच इथपासून आता आमचा मनोहर आला आहे ना, बघा कसा पाकिस्तानवर हल्ला करतो ते, इथपर्यंत! पाकिस्तान बद्दल बोलताना त्या उत्साहात ह्यांना आता ठसका वगेरे लागतो की काय ह्याची मला एकदम काळजी वाटली. परंतु विषय 'आता अच्छे दिन येणार आहेत' पर्यंत गेला तेव्हा एका आश्वस्त मुद्रेत आजोबा गेले आणि भोवती बसलेल्या सर्वांनी होकारार्थी मान हलवली.
पुढे पारिवारिक पातळीवरच्या वाटाघाटी सुरु झाल्या. एखादी कंपनी समोरच्या क्लायंटने आपल्या बरोबर बिझनेस करावा म्हणून तो म्हणतो ते सगळे जसे ऐकते तसे माझ्याकडचे करत होते. त्या साऱ्या संभाषणात मला एवढेच शब्द ऐकू आले - 'मुलगी पसंत आहे'
" पण तुम्हाला वयाबद्दल काही म्हणायचे नाही ना? म्हणजे … तुमचा मुलगा २८ वर्षांचा आणि आमची मुलगी २२ वर्षांची … ", मुलीकडल्यांकडून एक शेवटचा प्रश्न आला.
"नाही हो", आईने सूत्र हातात घेतली. "आपल्या पिढीला कुठे त्रास झाला? आणि हे आता वाटते हो … पुढे एकदा पस्तीशी वगेरे ओलांडली की दोघेही एकाच लेव्हल वर येतात."
ह्या घरातले सगळे आता माझे नातेवाईक झाले होते.
लवकरात लवकर लग्न झालं पाहिजे असे संकेत मला आधीच मिळाले होते. ते संकेत समोरच्या पक्षाला दिले गेले. समोरच्या पक्षाचे प्रतिनिधी आणि आमचे प्रतिनिधी हे प्रत्येक निर्णय घेण्याआधी वाटाघाटी करायचा आव आणायचे. परंतु समोरचे प्रतिनिधी एकच वाक्य पाठ करून आले होते. 'आमची काही हरकत नाही' ह्या त्यांच्या ठरलेल्या वाक्याने चर्चा संपायची. त्यामुळे लग्नात ज्या पक्षाची बाजू वरचढ ठरते तो 'वर' पक्ष असे मला लहानपणापासून वाटायचे ते काही अगदी खोटे नव्हते ह्याची प्रचीती मला माझ्याच लग्नात येत होती. आणि ३० डिसेंबर २०१४ ही तारीख ठरली. माझ्या बऱ्याच मित्रांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ३१ डिसेंबर नाही निवडली म्हणून! ( माझ्यासाठी नव्हे!).
बाकी माझी एकूण घडण ही इतकी नीरस का झाली आहे हे मला सांगता येत नाही. म्हणजे आयुष्यातल्या एका दिवसासाठी चेहरा गुळगुळीत करणे, त्यावर रंगकाम करणे हे आपण का करतो असा मला प्रश्न पडला. अजूनही त्याचे उत्तर मिळाले नाही. त्या एका दिवसासाठी घेतलेल्या कपड्यांचे पुढे काय झाले हे आता मला चांगलेच माहिती आहे. परंतु तरीही असे करावे लागते. आणि ह्याचे उत्तर 'असे करावे लागते' असेच असते! त्यात पुन्हा आपण त्यांच्यासाठी आणि त्यांनी आपल्यासाठी केलेली खरेदी असते. मग दोन्ही बिलांची घरातल्या गप्पांमध्ये होणारी तुलना आणि आपण दिलेलंच सरस हे ठरवायचा आटापिटा! आणि ह्या साऱ्यात रस दाखवला नाही तर 'पुढे तुझे कसे होणार' ह्याबद्दल व्यक्त होणारी चिंता. एकूण काय तर लग्न ह्या घटनेनंतर आयुष्यात प्रचंड बदल होणार आहे असे उगीचच सांगितले जाते. तसं काही होत नाही हे अर्थात काही आठवड्यांच्या कालावधीत समजतच. ही अवस्था म्हणजे आपल्याला पोहायला जाताना पाण्यात बुडू नाही म्हणून अगदी पाठीला डबा बांधायचा आणि उडी मारल्यावर खोली ३ फुटाची आहे असे समजण्यासारखे असते. पण ह्या साऱ्या गोंधळात खरेदी वगेरे वैताग देणाऱ्या प्रक्रियेत मित्स कधी कधी आमच्या बरोबर असायची.
मित्स म्हणजेच माझी बायको. तिचे नाव मिताली. परंतु ' एवढे मोठे नाव' कुठे घेत बसायचे म्हणून मला सगळे मित्स म्हणतात असं मला लग्न ठरल्याच्या काही दिवसातच सांगितले गेले होते. वर, आमच्या ग्रुप मध्ये आम्ही सर्वांना अशी नावं ठेवली आहेत असं देखील मला सांगण्यात आलं होतं. मला आठवलं की आमच्या कॉलेज मध्ये काही उत्साही मुलींनी असा प्रकार करायचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांनाच सर्वांनी नावं ठेवल्यामुळे त्यांनी हा नाव ठेवण्याचा प्रयत्न बाजूला ठेवला! परंतु आता मला हेच नाव वापरावे लागणार होते. असो.
लग्नाची खरेदी होत असताना नुसता मी आणि माझा परिवारच नाही तर अख्खं जग त्यात सामील होतंय असं मला काही दिवसात जाणवू लागलं. रिसेप्शनसाठी शर्ट घेताना अचानक माझा मोबाईल वाजला. मोबाईल बघितला तर शर्ट हातात घेऊन त्याच्याकडे बघतानाचा माझा फोटो मला फेसबुक वर दिसला. माझ्या होणाऱ्या बायकोने मला तेवढ्यात tag केले होते. आणि तो फोटो अपलोड करून २ मिनिटं ही झाली नाही तर त्यावर चार उत्साही मुला-मुलींचे कमेंट आले होते. 'हे माझे ग्रुप-मेट्स. नेहमी ऑनलाईन असतात' हे वाक्य माझ्या कानावर पडले. आणि पुढील दोन ते तीन दिवस माझ्या नकळत माझे बरेच फोटो फेसबुक वर येऊ लागले. आणि त्यामुळे माझे ऑफिसातले सहकारी आणि माझे इतर मित्रही प्रत्येक खरेदी बद्दल विचारायला लागले. शेवटी सुरुवातीला विनंती आणि नंतर विनवण्या करून मी तिला हा सारा प्रकार थांबवायला सांगितला. आणि लग्ना नंतर पुढे आयुष्यभर जे करायला लागणार होतं ( आणि आता करायला लागतंय) ह्याचा माझा सराव सुरु झाला. तिने देखील, नाखुशीने का होईना, पण हे सगळं थांबवलं. परंतु फेसबुकचा उल्लेख अधून मधून होयचा. म्हणजे एखादा शर्ट घेताना ' हा फेबुकवर छान दिसेल' अशी प्रतिक्रिया यायची. क्वचित कधीतरी फेसबुक स्टेटस मध्ये मी tagged असायचो. पण जेव्हा 'thinking about someone special' ह्या स्टेटस मध्ये मला tag केले गेले तेव्हा मात्र मी हे देखील थांबवायला सांगितले आणि माझ्या नीरस असल्याबद्दल पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले!
आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला. इतके दिवस मित्राचे किंवा मैत्रिणीचे लग्न होताना त्याला/तिला ज्या गोष्टीसाठी हसायचो ती गोष्ट आज मला करायला लागणार होती. स्टेजवर वेळेचे ओझे डोक्यावर घेऊन येणाऱ्या सर्वांकडे बघून हसायचे होते आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायचे होते. ह्यावर भर घालायला माझे काही मित्र ' आम्ही जेऊन घेतो' हे मुद्दाम सांगत होते.हे सगळं सुरु असताना साधारण ८ ते १० मुलामुलींचं टोळकं स्टेज चढून वर आलं. औपचारिक ओळख झाल्यावर असं कळलं की हा हिचा कॉलेजचा ग्रुप आहे. त्यांची ओळख आणि त्यांनी आमचे अभिनंदन केल्यावर फोटो काढायची वेळ आली आणि मला जवळ जवळ पन्नासाव्या वेळेस हसायची संधी मिळाली. त्यात अजून एकदा हसायची भर पडली जेव्हा त्यातील एकाने आपला मोबाईल बाहेर काढला आणि त्यावर आमचा सर्वांचा एक फोटो घेतला. आणि तेवढ्यात त्यातील एकाने सर्वांना थांबायची खूण केली. स्टेजच्या डाव्या बाजूला जो ग्रुप पुढे यायला व्याकूळ होता तो अधिक व्याकूळ झाला. क्षणभर कुणाला काही कळेना. ज्याने थांबायची खूण केली त्याने हातात काठी सारखं काहीतरी घेतलं. आणि दुसऱ्या क्षणी तिला ताणून लांब केले. आणि अगदी टोकावर स्वतःचा मोबाईल अडकवला. आणि गुढी उभारण्याच्या पोझ मध्ये ते सारे एका हातात धरले. त्या सबंध घोळक्यात मीच एकटा संभ्रमित दिसत होतो. आणि कानाला कांठळ्या बसाव्यात अशा आवाजात त्यातील तीन जणं ओरडले -- " सेल्फ़ीssssssss"
मला सेल्फी काय आहे ते माहिती होतं. परंतु त्यासाठी देखील यंत्र उपलब्ध आहेत ह्याची माहिती मला नव्हती.

लग्नात मला जी काही लोकं भेटायला आली त्यांच्यापैकी सेल्फीचा आग्रह मात्र ह्याच ग्रुप ने धरला होता. इतर बरीच लोकं येत होती. काही परिचित, काही अपरिचित आणि बरीचशी त्या वेळेपूर्ती परिचित! आता हेच बघा ना. मित्सच्या पुण्यातील एका काकांचे ज्येष्ठ मित्र आम्हाला भेटायला स्टेज वर आले. साधारण सत्तरी जवळ आलेल्या ह्या व्यक्तीची ओळख 'मंगळूरला असतात आणि बऱ्याच वर्षांनी पुण्यात आले आहेत' अशी झाली. आता हे काका पुण्यातच बऱ्याच वर्षांनी आले होते तर ते पुढे मुंबईला कधी येतील आणि आलेच तर आमच्या घरी कधी येतील हा प्रश्नच होता म्हणा! पण हाच तो तात्पुरता परिचय आणि लग्नात नेमकी ह्या अशाच लोकांची संख्या सर्वाधिक असते! माझ्यात मात्र स्टेज वर उभं राहून राहून दूरदृष्टी निर्माण झाली होती. म्हणजे आतापर्यंत मला आपण काही तासांनी जेवणार आहोत असे दिसू लागले होते. मात्र आता मी उद्या विमानात बसलो आहे, केरळला जाणारे विमान, त्या विमानात एयर-हॉस्टेस कशा असतील .… आणि एकदम " हे आपटे साहेब", असं म्हणत सासरेबुवांनी कुणाला तरी समोर उभे केले!
तर अशाप्रकारे लग्नाचा शेवट प्रचंड दगदग आणि कंटाळवाणा झाला हे मान्य करावे लागेल. दुसऱ्या दिवशी लगेच लवकर उठून कोचीला जाणारे विमान पकडायचे होते.

आम्ही विमानात बसलो. नाही म्हटलं तरी महिनाभर भरपूर दगदग झाली होती. सतत काहीतरी कामं असायची. भरपूर लोकांकडे जाणं, बऱ्याचदा त्यांच्याकडे जेवणं, त्यांचा तो वाट्टेल तसा आग्रह करणं आणि एवढं सगळं करून घरी उशिरा पोहोचून सकाळी वेळेवर कामावर जाणं. बरं, ही नातेवाईक मंडळी लग्नाला तर येणार होतीच. काही तर घरापासून अगदी जवळ राहणारी होती. पण तरीही 'आमच्याकडे जेवायला या' हे होतेच. आणि ते देखील त्यांच्या स्केड्युल प्रमाणे! नवरा मुलगा असलो तरीही मला कोणतीही सवलत नाही. एका उत्साही काका-आजोबांनी शेवटच्या क्षणी, 'आज जरा मला वेळ नाही मिळत आहे, उद्या ये' सांगून अशीच माझी पंचाईत केली होती. आणि अशा वेळेस आई नेमकी त्यांची बाजू घ्यायची. ' नेहमी कुठे बोलावतात ते' हा तिचा पवित्रा! ( तसं नेहमी कुणीच बोलवत नाही म्हणा!) तेव्हा पासून लग्न होईपर्यंत धावपळीतून अजिबात आराम मिळाला नव्हता. लग्न सुरु असताना मी झोपी जातोय का काय ह्याची मला भीती होती. परंतु सारखे 'सावधान' करणे सुरु असल्यामुळे तो प्रसंग टळला!
विमानात बसल्यावर हे सारे आठवून मी एक समाधानी सुस्कारा टाकला. परंतु कोची पर्यंत एक झोप होईल ह्याचा आनंद क्षणात मावळला.
" अरे झोपतोयस काय! आपल्याला एक सेल्फी काढायला हवा!"
" आत्ता? इथे?"
"अरे मग काय! सीटबेल्ट ची अनौंसमेंट होण्याआधी …. एक सेल्फी तो बंता है …. चल चल …लवकर … पुढे फोन स्विचऑफ करायला सांगतील …. आणि मग कोची पर्यंत नेट पण बंद होईल! त्याच्या आत आपण विमानात बसलोय हा सेल्फी फेसबुक वर नको टाकायला?"
हा एक सक्तीचा प्रोटोकॉल असल्यासारखी ही मला का सांगत होती देव जाणे! आणि त्याच क्षणी मी तो 'सेल्फी' 'फेस' केला!

आमचं फ्लाईट साधारण सकाळी ११ च्या सुमारास कोचीला उतरलं. मी जवळ जवळ तासभर का होईना झोप मिळवली होती. आता हनीमूनला जाताना प्रवासात झोपेला महत्व द्यावं हे मला देखील मान्य नव्हतंच! त्यामुळे आमच्या गप्पा देखील झाल्या. लग्न होण्या आधीच्या दोन-तीन महिन्याच्या काही आठवणी काढल्या गेल्या. काही विषयांवर गप्पा झाल्या, हसणं झालं, खिदळणं झालं. आणि विमानतळावर परत एकदा ….
" सेल्फी!!!"
'कोची विमानतळावर सेल्फी' हे शीर्षक लिहून फोटो फेसबुक वर गेला होता. आणि एका गहन हिशोबाकडे माझे लक्ष गेले.
" आपण मुंबईला विमानात सेल्फी काढलेला ना … त्याला बघ … १४८ लाईक्स आले पण", ही खूप उत्साहाने सांगत होती.
" बरं, मग?"
आणि…
" अरे मग काय … लोकांना आवडला फोटो… तुला काहीच कसं वाटत नाही… आणि त्यात तुझे मित्र खूप कमी आहेत … माझ्याच मित्र-मैत्रिणींकडून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत … तुम्ही कुणीच फेसबुक वर नसता का? करता काय मग दिवसभर?"
शेवटच्या ' करता काय मग दिवसभर?' ह्या प्रश्नाला 'काम' असे उत्तर देण्याचा मोह मी टाळला. उगीच सहजीवनाच्या दुसऱ्याच दिवशी खटका नको उडायला! शिवाय आता काढलेल्या ह्या सेल्फीला किती 'लाइक्स' आले ह्याची मोजणी काही वेळेनंतर होणार होतीच. हॉटेलकडे घेऊन जाणाऱ्या कॅब मध्ये दर दोन मिनिटांनी फेसबुकवर फोटोची पाहणी होत असताना माझ्या हे लक्षात आले. त्यामुळे मी खिडकी बाहेर पाहू लागलो आणि माझी अरसिकता पुन्हा एकदा सिद्ध झाली.
हॉटेल मध्ये साधारण १ च्या सुमारास आम्ही चेक-ईन केलं आणि रूम मध्ये शिरतानाच माझा मोबाईल जवळ जवळ अर्धा मिनिट वाजत राहिला. अनलॉक करून पाहतो तर पंचवीस एक फोटोंनी माझ्या मोबाईल मध्ये शिरकाव केला होता. हिनेच पाठवले होते. पण एवढे?
" हो! एअरपोर्ट पासून हॉटेल पर्यंत काढले", तिने उत्तर दिले. अच्छा, म्हणजे माझे पाहणे सुरु होते तेव्हा हिने टिपणे सुरु केले होते. ह्या फोटोंमध्ये रस्त्यावर असलेली रहदारी, एअरपोर्टच्या बाहेर थोडीशी मोकळी जमीन, केरळ मधली एक बस, रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक गाय, रस्त्यावर मल्याळी अक्षरात लिहिलेले एक होर्डिंग इथपासून हॉटेल बाहेर ठेवलेल्या तीन कुंड्या, हॉटेलचे नाव ठळकपणे असलेला बोर्ड वगेरेचा समावेश होता. आता मल्याळी अक्षरं सोडली तर ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुद्धा होत्या. काही वेळाने मला लक्षात आले की ही मल्याळी अक्षरं फेसबुक मधल्या 'अपलोड' साठी होती. ' केरळ मध्ये आहोत ह्याचे प्रुफ' असे स्पष्टीकरण बायकोकडून मिळाले.

कॅमेराच्या नजरेतून पाहण्याआधी मी हॉटेल भोवती असलेले सौंदर्य माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहून घेतले. सकाळी वॉकला आलो होतो. कोणतेही चित्र कॅमेऱ्यात टिपण्याआधी ते आपल्या डोळ्यांनी टिपले गेले पाहिजे. त्याच्यासाठी काही सेकंदाचा अवधी हवा. तरंच एक सुंदर फोटो तयार येईल …. इतक्यात माझा फोन वाजला. एवढ्या सकाळी कुणाचा मेसेज म्हणून whatsapp उघडले तर बायकोचा मेसेज! एक चहा किंवा कॉफी असलेला कप आणि त्यातून वाफा येत आहेत, शेजारी एक गुच्छ ठेवलेला आहे आणि संदेश झळकतोय … गुड मॉर्निंग! हा मेसेज माझीच बायको मला का पाठवतेय हे काही मला कळेना. आणि ते सुद्धा ५०० मीटर लांब असलेल्या हॉटेलच्या खोलीतून! मोबाईल खिशात ठेवून मान वर केली तर समोरून ही चालत येत होती …. म्हणजे हिने येता येता हा मेसेज फॉरवर्ड केला होता!!
" गुड मॉर्निंग…", मी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. " छान होता ना मेसेज … आताच आला मला", समोरच्या दृश्याचा फोटो काढीत हिने माझ्या नैसर्गिक शुभेच्छांचा निकाल लावला. आणि ' मी तुला फोटोच्या नव्हे खऱ्या शुभेच्छा देतो आहे' असं मी सांगेपर्यंत ७ फोटो काढून झाले होते. मीच तो नाद सोडून दिला. त्यानंतर रोज सकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान माझ्या फोन मध्ये त्याच्या शेजारी ठेवलेल्या फोन मधून शुभ सकाळ वगेरे चे मेसेज येऊ लागले.

पण इथपर्यंत भागलं नाही. माझ्या फोन मध्ये आता काही नव्या मेसजेस नी देखील शिरकाव करायला सुरुवात केली होती. ह्यांची विशेषता अशी की हे संदेश काही विशिष्ट व्यक्तींच्या भोवतीच विणले जायचे. त्यात डॉ. कलाम, अब्राहम लिंकन आणि स्वामी विवेकानंद ह्यांचा सामावेश होता. मला खात्री आहे की ही माणसं आज जर जिवंत असती तर त्यांनी ह्या सर्वांवर अब्रु-नुकसानी पासून चुकीची माहिती पसरवल्याचा खटला नक्कीच भरला असता. म्हणजे I am not handsome but I can give my hand to someone who need help... Because beauty is required in heart not in face....असं कलाम कधी म्हणाले असतील असं वाटत नाही. हिच शिक्षा विवेकानंदांना देखील दिली होती. म्हणजे एक इंग्रज माणूस विवेकानंदांना विचारतो की तुमच्या देशात स्त्रिया 'shake hand' का करत नाही? तेव्हा विवेकानंद त्याला उलटा प्रश्न विचारतात की तुमच्या देशात तुम्ही राणीला 'shake hand' करता का …. आमच्या देशात प्रत्येक स्त्री राणी सारखी आहे --- गुड मॉर्निंग, असा तो संदेश पाहून मी चकित झालो. मला काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण झाली. काही मोठ्या लोकांनी ( काका वगेरे) WhatsApp वर ग्रुप काढलेला. अजून देखील आहे. पण त्यात मी नाहीये. त्यात देखील अशाच संदेशांचा भडीमार होयचा. काही लोकसंगीत प्रकार कसे त्याचा कवी माहिती नसतो पण ती वर्षानुवर्ष पुढे सरकत आपल्या पर्यंत येतात तसंच बहुदा ह्या संदेशांचे पुढे होणार आहे. मी दहावी-अकरावीत असताना ( म्हणजे बारा वर्षांपूर्वी) ई-मेल चेक करायला महिन्यातून एकदा सायबर कॅफे मध्ये जावे लागे. तेव्हा काही फार महत्वाची ई-मेल येत नसत , नुसती फॉरवर्ड असत. त्यात एक ई-मेल असे सांगायचे की भारतातील राष्ट्रगीताला UNESCO ने जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीत म्हणून सन्मानित केलंय. बारा वर्षांनी जेव्हा WhatsApp वर हाच मेसेज एका काकाने फॉरवर्ड केल्यावर मी सभात्याग करतात तसा ग्रुप-त्याग केला! इतकी वर्ष झाली तरी वाजपायी ह्यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग आणि आता मोदी हे कुणीच हा सन्मान स्वीकारायला गेले नाहीत ही साधी गोष्ट कुणाच्याही लक्षात न यावी? पण काका लोकांचं ठीक आहे. त्यांच्या हातात एकदम हे तंत्रज्ञान आले. पण शाळेपासून मोबाईल बरोबरच मोठ्या झालेल्या माझ्या बायकोला देखील अशा मेसेजसची चिकित्सा करावी वाटू नये ह्याचे मला आश्चर्य वाटले.

