Pages

Total Pageviews

Friday, September 14, 2012

फिझिओथेरापिस्ट - भाग -१

नवीन शहरात किंवा गावी गेलात तर तिथे जाऊन काय करायचे ह्याचे बरेच तोडगे आहेत. खादाडीचा शौक असलेल्यांना त्या शहराचे ( किंवा गावचे ) खाद्यपदार्थ अनुभवता येतात. काहींना ऐतिहासिक वास्तू पाहण्यात रस असतो तर काहींना फक्त खिडकी पलीकडील वस्तू न्याहाळण्यात! ( ह्या दुसऱ्या वर्गातील लोकांची मला भयंकर दया येते! अहो, दुकानात टांगलेला शर्ट घेण्यासाठी कुणी यात्रा करतं का? तसले शर्ट तर आपल्या गावी असतातच की! असो...) काही लोकांना तिथल्या मातीचा, दगडांचा संग्रह करायची हौस असते! ( आता असते बाबा...काय करणार त्याला...) अगदीच लांबची यात्रा असेल तर तिथली जीवनपद्धती पाहण्यात काही लोक रमतात.( ह्यात मात्र मजा असते!) काही लोकांचा ( विशेषतः मुलींचा) तर असा समज असतो की पाच दिवसांपेक्षा जास्त त्यांचा कॅमेरा चालला नाही तर तो कायमचा बंद पडेल! त्यामुळे जातील तिथे शक्य तितके फोटो काढणे ह्या उद्योगात (?) ही लोकं रमतात! थोडक्यात काय, यात्रा आपल्या संग्रहात भर पाडते. आता माझा संग्रह कोणता ह्या प्रश्नावर माझे एकच उत्तर असते - माणसांचा! आत्तापर्यंत अनेक माणसं संग्रही करून ठेवलेली आहेत. काहींची कथा आहे तर काहींची व्यथा. पण प्रत्येकाने माझ्या मनावर त्यांचा एक ठसा उमटवला आहे एवढे नक्की! मग एखाद्या रेंगाळत जाणाऱ्या रविवारच्या दुपारी कुणीतरी काहीतरी बोलतं, किंवा कुठला तरी प्रसंग आठवतो आणि त्या प्रसंगाशी निगडीत असलेली व्यक्ती आठवते. मागच्याच आठवड्यात माझ्या पायात लचक भरली. 'होईल बरा आपोआप' हा माझा पवित्रा ह्या वेळेस मात्र मला महाग पडला. ह्याच अवस्थेत चालणे, पळणे सुरु ठेवल्याने सूज वाढू लागली आणि शेवटी ती इतकी झाली की माझ्या पायाने माझ्यापुढे हात जोडले - आता पुढे नाही चालू शकणार! मग काय, फिझिओला बोलवावे लागले. आणि त्याची ट्रीटमेंट उपभोगताना माझ्या माणसांच्या संग्रहातील एक वल्ली माझ्यासमोर येऊन उभी राहिली! लॉस -अन्जेलीस ह्या शहरी भेटलेली डॉ. नीलम दांडेकर.

