Pages

Total Pageviews

Monday, August 29, 2011

घनश्यामजी

'शिक्षण' ही समाजाची गरज आहे हे खरे आहे! पण 'शिक्षण' कशाला म्हणावे हे मात्र समाजाला अजून कळले नाही असं कधी-कधी वाटतं. चार पुस्तकं वाचण्याला समाज शिक्षण म्हणत आला आहे. परंतु हे पुस्तकांचे 'शिक्षण' किती फसवे असते असे आज-कालच्या....नव्हे आजच्या शिक्षकांकडे बघून प्रकर्षाने जाणवते. आम्ही ज्या पिल्लै कॉलेज मध्ये शिकलो त्यात अश्या शिक्षकांचे प्रतिनिधित्व काही लोकांनी स्वखुशीने केले होते! त्याच 'हिटलरशाही' मध्ये आम्ही काही गोष्टी शिकायचा प्रयत्न केला पण थोड्या दिवसांनी तो नाद सोडून दिला! पण आम्ही पडलो विद्यार्थी! त्यामुळे आम्ही ३ वर्षांनी आनंदाने ह्या कारभाराला राम राम ठोकला! परंतु ह्या कॉलेज मध्ये स्वतःची नोकरी असल्यामुळे, आम्ही गेल्यावर, एका व्यक्तीला मात्र टिकून राहावे लागले. ती व्यक्ती म्हणजे 'घनश्यामजी'

वास्तविक घनश्यामजी हे कुणी शिक्षक नव्हते.अर्थात आमची पिढी शिक्षकांना 'अरे-तुरे'च करते, त्यामुळे ह्यांच्या नावापुढे 'जी' जोडणं आणि हे शिक्षक नसणं असं वेगळं सांगायला नकोच आहे मी! पण मग मोठ्यांना नावाने हाक मारणाऱ्या आम्हा मुलांना, ह्यांना 'जी' का म्हणावंस वाटलं? त्याचं औपचारिक कारण म्हणजे त्यांना सारा 'शिक्षकवर्ग' घनश्यामजी पुकारायचा. आणि अनौपचारिक कारण त्यांचा स्वभाव.सदैव 'शिक्षकांच्या' सहवासात राहून सुद्धा, आमच्या 'प्रयोगातील' सामग्री धुणारा हा माणूस, स्वभावाने किती मनमिळावू होता ह्याचाच प्रत्यय कॉलेजच्या त्या ३ वर्षात आम्हाला आला.

त्यांच्याशी आम्हा मुलांचा धागा नेमका केव्हा जोडला गेला हे आठवत नाही. मला वाटतं पहिल्या वर्षीपासून जेव्हा प्रयोग सुरु झाले, तेव्हा आम्ही त्यांच्या आजू-बाजूला घुटमळू लागलो. कधी 'beaker ' दया , तर कधी test tube दया अश्या मागण्या करीत आम्ही त्यांच्याकडे जायचो. त्यांचं मुख्य काम, अर्थात हे सर्व धुवून ठेवण्याचं होतं. पण कधी कधी प्रयोग संपवायची घाई असली व त्यानंतर घरी जायची घाई असली तर त्यांच्याकडे जायचो. जेणेकरून मुलींच्या घोळक्याआधी काम संपवून घरी पळता यावं! पण त्यांच्या मनमिळावू स्वभावाचं पाहिलं दर्शन झालं ते आम्ही सर्व पोरं- पोरी गोव्याला जायला निघालो तेव्हा. आमचं गोव्याला जाणं हे तराजूच्या पारड्याप्रमाणे वर-खाली होत-होतं. अर्थात आम्हला गोव्याला घेऊन जाणारे आमचे 'एच ओ डी' तितकेच दिव्य होते. आणि मी वर्गाचा 'सी आर' असल्यामुळे मध्यस्थीची जबाबदारी माझी होती! असंच, एकदा विक्षिप्तपणाच्या नादात 'एच ओ डी' गोव्याला जायचं नाही असं म्हणाले. तेव्हा खट्टू झालेल्या आम्हा मुलांना सर्वप्रथम समजावायला जर कुणी आलं असेल, तर ते म्हणजे घनश्यामजी! वास्तविक ते गोव्याला अजिबात येणार नव्हते. पण " वहा जा कर 'बीच' पे मस्त भीग के आना", असं त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं! आपण 'भांडी धुण्याचं कंटाळवाणं काम करावं, पण दुसऱ्याला आनंदाच्या शुभेच्छा दयाव्या' , ही माझ्यामते फार कठीण गोष्ट आहे!