परंतु आश्चर्य वाटण्याची ही एक सुरुवात होती असं मला काही दिवसात कळलं. कोचीहून आम्ही आता मुन्नारला आलो होतो. तिथे आम्हाला जे हॉटेल मिळाले होते ते एकदम डोंगरात बसलेले असे होते. तिथली ती शांतता आठवली ना की आपण शहरात जन्माला आलोय ह्याचा प्रचंड पश्चाताप होतो! डोंगराचा तो भाग 'U' ह्या आकाराचा असल्यामुळे दोन बाजूंमध्ये प्रचंड मोकळी जागा होती. आमचं हॉटेल एका बाजूला तर दूर दुसऱ्या बाजूला पायथ्याशी एक मंदिर होते. परंतु परिसर इतका शांत की दूर मंदिरात लावले गेलेले दाक्षिणात्य संगीत अगदी स्पष्ट ऐकू येत होते. मी त्या जागेचा शांत उभं राहून, डोळे मिटून अनुभव घेताना हिने नेहमीप्रमाणे फोटो मोहीम सुरु केलीच! त्या दिवशी रात्री जेवायला बसलो होतो.
" काय शांत परिसर आहे … मुंबईला जावेच वाटत नाही ", मी म्हणालो. ही मोबाईल मध्ये काहीतरी टाईप करत होती. त्यामुळे माझ्याकडे न बघता 'हं' एवढा प्रतिसाद आला. त्यामुळे काही सेकंदांनी मी देखील माझे सूप चे बाउल न्याहाळू लागलो. आणि तेवढ्यात …
" ओह्ह्ह …. मोदी… "

टी.वी वर पंतप्रधान कुठेतरी बोलत होते त्याची बातमी दाखवत होते.
" तुला आवडतं का राजकारण?" मी विचारलं.
" ओह्ह प्लीज … नाही आवडत … खूप बोरिंग आहे पॉलीटिक्स", ती म्हणाली. " बट आय फाईंड मोदी वेरी कूल ", हे देखील पुढे जोडले तिने.
पंतप्रधान कूल कसे असू शकतात हा विचार मी मनात दाबून धरला.
" पण तुला माहितीय का …. मी वोट द्यायला गेले होते ना.… तर मला लिस्ट मध्ये मोदींचे नाव कुठेच दिसले नाही… … आय वॉस सो कंफ्युज्ड…"
पुढच्या क्षणी मला पाणी द्यायला धावलेल्या दोन वेटर्सना मी खुणेने मागे सारले होते. इतका प्रचंड ठसका लागला होता मला. पुढे मला सांगितले गेले की नेमके तिला कमळ असलेले बटण दाबा ही जाहिरात आठवली आणि कदाचित ते म्हणजे मोदी असं समजून तिने आपले मत व्यक्त केले होते. आणि तिच्या सुदैवाने ते बरोबर निघाले. मी हे सारे ऐकून घेतले. मग तिला समजवायला सुरुवात केली की कमळ ही भाजपची निशाणी आहे. आणि तू मत मोदींना नाही तर भाजपला दिले आहेस. त्यानंतर खासदार कोण, आमदार कोण आणि मोदी निवडणुकीला कुठून उभे होते वगेरे सर्व मी तिला समजावले. मोबाईल कडे पाहणे आणि माझ्याकडे पाहणे ह्याचा समन्वय साधत मान खाली-वर करीत ती सारे ऐकत होती. मागच्या निवडणुकीच्या वेळेस ती १७ वर्षांची असल्यामुळे तिची मत द्यायची संधी हुकली होती. राज्याच्या आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत तिला रस नव्हता. त्याचे कारण तिच्या शब्दात सांगायचे तर 'तेव्हा फेसबुक, ट्विटर नसल्यामुळे मला काहीही माहिती नव्हते'.
" मी गाडी चालवते तर रस्त्यावर खड्डे असतात…. आमच्या घरी पुण्यात २४ तास पाणी येत नाही… गाडी चालवते तर सारखा ट्राफिक असतो … सो मी ठरवले की आता चेंज हवा ", तिने शेवट केला.
" पण ह्यातली कोणती कामं केंद्र सरकार करतं?" मागवलेल्या आईस-क्रीमचा फोटो काढून WhatsApp वरून पाठवणे हे माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर होते. त्यामुळे विषय तिथेच संपला. तो अजून सुरु राहिला असता तर कदाचित मी तिला सोशल मिडियाच्या पलीकडे जाउन रोजचा पेपर वाच वगेरे सांगणार होतो. परंतु ज्या प्रकारे सोशल मिडियावर चाललेल्या चर्चा अचानक संपतात (किंवा संपवल्या जातात) तसा आमचा हा विषय संपला.

आम्ही आता घरी आलो होतो. एकमेकांची सवय होऊ लागली होती आणि हळू हळू स्वभाव देखील समजू-जाणवू लागले होते. अर्थात निश्चित स्वरूपात नाही. पण एक अंदाज येऊ लागला होता एवढं मात्र खरं! काही वेळेस त्यामुळे खटके देखील उडायचे.जेवण झाल्यावर गाणी ऐकायची मला लहानपणापासून सवय. त्यात 'जो जीता वोही सिकंदर' किंवा 'दिलवाले दुल्हनिया जायेंगे' मधली गाणी अगदी विशेष आवडीने. कधी कधी 'अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का' होऊन जायचं. अधून मधून ८० च्या दशकातील आर.डी बर्मन ची गाणी किंवा त्याचीच '१९४२ - अ लव्ह स्टोरी' मधली गाणी असायची. कधी कधी 'तेझाब', 'बेटा' वगेरे सिनेमे हजेरी लावायचे. आमच्या घरी टी.वी सर्वप्रथम आला तेव्हा ऐकलेली … किंवा आपण म्हणू पाहिलेली ही गाणी आहेत.

" आमच्याकडे टी.वी आला तेव्हा सुपरहिट मुकाबला वर हे गाणं सर्वप्रथम पाहिलं ", मी एका गाण्याबद्दल हिला सांगत होतो. हिला त्याचे फार काही वाटले नाही. जी गोष्ट गाण्यांची ती गोष्ट इतर बऱ्याच गोष्टींची! तिला 'मिले सूर मेरा तुम्हारा' किंवा 'बजे सरगम' असे जुने विडीयो लावले की कंटाळा येतो . मला कधी कधी जुन्या दूरदर्शनच्या जाहिराती बघायला आवडतात. त्याने मी मधूनच सायकल आणि स्कूटर रस्त्यावर फिरत असलेल्या माझ्या लहानपणात जातो. धारा, लिरिल, बोर्नविटा, डेअरी मिल्क, रस्ना, फेविकॉल, निरमा, अमूल हे आयुष्याचा भाग नव्हते झाले अशा माझ्या बालपणी डोकावतो. हिला त्याचे विशेष काही वाटत नाही. मी आणि माझी बहिण आमचा landline फोन वाजला की तो कोण पहिले उचलतोय ह्यासाठी शर्यत लावायचो हे तिला सांगितल्यावर आपला नवरा नक्कीच लहानपणी वेडा होता अशा नजरेने ती पाहते. Landline फोन नंतरचा कॉर्डलेस फोन किंवा पेजर वगेरे चा प्रवास तिने अनुभवलेला नसावा. कारण त्याबद्दल घरी कधी विषय निघाला तर ती त्यात सहभागी होत नाही. घरी कधी दूरदर्शनच्या सिरियलच्या आठवणी निघाल्या की ही काही मिनिटांमध्ये आतल्या खोलीत निघून जाते. हिच्या आठवणी ह्या ह्रितिक रोशन पासून सुरु होतात आणि बऱ्याचशा नंतरच्या हिरो-हिरोइन्स पर्यंत येउन पोहोचतात. हिला श्रीमान-श्रीमती मध्ये रस नाही पण फ्रेंड्स मध्ये आहे. ज्या गोष्टी मला कॉलेज संपताना मिळाल्या त्या तिच्याकडे दहावीतच आल्याचे माझ्या लक्षात येत होते. ह्या साऱ्या यादीत इंटरनेट, फेसबुक आणि मोबाईल फोन ह्याचा देखील समावेश होता. तिने सायबर कॅफेचा उपयोग केवळ प्रिंट काढायला केला होत. तिला कळायला लागणाऱ्या वेळेत तिच्याकडे कॉम्पुटर आणि इंटरनेट हे दोन्हीही आले होते. त्यामुळे जुन्या टी.वी विडीयो गेम्स बद्दल बोललं तर तिला काही कळायचं नाही. पण तिला कॉम्पुटर गेम्स बद्दल सगळी माहिती होती. एकूणच असं की हे सगळं तिच्याकडे एकदम आलं होतंं. माझ्यासारखी ती कोणत्याही प्रक्रियेला सामोरी गेली नव्हती.

तिला खेळाची देखील आवड होती. पण तिचे फेडरर-प्रेम हे साम्प्रासला न बघता निर्माण झाले होते आणि सचिन तेंडुलकरची शेवटची दहा वर्ष तिने पाहिल्यामुळे तो निवृत्त झाला तरी तिचे आयुष्य सुरळीत सुरु होते.

पण एवढं असून सुद्धा ही दरी मी भरून काढायचा प्रयत्न करू शकत होतो. परंतु ती दहावीतच असताना फेसबुक तिच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्याच्या जवळ जवळ चार एक वर्ष तरी आधी इंटरनेट! त्यामुळे ही दरी भरून काढणं मला नक्कीच जड जात होतं. आणि ते वापरण्यात मी नक्कीच कमी पडत होतो. म्हणजे फेसबुक आणि एकूण सोशल मिडिया हे तुमच्या आवडी जोपासणाऱ्या, सम-विचारी लोकांना शोधणारे आणि त्या नंतर त्यांना प्रत्यक्ष भेटून मैत्री करायसाठी उत्तम माध्यम आहे एवढेच मला माहिती होते! परंतु त्याच्या पलीकडे देखील त्याचे भरपूर उपयोग आहेत हे मला काही दिवसात समजले. निमित्त होते एका रविवारी - लग्नाला दोन महिने झाले म्हणून (!) - दिवसभर फिरायला जाण्याचे. तिला एव्हाना नोकरी देखील लागली होती. परंतु ती जिथे जायची तिथे मेट्रो ने जावे लागत नव्हते. आणि ही पुण्याची असल्यामुळे तिला मेट्रो मध्ये बसायचे आकर्षण होते. पण आमचा अख्खा दिवस साऱ्या जगाने पाहवा अशी तिची योजना होती! त्यामुळे मेट्रो मध्ये बसायच्या आधी घाटकोपर स्टेशनवर 'excited to ride mumbai metro for first time' असा स्टेटस फेसबुक वर लिहिला गेला आणि 'with' मध्ये माझे नाव! त्या नंतर दोन मिनिटे नाही झाली की 'and the ride begins' म्हणून पुन्हा फेसबुक स्टेटस…. सोबत मी होतोच! पाच मिनिटांनी मी तिला खाली दिसणारी रहदारी दाखवणार तेवढ्यात एका सेल्फीची फर्माईश! मग पुढे 'mumbai metro selfie' अशा नावाने पुन्हा आम्ही फेसबुकवर! एव्हाना अंधेरी स्टेशन आले आणि उतरायची वेळ झाली. मुंबई मेट्रोच्या ब्रिज वरून दिसणारी मुंबई बघायचीच राहिली.… पण हे सगळं संपलं नव्हतं! त्यानंतर जेवताना प्रत्येक डिशचा काढलेला फोटो आणि प्रत्येक वेळेस त्याचा फेसबुकवर मांडलेला पंचनामा हे काही संपत नव्हतं. दिवसाचा शेवटचा टप्पा हा पिक्चर बघण्याचा होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पिक्चर बघताना देखील साधारण दर १५ ते २० मिनिटांनी मोबाईल बाहेर काढला जात होता. थेटरात बसलेले बहुतांश तिच्या वयाचे लोक मला हेच करताना आढळत होते. आणि मला अपेक्षित होते तेच झाले. घरी परत येताना पिक्चर बद्दल काही बोलताच आले नाही. कारण बहुतांश गोष्टी तिच्या नीट लक्षातच नव्हत्या!

बाकी इंटरनेट आणि मोबाईल हे आता अविभाज्य घटक वगेरे राहिले नव्हते. तर ते एक शारिरिक विस्तार झाले होते! त्यामुळे काही मजेशीर गोष्टी देखील होयच्या. माझा एक चुलत भाऊ अमेरिकेत असतो. तिथे कुठे फिरायला गेला तर तिथले फोटो आमच्याशी शेअर करतो. त्यातलाच एक फोटो पाहताना हिने प्रतिक्रिया दिली होती
" अरे… ही झाडं बघ ना … Farmville सारखी आहेत!"
तशीच एक प्रतिक्रिया तिने चर्चगेटच्या रस्त्यांवरून जाताना एका sweet-shop कडे पाहून दिली होती. तिथल्या डब्यांमध्ये विविध प्रकारच्या गोळ्या ठेवलेल्या पाहून तिची प्रतिक्रिया होती की त्या candy crush saga ह्या खेळासारख्या होत्या. दोन्ही वेळेस मला हेच सांगावे लागले की ह्या दोन खेळांची संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या गोष्टींपासून निर्माण झाली आहे. असाच एक प्रसंग फेसबुक नवीन आले तेव्हा मी अनुभवला होता. तेव्हा मी कॉलेजला होतो. फेसबुकची संकल्पना मूळ अमेरिकन. तिथल्या जीवनपद्धती मुळे निर्माण झालेल्या सर्व गोष्टी ह्या माध्यमातून आपल्याला दिसतात. त्यात एक 'poke' असा पर्याय आहे. ह्याचा अर्थ बोटाने हलकेच टोचणे. म्हणजे तिथे कामानिमित्त एकमेकांपासून लांब गेलेली माणसं फेसबुक वर प्रतिसाद द्यायची थांबली तर आपण त्यांच्या प्रोफाईल वर जाउन हे poke चे बटण क्लिक करायचे. पण हीच गोष्ट आमच्या बिल्डींग मधल्या दहावीतल्या दोन पोरांनी ( एक पहिल्या आणि दुसरा दुसऱ्या मजल्यावर राहणारा) सुरु केली तेव्हा मला हसावं का रडावं हेच कळेना! शिवाय ते एकमेकांना बाहेर सागायचे देखील,
" अरे … मी तुला poke केलंय हं … घरी गेल्यावर मला परत कर"

आता जाणवतं की ही देखील त्या वेळेस नववी-दहावीतच तर होती! मग वाटलं की फेसबुकची मूळ संकल्पना ह्या मुलांना समजली आहे का? फेसबुक किंवा एकंदर सगळ्याच प्रकारचा सोशल मिडिया हा संपर्क तुटलेल्या मित्र-मैत्रिणींशी पुन्हा संपर्कात येण्याचं साधन आहे हे त्याचे भारतातले विश्लेषण झाले. पण ह्याचा मूळ हेतू 'नेटवर्किंग' हा आहे. आपल्यात ज्या विशेष आवडी-निवडी आहेत आणि ज्या कालांतराने आपल्या स्वभावात प्रवेश करतात त्या आवडी-निवडी आपल्या पारंपारिक मित्र-वर्तुळात असतीलच असं नाही. सोशल मिडिया मात्र तसे वर्तुळ जमवतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाला अधिक खुलवतो. फेसबुक हे आपण नेहमीच भेटतो त्या मित्र-मैत्रिणींबरोबर फोटो काढायची जागा नाही. फेसबुक काय WhatsApp आणि गेला बाजार 'एसएमएस' ह्या माध्यमांची सुद्धा आपण अशीच भेसळ केली! ह्या दोन्हींचा वापर रोजचे महत्वाचे संदेश पाठवणे हा आहे. त्यात आपण मोठ्ठाले निबंध पाठवून त्याचा वेगळाच उपयोग केला. मी वय वर्ष ४० आणि पुढे असलेल्या लोकांबद्दल एकवेळ समजू शकतो. कारण हे सारं त्यांच्या आयुष्यात एकदम आलं. काहींच्या तर उतारवयात! परंतु तंत्रज्ञाना बरोबर वाढणाऱ्या वयोगटाकडून असे निश्चित अपेक्षित नाही. त्यामुळे ही ऑफिस मध्ये गेल्यावर तिच्या तिथल्या मैत्रिणी बरोबर कॉफी पिताना फोटो काढून फेसबुकवर का टाकते माहिती नाही! रक्षाबंधन किंवा भाऊबीज साजरी झाल्यावर स्वतःच्या भावाला फेसबुक वर tag करायची विशेष गरज आहे का? ' मला हा दागिना खूप आवडला … त्यामुळे तू मला तो घेऊन दे' अशा एका वाक्यात हिने मला tag केलेलं! गम्मत म्हणजे तसा विषय त्या दिवसानंतर एकदाही आमच्या घरी चर्चेत आलेला नाही. मग एकदा लग्न होऊन दोन महिने झाले म्हणून एका स्टेटस मध्ये मी होतो. तोच मी बाहेर जेवायला गेलो की पण असायचो. म्हणजे तिच्या बरोबर तर असायचो पण ती फेसबुक वर एकटी पडू नये न …म्हणून तिकडे पण बरोबर असायचो! हल्ली मॉल मध्ये गेलो की मध्येच एके ठिकाणी सेल्फी साठी उभं रहावं लागतं. कधी मध्येच 'माझा फोटो काढ ना' ची फर्माइश होते आणि मग एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला ती आणि मधून जाणारी माणसं असं चित्र होतं! काही लोकं सौजन्य दाखवतात आणि फोटो होऊ देतात आणि आपल्याला आणखी खजील करतात. आणि मी विचार करू लागतो की ह्या फोटोंचे पुढे होते काय? म्हणजे एकदा असंच मॉल मध्ये काढलेल्या फोटोबद्दल मी हिला विचारलं. तर तेव्हा समजलं की तो फोटो जुन्या फोन मध्ये होता आणि आता तो फोन एकदम खराब झाल्यामुळे सापडणं कठीण आहे. मग हे फोटो काढले कशाला होते? त्याचा काही विशिष्ट अल्बम बनवला गेला का? फोटो ही एक आठवण की एक क्षणिक सोय? ह्या आणि अशा बऱ्याच प्रश्नांना मी सामोरे जात असतो. उत्तर सापडणं अवघड आहे.

