Pages

Total Pageviews

Monday, May 5, 2014

'आम्हाला मातृभूमी नाही'

मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता. लेक्चरच्या वेळेस प्रोफेसरांनी 'आरक्षण हवे का नको' ह्या विषयावर चर्चा करायचे ठरविले. हा फार संवेदनशील विषय आहे हे मला माहिती होते परंतु वर्गातील सारी मुलं एवढ्या तावातावाने विरोधात बोलतील हे मला अनपेक्षित होतं. त्यातल्या एकाने आरक्षणासाठी थेट डॉ. आंबेडकरांना जबाबदार धरले आणि त्यांच्यामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगितले. सारा वर्ग टाळ्या वाजवू लागला आणि एकदम एका मुलाने हात वर केला. त्याला बोलायची संधी दिली गेली आणि बाबासाहेबांबद्दल तो इतके सुंदर बोलला की बस्स - प्रोफेसर देखील त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. वर्गातील मुलांना देखील त्यापुढे काही बोलता आले नाही आणि बऱ्याच लोकांनी काहीतरी निरर्थक मुद्दे काढून उगीच विरोध करायचा प्रयत्न केला. परंतु ते फोल ठरले आणि चर्चा संपली! मी मुद्दाम वर्गाबाहेर जाउन त्याच्याशी बोलले. प्रसाद सारखा शांत मुलगा एवढे प्रभावी बोलू शकेल ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता!

पुढे आमची ओळख वाढली. गप्पा वाढल्या. बरेच विषय बोलले जायचे परंतु वैचारिक चर्चा जास्त होत असे. कधी कधी लायब्ररी मध्ये नोट्स काढणे म्हणून बसले जायचे परंतु अभ्यास सोडून सामाजिक विषय जास्त बोलले जायचे. त्याला त्यावर बोलणे फार आवडायचे आणि त्याचे मुद्दे देखील खूप प्रभावी असायचे. खूप वाचन होते. आणि शिवाय विचार अगदी सर्वसमावेशक होते. माझ्या घरी भिंतीवर बाबासाहेबांचा फोटो होता परंतु माझ्याकडे  त्या फोटोला नमस्कार करणे ह्यापलीकडे काहीच नव्हते. आणि त्याचे त्यांच्याबद्दल असलेले वाचन मला शरमेने मान खाली घालायला लावायचे. आमची मैत्री वाढत गेली तसा तो अधिक बोलका होऊ लागला. एकदा असाच एक विषय सुरु होता. प्रसाद भान सोडून बोलत होता. लायब्ररी मध्ये पुढे बसलेल्या लोकांनी एक-दोन वेळेस मागे वळून आमच्याकडे पाहिले देखील. "आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?" अंगावर शहारा आला होता आणि डोळे पाणावले होते त्याचे. तो लालबुंद चेहरा मला अजून लक्षात आहे.

एकमेकांचा नंबर तर होता आमच्याकडे! त्यामुळे मेसेज वगेरे सुरु झाले. तेव्हा व्हाटसअप वगेरे नव्हतं आणि फेसबुक पण नुकतंच सुरु झालेलं! त्यामुळे मेसेज फॉरवर्ड करणं सुरु असायचं. आणि मी त्याच्या विचारांच्या आणि नंतर त्याच्या प्रेमात केव्हा पडले हे कळले देखील नाही. पण विचारायचे कसे? शिवाय विचारायच्या आधी आमची भिन्न पार्श्वभूमी लक्षात आली आणि क्षणभर बिचकले! परंतु मन सांगत होते विचारून मोकळी हो! आणि मी एकेदिवशी आम्ही घरी येताना त्याला सांगून टाकले. क्षणभर तो माझ्याकडे बघत राहिला! नंतर म्हणाला, " मला देखील तुला हेच विचारायचे होते!"
मी जे ऐकले त्यावर माझा विश्वासच बसेना! काही न बोलता आम्ही नुसतेच चालत राहिलो. आणि अचानक मनात आलेल्या विचाराने मी पुन्हा घाबरले. आणि धैर्य गोळा करून म्हणाले, " आमच्या घरी बाबासाहेबांचा फोटो आहे तरी सुद्धा तुला चालेल?"
तो माझ्याकडे पाहून हसला. म्हणाला, " माझे विचार आणि माझी कृती ह्यात फरक नाही!"

