परवाच माझ्या फेसबुकच्या भिंतीवर एक नवीन 'पोस्टर' लावले गेले. ( wall
वर post करणे ह्याचा मराठीतला वापर म्हणा हवं तर - 'पोस्टर' लावणे! आणि
'wall ' असल्यामुळे व्यावहारिक देखील! असो.. ) एरवी गुलाबातून रक्त
सांडणारा किंवा अश्रू ढाळणाऱ्या एखाद्या सदैव उदास मुलीचा फोटो किंवा
गुढीपाडवा, बैल-पोळा,दिवाळी,ईद, क्रिसमस ते पार 'thanks giving ' पर्यंत
तुम्हाला शुभेच्छा देणारा एखादा फोटो अगर एखाद्या राजकीय नेत्याची नसलेली
कारकीर्द उगीच उजळणारा संदेश किंवा एका पक्षामुळे आपला देश कसा लुटला जातोय
आणि आपल्या देशात काडीमात्र प्रगती कशी झाली नाही असले 'पुरावे' देणारे
माहितीपत्र - ह्यांच्यापैकी त्या 'पोस्टर' मध्ये काहीही नव्हते ही खरच एक
सुखद बाब होती! उलट त्यात होती एक बातमी. अमेरिकेत स्थायिक असलेल्या काही
उगवत्या कलाकारांनी प्राचीन भारतीय संगीत आणि 'jazz ' संगीत ह्यांचे
'फ्युजन' करायचा प्रयत्न केला आहे. त्यातील 'शंकर टकर' हे नाव बऱ्याच
जणांनी ऐकले देखील असेल. हा एक अत्यंत प्रयोगशील ग्रुप आहे आणि इंटरनेट
विश्वात बरीच प्रसिद्धी पावलेला देखील! तर ह्या ग्रुपची एक रचना असलेला
'video ' होता आणि त्यात काम करायची संधी मिळाली आहे हे सांगणारी एक बातमी!
'पोस्टर' माझ्या मित्र डेविडने लावले होते आणि ही बातमी म्हणजे त्याने
संगीत क्षेत्रात किती प्रगती केली आहे ह्याची साक्ष!
डेविड म्हणजे डेविड रामोस. हा 'ओकारीना' नावाचे एक दुर्मिळ वाद्य वाजवतो.
तशी त्याला बाकी वाद्य देखील वाजवता येतात. पण मुख्य वाद्य हे. माझी आणि
डेविडची पहिली भेट लगेच मला आठवली. माझ्या विद्यापीठाच्या ( university )
संगीत विभागात मी 'भारतीय संगीत' ह्या विषयावर एक तासभर लेक्चर दिले होते.
त्यात सुरुवातीला जवळ-जवळ २० मिनिटं माझे पियानो वादन झाले होते आणि नंतरची
४० मिनिटं लेक्चर. ( पहा :
http://www.relatingtheunrelated.blogspot.in/2011/11/blog-post.html
) ह्या लेक्चरच्या आधी वर्गाचा अंदाज यावा आणि प्रोफेसर डॉ. ब्रील
ह्यांच्या शिकवण्याची शैली कळावी म्हणून त्यांच्या एका लेक्चरला मी हजेरी
लावली होती. मी जरी बायोलॉजीचा विद्यार्थी असलो तरीही अख्ख्या विद्यापीठात
कोणत्याही लेक्चरला बसायला परवानगी होती.ज्ञान-दान ह्या विषयी अमेरिकेत खूप
आस्था आहे. ( आता ह्या लोकांनी विद्यापीठाची लायब्ररी शहरातल्या
सर्वांसाठी 'फ्री' ठेवलेली आहे तर कुणालाही कुठल्याही लेक्चरला बसायची
परवानगी देणे ह्यात काही खूप आश्चर्य वाटायचे कारण नाही! असो... ) तर ह्या
लेक्चरला डॉ. ब्रील ने माझी ओळख करून दिली. " हा आशय. भारतातून आला
आहे....आपल्याला भारतीय संगीताबद्दल पुढे लेक्चर देणार आहे...आणि आपल्या
कॅम्पस मध्ये एक 'world music group ' स्थापन करायची ह्याची इच्छा आहे. तर
इच्छुक व्यक्तींनी त्याला प्रतिसाद द्यावा...खरं तर तुम्ही सर्वांनी त्याला
