Pages

Total Pageviews

Sunday, January 10, 2016

शास्त्रीय संगीत - अस्वस्थ श्रोता/ अस्वस्थ कलाकार?

मानसशास्त्रात emotional self awareness हा एक बराच प्रचलित विषय आहे. ह्या विषयात एखाद्या व्यक्ती मध्ये असणाऱ्या विशिष्ट भावना आणि त्यांच्यामुळे होणारे परिणाम ह्याचा अभ्यास होतो. ह्या विशिष्ट भावनांमुळे आपल्या कार्यक्षमते वर काही परिणाम होतो का, आपल्या एकंदर वागण्यावर काही परिणाम होतो का हे देखील अभ्यासले जाते. ह्या विषयाच्या अभ्यासात असे आढळले की समोर आलेल्या परिस्थितीला एखादी व्यक्ती दोन प्रकारे सामोरे जाते. एक म्हणजे ती व्यक्ती अति शीघ्र पद्धतीने प्रतिक्रिया करते ज्याला शब्द आहे react करते. आणि दुसरे म्हणजे ती व्यक्ती समोर आलेली परिस्थिती समजून घेते, त्यावर विचार करते आणि मग एक संतुलित प्रतिसाद देते ज्याला शब्द आहे respond करते. पहिल्या प्रकारे सामोरे जाणारी व्यक्ती ही अस्वस्थता, संयम आणि एकाग्रता ह्यांचा अभाव दर्शवते कारण तेथे प्राधान्य परिस्थिती समजून घ्यायला नसते तर लगेच एखादी प्रतिक्रिया करणे ह्याला असते. दुसऱ्या प्रकारे सामोरे जाणारी व्यक्ती मात्र संयमित, संतुलित असणे आणि एकाग्रता ह्यांचे दर्शन घडविते. शिवाय तुमच्यात विचार करण्याची एक प्रक्रिया आहे ( thought process) ह्याची देखील अपेक्षा ठेवते.

शास्त्रीय संगीत ही एक विचार- प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी तुम्हाला वरीलपैकी दुसऱ्या प्रकारच्या लोकांची गरज आहे. किंवा जी लोकं शास्त्रीय संगीत ऐकतात किंवा सादर करतात त्यांच्यात एका टप्प्याला हे गुण विकसित होतील ह्याची शाश्वती प्राप्त होण्याची अपेक्षा आपण करू शकतो. मात्र ह्या सगळ्यावर आपल्या दैनंदिन जगण्याचा देखील प्रभाव पडू शकतो का? किंवा तसा तो पडला आहे का?

