ही कथा 'मायबोली' ह्या दिवाळी अंकात (online) प्रकाशित झाली होती!
बरोबर एक मोठा बुके आणि थोडी चॉकलेट्स घेऊन मी, माझी पत्नी, आणि माझा ८ वर्षांचा मुलगा ड्राईव करत चाललो होतो. बाल्टिमोर काऊंटीमधील शांत परिसरात गाडी वेगात पळत होती. तितक्याच वेगात आमचा उत्साह आणि आनंद देखील वाहत होता. प्रसंगच तसा होता. नुकतेच नोबेल पारितोषिक विजेते घोषित झाले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जगातील मान्यवरांची ओळख हळू हळू होऊ लागली होती. अमेरिकेत जे थोडे लोक पेपर वाचतात, त्यांच्यात आम्ही देखील असल्यामुळे रोजचे लेख आम्हाला काय ती माहिती पुरवीत होते. ह्या सार्या यादीत एका त्रिकुटाचा समावेश होता. हे त्रिकुट होते शास्त्रज्ञांचे. जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीमधील मेडिकल सायन्स शाखेतील एका मोठ्या प्रयोगाने मागच्याच वर्षी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मानवी शरीरातील पेशींमधील (cells) 'डीएनए'वर हे संशोधन होते. पेशींच्या एका विशिष्ठ भागात, ज्याला न्युक्लिअस म्हणतात, हे डीएनए असते. या डीएनए चे प्रोटीन नामक सत्वात रुपांतर होते आणि पुढे हेच प्रोटीन आपली शारीरिक वाढ किंवा जडणघडण होण्यास कारणीभूत ठरते. परंतु इतके दिवस पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असू शकते याचा कोणालाच पत्ता नव्हता. शास्त्रज्ञांच्या या त्रिकुटाने एका मोठ्या प्रयोगाची मदत घेऊन हे शोधून काढले की पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असते आणि त्याचे रुपांतर शरीरातील महत्त्वपूर्ण प्रोटीनमध्ये होते. या त्रिकुटात एक भारतीय नाव झळकल्याचे आमच्या ऐकण्यात आले होते. आणि सहज त्या दिवशी पेपर उघडला तर काय आश्चर्य! दोन अमेरिकन शास्त्रज्ञ मंडळीत एक नाव "तिचे" होते. लगेच येणार्या शनिवारचा मुहूर्त धरला. ( इकडे मुहूर्त ही कल्पना म्हणजे विकेंड! आणि केवळ विकेंडच..) आणि आम्ही सारे तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला निघालो.
सहा वर्षांपूर्वी शिकागो सोडून आम्ही बाल्टिमोरला स्थाईक झालो. नवीन शहरी जातानाची एक सवय अमेरिकेत पाऊल ठेवल्यापासून कायम होती. तिकडे असलेल्या भारतीय लोकांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवायची. आपला एकूण देश अनेक राज्यात विभागला गेल्याचे आपल्या भूगोलाच्या पुस्तकानेच लहानपणी मनात ठसवल्यामुळे या भारतीयांमध्ये मराठी कोण हे सुद्धा बघणे आलेच. आमचा मुलगा, त्याचा जन्म इकडे झाल्यामुळे अनेक 'रंगांमध्ये' लीलया मिसळू शकत होता! आमचे तसे नव्हते. तर सहज लिस्ट चाळत होतो तर हिचे नाव त्यात! नाव वाचून आश्चर्याचा धक्काच बसला. हीच का ती ह्याची खात्री करायला इ-मेल पाठवला तर तीच निघाली! आणि मुख्य म्हणजे तिने मला ओळखले होते. बाल्टिमोर मध्ये कधीही येशील तेव्हा घरी ये असा संदेश तिने लगेच पाठवला! आणि पुढे वाचले तर 'सिनिअर सायंटिस्ट, जॉन हॉपकिन्स' असे तिचे डेसिग्नेशन वाचले तेव्हा थक्क झालो! खूप प्रगती केली होती तिने. स्वतःचे क्षेत्र गाजवले होते!