परंतु एका घटनेने माझे थोडेसे मत-परिवर्तन झाले. एका पारिवारिक कार्यक्रमाला आम्ही सगळे एकत्र जमलो होतो. माझ्या लहान बहिण-भावंडांचं हिच्याशी फार छान जमतं. सर्व बऱ्यापैकी सारख्या वयाचे असल्यामुळे असेल. त्या दिवशी प्राथमिक गप्पा झाल्यावर ठरलेलं फोटो सेशन सुरु झालं. ह्यांचे बरेच फोटो काढून झाल्यावर आम्हा मोठ्या बहिण-भावांना त्यात ओढले गेले. आम्ही अगदी पहिले नाही वगेरे म्हटले तरीही शेवटी त्यात सामील झालो. मोबाईलच्या चांगल्या दर्जामुळे फोटो देखील छान येत होते. आणि तेव्हा मनात विचार आला की आपले असे फोटो किती आहेत? काही लहानपणीचे वाढदिवसाचे वगेरे, थोडेफार शाळेतले ( शाळेनेच काढून दिलेले) काही कॉलेज मधले आणि थोडेफार नवीन फोन ने काढलेले. आपण अशा बऱ्याच कार्यक्रमांना मित्र-मैत्रिणींबरोबर, बहिण-भावांबरोबर उपस्थित राहिलो आहे? पण ते क्षण आपण टिपू शकलो नाही. आपल्याकडे जुना कॅमेरा होता, रोल फिरवायला लागायचा आणि त्यावेळेस ह्या सर्व कारणांमुळे फोटोची सवय नव्हती. अगदी फार जुनी गोष्ट नाही ही. पण आता तंत्रज्ञान आहे तर असा उपयोग का करू नये? तीच गोष्ट आपल्या लहानपणीच्या फोटोंची! काही मोजके फोटो सोडले तर आपल्याकडे आपलं लहानपण उलगडणारे फोटो नाहीत. पण आज आई-वडील आपल्या मुलांची वाढ फोटोच नव्हे तर विडीयो वर देखील टिपू शकतात. आणि हे साठवलेले क्षण अगदी पंधरा वर्षानंतर पुन्हा अनुभवू शकतात. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना नावं ठेवणे किंवा त्यांच्या संबंधित प्रश्न उपस्थित करण्यात काही अर्थ नाही.

हेच विचार डोक्यात ठेवून मी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेलो. वर सांगितल्याप्रमाणे मी ई-कॉमर्स क्षेत्रात कामाला आहे. ह्या क्षेत्राची प्राथमिक ओळख म्हणजे आपण जे व्यवहार दैनंदिन आयुष्यात करतो तेच व्यवहार इंटरनेट वरून करणाऱ्या कंपन्यांचे क्षेत्र. तसं मी हॉटेल बुकिंग इंटरनेट वरून करून देणाऱ्या कंपनीत कामाला आहे. त्याच दिवशी आमच्या कंपनीत दोन मोठ्या पदांवर नियुक्ती झाली. ही दोघं म्हणजे नुकतीच कॉलेज मधून बाहेर पडलेली २३ वर्षांची मुलं! गुगल ह्या वेबसाईट वर कंपनी अगदी पहिल्या पानावर झळकावी ( आणि लोकांच्या नजरेस पडावी) ह्याची एक सोपी पद्धत त्यांनी interview मध्ये सुचवलेली होती. कंपनी मध्ये कुणालाही आजपर्यंत ह्याचा अंदाज आला नव्हता. त्यामुळे आता माझ्या बरोबरीच्या पदावर माझ्याहून ५ वर्षांनी लहान असलेली दोन मुलं दाखल झाली होती. आणि ह्याचा आम्हाला फायदाच होत गेला. ह्या मुलांकडे नवीन कल्पना भरपूर होत्या. इंटरनेट क्षेत्रात वावर आमच्यापेक्षा अधिक होता. फक्त सकाळच्या मिटिंगला मोबाईल बाजूला ठेवणं त्यांना जमत नव्हतं. कुणी दोन -तीन मिनिटं बोलायचं थांबलं की लगेच मोबाईलवर फेसबुक वगेरे बघितलं जायचं. मिटिंग मध्ये स्वस्थ बसणं जरा अवघड जायचं. इंटरनेट सर्व्हिस थोडीशी मंदावली की लगेच नापसंती व्यक्त केली जायची. पण आमच्या क्षेत्रात एकूण ह्या वयाच्या मुलांनी कंपनी सुरु केल्याची देखील उदाहरणं येत होती. भारतातले बरेच नवीन CEO हे पंचवीस वर्षांच्या जवळचे होते हे मध्ये एका अहवालात प्रसिद्ध झाले होते. म्हणजे ह्यांची कल्पनाशक्ती विसाव्या वर्षी जागृत होत गेली होती. अशी ही उदाहरणं आम्हाला देखील एक सकारात्मक आव्हान देत होती.

अशाच मन:स्थितीत मी घरी आलो. बायको किचन मध्ये चहा करत होती. तिच्या हातातून चहा चा कप घेतला आणि खिशातून मोबाईल बाहेर काढून म्हणालो,
"सेल्फी!"

जुळवून घ्यायला सुरुवात झाली होती.

- आशय गुणे :) 

