Pages

Total Pageviews

Thursday, May 30, 2019

पं मुकुल शिवपुत्र यांचा दक्षिण दौरा - आठवणी

१५ जानेवारी, २०१७ हा माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस होता. पार्ल्याच्या हृदयेश फेस्टीवल मध्ये रात्री नऊच्या सुमारास पं. मुकुल शिवपुत्र हे 'शंकरा' राग अशा प्रभावीपणे गायले की पुढे आठवडाभर तरी मी त्या आठवणीने अस्वस्थ होतो. दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाताना रात्री ट्रेन मध्ये त्याबद्दल 'फेसबुक'वर थोडेसे लिहिले आणि ते पुढल्या सकाळी इतके 'वायरल' झाले की दुपारपर्यंत 'धन्यवाद' लिहिलेले एक ई-मेल आले. उघडून बघितले तर नाव 'मुकुल शिवपुत्र!' पण हा चमत्कारिक अनुभव ही फक्त एक सुरुवात होती हे काही दिवसातच मला कळलं! 'गंधर्व सभा' च्या प्रियाताई आचरेकर यांनी मला संस्थेत सहभागी होयची संधी दिली आणि मुकुलजींच्या पुढच्या कार्यक्रमांना मला हजेरी लावता आली. एकूण सोशल मीडियावरील त्या माहिती असलेल्या, नसलेल्या लोकांच्या 'शेअर' आणि 'फॉरवर्ड' मुळे मी या महागायका पर्यंत पोहोचलो होतो. पण पुढच्या वर्षी मार्च मध्ये प्रियाताईंनी आणखी एक सुखद धक्का दिला. "एप्रिल महिन्यात मुकुलजींचा दक्षिण दौरा आहे. तर तुम्ही देखील आमच्या बरोबर या." मी उडालोच! बाजूला 'प्रथम'च्या (मी ज्या संस्थेत काम करतो) उषाताई राणे होत्या (त्याही कार्यक्रम ऐकायला आल्या होत्या)."अशी संधी अजिबात सोडू नकोस", असं सांगून त्यांनी मला परवानगी देऊन टाकली! कार्यक्रम असेल त्यादिवशी मी मुकुलजीं बरोबर थांबणार आणि इतर दिवस 'प्रथम'चे कर्नाटक मधले काम पाहणार असं ठरलं.

शनिवार ७ एप्रिल या दिवशी दोन गाड्या पुण्याहून बेळगावकडे निघाल्या. तबलावादक श्री. सुनील जायफळकर, हार्मोनियम वादक श्री. सुयोग कुंडलकर आणि आम्ही सगळे.
पहिली मैफल बेळगावला होती. ८ एप्रिल २०१८ या दिवशी पहाटे ६ वाजता. तिथल्या रिट्झ थिएटरला. हा दिवस माझ्यासाठी अनेक अंगांनी खास होता. एक, ८ एप्रिल म्हणजे पं. कुमार गंधर्व यांची जयंती. दक्षिण दौऱ्याची सुरुवात कुमारजींच्या जयंती दिवशी व्हावी आणि ती सुद्धा मुकुलजींच्या गाण्याने! शिवाय, एक नाही दोन मैफलींनी - कारण दुसरी मैफल त्याच दिवशी संध्याकाळी धारवाडला घडली. दुसरे, हे रिट्झ थिएटर म्हणजे पु.लं नी लिहिलेल्या 'रावसाहेव' मध्ये उल्लेख असलेली वास्तू. बेळगावात कन्नड वारे वाहत असताना आपले मराठी पाय जमिनीत अगदी घट्ट रोवून उभी असलेली वास्तू आहे ही. ती आता लोकमान्य रंगमंदिर ह्या नावाने ओळखले जाते. तिथे आत शिरल्यावर समोरच 'रावसाहेब' यांचा फोटो आपल्याला दिसतो. शिवाय पु. लं आणि त्यांचा अड्डा जिथे खुर्च्या टाकून गप्पा मारायला बसायचा ती जागा देखील आपल्याला दिसते. अशा या ऐतिहासिक जागेत मुकुलजींनी 'अहिर भैरव' राग गायला आणि 'रसिया म्हारा' या पारंपरिक बंदिशीने मैफलीची आणि एकूण दक्षिण दौऱ्याची सुरुवात झाली. विलंबीत तीन तालात हा बडा ख्याल गायल्या नंतर त्यांनी पारंपरिक आणि लोकप्रिय असलेली 'अलबेला सजन आयो' ही रचना सादर केली. 'अहिर भैरव' नंतर पंडितजींनी अगदी काही क्षणांचा विलंब घेऊन 'बहार' सुरु केला. 'फुल रही सरसो सकल बन' या आमिर खुसरोंच्या बंदिशीने एक वेगळाच रंग भरला! अहिर भैरव आणि बहार हे राग अगदी वेगळ्या प्रवृत्तीचे आहेत. 'अहिर भैरव' मध्ये रे आणि ध या कोमल स्वरांना महत्व आहे आणि 'बहार' मध्ये ग आणि नी या कोमल स्वरांना! पहिला राग रंगल्यावर त्यावर या वेगळ्या प्रवृत्तीच्या राग गाऊन रंग भरणे हे अत्यंत अवघड असते. मात्र मुकुलजी हे अगदी सहजतेने करत होते. 'बहार' नंतर ज्या रचना सादर झाल्या त्या अशाप्रकारे - राग बहादुरी तोडी, मिश्र पिलू ठुमरी, 'ग्यान की जडिया दयी' हे निर्गुणी भजन, राग शुद्ध सारंग आणि 'बाजू बंद खुल खुल जा' ही प्रसिद्ध भैरवी. चार तास कसे गेले कळलं देखील नाही. १०:३० च्या सुमारास कार्यक्रम संपला आणि आम्ही लगबगीने सगळी वाद्य आणि सामान घेऊन हॉटेल गाठले. काही तासात धारवाडसाठी निघायचे होते. जेवण करून जवळ जवळ दोन तासांचा प्रवास करून तिकडे पाच वाजता मैफल सुरु होणार होती.

