Pages

Total Pageviews

Sunday, October 9, 2011

'स्टेसी' - माझी अमेरिकेतील मैत्रीण

अमेरिकन माणूस हा पटकन कुणाशी बोलत नाही. पण एकदा त्याला, किंवा तिला, तुमच्या चांगल्या असण्याबद्दल खात्री पटली की त्यांची कळी खुलते. मग ते तुमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यांना तुम्ही हवे-हवेसे वाटता...तुमच्याशी सारखं काहीतरी 'share ' करावेसे वाटते.
बाकी 'कायद्याच्या' साच्यात अडकलेल्या ह्या जीवनपद्धतीत आपुलकी सुद्धा 'लीगल' आहे की नाही असाच शोध घेणारी ही माणसं! त्यामुळे एकमेकांवर  विश्वास हा कमीच. पण ह्या साच्यात भावना कुठेतरी दडून बसतात आणि मग अचानक एका  विश्वास ठेवण्या-लायकीच्या माणसासमोर प्रकटतात! अशा ह्या 'साच्यात' दोन वर्ष वावरताना मला ती भेटली. आणि तिच्यासाठी 'विश्वास ठेवण्या-लायकीचा' होतो मी! तिचे नाव स्टेसी.
आमच्या विद्यापीठाच्या bachelors शाखेत ती शिकत होती. तिचा विषय होता biology ,जो माझा masters  चा देखील विषय होता.