प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे." 'मेक्सिकोचे मरियाची संगीत' हा
विषय असलेले ते लेक्चर संपले पण नंतर कुणीही माझ्या प्रस्तावाकडे फारसे
लक्ष दिले नाही. सारे घरी जायच्या घाईत होते. कदाचित इकडे आपल्याला फार
प्रतिसाद मिळणार नाही असा निष्कर्ष काढून मी निघायच्या तयारीत असतानाच
मागून एक आवाज आला. " अशय... is that how you pronouce your name ?" मी
त्याला 'आशय' हे माझे नाव समजावले आणि आमची चर्चा सुरु झाली. ( पुढे मी
अमेरिका सोडेपर्यंत त्याने मला 'अशय' च म्हणणे सुरु ठेवले!) डेविडला माझा
प्रस्ताव आवडला होता. त्याला एकूणच 'world music ' बद्दल उत्सुकता आहे हे
समजले. वर्गात मी आणि तो बोलत बसलो होतो. मी पियानो वाजवतो हे समजल्यावर
वर्गात ठेवलेल्या पियानोकडे इशारा करत त्याने मला वाजवायची विनंती केली. मी
पियानोवर बोटं ठेवली आणि वर्गातल्या अतिउच्च दर्जाच्या 'sound system ' चा
अनुभव घेतला. संगीताचा वर्ग असावा तर असा! जवळ जवळ २० मिनिटे चाललेला 'राग
यमन' त्यादिवशी डेविडने मन लावून ऐकला. 'काहीतरी वेगळं ऐकू येतंय' म्हणून
कदाचित ८-१० लोकं पण जमली. सगळेच विद्यार्थी. त्या दिवशीपासून माझी आणि
डेविडची मैत्री सुरु झाली. आज देखील सुरु आहे.
त्यानंतर आम्ही फेसबुकवर 'connect ' झालो. अमेरिकेत शक्यतो मित्र होण्याची
ही प्रथम पायरी असते. भारतासारखे ' अरे ...नंबर दे रे...तुला मिस कॉल
देतो...आला का मिस कॉल...हो, माझाच नंबर आहे...सेव कर...मला मिस कॉल दे...'
हे शक्यतो लगेच होत नाही. privacy जपणारा देश आहे न हा. विद्यापीठात
मुलांचे 'कळप' फार क्वचित दिसतात ( मुलींचे नाही म्हणत...त्यांचे 'कळप' तर
भारतात सुद्धा दिसत नाहीत.. त्यात विशेष काहीच नाही म्हणा...) ह्याचे कारण
हे इथपासून सुरु होत असावे. दरम्यान फेसबुकवर थोडी चर्चा होत होती. 'World
Music Group ' साठी काय करता येईल ह्याबद्दल थोडा विचार केला जायचा. तो
त्याच्या मित्रांना देखील सांगणार होता. पण मी ठरलो बायोलॉजीचा विद्यार्थी.
सतत lab मध्ये काम करावे लागत होते. शिवाय त्याच वेळात मला मोटेल मध्ये
जॉब लागल्यामुळे त्याचा वेळ सुद्धा जमवावा लागत असे. सप्टेंबर महिन्यातील
दिवस ह्या गोष्टींमुळे भरभर जात होते आणि अचानक डेविडने मला एका शुक्रवारी
भेटण्याबद्दल विचारले. परीक्षा वगेरे आटोपल्या होत्या आणि त्या दिवशी
मोटेलची शिफ्ट पण नव्हती. मी लगेच होकार कळवला. शुक्रवारी दुपारी आम्ही लंच
एकत्र करायचे ठरवले. आणि आमचे laptops सामोरा-समोर ठेवून आम्ही गप्पा
मारायला सुरुवात केली. तेव्हाच त्याने मला त्याचे 'ओकारीना' हे वाद्य प्रथम
वाजवून दाखवले. " मी तुला हे वाद्य दाखवतो. तुला पहायचं आहे....इकडे २
मिनिटात कशी शांतता पसरते? थांब मी वाजवतो...". आणि त्याच्या वाजवण्याने
खरोखर २ मिनिटात आजूबाजूच्या टेबलवरच्या मुला-मुलींचे लक्ष आमच्याकडे गेले.
