Pages

Total Pageviews

Thursday, October 18, 2012

सुरेश

समोर उभ्या असलेल्या शाळेच्या इमारतीच्या साक्षीने दामोदर हॉटेलच्या छोट्याशा जागेने तिशीत पदार्पण केले. शाळेची इमारत ह्या जागेपेक्षा १० वर्ष मोठी. आणि म्हणून कदाचित मोठेपणाचा आव आणीत त्या छोट्या जागेकडे सदैव डोळे वटारून बघत असते. शाळेच्या इमारतीला माहिती आहे - मोठी होऊन होऊन किती मोठी होणार ही जागा? मोठेपणाचा हक्क आणि ठेका आपल्याकडेच असणार आहे - सतत! शाळेची इमारत दहा वर्षांची होती तेव्हा समोरच्या जागी, जिथे काहीही नव्हतं, थोडी हालचाल सुरु झाली. 'शाळेच्या ठिकाणी हे काय?' अशी बऱ्याच जणांची भावना त्या दिवसात होती. पण शेवटी थोडा संघर्ष करून दामोदर हॉटेल ह्या इमारतीने आपले अस्तित्व मिळवले. हॉटेल म्हटल्यावर साहजिकच मुलं-मुली तिकडे जाऊ लागली. अधून मधून गप्पा मारायला तिकडे बसू लागली. शाळा संपली की खाऊ-पियू लागली. शाळेला मात्र हे खटकू लागलं. तिने हॉटेलला शक्य तितके वाळीत टाकायचे ठरवले. मुलांच्या तिकडे जाण्यावर बंदी घातली गेली. शेवटी कुणाचाही आधार मिळत नाही हे लक्ष घेता त्या हॉटेलने स्वतः प्रगती करायचे ठरवले. शाळेच्या सतत असलेल्या वाकड्या तोंडाकडे लक्ष न देता त्या जागेने आपली व्याप्ती थोडी थोडी का होईना वाढवली. आणि ह्या तीस वर्षात थोडीफार कीर्ती देखील मिळवली. शाळेची इमारत मात्र हे मानायला अजिबात तयार नव्हती.

आज हॉटेल दामोदरच्या तीन टेबलांना एकत्र करण्यात आलं होतं. सर्व बाजूंनी खुर्च्या मांडल्या होत्या. थोडी दिव्यांची आरास होती. हॉटेलकडून जितकं काही करता येऊ शकत होतं तितकं त्यांनी केलं होतं. कारण आज एकदम २५-२८ लोकं हॉटेल मध्ये जेवायला येणार होती. समोरच्या शाळेत बऱ्याच वर्षांपूर्वी शिकून गेलेली अशी ही लोकं होती. पंधरा वर्षांपूर्वी 'पास आउट' झालेली batch ! म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी १५-१६ वय असलेली ही मुलं आता तिशीत पदार्पण करणार होती. ह्यांचे 'reunion ' व्यवस्थित हाताळण्याची जबाबदारी हॉटेल दामोदरच्या सर्वात अनुभवी वेटर वर होती! पंधरा वर्ष अनुभव असलेला वेटर होता तो. असे प्रसंग त्याने ह्याच्या आधी अगदी समर्थपणे हाताळले होते.

संध्याकाळचे सात वाजताच त्या टेबल-मांडणीकडे लोकांची वर्दळ वाढू लागली. आणि ७:४५ पर्यंत तिकडे २७ लोकं हजर होती. वेटरने पाणी सर्व केले आणि त्यांच्या सर्वांच्या ऑर्डरप्रमाणे तो 'कोक' आणायला आत गेला.
" अरे यार! कोक कसले पिताय! असली ड्रिंक्स पिण्याचे वय निघून गेले आपले! " प्रत्येक ग्रुप मध्ये एक तरी 'आपण किती आणि कसे पितो' हे सांगणारा नमुना असतोच!
" अबे ए...मुली पण आहेत आपल्याबरोबर. पितोस कसला!" ग्रुप मध्ये उगीच सावध होणारी पात्र पण असतातच की!
" प्या की! आम्ही देखील देऊ कंपनी!" - एक इतर मुलींचा रोष ओढवून घेत उगीचच बिनधास्त मुलगी. एकूण काय, सर्व प्रकारच्या नमुन्यांनी भरलेला हा ग्रुप जवळ जवळ १५ वर्षांनी एकत्र आला होता. पण हॉटेल दामोदर हे साधे हॉटेल होते. शाळेसमोर बऱ्याच वर्षांपूर्वी उघडलेले एक साधे भूक आणि तहान भागवायचे ठिकाण! तिकडे दारू-बिरू मिळत नव्हती.