माझी नोकरी ही फिरतीची आहे हे किती चांगलं आहे! म्हणजे फिरणे स्वखर्चाने होत नाही हा एकमेव विचार नाही त्यात! ( एकमेव नाही म्हणजे अनेक मधला एक नक्कीच आहे!) पण ह्या नोकरीमुळे अनेक शहरं बघायला मिळतात. आता इतकी शहरं बघितली की ती सारी स्वभावाने एक वाटायला लागली आहेत. प्रत्येक शहर हे सकाळी १०-११ पर्यंत मनसोक्त पळून घेतं. दुपारी जांभया देतं. किंचित डुलकी घेतं. ४ च्या आस पास चहा प्यायल्यावर परत ताजे-तवाने होऊन १० पर्यंत धावून परत एकदा झोपी जातं. हां, आता काही शहरं लवकर उठतात आणि उशीरा झोपतात हे खरं असलं तरी मूळ स्वभाव हा! एखाद्या गजबजलेल्या भागात एका न गजबजलेल्या bus stop वर बसून शहराची हालचाल न्याहाळण्यात जी मजा आहे ना ती कशात नाही! माझ्या कंपनीने मला कामानिमित्त लॉस- एन्जेलेसला पाठवले तेव्हाचा प्रसंग. अशाच एका शनिवारी bus stop वर बसलेलो असताना बाजूला थोडी कुजबुज ऐकू आली. शनिवार असल्यामुळे त्या जोडप्याचे बोलणे ग्रोसरी बद्दल असावे म्हणून मी फार काही लक्ष दिले नाही. पण सहज कान टवकारले तर मराठी भाषा! आता महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी कुटुंबातील एक अशा संख्येने जरी लोकं अमेरिकेत आली तरी भर रस्त्यात मराठी? त्यामुळे हे जोडपे नुकतेच लग्न करून आले असावे असा अंदाज मी बांधला आणि तो पुढे खरा देखील निघाला! आणि ह्यांच्या मराठीचे इंग्लिश होण्याआधी आपण ह्यांच्याशी ओळख करून घेऊ आणि मराठीत बोलून घेऊ म्हणून मी पुढे सरसावलो. हे होते श्री व सौ. दांडेकर. नुकतेच लॉस-एन्जेलेसला आले होते. आणि आश्चर्य म्हणजे मी राहतो तिकडेच जवळपास राहत होते.

आमची बस आली आणि आम्ही घराकडे जाऊ लागलो. जाता जाता इतके समजले की श्री. दांडेकर - म्हणजे विशाल - हा ओहायो मधून ग्रेज्यूएट झाला होता आणि गेली चार वर्ष एल.ए मध्ये राहून काम करतो आहे.
सौ. दांडेकर अर्थात नीलम हिला अमेरिकेला येऊन नुकतेच सहा महिने झाले होते. तिचे अमेरिका दर्शन हे कॅलिफोर्निया ह्या सुंदर राज्यातून सुरु झाल्यामुळे ती अत्यंत खुश होती. म्हणजे भारतातील त्रुटी तिला आठवत होत्या इतकी प्राथमिक पायरी तिची होती! आज शनिवार असल्यामुळे दोघांना बाहेर पडायला वेळ मिळाला होता आणि नवीन ओळख निघाली म्हणून नीलम जरा आनंदी वाटली. विशाल मात्र बरीच वर्ष इकडे राहत असल्यामुळे त्याला माझ्याशी झालेल्या ओळखीने फार काही आनंद झाला होता असं मला वाटलं नाही.
" आम्ही सहसा बसने प्रवास करत नाही. तिकीट काय महाग आहे हो इकडे. मी ओहायोला होतो तेव्हा मात्र परवडायचं. कॅली म्हणजे प्रचंड महाग", विशाल मला म्हणाला. त्यांची अवस्था मी समजू शकत होतो. नुकतेच लग्न झाल्यामुळे त्याला आता दोघांचा खर्च उचलायला लागत होता. इतके दिवस रूम-मेट्स बरोबर खर्च विभागला जायचा. पण आता कसले रूम-मेट्स! आता अमेरिका नावाच्या त्या संधी-राज्यात ह्या दोघांना चालायचे होते. पुन्हा भेटत जाऊ असं म्हणून ते दोघे घरी गेले. मी काही अमेरिकेत विद्यार्थी म्हणून आलो नव्हतो. त्यामुळे माझी परिस्थिती 'शून्यातून निर्माण करणे' अशी नव्हती. त्यामुळे ह्यांचं चांगलं होऊ दे असाच विचार मनात ठेवून मी घरी आलो.