खर्च जमवावा आणि अनुभव घ्यावा म्हणून मी शिकता-शिकता विद्यापीठाच्या 'बुक स्टोर' मध्ये काम करायचे ठरवले. ठरवले म्हणणे तसे चुकीचे...कारण प्रत्येकाला तसे करावेच लागते. ह्याच 'बुक स्टोर' मध्ये मला अनेक चांगले अनुभव तर आलेच पण अमेरिकन 'सामान्य माणूस' सुद्धा जवळून बघायला मिळाला.इथेच माझी आणि स्टेसीची प्रथम भेट झाली. खांद्यापर्यंत सोडलेले सुंदर सोनेरी केस, गालांवर किंचित नैसर्गिक लाल रंग, बेताची उंची, मुलींना शोभेल एवढीच रुंदी व सदैव हसरा, पांढरा शुभ्र चेहरा! कामाच्या पहिल्या दिवशी, मी माझ्या 'locker ' मध्ये सामान ठेवत असताना ही माझ्या बाजूच्या locker मध्ये तिचे सामान ठेवत होती. ( आमचे दोघांचे lockers  बाजू-बाजूला ठेवल्याबद्दल नियतीचे आभार! :D  ) अमेरिकन रीत असल्यामुळे आणि
शेजारी सुंदर मुलगी असल्यामुळे मी उद्गारलो . "शुभ प्रभात! कसं चाललंय?" " एकदम मजेत...आज माझा पहिला दिवस आहे", ती म्हणाली. आमच्या बोलण्याने वेग पकडला. तेव्हा उन्हाळा असल्यामुळे 'आज किती उकडतंय' हे आलंच त्यात! ( ह्या अमेरिकन लोकांना 'तापमान' ह्या विषयावर अनेक तास बोलता येईल!) आलेली पुस्तकं तपासायची, त्यांच्या विषयाप्रमाणे एकत्र करायची व त्यांना 'shelf ' मध्ये लावायची हे आमचे दोघांचे काम होते. त्यामुळे साहजिकच बोलणं होत असे. पण ह्या जोरावर 'मैत्री' व्हावी असं म्हणायला ती भारतीय नव्हती. :)
एकदा असंच काम करत असताना कुणीतरी मला विचारलं, " काय रे, तुमच्याकडे असाच उकाडा असतो का रे?" ( टेक्सास मध्ये प्रचंड उकडतं!) त्या व्यक्तीला मी भारतीय आहे हे माहिती होतं. स्टेसीला ह्या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले. " तू भारतावरून, एवढ्या लांबून, इकडे शिकायला आलास! दाट इज कूल! मी भारताबद्दल ऐकून आहे.....एकदा कधीतरी जायचे पण आहे. पण भारत सुरक्षित आहे का?" ह्या अनपेक्षित प्रश्नांनी माझे लक्ष वेधून घेतले. " तू भारतात येऊ शकतेस....इट इज सेफ ...डू नॉट वरी." मी तिला जणू आमंत्रणच देत होतो. माझ्या सुदैवाने तिला भारतात केवळ हत्ती, घोडे आहेत असे वाटत नव्हते! तिच्यामते भारत एक प्रगतीशील देश होता आणि त्यामुळे उत्सुकतेच्या भावनेने ती भारताबद्दल विचारात होती. कुठे कुठे तिने काय वाचले होते ह्याचा माझ्याकडून खुलासा करून घ्यायची.  तिच्या वर्गात अमेरिकेत वाढलेले भारतीय लोक होते पण खास भारतातून आलेला तिच्या पाहण्यात मी एकटाच होतो!
"तुला तुझ्या घरच्यांची आठवण येत नाही का रे? तुला इकडे कंटाळा येत असेल ना?" काम करताना एकदा अचानक तिने मला हा प्रश्न विचारला. मी अर्थात पहिल्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले. पण मला इकडे कंटाळा येत नाही असं कळल्यावर तिने प्रचंड आश्चर्य व्यक्त केले! मग तू दिवसभर काय करतोस, घरी कधी बोलतोस, खाण्या-पिण्याचं काय करतोस, 'पार्टी' करतोस की नाही ह्या अनेक प्रकारच्या  प्रश्नांना मला सामोरे जावे लागले. पण तिच्याशी बोलायला मजा वाटायची. ह्याचे मुख्य कारण म्हणजे तिच्यातला साधेपणा. साधारण आपल्याकडे बोलले जाणारेच विषय आमच्या बोलण्यात येत. शेवटी इकडची काय आणि तिकडची काय, सामान्य माणसं सारखीच!
दिवस भर-भर चालले होते. बुक स्टोरची नोकरी संपली होती. बरीच लोकं परवडत नसल्यामुळे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना तात्पुरती सुट्टी दिली होती. त्यामुळे स्टेसीशी काहीच संपर्क नव्हता. बुक स्टोरचे बाकी लोक अधून मधून भेटायचे, थोडी औपचारिक विचारपूस होयची आणि मग आम्ही आपापल्या वाटा चालू लागायचो.
