कुठलीही व्यक्ती भोवती घडणाऱ्या क्रियेला दोन प्रकारे सामोरे जाते. पहिला प्रकार म्हणजे, ती क्रिया समजणे; तर दुसरा प्रकार म्हणजे, ती क्रिया अनुभवणे. समजण्याच्या क्रियेत आपल्या साथीला असतात शब्द. आणि आपण एका विशिष्ट भाषेत व्यक्त होतो; परंतु अनुभवण्याच्या स्थितीत आपल्या साथीला असतात बऱ्याच अनामिक भावना. आणि त्याच्या जोडीला असतात, बरेच अमूर्त विचार आणि अगणित पैलू! त्यामुळे अनुभवण्याची स्थिती ही अधिक व्यापक आणि गूढ असते. उदाहरण द्यायचे झाले तर अशी कल्पना करूया की, आपण एक रम्य भूप्रदेश पाहत आहोत किंवा सूर्योदय होताना त्या ठिकाणी उपस्थित आहोत. आपण जर या घटना समजून घेतल्या, तर काही वाक्यांमध्ये त्या घटनांचे वर्णन आपल्याला करता येईल. परंतु त्या अनुभवण्याचा प्रयत्न केला, तर मनात तऱ्हेेतऱ्हेेचे विचार येतात! हीच घटना दुसऱ्या दिवशी आठवली, तर तिच्याशी संबंधित अजून काही पैलू आपल्याला लक्षात येतात. महिनाभरानंतर जर ती घटना आठवली तरीही स्वतःशीच अजून काही पैलू उलगडले जातात. याचे कारण असे की, आपल्याला सौंदर्याची अनुभूती होत असते. असाच हरघडी नवी अनुभूती देणारा किशोरी आमोणकरांचा अलौकिक सूर.
किशोरीताईंचा हा सूर म्हणजे संपूर्ण गोलाई! एक स्वच्छ, तेजोमय आकार; ज्याला एक भेदक तीव्रता आहे. परंतु या गोलाईची सखोलता अशी की, त्यात निर्माण होणाऱ्या कंपनात अगणित भाव समाविष्ट झालेले जाणवतात. खरं तर स्वर केवळ सात आणि त्यांचे प्रकार मोजून त्यांची एकूण संख्या बारा एवढी होते. त्यात संगीताचे नियम असे की, एका रागात एक विशिष्ट स्वर-समूहच असावा लागतो. परंतु वरील लिहिलेले ‘कंपन’ आणि स्वरांच्या गोलाईची सखोलता ही प्रत्येक रागाचे रूप आणि त्यातून निर्माण होणारे विशिष्ट भाव कसे काय निर्माण करते, हे एक शब्दांच्या पलीकडले अनुभवणे आहे. कदाचित यालाच ‘दिव्यत्व’ असेही म्हणत असावेत.
अनेकदा माझ्या पहाटेची सुरुवात किशोरीताईंच्या ‘ललित पंचम’, ‘बिभास’, किंवा ‘मिया की तोडी’ या रागांनी होते. हिंदुस्थानी राग संगीतात वेळेला खूप महत्त्व आहे. पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, मध्यरात्र असे राग सादर करण्याचे विभाजन केले गेले आहे. पहाटे त्यांचा ‘मिया की तोडी’ ऐकला की, त्यांच्या त्या सुरांमध्ये उगवत्या सूर्याचे तेज झळकते. मात्र ‘ललित पंचम’ हा राग गाताना जेव्हा त्या ‘उडत बुंद’ या रचनेत ‘बुं’ या शब्दाने समेवर येतात, तेव्हा त्या क्षणाला एका अनामिक भूप्रदेशावर झालेला सूर्योदय डोळ्यासमोर येतो. या रागात मात्र त्यांच्या सुरांमध्ये रम्यता अधिक भासते. यापेक्षा वेगळा अनुभव येतो, जेव्हा त्या बिभास रागात ‘नरहर नारायण’ गातात. त्या वेळेस मात्र सूर्योदय होण्याच्या आधीचा एक भूप्रदेश डोळ्यासमोर येतो. याच्या जोडीला आपला आजचा दिवस कसा जाईल, या विचाराची किंचित हुरहूरदेखील जाणवते!