" हो रे. ते विसरलोच मी! कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये राहून राहून ह्या गोष्टींची इतकी सवय झाली आहे ना. काही विचारू नकोस. दर वीकेंडला आम्ही पार्टी करतो. त्यात भरपूर दारू प्यायली जाते. आणि नोमुरा मध्ये आमचा बॉस आमच्याहून जास्त पितो आणि दंगा करतो." दारू मागणाऱ्याला त्याने चुकीच्या ठिकाणी दारू मागितल्याचे लक्षात आले. पण बोलता बोलता तो नोमुरा ह्या कंपनीत कामाला आहे हे त्याने सांगून टाकले!
" हो! आमच्या इन्फी मध्ये देखील आम्ही धम्माल करतो. साला मंडे ते फ्रायडे कुत्र्यासारखं काम करावं लागतं. पण त्यामुळे आम्ही शनिवारी-रविवारी सगळं वसूल करून घेतो....तो बघ ...रेडा आला ...साला अजून पण तितकाच ढोल्या आहे...बडे बाप का साला", इन्फी मध्ये काम करणारी व्यक्ती वेटरने 'सर्व' केलेल्या स्टार्टर मधील एक तुकडा तोंडात टाकत म्हणाली. आणि सगळे 'रेड्याकडे' बघू लागले.
"हेलो गाईज ...कसं काय चाललंय? किती वर्षांनी इकडे येतो आहे! आज पण मी तितकाच खाणार आहे.... सुरुवात पण झाली वाटतं तुमची... स्टार्टर आहेत...मागवा अजून", रेडा उद्गारला.
" साला हा बघ... अजून तसाच आहे.. तेवढंच खातोस का रे अजून? तेव्हा पण हाणायचास... बाप पैसेवाला ना तुझा...आम्हाला वाटायचं...आता थांबेल, मग थांबेल...अख्ख्या बिल्डींग मधील एक घर विकण्याचे पैसे तुझा बाप तुला खायला म्हणून द्यायचा वाटतं", एकाने तेव्हा बिल्डर बाप असलेल्या रेड्याला उद्देशून शेरा मारला आणि सगळे हसू लागले.
" ए. काय रे...", उगीचच एका मुलीने हसून घेऊन नंतर भाषा किती विचित्र वापरली असं दर्शवून टाकलं. लगेच मोर्चा मुलीकडे वळलाच.
" तू तरी कुठे बदलली आहेस.... च्यायला.. पुस्तकी पोपटीण नुसती... आई शिक्षिका होती तुझी... घरून सगळा आभ्यास त्यामुळेच पूर्णपणे तयार असायचा तुझा. आता काय करतेस? शिक्षिकाच झाली असशील तू!"
" नाही रे... मी लॉ केलं आहे रे.... वकील झाली आहे मी ... आणि मयूर... पोपटीण नाही...मैना असतं....मराठी सुधारा स्वतःच... शाळेपासून तसंच आहे", त्या मुलीने लगेच चिडवणे परतवले आणि मंडळी अजून हसू लागली.
" नाही गं...इंजिनिअर आहे ना तो... मराठीची सवय सुटली असेल... आणि आपल्याला करायचंय काय...पोपटीण असो वा मैना...समजलं ना तुला तो काय बोलतोय ते?" एकाने व्याकरणाच्या चिंद्या फाडणाऱ्या त्या इंजिनिअर मुलाची बाजू घेतली लगेच!
" तुम्ही इंजिनिअर लोकं एकमेकांची बाजू घ्या फक्त", एकजण उद्गारला.
" ए पण तू लॉ कसं काय केलंस गं? किती तरी वर्ष आपण एकमेकांना बघितलंच नाही ...आणि मी नंतर अमेरिकेतच होते ना.. लग्न झाल्यापासून वी लिव इन ह्युस्टन...फॉर द फर्स्ट कपल ऑफ यर्स वी वर इन न्यू यॉर्क. ए वेटर .... अजून तीन प्लेट चिकन लॉलीपॉप... आणि लवकर आण प्लीज.. ", एका मुलीने संभाषण पुढे ढकलले. ती अमेरिकेत असते आणि कुठल्या शहरांमध्ये राहिली आहे ह्याचा उल्लेख मात्र इंग्लिश मध्ये झाला. " डोंट यु थिंक ...हा वेटर उगीचच आपल्याकडे बघतोय... ह्याला कामाला लावलं पाहिजे... उभं राहून बघायची काय गरज आहे?" त्या मुलीने पुढे हळूच सर्वांना विचारले.
" काही नाही गं ...टीप मागायला पुढे पुढे करतात ही लोकं...तू लक्ष देऊ नकोस...आणि तुझं लग्न झालं आहे... टेन्शन नको घेउस...अमेरिकेतला गोरा बघत असता तर ठीक होतं गं ...इकडचे लोकं म्हणजे तुझे डिमोशन!" एका मुलाने आपले एक मत व्यक्त केले आणि लोकं परत हसू लागली. मग थोडक्यात तिने ग्राजुएट झाल्यानंतर लग्न ठरलं आणि नवऱ्याच्या बरोबर अमेरिकेला कशी गेले ही कथा सांगायला सुरुवात केली. ही कथा लोकांनी बऱ्यापैकी शांततेत ऐकली. चिकन लॉलीपॉप आली तेवढ्यात. आणि पुढे गाडी मेन कोर्स कडे वळली. तोपर्यंत कोण काय करतंय, कुठे आहेत, नोकरी, धंदा ह्या सर्व गोष्टींची चर्चा झाली होती. स्टार्टरची मजा घेतल्यानंतर ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील, एन.आर.आय आणि तत्सम मंडळी इतर चर्चांमध्ये गुंतली. आणि वेटरला परत बोलावले गेले आणि ऑर्डर दिली गेली.