एकदा रात्री असाच कपडे धुण्यासाठी घराबाहेर पडलो.( होय! अमेरिकेत जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तर सर्व भाडेकरूंसाठी एक 'laundry  machine  असतं. तिथे नंबर लाऊन कपडे धुवायचे असतात) कपडे 'washing ' करणाऱ्या यंत्रात टाकले, यंत्र सुरु केले आणि मागे वळलो. बघतो तर काय.... कपडे हातात घेऊन दारात स्टेसी उभी! " तू इथे कसा? तू इकडेच राहतोस का?" तिने मला विचारले. "ग्रेट! कधी पाहिलं नव्हतं तुला इकडे", मी उद्गारलो. " एनीवेज,आपण बुक-स्टोर सोडल्यावर भेटणं कठीण होतं. नालायक लोकं, आपल्याला जास्त तास दिले नाहीत कामाला. आधीच सांगायला पाहिजे होतं ना, डॉलर्स पण कमी देत होते. म्हणून मी बाहेर नोकरी करते. तू कुठे काम करतोस?"
संभाषणाच्या गाडीचे रूळ 'पगार' ह्या स्थानकावर जेव्हा येतात, तेव्हापासून ती गाडी पुढे भयंकर वेगाने आणि उत्साहाने पळू लागते!  " मी अमेरिकेत राहत नाही, त्यामुळे मला बाहेर काम करायला परवानगी नाही", मी उत्तरलो.( बाहेर ह्याचा अर्थ विद्यापीठाच्या हद्दीच्या बाहेर) "काय सांगतोस!  मग तू खर्च कसा भागवतोस?" तिने आश्चर्याने विचारले. मी नोकरी शोधत असल्यामुळे पुढे काही बोललो नाही.
त्यानंतर स्टेसी अधून-मधून भेटू लागली. आमच्या laundry room  च्या बाजूला बसायला छोटीशी जागा होती. ती मला बऱ्याच वेळेला तिकडे फोन वर बोलताना दिसायची. मला बघून हात करायची किव्हा कधी कधी येऊन बोलायची.  इकडचे तिकडचे प्रश्न विचारायची. नोकरी मिळाली का नाही ह्याची चौकशी करायची. अधून-मधून भारताबद्दल देखील विचारायची. मी पण थोडीफार उत्तरं देऊन निघून यायचो. दरम्यान मी एका मोटेल मध्ये रात्रपाळी करू लागलो होतो. 'तसल्या' नोकऱ्या करायला आम्हाला परवानगी नव्हती आणि म्हणून मी कुणा अमेरिकन माणसाला त्याची दाद लागू देत नव्हतो. आणि म्हणून मी नोकरी करतोय ह्याची स्टेसीला देखील कल्पना नव्हती.
एकदा नाताळच्या आदल्या दिवशी मी laundry  room  कडे गेलो असताना मला स्टेसी तिकडे दिसली. संध्याकाळची वेळ होती. त्यांनतर मला मोटेल वर जायचे होते. स्टेसीला नाताळच्या शुभेच्छा दिल्या व तिनेदेखील त्या मला हसत हसत परत दिल्या.
"मग, काय करणार नाताळच्या निमित्ताने?" मी एक सहज प्रश्न केला. स्टेसीचा चेहरा पडला  व ती मला सांगू लागली. " मी क्रिसमस असून घरी जाऊ शकत नाही.....मागच्यावर्षी पण नाही जाऊ शकले. डॉलर्सचा प्रॉब्लेम आहे रे....खर्च इतके वाढले आहेत.....मी काम करते तिकडे जास्त डॉलर्स पण मिळत नाही. मला माझ्या आईची खूप आठवण येते. माझे बाबा इराकला आहेत....युद्ध आहे ना!"
" म्हणजे, तू कुठे राहतेस?" मला अपेक्षित होतं की ती माझ्याच शहरात राहत असेल आणि रोज कॉलेजला यायचं तसं येत असेल.
" मी वर्जिनियाहून आले आहे. मी इकडे नाही राहत. आम्हाला टेक्सास स्वस्त पडतं रे. म्हणून मी मागच्या जुलैमध्ये इकडे शिकायला आले. तेव्हा मला नोकरी नव्हती. सारे डॉलर्स आई पाठवायची. पण नंतर ते महाग जायला लागले. घरचे भाडे, सगळ्याचे इंश्युरंस , वेगवेगळे कर भरणे ह्यात मला डॉलर्स पाठवणं कठीण होऊ लागलं. म्हणून मी इकडे नोकरी पत्करली. पण तुला माहिती आहे ना, आपल्याला बुक स्टोर मध्ये किती पगार मिळायचा....ते नुसतं काम करून घ्यायचे. म्हणून मी नोकरी बदलली. पण परिस्थिती तशीच आहे....काही उरत नाही. मागच्या वर्षी मी काही 'गिफ्ट' पाठवू शकली नाही माझ्या आईला....ह्यावर्षी देखील डॉलर्स नाही. मला बाबांना इराकला पण 'गिफ्ट' पाठवायचे आहे....पण काय करू.....इट इज नॉट इसी....आय मिस माय फादर सो मच!"              