Saturday, February 14, 2015

प्रयत्ने स्थळ शोधिता - भाग २

आणि दुसऱ्याच दिवशीपासून मला ह्या वेबसाईटचा मला मुलगी शोधून देण्याचा प्रयत्न लक्षात आला. मला मुलगी कोणत्या वयोगटातील अपेक्षित आहे ह्याची माहिती मी त्यांना आधीच दिली होती. त्याप्रमाणे रोज दोन इ-मेल मला येऊ लागले. एका इ-मेल मध्ये मला आठ ते नऊ मुली दिसायच्या. ह्या मुली त्यांच्यामते मला अनुरूप ( match) होत्या. अहो, एक ठीक पण नऊ मुली मला एकाच दिवशी अनुरूप कशा असतील? पण आपण आता choose from the display ह्या इंटरनेटच्या विश्वात आलो आहोत ह्याचा मला साक्षात्कार झाला. आणि असे असून सुद्धा मी त्या नऊ च्या नऊ मुली उत्सुकतेने न्याहाळू लागलो. मुलीचे फोटो इंटरनेट वर पहायची अधिकृत संधी फुकट कोण घालवेल? शिवाय हे फोटो पाहणं एका चांगल्या उद्देशासाठीच होतं की! काही दिवसांनी 'आज कुणाचा फोटो बघायला' मिळतोय अशी देखील माझी अवस्था झाली होती आणि हे नाकारण्याचे काहीच कारण नाही. ह्या व्यतिरिक्त अजून एक इ-मेल मला रोज यायचा. तो म्हणजे अमुक एक मुलगी माझी photo match आहे असे सांगणारा इ-मेल. आता मी मुलगा आणि ती मुलगी एवढा साधा-सरळ नैसर्गिक फरक असताना मी कुण्या एका मुलीचा photo match कसा होऊ शकतो हे मला कळेना! ह्या मेल मध्ये मात्र एकाच मुलीचा फोटो असायचा. थोडक्यात काय, तर मला ह्या मुलींमध्ये उत्सुकता निर्माण व्हावी आणि मी एक पाऊल पुढे टाकावं ह्या आस्थेने ते 'वेबसाईट' हे सृजनकार्य करत होतं. एक पाऊल पुढे म्हणजे 'तुम्हाला ह्या मुलीमध्ये आवड निर्माण झाली आहे का' ह्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असे द्यायचे! पण जुन्या सवयी जाता जात नाहीत. शिवाय त्या लहानपणीच्या असल्या तर नाहीच नाही! आता लहानपणापासून मुली फक्त पाहत आलो असल्यामुळे पाय जमीनीवरच घट्ट रोवलेले असायचे. त्यामुळे पुढचं पाऊल टाकण्याचा प्रश्नच नव्हता! साहजिकच इथेही तेच झाले.
शेवटी मग माझ्याकडून काहीच हालचाल होत नसल्याने त्या वेबसाईट वाल्यांनी माझी चौकशी करायला मला फोन करायला सुरुवात केली.
" सर, आम्ही पाहतोय की तुम्ही फक्त प्रोफाईल सुरु करून ठेवली आहे. परंतु तुम्ही निष्क्रिय दिसता आहात", त्यांनी विचारले.
" हो… म्हणजे नाही … मला रोज ई-मेल येतात आणि त्यात माझ्या match चा उल्लेख असतो. मी ते पाहतो", मी उत्तर दिले.
" सर, पण तेवढं करून कसं चालेल? ( ही बाई अगदी माझी समजूत काढल्यासारखी बोलत होती!) तुम्हाला जर पुढे तुमची पसंती पाठवायची असेल तर तुम्हाला त्या मुलीला इ-मेल करावे लागेल, तिला फोन करावा लागेल. ते तुम्ही कसं करणार?"
"म्हणजे?"
" सर, त्यासाठी तुम्हाला आमचा paid member व्हावे लागेल. त्याची किंमत अमुक अमुक हजार आहे…", ती अगदी गोड आवाजात सांगत होती. ह्या साऱ्या प्रकारात मी paid membership चा विचारच केला नव्हता. त्यात काही विशेष नाही म्हणा कारण पुढे देखील करणार नव्हतो! मला जवळ जवळ एक महिना विचार करायला लागेल असे मी तिला सांगितले.
" धन्यवाद सर, तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल", ती म्हणाली आणि तिने फोन ठेवला. वेळ किमती आहे हे माहिती असून सुद्धा ही मंडळी अचानक का फोन करतात काय माहिती! पण मी देखील 'सेल्स' मध्ये असल्यामुळे दुसऱ्याच्या 'टार्गेट' बद्दल आणि ते 'अचीव' करण्यासाठी केल्या जाणाऱ्या खटपटीबद्दल मला सहानुभूतीच आहे.
दोन दिवसांनंतर त्यांचा पुन्हा फोन आला. पुन्हा मला माझ्या नाकारतेपणाची जाणीव करून देण्यात आली. मी काहीच करत नाही, मुलींना अप्रोच करीत नाही, निष्क्रिय आहे, कुठल्याच मुलीने अजून मला अप्रोच केलं नाही वगेरे लडिवाळ तक्रारी त्या फोनवर बोलणाऱ्या मुलीने केल्या. आणि शेवटी ह्या सगळ्या समस्येवर एक रामबाण उपाय ( तिच्यामते) असल्याचा दावा करीत तिने मला एक नवीन 'ऑफर' ऐकवली.
" कसं आहे न सर, आम्हाला माहिती आहे तुम्ही बिझी असता, तुम्हाला वेळ नसतो…. आणि त्यामुळे न सर , आम्ही तुमच्या साठी एक खास ऑफर घेऊन आलो आहे. तुम्ही जर तीन महिन्याची आमची अमुक अमुक हजार फी भरलीत आणि त्यात अजून अमुक हजार रुपये टाकले न तर केवळ (?) एवढ्या हजारात …. एक अतिरिक्त सेवा पुरवू!" अतिरिक्त सेवा ऐक्यावर माझे लक्ष्य एकदम ती काय सांगते आहे हे ऐकण्यात गेले. कारण इतका वेळ हजाराचे आकडे ऐकू येत असल्यामुळे मी लक्षच देत नव्हतो.
" आम्ही न तुमच्यासाठी खास रिलेशनशिप ऑफिसर ठेवू. तो तुमच्याकडून जाणून घेईल की तुमची नक्की requirement काय आहे." तिचा तो requirement शब्द ऐकून ती आधी दुकानात काम करीत असणार ह्याची मला खात्री पटली आणि मी जोरात हसणं कसं-बसं आवरलं! " जेव्हा ह्या ऑफिसरला कळेल की तुम्हाला मुलीकडून काय अपेक्षा आहेत, तुमच्या आवडी-निवडी काय आहेत तेव्हा तो तुमच्यासाठी योग्य प्रोफाईल शोधेल. आणि ह्या ऑफिसर्सन खूप वर्षांचा अनुभव असतो ह्या क्षेत्रांमधला… त्यामुळे ते तुम्हाला अगदी योग्य match शोधून देतील. आणि तुम्हाला खरं सांगू का सर…. पण तुम्हाला हे नीट नाही जमणार …पण आमच्या अनुभवी ऑफिसर्सना नक्कीच जमेल! आणि इतकेच नाही… ते तुमच्या वतीने मुलीशी संपर्क साधतील आणि तुम्हाला दोघांना एकेठिकाणी भेटवतील आणि तुमच्यात संवाद सुरु करून देतील.… "
लग्न अर्थात आम्ही करायचे! कारण तेवढंच बाकी ठेवलं होतं ह्या सेवेने! भारत देशात वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगार संधी कशा उपलब्ध झाल्या आहेत ह्याचा साक्षात्कार मला तेव्हा झाला.
परंतु ह्या टेलीफोन कॉल नंतर माझे डोळे उघडले. आपण किती निष्क्रिय आहोत ह्याची जाणीव झाली. इतके निष्क्रिय की स्वतःचे लग्न लावून द्यायला देखील कुणीतरी नियुक्त करायला लागत आहे. त्या दिवशी मी निश्चय केला. आपली होणारी बायको आपणच शोधायची! कुणाचाही आधार न घेता. रोज अर्धा तास वेबसाईट वर घालवायचा, मुलींच्या प्रोफाईल चाळायच्या आणि त्यातून पसंत पडणाऱ्या मुलींना कसला ही संकोच न बाळगता डायरेक्ट पसंती कळवायची! पुढचं पुढे बघू!
त्याच दरम्यान माझ्या वयाच्या मित्र-मैत्रिणींच्या लग्नाच्या, लग्न ठरण्याच्या आधीच्या आणि एकूण ह्या प्रक्रियेच्या बऱ्याच कहाण्या कानी पडत होत्या. एका मैत्रिणीच्या लग्नासाठी बोलणी होताना तर तिच्या घरी मी स्वतः उपस्थित होतो. माझी 'बेस्ट फ्रेंड'. बऱ्याच विषयांवर आम्ही इतके वर्ष गप्पा मारलेल्या. त्यामुळे आवडी-निवडीच्या हिशोबाने एकमेकांना चांगले ओळखून. कॉलेज मध्ये असताना तर 'चिडविण्याच्या यादीत' आमचे जोडी म्हणून पहिले नाव असायचे. तर 'माझे लग्न ठरताना तू सुद्धा तिकडे हवा' ही तिची विनंती मी नाकारू शकलो नाही. प्रथमिक बोलणी झाली की मला काय वाटतंय, मुलगा कसा आहे ह्याचा रिपोर्ट मला द्यायचा होता. आणि मग ती त्यावर विचार करून घरच्यांशी बोलून निर्णय घेणार होती. त्यादिवशी सकाळी मुलाकडले आले. प्राथमिक ओळखी झाल्या. माझ्या मैत्रिणीच्या आई-वडिलांना माझे तिथे असणे काहीही गैर वाटले नव्हते तरीही 'हा हिचा मित्र' अशी ओळख झाल्यावर त्या मंडळींचा चेहरा जरासा गंभीर झाला. आणि लग्नाची बोलणी होताना जे नाट्य घडतं ते माझ्या मैत्रिणीने पार पाडलं. एका ट्रे मधून सर्वांसाठी उपमा आणि नंतर कॉफी - ' हे हिने स्वतः केलंय' असा सगळीकडून जयघोष होत असताना - ती घेऊन आली. सुरुवातीला हवामान, ट्राफिक, वेळेत पोहोचणे कसे अवघड आहे, मुंबईत आलेले परप्रांतीय लोक इथपासून 'केंद्रात सरकार कसे काम करत नाही' ( 'अच्छे दिन' यायचे होते तेव्हा!) ह्या मध्यमवर्गातील आवडत्या विषयांवर मुला-मुलीकडल्या बापांनी बोलून घेतले. दोन्हीकडच्या आई 'हो ना', 'खरंय' ह्या पलीकडे बोलत नव्हत्या. माझी मैत्रीण आणि तिचा होणारा नवरा गप्प होते. मग हिच्या वडिलांनी प्रश्न केला. वास्तविक त्यांना माहिती होते तरी विचारले.
" काय करता तुम्ही?" ह्या अशा प्रसंगात मुलीचे वडील मुलाला 'अहो' वगेरे म्हणतात आणि मुलीचा उल्लेख मात्र 'अगं' असा होतो. हे मी ऐकले होते पण आज अनुभवत होतो. मुलगा अपेक्षेप्रमाणे एका आय. टी कंपनीत कामाला होता. ह्या त्याच्या उत्तराला माझ्या मैत्रिणीच्या आजोबांपासून सर्वांनी 'वा' असा प्रतिसाद दिला. " हल्ली काय आय.टी खूप जोरात आहे", असे दहा वर्षापूर्वीचे वाक्य सुद्धा ते आजोबा बोलून गेले. आणि सगळीकडे प्रस्सनता पसरली. आणि काही मिनिटात काहीसा संकोच ठेवून मुलीच्या वडिलांनी प्रश्न विचारला. " फॉरेनला जाता … म्हणजे पाठवू शकतात … बरोबर ना? आय. टी मध्ये?"
हा प्रश्न ऐकल्यावर मुलाच्या बापाची कळी खुलली! आणि पुढे होकारार्थी उत्तर देऊन विषय परदेशातल्या 'सुख समाविष्ट' जीवनाकडे कधी गेला हे आम्हालाच कळलं नाही. शेवटी विषय संपला तो मुलाच्या बापाच्या वाक्याने. " आम्हाला मुलगी पसंत आहे. काय ते तारखेचं नक्की करूया!"
" हो … हो … नक्की करूया! माझ्यामते वर्षाखेरीस करू! काय गं?" त्यांनी माझ्या मैत्रिणीला प्रश्न विचारला. मी पाहत होतो. ती एकदम भानावर आली. ह्या अशा प्रसंगी नाही किंवा बघुया असं म्हणणं तिला परंपरेने वर्ज्य ठरवलं होतं. ती आता न्यु-यॉर्क ला राहते. रोज मला candy crush किंवा तत्सम 'फेसबुकी' खेळांच्या रिक़्वेस्ट पाठवत असते! त्या दिवशी गप्पं असलेला तिचा नवरा तिकडे कामात गुंतलेला असतो. आपल्याला तिकडे नियमानुसार नोकरी करता येत नाही हे तिला आणि तिच्या परिवाराला माहितीच नव्हते.
पण काही वेळेस वेगळा प्रसंग देखील घडत होता. कॉलेज मध्ये प्रेमात पडलेले माझे काही मित्र वास्तवाच्या चटक्याने भानावर येत होते. माझ्या एका मित्राचे कॉलेज मध्ये त्याच्याच वर्गातील एका मुलीशी अफेयर सुरु झाले. दोघांची गाडी रुळावरून अगदी डोलत डोलत चालली होती. अगदी दोघांनी एकाच कंपनीत नोकरी पत्करली. साऱ्या कंपनीत ह्यांचे लग्न होणार आहे हे माहिती होतं. कॉलेज पासून 'पुढचा विचार' करणं आता कंपनीत असताना सुद्धा सुरु झालं होतं. अर्थात अधिक व्यापक पद्धतीने! त्याच वेळेस मुलीला कंपनीने काही आठवड्यांसाठी युरोपला पाठवले. काही महत्वाचे काम होते. एयरपोर्ट वर आनंदाने सोडायला गेलेल्या लोकांमध्ये मी देखील होतो. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आणि ती निघून गेली. दोघांच्या ही घरी माहिती होतं आणि त्यामुळे दोघांचे आई-वडिल हे आनंदाने पाहत होते. पण ती तिथे असताना तिला काय झाले कोणास ठाऊक! कदाचित तिथल्या दृष्टीस येणाऱ्या श्रीमंतीला भुलून तिने परत आल्यावर त्याच्या पगाराची चौकशी करायला सुरुवात केली. हीच चौकशी तिच्या आई वडिलांकडून सुद्धा येऊ लागली आणि त्यामुळे त्याला अधिक व्यापक स्वरूप निर्माण झाले. एरवी तिच्याशी बोलताना सुद्धा 'युरोप' हा विषय तिच्याकडून अधिक येऊ लागला. आणि शेवटी ती लग्न करू शकणार नाही असाच निर्णय तिने जाहीर केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा निर्णय सांगायच्या एका आठवड्या नंतरच तिच्यासाठी स्थळ आलं आणि तिने ते पसंत देखील केलं. ती आता लंडनला असते. आमच्याशी विशेष संपर्क नाही. मित्राची अवस्था पहिले काही महिने फार बिकट होती. पण एकूण इतक्या लगेच तिच्याकडे स्थळ सुद्धा चालून आलं ह्याचा अर्थ 'लग्न' ह्या नाटकाची सूत्र किती आधीपासून कुणीतरी सांभाळत होतं हेच दिसून आलं.
ह्या व्यतिरिक्त स्वतःच्या गर्लफ्रेंड ना सांभाळतानाचे 'वास्तव' आता काही मित्र स्वतःहून सांगत होते. ते वास्तव त्यांना पटू लागले होते असं म्हणूया हवं तर. कॉलेज मध्ये असताना ज्या प्रश्नांचा विचार देखील केला नव्हता ते प्रश्न आता एकदम विचारले जाऊ लागले. बहुतांश गर्लफ्रेंड्स ह्या दिवसातून तीन वेळेस तरी पगार ह्या विषयावर घसरायच्या. कुणाच्या गर्लफ्रेंड्स मॉल मध्ये लटकणाऱ्या महागड्या ड्रेस कडे बोट दाखवायचे. कधी कधी हेच बोट दुसऱ्या मुलींकडे अर्थात त्यांनी घातलेल्या ड्रेसकडे जायचे. अशा वेळेस त्या मुलीकडे अधिकृत रित्या पाहणे माझे मित्र सोडत नसणार ह्याची मला खात्री आहे. परंतु 'हे मला कधी घेऊन देणार' वगेरे ऐकल्यावर त्यांना मानसिक त्रास नक्कीच होत होता. कधी कधी तर 'तुला त्याच्या एवढा पगार कधी मिळणार' वगेरे विचारल्यावर त्यांचे डोकेच फिरायचे. मग त्यांची भांडणं. हे सारे मग माझ्या कानावर यायचे. मग ह्या प्रश्नांवरून चर्चा पाच वर्ष पुढे काय, दहा वर्ष पुढे काय इकडे जायची. त्यातून फ़्रसट्रेट होऊन काही मित्रांनी टपरीवाल्यांना चांगले दिवस देखील आणले होते.
अशी ही पार्श्वभूमी होती जेव्हा मला ह्या वेबसाईट वाल्यांचा फोन येत होता. एकंदर 'प्रेम विवाह', 'गर्लफ्रेंड' वगेरेचे ( काही लोकांचे) कटू सत्य समजत होते. शिवाय उद्या आपण एखादं स्थळ चालून आलं म्हणून लग्न केलंच आणि पुढे हे असे अनुभव मला आले तर? हा विचार सुद्धा डोक्यात होता. त्यामुळे आता आपण स्वतः शोध घ्यायचाच हे मी ठरविले!
तसं पहिले काही दिवस अगदीच विचित्र वाटलं. समोर फोटो दिसतायत. त्यानंतर 'स्व' बद्दल लिहिलेला तो मजकुर वाचायचा. पण ही व्यक्ती आपली बायको होणार अशा प्रकारचा विचार एकदम कसा करायचा? पण काही दिवस गेले आणि मी अशा अर्थाने विचार करायला सज्ज झालो. आणि तेव्हा मला 'मुलगी' ह्या रहस्याचे बरेच पैलू अनुभवायची संधी मिळाली.
आता मी स्त्रियांच्या किंवा मुलींच्या विरोधात वगेरे लिहितो आहे असे समजण्याचे काही कारण नाही. बऱ्याच मुलींना खाली लिहिणार आहे तसे अनेक अनुभव मुलांबद्दल देखील आले असतील. आणि मी मुली ( आणि अर्थात मुलीच!) बघत असल्यामुळे मला त्यांच्याच प्रोफाईल दिसणार.
ह्या मुलींच्या प्रोफाईल चाळल्या की मला नेहमी एक प्रश्न पडत आलेला आहे. बऱ्याच मुलींनी आपल्याला इथे योग्य स्थळप्राप्ती होणार नाही हे आधीच मनात ठेवलेलं असतं काय? कारण तसं नसतं तर त्यांनी प्रोफाईल मध्ये सर्वात लक्षवेधक गोष्ट - अर्थात फोटो - नीट आणि आपण लग्नासाठी इथे आलो आहोत अशा थाटात तरी लावला असता! काही मुलींचा फोटो हा तिरका का लावलेला असतो माहिती नाही. काहींचा आपण त्यांच्याकडे बघू तर त्या कुठे तरी दुसरीकडे बघत असतात आणि आपल्याला त्यांच्या चेहऱ्यातला केवळ गाल आणि कान दिसो असा फोटो असतो. काही मुली फोटोत सुद्धा फोनवर बोलत असतात तर काही दूर एका खांबाला टेकून उभ्या असतात. काहीच्या फोटो मागे समुद्राच्या उंच उडणाऱ्या लाटा तर काहींच्या फोटो मागे घनदाट जंगल! ( असे फोटो पाहिल्यावर त्या काय करतात वगेरे बघायचे धाडसच झाले नाही माझे!) काही मुली तर फोटो म्हणजे कपाळ ते हनुवटी एवढाच भाग आला पाहिजे ह्या समजुतीने वेबसाईट वर येतात तर काही मुली स्वतःबद्दलचे रहस्य टिकवून ठेवायच्या प्रयत्नात असतात आणि त्यामुळे फोटोच लावत नाहीत. त्यांच्या फोटोवर लिहिलेलं असतं - not visible without permission. ( लग्नानंतर सगळ्या गोष्टींसाठी बायकोची परवानगी घ्यावी लागते ह्या गोष्टीची सुरुवात ह्या मुली लग्नाआधीच करीत असव्यात!) टेडी बेअर मांडीवर घेऊन बसलेल्या मुलींचे फोटो पाहिले तर बालविवाह आपल्याकडे अजून वैध आहे की काय असाच मला प्रश्न पडत आलेला आहे.
जी गत फोटोंची तीच गत स्वतःबद्दल लिहायच्या जागेबद्दलची! अर्थात 'about me' ची. ह्या जागेवर लिहिताना बऱ्याच मुलींना 'लग्ना संबंधितच माहिती लिहा' असे बजावले पाहिजे असे मला राहून राहून वाटते. शिवाय ह्याच जागी त्या त्यांच्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत हे देखील लिहित असतात. त्यामुळे आमच्यासाठी ही जागा अतिशय महत्वाची ठरते.
ह्या जागेत लिहिण्याची बहुतांश मुलींची पद्धत ही एकसारखी आढळलेली आहे. सर्वप्रथम काही ठरलेल्या विशेषणांनी स्वतःचे वर्णन आटपायचे आणि थेट गाडी 'माझे मित्र-मैत्रिणी माझ्याबद्दल काय म्हणतात' इथे न्यायची! हे म्हणजे आपण नोकरीचा अर्ज करताना काही लोकांचे 'रेफरन्स' चिकटवतो तसे हे अनामिक रेफरन्स! बरं ही विशेषणं इतकी वैश्विक का असावीत ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही. उदाहरणार्थ, आमची राणी फार साधी, निरागस मुलगी आहे. ती दिसायला चांगली आहे, तिचे मन छान आहे आणि ती एक 'ग्रेट ह्युमन बिंग' आहे. ( हे आणि पुढची सारी उदाहरणं मूळ इंग्रजीतून भाषांतरीत आहेत!)
दुसरीकडे एकीने लिहिलं होतं की मी 'हैप्पी गो लकी' आहे, ' and I am full of life' आणि मला असा मुलगा अपेक्षित आहे जो मला मी आहे तशी स्वीकारेल(!) एका मुलीने लिहिले होते की ती 'simple living high thinking' ह्या तत्वाने आयुष्य जगते आणि तिला असे लोक आवडतात जी पाठीमागे न बोलता सरळ तोंडावर बोलून मोकळी होतात आणि मला असा मुलगा हवा आहे जो माझ्यासारखा fun loving असेल!
(मला हा fun loving शब्द काय असतो माहिती नाही. fun म्हणजेच मजा ही सर्वांना आवडतेच की! त्यामुळे मुद्दाम 'मी fun loving' आहे असं वेगळं लिहायची काय गरज आहे? किंबहुना, 'fun hating' व्यक्ती जगात चुकून सुद्धा अस्तित्वात असेल असं मला वाटत नाही! )
'Down to Earth' अर्थात पाय जमिनीवर असणे हा देखील मुलींचा स्वतःबद्दल सांगायचा आवडता गुण आहे. एका केस मागे सारीत फोटो असलेल्या मुलीने ती easy going आहे असे स्वतःबद्दल लिहून ठेवले होते. म्हणजे काय कुणाला माहिती! मला हे समजले नाही की मी माझ्या सारख्या सामान्य आणि गुण-दोष असलेल्या मुलींना शोधायला ह्या वेबसाईट वर आलो की भोवतीचे जग जिंकून वैश्विक रूप धारण केलेल्या स्त्री-संतांना? बर, ह्या गुणांचा नेमका लग्नाशी कसा संबंध जोडायचा? म्हणजे एखादी मुलगी down to earth आहे हे वयाच्या चोवीसाव्या वर्षी कसे काय सिद्ध झाले? तसे होण्यासाठी असे काय अनुभव घेतले ह्या मुलींनी देव जाणे!
काही मुली स्वतःबद्दल लिहिताना एक विशिष्ट विरोधाभास घेऊन येतात. ह्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे ' मी एक liberal मुलगी आहे आणि मला traditional गोष्टी आवडतात. किंवा माझा परिवार हा liberal with traditional views असा आहे. ह्या संभ्रमित आणि वैश्विक गुणांमुळे भारावून गेलेल्या अवस्थेत आपण नंतरच्या कॉलम्स मध्ये प्रवेश करतो. कौटुंबिक पार्श्वभूमी, आवडी-निवडी, नक्षत्रांच्या संबंधित माहिती, शिक्षण आणि आवडी-निवडी वगेरे माहिती झाली की आपण शेवटच्या कॉलम पर्यंत येउन पोहोचतो - मुलाकडून अपेक्षा!!
मानसिक दृष्ट्या सक्षम असाल तरच पुढे वाचा - अशी सूचना ह्या वेबसाईट वाल्यांनी आम्हा मुलांना हे वाचायच्या आधी दिली पाहिजे! तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या पदावर असाल, चांगली नोकरी करत असाल, चांगला पगार असेल, बॉसने स्तुती केली असेल तरीही एकदा हा कॉलम वाचलात की आपण आयुष्यात काहीच करू शाकेलेलो नाही अशी भावना मनात येईल! इथे सुरुवातीला जात, शिक्षण, वय, उंची, गोत्र, शिक्षण ह्या गोष्टी आपण सहज रित्या पार करतो. पण जेव्हा विषय येतो वार्षिक उत्पन्नाचा तेव्हा आपण गप गुमान त्या प्रोफाईल मधून बाहेर पडून दुसऱ्या प्रोफाईल मध्ये शिरतो. बहुतांश मुलींनी मुलाकडून अपेक्षित वार्षिक उत्पन्न हे १० लाखाच्या खाली लिहिलेले नसते. काहींनी ते अगदी वीस लाखापर्यंत नेउन ठेवलेले असते. बरं, ह्या मुलींच्या यादीत ज्या मुलींचा पगार तेवढा असतो त्यांनी ही अपेक्षा केली तर मला त्याचं काही नवल वाटणार नाही. परंतु वार्षिक उत्पन्न दोन लाख देखील नसलेल्या मुली जेव्हा वीस लाखाच्या अपेक्षा ठणकावून सांगू लागतात तेव्हा हुंडा ही परंपरा उलट्या बाजूने सुरु झाली की काय असा प्रश्न मनात उपस्थित होतो! मी एक प्रोफाईल पहिली होती. त्यात मुलीने वार्षिक उत्पन्नाची अपेक्षा किमान ४ लाख/वर्ष ते कमाल २० लाख/वर्ष एवढी ठेवली होती. परिस्थितीशी जुळवून घेण्याची काय ती विलक्षण क्षमता! ही मुलगी चार लाख प्रति वर्ष चे आयुष्य जगू शकत होती आणि वीस लाख प्रती वर्षाचे सुद्धा! ह्या अशा मुली शक्यतो आय.टी कंपनीत नोकरी करणाऱ्या मुलांवर नजर ठेवून असाव्यात. कारण बाहेरच्या देशातून पैसे येत असल्यामुळे का होईना, पण एवढा पगार तेच घेऊ शकतात. भारतीय कंपनीत, जिथे बहुतांश भारतीय मुलं काम करतात, पगाराचा हा आकडा गाठायला बरीच बढती गाठावी लागते. पुण्यात बऱ्याच मुली अशाप्रकारचे अप्रत्यक्ष इशारे त्यांची प्रोफ़ाइल वाचणाऱ्या मुलांना देत असतात. स्थायिक होण्याचे ठिकाण 'पुणे किंवा अमेरिका' (!) असे आढळले की आपण ह्या अप्रत्यक्ष इशाऱ्याला समजून जायचे! ह्या संदर्भातील एक 'भयंकर' अपेक्षांची मागणी करणारी परंतु तेवढीच संभ्रमात असलेली प्रोफाईल माझ्या नजरेत आली आणि आपण ह्या साऱ्या प्रकाराकडे विनोदाच्या दृष्टीने देखील पाहू शकतो अशी प्रेरणा मला देऊन गेली.
आम्ही आमच्या बहिणीसाठी एक स्थळ शोधतोय. मी अमेरिकेत राहते आणि माझी चुलत बहिण फ्रान्सला राहते. सुदैवाने आम्ही दोघी पी.एच.डी झालेल्या मुलांशी विवाहबद्ध आहोत. त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की आम्ही एका उच्चशिक्षित मुलाची अपेक्षा करतो आहोत. परंतु ही आमची अट नाही. आम्ही देशाबाहेर राहणाऱ्या मुलाची अपेक्षा करतो आहोत. परंतु ही आमची अट नाही. आम्ही मध्य महाराष्ट्रातल्या एका प्रतिष्ठित आणि लिबरल परिवारातील मुली आहोत. त्यामुळे आम्हाला आमच्याच पोट-जातीतील मुलगा अपेक्षित आहे. त्यामुळे इतर सदस्यांनी इथे पसंती दर्शवू नये! धन्यवाद! आणि ह्या मागण्यांवर शिक्कामोर्तब करीत त्यांनी प्रत्येक देशातील चलनाची आकडेवारी देत पगाराची मागणी केली होती. त्यांना पंधरा ते वीस लाख प्रति वर्ष भारतीय रुपये, चाळीस हजार ते एक लाख इंग्लंडचे पौंड, दोन लाख चाळीस हजार ते तीन लाख सत्तर हजार प्रति वर्ष अरबी दिनार, ऐंशी हजार ते दीड लाख ऑस्ट्रेलिया डॉलर आणि ऐंशी हजार ते दीड लाख अमेरिकन डॉलर ह्यांच्यापैकी कोणतीही 'परिस्थिती' मान्य होती. आणि शेवटचे गणित होते पन्नास लाख ते एक करोड प्रति वर्ष ह्या चलनाचे. चलन होते 'PKR'. गुगल सर्च केल्यावर अर्थ उलगडला - पाकिस्तानी रुपये!!! म्हणजे ह्या मुलीची पाकिस्तानला जायची पण तयारी होती! परंतु पुणे सोडून मुंबई किंवा नागपूरला जायची तयारी नव्हती.
पुढे काही दिवसांनी मला काही पसंती दर्शविणारे प्रस्ताव आले. वरील त्रुटी नसलेल्या देखील काही प्रोफाईल होत्या. स्वतःबद्दल वस्तुस्थिती दर्शविणाऱ्या, मतं व्यवस्थित मांडणाऱ्या आणि स्पष्ट, योग्य अपेक्षा सांगणाऱ्या ह्या प्रोफाईल्स होत्या. त्यामुळे मी काहींना पसंती पाठवली. आणि ही प्रक्रिया सुरु झाली. परंतु कधी मी प्रस्ताव नाकारायचो तर कधी तिकडून नकार यायचा. ह्याची बरीच कारणं होती अर्थात. कधी कोणत्या मुलीला तिच्या नोकरीमुळे मुंबईत येणे शक्य नसायचे तर कधी लग्न लवकर करायचे कारण असायचे जे अर्थात मला नको होते. आणि एके दिवशी एक प्रस्ताव चालून आला. मुंबईचीच मुलगी होती. रसिका नावाची. स्वतःबद्दलचा मजकूर नीट लिहिलेला, स्पष्ट मतं मांडलेली आणि अपेक्षा बऱ्यापैकी नोंदवलेल्या. प्रोफाईल वाचून माझे प्राथमिक समाधान झाले आणि मी पसंती परतवून भेटण्याचे निश्चित केले.
वाशीचा इनओर्बिट मॉल हे भेटण्याचे ठिकाण ठरले. आम्ही एकमेकांचे नंबर घेतले होतेच. तिची नोकरी ही वाशीत असल्यामुळे आणि मला देखील ते शक्य असल्यामुळे आम्ही भेटायचे ठरवले. वॉट्सएप वर आधी थोडे बोलणे झाले होते. परंतु तेव्हा आपण एका अशा मुलीशी बोलतो आहोत जी आपली कदाचित बायको होऊ शकेल ह्यावर विचार करणे जड जात होते. संध्याकाळी साडे सहाला आम्ही तिथल्या कॉफी शॉप मध्ये कॉफी मागविली आणि गप्पा सुरु केल्या. काय करतेस, कसा होता आजचा दिवस, निघायला उशीर होणे, बॉस चांगला/वाईट, घरी जायला उशीर वगेरे विषय हाताळले गेले. हे विषय बोलताना असे अजिबात वाटत नव्हते की दोन अनोळखी लोक पहिल्यांदा बोलत आहेत. नेहमीचंच कुणीतरी बोलतंय असं वाटत होतं. परंतु मध्येच असे जाणवायचे की आपण इथे ह्या मुलीशी लग्नासाठी बोलायला म्हणून आलो आहोत आणि ही कदाचित आपली बायको होऊ शकेल. तेव्हा मात्र तो विचार झटकून टाकावासा वाटायचा! शेवटी मी स्वतः विषय सुरु केला. नाहीतर गप्पांची गाडी थांबलीच नसती.
" मग…. लग्नाबद्दल तुझे काय विचार आहेत? तू ह्या कल्पनेकडे कशी बघतेस?"
मला वाटत नाही माझा प्रश्न फार अवघड होता. परंतु तिच्याकडे काही विशेष उत्तर नव्हते ह्या प्रश्नाचे. म्हणून तो प्रश्न माझ्याकडे परतवला गेला.
" मला वाटतं माझ्या बायकोने मला कॉमप्लीमेंट करायला हवे …माझ्यावर अवलंबून राहिलेले मला आवडणार नाही. आणि त्यासाठी मला तिला आणि तिला मला व्यवस्थित जाणून घेणे आवश्यक आहे. सो, मला असं वाटतं की कॉफी शॉप मध्ये भेटून काही होणार नाही. रोज थोड्या गप्पा झाल्या पाहिजेत, दिवसभराच्या गोष्टी शेअर करून बघायला हव्या… बाहेर थोडे एकत्र फिरले पाहिजे …आणि मुव्हीला जाणे वगेरे सोशल इव्हेंट्स सुद्धा एकत्र पार पाडले पाहिजेत. तरच आपण एकमेकांना नीट ओळखू शकू. माझा डेटिंग ह्या कंसेप्ट वर विश्वास आहे … अर्थात … आपण त्याचा फार चुकीचा अर्थ घेतो!"
मी 'चुकीचा अर्थ घेतो' एवढं म्हणेपर्यंत तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव माझ्या नजरेत पडले. तिचा चेहरा गंभीर झाला आणि शांत शब्दात ती म्हणाली,
" मला नाही वाटत माझ्या आई-वडिलांना हे पटेल!"
"पण तुला?" हा माझा प्रश्न पूर्ण होईपर्यंत ती टेबलवरून उठून निघून गेली होती. एकूण चमत्कारिक प्रसंग होता हा. माझ्याकडून काही अपशब्द बोलला गेला का, काही गैरवर्तन झाले का ह्याची मी उजळणी केली आणि तसं काही घडल्याचे माझ्या आठवण्यात आले नाही. आणि पुन्हा मी एक नवा शोध घेण्यास प्रारंभ केला.
असेच काही दिवस गेले आणि पूर्वा नावाची एक मुलगी मी पाहत असलेल्या यादीत आली. आवडी-निवडी माझ्याशी जुळणाऱ्या होत्या. काही प्रमाणात विचार आणि एकंदर स्वतःबद्दल आत्मविश्वासाने लिहिलेला मजकूर. ह्या वेळेस भेटण्याचे ठिकाण होते दादर. दादरच्या प्रीतम हॉटेल जवळ असलेल्या एका कॉफी शॉप मध्ये मी आणि पूर्वा भेटलो. आता मात्र मी थोडा सरावलेलो होतो. विषयाला कसे यायचे माहिती झाले होते. सुरुवातीची प्रस्तावना नेमकी किती वेळ सुरु ठेवायची हे मला आता माहिती झाले होते. बोलण्यात असे आले की पूर्वा ही एक फ्रीलान्स चित्रकार होती. नोकरी करता करता छोटे मोठे प्रोजेक्ट्स हाती घ्यायची. लग्न झाल्यावर काही दिवसांनंतर ती नोकरी सोडून केवळ ह्या क्षेत्रात काम करणार होती. मला हा आत्मविश्वास भावला आणि त्याला माझी काहीच हरकत नसणार होती. बोलता बोलता मी देखील माझ्या आवडी-निवडी सांगितल्या. नोकरीतील बऱ्यापैकी वर्ष पार पडल्यानंतर मला लेखक म्हणून काम करायचे होते. अर्थात ही गोष्ट काय पाच वर्षात होणार नव्हती. चांगली सेटलमेंट आल्यावरच होणार होती. अगदी मुद्द्याला धरून चांगले बोलणे झाले आमचे आणि आम्ही पुढे भेटायचे ठरविले. मनात मिश्र भाव ठेवून मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी माझ्या मोबाईल मध्ये मेसेज झळकला.
' मला वाटत नाही आपलं जमेल. मला एक वेल सेटल्ड मुलगा हवा आहे. तो जर वेल सेटल्ड असेल तरच मी माझ्या योजना पुढे नेऊ शकते. तुला पुढे नोकरी सोडायची आहे असे तू सांगितल्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतो आहे. धन्यवाद!'
इतक्या लवकर विचार बदलला! प्रभावित करणारे घरचेच असणार असं म्हणायला खूप जागा होती. एकूण काय, मुलाने स्वतःच्या आवडी-निवडींचा विचार करू नये. त्याने फक्त कमवावे. असो.
मी आता अशा एका पातळीवर होतो जिथे मला प्रोफाईल वरून मुली सापडत होत्या. परंतु वाटाघाटीत गाडी अडत होती. काही मुलींचे म्हणणे होते की पहिल्याच बोलण्यात घरच्यांना समाविष्ट करायचे जे मला अजिबात मान्य नव्हते तर काहींना माझे घरी न सांगून परस्पर स्वतः निर्णय घेऊन मुलींना भेटणे मान्य नव्हते. काहींचे सारे निर्णय 'घरचेच घेतात' ह्या स्वरूपाचे होते आणि त्या 'फक्त भेटून घे' असं घरच्यांनी सांगितलं ह्या सदरात मोडत होत्या. फक्त भेटून ये म्हणजे काय? लग्न गृहीत धरलं आहे असा अर्थ काढायचा का? काही मुलींचे वडील भेटायच्या दिवशी सकाळपासून reminder calls द्यायचे आणि मुलीशी बोलायला निर्माण केलेला माहोल उध्वस्थ करायचे. माझे विचार स्पष्ट होते. हा निर्णय आयुष्यातील सर्वात महत्वाच्या निर्णयांच्या सदराची सुरुवात आहे. इथून पुढे सारे निर्णय जर मिळून घ्यायचे असतील तर ह्या निर्णयात घरच्यांचा प्रभाव सुरुवातीलाच का आणायचा? आपल्या क्षमतेनुसार, आकलनानुसार हा निर्णय आपण नक्कीच घेऊ शकतो. पुढे घरच्यांशी बोलायचे आहेच. त्यांना अंधारात ठेवा असे मला मुळीच म्हणायचे नव्हते. परंतु ही गोष्ट बऱ्याच मुलींना पटणारी नव्हती. कदाचित आपल्याकडे मुलींना 'तुझे डोके कुणाच्या तरी खांद्यावर ठेवायचे आहे' ह्याच प्रकारचे धडे दिले जातात म्हणून असे होत असेल. तुमची देखील ,मान ताठ असू शकते ही शिकवण फार कमी मुलींना मिळते. दुसरी मला जाणवलेली गोष्ट म्हणजे मुलाचा पगार हा मुलीपेक्षा जास्त (च) पाहिजे हा हट्ट मुलीकडले अधिक करतात. बऱ्याच मुलींची देखील हीच समजूत असते. जी गोष्ट पगाराची तीच गोष्ट डिग्रीची!
मी ह्या साऱ्या गोष्टी फार शिथिल ठेवल्या होत्या. माझ्या बायकोचा पगार जास्त असेल तर मला त्रास होणार नव्हता, तिची डिग्री जास्त असेल तरीही नव्हता. परंतु माझे हेच विचार माझी गाडी मात्र अडवत होते कारण ते पलीकडल्या व्यक्तीला पटणारे नसायचे.
आणि काही दिवसांनी एक अनपेक्षित घटना माझ्या आयुष्यात घडली. मुंबईच्या 'एन.सी.पी.ए' ला एक प्रायोगिक नाटक बघायचा योग आला. एक मुलगी माझ्या शेजारी येउन बसली. मी 'लहरी महंमद' असल्यामुळे बहुतेक वेळेस नाटक, गाणं वगेरे अनुभवायला एकटा जात असतो. त्या वेळेस झाले असे की शेजारी बसलेली मुलगी देखील एकटीच आली होती. एकमेकांकडे पाहून अस्तित्वाची दाखल घेण्यापलीकडे प्रथम काहीच झाले नाही. परंतु नंतर दाद देताना आम्हाला एकमेकांची साथ मिळाली. श्रोत्यांकडून वारंवार होणारा खोकण्याचा आवाज, गंभीर विधानाच्या वेळेस देखील हसणे, क्षुल्लक गोष्टींना टाळ्या वाजवणे आणि मध्ये मध्ये बोलणे ह्या गोष्टींकडे आम्ही मिळून नाक मुरडले. नाटक झाल्यावर आमचे थोडे बोलणे झाले, काही प्रमाणात थट्टा-मस्करी झाली आणि एकमेकांना 'बाय' म्हणून आम्ही निघालो. मी बससाठी उभा राहिलो. थोड्या वेळाने पाहतो तर ती त्याच बससाठी आली. त्या दिवशी ती यायच्या आधी माझी बस आली असती तर हा दिवस बघायला मिळाला नसता! पुन्हा बोलणे झाले आणि असे कळले की ती नवी मुंबईतच राहते आणि त्यामुळे सोबतच जायचे ठरले. बऱ्यापैकी रात्र झाली होती म्हणून ती लेडीज मध्ये न जाता माझ्याबरोबर आली. आणि त्या रात्री ट्रेन नवी मुंबईत शिरेपर्यंत आम्ही आमची आयुष्य उलगडायचा प्रयत्न केला. नंतर अनेक नाटकांना आम्ही एकत्र गेलो. येता-जाता गप्पा मारल्या. त्या निमित्ताने एकत्र जेवलो. कुणीही काहीही ठरविले नव्हते. जे घडत होते ते सारे अनपेक्षित होते. परंतु कुणीतरी ठरविल्यासारखे! मुली पाहताना मनाशी ठरविलेला माझा 'फ्लो' आपोआप 'फॉलो' केला जात होता. आमच्या सर्व आवडी-निवडी सारख्या नव्हत्या! आमचे विचार देखील बऱ्याच बाबतीत भिन्न होते. चर्चा तर कधीच एकमताने संपायच्या नाहीत. परंतु कुठे तरी काहीतरी 'क्लिक' होत होते. निदान असे जाणवत तरी होते. जवळ जवळ वर्ष - दीड वर्ष ह्या स्थितीतील आनंद लुटल्यानंतर एका संध्याकाळी नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर 'मरीन लाइन्स'ला समुद्र किनारी तिने मला विचारले - औपचारिकता म्हणून! मी देखील हो म्हटले - औपचारिकता म्हणून!
स्थळ शोधण्याचा प्रयत्न सफल झाला होता. परंतु काही विशेष प्रयत्न न करता. स्वतःहूनच!
- आशय गुणे स्मित