हा विषय सुरु करण्या आधी आपल्याला शास्त्रीय संगीताच्या मैफलीची एकंदर मांडणी समजून घेतली पाहिजे. शास्त्रीय मैफल ही एक बैठी क्रिया आहे. समोर कला सादर करणारा कलाकार आणि श्रोते हे दोघेही बसल्या अवस्थेत असतात. मैफलीची सुरुवात धीम्या गतीने होते. ही विलंबित लय तशीच ठेवून त्यात एका मागोमाग एक सूर चढवले जातात. धीम्या गतीने संथ वाहणारे सूर अर्थात आलाप. त्यानंतर आणि एका विशिष्ट बढत झाली की मग सुरांची लय वाढते आणि त्याला तान असे म्हणतात. तो पर्यंत तालाची देखील लय वाढलेली असते. शेवटी गाणे एक विशिष्ट द्रुत गति पकडते आणि मैफल समाप्त होते. एकूण काय तर ही एक प्रक्रिया असते. मैफलीत एकदम असे काही घडत नाही. परंतु एक उत्कृष्ट मैफल घडविण्याची जबाबदारी कलाकार आणि श्रोता ह्या दोघांवर असते. कलाकार जर ह्या प्रक्रियेत स्वतःला सामावून घेत नसेल आणि त्याला 'पुढे' जायची आणि द्रुत गायची/वाजवायची घाई असेल तर मैफलीचा मथितार्थ साध्य होणार नाही. ह्याच प्रकारे जर श्रोता वर्ग 'लगेच' काहीतरी घडेल अशी आशा मनात घेऊन बसला आणि त्या प्रक्रियेशी एकरूप नाही झाला तर मैफलीचा हेतू कदापि साध्य होणार नाही. वरील सिद्धांताच्या अनुषंगाने विचार केला तर कलाकाराने समोर असलेल्या परिस्थितीला ( रागाला, तालाला) एका प्रक्रिये द्वारे  respond करणे अपेक्षित आहे, react करणे नाही. आणि हीच अपेक्षा आपण श्रोत्यांकडून कमी- अधिक प्रमाणात करायला हरकत नाही.
आपण त्या प्रक्रियेत जसे आपल्याला सामावून घेऊ तशी ती आपल्याला अधिक समजत जाते. आणि त्या वाटेवर प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी नवीन अनुभवायला मिळते. कलकत्त्यात एकदा भीमसेन जोशी ह्यांचे तीन संगीत संम्मेलनांमध्ये सलग गाणे होते. एक झाले की पुढे दुसरीकडे जायचे. ह्या तिन्ही ठिकाणी त्यांनी राग तोडी गायला होता. गंमत म्हणजे बरेच लोक त्यांचे एका ठिकाणचे गाणे झाले की दुसरीकडे तोच राग ऐकायला जात होते आणि पुन्हा तिसऱ्या ठिकाणी सुद्धा! गायक आणि श्रोता प्रत्येक ठिकाणी स्वतःला त्या प्रक्रियेत सामावून घेत होते आणि आनंदाची नवीन अनुभूती त्यांना प्रत्येक ठिकाणी मिळत होती. भीमाण्णा आणि ते सारे श्रोते ह्यांच्या संयमाला दाद द्यायलाच हवी!

आणि इथे विषय जरी शास्त्रीय संगीताचा असला तरीही दैनंदिन आयुष्यात देखील अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला स्वतःला एका प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यायचे आमंत्रण देतात. कुंभाराचे मडके बनविणे ही एक प्रक्रिया आहे, चित्रकाराचे चित्र काढणे ही देखील आहे. एखादे पुस्तक वाचणे ही देखील एक प्रक्रियाच आहे. घाई-घाईत वाचलेले पुस्तक जेव्हा दुसऱ्यांदा शांत चित्ताने वाचले की त्यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला नव्याने समजतात! ध्यान लावून बसणे ही देखील एक प्रक्रियाच आहे.