बेळगावला हॉटेल सोडायच्या पूर्वी आम्ही पटकन खाऊन घेतले आणि मी देखील कार्यक्रमाची 'प्रेस-नोट' पाठवून दिली. आणि नंतर जवळ-जवळ दोन तास उत्तर कर्नाटकचा सुंदर परिसर अनुभवत आम्ही धारवाड गाठले. हिंदुस्थानी कंठ-संगीताचा विचार केला तर देशातील सर्वात श्रीमंत प्रदेश आहे हा! डॉ. गंगुबाई हंगल, पं मल्लिकार्जुन मन्सूर, भारतरत्न पं भीमसेन जोशी, पं बसवराज राजगुरू आणि पं. कुमार गंधर्व देखील इथलेच! जी गोष्ट संगीताची तीच गोष्ट साहित्याची. त्यामुळे कन्नड साहित्यिक द.रा बेंद्रे आणि मराठी साहित्यिक जी.ए कुलकर्णी यांच्या धारवाडला मुकुलजींची मैफल होणे हे अनेक अंगांनी खास होते. हा कार्यक्रम धारवाडच्या अण्णाजीराव सभागृहात झाला.
बरोबर पाच वाजता सुरु झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात मुलतानी या रागाने झाली. धीम्या गतीचे आलाप, त्याला सरगमची जोड याच्या मिश्रणाने बढत झाली आणि श्रोते देखील एकाग्रतेने गाणं ऐकण्यात दंग झाले. मुलतानी नंतर एकदम वेगळ्या 'मूड'चा 'कामोद' लोकांसमोर प्रस्तुत झाला. या रागात अगदी मुक्तपणे आलापी प्रस्तुत झाली. मुकुलजींच्या गाण्यात मला एक वैशिष्ट्य जाणवतं ते असं की रागाच्या सुरुवातीच्या आलापीला ते भरपूर न्याय देतात. त्यामुळे रागाचा माहोल खूप चांगला निर्माण होतो. आता आपण एक उत्कृष्ट कामोद ऐकणार असं वाटत असता अचानक तीनतालात 'नेवर बाजो' ही नट कामोद मधील बंदिश सुरु झाली. मात्र माझ्यामते त्या मैफलीत मला सर्वात भावलेला राग म्हणजे त्या नंतरचा 'शाम-कल्याण.' सुरुवात 'म्हारा रसिया' ने झाली आणि नंतर एकतालातील 'ऐसो तुमी को मै जानत हूँ' ने सांगता झाली. ही बंदिश एरवी द्रुत लयीत गायली जाते मात्र पंडितजींनी त्यादिवशी ती मध्यलयीत गायली. त्या लयीत देखील ती इतकी प्रभावी वाटली की आज वर्षभरा नंतर देखील मला ती स्वच्छ लक्षात आहे. त्या नंतर खमाज मधील एक ठुमरी आणि नंतर 'युगन युगन हम योगी' या निर्गुणी भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. पुन्हा चार तास गायन आणि तीच श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची क्षमता. त्या दिवशी ८ तास, म्हणजे १/३ दिवस गायन झाले. मध्ये प्रवास. सकाळी ४ ला सुरु झालेला आमचा दिवस रात्री बारा वाजता संपला. त्याच दिवशी दोन्ही कार्यक्रमांना उत्कृष्ट हार्मोनियम साथ करणारे सुयोग कुंडलकर पुण्याला परत आले. सुनील जायफळकर मात्र पूर्ण दौरा आमच्या बरोबर असणार होते.