स्टेसी हे सगळं शांतपणाने सांगत होती. डोळ्यात पाण्याचा एक थेंब नाही, उगीच हातवारे नाही, आवाज चढवलेला नव्ह्ता किंवा उगीच भावनात्मक दबलेला नव्ह्ता. तिच्या वागण्यात खूप 'maturity ' दिसत होती. परिस्थिती ही अशी आहे आणि  त्याच्याप्रमाणे आपण जगायचे आहे, ह्याची तयारी होती. मी भारताहून जरी आलो असलो, तरी तिची परिस्थिती बऱ्यापैकी माझ्यासारखीच होती.....आई-वडिलांपासून लांब, परिवारापासून लांब.
"मग तू वर्जिनियाला कधी जाणार?" मी विचारलं. खरं तर ह्या प्रश्नाचं एकच उत्तर होतं...डॉलर्स जमल्यावर. पण मला संवाद पुढे ढकलायचा होता. एक तर एवढी सुंदर मुलगी आपल्याशी बोलते आहे ही भावना तर दुसरीकडे एक नवीन कथा ऐकण्याची संधी. मला दोन्ही हवं होतं! "माहिती नाही रे.माझ्याकडे डॉलर्स जेव्हा येतील,जेव्हा साठतील तेव्हा मी ठरवीन. आजच मी माझ्या आजोबांशी बोलत होते.त्यांना पण माझी खूप आठवण येते. पण बिचारे इकडे येऊ शकत नाही.त्यांना जे पेन्शन मिळते त्यात त्यांना इकडे यायचा विमान प्रवास परवडत नाही. यु नो? मी त्यांची लाडकी नात आहे.मी बाळ होते तेव्हा माझे आजी-आजोबा ४ महिने राहिले होते आमच्याकडे. तेव्हापासून त्यांचा माझ्यावर जीव आहे."
हे सगळे मला नवीन होते. आम्हाला भारतात अमेरिकेबद्दल काय सांगितले
जाते? अमेरिकेत नात्यांना काहीच किंमत नाही.मुलं मोठी झाली की आई-वडिलांना विचारत  नाहीत. ( हे असं सांगण्यात अमेरिकेत गेलेल्यांपेक्षा न गेलेल्या लोकांची संख्या जास्त असते म्हणा! ) पण इथे तर, भारताप्रमाणे आजी-आजोबांचा नातवंडांवर जीव आहे. देश कुठलाही असो....सामान्य माणसं सारखीच की!
त्याचवर्षी मी भारतात जाऊन आलो होतो ह्याचे तिला फार कौतुक होते. त्या दिवशी तिने मला विचारले. " तू भारतात जाऊन आलास...कमाल आहे तुझी....एवढा खर्च कसा काय मानेज केलास?" तिच्या ह्या प्रश्नाने मात्र मला थोडे खजील झाल्यासारखे झाले. मी तिकिटाचे अर्धे पैसे घरून मागवले होते ह्याची तिला दाद नाही लागू दिली मी!
कुठे राहतात तुझे आजी-आजोबा?" मी विचारले. "वर्जिनियालाच का?"
"नाही रे. ते तर कॉलोरेडोला असतात. ते मला नेहमी म्हणतात, फोन वर बोलण्यात फक्त कृत्रिम मजा येते, तुला समोरासमोर बघावेसे वाटते, त्यात खरा आनंद आहे. आता आठ वर्ष झाली, मी त्यांना बघितले  नाही.जे काही बोलणं होतं ते फोनवरूनच!"
मी तिची अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्या किंचित अंधुक वातावरणात तिने कानात घातलेला 'दागिना' ( दागिनाच म्हणतात ना हो?) चमकला आणि ती अधिक सुंदर दिसली! मग ती स्वतःच्या बाबांबद्दल सांगू लागली.
मी विषय काढलाच नव्ह्ता. तिला मात्र सगळं सांगावसं वाटलं. अमेरिकेत जीवन हे 'यंत्रसंस्कृती'शी मैत्री केलेलं. त्यामुळे कुणाला-कुणाशी बोलायला वेळ नसतो. आणि ऐकून घेणारे कुणी भेटले तर मग विचारांचे धरण फुटते आणि माणूस असा बोलका होतो.