हा मुलगा त्याच्या क्षेत्रात किती मुरला आहे हेच दिसून येत होते. आणि हे
सांगताना त्याचा पाय जमिनीवर ठेवून देहबोलीतून ( body language ) वाहणारा
आत्मविश्वास सुद्धा! त्या दिवशी त्याच्याबद्दल प्रथम कळले. हा मुलगा 'san
antonio ' ह्याच शहरात राहत होता. रोज बसने प्रवास. क्वचित सायकल आणत असे.
कधी गिटार वगेरे आणायचे झाले तर सायकल आणणे रद्द! अत्यंत धार्मिक. सदैव
देवाचे ( Jesus Christ ) आभार मानणारा. मी आज जो काय आहे तो त्याच्या
कृपेमुळे वगेरे म्हणणारा. पण धार्मिक ह्याचा अर्थ आपलेच मूळ जपणारा असं
नव्हे. नाहीतर एवढ्या उत्सुकतेने भारतातील संगीत ऐकायला तो आला नसता. चर्च
मध्ये वाजवणे, बाहेर ग्रुप मध्ये वाजवणे हे सगळं सुरु होतंच. पण ' I want
to know more about music all over the world ' हे त्याने बोलून दाखवले.
आणि ह्याच दिवशी त्याच्या आवडीच्या कलाकारांमध्ये एक भारतीय नाव सामील झाले
- उस्ताद झाकीर हुसैन! लंच झाल्यावर त्याने भारतीय संगीताचे काही नमुने (
म्हणजे ' samples ' ...'नमुना' नव्हे! ) ऐकायची इच्छा व्यक्त केली आणि लगेच
मी तबला ऐकवायला सुरुवात केली. 'You Tube ' वर झाकीर वाजवू लागला.
" मी आतापर्यंत बरीच तालवाद्य ऐकली आहेत. पण त्यात एकतर 'sticks ' वापरतात
किंवा अख्खा हात. हा माणूस तर नुसती बोटं वापरतोय. how is it possible ?
आणि ह्या पाच बोटांच्या जोरावर अख्खा rhythm तयार होतोय! This must be
really great . मला ह्या माणसाला ऐकायला नक्कीच आवडेल. हा कुठे राहतो?
अमेरिकेत perform करतो का? " त्याने बऱ्याच उत्साहाने हे विचारले. पण हा
उस्ताद लॉस-अन्जेलेस मध्येच राहतो हे ऐकल्यावर त्याला अजून आश्चर्य वाटले.