आता कॅलिफोर्निया म्हटलं तर माझ्यामते तरी सर्वात जास्त भारत-प्रेम असलेलं राज्य! ह्याचा अर्थ खूप भारतीय इकडे आहेत म्हणून नव्हे! आणि भारतीय आहेत म्हणून भारत प्रेम आहे हा समज तरी कुठे बरोबर आहे? पण ह्या राज्यातील भारतीयच नव्हे तर अमेरिकन आणि इतर देशातून आलेले लोक सुद्धा भारतीय संगीत आणि कलांच्या प्रचंड प्रेमात आहेत! रवी शंकर, झाकीर हुसैन, अली अकबर खान, आशिष खान, स्वपन चौधरी ही सगळी मंडळी इकडेच तर राहतात! आणि आली अकबर खान ह्यांनी आपली म्युसिक स्कूल ह्या राज्यात उभारल्या पासून तर ह्या राज्याचं भारतीयत्व अजून वाढलं आहे! त्यामुळे झाकीर हुसैन ह्यांच्या तबला वादन कार्यक्रमात मागे तंबोरा वाजवायला चीनी माणूस बसला तरी कुणाला त्याचे विशेष वाटत नाही. किंवा आली अकबर खान ह्यांना तंबोरा साथ कुण्या एका युरोपीय माणसाने केली तरी त्यात काही विशेष नाही! इकडे लोकांना ह्याची सवयच झाली आहे. त्यामुळे वीकेंडला होणाऱ्या कार्यक्रमात बहुतांश कार्यक्रम हे भारतीयच असायचे! सुदैवाने दांडेकर जोडप्याला भारतीय संगीतात थोडा रस होता.

" अरे काय म्हणताय! बऱ्याच दिवसांनी! कसे आहात?" गुरुवारी रात्री ग्रोसरी स्टोर मध्ये पोळ्या घेताना नीलम मला भेटली.
" बरा आहे. मग अमेरिकेत दिवस खूप पटापट जातात. जवळ जवळ महिना झाला आपल्याला भेटून. लक्षात आलं असेल ना एव्हाना", मी म्हणालो.
" हो ना! पण आता मी पण थोडी रुळायला लागली आहे. इकडे येऊन ग्रोसरी विकत घेईपर्यंत किंवा थोडंफार फिरायला जाईपर्यंत मला आता माहिती झाली आहे", ती म्हणाली.
" ह्म्म्म ...बरं ते जाऊदे... शनिवारी केन झुकरमनचे सरोद वादन आहे. आपल्या इकडच्या चर्च मध्ये. येताय का दोघे?
" नाही हो. आवडले असते. पण विशालला नाही वेळ. तो उशीरा घरी येतो. जेवणाचं पण बघावे लागले ना त्यादिवशी", ती म्हणाली.
" शनिवारी पण नाही?" मी थोडासा चकित झालो. " अहो, मागच्या महिन्यात आपण भेटलो होतो ना तेव्हा कुठे जवळ जवळ दोन महिन्यांनी त्याला माझ्या बरोबर थोडा वेळ फिरता आलं होतं. त्यानंतर परत तो बिझी आहे तो आहेच!"
" कुठे आहे तो नोकरीला?"
" चेझ बँक ", ती म्हणाली. अमेरिकेत माणसं वीकेंडला मज्जा करतात एवढेच संस्कार मनावर कोरलेला मी, मला हे अगदीच नवीन होते. माझ्या ऑफिस मध्ये सुद्धा सर्व अमेरिकन शुक्रवारी दुपारी ४ लाच ऑफिस मधून पळताना मी पाहत होतो. हा प्रकार निराळाच होता! पण घरात एकट्याने बसून दिवस घालवणाऱ्या नीलमची मात्र मला थोडी कीव आली. आपण हिला सुद्धा आपल्या ग्रुप मध्ये जमवून घेतलं पाहिजे असं मला त्या दिवशी कुठे तरी वाटलं.

आमचा ग्रुप हा वीकेंडला कुणाच्या तरी घरी भेटायचा. ४-५ तास मनसोक्त गप्पा मारायचो. क्वचित कुठेतरी फिरायला जात असू. कधीतरी कुठल्या मैफलीला हजेरी लावत असू. ग्रुप मधले बरेच भारतीय हे तिकडचेच नागरिकत्व मिळवलेले. पण मनात अधून मधून भारताची चक्कर मारून येणारे! त्यांची मुलं ही वीकेंड असल्यामुळे बाहेर भटकायला जायची. आणि आमच्या ग्रुपने एका शनिवारी उस्ताद आशिष खान ह्यांचे सरोद वादन ठरवले! जवळपास खांसाहेबांचा एक शिष्य राहायचा. त्याच्या ओळखीने हा योग जमला! आणि ठरलं... शनिवार १० ऑक्टोबरला खांसाहेब ह्यांचे वादन!