आमच्या घरी आणि नातेवाईकांना समजावणे हे एक आव्हानच होते. आपली मुलगी एका बामणाच्या घरी चालली आहे ह्या कल्पनेने काही नातेवाइक एकदम खूश होते तर काही एकदम नाराज! त्याच्या घरचे नातेवाइक तर अजिबात तयार होत नव्हते. परंतु प्रसाद माझ्याबरोबर उभा होता आणि मला ह्यात समाधान होते. दरम्यान मी त्याच्या घरी जाऊ लागले. त्याच्या घरच्यांशी ओळख होऊ लागली होती. त्याचा मोठा भाऊ प्रकाश हा रशियात                
डॉक्टर होण्यासाठी गेला होता. आणि एके दिवशी घरी बातमी आली की प्रकाश दादाला रशियात एक रशियन मुलगी आवडली आहे आणि दोघे लग्न करणार आहेत! घरी अर्थात सगळे खुश झाले होते. तो घरी केव्हा येईल ह्याची वाट बघत होते. पोरांना ह्या गोऱ्या वाहिनीला बघण्याची ओढ लागली होती. 'स्काइप' वर आजीने होणाऱ्या सूनेला पाहिले होते आणि 'किती गोरी आहे माझी सून' असे आनंदाने म्हणून नात्याला पसंती दिली होती! प्रकाश दादाला  देखील आपल्या होणाऱ्या बायकोची स्वीकृती झाल्यामुळे आनंद झाला होता. लग्नाचा दिवस उजाडला. मी देखील मदत म्हणून प्रसादच्या घरी असायचे. त्याचे इतर काही मित्र देखील होते. लग्न अगदी व्यवस्थित पार पडले आणि रशियन सूनेने अगदी उत्सुकतेने सारे विधी पार पाडले. तिला आपल्या 'कल्चर' बद्दल बरेच काही सांगितले गेले होते. ' आपल्या प्राचीन आणि महान संस्कृती बद्दल तिला सारे कळले पाहिजे' असे आदेश आजीने आणि त्यादिवशी घरी आलेल्या पुण्याच्या आजीने 'स्काइप' वर प्रकाश दादाला आधीच दिले होते. त्याचे पालन झाले होते बहुदा!

त्यादिवशी सारे नातेवाईक ह्या नव्या सूनेशी बोलायला उत्सुक होते. पुण्याच्या आजी तर प्रचंड! अगदी तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये सारे काही सांगितले जात होते. अर्थात मुलगी रशियन असल्यामुळे तितक्याच तोडक्या मोडक्या इंग्लिश मध्ये उत्तरं मिळत होती आणि आजीची विशेष पंचाईत होत नव्हती! दोघे रशियाला परत जायचा दिवस उजाडला. सर्वजण अगदी भावूक झाले होते. मी देखील प्रसादच्या जवळ उभी होते. सारे काही समजू शकत होते.
"माझ्या सूनेची काळजी घे रे!" आजीने अगदी भावूक स्वरात सांगितले. आम्ही परत यायला निघालो. पुण्याच्या आजीने प्रसादकडे डोळे वटारून कोरड्या स्वरात सांगितले, " आता तुमचा नंबर असेल ना!" आम्ही परत घरी आलो.