मला कधीतरी ह्याच्या कार्यक्रमाला घेऊन जा अशी विनंती त्याने त्या दिवशी
केली. मी अर्थात होकार दिलाच. पुढच्या महिन्यात झाकीरभाईंच्या
कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्युस्टनला जायचा योग आला. तेव्हा काही डेविडला
माझ्या बरोबर येणे जमले नाही. पण मी तिकडून परत आल्यावर मैफल कशी होती हे
विचारायला तो विसरला नाही. मी उस्ताद बरोबर काढलेल्या फोटोबद्दल माझे
अभिनंदन पण केले. पण ह्याच महिन्यात ह्युस्टन वरून आल्यावर वर
सांगितल्याप्रमाणे ह्याच्या 'world music ' च्या वर्गात माझे लेक्चर आयोजित
केले होते. आधीच झाकीरभाईंना भेटल्यामुळे उत्साह द्विगुणीत होता. लेक्चर
खूप छान झालेच. माझे वादन पण मुलांना आवडले आणि मी दाखवलेली भारतीय वाद्य
पण मुलांना खूप आवडली. त्यात शेवटी झाकीरभाईंची 'video clip ' दाखवताना तर
पोरांनी बाक वाजवणे बाकी ठेवले होते. कुणी हवेत बोटांचे इशारे करीत होते तर
कुणी डोलून तालाला दाद देत होते. आणि ह्या दिवसानंतर डेविड ने झाकीरभाईंना
नीट ऐकायला सुरु केले. मी फेसबुकवर 'share ' केलेल्या तबल्याच्या
चित्रफिती ( videos ) तो आता ऐकू लागला होता. आणि माझ्या लेक्चरच्या जवळ
जवळ आठवड्यानंतर मला फेसबुकवर डेविडने झाकीर हुसैन चे पेज
'लाईक' केल्याचे आढळले. आपले लेक्चर सार्थक झाल्याची थोडीफार भावना त्यादिवशी माझ्या मनात निर्माण झाली.
डेविड नंतर कॅम्पस मध्ये भेटायचा. अमेरिकन विद्यापीठाचे कॅम्पस एक उत्साही
ठिकाण असते. कुणी skate board वरून मुक्त विहार करत असतं तर कुणी सायकल
चालवत चालवत वर्ग असलेल्या बिल्डींग पर्यंत जात असतं. काही मुलं छोट्या
घोळक्यात पुस्तकं घेऊन जात असतात तर काही कृष्णवर्णीय मुलं नाचणे आणि चालणे
ह्यांचा समन्वय साधत बर्यापैकी आवाज करीत स्वतःच्ता अस्तित्वाची जाणीव
करून देत असतात. काही मुलं सदैव काहीतरी चरत असतात तर काही मुलं
खाण्या-पिण्याचे stall टाकून उभी असतात. ( ह्यातील पदार्थ विकून कुणालातरी
मदत म्हून निधी जमविण्यासाठी). काही मुलांना आपापल्या 'students
organization ' चा प्रचार करायचा असतो तर काही मुलं विद्यापीठाच्या
चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत असतात. कुठे 'आज रात्री ९ वाजता अमुक
अमुक सिनेमा आहे....फुकट आहे....जरूर या' ही पाटी...तर कुठे तरी ' अमुक
अमुक मुलाला/ मुलीला अध्यक्ष म्हणून निवडून आणा हा बोर्ड ( banner नव्हे!).
काही मुलं हवामान चांगले असल्यास 'flying dish ' ची मजा लुटत असतात तर
काही मुलं चक्क रग्बी खेळत असतात. कुणी जॉग्गिंगच्या प्रेमात तर कुणी
चालण्याच्या. ह्याच भारतीय मुलाला विश्वास न बसणाऱ्या वातावरणात अजून एका
गोष्टीचा समावेश असतो. ती म्हणजे मुक्त कंठाने गाणारी किंवा वाद्य वाजवणारी
मुलं. आणि ह्या सर्वांकडे बघून जाणारी नाकाचा केवळ मुरडण्यासाठी वापर न
करणारी अमेरिकन मुलं! डेविड हा बऱ्याचदा मला गिटार वाजवताना आणि गाताना
दिसायचा. आजूबाजूच्या लोकांकडे त्याचे अजिबात लक्ष नसायचे. आपल्याच कलेत
गुंग! देवाची स्तुती करत गाणी म्हणणे त्यात प्रामुख्याने. त्याच्या बाजूला
जाऊन उभे राहावे लागायचे. मग काही सेकंदाने त्याला लक्षात यायचे. " वो देख
तेरा दोस्त...येडे माफिक बजाते बैठा है...", अशी वाक्य माझे मित्र मला
बऱ्याच वेळेस बोलून दाखवायचे.
पण डेविडची हीच कला जवळून अनुभवायची संधी आम्हाला त्या दिवसात मिळाली.