आम्ही सर्वांनी खूप उत्साहाने काम केले. आमंत्रणं दिली. तिकिटे विकली. अर्थात आशिष खान हे नाव आमचे काम सोपे करत होतं. खांसाहेब नुस्क्तेच युरोपचा दौरा करून आले होते. विमानतळावर त्यांना आणायला गेलो तेव्हा गेले दोन महिने त्यांचे वादन कुठे कुठे झाले हे ऐकून थक्क होत होतो. गर्दी जमली होतीच. बरोबर वेळेत खांसाहेब तयार झाले आणि स्टेज चढणार एवढ्यात.....
त्यांच्या पाठीत दुखायला लागले. त्यांनी 'आ....' अशी जोरात आरोळी ठोकली. त्यांना उभं राहता येईना. कळवळत, विव्हळत ते खाली बसले. आम्हाला काय करायचे काही कळेना. लगेच एकाने डॉक्टरला फोन करायला सुरुवात केली. पण आमचा हा एरिया थोडासा शहरापासून बाहेरच्या बाजूला होता. त्यामुळे डॉक्टर यायला वेळ लागणार होता. खांसाहेब काही कळवळायचे थांबत नव्हते. आणि अचानक एक मुलगी पुढे आली. तिने खांसाहेबांना हळुवारपणे पोटावर झोपवले. कुणीही काहीही बोलायच्या आत चटकन लचक भरलेला भाग शोधून काढला. आणि हळुवार मसाज द्यायला सुरुवात केली. खांसाहेब हळू हळू शांत होऊ लागले. आणि तो मसाज इतका चांगला जमला की डॉक्टर येईपर्यंत खांसाहेब उठून उभे राहिले.
" तुम्हाला ए.सी मध्ये वारंवार वावरल्यामुळे असं झालाय. थोड्याशा स्ट्रेचिंगची गरज आहे", नीलमने अगदी आत्मविश्वासाने आणि ठामपणे खांसाहेबांना समजावले. आणि तिने त्यांना हलके व्यायाम पण करून दाखवले. खांसाहेब प्रचंड खुश होते. आलेल्या डॉक्टरांनी देखील नीलमचे खूप कौतुक केले. ह्या मुलीने आम्हाला काहीच काम नाही करू दिले....स्वतः खूप चांगले हाताळले वगेरे तारीफ केली. आम्ही सारे अर्थात अवाक होऊन बघत होतो.
" यह लडकी कमाल है! जिस बारीकी से हम हमारे आलाप बजाते है ठीक उसी बारीकी से इसने हमारा इलाज कर दिया!" खुद्द खांसाहेब असं म्हणाल्यावर आम्ही काय म्हणणार? त्यादिवशी खांसाहेबांनी इतके उत्कृष्ट वादन केले की अजून सुद्धा ते माझ्या तंतोतंत लक्षात आहे! आणि मुख्य म्हणजे नीलम वर खुश होऊन त्यांनी आमच्याकडून बिदागी पण घेतली नाही. मैफलीनंतरच्या खांसाहेबांच्या घेरावानंतर आता नीलमचा घेराव झाला. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मी देखील त्यात सामील होतो.
"हे सगळं तुला कसं काय सुचलं? कमाल आहे तुझी!" मी आनंदाने म्हणालो.
"अहो, जमायचे काय...माझे ते क्षेत्र आहे", ती हसत हसत म्हणाली.
"म्हणजे?"
"अहो! मी डॉक्टर आहे. भारतात फिजियोथेरपी केली आहे. डॉ. नीलम दांडेकर!"
त्या गर्दीत आश्चर्य वाटणाऱ्या लोकांपैकी मी काही एकटा नव्हतो!




आशय गुणे स्मित

No comments:

Post a Comment