Sunday, July 27, 2014

प्रयत्ने स्थळ शोधिता… - भाग १

 
" माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलं आहे. मुलगा अमेरिकेचा आहे आणि लवकरच मी देखील 'फ्लाय' करणार आहे", ती मला म्हणाली.  हे ऐकताना मी माझा चेहरा शक्य तितका स्थिर ठेवायचा प्रयत्न करीत होतो हे मला जाणवत होते. त्यामुळे बहुतेक वाक्य माझ्या कानीच पडत नव्हती. परंतु जे ऐकायचे ते ऐकले. हिचे लग्न ठरले होते आणि आता माझ्या पुढे पर्याय उरले नव्हते. त्यामुळे आता पुढचे पाउल कुठे आणि कसे टाकायचे ह्याचा विचार करावा लागणार होता. ऑफिस ह्या क्षेत्रा पुरते सारे पर्याय संपुष्टात. आणि आता पर्यायच हवे असतील तर नोकरी बदलायला लागणार होती. पण मी इथे रुजू होऊन वर्ष पण झाले नव्हते. त्यामुळे नौकरी आणि छोकरी ह्या दोन्हींमध्ये पर्यायांचा 'डेड एन्ड' आला होता.
तसा मी लहानपणापासून ( म्हणजे शाळेत नववी-दहावी पासून) 'ट्राय कर' विभागात कार्यरत आहे. ह्या विभागात काम करणारी मुलं सतत 'मुली' ह्या विषयावर म्हटलं तर 'ट्राय' अर्थात प्रयत्न करीत असतात. पण नेमके होते असे की जी मुलं काहीही ट्राय करायच्या भानगडीत पडत नाहीत तेच शेवटी बक्षीस घेण्यास पात्र ठरतात. परंतु आम्ही आमची पद्धत काही बदलत नाही आणि त्याच सनातनी स्वभावामुळे शाळा ते कॉलेज, कॉलेज ते सिनियर कॉलेज, तिथून पुढे नोकरी आणि मग दुसरी नोकरी असे करत सारे पर्याय संपवतो. तोपर्यंत इतर मुलांची 'प्रथमा', 'द्वितीय' वगेरे अनुभवांची परीक्षा देऊन झालेली असते.
असो, तर पर्याय संपलेल्या अवस्थेत काही दिवस गेले. घरून देखील आता थोडे अप्रत्यक्ष इशारे येऊ लागले होते. परिस्थिती बदलली होती म्हणा. आता मी घरी आईला, " मी मुली बघतो आहे", हे सांगू शकत होतो. काही वर्षांपूर्वी कॉलेजला असताना हे वाक्य बोललो असतो तर  भुवया उंचावल्या गेल्या असत्या.
पण आता अचानक हे सारे अधिकृत झाले होते. आणि त्यामुळे मी 'समाजमान्य' पद्धतीने मुली शोधायला सुरुवात केली. थोडी तांत्रिक प्रगती झाल्यामुळे समाजाला इंटरनेट वापर सुदैवाने मंजूर आहे. आणि अशाप्रकारे सुरुवात झाली माझ्या मुली बघण्याच्या मोहिमेला…

 आता सुरुवात इंटरनेट वरून करायची ठरलेली. ह्याचे मुख्य कारण नातेवाईक! एकदा घरी कसलंस कार्य होतं. मी झब्बा घालून हॉल मध्ये आलो आणि एक अतिउत्साहित आजी म्हणाली, " वा वा … आता आम्ही बघायला सुरुवात करायला हवी!" मी त्या दिवशी पासून नातेवाईक मंडळींकडून चार काय चांगले चौसष्ठ हात लांब आहे!
…. जाता जाता सांगतो, माझे वय त्यावेळेस १९ होते.

त्यानंतर जवळ जवळ प्रत्येक सामाजिक प्रसंगात मी कुठल्या न कुठल्या तरी आजी-आजोबा, मावशी, आत्त्या, काकू ह्यांच्या जाळ्यात अडकायचो! प्रेत्येका पुढे एकच समस्या - माझे लग्न कधी होणार! मी मुलगा असल्यामुळे , ' काय मग, कुठे जमवून घेतलं आहेस का', हा प्रश्न ते मला विचारू शकत होते. आणि पुढे ज्या लग्नाला आम्ही गेलो असू तिथून निघताना त्यांच्या दोनच अपेक्षा होत्या - माझ्याकडून लग्न ठरलं हे लवकरच ऐकायची आणि ज्यांचं लग्न झालं त्यांच्याकडून 'लवकरच गोड बातमीची!' ह्या पलीकडे त्यांचे जग नसावे!

त्यामुळे आता जर त्यांना सांगितले तर सामानाची यादी आणावी तशी ते माझ्या पुढे मुलींची यादी घेऊन आले असते. आणि काही दिवसांनी दुकानदार बिल चुकतं करायला येतो तसे मागे लागले असते. नकोच ती भानगड! शिवाय ऑनलाइन पद्धतीने मला माझ्या निकषांनी निर्णय घेता येणार होते. आता तसे काही फार मोठे निकष नव्हते माझे. परंतु ज्या मुलीला किंवा मुलींना मला भेटावे लागणार होते, त्यांच्याशी आणि सुरुवातीला त्यांच्याशीच बोलून मला पुढे ही 'केस' घरी रेफर करायची होती. त्यामुळे पहिले कुठल्या  तरी 'लग्न पोर्टल' वर नाव रेजिस्टर करणे आणि पुढे काय होतंय ते पाहणे इथून मी सुरुवात करणार होतो. माझ्यावर ही वेळ येईल असे मी अगदी शाळा-कॉलेज पासून वागत आलो असलो तरीही ही प्रक्रिया एकूण नवीनच होती!



तेवढ्यात घरच्यांनी एका खाजगी विवाह संस्थेचे नाव मला सुचाविले. ह्या संस्थेचे ब्रीदवाक्य काय असावे? तर 'इथे विवाह जुळून येते!' आता ही काय सांगायची गोष्ट झाली का? हे म्हणजे कोणत्याही ऑफिसच्या बाहेर 'येथे काम होते' असे लिहिण्यासारखे आहे. ह्यांची मुलं-मुली जोडण्याची कल्पना खूप
भव्य होती. हे लोक कुठेतरी मेळावा जमवतात आणि भरपूर संख्येने मुलं-मुली तिकडे उपस्थित राहतात. मग आपण त्यातील कुणा एकी बरोबर जोडी जुळवायची आणि तिच्याशी गप्पा मारायला सुरुवात करायची. आणि ओळख करून घरी जायचं. पुढचं पुढे. पण ह्या कल्पनेला एक अडचण होती.
हॉटेल मध्ये कितीही चांगला पदार्थ मागवला - अगदी तिखट, चमचमीत - तरी आपले लक्ष शेजारच्या टेबल वर काय मागवलं गेलंय ह्याच्याच कडे असते! मनुष्य स्वभाव आहे त्याला काय करणार? त्यामुळे तिकडे जाऊन मला बाजूचा मुलगा कुणाशी बोलतोय, तिच्याशी आपण बोलायला हवं होतं का वगेरे विचार करायचे नव्हते. आणि मी त्या वाटेला न जायचे ठरविले. आणि लग्न डॉट कॉम नावाच्या एका वेबसाईटची निवड केली.

स्वतःबद्दल लिहिणे ही एक तापदायक प्रक्रिया असते. अगदी पोटापाण्याशी निगडीत असल्यामुळे मी नोकरी सुचित करणाऱ्या वेबसाईट वर स्वतःबद्दल लिहितो. शिवाय तिथे स्वतःबद्दल वाट्टेल ते लिहिता येऊ शकतो. पण इकडे? नोकरी मिळावी म्हणून वाढवून चढवून लिहिण्याची प्रक्रिया छोकरी मिळवताना  वापरता येत नाही. शिवाय नोकरी मिळवतानाचा एकमेव निकष 'आधीचा अनुभव' ( तुम्ही स्वतःबद्दल काहीही लिहिले तरी) हा असतो.  इकडे जर 'आधीचा अनुभव' सांगायला गेलं तर कोणतीही मुलगी तुम्हाला समोर उभं करणार नाही! त्यामुळे जे काय असेल ते सत्य लिहावे लागते आणि म्हणूनच ते अवघड असते.
ह्या वेबसाईट वर 'स्वतःबद्दल थोडे' ( हे थोडे थोडीच असते! पण हे नंतर लक्षात आले!) ह्या व्यतिरिक्त बरेच काही होते. त्यात माझ्या परिवारा विषयी, मी सध्या काय करतोय ह्या विषयी आणि एकंदर मी जीवन जगणे कसे पसंत करतो हे सारे कॉलम भरायचे होते. मग मला भरायची होती माझी उंची, माझा शारीरिक बांधा ( स्वतःबद्दल लिहिणे कठीण का ते कळलं ना आता?), माझा वर्ण, मी सिगारेट पितो का, दारू पितो का, माझी रास आणि माझा रक्तगट आणि माझा धर्म वगेरे. पुढे जात आणि एवढं पुरे न होत तर माझे गोत्र!

आता मी अत्री नामक ऋषीशी संबंधित आहे असे मला सांगितले गेले होते. आणि म्हणून माझे गोत्र 'अत्री'. पण जवळ जवळ पाच हजार वर्षांपूर्वी जन्माला आलेला हा इसम माझा डायरेक्ट नातेवाईक कसा होऊ शकतो हे काही मला कळेना! हा प्रश्न विचारल्यावर मला असे सांगितले गेले की आपल्या पिढ्या मागे नेल्या तर अत्री ह्या ऋषींशी आपले मूळ शोधतात. परंतु ह्याचे डॉक्युमेंटेशन माझ्या कोणत्याही नातेवाईकांकडे सापडले नाही. त्यामुळे वेबसाईट वर मी हा कॉलम भरला नाही.
ह्यापुढे माझी नोकरी, माझे वार्षिक उत्पन्न, मी किती शिकलोय, मी कुठे राहतो, माझ्या आवडी-निवडी, माझे आवडते पदार्थ, मला कोणते खेळ आवडतात ( हा प्रश्न खेळायला की बघायला हे माहिती नाही), कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं ( माझे लग्न झालेले मित्र सांगतात की लग्नानंतर केवळ रड'गाणं'च गायलं जातं!), कोणत्या प्रकारचे सिनेमे आवडतात आणि कोणत्या प्रकारचे कपडे आवडतात ( ह्याचा लग्नाशी काय संबंध काय माहिती) हे सारे प्रश्न होते. पुढे माझ्या होणाऱ्या बायकोकडून काय अपेक्षा आहेत हे सारे प्रश्न होते आणि तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली.
कॉलेज मध्ये ( आणि एकूणच आतापर्यंत) आम्ही मुली बघत(च) आलो आहे. त्यावेळेस कधी कधी शाळेतल्या मुली देखील दिसायच्या. परंतु , " बच्ची को क्या देखना' अशा आविर्भावाने आम्ही त्यांच्याकडे बघणे टाळायचो. आमच्यापेक्षा चार वर्ष लहान असलेल्या मुलींकडे काय बघायचे! पण आज जेव्हा मी 'अपेक्षित वधू' साठी वयोगट २३- २७ हा ठेवला तेव्हा नियतीने चक्र उलटे फिरविण्याचा अनुभव मला आला. परंतु आता त्याला काही इलाज नव्हता. मी माझी 'प्रोफाईल' आता तयार केली होती. आणि पुढे काय अनुभव येणार ह्या उत्सुकतेने आणि क्वचित टेन्शनने मी सज्ज झालो होतो.

(…. भाग २ पुढे)


Monday, May 5, 2014

'आम्हाला मातृभूमी नाही'

मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता. लेक्चरच्या वेळेस प्रोफेसरांनी 'आरक्षण हवे का नको' ह्या विषयावर चर्चा करायचे ठरविले. हा फार संवेदनशील विषय आहे हे मला माहिती होते परंतु वर्गातील सारी मुलं एवढ्या तावातावाने विरोधात बोलतील हे मला अनपेक्षित होतं. त्यातल्या एकाने आरक्षणासाठी थेट डॉ. आंबेडकरांना जबाबदार धरले आणि त्यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगितले. सारा वर्ग टाळ्या वाजवू लागला आणि एकदम एका मुलाने हात वर केला. त्याला बोलायची संधी दिली गेली आणि बाबासाहेबांबद्दल तो इतके सुंदर बोलला की बस्स - प्रोफेसर देखील त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. वर्गातील मुलांना देखील त्यापुढे काही बोलता आले नाही आणि बऱ्याच लोकांनी काहीतरी निरर्थक मुद्दे काढून उगीच विरोध करायचा प्रयत्न केला. परंतु ते फोल ठरले आणि चर्चा संपली! मी मुद्दाम वर्गाबाहेर जाउन त्याच्याशी बोलले. प्रसाद सारखा शांत मुलगा एवढे प्रभावी बोलू शकेल ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता!

पुढे आमची ओळख वाढली. गप्पा वाढल्या. बरेच विषय बोलले जायचे परंतु वैचारिक चर्चा जास्त होत असे. कधी कधी लायब्ररी मध्ये नोट्स काढणे म्हणून बसले जायचे परंतु अभ्यास सोडून सामाजिक विषय जास्त बोलले जायचे. त्याला त्यावर बोलणे फार आवडायचे आणि त्याचे मुद्दे देखील खूप प्रभावी असायचे. खूप वाचन होते. आणि शिवाय विचार अगदी सर्वसमावेशक होते. माझ्या घरी भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो होता परंतु माझ्याकडे  त्या फोटोला नमस्कार करणे ह्यापलीकडे काहीच नव्हते. आणि त्याचे त्यांच्याबद्दल असलेले वाचन मला शरमेने मान खाली घालायला लावायचे. आमची मैत्री वाढत गेली तसा तो अधिक बोलका होऊ लागला. एकदा असाच एक विषय सुरु होता. प्रसाद भान सोडून बोलत होता. लायब्ररी मध्ये पुढे बसलेल्या लोकांनी एक-दोन वेळेस मागे वळून आमच्याकडे पाहिले देखील. "आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?" अंगावर शहारा आला होता आणि डोळे पाणावले होते त्याचे. तो लालबुंद चेहरा मला अजून लक्षात आहे.