वास्तविक मी हिचा विद्यार्थी. बायोटेक हे क्षेत्र भारतात नवीन आले तेव्हा ह्यात खूप स्कोप आहे असे ऐकून आम्ही त्यात उडी घेतली होती. दुसर्या वर्षी शिकत असताना ही आमच्या कॉलेज मध्ये शिकवायला जॉईन झाली. पीएचडी संपवून आणि थोडा फार रिसर्च करून ती प्रोफेसर म्हणून रुजू झाली होती. तिचे वय तेव्हा २६ होते. एक अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय प्रोफेसर अशी तिची ख्याती होती. त्यामुळे आम्हा मुलांचं (आणि मुलींचं सुद्धा!) तिच्याशी काही फार जमायचं नाही. मुली देखील तिच्या समोर नोट्स काढायचा आव आणत असल्या तरी तिच्या मागे (आणि मागेच!) तिचा समाचार घ्यायच्या. काही मुलांची तर तिच्याशी वादावादी झाली होती. वर्गात जोरजोरात भांडण होणे बाकी ठेवले होते काहींनी! हिने तिच्या आयुष्यात शिस्तीला खूप महत्त्व दिले होते पण आमच्यावर ती शिस्त लादताना गफला व्हायचा!
"हिचे अजून लग्न झाले नाही ना! म्हणून ही सदैव रागात असते... हिला कुणीतरी नवरा आणून द्या रे!" - तिच्या शिस्तप्रिय स्वभावाचे आणि तो आमच्यावर लादल्याचे खापर तिच्या अविवाहित राहण्यावर फोडले जायचे. तिचा विषय निघाला की हे वाक्य हमखास बोलले जायचे. संभाषणात सर्वप्रथम तिच्या उच्च शिक्षणावर जोर दिला जायचा. आश्चर्य व्यक्त केले जायचे... क्वचित आदरभाव सुद्धा! पण तिचे लग्न नाही झाले ह्या विषयावर येऊन सगळं संपायचं! काळजीच होती जणू सार्या मुलांना हिच्या लग्नाबद्दल! पुढे आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि आमच्यापैकी बर्याच लोकांना असा साक्षात्कार झाला की आम्ही निवडलेल्या क्षेत्राला अजिबात स्कोप नाही! आणि सर्व क्षेत्रांचा शेवट ज्या एका पदवीने होतो तेच आम्ही केले - एमबीए! पुढे नशीबाने चांगले दिवस दाखवत एक चांगली नोकरी दिली. आणि त्याचे पेढे द्यायचे म्हणून मी आमच्या या आधीच्या कॉलेज मध्ये गेलो. तेव्हा समजलं की ही अमेरिकेला जायचे म्हणून प्रोफेसरगिरी करून पैसे जमवत होती. पोस्ट-डॉक करण्यासाठी. आम्ही थक्कच झालो होतो!
"अजून किती शिकायचे माणसाने! आता बास ना", इथपासून, "लग्न काय अमेरिकेत जाऊन करणार काय? नक्कीच कुणीतरी गोरा पकडेल... दिसते तर माल एकदम" इथपर्यंत सारी वाक्यं बोलली गेली होती.
अजून काही वर्ष गेली आणि मला अमेरिकेत पाठवले गेले. २८ व्या वर्षी ही संधी आल्यामुळे घरचे एकदम खुश होते. आता मला कुणीही मुलगी देईल ही त्यातली एक भावना. आणि झालेही तसेच. लग्न करून मी अमेरिकेत गेलो.
बाल्टिमोर मध्ये आल्यावर लगेच काही हिची भेट झाली नाही. तिकडच्या महाराष्ट्र मंडळात गेलो तेव्हा मात्र तिच्याबद्दल थोडे ऐकले. "तिचे काय... नाव भारतीय आहे फक्त... बाकी काय भारतीय आहे तिच्यात?" असे एक वाक्य एका गृहस्थाने बोलून दाखवले होते आणि सर्वांनी एकमताने हसून त्या माणसाला दाद दिली होती. ती ज्येष्ठ शास्त्रज्ञ असल्यामुळे खूप व्यस्त असायची. त्यामुळे आल्यापासून २-३ आठवडे काही भेट होऊ शकत नव्हती. शेवटी तिनेच एकदा रविवारी बोलावले. आणि जवळ जवळ १५-१६ वर्षांनी डॉ. सुलभा प्रभुणे हिला भेटलो. जवळ जवळ ४५ वर्षांच्या डॉ. प्रभुणे मध्ये लक्षणीय बदल झाला होता. पंधरा वर्षांपूर्वी खांद्यापर्यंत येणार्या केसांचा बॉय-कट झाला होता. चेहर्यावरचा चष्मा जाड भिंगांचा झाला होता. केस बर्यापैकी पिकले होते. आणि चेहरा थोडासा का होईना सुरकुतलेला दिसत होता. तिची इकडची प्रगती ऐकून आणि पंधरा वर्षांनी परत एकदा थक्क होऊन मी घरी गेलो. पोस्ट-डॉक करायला आलेल्या तिने खूप चांगला परफॉर्मन्स देऊन आणि अनेक रिसर्च पेपर प्रकाशित करून बढती मिळवली होती. आणि ५ वर्षांपूर्वी स्वतःची प्रयोगशाळा सुरु केली होती.