प्रत्येक अमेरिकन विद्यापीठात Indian Students Association ही संस्था आहे.
विद्यापीठात येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना airport वरून आणायचे ( बहुतेक
वेळेस विनामुल्य) , त्यांची तात्पुरती राहण्याची सोय करणे ( त्यांना
स्वतःची भाड्याची apartment मिळेपर्यंत) इथपर्यंत ही संस्था खूप चांगलं काम
करते. पण ह्याच्या व्यतिरिक्त होळी साजरी करणे, दिवाळी साजरी करणे आणि १५
ऑगस्ट आणि २६ जानेवारी ह्या दिवशी भारताचा झेंडा उभारणे हे सोडून ह्या
संस्थेत काही विशेष होत नाही. ह्याचा अर्थ ह्या गोष्टींना माझा विरोध आहे
असं नव्हे. परंतु लहानपणी भूगोलात ' भारत हा अमुक इतक्या राज्यांमध्ये
विभागलेला आहे' हे वाक्य जेव्हा आपली पोरं खरं करून दाखवतात तेव्हा ह्या
गोष्टींबद्दल विशेष आस्था वाटत नाही. आणि २१ व्या शतकातील परदेशातल्या
भारतीय मुलांची ही 'कर्म-कांड' होऊन बसतात. तर ह्याच संस्थेच्या दिवाळी
सोहळ्याची तयारी आम्ही करीत होतो. कार्यक्रम कुठले ठेवायचे हा विचार सुरु
असतानाच एकदम डेविडच्या 'ओकारीना' ह्या वाद्याची आठवण झाली. एरवी 'फक्त
बॉलीवूड' ( किंवा त्या त्या राज्यातील चित्रपट संगीत) असलेल्या ह्या
सोहळ्यात काहीतरी वेगळं करण्याचा आमचा मनसुबा होताच. डेविडने माझे आमंत्रण
अगदी एका क्षणात स्वीकारले आणि त्याच्या वाजवण्याने धम्माल आणली. कार्यक्रम
बरोब्बर संध्याकाळी ६:३० वाजता सुरु होणार होता. डेविड ६:१५ लाच हॉल वर
हजार! आणि प्रत्येक भारतीय कार्यक्रम असल्याप्रमाणे आमचाही कार्यक्रम ७:२०
वाजता सुरु झाला! अधून -मधून माझे लक्ष डेविडकडे जात होते. पण त्याला
कसलाही त्रास वाटत नव्हता. उशीर झाला आहे ह्याबद्दल नाराजी नव्हती. एवढेच
काय, तर नंतर बऱ्याच गोष्टींना तो अगदी मनापासून दाद देत होता. बॉलीवूडची
नृत्य, गाणी हे मस्त एन्जॉय करीत होता. पण त्याची वेळ आली तेव्हा मात्र
अगदी आत्मविश्वासाने त्याने आपली कला सादर केली. त्या छोट्या वाद्यावर
त्याने अमेरिकन लोकधुना वाजवून लोकांची दाद मिळवली. इतकेच नव्हे, तर 'हा
कोण मुलगा...आणि हे कुठलं वाद्य' अशी भावना मनात ठेवून नुसता आरडा-ओरडा
करणारे प्रेक्षक (?) सुद्धा शांत बसून त्याच्या वादनाला दाद देऊ लागले. आणि
खरी धमाल तर पुढे आली. माझ्या एका मित्राने एका गिटार वाजवणाऱ्या त्याच्या
अमेरिकन मित्राला वाजवायला बोलावले होते. डेविड आणि ह्या मुलाची अजिबात
ओळख नव्हती. पण दोघांचे 'solo ' वादन झाल्यावर त्यांनी ५ मिनिटं ( हो फक्त
५! ) एकमेकांशी चर्चा केली आणि स्टेजवर जाऊन सह-वादन केले! जुगलबंदीच म्हणा
ना! आम्हाला सर्वांना पर्वणीच होती ही. त्यांचे 'co - ordination ' अगदी
जबरदस्त होते. दिवाळी सोहळ्यातील ह्या दोघांचे वादन नक्कीच सर्वोत्कृष्ट
ठरले. " सॉरी...मला फेमिली बरोबर डिनरला जायचं आहे...मी पूर्णवेळ नाही
थांबत...पण मला खूप मजा आली...मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद!" शेवटी
जेवायचा आग्रह करताना डेविड मला आनंदाने म्हणाला.