" इकडे आपल्या वेळेस चिकन लपेटा खूप फेमस होते.... मला अजून आठवतंय ... आहे का ते इकडे अजून?"
" हो साहेब, आहे ना", वेटर बोलला. ऑर्डर दिली गेली आणि मंडळी ती येई पर्यंत गप्पा पुढे वाढवीत बसले. " तुला बरं आठवतंय रे सगळं... चिकन लपेटा वगेरे... सर्वात आधी तूच आणलं होतास बहुतेक मला इकडे... आठवत नाही मला एवढं... पण तुला बराच माहिती होतं इकडे काय मिळतं वगेरे"
" अरे... मी इकडे आलो ते आपल्या ...हम्म...सुरेश बरोबर... मला तरी कुठे काही माहिती होतं.. त्याने मला आणलं इकडे", ती व्यक्ती म्हणाली.
" कोण सुरेश?" एक दोन लोकांनी हा प्रश्न विचारला. " अरे तो ...आपल्या शाळेच्या शेजारच्या गल्लीत राहत होता ..रिक्षावाल्याचा मुलगा.."
"ओह्ह ...तो! अरे हां... तोच तो...एकदा मला आठवतंय.. आपले बाबा काय करतात हे सर्वांना विचारलेले असताना...रिक्षावाला आहेत असं म्हटल्यावर आपण हसलो होतो तोच", एक मुलगी आपली एक आठवण सांगू लागली आणि वातावरण एकदम हसरे झाले. " आपण पुढे त्याला मार्केट मध्ये जायचे झाले तर तुझ्या बापाला बोलवू असं सांगितलं होतं...", रेडा उद्गारला. इतका वेळ तो खाण्यात गुंतला होता.
" साल्याचा नेहमी अभ्यास अपूर्ण असायचा. रोज मार पडायचा. एकदा कॅलेंडर वर सही आणायला सांगितली होती त्याला.. घरी कुणाला सही करता येत नाही असं म्हटल्यामुळे जाम झोडपून काढलं होतं ....साला मी त्याचा बेंच पार्टनर...हसूच आवरत नव्हते...सातवी-आठवीची गोष्ट असेल ही."
" परश्या आणि सुरेश ह्यांची जोडी अजब होती पण...मी त्यांच्या एक बेंच मागे तर बसायचो. परश्या एकदम युनिफॉर्मला कडक इस्त्री मारून यायचा...आणि ह्याचा अवतार बघण्यासारखा असायचा. इस्त्री तर सोडा ...कपडे सुद्धा कधी कधी न धुतलेले घालायचा... मला तर वाटतं अंघोळ पण नेहमी नव्हतं करत."
"ईईई... खरंच का? एकदा मला आठवतंय ही मुलं खूप बोलतात तेव्हा मुला-मुलींना एका बेंचवर बसवायचे ठरवले. आणि ही आणि तो उरले होते फक्त....बाकी सर्वांची जागा नक्की झाली होती....आणि तेव्हा हिच्या चेहऱ्यावरचे भाव....आय मीन ...एक्स्प्रेशन्स....त्या दिवसात आपल्याकडे कॅमेरे नव्हते...फोनच नव्हते म्हणा ...नाहीतर नक्कीच फोटो काढला असता मी तुझा... ", एक मुलगी एन. आर. आय मुलीला उद्देशून म्हणाली. " हो ना", तिने लगेच सुरुवात केली. " त्याच्याबरोबर कोण बसेल बाबा!"