आणि ह्या प्रक्रियेत आपण स्वतःला सामावून घेतलं तर काय होतं? तर त्याने आपली 'पुढे काय होणार' ही सतत असणारी उत्सुकता कमी होऊन आपण आहे ते क्षण अनुभवायला शिकतो. समोर असलेला क्षण अधिक चांगला अनुभवता यावा ह्या प्रयत्नाने आपली एकाग्रता वाढते. आपला संयम वाढतो आणि एकंदर प्रक्रिया समजून घेताना सहनशीलता वाढते. आपली ऐकून घेण्याची प्रवृत्ती सक्षम होते. अर्थात हे तेव्हा होईल जेव्हा आपण respond करू आणि react करायचे कमी करू. कोणत्याही क्षेत्रातील दिग्गजांकडे आपण पाहिले तर त्यांच्यात आपल्याला हेच गुण आढळतील.
आणि ह्या अनुषंगाने रोज झपाट्याने बदलणाऱ्या जीवनपद्धतीकडे पाहिले तर आपल्या सर्वांमध्ये झालेले बदल अगदी सहज लक्षात येतात. आणि ह्या बदलांमुळे मैफल ऐकायला येणारा श्रोता हा देखील देहबोली ने बदलला आहे. त्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. साधारण दशक भर पूर्वीचा श्रोता आणि आजचा श्रोता ह्यांच्यात बराच फरक जाणवतो.
गेल्या दहा-एक वर्षात आपला देश हा झपाट्याने बदलला आहे. तसा तो आधुनिक होत गेला त्याची सुरुवात १९९१ च्या उदारीकरणा पासून झाली असं म्हणायला हरकत नाही. देशात नवीन उद्योग स्थापन झाले, रोजगारसंधी उपलब्ध झाल्या आणि सर्व क्षेत्रात आणि एकूण सगळीकडे बऱ्याच संधी उपलब्ध झाल्या. परंतु गेल्या दहा-बारा वर्षात जर कोणते बदल ह्या देशात झाले असतील तर ते म्हणजे झपाट्याने झालेले शहरीकरण आणि ह्या साऱ्या प्रक्रियेतून तयार झालेला मध्यमवर्ग. संख्येने विपुल असा हा नव-मध्यमवर्ग आहे. आर्थिक स्थिती सुधारलेला आणि त्यामुळे बरीच ऐहिक दालनं खुली झालेला असा हा वर्ग म्हणता येईल. साहजिकच वाढत्या शहरांमध्ये रोजगारसंधी देखील वाढल्या आणि त्यामुळे आयुष्याला एक गति आली. महाराष्ट्र हे शहर तर त्यात अग्रगण्य मानले पाहिजे. मुंबई शहराची गति तर अजून वाढली. बोरिवलीचा माणूस देखील ऐरोलीला कामाला जाऊ लागला. परंतु ह्या गोष्टी मुळे दिवसाच्या प्रत्येक क्षणाला कसलेसे लक्ष्य समोर ठेवण्याचा स्वभाव मनात घर करू लागला. सकाळची आणि संध्याकाळची लोकल हे मुंबईकरांचे लक्ष्य आधीपासून होतेच. परंतु लांब असलेल्या नोकरीमुळे त्यात ट्रेन मधून उतरलो की पुढची बस पकडणे, येताना पुन्हा ती पकडणे आणि म्हणून विशिष्ट वेळेत सारे काम आटपायचा प्रयत्न करणे ही नवीन लक्ष्य निर्माण झाली. इतर शहरांचा अगदी असा प्रश्न नसला तरीही त्यांच्या वाढत्या विस्तारामुळे आणि सतत लोकांच्या होत असलेल्या विहारामुळे तिथल्या राहणीमानात एक गति निर्माण झाली आहे. साहजिकच लोकांचा कल प्रत्येक गोष्ट 'लगेच' होण्यामध्ये आहे. आणि अर्थात त्यामुळे वाढत चालली आहे अस्वस्थता! कारण आपल्या सर्वांना सतत कोणती तरी क्रिया करायची सवय झाली आहे. कारण स्वस्थ एके ठिकाणी आपण बसतोच कुठे? त्यामुळे गेल्या काही वर्षात रस्त्यावर वाजणारे हॉर्न हे एकाएकी कसे वाढले ह्याचे उत्तर आपल्याला सापडू शकेल. कारण समोरची गाडी थांबली की दोन सेकंद तिच्यामागे थांबण्या ऐवजी आपल्याकडून एक क्रिया होऊन जाते. समोरचा सिग्नल बदलायला १० सेकंद जरी शिल्लक असली तरीही गाड्या पुढे पुढे सरकताना आपल्याला दिसतात. कारण आपण १० सेकंद सुद्धा एके ठिकाणी स्वस्थ थांबू शकत नाही. असेच आपल्यात झालेले बदल आपण स्वतः तपासून पाहू शकतो. हेच पुरेसे नव्हते तर गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्यात 'सोशल मिडिया' आणि 'स्मार्टफोन' ह्या दोन चमत्कारांनी प्रवेश केला आहे. ह्या गोष्टींवर मी टीका करणार नाही कारण त्यांचा मूळ हेतू हा वाईट नाही, उलट त्या उपयोगी गोष्टीच आहेत. परंतु आपल्याला जर वेळ मिळाला की आपण ह्या माध्यमांचा उपयोग करू लागतो. काही काम सुरु असताना मध्येच त्यात 'डोकावणे' ही सवय हल्ली सर्वांना लागली आहे. तरुण शाळा- कॉलेज मधल्या मुलांना तर अगदी भरपूर प्रमाणात! हा पण वाढत्या अस्वस्थतेचा एक भाग म्हटला पाहिजे. कारण हल्ली आपल्याकडे रिकामा ( रिकामटेकडा नव्हे!) वेळ उरलेलाच नाही. जे काही रिकामं, स्वस्थ बसवणारं असेल ते कुण्या एका क्रियेने भरले जाते.