बाकी डेविड बराच family -attached ' होता. त्याच्या फेसबुकच्या 'status
message ' मध्ये बऱ्याच वेळेस परिवाराचा उल्लेख असायचा. एकंदर त्याचा
परिवार बराच 'conservative christian ' असावा. बऱ्याच वेळेस jesus christ
ची स्तुती असायची. किंवा family dinner चा एखादा उल्लेख असायचा. म्हणूनच
कदाचित मी 'las vegas ' ला जाणार आहे हे कळल्यावर इतरांनी दिलेले सल्ले
किंवा मी तिकडे काय करू शकतो ह्याबद्दल केलेल्या कल्पना ह्यापेक्षा वेगळा
संदेश डेविड ने पाठवला होता. " स्वतःची काळजी घे. I wish you a safe
journey and I pray to God that you do not fall for any unwanted and
unethical temptations ' असं त्यात लिहिलं होतं.
पुढे पुढे नवीन संगीत आत्मसात करताना डेविड ने तबला आणि झाकीर हुसैन
ह्यांना मात्र एक स्वतंत्र स्थान दिले होते. अधून मधून माझ्या posts ना
'likes ' येत होत्या. मला अगदी व्यवस्थित आठवतंय. उस्ताद अल्लारखा आणि
उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचा एक 'video ' मी फेसबुक वर टाकला होता. ' newton
and einstein of Tabla ' असं मी त्याचं वर्णन केलं होतं. प्रत्येक तबला
वादनासारखं ह्या दोघांनी पण काही बोल तोंडाने बोलून नंतर वाजवले होते.
डेविडला ह्याबद्दल फार उत्सुकता होती. लगेच संदेश पाठवला गेला ( फेसबुक
वर). मला ह्या तबल्याची 'divine ' भाषा शिकायची आहे. माझी खूप इच्छा आहे.
शिकवशील? ' आता मला कुठे तबला वाजवता येतो? पण ह्या दिवसानंतर मला भेटून
संगीत-चर्चा करायचा बेत तो आखू लागला. आपण कधीतरी भेटून एकत्र वाजवले
पाहिजे आणि दिवसभर फक्त संगीत ऐकले पाहिजे असं तो मला बऱ्याच वेळेस म्हणू
लागला. वेळ काही जमत नव्हती. आणि असं घडण्यासाठी मी अमेरिका सोडायच्या
आधीचा एक आठवडा उजाडला. आपण दुपारी मित्राकडे खेळायला जावं किंवा गप्पा
मारायला जावं असाच तो प्रकार होता. अगदी एका भारतीय मित्रसारखाच....
फेसबुक वर ह्याचा संदेश आला. 'गेले बरेच दिवस आपण ठरवतोय.....एकत्र मैफल करायची आहे...कधी करूया? आता तर तू चालला आहेस!'
" ह्या एका आठवड्यात कधीतरी जमवुया", मी उत्तर पाठवले.
"शुक्रवारी दुपारी जमेल का? माझा सकाळी क्लास झाला, की मी मोकळा
आहे...दुपारी दोन वाजेपर्यंत आहे...तू ६०३ नं ची बस पकड....माझ्या घराच्या
समोर थांबते! जाताना ८.०० वाजता तुला परत घरी जायला बस आहेच!" दुसऱ्या
दिवशी लगेच उत्तर. आणि खाली त्याने त्याचा पत्ता पाठवला. मी लगेच होकार
कळवला.