"मग, या कधी आमच्याकडे!" मी म्हणालो. "या म्हणजे कोण आता?" तिने एकदम विचारले. "म्हणजे तुम्ही सगळे..." मी पुढे बोलणार इतक्यात तीच म्हणाली. "फॅमिली वगेरे कुणीही नाही इकडे... मी एकटीच राहते... मी लग्न नाही केलं!" थक्क होण्याचे कारण फक्त तिचे उच्च शिक्षण एवढेच नव्हते हे वेगळं नको सांगायला!
आल्यापासून ३-४ वर्षात मी मात्र जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस तिला विकेंडला घरी बोलवायचो. ओळख अजून वाढू लागली. आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये कसे झाले कळले देखील नाही. इतके दिवस 'अहो-जाहो' करणार्या मला शेवटी तिने 'अरे-तुरे' ने हाक मारायला सांगितली. कॉलेज मध्ये तशी हाक आम्ही मारत होतोच... अर्थात तिच्या पाठीमागे. आता मात्र तिला अशी हाक मारायची परवानगी खुद्द तिनेच दिली.
क्वचित कधीतरी ती महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना किंवा माझ्या घरी ठेवलेल्या कार्यक्रमांना यायची. तेव्हा सुद्धा स्वारी एकटीच. जास्त कुणी तिच्याशी बोलायचे नाही. मंडळाचे कार्यक्रम झाले की ही एकटीच निघून जायची. मी माझ्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात उभा असलो तर आमच्यात न येता एकटीच घरी जायची. जर मी एकटा असलो तर मात्र मला भेटून, चार शब्द बोलून घरी जायची. क्वचित हिच्याशी आणि माझ्या मुलाशी पण बोलायची. पण एकूण सगळं एकट्यानेच! खरं तर तिचे रुटीन खूप व्यस्त असायचे. सकाळी लवकर लॅबमध्ये जायची. आणि रात्री यायला ९-१० वाजायचे. कधी कधी विकेंडला पण जावे लागायचे. त्यामुळे एकूण बिझीच!
दरम्यान मला हिच्याबद्दल जे मत ऐकायला मिळत होते ते काही फार चांगले नव्हते. बाल्टिमोर काऊंटी मध्ये बर्याच वर्षांपासून राहणार्या एका गृहस्थाने हिला म्हणे वेगवेगळ्या गोर्या लोकांबरोबर फिरताना बघितले होते. लेट-नाईट पार्टी करताना ती बर्याचदा दिसली होती. हिच्या घरी बर्याचदा कोणीतरी यायचे. मला देखील हिच्यापासून सावध राहायला सांगितले गेले. मुलांना तर लांबच ठेवा असा पण सल्ला देऊन झाला होता! ही बाई एकेकाळी माझी शिक्षिका होती ही गोष्ट मी ह्यांच्यापासून लपवून ठेवली होती. तिने सांगायचा तर प्रश्नच नव्हता! तिच्याशी बोलताना एवढे सुद्धा समजले होते की ही बाई बर्याच वर्षांपूर्वी एकदा भारतात गेली होती. तिने सांगितलेले साल म्हणजे ती साधारण ३३ वर्षांची वगैरे असली पाहिजे. त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत काही ती भारतात गेली नव्हती. भुवया उंच करायला लावणारी केस होती हिची हे मात्र खरं!
मी इकडे आल्याच्या वर्षभरातच तिची स्वतःची प्रयोगशाळा सुरु झाल्यामुळे तिकडे होणार्या गोष्टी माझ्या कानावर यायच्या. आणि खूप वर्षांपूर्वी पदवी बायोटेक मध्ये मिळवल्यामुळे तेव्हा असलेल्या शिक्षिकेकडून त्याची उजळणी देखील होत असे. तिचे विचार संशोधनात अंमलात आणण्यासाठी एक चांगली टीम तिच्याकडे होती. पीएचडी करायला आलेले विद्यार्थी हुशार होतेच शिवाय पोस्ट-डॉक वाले लोक सुद्धा खूप मेहनती आणि सर्जनशील होते. त्यामुळे संशोधनातील हिच्या विचारांना चांगले पाठबळ होते. आणि त्यामुळे परिणाम चांगले मिळायचे. डॉ. प्रभुणे हे एक प्रभावी नाव झाले होते. दर वर्षी रिसर्च ग्रँट मिळणार्या शास्त्रज्ञ मंडळींमध्ये हिचे नाव होते. पण आमच्या लोकांकडून एकूण हिच्या कामगिरीची तेवढी दाखल घेतली जायची नाही एवढे मात्र खरे. कुठल्यातरी गाण्याच्या किंवा वाजवण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन जिंकलेल्या लोकांचा सत्कार होत असे. मात्र मी ३ वेळा सत्कारासाठी हिचे नाव पुढे केले तेव्हा तिन्ही वेळेस मला वेड्यात काढून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला होता!
