Pages

Total Pageviews

55,127

Friday, August 19, 2011

जेम्स

मुंबईतले सेंट झेविअर्स कॉलेज हे 'मल्हार फेस्ट', इंग्लिश बोलणारी मुलं, 'कपडे आहेत कि कापडं आहेत' असं वाटणारे कपडे घालणाऱ्या मुली, 'बड्या बापाचे' असणारे विद्यार्थी ह्या गोष्टींसाठी बरेच चर्चेत असते. पण फार कमी लोकांना माहिती आहे ते तिकडे असलेल्या एका 'लायब्ररी' बद्दल! ही लायब्ररी पुस्तकांची वगेरे नसून चक्क संगीताची आहे.ह्या लायब्ररीचा हेतू 'भारतीय शास्त्रीय संगीत प्रचार' हा आहे. १९७० च्या सुमारास इथल्या प्राचार्यांना ही कल्पना सुचली. त्यांनी 'इंडिअन म्युसिक ग्रुप' नावाची संस्था सुरु केली. ह्या संस्थेनी दर वर्षी नामवंत कलाकार बोलावून त्यांच्या मैफिली केल्या, त्याचे 'रेकॉर्डिंग' केले व अश्याप्रकारे ह्या लायब्ररीचा जन्म झाला. जवळ जवळ चाळीस वर्षांचा संग्रह इथे उपलब्ध आहे. 'जेम्स' ह्याच लायब्ररीत 'लाय्ब्ररिअन' होता.

मी 'म. टा' मध्ये ह्या लायब्ररीबद्दल लेख वाचला आणि लगेच त्याचा 'लाईफ मेम्बर' होण्यासाठी तिकडे पोचलो! समोर एक गृहस्थ बसले होते....तोच हा जेम्स. माझे अगदी हसतमुख चेहऱ्याने स्वागत केले व मेम्बर होण्याची औपचारिकता पूर्ण केली. त्यादिवसापासून मी झेविअर्स मध्ये जायला लागलो आणि त्या रेकॉर्ड्स ऐकू लागलो. आणि माझी जेम्सशी ओळख झाली. दुसऱ्या-तिसऱ्या ओळखीतच जेम्स हा ६५ वर्षांचा आहे हे कळले. तरी सुद्धा सगळी मुलं त्याला 'जेम्स' असंच बोलवायची. मी मात्र सर्वप्रथम ' मिस्टर जेम्स' अशी हाक मारायचो पण नंतर त्याने सांगितल्याप्रमाणे 'नुसतं जेम्स' चालू झालं. म्हणूनच इथे 'एकेरी' उल्लेख करतो आहे. हा माणूस सर्वप्रथम झेविअर्स च्या कचेरीत कारकून होता. तिथून निवृत्त झाल्यावर 'आता पुढे काय' हा प्रश्न होताच. तेव्हा ह्या लायब्ररीकडे त्याचे लक्ष गेले. त्याच्याच शब्दात सांगायचे तर ' ए सी ची हवा खायला मिळेल' म्हणून तो तिकडे 'लायब्ररीयन' म्हणून रुजू झाला. तोपर्यंत त्याला संगीताचा काहीच गंध नव्हता.

एकदा असाच तिकडे गेलो असताना त्याने मला त्याची वही दाखवली. त्या वहीत अगदी आम्ही संगीत शिकताना 'theory ' शिकतो तसं व्यवस्थित लिहून ठेवलं होतं.राग कसा असतो, ताल म्हणजे काय, मल्हार केव्हा गातात, कुठल्या वेळी काय गायचे, कलाकारांची माहिती, कलाकारांच्या घराण्याची माहिती, वादकांची माहिती, वाद्यांची माहिती असं सगळं लिहून ठेवलं होतं. ६५ वर्षाच्या म्हाताऱ्याचा हा 'उद्योग'! हे सगळं केव्हा केलंस असं मी विचारलं तेव्हा त्याचे उत्तर तयार होते.