एकमेकांचा नंबर तर होता आमच्याकडे! त्यामुळे मेसेज वगेरे सुरु झाले. तेव्हा व्हाटसअप वगेरे नव्हतं आणि फेसबुक पण नुकतंच सुरु झालेलं! त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करणं सुरु असायचं. आणि मी त्याच्या विचारांच्या आणि नंतर त्याच्या प्रेमात केव्हा पडले हे कळले देखील नाही. पण विचारायचे कसे? शिवाय विचारायच्या आधी आमची भिन्न पार्श्वभूमी लक्षात आली आणि क्षणभर बिचकले! परंतु मन सांगत होते विचारून मोकळी हो! आणि मी एकेदिवशी आम्ही घरी येताना त्याला सांगून टाकले. क्षणभर तो माझ्याकडे बघत राहिला! नंतर म्हणाला, " मला देखील तुला हेच विचारायचे होते!"
मी जे ऐकले त्यावर माझा विश्वासच बसेना! काही न बोलता आम्ही नुसतेच चालत राहिलो. आणि अचानक मनात आलेल्या विचाराने मी पुन्हा घाबरले. आणि धैर्य गोळा करून म्हणाले, " आमच्या घरी बाबासाहेबांचा फोटो आहे तरी सुद्धा तुला चालेल?"
तो माझ्याकडे पाहून हसला. म्हणाला, " माझे विचार आणि माझी कृती ह्यात फरक नाही!"

आमच्या घरी आणि नातेवाईकांना समजावणे हे एक आव्हानच होते. आपली मुलगी एका बामणाच्या घरी चालली आहे ह्या कल्पनेने काही नातेवाइक एकदम खूश होते तर काही एकदम नाराज! त्याच्या घरचे नातेवाइक तर अजिबात तयार होत नव्हते. परंतु प्रसाद माझ्याबरोबर उभा होता आणि मला ह्यात समाधान होते. दरम्यान मी त्याच्या घरी जाऊ लागले. त्याच्या घरच्यांशी ओळख होऊ लागली होती. त्याचा मोठा भाऊ प्रकाश हा रशियात                
डॉक्टर होण्यासाठी गेला होता. आणि एके दिवशी घरी बातमी आली की प्रकाश दादाला रशियात एक रशियन मुलगी आवडली आहे आणि दोघे लग्न करणार आहेत! घरी अर्थात सगळे खुश झाले होते. तो घरी केव्हा येईल ह्याची वाट बघत होते. पोरांना ह्या गोऱ्या वाहिनीला बघण्याची ओढ लागली होती. 'स्काइप' वर आजीने होणाऱ्या सूनेला पाहिले होते आणि 'किती गोरी आहे माझी सून' असे आनंदाने म्हणून नात्याला पसंती दिली होती! प्रकाश दादाला  देखील आपल्या होणाऱ्या बायकोची स्वीकृती झाल्यामुळे आनंद झाला होता. लग्नाचा दिवस उजाडला. मी देखील मदत म्हणून प्रसादच्या घरी असायचे. त्याचे इतर काही मित्र देखील होते. लग्न अगदी व्यवस्थित पार पडले आणि रशियन सूनेने अगदी उत्सुकतेने सारे विधी पार पाडले. तिला आपल्या 'कल्चर' बद्दल बरेच काही सांगितले गेले होते. ' आपल्या प्राचीन आणि महान संस्कृती बद्दल तिला सारे कळले पाहिजे' असे आदेश आजीने आणि त्यादिवशी घरी आलेल्या पुण्याच्या आजीने 'स्काइप' वर प्रकाश दादाला आधीच दिले होते. त्याचे पालन झाले होते बहुदा!

त्यादिवशी सारे नातेवाईक ह्या नव्या सूनेशी बोलायला उत्सुक होते. पुण्याच्या आजी तर प्रचंड! अगदी तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये सारे काही सांगितले जात होते. अर्थात मुलगी रशियन असल्यामुळे तितक्याच तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये उत्तरं मिळत होती आणि आजीची विशेष पंचाईत होत नव्हती! दोघे रशियाला परत जायचा दिवस उजाडला. सर्वजण अगदी भावूक झाले होते. मी देखील प्रसादच्या जवळ उभी होते. सारे काही समजू शकत होते.
"माझ्या सूनेची काळजी घे रे!" आजीने अगदी भावूक स्वरात सांगितले. आम्ही परत यायला निघालो. पुण्याच्या आजीने प्रसादकडे डोळे वटारून कोरड्या स्वरात सांगितले, " आता तुमचा नंबर असेल ना!" आम्ही परत घरी आलो.

प्रसादला आणि मला विधींचे विशेष आकर्षण नव्हते. शिवाय दोन वेगळ्या पार्श्वभूमी असल्यामुळे दोन्हीकडचे लोक आपापले विधी पुढे करतील ह्याची भीती होतीच. त्यामुळे आम्ही सर्वांचा रोष पत्करून कोर्टात लग्न करायचे ठरवले! हा आमचा निर्णय घरी तर अजिबात मान्य नव्हता पण त्या संदर्भात नाराजी ही नातेवाईक मंडळींमध्ये अगदी लगेच पसरली! प्रसाद खंबीर होता आणि सुदैवाने त्याचे वडील आमच्या बाजूने होते. सारे काही व्यवस्थित पार पडले असे जरी नसले तरी ऐन लग्नाच्या वेळेस मात्र कसलाही विघ्न आला नाही. लग्न करून आम्ही घरी आलो. सारे माझ्याकडे टक लावून पाहत होते. बोलत मात्र कुणीच नव्हतं. चिल्ली-पिल्ली मंडळी देखील आपल्या आईचा हात हातात धरून उभी होती. नाही, त्यांच्या आईंनीच त्यांचा हात हातात घेतला होता. मी वाकून सर्वांना नमस्कार करत होते. सारे ' हम्म' एवढे म्हणत होते.

मी आता घरची एक महत्वाची सदस्य झाले होते. आई-बाबा व्यवस्थित बोलायला लागले होते. मी देखील खुलले होते. गप्पांमध्ये सामील होत होते. आणि रविवारी पुण्याच्या त्या आजी आणि इतर एक दोन आजी येणार होत्या हे कळले. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करण्यात आईला मदत केली. बेत तयार झाला. दुपारी जेवण देखील छान गप्पांमध्ये पार पडले. किचन आमच्या बेडरूमच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथे बोलले जाणारे शब्द नीट ऐकू येतात. सगळं झाल्यावर मी झोपायचे म्हणून दिवाणावर पडले होते. प्रसाद बाहेर हॉल मध्ये फोनवर बोलत होता.  आणि आत आजींचा संवाद सुरु झाला.
" मला वाटलं होतंच …. जेवण आपल्या सारखं नव्हतं! चव काहीतारी वेगळीच होती. कोण कुठली बायको केली आहे ह्या प्रसादने! तरी वहिनी, मी तुम्हाला सांगत होते ना … ह्या असल्या लग्नांना काहीही अर्थ नसतो! अहो, आपले पूर्वज काय वेडे होते काय नियम घालून द्यायला! लग्न करायचे तर ते आपल्या माणसाशीच! जाऊ दे... हल्लीची मुलं बघून घेतील आपण कोण सांगणार! झोपा तुम्ही!"

मला कधी नव्हे ते हे सारे ऐकून धक्का बसला! आपल्या माणसाशी? रशियातून आलेली सून आपली होती? ती आपल्या पद्धतीने स्वयंपाक करणार होती काय? आणि मग त्या लग्नाला खूप अर्थ होता काय? तेव्हा कुठे गेले तुमचे पूर्वज? ह्याच त्या आजी सूनेची काळजी घे म्हणून त्या दिवशी सांगत होत्या! आणि मी ह्या देशातली सून असून माझी पर्वा नाही कुणाला! रशियातली 'गोरी' वहिनी बघायला मात्र सारी पोरं मोकळी पण मी घरात प्रवेश करताना त्या साऱ्यांचे हात त्यांच्या आईच्या हातात! अगदी घट्ट! माझा नमस्कार कुणीही स्वीकारायला तयार नाही आणि तिकडे? आपली महान संस्कृती समजाव म्हणून बजावले गेले होते! तिच्याशी इंग्लिश बोलायची हौस आणि माझ्याशी मातृभाषेत देखील कुणी बोलायला तयार नाही. पण तेवढ्यात प्रसाद खोलीत येताना दिसला! मला एकदम त्याचा कॉलेज मधला तो लालबुंद चेहरा आठवला!  "…आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?"

आशय गुणे :)

Wednesday, December 5, 2012

डॉ . प्रभुणे

ही  कथा 'मायबोली' ह्या दिवाळी अंकात (online) प्रकाशित झाली होती! 

बरोबर एक मोठा बुके आणि थोडी चॉकलेट्स घेऊन मी, माझी पत्नी, आणि माझा ८ वर्षांचा मुलगा ड्राईव करत चाललो होतो. बाल्टिमोर काऊंटीमधील शांत परिसरात गाडी वेगात पळत होती. तितक्याच वेगात आमचा उत्साह आणि आनंद देखील वाहत होता. प्रसंगच तसा होता. नुकतेच नोबेल पारितोषिक विजेते घोषित झाले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जगातील मान्यवरांची ओळख हळू हळू होऊ लागली होती. अमेरिकेत जे थोडे लोक पेपर वाचतात, त्यांच्यात आम्ही देखील असल्यामुळे रोजचे लेख आम्हाला काय ती माहिती पुरवीत होते. ह्या सार्‍या यादीत एका त्रिकुटाचा समावेश होता. हे त्रिकुट होते शास्त्रज्ञांचे. जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीमधील मेडिकल सायन्स शाखेतील एका मोठ्या प्रयोगाने मागच्याच वर्षी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मानवी शरीरातील पेशींमधील (cells) 'डीएनए'वर हे संशोधन होते. पेशींच्या एका विशिष्ठ भागात, ज्याला न्युक्लिअस म्हणतात, हे डीएनए असते. या डीएनए चे प्रोटीन नामक सत्वात रुपांतर होते आणि पुढे हेच प्रोटीन आपली शारीरिक वाढ किंवा जडणघडण होण्यास कारणीभूत ठरते. परंतु इतके दिवस पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असू शकते याचा कोणालाच पत्ता नव्हता. शास्त्रज्ञांच्या या त्रिकुटाने एका मोठ्या प्रयोगाची मदत घेऊन हे शोधून काढले की पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असते आणि त्याचे रुपांतर शरीरातील महत्त्वपूर्ण प्रोटीनमध्ये होते. या त्रिकुटात एक भारतीय नाव झळकल्याचे आमच्या ऐकण्यात आले होते. आणि सहज त्या दिवशी पेपर उघडला तर काय आश्चर्य! दोन अमेरिकन शास्त्रज्ञ मंडळीत एक नाव "तिचे" होते. लगेच येणार्‍या शनिवारचा मुहूर्त धरला. ( इकडे मुहूर्त ही कल्पना म्हणजे विकेंड! आणि केवळ विकेंडच..) आणि आम्ही सारे तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला निघालो.

सहा वर्षांपूर्वी शिकागो सोडून आम्ही बाल्टिमोरला स्थाईक झालो. नवीन शहरी जातानाची एक सवय अमेरिकेत पाऊल ठेवल्यापासून कायम होती. तिकडे असलेल्या भारतीय लोकांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवायची. आपला एकूण देश अनेक राज्यात विभागला गेल्याचे आपल्या भूगोलाच्या पुस्तकानेच लहानपणी मनात ठसवल्यामुळे या भारतीयांमध्ये मराठी कोण हे सुद्धा बघणे आलेच. आमचा मुलगा, त्याचा जन्म इकडे झाल्यामुळे अनेक 'रंगांमध्ये' लीलया मिसळू शकत होता! आमचे तसे नव्हते. तर सहज लिस्ट चाळत होतो तर हिचे नाव त्यात! नाव वाचून आश्चर्याचा धक्काच बसला. हीच का ती ह्याची खात्री करायला इ-मेल पाठवला तर तीच निघाली! आणि मुख्य म्हणजे तिने मला ओळखले होते. बाल्टिमोर मध्ये कधीही येशील तेव्हा घरी ये असा संदेश तिने लगेच पाठवला! आणि पुढे वाचले तर 'सिनिअर सायंटिस्ट, जॉन हॉपकिन्स' असे तिचे डेसिग्नेशन वाचले तेव्हा थक्क झालो! खूप प्रगती केली होती तिने. स्वतःचे क्षेत्र गाजवले होते!

वास्तविक मी हिचा विद्यार्थी. बायोटेक हे क्षेत्र भारतात नवीन आले तेव्हा ह्यात खूप स्कोप आहे असे ऐकून आम्ही त्यात उडी घेतली होती. दुसर्‍या वर्षी शिकत असताना ही आमच्या कॉलेज मध्ये शिकवायला जॉईन झाली. पीएचडी संपवून आणि थोडा फार रिसर्च करून ती प्रोफेसर म्हणून रुजू झाली होती. तिचे वय तेव्हा २६ होते. एक अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय प्रोफेसर अशी तिची ख्याती होती. त्यामुळे आम्हा मुलांचं (आणि मुलींचं सुद्धा!) तिच्याशी काही फार जमायचं नाही. मुली देखील तिच्या समोर नोट्स काढायचा आव आणत असल्या तरी तिच्या मागे (आणि मागेच!) तिचा समाचार घ्यायच्या. काही मुलांची तर तिच्याशी वादावादी झाली होती. वर्गात जोरजोरात भांडण होणे बाकी ठेवले होते काहींनी! हिने तिच्या आयुष्यात शिस्तीला खूप महत्त्व दिले होते पण आमच्यावर ती शिस्त लादताना गफला व्हायचा!

"हिचे अजून लग्न झाले नाही ना! म्हणून ही सदैव रागात असते... हिला कुणीतरी नवरा आणून द्या रे!" - तिच्या शिस्तप्रिय स्वभावाचे आणि तो आमच्यावर लादल्याचे खापर तिच्या अविवाहित राहण्यावर फोडले जायचे. तिचा विषय निघाला की हे वाक्य हमखास बोलले जायचे. संभाषणात सर्वप्रथम तिच्या उच्च शिक्षणावर जोर दिला जायचा. आश्चर्य व्यक्त केले जायचे... क्वचित आदरभाव सुद्धा! पण तिचे लग्न नाही झाले ह्या विषयावर येऊन सगळं संपायचं! काळजीच होती जणू सार्‍या मुलांना हिच्या लग्नाबद्दल! पुढे आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि आमच्यापैकी बर्‍याच लोकांना असा साक्षात्कार झाला की आम्ही निवडलेल्या क्षेत्राला अजिबात स्कोप नाही! आणि सर्व क्षेत्रांचा शेवट ज्या एका पदवीने होतो तेच आम्ही केले - एमबीए! पुढे नशीबाने चांगले दिवस दाखवत एक चांगली नोकरी दिली. आणि त्याचे पेढे द्यायचे म्हणून मी आमच्या या आधीच्या कॉलेज मध्ये गेलो. तेव्हा समजलं की ही अमेरिकेला जायचे म्हणून प्रोफेसरगिरी करून पैसे जमवत होती. पोस्ट-डॉक करण्यासाठी. आम्ही थक्कच झालो होतो!

"अजून किती शिकायचे माणसाने! आता बास ना", इथपासून, "लग्न काय अमेरिकेत जाऊन करणार काय? नक्कीच कुणीतरी गोरा पकडेल... दिसते तर माल एकदम" इथपर्यंत सारी वाक्यं बोलली गेली होती.
अजून काही वर्ष गेली आणि मला अमेरिकेत पाठवले गेले. २८ व्या वर्षी ही संधी आल्यामुळे घरचे एकदम खुश होते. आता मला कुणीही मुलगी देईल ही त्यातली एक भावना. आणि झालेही तसेच. लग्न करून मी अमेरिकेत गेलो.

बाल्टिमोर मध्ये आल्यावर लगेच काही हिची भेट झाली नाही. तिकडच्या महाराष्ट्र मंडळात गेलो तेव्हा मात्र तिच्याबद्दल थोडे ऐकले. "तिचे काय... नाव भारतीय आहे फक्त... बाकी काय भारतीय आहे तिच्यात?" असे एक वाक्य एका गृहस्थाने बोलून दाखवले होते आणि सर्वांनी एकमताने हसून त्या माणसाला दाद दिली होती. ती ज्येष्ठ शास्त्रज्ञ असल्यामुळे खूप व्यस्त असायची. त्यामुळे आल्यापासून २-३ आठवडे काही भेट होऊ शकत नव्हती. शेवटी तिनेच एकदा रविवारी बोलावले. आणि जवळ जवळ १५-१६ वर्षांनी डॉ. सुलभा प्रभुणे हिला भेटलो. जवळ जवळ ४५ वर्षांच्या डॉ. प्रभुणे मध्ये लक्षणीय बदल झाला होता. पंधरा वर्षांपूर्वी खांद्यापर्यंत येणार्‍या केसांचा बॉय-कट झाला होता. चेहर्‍यावरचा चष्मा जाड भिंगांचा झाला होता. केस बर्‍यापैकी पिकले होते. आणि चेहरा थोडासा का होईना सुरकुतलेला दिसत होता. तिची इकडची प्रगती ऐकून आणि पंधरा वर्षांनी परत एकदा थक्क होऊन मी घरी गेलो. पोस्ट-डॉक करायला आलेल्या तिने खूप चांगला परफॉर्मन्स देऊन आणि अनेक रिसर्च पेपर प्रकाशित करून बढती मिळवली होती. आणि ५ वर्षांपूर्वी स्वतःची प्रयोगशाळा सुरु केली होती.

"मग, या कधी आमच्याकडे!" मी म्हणालो. "या म्हणजे कोण आता?" तिने एकदम विचारले. "म्हणजे तुम्ही सगळे..." मी पुढे बोलणार इतक्यात तीच म्हणाली. "फॅमिली वगेरे कुणीही नाही इकडे... मी एकटीच राहते... मी लग्न नाही केलं!" थक्क होण्याचे कारण फक्त तिचे उच्च शिक्षण एवढेच नव्हते हे वेगळं नको सांगायला!
आल्यापासून ३-४ वर्षात मी मात्र जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस तिला विकेंडला घरी बोलवायचो. ओळख अजून वाढू लागली. आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये कसे झाले कळले देखील नाही. इतके दिवस 'अहो-जाहो' करणार्‍या मला शेवटी तिने 'अरे-तुरे' ने हाक मारायला सांगितली. कॉलेज मध्ये तशी हाक आम्ही मारत होतोच... अर्थात तिच्या पाठीमागे. आता मात्र तिला अशी हाक मारायची परवानगी खुद्द तिनेच दिली.

क्वचित कधीतरी ती महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना किंवा माझ्या घरी ठेवलेल्या कार्यक्रमांना यायची. तेव्हा सुद्धा स्वारी एकटीच. जास्त कुणी तिच्याशी बोलायचे नाही. मंडळाचे कार्यक्रम झाले की ही एकटीच निघून जायची. मी माझ्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात उभा असलो तर आमच्यात न येता एकटीच घरी जायची. जर मी एकटा असलो तर मात्र मला भेटून, चार शब्द बोलून घरी जायची. क्वचित हिच्याशी आणि माझ्या मुलाशी पण बोलायची. पण एकूण सगळं एकट्यानेच! खरं तर तिचे रुटीन खूप व्यस्त असायचे. सकाळी लवकर लॅबमध्ये जायची. आणि रात्री यायला ९-१० वाजायचे. कधी कधी विकेंडला पण जावे लागायचे. त्यामुळे एकूण बिझीच!

दरम्यान मला हिच्याबद्दल जे मत ऐकायला मिळत होते ते काही फार चांगले नव्हते. बाल्टिमोर काऊंटी मध्ये बर्‍याच वर्षांपासून राहणार्‍या एका गृहस्थाने हिला म्हणे वेगवेगळ्या गोर्‍या लोकांबरोबर फिरताना बघितले होते. लेट-नाईट पार्टी करताना ती बर्‍याचदा दिसली होती. हिच्या घरी बर्‍याचदा कोणीतरी यायचे. मला देखील हिच्यापासून सावध राहायला सांगितले गेले. मुलांना तर लांबच ठेवा असा पण सल्ला देऊन झाला होता! ही बाई एकेकाळी माझी शिक्षिका होती ही गोष्ट मी ह्यांच्यापासून लपवून ठेवली होती. तिने सांगायचा तर प्रश्नच नव्हता! तिच्याशी बोलताना एवढे सुद्धा समजले होते की ही बाई बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा भारतात गेली होती. तिने सांगितलेले साल म्हणजे ती साधारण ३३ वर्षांची वगैरे असली पाहिजे. त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत काही ती भारतात गेली नव्हती. भुवया उंच करायला लावणारी केस होती हिची हे मात्र खरं!