तसा दुसरा एक अनुभव मला २ ऱ्या वर्षी आला. आमच्या कॉलेज ने एक विज्ञान प्रदर्शन आयोजित करायचे ठरवले. आमच्या 'एच ओ डी' ची एक विशेषता होती. गोव्याला मनमुराद आनंद लुटायला जायची 'सहल' असो, अगर विज्ञान प्रदर्शनामार्फत 'आनंद मिळवायची' संधी असो, ते आमच्या कुठल्याही प्रस्तावाला प्रथम 'नाहीच' म्हणायचे! मग त्यांच्यामागे गळ घालून, त्यांच्या हाता-पाया पडून त्यांच्याकडून एकदाची परवानगी मिळायची. आणि मग एवढ्या उशिरा मिळालेल्या परवानगी नंतर उरलेल्या थोड्याश्या वेळात आम्ही 'तयारी' करायला सुरुवात करायचो! ह्या प्रदर्शनात मी आणि माझ्या मित्रांनी, 'किचन मधल्या कचऱ्यापासून 'मिथेन' वायू बनवायचे ठरवले होते. बरेच प्रयोग करून बघितले, पण 'मिथेन' काही निघेना! तेव्हा कुठल्याही 'शिक्षकाने' पुढे यायच्या आधी आमच्या पाठीवरून हात फिरवणारे होते घनश्यामजी! "तुमने इतना 'try किया है ना, तो फिर जरूर gas आयेगा!" त्यांचे हे शब्द ऐकल्यावर काय धीर यायचा! आमची प्रयोगाची सामग्री पाहून काही काही 'शिक्षकांनी' नाकं मुरडलेली होतीच!

त्याच दिवसातली एक विशेष आठवण आहे. आम्ही 'मिथेन' कचऱ्यापासून बनवत असल्यामुळे, मला थोडासा सडलेला भाजीपाला घेऊन कॉलेज ला जावं लागत असे. मग त्यावर ते काही विशिष्ट 'विधी' करावे लागत. माझ्या कामावर घनश्यामजींचे बरीक लक्ष असे. आमच्या एक 'शिक्षिका' तर "कचरेवाला आ गया देखो", असं खोचकपणे म्हणून मला हसायच्या! ही आपल्या 'जीवनपद्धतीची' एक खासियतच आहे की! आपण झाडूची पूजा करतो.....पण तोच वापरणाऱ्या 'झाडूवाल्याला' मात्र तुच्छ मानतो! चार पुस्तकं वाचणारा हाच 'शिक्षक'! मग अश्या वेळेला "तुम उस्पे ध्यान मत दो" असं मला येऊन घनश्यामजी सांगायचे! आणि त्या 'ध्याना'कडे 'ध्यान' न देता आम्ही आमचे काम करू लागलो आणि एके दिवशी 'मिथेन' वायू तयार झला! आमचा प्रयोग यशस्वी झाला! तेव्हा सुद्धा आमच्या पाठीवर पहिली थाप जर कुणी मारली असेल, तर ती घनश्यामजींनीच!

परीक्षा उद्यावर असणे व तरीही कॉलेजमध्ये शिकवणे न संपणे, हा तर प्रत्येक कॉलेजचा नियमच असतो! अश्यावेळेला मग आम्ही 'त्या दिवसात' (फक्त!) लायब्ररीत बसायचो! आमचे 'शिक्षक' कधी कधी घनश्यामजींना लायब्ररीत पुस्तकं आणायला पाठवायचे! तेव्हा आमच्या शेजारी येऊन " पढो पढो, exam है न! खाना वगेरे खाया के नाही", असं प्रेमाने विचारायचे! मला कधी कधी वाटायचं की ह्यांना असं वाटत नसेल का, की "आपल्या मुलांनी पण ह्या कॉलेज मध्ये शिकावं, पुस्तकं वाचावीत, मोठं व्हावं"? पण नंतर वाटायचं की आमच्या कॉलेजच्या शिक्षकांना बघून त्यांना असं नक्कीच वाटत नसेल! वारंवार उद्धटपणे बोलणारी माणसं, 'कचरेवाला म्हणून हिणवणारी माणसं जर 'मोठी' असतील, तर त्यांना केव्हाही 'मोठं' न व्हावासच वाटत असेल!

३ ऱ्या वर्षी असताना आम्ही कॉलेज मध्ये 'शिक्षक दिन' साजरा केला! 'छम छम करता है ये नशीला बदन' नामक गाणी शिक्षकांसमोर पेश केली गेली! आजच्या घडीला कुठल्याही 'मंगल कार्याला' करायलाच लागणारा 'fashion show ' चा 'विधी' झाला! एका उत्साही मुलीने आमच्या 'एच ओ डी' ची तुलना 'डॉ. राधाकृष्णन' ह्यांच्याशी करीत त्यांच्या पायावर डोकं ठेवलं! सारा वर्ग त्या दिवशी 'शिक्षकांना' 'विश' करीत होता व नंतर आपापल्या घोळक्यात जाऊन दंगा करीत होता! घनश्यामजी कुठेच नव्हते! अश्यावेळेला आम्ही काही मुलांनी( आणि मला माझ्या मित्रांचा अभिमान वाटतो) घनश्यामजींना जाऊन एक 'शर्ट- पीस' दिलं होतं! त्यावेळेला त्यांच्या डोळ्यात साठलेला आनंद मी अजून विसरू शकत नाही! थोडं भावूक होऊन त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला होता, " बहुत आगे बढो!"