" मी जेव्हा सर्वप्रथम इकडे आलो तेव्हा मला हे काही ऐकायला आवडायचं नाही. कोण ही माणसं....ही एवढी आरडा-ओरडा का करतात? आणि ह्यांना ऐकायला लोकं ह्या लायब्ररीत का म्हणून येतात? पण नंतर नंतर मला हे आवडायला लागलं. झाकीर ने वाजवलेला एखादा तुकडा मला 'गोड' वाटू लगला, भीमसेनांची तान खुश करू लागली..... कुमार आवडायला लागले....सरोद ची मजा मी घेऊ लागलो......तेव्हा मी ठरवलं की आपण जे ऐकतोय, आपण जिथे काम करतोय त्याची पूर्ण माहिती आपण घ्यायला हवी...तरच हे ऐकायला जास्त मजा येईल! आणि मी आलेल्या लोकांना विचारू लागलो. ते सांगायचे ते लिहून काढायचो आणि ऐकून त्याचा अर्थ लावायचो. आणि हळू हळू मला हे सगळं समजू लागलं. 'मल्हार' मी पावसाळ्यात ऐकून त्याची मजा अधिक लुटू लागलो!" चेहऱ्यावर आनंदाचा भाव ठेवून तो हे सगळं सांगत होता. तो पुढे म्हणाला, " एकदा किशोरी अमोणकर आल्या होत्या.त्यांनी जैत केदार' नावाचा अनवट राग गायला....श्रोत्यांमध्ये मीच तो ओळखू शकलो. मैफिलीनंतर त्यांना विचारल्यास त्यापण चमकल्या आणि माझे कौतुक केले. पण मी तो राग त्याच्या आधीच्याच आठवड्यात एका रेकॉर्ड मध्ये ऐकला होता", डोळा मारून त्याने हसायला सुरुवात केली. मी पण हसण्यात सामील झालो!

कलाकारांवरून आठवले. जेम्स ने बरेच कलाकार जवळून पहिले होते. कारण मैफिलीच्याआधी 'ग्रीन रूम' मध्ये तोच त्यांना हवं-नको ते बघायचा. त्यांच्या गोष्टी सांगताना तो अगदी खुलून जायचा. असाच एक किस्सा तो सांगायचा ......" एकदा भीमसेनजींची मैफल होती. त्यांना प्रत्येकवेळी 'लेटेस्ट ब्रांड' पुरवायची जवाबदारी माझी असायची ( हे सांगताना तो नेमही मिश्कील चेहरा करायचा). एकदा असंच 'ब्रांड' दिल्यावर त्यांनी त्याला तोंड लावले आणि थोडावेळ खाली बघत बसले. मग मी त्यांना प्रश्न विचरला......पंडितजी आज कोणता राग गाणार.....थोड्यावेळाने ते ओरडले......'मारवा....आपल्याला वाटलं ह्या अवस्थेत हे काय गातील......पण काय सांगू, तसा मारवा नंतर मी कुणाचा ऐकला नाही!" आमच्या दोघांमध्ये 'भीमसेन जोशी' हा समान धागा असल्यामुळे त्यांच्यावर चर्चा खूप व्हायची. " उसका आवाज एकदम इधर से आता है रे"...... स्वतःच्या पोटाकडे बोट दाखवून तो कित्त्येकदा मला म्हणाला असेल.

कधी झाकीरच्या तबल्याची आठवण, तर कधी रवी शंकर ह्यांच्या उशिरा पर्यंत चालेल्या मैफिलीची. १० वर्षांपूर्वी झालेल्या झाकीर च्या मैफिलीत लोकं किती वाजले हे कसे विसरले होते हा किस्सा मी त्याच्याकडून जवळ-जवळ १० वेळा तरी ऐकला असेल. पण ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायला मजा पण तितकीच यायची. हेच काय, त्याला चित्रपटांची पण तितकीच आवड होती. 'अभिषेक बच्चन चे लग्न ऐश्वर्यापेक्षा राणी मुखर्जीशी व्हायला पाहिजे' असा एक फुकटचा सल्ला त्याने दिला होता! पण ह्या क्षेत्रात माझं 'ज्ञान' हे त्या कॉलेजच्या मुलींच्या स्कर्टपेक्षा सुद्धा कमी होतं, म्हणून आमचं जास्त बोलणं झालं नाही कधी!