मी इकडे आल्याच्या वर्षभरातच तिची स्वतःची प्रयोगशाळा सुरु झाल्यामुळे तिकडे होणार्‍या गोष्टी माझ्या कानावर यायच्या. आणि खूप वर्षांपूर्वी पदवी बायोटेक मध्ये मिळवल्यामुळे तेव्हा असलेल्या शिक्षिकेकडून त्याची उजळणी देखील होत असे. तिचे विचार संशोधनात अंमलात आणण्यासाठी एक चांगली टीम तिच्याकडे होती. पीएचडी करायला आलेले विद्यार्थी हुशार होतेच शिवाय पोस्ट-डॉक वाले लोक सुद्धा खूप मेहनती आणि सर्जनशील होते. त्यामुळे संशोधनातील हिच्या विचारांना चांगले पाठबळ होते. आणि त्यामुळे परिणाम चांगले मिळायचे. डॉ. प्रभुणे हे एक प्रभावी नाव झाले होते. दर वर्षी रिसर्च ग्रँट मिळणार्‍या शास्त्रज्ञ मंडळींमध्ये हिचे नाव होते. पण आमच्या लोकांकडून एकूण हिच्या कामगिरीची तेवढी दाखल घेतली जायची नाही एवढे मात्र खरे. कुठल्यातरी गाण्याच्या किंवा वाजवण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन जिंकलेल्या लोकांचा सत्कार होत असे. मात्र मी ३ वेळा सत्कारासाठी हिचे नाव पुढे केले तेव्हा तिन्ही वेळेस मला वेड्यात काढून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला होता!

मात्र तिच्यामुळे जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटी बघायची संधी मात्र मिळाली. नुसती नाही तर अगदी आतून. एरवी, जगाला जवळ जवळ ४० नोबेल पारितोषिके मिळवून देणारी ही 'पवित्र' वास्तू अगदी आतून बघायचे भाग्य कुणाला मिळेल? सतत काहीतरी नवीन शोधण्याच्या मागे असलेले हे इथले शास्त्रज्ञ बघितले की आपण एका वेगळ्याच विश्वात आहोत ह्याची नक्कीच खात्री पटते! बाहेर जगात काय चालले आहे ह्याची फारशी पर्वा न बाळगता, एकाग्रतेने इकडे काम सुरु असते. सतत त्याच विश्वात राहून आणि त्याच विश्वात राहण्यासाठी पोषक अशा वातावरणात नांदून उत्कृष्ट शोध लागतात! आणि त्यामुळे एका अर्थाने जग चालते. ती पण त्याच जगातली. भारतातून एक ध्यास मनात बाळगून आली होती. आणि तिने ठरवलेल्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल केली ह्यावर, मिळालेल्या नोबेल पारितोषिकाने शिक्कामोर्तबच केले होते!

घराची बेल वाजवली. आणि पुढच्या अर्ध्या तासात एका आश्चर्यचकित करणार्‍या उत्तराला मला सामोरे जावे लागले. बुके दिला. आनंदाने चॉकलेट्स देखील दिली. आणि अभिनंदन करणे सुरु केले. बोलताना पुढे म्हणालो. "घरी फोन केलास की नाही? खूप खूष असतील ना सगळे?" उत्तर निर्विकारपणे नाही असं आल्यावर मात्र मी एकदम आश्चर्य व्यक्त केले. आणि "फोन कर गं" असं तिला एक-दोनदा सांगितले. शेवटी तीच म्हणाली.
"मी माझ्या घरच्यांशी संबंध तोडून टाकले आहेत. त्यांना माझ्या यशाविषयी किंवा एकंदर आयुष्याविषयी काहीही घेणंदेणं नाही!"
"अगं पण का? असं कसं?"
TichiKatha.gif
"हो मग काय... त्यांना काहीच पडलेली नाही. मी त्यांच्यासाठी मेले आहे. भारतात अजून पुरुषच शास्त्रज्ञ होत असतात. सर्वांचा विरोध पत्करून मी इकडे पोस्ट-डॉक करायला आले. बाबांनी शेवटी एका अटीवर परवानगी दिली. २ वर्षात घरी परत येऊन लग्न करायचे. दोन वर्षाच्या पोस्ट-डॉक ने काय होणार आहे? ती तर शास्त्रज्ञ बनण्याची सर्वात पहिली पायरी आहे... त्यांना कुठे माहिती होते की पोस्ट-डॉक निदान पाच वर्ष केलं की पुढे असोसिएट प्रोफेसर होता येतं... आणि मग पुढे बढती मिळवत मिळवत सायंटिस्ट होतो माणूस! भारतात एवढेच वाटते की पीएचडी केली की माणूस शास्त्रज्ञ होतो! त्यामुळे... ह्या असल्या प्रस्तावाला काहीही अर्थ नव्हता... मला शास्त्रज्ञ व्हायचे होते... आणि मी अजिबात भारतात गेले नाही. परंतु काही वर्षांनी एकदा मी सर्वांना भेटायला परत घरी गेले... तेव्हा माझ्या नावावर ४ रिसर्च पेपर होते... आणि नामांकित जर्नल्स मध्ये माझे नाव छापून आले होते. मला हे सर्व घरी सांगायचे होते... पण घरी गेले तर ... लग्न... लग्न आणि केवळ लग्न! जर्नल वगैरे ठीक आहे... पण आता लग्नाचे बघा जरा, अशी सूचना मिळायची. नातेवाईकांमध्ये ह्याच्या आधी मुलगी किती हुशार आहे म्हणून मला मिरवले जायचे... पण आता त्यांच्याकडून सुद्धा लग्न करा लवकर... अशा सूचना!! शेवटी बरीच भांडणं करून... मी परत इकडे आले... ह्यावेळेस मात्र खूप त्रासले होते. वैतागले होते... रागावले होते. कुणालाच माझ्या कामाची कदर नाही हे मी जाणले होते... आणि त्याचाच सर्वात जास्त त्रास होत होता! त्यामुळे सुरुवातीचे काही महिने रिसर्च मध्ये लक्ष नव्हतं लागत... रिझल्ट नव्हते येत... कधी कुणी कौतुक केले की घरी सांगावेसे वाटायचे...परंतु ... काहीही उपयोग होणार नव्हता हे देखील माहिती होते! दरम्यान मला थोडेफार समजून घेणारे माझे कलीग्स होते माझ्या बरोबर... त्यांच्या बरोबर वेळ चांगला जाऊ लागला... ते मला समजू शकत होते... कारण ते सुद्धा शेवटी शास्त्रज्ञ होते... आणि ह्या एकटेपणाला सरावले होते. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाशी मी काही वर्ष रिलेशनशिप मध्ये पण होते... काही वर्ष परत एकटीने घालवली... परत एक कलीगशी ओळख वाढली... तो माझ्याने १५ वर्ष मोठा होता... परंतु मला समजून घ्यायचा... रिझल्ट आले नाही आणि मानसिक ताण वाढला की प्रोत्साहन द्यायचा... जवळ जवळ वर्षभर आम्ही एकत्र होतो... पण नंतर तो देखील पुढे दुसरीकडे निघून गेला... आम्ही आहोत अजून टच मध्ये म्हणा...! पण एवढ्यात झाले काय... की बाल्टिमोर मध्ये आमच्या ओळखीच्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत... त्यांनी कुणामार्फत तरी हे सारं घरी सांगितलं! बर्‍याच वर्षांनी घरून फोन आला... मी उचलला तर हे ऐकायला आलं... तुला असले धंदे करायला पाठवले नव्हते अमेरिकेत... पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नकोस... तू आमच्यासाठी मेलीस! ज्या लोकांना मी केलेल्या कामाचे कौतुक नाही... केवळ निंदाच करता येते... त्यांच्याशी मी तरी संबंध का ठेवू? परिस्थितीने मला अजून कठोर बनवले... आज मिळालेले नोबेल मी माझ्या परिस्थितीला समर्पित करते!"

घरी आलो होतो. बायको मुलाला झोपवून स्वतः कधीच झोपून गेली होती. माझ्या मनात मात्र विचारचक्र सुरूच होते. एका साच्यात आयुष्य जगणार्‍या आपल्यासारख्या लोकांना कळेल का हिची व्यथा? माणसाने शिकावे, मोठे व्हावे, योग्य त्या वयात लग्न करावे, संसार सुरु करावा... सर्व मान्य! परंतु हे आयडियल जगणे झाले. प्रोटोकॉल प्रमाणे! उद्या जर कुण्या एका ध्येयनिष्ठ व्यक्तीने एक अद्वितीय काम करण्यासाठी ही चौकट ओलांडली तर? त्या कामात झोकून देताना हे नियम बाजूला सारले तर? मनाने तो सज्ज होईल देखील! पण त्या वयात असलेल्या शारीरिक गरजा? किंवा कुणासमोर आपण केलेले काम व्यक्त करण्यासाठी त्यावर अवलंबून राहावे लागले तर? त्यातून रिलेशनशिप्स निर्माण झाल्या तर दोष कुणाचा? आणि ह्याला केवळ दोष मानून त्या माणसाला नाकारायचा अधिकार आपल्याला आहे? त्याला वाईट ठरवून वाळीत टाकणारे आपण कोण? घड्याळाच्या काट्याप्रमाणे जीवन जगणारी माणसं! त्यांना वेळ काळ झोकून काम केलेल्या लोकांबद्दल का असेल मग आस्था? इतर लोकांसाठी माहिती नाही... पण डॉ.प्रभुणे माझ्या नजरेत एकदम वरच्या शिखरावर आहे. स्वतःचे ध्येय प्राप्त केलेली एक यशस्वी स्त्री!


 (काल्पनिक)



-आशय गुणे


This story can also be read here:  http://vishesh.maayboli.com/node/1228

Image Credits: 'Maayboli - http://vishesh.maayboli.com/node/1228 

Monday, December 3, 2012

फिझिओथेरापिस्ट - भाग २


नीलमची डॉ. नीलम झाल्यापासून तिची ओळख आणि कदर ह्या दोन्ही गोष्टी वाढल्या होत्या. आता ती आमच्यात मिसळू लागली होती, गप्पा-गोष्टीत सामील होऊ लागली होती, चर्चा करू लागली होती आणि भारतातील ताजे किस्से देखील सांगू लागली होती. ( ती तशी हल्लीच भारताहून आली होती त्यामुळे देशात नेमके काय सुरु आहे हे तिच्याकडून ऐकण्यात मजा यायची.) सुरुवातीला एकटीने दिवस काढणाऱ्या नीलमला आता बोलायला माणसं मिळाल्यामुळे ती अगदी भरपूर बोलायची. कधी कधी दुसऱ्याचे वाक्य तोडून स्वतः मध्येच बोलायला लागायची आणि तिला हे लक्षात येताच खजील होऊन माफी मागायची. ग्रुप मध्ये राहणारी मंडळी इथलीच. त्यामुळे त्यांना तिची मनःस्थिती समजत होती. त्यामुळे ह्या सर्वांना त्याचे काहीच वाटायचे नाही. उलट, हसून सोडून द्यायचे सगळे! साधारण भारतीय ( मराठी म्हणूया आपण हवं तर..) ग्रुप्स मध्ये बोलले जाणारे विषय
आम्ही बोलायचो. त्यात राजकारण, क्रिकेट, भारतीय लोकांचं भारताबाहेर वागणं ( ह्यात प्रत्येकाकडे त्यांचे सोडून इतर सर्व भारतीय लोकांच्या बहुतांश वाईटच अनुभवांचे गाठोडे उघडले जायचे!) , संगीत,
महाराष्ट्र मंडळ ( आणि त्यातले रुसवे-फुगवे...) , नवीन सिनेमे, भारतीय सण, खाद्यपदार्थ आणि साजरे केलेले वीकेंड्स हे विषय प्रमुख्याचे. त्यातून ज्या कपल्स ना नुकतेच मुल झाले होते त्यांची ह्या मुला/मुली बद्दलची असंख्य कौतुकं आमच्या वाटेला यायची. त्यातून एकीच्या मुलाने काहीतरी करून दाखवले हे 'माझ्या मुलाने केव्हाच केले होते' असे सांगण्यात काही माता रमायच्या! पण ह्या साऱ्यांमध्ये डॉ. नीलम तिच्या मतांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घ्यायची. तिचे तरुण असल्यामुळे नवीन विचार बरीच वाहवा मिळवून जायचे.
मला आठवतंय, तेव्हा नुकताच क्रिकेटचा वर्ल्ड कप संपला होता आणि तो भारताने जिंकला होता. तेव्हा डोक्यावरचे केस पांढरे आहेत ह्याची साक्ष पटवून देणारे एक विधान ग्रुप मधल्या एका गृहस्थाने केले. " झाला वाटतं वर्ल्ड कप... आता मात्र त्या तुमच्या तेंडुलकर ने रिटायर व्हावे!" एवढे वाक्य पुरं व्हायच्या आधीच नीलम पेटून उठली. आणि तिने शेवटपर्यंत असे काही मुद्दे काढले की बोलणाऱ्या गृहस्थाला आपले विधान मागेच घ्यावे लागले! असाच एकदा 'आपल्या लोकांना शिस्त नाही' हा सर्वांचा आवडता विषय सुरु होता.
विषय रंगात आला होता. तेच ते नेहमीचे, आपण रस्त्यावर एका लेन ने कशी गाडी चालवत नाही इथपासून सार्वजनिक ठिकाणी आपण कसे आवाज कमी न करता बोलतो इथपर्यंत साऱ्यावर चर्चा झाली! इथे देखील डॉ. नीलम ने आपली मतं सांगायला सुरु केली.
" मला असं वाटतं की आपल्या बेशिस्ती चे मूळ आपल्या रोजच्या दिनक्रमात आहे. आपल्यापैकी किती लोक सकाळची सुरुवात लवकर उठून करतात? माझ्या पाहण्यात तरी इकडे फार म्हणजे फार कमी भारतीय लोक सकाळी लवकर उठताना दिसतात. भारतातले तर विचारूच नका.... त्या उलटं तुम्ही चाइनिज़, जपानी किंवा अमेरिकनच बघा ना! आमच्या शेजारी दोन चीनी विद्यार्थी राहतात... दुपारी १२:३० म्हणजे १२.३० ला जेवण झालेच पाहिजे. सकाळी लवकर उठून नाश्त्याच्या वेळेस नाश्ता होतो...आणि पुढे सारा दिनक्रम व्यवस्थित! इकडचे भारतीय विद्यार्थी जेवढे माझ्या ओळखीचे झालेत ...सर्व १० ला उठतात.... मग नाश्ता....दुपारचे जेवण ३ च्या सुमारास... आणि रात्री उशीरा पर्यंत कॉलेजच्या lab मध्ये काम करत बसतात... मग उशिरा झोपल्यामुळे परत दुसऱ्या दिवशी उशिरा... ..अहो, पण का? विशालला सुद्धा हि वाईट सवय आहे...रात्री रात्री पर्यंत कंपनीत बसावे लागते...मान्य....पण दिवसाची सुरुवात लवकर केली तर? काही बिघडणार आहे का? उलट कामं लवकर होतील सगळ्यांची. इतर गोष्टींना देखील वेळ मिळू शकतो ", ती म्हणाली.
"तू म्हणतेस ते काही चूक नाही... पण तुला एक सांगू...इकडे आपल्या लोकांकडून काम पण तितकेच केले जाते...भारतीय आणि चीनी तर ह्यांचे आवडते.. एवढ्या कमी पगारात अमेरिकन थोडी कामं करणार आहेत? " - एक अनुभवी गृहस्थ उद्गारला.
"कमी पगार! अहो काका, ५००० डॉलर काय कमी पगार आहे?" - नीलम.
" अगं, तू इथे हल्ली हल्ली आली आहेस .. कॅलिफोर्निया मध्ये ५००० पर्यंत पगार काहीच नाही... इकडची महागाई अनुभव.. मग तुला कळेल...अगदी छान आयुष्य जगायचे असेल ना... वीकेंडला मज्जा करायची असेल ना .. तर एवढा पगार अजिबात पुरेसा नाही...म्हणून अमेरिकन लोकं ह्या नोकऱ्या करत नाहीत... म्हणून मग ह्या लोकांना चीनी आणि भारतीय लोकांना नोकऱ्या द्याव्या लागतात ... आपलं कसं.. गुणिले ५० सदैव डोक्यात ... त्यामुळे आपण इकडे लाखभर रुपये दर महिन्याला कमावतो ह्याच मनःस्थितीत आपण काम करत असतो... हे सगळं असंच चालत राहणार... सर्वांच्या गरजा वेगळ्या... ", इकडे आयुष्य काढलेल्या त्या व्यक्तीने तिला समजावले.
नीलमला नंतर मी शहरातल्या एका लायब्ररीबद्दल सांगितले. बस ने अर्ध्या तासावर होती. त्यामुळे जाणे येणे सोपे होते. तिने देखील लायब्ररीबद्दल उत्सुकता दर्शवली. आणि काही महिन्यांमध्ये मला कळले की तिने ती लायब्ररी जॉईन सुद्धा केली आहे.
" बरं झालं तुम्ही मला लायब्ररीबद्दल सांगितलं ते.. आता माझा वेळ थोडा चांगला जाऊ लागला आहे... नाहीतर रोज सकाळी उठून घरातली कामं करायची, फेसबुकवर वेळ घालवायचा, जेवण करायचे मग दुपारी कधी डुलकी....कधी नेटवर पिक्चर बघणे....संध्याकाळी थोडा फेरफटका किंवा कुणाला काही दुखापत असेल तर त्यांची ट्रीटमेंट आणि घरी येऊन विशालची वाट बघणे ह्यात दिवस संपायचा ...आता निदान वाचायला तरी मिळते आहे... तेवढाच वेळ सार्थकी जातो ", नीलम म्हणाली. आज ती मला ग्रोसरी स्टोर मध्ये भेटली होती. माझ्यासारखीच भाजी घ्यायला आली होती.
" अरे वा... ट्रीटमेंट देणे सुरु आहे तर...चांगलं आहे.. चांगलं आहे... पण मग तू हे वाढवत का नाहीस? एवढी डॉक्टर झाली आहेस... तुझ्या ह्या फीजियोथेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ दे की...", मी सहज म्हणालो. माझ्या फिरतीच्या नोकरीमुळे मला काही विषयात कसे अज्ञान आहे हे मला पुढच्या काही सेकंदात कळले.
" अहो, मला बाहेर नोकरी करायला अलावूड नाही... कायद्याने त्याला परवानगी नाही... माझा dependent विसा आहे ना... विशाल नोकरी करतो आणि मी dependent !" तिला मग मी फेरफटका मारून यायच्या अजून काही जागा सांगितल्या. ४० मिनिटांवर असलेला zoo बघायला सांगितला किंवा तासाभरावर असलेले विद्यापीठाचे कॅंपस बघून ये असा सल्ला दिला. विशाल कामात बुडालेला असल्यामुळे गेले बरेच वीकेंड सुद्धा त्याला वेळ नव्हता मिळत. नीलम त्यामुळे एकटी फिरण्यात तशी एक्स्पर्ट झाली होती - सवयीने आणि परिस्थितीने! तिने लगेच होकार दिला. आणि एका शुक्रवारी बाईसाहेब डब्यात sandwiches भरून आणि हातात कोकची बाटली मिरवत university बघायला गेल्या देखील! त्याचा सविस्तर वृत्तांत मला दोन आठवड्यानंतर एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या आधी मिळाला. सुरुवातीला धन्यवाद वगेरे देऊन झाला आणि मग मीच विचारलं.
" काय, कशी वाटली university ?"
" खूप छान! मला वाटलं नव्हतं इथल्या मुलांना एवढं बागडायला मिळत असेल.... ह्यांच्याकडे बघून वाटतं आपण काहीच केलं नाही आयुष्यात! चार भिंतीच्या आड शिक्षकांच्या धाकात शाळेचं आयुष्य गेलं माझं! कधीतरी आठवड्यातून एकदा खेळायला घेऊन गेले तर गेले... कॉलेज मध्ये तर साधं मैदान सुद्धा नव्हतं आमच्या इथे! कधीतरी लहर आली की लायब्ररीत घेऊन जायचे.... तिकडे सुद्धा आमच्या समोर एक पुस्तक ठेवले जायचे... आणि नंतर ते परत घेतले जायचे! खेळायची आणि वाचायची सवय लागणार तरी कशी? आणि इकडे मी बघते काय... मुलं, मुली जिम मध्ये जात आहेत..कुणी सायकल चालवत आहे... कुणी सायकल चालवत आहे... कुणी खेळत आहे... आणि कुणी चक्क गात आहे! नशीबवान पोरं आहेत इकडची!" नीलम हे इतकी तावातावाने बोलली की समोरच्या रांगेत बसलेल्या एक-दोन लोकांनी मागे वळून आमच्याकडे बघितले.
" पण तू देखील डॉक्टर आहेसच! एवढी चांगली फिजिओ झाली आहेस ते... ", मी आपलं उगंच सांत्वन करायचे म्हणून तिच्या डिग्रीची आठवण करून दिली!
" अहो.. कसली डॉक्टर...ती नुसतीच एक जबरदस्ती होती... मला कुठे माहिती होते मी डॉक्टर होणार आहे? आणि झालेच आहे... पण आता त्याचा काही उपयोग आहे का?"
"म्हणजे?" - मी विचारले.
" अहो, दहावीच्या मार्कांनी सर्वात मोठा घोळ घातला आयुष्यात! मला ९०% मिळाले. घरी कुणीतरी डॉक्टर व्हायला हवे होतेच कारण माझ्या आधी घरी कुणीही डॉक्टर झाले नव्हते. तेव्हाच माझे करिअर निश्चित झाले. बारावी होईपर्यंत माझं कल मिडियाकडे जात होता... त्यामुळे टक्केवारी घसरली देखील...८४ वर आली...पण घरचे ठाम होते. माझ्या आईनी बोलून दाखवले होते... माझ्या मुलीच्या नावा मागे डॉक्टर लिहिलेले बघणे हे तिचे स्वप्न आहे म्हणून! माझ्या स्वप्नाची कुणालाच परवा नव्हती.... पण एम.बी.बी.एस करायला तेवढी टक्केवारी पुरेशी नव्हती... बी.डी.एस ला पण नाही मिळू शकला प्रवेश! मी मिडियाचा प्रस्ताव परत एकदा पुढे ठेवला...पण आमच्या आईसाहेबांचे स्वप्नं होते ना.... मग शेवटी फिजियोला प्रवेश मिळाला! आणि अशाप्रकारे मी डॉक्टर नीलम झाले", हसत हसत ती म्हणाली.
"पण मग तू इकडे कधी आलीस?"
" तो म्हणजे बाबांचा साक्षात्कार! फिजियो झाल्यावर तुम्हाला लगेच लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या नाही आहेत... खरंतर त्या कुठेच नाहीत.. .. पण मी स्वतः ५००० च्या नोकरीने सुरुवात केली. वर्ष झालं आणि बाबांनी निष्कर्ष काढला - ह्या अशा पाठी चोळून काहीही होणार नाही... तू सेटल कधी होणार? पण मुलगा डॉक्टरच हवा ह्या अटीने स्थळ शोधणे सुरु झाले... आता ५००० रुपये महिना पगार असलेल्या डॉक्टर मुलीला कुठला डॉक्टर मुलगा भाव देईल? शेवट विशाल दांडेकर हे स्थळ समोर आले. माझ्या एका आत्याच्या बिल्डींग मध्ये ह्याची काकू राहायची...तिकडून कळले! हा काही डॉक्टर वगेरे नव्हता...पण अमेरिकेचा होता ना...लगेच बाबांनी होकार कळवला... मी इकडे येऊन नोकरी करू शकणार नाही हे माहिती असून सुद्धा!"
"पण मग तू काही बोलली नाहीस?" - मी विचाले.
" काय बोलणार? बाबंनी शब्द दिला होता ना.. आणि त्यांच्यामते मी सेटल होण्यासाठी ह्यापेक्षा जास्त चांगली संधी येणे शक्य नव्हते. पण कसली सेटलमेंट... इकडे येऊन समजले की वास्तव निराळेच आहे! विशाल ओहायोला असताना त्याने कसली तरी कन्सलटनसी जॉईन केली होती. ह्याच्यात म्हणे त्याला कुठलेसे software शिकवले गेले आणि नंतर त्याला त्यात ७ वर्षांचा अनुभव आहे असे त्याच्या resume मध्ये लिहिले गेले. आता ज्या मुलाला अमेरिकेत शिकायला येऊन ५ पेक्षा जास्त वर्ष झाली नव्हती त्याला ७ वर्षांचा कुठला आला अनुभव? पण नोकरी देणाऱ्या कंपनीतील recruit करणारा माणूस भारतीय...आणि हा consultant सुद्धा भारतीय! अशी ही अमेरिकेत मोठी साखळी आहे असं कळल्यावर मला धक्काच बसला! आणि नोकरी मिळाल्यावर ह्याच्या बॉसला खरच वाटतं की हा ७ वर्ष अनुभव घेऊन आला आहे.... ते बसलेच आहेत...काम करवून घ्यायला...त्यामुळे शनिवारी आणि रविवारी सुद्धा काम! त्यादिवशी काका म्हणाले होते ते अगदी बरोबर आहे..."
" पण हा तर नोकरी मिळवायचा illegal प्रकार झाला...तुझ्या बाबांना माहिती आहे ह्याबद्दल?"
" अहो, त्यांना तरी किती गोष्टी सांगू मी? त्यांना काय मला देखील वाटले होते आम्ही लगेच सेटल होऊ..... पण apartment मधल्या एका अमेरिकन परिवाराने फेकलेले सोफे आणि खुर्च्या नव्या कोऱ्या परवडत नाहीत म्हणून रात्री बारा वाजता हळूच उचलून आम्ही जेव्हा घरी आणल्या ना...तेव्हा मला इकडची लाईफ काय आहे ते समजले...हे काय मी बाबांना सांगू? विशालला विचारले असता त्याने हेच सांगितले - इकडे असे करावे लागते. बहुतांश भारतीय लोकं हे असंच जगतात! "
गाणे सुरु झाले. आणि डॉ. नीलम अगदी काही क्षणातच ते ऐकण्यात इतकी एकरूप झाली की जणू काही झालेच नाही. जणू काय ती मला काही बोललीच नाही. अर्थात, समोर आलेल्या प्रसंगात अशीच एकरूप होऊन जायची सवय तिला होतीच! अगदी दहावी पासून.
आशय गुणे स्मित