मात्र तिच्यामुळे जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटी बघायची संधी मात्र मिळाली. नुसती नाही तर अगदी आतून. एरवी, जगाला जवळ जवळ ४० नोबेल पारितोषिके मिळवून देणारी ही 'पवित्र' वास्तू अगदी आतून बघायचे भाग्य कुणाला मिळेल? सतत काहीतरी नवीन शोधण्याच्या मागे असलेले हे इथले शास्त्रज्ञ बघितले की आपण एका वेगळ्याच विश्वात आहोत ह्याची नक्कीच खात्री पटते! बाहेर जगात काय चालले आहे ह्याची फारशी पर्वा न बाळगता, एकाग्रतेने इकडे काम सुरु असते. सतत त्याच विश्वात राहून आणि त्याच विश्वात राहण्यासाठी पोषक अशा वातावरणात नांदून उत्कृष्ट शोध लागतात! आणि त्यामुळे एका अर्थाने जग चालते. ती पण त्याच जगातली. भारतातून एक ध्यास मनात बाळगून आली होती. आणि तिने ठरवलेल्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल केली ह्यावर, मिळालेल्या नोबेल पारितोषिकाने शिक्कामोर्तबच केले होते!
घराची बेल वाजवली. आणि पुढच्या अर्ध्या तासात एका आश्चर्यचकित करणार्या उत्तराला मला सामोरे जावे लागले. बुके दिला. आनंदाने चॉकलेट्स देखील दिली. आणि अभिनंदन करणे सुरु केले. बोलताना पुढे म्हणालो. "घरी फोन केलास की नाही? खूप खूष असतील ना सगळे?" उत्तर निर्विकारपणे नाही असं आल्यावर मात्र मी एकदम आश्चर्य व्यक्त केले. आणि "फोन कर गं" असं तिला एक-दोनदा सांगितले. शेवटी तीच म्हणाली.
"मी माझ्या घरच्यांशी संबंध तोडून टाकले आहेत. त्यांना माझ्या यशाविषयी किंवा एकंदर आयुष्याविषयी काहीही घेणंदेणं नाही!"
"अगं पण का? असं कसं?"
"हो मग काय... त्यांना काहीच पडलेली नाही. मी त्यांच्यासाठी मेले आहे. भारतात अजून पुरुषच शास्त्रज्ञ होत असतात. सर्वांचा विरोध पत्करून मी इकडे पोस्ट-डॉक करायला आले. बाबांनी शेवटी एका अटीवर परवानगी दिली. २ वर्षात घरी परत येऊन लग्न करायचे. दोन वर्षाच्या पोस्ट-डॉक ने काय होणार आहे? ती तर शास्त्रज्ञ बनण्याची सर्वात पहिली पायरी आहे... त्यांना कुठे माहिती होते की पोस्ट-डॉक निदान पाच वर्ष केलं की पुढे असोसिएट प्रोफेसर होता येतं... आणि मग पुढे बढती मिळवत मिळवत सायंटिस्ट होतो माणूस! भारतात एवढेच वाटते की पीएचडी केली की माणूस शास्त्रज्ञ होतो! त्यामुळे... ह्या असल्या प्रस्तावाला काहीही अर्थ नव्हता... मला शास्त्रज्ञ व्हायचे होते... आणि मी अजिबात भारतात गेले नाही. परंतु काही वर्षांनी एकदा मी सर्वांना भेटायला परत घरी गेले... तेव्हा माझ्या नावावर ४ रिसर्च पेपर होते... आणि नामांकित जर्नल्स मध्ये माझे नाव छापून आले होते. मला हे सर्व घरी सांगायचे होते... पण घरी गेले तर ... लग्न... लग्न आणि केवळ लग्न! जर्नल वगैरे ठीक आहे... पण आता लग्नाचे बघा जरा, अशी सूचना मिळायची. नातेवाईकांमध्ये ह्याच्या आधी मुलगी किती हुशार आहे म्हणून मला मिरवले जायचे... पण आता त्यांच्याकडून सुद्धा लग्न करा लवकर... अशा सूचना!! शेवटी बरीच भांडणं करून... मी परत इकडे आले... ह्यावेळेस मात्र खूप त्रासले होते. वैतागले होते... रागावले होते. कुणालाच माझ्या कामाची कदर नाही हे मी जाणले होते... आणि त्याचाच सर्वात जास्त त्रास होत होता! त्यामुळे सुरुवातीचे काही महिने रिसर्च मध्ये लक्ष नव्हतं लागत... रिझल्ट नव्हते येत... कधी कुणी कौतुक केले की घरी सांगावेसे वाटायचे...