आणि ह्याच गोष्टीचा परिणाम हल्ली मैफलीत दिसू लागला आहे.    
       
मैफलीत बसलेला श्रोता हा देहबोलीने सतत एका अस्वस्थतेने ग्रासलेला असा भासतो. प्रेक्षागारात आल्यापासून श्रोत्यांमध्ये एकप्रकारची चुळबुळ जाणवते. मैफल सुरु होईपर्यंत आणि कधी कधी सुरु झाल्यावर देखील श्रोत्यांच्या गप्पा काही थांबत नाहीत. गाणं-वाजवणं सुरु झाल्यावर देखील बरेच श्रोते एकमेकांशी बोलताना आढळतात. बऱ्याच श्रोत्यांना अधून मधून मोबाईल मध्ये डोकं घालावेच लागते. बऱ्याच श्रोत्यांचे मोबाईल वाजतात आणि काही तर तिथेच खाली वाकून बोलून देखील घेतात. हल्ली श्रोते प्रत्येक छोट्या जागेवर टाळ्या वाजवताना आढळतात आणि असे करण्याने कलेची सलगता बिघडते हे कुणालाच लक्षात येत नाही. ह्याला कारण परत तेच. समोर येणारे क्षण सहन न करता, त्या प्रक्रियेला सामोरे न जाता आपण टाळ्या वाजवून एक क्रिया करीत त्याला प्रतिसाद देत असतो. बरेच श्रोते हे भर मैफलीत खोकताना आढळतात. एकदम आजारी व्यक्ती मैफलीला आली तर असे होण्यास माझी काहीही हरकत नाही. परंतु जर बरीचशी एकाग्रता श्रोत्यांनी ठेवली तर खोकणे, शिंकणे वगेरे विसरून तो श्रोता संगीताशी साम्यावस्थेत नक्कीच पोहोचू शकतो. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे श्रोत्यां मधली एकाग्रता कमी होताना आढळते आहे. आणि दिवसेंदिवस ह्या गोष्टी वाढतच आहेत.
आता कलाकार देखील ह्याच समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणात देखील बदल होताना दिसत आहे. एके काळी सव्वा तास चालणारा ख्याल हल्ली चाळीस मिनिटांमध्ये संपतो. वीस ते पंचवीस मिनिटांची ठुमरी आता पंधरा मिनिटांमध्ये संपते. सुरुवातीचे आलाप आता स्वरांचे तेवढे स्थैर्य राखून गायले- वाजवले जात नाहीत; उलट त्यांच्यात देखील जलदता वाढली आहे. एक पिता-पुत्र वादक आपल्या देशात बरेच लोकप्रिय आहेत. परंतु वडील जसे आलापी करायचे किंवा करतात तेवढे स्थैर्य मुलाच्या वाजवण्यात आढळत नाही. त्याच्यात आढळणारी जलदता ही तो प्रतिनिधित्व करीत असलेल्या समाजाच्या अधीरतेचे प्रतिक कदाचित म्हणता येईल!
भारतीय शास्त्रीय संगीत हे काळानुरूप बदलत आलेले पण तरीही आपले सैद्धांतिक अस्तित्व टिकवून ठेवलेले संगीत आहे. त्यामुळे कदाचित बदलत्या समाजाच्या पार्श्वभूमीवर हे संगीत एक वेगळे रूप घेईल. कदाचित त्याची लांबी कमी होईल, स्वरूप थोडेसे बदलेल. परंतु ह्या घडीला श्रोत्यांमध्ये आणि बऱ्यापैकी प्रमाणात कलाकारांमध्ये आढळलेला हा बदल मात्र लक्षणीय आहे. आणि काही प्रमाणात चिंता व्यक्त करायला लावणारा देखील. कारण शेवटी हे आपल्याच समाजाचे प्रतिबिंब आहे. शिवाय शास्त्रीय संगीत ही चौकट सोडून विचार केला तर बाकी क्षेत्रांमध्ये जिथे 'प्रक्रिया' महत्वाची आहे तिथे देखील हेच अनुभवता येते. मग तो नाटक बघणारा श्रोता असो वा सिनेमा पाहणारा. आज परिस्थिती अशी आहे की सर्वांना अंतिम निकालाची उत्सुकता असते, तिथे पोहोचविणाऱ्या प्रक्रियेची नाही. प्राचीन चीनी विचारवंत लाओ त्झु चे हे वाक्य आपल्या साऱ्यांची स्थिती दर्शविते:

           Do you have the patience to wait
       till your mud settles and the water is clear?


- आशय गुणे :)




Published on October 19, 2014 ( Digital Diwali Ank – 2014) 

तेजोमय स्वराकार... किशोरीताई आमोणकर

कुठलीही व्यक्ती भोवती घडणाऱ्या क्रियेला दोन प्रकारे सामोरे जाते. पहिला प्रकार म्हणजे, ती क्रिया समजणे; तर दुसरा प्रकार म्हणजे, ती क्रिया अनुभवणे. समजण्याच्या क्रियेत आपल्या साथीला असतात शब्द. आणि आपण एका विशिष्ट भाषेत व्यक्त होतो; परंतु अनुभवण्याच्या स्थितीत आपल्या साथीला असतात बऱ्याच अनामिक भावना. आणि त्याच्या जोडीला असतात, बरेच अमूर्त विचार आणि अगणित पैलू! त्यामुळे अनुभवण्याची स्थिती ही अधिक व्यापक आणि गूढ असते. उदाहरण द्यायचे झाले तर अशी कल्पना करूया की, आपण एक रम्य भूप्रदेश पाहत आहोत किंवा सूर्योदय होताना त्या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण जर या घटना समजून घेतल्या, तर काही वाक्यांमध्ये त्या घटनांचे वर्णन आपल्याला करता येईल. परंतु त्या अनुभवण्याचा प्रयत्न केला, तर मनात तऱ्हेेतऱ्हेेचे विचार येतात! हीच घटना दुसऱ्या दिवशी आठवली, तर तिच्याशी संबंधित अजून काही पैलू आपल्याला लक्षात येतात. महिनाभरानंतर जर ती घटना आठवली तरीही स्वतःशीच अजून काही पैलू उलगडले जातात. याचे कारण असे की, आपल्याला सौंदर्याची अनुभूती होत असते. असाच हरघडी नवी अनुभूती देणारा किशोरी आमोणकरांचा अलौकिक सूर.

किशोरीताईंचा हा सूर म्हणजे संपूर्ण गोलाई! एक स्वच्छ, तेजोमय आकार; ज्याला एक भेदक तीव्रता आहे. परंतु या गोलाईची सखोलता अशी की, त्यात निर्माण होणाऱ्या कंपनात अगणित भाव समाविष्ट झालेले जाणवतात. खरं तर स्वर केवळ सात आणि त्यांचे प्रकार मोजून त्यांची एकूण संख्या बारा एवढी होते. त्यात संगीताचे नियम असे की, एका रागात एक विशिष्ट स्वर-समूहच असावा लागतो. परंतु वरील लिहिलेले ‘कंपन’ आणि स्वरांच्या गोलाईची सखोलता ही प्रत्येक रागाचे रूप आणि त्यातून निर्माण होणारे विशिष्ट भाव कसे काय निर्माण करते, हे एक शब्दांच्या पलीकडले अनुभवणे आहे. कदाचित यालाच ‘दिव्यत्व’ असेही म्हणत असावेत.