प्रसादला आणि मला विधींचे विशेष आकर्षण नव्हते. शिवाय दोन वेगळ्या पार्श्वभूमी असल्यामुळे दोन्हीकडचे लोक आपापले विधी पुढे करतील ह्याची भीती होतीच. त्यामुळे आम्ही सर्वांचा रोष पत्करून कोर्टात लग्न करायचे ठरवले! हा आमचा निर्णय घरी तर अजिबात मान्य नव्हता पण त्या संदर्भात नाराजी ही नातेवाईक मंडळींमध्ये अगदी लगेच पसरली! प्रसाद खंबीर होता आणि सुदैवाने त्याचे वडील आमच्या बाजूने होते. सारे काही व्यवस्थित पार पडले असे जरी नसले तरी ऐन लग्नाच्या वेळेस मात्र कसलाही विघ्न आला नाही. लग्न करून आम्ही घरी आलो. सारे माझ्याकडे टक लावून पाहत होते. बोलत मात्र कुणीच नव्हतं. चिल्ली-पिल्ली मंडळी देखील आपल्या आईचा हात हातात धरून उभी होती. नाही, त्यांच्या आईंनीच त्यांचा हात हातात घेतला होता. मी वाकून सर्वांना नमस्कार करत होते. सारे ' हम्म' एवढे म्हणत होते.

मी आता घरची एक महत्वाची सदस्य झाले होते. आई-बाबा व्यवस्थित बोलायला लागले होते. मी देखील खुलले होते. गप्पांमध्ये सामील होत होते. आणि रविवारी पुण्याच्या त्या आजी आणि इतर एक दोन आजी येणार होत्या हे कळले. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक करण्यात आईला मदत केली. बेत तयार झाला. दुपारी जेवण देखील छान गप्पांमध्ये पार पडले. किचन आमच्या बेडरूमच्या अगदी जवळ आहे त्यामुळे तिथे बोलले जाणारे शब्द नीट ऐकू येतात. सगळं झाल्यावर मी झोपायचे म्हणून दिवाणावर पडले होते. प्रसाद बाहेर हॉल मध्ये फोनवर बोलत होता.  आणि आत आजींचा संवाद सुरु झाला.
" मला वाटलं होतंच …. जेवण आपल्या सारखं नव्हतं! चव काहीतारी वेगळीच होती. कोण कुठली बायको केली आहे ह्या प्रसादने! तरी वहिनी, मी तुम्हाला सांगत होते ना … ह्या असल्या लग्नांना काहीही अर्थ नसतो! अहो, आपले पूर्वज काय वेडे होते काय नियम घालून द्यायला! लग्न करायचे तर ते आपल्या माणसाशीच! जाऊ दे... हल्लीची मुलं बघून घेतील आपण कोण सांगणार! झोपा तुम्ही!"

मला कधी नव्हे ते हे सारे ऐकून धक्का बसला! आपल्या माणसाशी? रशियातून आलेली सून आपली होती? ती आपल्या पद्धतीने स्वयंपाक करणार होती काय? आणि मग त्या लग्नाला खूप अर्थ होता काय? तेव्हा कुठे गेले तुमचे पूर्वज? ह्याच त्या आजी सूनेची काळजी घे म्हणून त्या दिवशी सांगत होत्या! आणि मी ह्या देशातली सून असून माझी पर्वा नाही कुणाला! रशियातली 'गोरी' वहिनी बघायला मात्र सारी पोरं मोकळी पण मी घरात प्रवेश करताना त्या साऱ्यांचे हात त्यांच्या आईच्या हातात! अगदी घट्ट! माझा नमस्कार कुणीही स्वीकारायला तयार नाही आणि तिकडे? आपली महान संस्कृती समजाव म्हणून बजावले गेले होते! तिच्याशी इंग्लिश बोलायची हौस आणि माझ्याशी मातृभाषेत देखील कुणी बोलायला तयार नाही. पण तेवढ्यात प्रसाद खोलीत येताना दिसला! मला एकदम त्याचा कॉलेज मधला तो लालबुंद चेहरा आठवला!  "…आणि मग आम्हाला मातृभूमी नाही असे बाबासाहेब म्हणाले त्यात चूक काय?"

आशय गुणे :)

No comments:

Post a Comment