मी पनवेलवरून येतो ह्याचे त्याला फार कौतुक वाटे. मी जायचो तेव्हा तिकडे असलेल्या लोकांना ' हा मुलगा किती शौकीन आहे बघा.....पनवेल वरून येतो' असं तो आवर्जून सांगत असे. मध्ये जेवायला जाताना सुद्धा मला अगदी प्रेमाने सांगायचा " तिकडे जवळ मेक-डोनाल्डस आहे ....तिकडे अजिबात जाऊ नकोस, साले लुटतात. त्यापेक्षा आपला घरचा डबा बारा. नाहीतर कुठल्यातरी हॉटेल मध्ये जा, नाहीतर कॉलेजची कॅन्टीन आहेच की! " वास्तविक संगीत सोडून आमच्यात कुठलाही धागा समान नव्हता. पण तरीही त्याच्या सांगण्यात, मी अनोळखी असूनसुद्धा, एक जिव्हाळा असायचा.

आणि २००९ साली मला अमेरिकेला शिकायला जायचा योग आला. त्यामुळे झेविअर्स मध्ये संगीत ऐकायला जाणे एकदम थांबले. विसा ची तयारी व नंतर एकंदर जायची तयारी ह्यात तिकडे जायला वेळच नाही मिळाला. त्यानंतर २०१० मध्ये जेव्हा मायदेशी परतलो तेव्हा एकदा 'लायब्ररीत' वेळात वेळ काढून गेलो. तिकडे 'लय्ब्ररिअनच्या जागेवर एक बाई बसलेली दिसली. सहज थोड्यावेळाने तिला विचारले, " आज काय जेम्स ची सुट्टी आहे का?" चेहरा एकदम गंभीर करून तिने उत्तर दिले, " मी जेम्स ची पत्नी आहे. ४ महिन्यांपूर्वी जेम्स वारला. त्याचे हार्ट फेल झाले!"

तो दिवस मी एकदम गप्पं होतो! आत एक पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटत होती. जेम्स नावाच्या म्हाताऱ्याच्या जाण्याने एका विलक्षण धक्क्याला मला सामोरे जावे लागले. लायब्ररीतल्या सगळ्या मुला-मुलींना अजून त्याची आठवण येते. बाहेरचा शिपाई त्याची आठवण काढतो....साऱ्यांना त्याची आठवण येते!

मागच्या आठवड्यात तिकडे परत जाण्याचा योग आला. तेव्हा त्याच्या बायकोने ( जी आता तिकडे 'लाय्ब्ररिअन' आहे ) मला माझ्याबद्दल विचारले. तेव्हा आमच्या बोलण्यात मी पनवेलचा आहे असं आलं आणि ती चटकन मला म्हणाली...." अरे तो तू वाटतं! " माझ्या चेहऱ्यावरचा आश्चर्याचा भाव पाहून तिने लगेच सांगितले, " जेम्स खूप बोलायचा तुझ्याबद्दल. म्हणायचा एक अतिशय शौकीन मुलगा लायब्ररीत येतो. पनवेलवरून येतो....उत्साहात असतो....आणि माझ्याबरोबर चर्चा देखील करतो. त्याला आश्चर्य वाटायचे तुझ्याबद्दल. आज प्रत्यक भेट झाली आपली. नाईस टू मीट यु!"

त्यादिवशी घरी जाताना चेहऱ्यावर आनंद असल्याचा उगीचच भास होत होता!


3 comments:

  1. a very nice portrayal of a very intriguing personality ... !!

    ReplyDelete
  2. Thanks a lot, 'artist'! Please look out for more! :)

    ReplyDelete
  3. Khup chhan lihilay :) Aawdal..

    ReplyDelete