अनेकदा माझ्या पहाटेची सुरुवात किशोरीताईंच्या ‘ललित पंचम’, ‘बिभास’, किंवा ‘मिया की तोडी’ या रागांनी होते. हिंदुस्थानी राग संगीतात वेळेला खूप महत्त्व आहे. पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र असे राग सादर करण्याचे विभाजन केले गेले आहे. पहाटे त्यांचा ‘मिया की तोडी’ ऐकला की, त्यांच्या त्या सुरांमध्ये उगवत्या सूर्याचे तेज झळकते. मात्र ‘ललित पंचम’ हा राग गाताना जेव्हा त्या ‘उडत बुंद’ या रचनेत ‘बुं’ या शब्दाने समेवर येतात, तेव्हा त्या क्षणाला एका अनामिक भूप्रदेशावर झालेला सूर्योदय डोळ्यासमोर येतो. या रागात मात्र त्यांच्या सुरांमध्ये रम्यता अधिक भासते. यापेक्षा वेगळा अनुभव येतो, जेव्हा त्या बिभास रागात ‘नरहर नारायण’ गातात. त्या वेळेस मात्र सूर्योदय होण्याच्या आधीचा एक भूप्रदेश डोळ्यासमोर येतो. याच्या जोडीला आपला आजचा दिवस कसा जाईल, या विचाराची किंचित हुरहूरदेखील जाणवते!

जसा दिवस पुढे आपल्याला कवेत घेत जातो, तशी आपली मनःस्थितीदेखील बदलत जाते. दुपारच्या वेळेस सूर्याचे डोक्यावर स्थिरावणे, कामामुळे येणारा क्षीण आणि पुढे शिल्लक असलेल्या कामांचा वेध, अशा वेळेस माझ्यासमोर ताईंचे ‘शुद्ध सारंग’ आणि ‘मधमाद सारंग’ हे राग येतात. या रागांमुळे मनाच्या या अवस्थेत प्राप्त होणारी शीतलता केवळ अवर्णनीय! ‘शुद्ध सारंग’मधला त्यांचा दोन मध्यमांचा हळुवार प्रयोगही शांती प्राप्त होण्यासाठी कारणीभूत ठरतो. तीच किमया त्यांच्या ‘मध्यमाद सारंग’मधल्या ‘जबसे मन लागो’ या बंदिशीची! त्यात ‘शुद्ध सारंग’ हा मला बाहेरच्या वातावरणाशी अधिक संबंध जोडणारा वाटतो, तर ‘मध्यमाद सारंग’ हा या वातावरणामुळे मनात डोकावणारा वाटतो. अशा वेळेस रागाचे नाव, त्यात वापरलेले स्वर या तांत्रिक बाबींना काहीही अर्थ उरत नाही. मात्र, सकाळची रम्यता आणि दुपारची शीतलता हे मनावर बदललेल्या वेळेनुसार होणारे परिणाम अनुभवण्याशिवाय लक्षात यायचे नाही. याच बदलत्या मनःस्थितीत संध्याकाळची व्याकुळता त्यांचे ‘ललितागौरी’, ‘पुरिया धनश्री’ आणि ‘भीमपलास’ हे राग व्यक्त करीत आलेत. कोणतीही व्यक्ती-मग ती जगाच्या पाठीवर कुठेही असो-संध्याकाळच्या वेळेस एक प्रकारची अस्वस्थता अनुभवतेच. त्या क्षणी मनात एक अनामिक पोकळी निर्माण होतेच होते! सूर्यास्ताची ही वेळ ‘माझे कुणी तरी ऐका’ हे सर्वात प्रकर्षाने सांगणारी असते. त्यांचे या वेळेस ऐकलेले राग या गोष्टीची पुष्टी नक्कीच करतात आणि वाटते की, शास्त्रीय संगीत किंवा रागसंगीत हे तंत्र आणि शास्त्र या पलीकडे जाऊन भावना व्यक्त करणारे उच्च दर्जाचे भाव-संगीत आहे!