जसा दिवस पुढे आपल्याला कवेत घेत जातो, तशी आपली मनःस्थितीदेखील बदलत जाते. दुपारच्या वेळेस सूर्याचे डोक्यावर स्थिरावणे, कामामुळे येणारा क्षीण आणि पुढे शिल्लक असलेल्या कामांचा वेध, अशा वेळेस माझ्यासमोर ताईंचे ‘शुद्ध सारंग’ आणि ‘मधमाद सारंग’ हे राग येतात. या रागांमुळे मनाच्या या अवस्थेत प्राप्त होणारी शीतलता केवळ अवर्णनीय! ‘शुद्ध सारंग’मधला त्यांचा दोन मध्यमांचा हळुवार प्रयोगही शांती प्राप्त होण्यासाठी कारणीभूत ठरतो. तीच किमया त्यांच्या ‘मध्यमाद सारंग’मधल्या ‘जबसे मन लागो’ या बंदिशीची! त्यात ‘शुद्ध सारंग’ हा मला बाहेरच्या वातावरणाशी अधिक संबंध जोडणारा वाटतो, तर ‘मध्यमाद सारंग’ हा या वातावरणामुळे मनात डोकावणारा वाटतो. अशा वेळेस रागाचे नाव, त्यात वापरलेले स्वर या तांत्रिक बाबींना काहीही अर्थ उरत नाही. मात्र, सकाळची रम्यता आणि दुपारची शीतलता हे मनावर बदललेल्या वेळेनुसार होणारे परिणाम अनुभवण्याशिवाय लक्षात यायचे नाही. याच बदलत्या मनःस्थितीत संध्याकाळची व्याकुळता त्यांचे ‘ललितागौरी’, ‘पुरिया धनश्री’ आणि ‘भीमपलास’ हे राग व्यक्त करीत आलेत. कोणतीही व्यक्ती-मग ती जगाच्या पाठीवर कुठेही असो-संध्याकाळच्या वेळेस एक प्रकारची अस्वस्थता अनुभवतेच. त्या क्षणी मनात एक अनामिक पोकळी निर्माण होतेच होते! सूर्यास्ताची ही वेळ ‘माझे कुणी तरी ऐका’ हे सर्वात प्रकर्षाने सांगणारी असते. त्यांचे या वेळेस ऐकलेले राग या गोष्टीची पुष्टी नक्कीच करतात आणि वाटते की, शास्त्रीय संगीत किंवा रागसंगीत हे तंत्र आणि शास्त्र या पलीकडे जाऊन भावना व्यक्त करणारे उच्च दर्जाचे भाव-संगीत आहे!
परंतु इथे एक गोष्ट कबूल करावी लागेल की, मी त्यांच्या रात्रीच्या आणि मध्यरात्रीच्या रागांचा अधिक चाहता आहे. कारण मी या वेळेस स्वतःला अधिक मुक्त समजतो! दिवसभरातील ताणतणाव संपल्यामुळे स्वतःकडे अधिक लक्ष देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी या वेळेस गायलेले राग मला अधिक भिडतात आणि माझ्या मनात डोकवायला अधिक प्रवृत्त करतात! याच वेळेस एक उत्साह आणि आनंद बाळगून परंतु अलगद पावलं टाकीत त्यांचा ‘भूप’ माझ्या मनात प्रवेश करतो! या रागात त्यांनी गायलेले ‘सहेला रे’ हे सर्वश्रुत आहेच. किंचित लडिवाळ आणि लाजत येणाऱ्या बागेश्रीचे सूर तो ऐकून झाल्यावर रुंजी घालत राहतात. ‘शुद्ध कल्याण’ आणि ‘रागेश्री’ या रागांमध्ये तर त्यांचे सूर मातृत्वाचे रूप धारण करतात! नुकताच ४ फेब्रुवारीला वरळीला नेहरू सेंटर येथे त्यांचा ‘शुद्ध कल्याण’ अनुभवला. त्या वेळेस त्या ‘एसी’ असलेल्या सभागृहात त्यांच्या सुरांनी मला पांघरूण घातले होते. तसाच त्यांचा रागेश्री प्रत्यक्ष अनुभवायचे भाग्य मला लाभले आहे. त्यातील ‘देखो शाम गहरी नींद’ ऐकताना त्या सुरांनी अक्षरशः मला प्रेमाने थोपटले आहे. त्यांचा ‘भूप नट’ ऐकला की, माझ्यासमोर एक स्वतःशीच हसत आणि किंचित लाजणारी तरुणी उभी राहते! मात्र त्यांचा ‘मालकंस’ साधनेचे रूप धारण करतो आणि ऐकणाऱ्यालादेखील एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवतो!
किशोरीताई यांच्या संगीताचा एकूण ‘कॅन्व्हास’ फार मोठा आहे आणि इथे नमूद केलेले राग ही त्यातली काही उदाहरणं आहेत. याचबरोबर त्यांचे ऋतुप्रमाण रागदेखील आहेत! या जागेत प्रत्येकाचा समावेश करणे अशक्य आहे.