दुसऱ्या दिवशी आम्ही जी.ए कुलकर्णी यांचे घर बघितले आणि मी मैसूरसाठी रवाना झालो. तो सोमवार होता आणि आठवड्याच्या रविवारी म्हणजेच १५ एप्रिल या दिवशी चेन्नईला मैफल होती. तो पर्यंत मी 'प्रथम' चे कर्नाटकातले काम पाहिले आणि रविवारी सकाळी चेन्नईला दाखल झालो.
भारतात दोन शास्त्रीय संगीत पद्धती विकसित झाल्या आहेत - एक म्हणजे उत्तर भारतीय, अर्थात हिंदुस्थानी आणि दुसरी दाक्षिणात्य म्हणजे कर्नाटिक. दोन शास्त्रीय शैली एकाच प्रदेशात असणारा भारत हा जगातील एकमेव देश असेल. मात्र तरीही उत्तरेतील लोकांना दक्षिणेतील लोकांच्या शैलीबद्दल फार कमी माहिती आहे. हेच दाक्षिणात्य लोकांबद्दल सुद्धा तितकंच खरं आहे. आपल्याला दाक्षिणात्य संगीत अनेकदा जुगलबंदी द्वारे माहिती असते. आणि त्यात सुद्धा 'उत्तर वि दक्षिण' अशी जणू स्पर्धा असल्यासारखे ते प्रस्तुत होते. मात्र मुकुल शिवपुत्र हे असे गायक आहेत ज्यांनी ८० च्या दशकात चेन्नईला जाऊन डॉ. एम डी रामनाथन यांच्याकडून दाक्षिणात्य संगीताचे धडे घेतले. त्यांच्या संगीतात हा प्रभाव त्यामुळे जाणवतो. कलाक्षेत्र, चेन्नई येथे झालेला हा कार्यक्रम हा त्यांना आणि के.एन.एस नाम्बियार म्हणजेच मुकुलजींचे 'कण्णामामा' यांना अर्पण होता. कार्यक्रमाची सुरुवात ‘श्री’ या रागाने झाली. त्यानंतर बसंत या रागाभोवती गुंफलेला 'खट' हे सहा रागांचे मिश्रण सादर झाले. रचनांचे वैविध्य कायम ठेवून पुढे खमाज रागातील टप्पा, तीन तालात तराणा आणि मध्यन्तरा नंतर श्याम कल्याणचा एक प्रकार, निर्गुणी भजन आणि भैरवी असं सादर झालं. दाक्षिणात्य संगीताच्या प्रदेशात जेव्हा श्रोत्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या तेव्हा एक वेगळाच आनंद झाला. मुकुल शिवपुत्र हे केवळ एक कलाकार नसून उत्तर आणि दक्षिण या दोन भागातील लोकांना जोडणारा एक दुवा पण आहेत हे सिद्ध झाले. या कार्यक्रमात श्री. व्यासमूर्ती कट्टी यांनी हार्मोनियमची साथ केली. त्यांनी पुढे बंगलोरच्या दोन्ही कार्यक्रमात देखील साथ केली. मैसूरच्या कार्यक्रमात श्री मधुसूदन भट हे हार्मोनियमच्या साथीला होते.