परंतु इथे एक गोष्ट कबूल करावी लागेल की, मी त्यांच्या रात्रीच्या आणि मध्यरात्रीच्या रागांचा अधिक चाहता आहे. कारण मी या वेळेस स्वतःला अधिक मुक्त समजतो! दिवसभरातील ताणतणाव संपल्यामुळे स्वतःकडे अधिक लक्ष देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या वेळेस गायलेले राग मला अधिक भिडतात आणि माझ्या मनात डोकवायला अधिक प्रवृत्त करतात! याच वेळेस एक उत्साह आणि आनंद बाळगून परंतु अलगद पावलं टाकीत त्यांचा ‘भूप’ माझ्या मनात प्रवेश करतो! या रागात त्यांनी गायलेले ‘सहेला रे’ हे सर्वश्रुत आहेच. किंचित लडिवाळ आणि लाजत येणाऱ्या बागेश्रीचे सूर तो ऐकून झाल्यावर रुंजी घालत राहतात. ‘शुद्ध कल्याण’ आणि ‘रागेश्री’ या रागांमध्ये तर त्यांचे सूर मातृत्वाचे रूप धारण करतात! नुकताच ४ फेब्रुवारीला वरळीला नेहरू सेंटर येथे त्यांचा ‘शुद्ध कल्याण’ अनुभवला. त्या वेळेस त्या ‘एसी’ असलेल्या सभागृहात त्यांच्या सुरांनी मला पांघरूण घातले होते. तसाच त्यांचा रागेश्री प्रत्यक्ष अनुभवायचे भाग्य मला लाभले आहे. त्यातील ‘देखो शाम गहरी नींद’ ऐकताना त्या सुरांनी अक्षरशः मला प्रेमाने थोपटले आहे. त्यांचा ‘भूप नट’ ऐकला की, माझ्यासमोर एक स्वतःशीच हसत आणि किंचित लाजणारी तरुणी उभी राहते! मात्र त्यांचा ‘मालकंस’ साधनेचे रूप धारण करतो आणि ऐकणाऱ्यालादेखील एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवतो!

किशोरीताई यांच्या संगीताचा एकूण ‘कॅन्व्हास’ फार मोठा आहे आणि इथे नमूद केलेले राग ही त्यातली काही उदाहरणं आहेत. याचबरोबर त्यांचे ऋतुप्रमाण रागदेखील आहेत! या जागेत प्रत्येकाचा समावेश करणे अशक्य आहे.

परंतु इथे महत्त्वाचा प्रश्न असा येतो की, ही गायकी अनुभवायची तरी कशी? या प्रश्नाचे उत्तर थोडे विस्तारित आहे. कारण किशोरीताई यांचे गाणे हे एव्हरेस्ट पर्वताच्या उंचीचे आहे! एव्हरेस्टवर पोहोचायला जसे काही मूलभूत प्रयत्न अपेक्षित असतात, तसंच इथे आहे. एव्हरेस्ट सर करणारी व्यक्ती ज्या समर्पित भावनेने त्या पर्वतांना सामोरे जाते, तसेच श्रोत्यांनी या गाण्याकडे पाहणे गरजेचे आहे. मनात कोणतेही प्रश्न न ठेवता केवळ ऐकणे गरजेचे आहे. म्हणजे, समोर येणाऱ्या एक एक सुराला एकाग्रतेने ऐकणे! पुढचे कार्य आपले मन स्वतः करते. परंतु, असे होण्यासाठी मनात काही प्रमाणात संयम असायला हवा! तरच समोर सादर होणाऱ्या रागाच्या स्वभावाशी आपले मन ‘साम्यावस्था’ साधेल.