" पण पुढे भेटला की नाही तो कुणाला? मला तर साधारण दहावी नंतर काहीच आठवत नाही त्याबद्दल. तसा मी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो...पण शाळेनंतर कधी कधी दिसायचा."
" काही कल्पना नाही म्हणा.... पुढे त्याने काय केले ..कुठे शिकला...आता काय करतोय...कुणाला काहीच माहिती नाही... अरे...तो वेटर परत आला रे...त्याला सांग काहीही नको आहे...असल्यास सांगू...उगीच इकडे येऊन आमच्याकडे बघत बसू नकोस..."
" ते जाऊ दे... त्याच्यामुळे आज चिकन लपेटा खायला मात्र मिळाला.. तुझ्यामुळे वगेरे ठीक आहे...पण तुला त्याने सांगितले...हे मान्य करावे लागेल... बिल आण रे...लवकर! "
" अरे यार...आपण सगळे असं मधून मधून भेटलं पाहिजे रे.. मजा आली आज...जुने दिवस आठवले... अरे..पाचशे चे सुट्टे आहेत का....नाहीतर सोड... नंतर दे... नीलम...तुला सोडतो मी...आणि हां, तू....परत यु.एस वरून येशील तेव्हा नक्की कळव गं... परत सगळे तेव्हाच भेटू...काय म्हणता सगळे! असो...हां...परश्या ....पन्नास रुपये दे रे...ह्याला टीप देऊया.." पोट जड होऊन सुद्धा त्यातल्या त्यात उत्साही असलेल्या एकाने बिलाचा हिशोब करायची जबाबदारी घेतली!
" हे घे रे...५० आहेत...चांगली सर्विस दिल्याबद्दल...आणि अधून मधून आमच्याकडे बघण्याबद्दल...आणि आमच्या टेबल जवळ सतत ये-जा केल्याबद्दल!" सारी मंडळी परत जोरजोरात हसू लागली. वेटर काही न बोलता त्यांच्याकडे बघू लागला.
" अरे... बघत काय बसला आहेस...घे ना...घे...काय नाव तुझं?"
" सुरेश."
मंडळी टीप देऊन निघून गेली. आणि ह्या साऱ्या लोकांना आपापल्या यशस्वी वाटेवर चालत जाताना त्याने परत एकदा पहिले. पंधरा वर्षांनंतर.



- आशय गुणे स्मित

2 comments:

  1. he vaachun potat kahitari tutalyasarkha zala Aashay!

    ReplyDelete
    Replies
    1. आजूबाजूस बरेच 'सुरेश' पाहायला मिळतात.. म्हणून लिहावेसे वाटले... सुस्थितीत असलेल्या समाजाची ही जबाबदारी आहे की त्यांनी भोवती असलेल्या, परंतु परिस्थितीमुळे थोडे मागे पडलेल्या सामाजिक घटकांना आपल्या बरोबर घेऊन गेले पाहिजे ... अन्यथा आपण कुणीतरी कमी आहोत असा न्यूनगंड ( complex) त्यांच्यात निर्माण होईल आणि हे घातक आहे!:( I appreciate your comment, Rujuta! :)

      Delete