पुढची मैफल बुधवार, १८ एप्रिल रोजी बंगलोरच्या प्रतिष्ठित 'बंगलोर गायन सभा' या हॉल मध्ये पार पडली. या मैफलीचे वैशिष्ट्य असे की प्रसिद्ध इतिहासकार आणि विचारवंत रामचंद्र गुहा यांची उपस्थिती. पुरिया धनश्री ने सुरु झालेल्या या मैफलीत पुढे अनेक रंग श्रोत्यांना अनुभवायला मिळाले. 'प्रभू मेरे अवगुण चित ना धरो' हे काफी रागात प्रस्तुत केलेले भजन, 'होली खेलन कैसे जाऊ' ही पिलू रागातील होरी, 'आन बान जिया में लागी' हा दादरा, 'ब्रूही मुकुंदेथी' ही एम. एस सुब्बुलक्ष्मी यांनी प्रसिद्ध केलेली रचना आणि शेवट भैरवी! ही विविधता रसिकांना समृद्ध करणारी होती. गुहा यांना ही राहवलं नाही. May he be granted good health and great singing for many years to come. He is a jewel of India असे लगेचच त्यांनी ट्विटर या मध्यमावर लिहिले
एव्हाना आम्हाला भैरवी होऊन सुद्धा श्रोते खुर्चीवरून न उठता सामूहिक रित्या मैफल पुढे सुरु राहावी अशी शब्दाविना विनवणी करण्याची सवय झाली होती. आणि हेच पुढे मैसूरला देखील घडलेच. २१ एप्रिलच्या शनिवारी घडलेल्या या मैफलीत दाक्षिणात्य विद्वान टी. एम. कृष्णा उपस्थित राहणार हे आम्हाला ट्विटरमुळे कळले. या मैफलीची सुरुवात मारवा या रागाने झाली. माझ्यासाठी ही गोष्ट अत्यंत आनंददायी होती कारण हल्ली हा राग ऐकायला मिळतोच असं नाही. मुकुलजींनी मात्र त्यांचे बंगलोरच्या 'पुरिया धनश्री' द्वारे दाखवलेले कोमल रिशभावरचे प्रेम इथे देखील तसेच ठेवले. मारवा नंतर बसंत राग सुरु झाला आणि तोपर्यंत टी.एम येऊन आमच्या बाजूला येऊन बसले होते. पण मध्यंतरानंतर रंगलेला 'कौसी' राग हा त्या मैफलीचाच नव्हे तर माझ्यामते संपूर्ण दौऱ्यातील 'हॉलमार्क' ठरला! बडा ख्यालात अंतरेतून स्थयीत येताना मुकुलजींनी अशी काही जागा घेतली की 'सुगर बलमा' या समेवर कृष्णा यांच्यासकट आम्ही सर्वांनी दाद दिली. तो क्षण मला अजून स्वछ लक्षात आहे! 'रघुवीर की सूद आयी' हे भजन आणि नंतर 'होली खेलन कैसे जाऊ' या होरी ने मैफल संपली. मात्र नंतर एका शिष्या प्रमाणे कृष्ण मुकुलजींना भेटले आणि दुसऱ्या दिवशी तो फोटो तिथल्या वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर झळकला.
२२ एप्रिलच्या रविवारी बंगलोरच्या जे.एस.एस ऑडिटोरियम मध्ये शेवटची मैफल पार पडली. ह्यात देखील श्रोत्यांपुढे विविध रचना सादर झाल्या. सुरुवात मुलतानी रागाने झाली आणि त्यानंतर मधुवंती राग सादर झाला. त्यात विशेष म्हणजे 'मै आऊ तोरे मंदरवा' ही वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व यांच्या पत्रव्यवहारातून तयार झालेली बंदिश विशेष रंगली. त्यानंतर अचानक वातावरण बदललं कारण खमाज रागातील 'बाली उमर लरकैया' ही ठुमरी सादर झाली. मुकुलजी हे एका भावविश्वातून दुसऱ्या एकम वेगळ्या भावविश्वात कसे काय प्रवास करतात याचे आश्चर्य वाटावे तर मध्यंतरा नंतर हा सिलसिला सुरूच राहिला. अत्यंत अवघड 'श्री कल्याण' (कुमार गंधर्व यांनी रचना केलेला) राग सादर झाला आणि त्यानंतर एकदम वेगळ्या 'मूड' चा नट-कामोद! त्यानंतर निर्गुणी भजन आणि पुन्हा 'ननंदिया काहे म्हारे बोल' ही अत्यंत लडिवाळ ठुमरी आणि शेवट 'आन बान जिया में लागी' हा दादरा. पंडितजी हे 'अवस्थांतर' असे काही करतात की आपण अचंबित होतो. एखाद्या रागात रिषभ आणि धैवत कोमल असले आणि तो गाऊन झाला की ते वातावरणात रेंगाळतात. हा 'हँगओव्हर' काही क्षण काय पुढील १५ मिनिटे देखील टिकू शकतो. अशा वेळेस वेगळे स्वर असलेला राग सुरु करून त्याचा रंग भरणे हे कमालीचे कठीण असते. पण मुकुलजी हे श्रोत्यांना देखील पुढच्या मिनिटात त्या वेगळ्या भावविश्वात अलगदपणे घेऊन जातात. मात्र त्याने आपण आधीचे राग विसरून जातो असे नाही. हे सारं आपल्याला नंतर आठवतंच!

