Pages

Total Pageviews

Wednesday, August 29, 2012

लग्न

कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?
तो तर 'पद' बघून मांडलेला एक खेळ असतो!

हौशी आत्या आणि लांबच्या मावश्या,
हुडकून आणणार उमेदवारी नाती!
" अहो, जोश्यांचा मुलगा लग्नाचा आहे",
" अहो ह्यांची मुलगी लग्नाची आहे ",
ह्याचसाठी तर त्यांचा जन्म असतो ..
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?



आई म्हणे ताईने आणलं स्थळ,
बाबा म्हणे दादाने सुचवले नाते
' रेफर' करण्यात कधी चुकतील का ते?
हेच नातं योग्य हा 'मान' त्यांचा असतो
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

मग सुरु होते विचारपूस, चालू होते चौकशी,
काय करतो मुलगा, 'काही करते की नाही' मुलगी!
मुलगा असतो डॉक्टर किंवा असतो इंजिनिअर,
क्वचित असतो सी. ए, मुलगी मात्र पदवीधर!
पण मुलीच्या बापास हाच जवाब पुरेसा असतो
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

एक तारीख ठरते, येतात मुलाकडले घरी,
किचन पासून 'ट्रे' घेऊन, घडते अभिनयाची वारी!
" आज तुम्ही येणार म्हणून हिने केले पोहे",
" अहो, नोकरी सांभाळून स्वयंपाक देखील करते हो!"
मुलाकडले निश्चिंत, मुलगा आपला स्थिर,
कारण 'पगार' हा त्याचा एकमेव निकष असतो
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

पण तरीही होते थोडीशी चौकशी, मुलाची.
"हा बनवतो प्रोग्राम, पुढच्या वर्षी परदेश गमन नक्की! "
पण ह्याचा आनंद मुलीकडल्यांच्या चेहऱ्यावर अधिक असतो.
शिवाय प्रोग्राम टी.व्ही चा की कॉमप्युटर चा ह्याचाच त्यांना पत्ता नसतो!
कारण 'एन. आर. आय' शिक्क्याचा आनंद त्यांच्यासाठी मोठा असतो  
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

मग प्रश्न येतो मुलीच्या इतर आवडींचा, तिच्या छंदांचा.
"ही गाते चांगली, चित्रकलेत प्राविण्य आहे!"
" हो, शिवाय स्वयंपाक देखील उत्तम करते...."
पण मुलाला हा प्रश्न असतो 'ऑप्शन' ला!
कारण येताना तो 'गाडी' चालवत आला ह्याचा वेध घेतलेला असतो
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

शेवटी मुलगी बसते बाजूला,
तिचेच ठरणारे नाते बघत.
आणि मुलगा असतो तिथे,
आधीच 'ठरलेल' नाते ठरवत!
आपली मुलगी तिकडेही बहरेल का हा सवाल नसतो,
कारण आपण 'मुलगी देतो आहे' हाच सतत विचार असतो!
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

पुढील वर्षात चित्र असे काही असते:
मुलगा राबतो अमेरिकेत, होतो गोऱ्यांचा गडी!
मुलगी बसते फेसबुकवर,
घेते 'फार्मविले' मध्ये उडी!
तिचे कधी काळचे गाणे होते आता अंगाई,
घरात असतो पाळणा, होते त्याची सरबराई!
कारण 'arrange marriage ' हा कधीच झालेला ठराव असतो,
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो? 

- आशय गुणे  :)

No comments:

Post a Comment