डिग्री संपली! हा-हा म्हणता कॉलेज ची ३ वर्षे पूर्ण झाली ! परीक्षा सुरु होण्यापूर्वीचा आमचा कॉलेजचा शेवटचा दिवस होता. तेव्हा सर्वांना घनश्यामजींनी सांगितले होते, " इसके बाद बीच बीच में आ के मिलके जाओ." आम्ही हो म्हणून त्यांचा निरोप घेतला होता!

आम्ही कॉलेज सोडल्यानंतर कॉलेज मध्ये खूप बदल झाले. आमच्यावेळी असणारया 'एच ओ डी' ला आमच्या नंतरच्या पोरांनी 'तक्रारी' करून काढून टाकले. कॉलेज मध्ये चांगले, अर्थात चांगल्या स्वभावाचे शिक्षक आले. २-३ वर्षांनी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा घनश्यामजींनीच हे मला सांगितले. त्यांची बदली आता दुसऱ्या एका 'department मध्ये झाली आहे! "इधर के लोक अच्छे है.....तुम्हारे टायम के वक्त थे वैसे नाही है", असे ते मला सुखाने सांगत होते!

आम्हाला फळ्यावर काही न शिकवता बऱ्याच गोष्टी शिकवून जाणारा हा आमचा 'शिक्षक' आता सुखाने 'नोकरी' करतोय हे पाहून बरं वाटलं!



2 comments:

  1. आम्ही त्या मानाने जरा नशीबवान होतो. डोंबिवलीला स्वामी विवेकानंदमध्ये बालपण गेलं आणि महाविद्यालयीन शिक्षण ठाण्याला व्ही.पी.एम मध्ये. दोन्हीकडे अगदी मनमिळाऊ आणि प्रेमळ शिक्षक होते. शाळा तर मराठीच होती आणि सर्व शिक्षक जवळपास राहणारे. माझ्या चुलत भावा-बहिणींनंतर मी आमच्या घरातला चौथा प्रतिनिधी शाळेत. त्यामुळे सर्व शिक्षक मला माझ्या घरादारासकट ओळखायचे. मी शाळेत कधी काही उलट-सुलट केलं तर मी घरी जायच्या आधी त्याची बातमी जात असे. पण त्या शिक्षकांच्या काळजीपूर्वक स्वभावाची किंमत आता कळते. ठाण्याला असताना देखील पूर्ण मराठमोळे वातावरण असायचे कॉलेजमध्ये. गणवेश असायचा, त्यात सकाळी ८ ते संध्याकाळी ५ ही वेळ सक्तीने पाळली जात असल्याने शाळेत असल्यासारखंच वाटायचं. HOD उषा राघवन आणि द्रष्टे प्राचार्य नायक सर आम्हाला लाभले होते ते सर्वात मोठे भाग्य. अर्थात कॉलेजमध्ये असताना सर्वच शिक्षकांची टर उडवायचो, पण कधी कुणाशी वाकडं नव्हतं. मी तर कॉलेजमध्ये अतिशय टारगट होतो. पण त्याचा फरक कधी पडला नाही. उलट तसा असल्यामुळे सर्वच शिक्षकांच्या चिंतेचा विषय होतो. वायवाला बसलेलो असताना नायक सरांनी येऊन "चांगला पोरगा आहे, जरा सांभाळून घ्या" म्हणून एक्सटर्नलला विनंती केल्याचे आठवते. एकूण, पोरं आपल्या पदरात पडली आहेत तर आपणच सांभाळायला हवीत असा दृष्टीकोन होता.
    पास-आउट झाल्यावर इथे युनिवर्सिटीला पाठवायला ट्रान्सस्क्रिप्ट आणि Letter of Recommendation हवे होते. तेव्हा कॉलेजमध्ये गेलो होतो. राघवन मॅडमनी 'किती खोटं बोलायला लावतोस' म्हणून सह्या दिल्या होत्या. आणि नायक सरांनी 'चाललायस ना अमेरिकेला? आता कळेल आपल्या कॉलेजची किंमत' असे म्हणत आशीर्वाद दिले होते. खरंच आता किंमत कळते.

    ReplyDelete