बाकी हा दौरा माझ्यासाठी संगीत या व्यतिरिक्त अन्य बऱ्याच गोष्टी शिकविणारा होता. मला पं मुकुल शिवपुत्र या गायकाला अगदी जवळून पाहता आले. पु. लं देशपांडे मल्लिकार्जुन मन्सूर यांच्याबद्दल 'गाण्यात राहणारा माणूस' असं म्हणाले होते. ते मला मुकुलजींबद्दल तंतोतंत पटले. कलाकार जेव्हा एखादी रचना सादर करतो तेव्हा त्याचा विचार किमान चोवीस तास आधी हॉटेलच्या खोलीत सुरु झालेला असतो हे मी प्रत्यक्ष अनुभवलं. मात्र मुकुलजी इतर घडामोडींबाबत तितकेच उत्सुक असतात. चेन्नईला चार तासाची मैफल आणि नांतर जवळ-जवळ दोन तास बाहेर घालवल्या नंतर सध्याच्या घडामोडींवर त्यांनी पुढे दोन तास चर्चा केली आणि एवढं करून सकाळी उठलो तेव्हा ते माझ्यासमोर तयार बसले होते! सोमवार २३ एप्रिलला सकाळी आमच्या गाड्या बंगलोरहून निघाल्या. सकाळी ९ वाजता सुरु झालेला प्रवास दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता पुण्याला संपला. पण संपूर्ण प्रवासात पंडितजींच्या गप्पा सुरु होत्या. आणि फक्त संगीत या विषयावरच नाही तर इतर विषय देखील त्यात समाविष्ट होते. मी काय करतो, माझ्या कामाचे स्वरूप काय याबाद्दल विचारले. मी शिक्षण क्षेत्रात काम करतो हे कळल्यावर त्याबद्दल प्रश्न विचारले, त्यांची मतं देखील सांगितली. दौऱ्यात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू मला दिसले. सतार वाजविणारे मुकुलजी, मैसूरला उपास होता म्हणून स्वतः खिचडी बनविणारे मुकुलजी, अनेक घडामोडींवर चर्चा करणारे मुकुलजी आणि तेवढ्यात काहीतरी सुचले की थोडं थांबून स्वर लावून ती स्वर-संगती गाऊन पुन्हा आमच्यात परत येणारे मुकुलजी! हेच ते अवस्थांतर.
इथे विशेष नमूद केले पाहिजे की या संपूर्ण दौऱ्यात हार्मोनियम आणि तबला वादकांची मुकुलजींना उत्कृष्ट साथ लाभली. त्याच बरोबर टाटा कॅपिटल, झी-२४ तास, सारस्वत बँक आणि 'विजय कर्नाटक' यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. 'द हिंदू', 'टाईम्स ऑफ इंडिया' आणि 'बेळगाव तरुण भारत' यांनी देखील मुकुलजींबद्दल लिहिले आणि दक्षिणेत अनेक लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. तिकिटांसाठी 'बुक माय शो' ने देखील मोलाचे सहकार्य दिले.
कलाकार हे 'moody' असतात असा आरोप त्यांच्यावर केला जातो. मात्र मनात काहीतरी सतत भावनात्मक 'घडत' असताना माणूस moody का होणार नाही? आपल्याला वेगळ्या भावविश्वात नेणारी ही मंडळी स्वतः सतत चिंतन आणि मनन करत असतात. हे फार कष्टाचे काम आहे. मैफलीत कलाकाराला खुलू द्यायची जबाबदारी श्रोत्यांची आणि साऊंड-सिस्टीम वाल्या लोकांची असते. कलाकारांवर पटकन टीका करणाऱ्या लोकांनी ही गोष्ट जरूर ध्यानात ठेवावी.
मी लहानाचा मोठा होताना दहावी, बारावी आणि अशा अनेक कारणांमुळे बऱ्याच दिग्ग्ज कलाकारांची कला प्रत्यक्ष अनुभवता नाही आली. भीमसेन जोशी, गंगुबाई हंगल, रवी शंकर, विलायत खान हे कलाकार मी दहावी-बारावीत असताना कला सादर करत होते. मात्र अभ्यास या क्षुल्लक कारणामुळे मला त्यांना प्रत्यक्ष अनुभवता नाही आले. त्यावेळेस त्रस्त अवस्थेत मी स्वतःलाच विचारायचो - "उत्कृष्ट संगीत मी मुकतो आहे आणि हे सारे कलाकार तर मी नाही ऐकू शकलो. पण असा आनंद मला प्रत्यक्षात कधी मिळेल? कोण देईल मला हा आनंद?" कदाचित नियती ने माझे हे बोलणे ऐकले असणार. कारण काही वर्षातच त्या पार्ल्याच्या मैफलीच्या निमित्ताने उत्तर मिळाले, "पं. मुकुल शिवपुत्र!"

- आशय गुणे :) 


No comments:

Post a Comment