" इराकचे युद्ध सुरु झाल्यापासून माझे बाबा तिकडेच आहेत. महिन्यातून एकदा फोन करतात. कधी कधी उशीर होतो.पण आम्हाला आता त्याची सवय झाली आहे. कधी कधी आम्ही त्यांना काही पाठवतो.मागच्यावर्षी त्यांनी मला एक 'फर'चा कुत्रा पाठवला होता. मला soft toys  खूप आवडतात! .मी तो माझ्याबरोबर इकडे घेऊन आले आहे. पण मला माझे बाबा हवे आहेत, काही वर्षांनी माझे लग्न होईल....तेव्हा मला ते इकडे हवे आहेत. लोक का युद्ध करतात रे? It  seperates  families !"
तिचा मुद्दा हा आम्हा सर्वांचाच मुद्दा आहे की! राजकारण्यांच्या स्वार्थापायी जगाचे नकाशे बदलत आले आहे, बदलत चालले आहेत आणि अजून किती दिवस बदलतील काही कल्पना नाही. पण तिच्या जिद्दीबद्दल माझ्या मनात कमालीचा आदर उत्पन्न झाला. अंदाजे वीस वर्षाची ही मुलगी....कमालीच्या आत्मविश्वासाने एकटी राहत होती.आठ वर्षांपासून आजी-आजोबांना बघितले नव्हते....बऱ्याच वर्षांपासून बाबांना बघितले नव्हते....आई अनेक मैलांवर दूर राहत होती...तरीही हिचे धैर्य खचले नव्हते.  मी दहावीची परीक्षा देत होतो त्यावेळी 'बुश' ने अमेरिकन सैन्य इराकला पाठवले होते. आता मी दहावी झाल्याला सात वर्ष झाली. सात वर्षांपासून तिला आपल्या बाबांना बघता आलं नव्हतं. ' आपण आपल्या बाबांना परत कधी बघू का' असा विचार तर तिच्या मनात येत नसेल ना .....जाऊ दे , मी हा विचार करणंच सोडून दिलं!
त्यानंतर स्टेसी अधून-मधून भेटायची...कधी लायब्ररीत तर कधी खायच्या ठिकाणी.थोडं बोलणं होयचं.मी नंतर भारतात कधी जाणार ह्याची मात्र ती आवर्जून चौकशी करायची. कधी कधी आई-वडिलांबद्दल देखील विचारायची. मी अमेरिका सोडताना तिला भेटायची इच्छा होती पण बऱ्याच दिवसांपासून ती काही दिसली नाही. कदाचित ती वर्जिनियाला जाऊ शकली असेल ह्या आनंदात मी भारतात परत आलो. आश्चर्य म्हणजे ती फेसबुक पण वापरात नाही. त्यामुळे तिथे सुद्धा 'contacted ' राहणं अवघडच!
परवा कुठेतरी पेपरात वाचले की अमेरिकन सरकार हळू-हळू इराक आणि अफ्घानिस्तानातून  सैन्य कमी करणार आहे. लगेच स्टेसीची आठवण झाली. तिला तिचे बाबा भेटू देत ह्याची देवाकडे प्रार्थना केली. माझ्यापेक्षा वयाने लहान आणि डिग्रीने देखील लहान असूनसुद्धा कमालीचे धैर्य शिकवणारी माझी ही मैत्रीण तिच्या परिवारासकट खुश राहो अशीच अशा व्यक्त करतो. बाकी मिनटा-मिनटाला बदलणाऱ्या ह्या जगात आशाच व्यक्त करू शकतो आपण!
आपली  भारतीय संस्कृतीच  सर्वश्रेष्ठ आहे असं मानणाऱ्या लोकांची संख्या काही कमी  नाही. पण शेवटी देश कुठलाही असो,धर्म कुठलाही असो, सामान्य माणूस हा सारखाच! आपल्याकडे मूल झालं की स्त्री आपल्या आई-वडिलांकडे  जाते.....इथे फरक एवढाच सूक्ष्म की आई-वडील ( स्टेसी चे आजी-आजोबा) आपल्या मुलीकडे राहायला आले होते!

Image Credits:  http://www.protodepot.com/archive/2008_01_01_archive.html

3 comments:

  1. मस्तच आशय...लेखाची मांडणी, शब्दरचना, पात्र-ओळख सर्वच बाबतीत हा लेख सरस झाला आहे. तू चुकीच्या क्षेत्रात आहेस मित्रा!

    ReplyDelete
  2. Well written. Its so good to know that people everywhere are alike with same aspirations and life experiences even though there are cultural differences. More articles need to be written in media in general to break the stereotypes of the 'rich' Americans and give a voice to the middle class there.

    ReplyDelete
  3. शब्दरचना छान आहे.

    ReplyDelete