परंतु इथे महत्त्वाचा प्रश्न असा येतो की, ही गायकी अनुभवायची तरी कशी? या प्रश्नाचे उत्तर थोडे विस्तारित आहे. कारण किशोरीताई यांचे गाणे हे एव्हरेस्ट पर्वताच्या उंचीचे आहे! एव्हरेस्टवर पोहोचायला जसे काही मूलभूत प्रयत्न अपेक्षित असतात, तसंच इथे आहे. एव्हरेस्ट सर करणारी व्यक्ती ज्या समर्पित भावनेने त्या पर्वतांना सामोरे जाते, तसेच श्रोत्यांनी या गाण्याकडे पाहणे गरजेचे आहे. मनात कोणतेही प्रश्न न ठेवता केवळ ऐकणे गरजेचे आहे. म्हणजे, समोर येणाऱ्या एक एक सुराला एकाग्रतेने ऐकणे! पुढचे कार्य आपले मन स्वतः करते. परंतु, असे होण्यासाठी मनात काही प्रमाणात संयम असायला हवा! तरच समोर सादर होणाऱ्या रागाच्या स्वभावाशी आपले मन ‘साम्यावस्था’ साधेल.
‘या हृदयीचे त्या हृदयी घातले’ हे यापेक्षा वेगळे काय असते?
परंतु अशा प्रकारच्या गायकीची आज समाजात आणि विशेषतः तरुण पिढीला गरज आहे, असे राहून राहून वाटते. याचे कारण असे की, समाजात पसरलेली एकूण अस्वस्थता. बदलत्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा आणखी काही; पण साऱ्या समाजाला कसलीशी घाई लागली आहे. सारे काही लगेच हवे आहे. कामाचे व्याप वाढले. ते पूर्ण करायला वेळ अपुरा पडायला लागला आणि त्यामुळे एकंदर धावपळ वाढली आहे. माझी पिढी ही मोठी झाली, ती याच धावपळीत. पुढे ज्या पिढ्या येत आहेत, त्यांचीदेखील हीच गत! अशा वेळेस एका जागी शांत बसायला वेळ आहे? आणि वेळ असल्यास त्याची सवय आहे? याच सवयीचा अभाव सगळीकडे जाणवतो आहे. सिग्नल ‘लाल’चा ‘हिरवा’ होईपर्यंत पुढे पुढे सरसावणारी वाहनं याच अशांततेचे प्रतीक आहेत. समोर गाडी एक सेकंद जरी थांबली, तरी मागच्याने लगेच वाजवलेला हॉर्न हे पण त्याचेच उदाहरण आहे. हीच अस्वस्थता आणि अशांतता घेऊन लोक सभागृहात शिरतात. शास्त्रीय संगीताची मैफल सुरू असताना सतत हालचाली करतात. कलाकाराने जर थोडा सूर टिकवला, तर तो शांतपणे ऐकायचे सोडून लगेच टाळ्या वाजवून, त्या सुराची अखंडता भंग करतात! माझ्या पिढीतील बरेच कलाकारदेखील या अस्वस्थ समाजाचे परिपाक असल्यामुळे त्यांचीदेखील राग मांडणी करायची पद्धत अधिक घाईची होत चालली आहे. आणि अर्थात त्यामुळे टाळ्या मिळविण्याकडे ओढदेखील! या साऱ्याचे एकमेव कारण म्हणजे, समोर येणारे क्षण पेलायला आणि पुढे अनुभवायला लागणाऱ्या संयमाचा अभाव! राग संगीत मात्र आपल्याकडून नेमकं याच गोष्टीची अपेक्षा करतं. किंबहुना, सर्व प्रकारची शास्त्रे संयमाच्या आधारावर उभी आहेत. म्हणूनच त्यांची उपासना करणारी व्यक्ती ही मूलभूत संयम बाळगून हवी! याच पार्श्वभूमीवर किशोरीताईंची गायकी आजच्या तरुण पिढीला आमंत्रित करते आहे. जरा एके ठिकाणी बसा. शांत बसा. मनातील भाव आणि रागातील भाव यांचा समतोल साधायचा प्रयत्न करा. एक एक क्षण अनुभवायला शिका आणि असे करता करता स्वतःमधील संयम वाढवा. ऐकण्याच्या या कलेमुळे दैनंदिन आयुष्यातदेखील समोरचा काय बोलतो आहे, हे लक्ष देऊन, संयम ठेवून आणि मध्येच अडथळा न आणता ऐकायला शिकाल! संगीत हे केवळ मनोरंजन नव्हे, त्याने व्यक्तिमत्त्वाचा आणि पर्यायाने समाजाचादेखील विकास होऊ शकतो. किशोरीताईंचे संगीत पदोपदी याचीच जाणीव करून देत असते!
-आशय गुणे :)
Published in Dainik Divy Marathi on May 31, 2015
No comments:
Post a Comment