मी लगेच 'गुगल' वर नकाशा सुरु केला! ह्याचा पत्ता शोधला आणि तो bus stop
सुद्धा. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि तिकडून मला
त्याच्या घरी न्यायला तो स्वतः आला. मी त्याला लांबूनच ओळखले!
रस्त्यावरच्या सगळ्या गाड्यांमध्ये एक स्वारी सायकलवरून येत होती.
त्याच्या घरी आलो.हा एका छोट्याश्या घरात एकटा राहतो! समोर आल्या आल्या
वेगवेगळ्या प्रकारची वाद्य ठेवलेली दिसतात. समोरच 'केसियो' आहे. एक गिटार
आहे. आणि ह्या सगळ्याच्या बाजूला त्याचा laptop . त्याने मला बसायला खुर्ची
दिली. सुरुवातीला इकडचे-तिकडचे विषय निघाले. त्याच्या बोलण्यावरून इतकेच
कळले की ह्या मुलाचा परिवार त्याच शहरात राहत होता. परंतु खर्च खूप होत
असल्यामुळे ह्याने नवीन apartment मध्ये आपले बस्तान बसवले. संगीताचा
अभ्यास व्यवस्थित होतो हे देखील एक कारण होतेच. सबंध घर हे ' 1BHK ' होते.
त्यामुळे भाडे कमी. हा बाहेर नोकरी करून स्वतःचा खर्च भागवायचा. आणि
ओकारीना ह्या वाद्याचे 'video ' youtube ' वर अपलोड करून त्या बरोबर
advertisement च्या सहाय्याने अधिक डॉलर्स कमवायचा. इतर अमेरिकन लोकांसारखे
मिळकत आणि बचत हे विरुद्धार्थी शब्द त्याच्याही आयुष्यात होते.
अशाच थोड्या गप्पा झाल्यावर त्याने लगेच 'यु-ट्यूब' सुरु केले. आणि मग
आमची चर्चा सुरु! त्याने मला त्याच्या आवडत्या सगळ्या कलाकारांची गाणी
ऐकवली! अमेरिकन संगीत काय असतं, जाझ , पॉप्युलर संगीत ह्या सगळ्यांवर
चर्चा झाली. त्याने ऐकवलेले संगीत खरच खूप चांगले होते. पण त्याला जास्त
उत्सुकता होती ती आपल्या संगीताची.
" त्यादिवशी तुझ्या लेक्चरला सर्वात काय जर आवडले तर 'झाकीर हुसैन' चा
तबला! मला तबला काय असतो....कसा असतो...कसा वाजवतो ते सांग ना! त्याची भाषा
मला खूप divine वाटते." त्याने ही गोष्ट मला परत सांगितली. मी तबला वाजवत
नाही हे प्रथम त्याला सांगून त्याला असंख्य 'चित्रफिती' दाखवायला सुरुवात
केली. संगीतात दर्दी असलेल्या सगळ्या अमेरिकन लोकांसारखे ह्याला 'रवी शंकर'
नवीन नव्हते. पण त्यांच्याबद्दल सुद्धा त्याला अजुन थोडे सांगितले.
वेग-वेगळी वाद्य दाखवली. आणि मग शेवटी विषय गायनाकडे आला! त्याला गायन कसे
करतात ह्याच्यावर जास्त माहिती हवी होती.
माझ्या मनात काय आले काय माहिती. मी त्याला 'beatles ' चे norwegian wood
हे लावायला सांगितले. आम्ही दोघांनी ते ऐकले आणि त्याला नंतर 'पवन दिवानी'
हे लता चे गाणे ऐकवले. तो संगीत शिकत असल्यामुळे साहजिकच त्याला दोन्हीत
साम्य जाणवले. मग त्याला 'राग' ह्या विषयाकडे मी घेऊन आलो.
"हे आपण ऐकले....तो राग बागेश्री." मी सांगितले. त्याला समजत होतं!
काहीतरी नवीन शिकतोय ह्याचा आनंदसुद्धा होत होता. मग त्याला त्यादिवशी सगळे
प्रकार ऐकवले....अभंग, ठुमरी,कवाल्ली, ख्याल, सिनेमा-संगीत... इतकेच काय,
तर लोकसंगीत सुद्धा!