परंतु ... काहीही उपयोग होणार नव्हता हे देखील माहिती होते! दरम्यान मला थोडेफार समजून घेणारे माझे कलीग्स होते माझ्या बरोबर... त्यांच्या बरोबर वेळ चांगला जाऊ लागला... ते मला समजू शकत होते... कारण ते सुद्धा शेवटी शास्त्रज्ञ होते... आणि ह्या एकटेपणाला सरावले होते. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाशी मी काही वर्ष रिलेशनशिप मध्ये पण होते... काही वर्ष परत एकटीने घालवली... परत एक कलीगशी ओळख वाढली... तो माझ्याने १५ वर्ष मोठा होता... परंतु मला समजून घ्यायचा... रिझल्ट आले नाही आणि मानसिक ताण वाढला की प्रोत्साहन द्यायचा... जवळ जवळ वर्षभर आम्ही एकत्र होतो... पण नंतर तो देखील पुढे दुसरीकडे निघून गेला... आम्ही आहोत अजून टच मध्ये म्हणा...! पण एवढ्यात झाले काय... की बाल्टिमोर मध्ये आमच्या ओळखीच्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत... त्यांनी कुणामार्फत तरी हे सारं घरी सांगितलं! बर्याच वर्षांनी घरून फोन आला... मी उचलला तर हे ऐकायला आलं... तुला असले धंदे करायला पाठवले नव्हते अमेरिकेत... पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नकोस... तू आमच्यासाठी मेलीस! ज्या लोकांना मी केलेल्या कामाचे कौतुक नाही... केवळ निंदाच करता येते... त्यांच्याशी मी तरी संबंध का ठेवू? परिस्थितीने मला अजून कठोर बनवले... आज मिळालेले नोबेल मी माझ्या परिस्थितीला समर्पित करते!"
घरी आलो होतो. बायको मुलाला झोपवून स्वतः कधीच झोपून गेली होती. माझ्या मनात मात्र विचारचक्र सुरूच होते. एका साच्यात आयुष्य जगणार्या आपल्यासारख्या लोकांना कळेल का हिची व्यथा? माणसाने शिकावे, मोठे व्हावे, योग्य त्या वयात लग्न करावे, संसार सुरु करावा... सर्व मान्य! परंतु हे आयडियल जगणे झाले. प्रोटोकॉल प्रमाणे! उद्या जर कुण्या एका ध्येयनिष्ठ व्यक्तीने एक अद्वितीय काम करण्यासाठी ही चौकट ओलांडली तर? त्या कामात झोकून देताना हे नियम बाजूला सारले तर? मनाने तो सज्ज होईल देखील! पण त्या वयात असलेल्या शारीरिक गरजा? किंवा कुणासमोर आपण केलेले काम व्यक्त करण्यासाठी त्यावर अवलंबून राहावे लागले तर? त्यातून रिलेशनशिप्स निर्माण झाल्या तर दोष कुणाचा? आणि ह्याला केवळ दोष मानून त्या माणसाला नाकारायचा अधिकार आपल्याला आहे? त्याला वाईट ठरवून वाळीत टाकणारे आपण कोण? घड्याळाच्या काट्याप्रमाणे जीवन जगणारी माणसं! त्यांना वेळ काळ झोकून काम केलेल्या लोकांबद्दल का असेल मग आस्था? इतर लोकांसाठी माहिती नाही... पण डॉ.प्रभुणे माझ्या नजरेत एकदम वरच्या शिखरावर आहे. स्वतःचे ध्येय प्राप्त केलेली एक यशस्वी स्त्री!
(काल्पनिक)
-आशय गुणे
This story can also be read here: http://vishesh.maayboli.com/node/1228
Image Credits: 'Maayboli - http://vishesh.maayboli.com/node/1228

No comments:
Post a Comment