‘या हृदयीचे त्या हृदयी घातले’ हे यापेक्षा वेगळे काय असते?

परंतु अशा प्रकारच्या गायकीची आज समाजात आणि विशेषतः तरुण पिढीला गरज आहे, असे राहून राहून वाटते. याचे कारण असे की, समाजात पसरलेली एकूण अस्वस्थता. बदलत्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा आणखी काही; पण साऱ्या समाजाला कसलीशी घाई लागली आहे. सारे काही लगेच हवे आहे. कामाचे व्याप वाढले. ते पूर्ण करायला वेळ अपुरा पडायला लागला आणि त्यामुळे एकंदर धावपळ वाढली आहे. माझी पिढी ही मोठी झाली, ती याच धावपळीत. पुढे ज्या पिढ्या येत आहेत, त्यांचीदेखील हीच गत! अशा वेळेस एका जागी शांत बसायला वेळ आहे? आणि वेळ असल्यास त्याची सवय आहे? याच सवयीचा अभाव सगळीकडे जाणवतो आहे. सिग्नल ‘लाल’चा ‘हिरवा’ होईपर्यंत पुढे पुढे सरसावणारी वाहनं याच अशांततेचे प्रतीक आहेत. समोर गाडी एक सेकंद जरी थांबली, तरी मागच्याने लगेच वाजवलेला हॉर्न हे पण त्याचेच उदाहरण आहे. हीच अस्वस्थता आणि अशांतता घेऊन लोक सभागृहात शिरतात. शास्त्रीय संगीताची मैफल सुरू असताना सतत हालचाली करतात. कलाकाराने जर थोडा सूर टिकवला, तर तो शांतपणे ऐकायचे सोडून लगेच टाळ्या वाजवून, त्या सुराची अखंडता भंग करतात! माझ्या पिढीतील बरेच कलाकारदेखील या अस्वस्थ समाजाचे परिपाक असल्यामुळे त्यांचीदेखील राग मांडणी करायची पद्धत अधिक घाईची होत चालली आहे. आणि अर्थात त्यामुळे टाळ्या मिळविण्याकडे ओढदेखील! या साऱ्याचे एकमेव कारण म्हणजे, समोर येणारे क्षण पेलायला आणि पुढे अनुभवायला लागणाऱ्या संयमाचा अभाव! राग संगीत मात्र आपल्याकडून नेमकं याच गोष्टीची अपेक्षा करतं. किंबहुना, सर्व प्रकारची शास्त्रे संयमाच्या आधारावर उभी आहेत. म्हणूनच त्यांची उपासना करणारी व्यक्ती ही मूलभूत संयम बाळगून हवी! याच पार्श्वभूमीवर किशोरीताईंची गायकी आजच्या तरुण पिढीला आमंत्रित करते आहे. जरा एके ठिकाणी बसा. शांत बसा. मनातील भाव आणि रागातील भाव यांचा समतोल साधायचा प्रयत्न करा. एक एक क्षण अनुभवायला शिका आणि असे करता करता स्वतःमधील संयम वाढवा. ऐकण्याच्या या कलेमुळे दैनंदिन आयुष्यातदेखील समोरचा काय बोलतो आहे, हे लक्ष देऊन, संयम ठेवून आणि मध्येच अडथळा न आणता ऐकायला शिकाल! संगीत हे केवळ मनोरंजन नव्हे, त्याने व्यक्तिमत्त्वाचा आणि पर्यायाने समाजाचादेखील विकास होऊ शकतो. किशोरीताईंचे संगीत पदोपदी याचीच जाणीव करून देत असते!

-आशय गुणे :) 

Published in Dainik Divy Marathi on May 31, 2015