"हे सगळं तुमच्या एका देशात कसं काय? एवढा वेगवेगळ्या प्रकाराने नटलेला आहे
तुमचा देश?" त्याला हे चमत्कारिक वाटत होतं. पण सारखा सारखा तो 'झाकीर
हुसैन' कडे वळत होता! त्याच्या तबल्याने त्याला वेड लावले होते आणि ते
उतरणे शक्य नव्हते. साहजिकच आहे म्हणा. आमचे कुठे उतरले आहे अजुन?
मग विषय आत्ताच्या संगीताचा सुरु झाला. "अमेरिकन संगीतात आणि एकूण पॉप्युलर
संगीत म्हणजे 'पॉप' मध्ये एकेकाळी melody म्हणजेच 'चाल' हा प्रकार होता!
एकेकाळी म्हणजे अगदी ५-६ वर्षांपूर्वी! आता सगळं rhytm वर आधारित आहे!
त्यामुळे तेवढी मजा येत नाही!" डेविड ने आपले प्रामाणिक मत दिले.
आश्चर्याची गोष्टं म्हणजे आपल्याकडे देखील हेच निरीक्षण मी करत आलोय.
असो...
"तू लाइव कार्यक्रम ऐकायला जातोस का? " मी सहज विचारले
"आज-काल जेव्हा 'पॉप म्युसिक' गातात, तेव्हा 'माईक' च्या आधी एक software
ठेवलेले असते. ते तुमचा आवाज सुधारते आणि मग तुम्ही आपोआप सुरात येत.
त्यामुळे असे कृत्रिम कार्यक्रम मी का बघू? त्याच्यात डॉलर का खर्च करू?"
डेविड ने परत एकदा प्रामाणिक पण थोडे धक्कादायक विधान केले.
"मग 'एन्रिक इग्लेसिअस', ब्रिटनी स्पिअर्स', 'लेडी गागा' सर्व असंच करतात
का?" मी विचारले. त्यावर त्याचे उत्तर अगदी स्पष्टं होते - 'होय!'
मला हे कलाकार माहिती नसणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असं तो समजत नव्हता.
माझ्या देशात अगदी उलटी परिस्थिती आहे. हे कलाकार जणू आपलेच आहेत ह्या
थाटात आपण मिरवतो. आणि मग त्याने गिटार काढले आणि समोर ठेवलेल्या केसिओ वर
मला बसायला सांगितले! आणि आमचे वादन सुरु झाले. कुणीही काहीही ठरवले
नव्हते! त्याक्षणी वाजवायला सुरुवात केली आणि हे वादन २० मिनटे चालले.
त्याने ते 'रेकॉर्ड' केले आहे.....आणि मी त्याला ते 'यु -ट्यूब' वर 'उपलोड'
करायला सुद्धा सांगितले आहे! वाट बघतोय...
.
शेवटी बस ची वेळ झाली. दुपार कशी गेली काही कळलेच नाही. डेविड मला बसपर्यंत
सोडायला आला. जाता जाता एक मिठी मारली आणि आपण 'टच' मध्ये राहू असे
निश्चित केले!
डेविड अजुन माझ्या 'friends list ' मध्ये आहे. मधून मधून बोलणे होते.
संगीताची देवाण-घेवाण होते. आता ह्या सुरेल दुपारला वर्ष होईल. अधून-मधून
अमेरिकेची आठवण येते. मन विद्यापीठाच्या कॅम्पसची हळूच एक चक्कर मारून
येते. आणि दिसतो गिटार वाजवत गात-गात जीवनाचा आनंद घेणारा डेविड. देवाचे
आभार मानणारा डेविड. काहीतरी नवीन शिकायला उत्सुक असणारा डेविड. फेमिली
बद्दल आत्मीयतेने बोलणारा डेविड. माझा मित्र डेविड!
- आशय गुणे