Friday, September 14, 2012

फिझिओथेरापिस्ट - भाग -१

नवीन शहरात किंवा गावी गेलात तर तिथे जाऊन काय करायचे ह्याचे बरेच तोडगे आहेत. खादाडीचा शौक असलेल्यांना त्या शहराचे ( किंवा गावचे ) खाद्यपदार्थ अनुभवता येतात. काहींना ऐतिहासिक वास्तू पाहण्यात रस असतो तर काहींना फक्त खिडकी पलीकडील वस्तू न्याहाळण्यात! ( ह्या दुसऱ्या वर्गातील लोकांची मला भयंकर दया येते! अहो, दुकानात टांगलेला शर्ट घेण्यासाठी कुणी यात्रा करतं का? तसले शर्ट तर आपल्या गावी असतातच की! असो...) काही लोकांना तिथल्या मातीचा, दगडांचा संग्रह करायची हौस असते! ( आता असते बाबा...काय करणार त्याला...) अगदीच लांबची यात्रा असेल तर तिथली जीवनपद्धती पाहण्यात काही लोक रमतात.( ह्यात मात्र मजा असते!) काही लोकांचा ( विशेषतः मुलींचा) तर असा समज असतो की पाच दिवसांपेक्षा जास्त त्यांचा कॅमेरा चालला नाही तर तो कायमचा बंद पडेल! त्यामुळे जातील तिथे शक्य तितके फोटो काढणे ह्या उद्योगात (?) ही लोकं रमतात! थोडक्यात काय, यात्रा आपल्या संग्रहात भर पाडते. आता माझा संग्रह कोणता ह्या प्रश्नावर माझे एकच उत्तर असते - माणसांचा! आत्तापर्यंत अनेक माणसं संग्रही करून ठेवलेली आहेत. काहींची कथा आहे तर काहींची व्यथा. पण प्रत्येकाने माझ्या मनावर त्यांचा एक ठसा उमटवला आहे एवढे नक्की! मग एखाद्या रेंगाळत जाणाऱ्या रविवारच्या दुपारी कुणीतरी काहीतरी बोलतं, किंवा कुठला तरी प्रसंग आठवतो आणि त्या प्रसंगाशी निगडीत असलेली व्यक्ती आठवते. मागच्याच आठवड्यात माझ्या पायात लचक भरली. 'होईल बरा आपोआप' हा माझा पवित्रा ह्या वेळेस मात्र मला महाग पडला. ह्याच अवस्थेत चालणे, पळणे सुरु ठेवल्याने सूज वाढू लागली आणि शेवटी ती इतकी झाली की माझ्या पायाने माझ्यापुढे हात जोडले - आता पुढे नाही चालू शकणार! मग काय, फिझिओला बोलवावे लागले. आणि त्याची ट्रीटमेंट उपभोगताना माझ्या माणसांच्या संग्रहातील एक वल्ली माझ्यासमोर येऊन उभी राहिली! लॉस -अन्जेलीस ह्या शहरी भेटलेली डॉ. नीलम दांडेकर.

माझी नोकरी ही फिरतीची आहे हे किती चांगलं आहे! म्हणजे फिरणे स्वखर्चाने होत नाही हा एकमेव विचार नाही त्यात! ( एकमेव नाही म्हणजे अनेक मधला एक नक्कीच आहे!) पण ह्या नोकरीमुळे अनेक शहरं बघायला मिळतात. आता इतकी शहरं बघितली की ती सारी स्वभावाने एक वाटायला लागली आहेत. प्रत्येक शहर हे सकाळी १०-११ पर्यंत मनसोक्त पळून घेतं. दुपारी जांभया देतं. किंचित डुलकी घेतं. ४ च्या आस पास चहा प्यायल्यावर परत ताजे-तवाने होऊन १० पर्यंत धावून परत एकदा झोपी जातं. हां, आता काही शहरं लवकर उठतात आणि उशीरा झोपतात हे खरं असलं तरी मूळ स्वभाव हा! एखाद्या गजबजलेल्या भागात एका न गजबजलेल्या bus stop वर बसून शहराची हालचाल न्याहाळण्यात जी मजा आहे ना ती कशात नाही! माझ्या कंपनीने मला कामानिमित्त लॉस- एन्जेलेसला पाठवले तेव्हाचा प्रसंग. अशाच एका शनिवारी bus stop वर बसलेलो असताना बाजूला थोडी कुजबुज ऐकू आली. शनिवार असल्यामुळे त्या जोडप्याचे बोलणे ग्रोसरी बद्दल असावे म्हणून मी फार काही लक्ष दिले नाही. पण सहज कान टवकारले तर मराठी भाषा! आता महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी कुटुंबातील एक अशा संख्येने जरी लोकं अमेरिकेत आली तरी भर रस्त्यात मराठी? त्यामुळे हे जोडपे नुकतेच लग्न करून आले असावे असा अंदाज मी बांधला आणि तो पुढे खरा देखील निघाला! आणि ह्यांच्या मराठीचे इंग्लिश होण्याआधी आपण ह्यांच्याशी ओळख करून घेऊ आणि मराठीत बोलून घेऊ म्हणून मी पुढे सरसावलो. हे होते श्री व सौ. दांडेकर. नुकतेच लॉस-एन्जेलेसला आले होते. आणि आश्चर्य म्हणजे मी राहतो तिकडेच जवळपास राहत होते.

आमची बस आली आणि आम्ही घराकडे जाऊ लागलो. जाता जाता इतके समजले की श्री. दांडेकर - म्हणजे विशाल - हा ओहायो मधून ग्रेज्यूएट झाला होता आणि गेली चार वर्ष एल.ए मध्ये राहून काम करतो आहे.
सौ. दांडेकर अर्थात नीलम हिला अमेरिकेला येऊन नुकतेच सहा महिने झाले होते. तिचे अमेरिका दर्शन हे कॅलिफोर्निया ह्या सुंदर राज्यातून सुरु झाल्यामुळे ती अत्यंत खुश होती. म्हणजे भारतातील त्रुटी तिला आठवत होत्या इतकी प्राथमिक पायरी तिची होती! आज शनिवार असल्यामुळे दोघांना बाहेर पडायला वेळ मिळाला होता आणि नवीन ओळख निघाली म्हणून नीलम जरा आनंदी वाटली. विशाल मात्र बरीच वर्ष इकडे राहत असल्यामुळे त्याला माझ्याशी झालेल्या ओळखीने फार काही आनंद झाला होता असं मला वाटलं नाही.
" आम्ही सहसा बसने प्रवास करत नाही. तिकीट काय महाग आहे हो इकडे. मी ओहायोला होतो तेव्हा मात्र परवडायचं. कॅली म्हणजे प्रचंड महाग", विशाल मला म्हणाला. त्यांची अवस्था मी समजू शकत होतो. नुकतेच लग्न झाल्यामुळे त्याला आता दोघांचा खर्च उचलायला लागत होता. इतके दिवस रूम-मेट्स बरोबर खर्च विभागला जायचा. पण आता कसले रूम-मेट्स! आता अमेरिका नावाच्या त्या संधी-राज्यात ह्या दोघांना चालायचे होते. पुन्हा भेटत जाऊ असं म्हणून ते दोघे घरी गेले. मी काही अमेरिकेत विद्यार्थी म्हणून आलो नव्हतो. त्यामुळे माझी परिस्थिती 'शून्यातून निर्माण करणे' अशी नव्हती. त्यामुळे ह्यांचं चांगलं होऊ दे असाच विचार मनात ठेवून मी घरी आलो.

आता कॅलिफोर्निया म्हटलं तर माझ्यामते तरी सर्वात जास्त भारत-प्रेम असलेलं राज्य! ह्याचा अर्थ खूप भारतीय इकडे आहेत म्हणून नव्हे! आणि भारतीय आहेत म्हणून भारत प्रेम आहे हा समज तरी कुठे बरोबर आहे? पण ह्या राज्यातील भारतीयच नव्हे तर अमेरिकन आणि इतर देशातून आलेले लोक सुद्धा भारतीय संगीत आणि कलांच्या प्रचंड प्रेमात आहेत! रवी शंकर, झाकीर हुसैन, अली अकबर खान, आशिष खान, स्वपन चौधरी ही सगळी मंडळी इकडेच तर राहतात! आणि आली अकबर खान ह्यांनी आपली म्युसिक स्कूल ह्या राज्यात उभारल्या पासून तर ह्या राज्याचं भारतीयत्व अजून वाढलं आहे! त्यामुळे झाकीर हुसैन ह्यांच्या तबला वादन कार्यक्रमात मागे तंबोरा वाजवायला चीनी माणूस बसला तरी कुणाला त्याचे विशेष वाटत नाही. किंवा आली अकबर खान ह्यांना तंबोरा साथ कुण्या एका युरोपीय माणसाने केली तरी त्यात काही विशेष नाही! इकडे लोकांना ह्याची सवयच झाली आहे. त्यामुळे वीकेंडला होणाऱ्या कार्यक्रमात बहुतांश कार्यक्रम हे भारतीयच असायचे! सुदैवाने दांडेकर जोडप्याला भारतीय संगीतात थोडा रस होता.

" अरे काय म्हणताय! बऱ्याच दिवसांनी! कसे आहात?" गुरुवारी रात्री ग्रोसरी स्टोर मध्ये पोळ्या घेताना नीलम मला भेटली.
" बरा आहे. मग अमेरिकेत दिवस खूप पटापट जातात. जवळ जवळ महिना झाला आपल्याला भेटून. लक्षात आलं असेल ना एव्हाना", मी म्हणालो.
" हो ना! पण आता मी पण थोडी रुळायला लागली आहे. इकडे येऊन ग्रोसरी विकत घेईपर्यंत किंवा थोडंफार फिरायला जाईपर्यंत मला आता माहिती झाली आहे", ती म्हणाली.
" ह्म्म्म ...बरं ते जाऊदे... शनिवारी केन झुकरमनचे सरोद वादन आहे. आपल्या इकडच्या चर्च मध्ये. येताय का दोघे?
" नाही हो. आवडले असते. पण विशालला नाही वेळ. तो उशीरा घरी येतो. जेवणाचं पण बघावे लागले ना त्यादिवशी", ती म्हणाली.
" शनिवारी पण नाही?" मी थोडासा चकित झालो. " अहो, मागच्या महिन्यात आपण भेटलो होतो ना तेव्हा कुठे जवळ जवळ दोन महिन्यांनी त्याला माझ्या बरोबर थोडा वेळ फिरता आलं होतं. त्यानंतर परत तो बिझी आहे तो आहेच!"
" कुठे आहे तो नोकरीला?"
" चेझ बँक ", ती म्हणाली. अमेरिकेत माणसं वीकेंडला मज्जा करतात एवढेच संस्कार मनावर कोरलेला मी, मला हे अगदीच नवीन होते. माझ्या ऑफिस मध्ये सुद्धा सर्व अमेरिकन शुक्रवारी दुपारी ४ लाच ऑफिस मधून पळताना मी पाहत होतो. हा प्रकार निराळाच होता! पण घरात एकट्याने बसून दिवस घालवणाऱ्या नीलमची मात्र मला थोडी कीव आली. आपण हिला सुद्धा आपल्या ग्रुप मध्ये जमवून घेतलं पाहिजे असं मला त्या दिवशी कुठे तरी वाटलं.

आमचा ग्रुप हा वीकेंडला कुणाच्या तरी घरी भेटायचा. ४-५ तास मनसोक्त गप्पा मारायचो. क्वचित कुठेतरी फिरायला जात असू. कधीतरी कुठल्या मैफलीला हजेरी लावत असू. ग्रुप मधले बरेच भारतीय हे तिकडचेच नागरिकत्व मिळवलेले. पण मनात अधून मधून भारताची चक्कर मारून येणारे! त्यांची मुलं ही वीकेंड असल्यामुळे बाहेर भटकायला जायची. आणि आमच्या ग्रुपने एका शनिवारी उस्ताद आशिष खान ह्यांचे सरोद वादन ठरवले! जवळपास खांसाहेबांचा एक शिष्य राहायचा. त्याच्या ओळखीने हा योग जमला! आणि ठरलं... शनिवार १० ऑक्टोबरला खांसाहेब ह्यांचे वादन!

आम्ही सर्वांनी खूप उत्साहाने काम केले. आमंत्रणं दिली. तिकिटे विकली. अर्थात आशिष खान हे नाव आमचे काम सोपे करत होतं. खांसाहेब नुस्क्तेच युरोपचा दौरा करून आले होते. विमानतळावर त्यांना आणायला गेलो तेव्हा गेले दोन महिने त्यांचे वादन कुठे कुठे झाले हे ऐकून थक्क होत होतो. गर्दी जमली होतीच. बरोबर वेळेत खांसाहेब तयार झाले आणि स्टेज चढणार एवढ्यात.....
त्यांच्या पाठीत दुखायला लागले. त्यांनी 'आ....' अशी जोरात आरोळी ठोकली. त्यांना उभं राहता येईना. कळवळत, विव्हळत ते खाली बसले. आम्हाला काय करायचे काही कळेना. लगेच एकाने डॉक्टरला फोन करायला सुरुवात केली. पण आमचा हा एरिया थोडासा शहरापासून बाहेरच्या बाजूला होता. त्यामुळे डॉक्टर यायला वेळ लागणार होता. खांसाहेब काही कळवळायचे थांबत नव्हते. आणि अचानक एक मुलगी पुढे आली. तिने खांसाहेबांना हळुवारपणे पोटावर झोपवले. कुणीही काहीही बोलायच्या आत चटकन लचक भरलेला भाग शोधून काढला. आणि हळुवार मसाज द्यायला सुरुवात केली. खांसाहेब हळू हळू शांत होऊ लागले. आणि तो मसाज इतका चांगला जमला की डॉक्टर येईपर्यंत खांसाहेब उठून उभे राहिले.
" तुम्हाला ए.सी मध्ये वारंवार वावरल्यामुळे असं झालाय. थोड्याशा स्ट्रेचिंगची गरज आहे", नीलमने अगदी आत्मविश्वासाने आणि ठामपणे खांसाहेबांना समजावले. आणि तिने त्यांना हलके व्यायाम पण करून दाखवले. खांसाहेब प्रचंड खुश होते. आलेल्या डॉक्टरांनी देखील नीलमचे खूप कौतुक केले. ह्या मुलीने आम्हाला काहीच काम नाही करू दिले....स्वतः खूप चांगले हाताळले वगेरे तारीफ केली. आम्ही सारे अर्थात अवाक होऊन बघत होतो.
" यह लडकी कमाल है! जिस बारीकी से हम हमारे आलाप बजाते है ठीक उसी बारीकी से इसने हमारा इलाज कर दिया!" खुद्द खांसाहेब असं म्हणाल्यावर आम्ही काय म्हणणार? त्यादिवशी खांसाहेबांनी इतके उत्कृष्ट वादन केले की अजून सुद्धा ते माझ्या तंतोतंत लक्षात आहे! आणि मुख्य म्हणजे नीलम वर खुश होऊन त्यांनी आमच्याकडून बिदागी पण घेतली नाही. मैफलीनंतरच्या खांसाहेबांच्या घेरावानंतर आता नीलमचा घेराव झाला. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मी देखील त्यात सामील होतो.
"हे सगळं तुला कसं काय सुचलं? कमाल आहे तुझी!" मी आनंदाने म्हणालो.
"अहो, जमायचे काय...माझे ते क्षेत्र आहे", ती हसत हसत म्हणाली.
"म्हणजे?"
"अहो! मी डॉक्टर आहे. भारतात फिजियोथेरपी केली आहे. डॉ. नीलम दांडेकर!"
त्या गर्दीत आश्चर्य वाटणाऱ्या लोकांपैकी मी काही एकटा नव्हतो!




आशय गुणे स्मित