Pages

Total Pageviews

Saturday, May 24, 2014

..आणि मी थोबाडपुस्तकाच्या थोबाडीत मारली!

दार वाजवले. काही सेकंदात एका बऱ्यापैकी उंच व्यक्तीने दार उघडले. उंचीमुळे किंचित वाकलेले खांदे. डोळ्यांवरचा चष्मा थोडासा नाकावरून घसरगुंडी करीत खाली आलेला. पांढरा टी-शर्ट आणि एक ३/४ थ पँट. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसल्यावर आम्हीच बोलायला सुरुवात केली.

" नमस्कार! आपल्याला भेटायचे होते. आम्ही तुमचे लेख वाचतो...."
चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह काही कमी होईना. मग आम्ही अजून स्पष्टीकरण दिले.
" आम्ही तुमचे लेख वाचतो.... फेसबुकवर…  आणि एकंदर तुमचे ब्लॉग सुद्धा. अलीकडे मासिकात छापून आलेल्या कथा देखील वाचल्या होत्या... अगदीच सगळी मतं पटतात असे नाही परंतु प्रभावित नक्कीच करतात!" एव्हाना आम्हाला घरी घेतले गेले होते आणि सोफ्यापर्यंत चालत जाईपर्यंत आम्ही हे सारे सांगत होतो.
"हां…  बोला … मग? सर्वप्रथम तुमची ओळख तर करून द्या?" आम्ही आमची ओळख करून दिली. आम्ही त्याच्या 'फ्रेंडलिस्ट' मध्ये आहोत हे त्याने दिलेले पाणी पित सांगितले. त्याची फ्रेंडलिस्ट अर्थात खूप मोठी होती आणि त्यामुळे आम्हाला जरा विस्तारित ओळख करून द्यायला सांगितली. आम्ही दादर वरून पनवेलला आलेलो आणि वाटेत नेमका ट्राफिक लागला. परंतु एरवी कुणाशी बोलताना 'काय नेहमीचेच आहे … ते काही बदलत नसतं' वगेरे बोलून विषय सुरु करता येतो. आज हे करता येणार नव्हते. कारण 'ह्या देशात काही होत नाही' ह्या वाक्यावर ह्याने आतापर्यंत त्याच्या लिखाणातून बरीच टीका केलेली. त्यामुळे एकंदर अवघडलेल्या अवस्थेत सुरुवात कशी करावी ह्या विचारात काही सेकंद गेले. शेवटी तोच म्हणाला.
" काय मग … काय बोलायचंय तुम्हाला?" आम्ही एकमेकांकडे बघितले. शेवटी मीच सुरुवात केली.
" ते तुम्ही अचानक फेसबुक…"
" हं…हं… पुढे बोला!"
" फेसबुक सोडलं … म्हणजे कशामुळे… तुम्ही तर ह्या माध्यमाचा बराच प्रचार केला होता.  ते कसे उपयोगी आहे वगेरे सांगणारे बरेच 'पोस्ट' तुम्ही       टाकत होतात! आणि अचानक … म्हणजे निवडणूक निकाल तुमच्या विरोधात लागला म्हणून का? नाही म्हणजे … तुम्ही गेल्यापासून चर्चा तर तशीच आहे!" मी एकदाचं सगळं बोलून मोकळा झालो. त्याने एक दीर्घ श्वास सोडला.
" मी ह्या माध्यमाला अजून मानतो. ह्या माध्यमामुळे मी स्वतः बऱ्याच लोकांपर्यंत पोहचू शकलो. अगदी काही वर्षांपूर्वी माहिती देखील नसलेली माणसं मला फेसबुकमुळे माहिती झाली. त्यांचे विचार कळले … त्यांचे राहणीमान कळले… आता हे विचार राजकीय पातळीवर सारखे नव्हते … पण तरीही त्याचं  मला काहीही घेणंदेणं नव्हतं! बऱ्याच लोकांच्या आणि माझ्या आवडीनिवडी, सामाजिक मतं काही... काही सारखं नव्हतं! पण तरीही एम माणूस म्हणून …. एक मित्र म्हणून मी बऱ्याच लोकांना सामावून घेत होतो! परंतु कसं आहे ना … मी नव्वदच्या दशकात जन्म घेतलेला मुलगा आहे… त्यामुळे जेव्हा ह्या गोष्टी नव्हत्या त्यावेळेचे घालवलेले बालपण माझ्याकडे आहे. आणि त्याचमुळे सोशल मिडियाचे महत्व माझ्या लेखी दिवसातील २०%
वेळ देण्यापुरते आहे. सो …. सोशल मिडियामुळेच  मी 'ओळखला' जात असीन किंवा माझ्याबद्दल अंदाज बांधले जात असतील तर मात्र मला ते आवडणार नाही!"
" म्हणजे?"
" म्हणजे मी एक व्यक्ती म्हणून ह्या इंटरनेट विश्वाबाहेर फार वेगळा आहे. म्हणजे तोच खरा 'मी' आहे. हे कदाचित माझ्या बऱ्याच मित्रांना माहिती नाही.… हे मित्र म्हणजे ज्यांना मी फेसबुक वर ओळखतो. आणि जेव्हा हे लोक माझ्यावर अगदी वाटेल ते लिहितात तेव्हा ह्या माध्यमाची मर्यादा दिसून              येते!"
" पण मग हे तुम्हाला आधी जाणवले नाही का … ?" मी विचारले.
मला तो काय म्हणत होता हे नीट कळले नव्हते. पण 'मी काय लिहितो हे नीट वाचा'… हे असे आव्हान मी बऱ्याच वेळेस त्याच्या 'स्टेटस' खाली प्रतिक्रियेत वाचले होते. त्यामुळे मी शांतपणे त्याचे बोलणे उलगडण्याची वाट पाहू लागलो.
" खरं सांगायचं तर नाही … ", त्याने सुरुवात केली, " साधारण २०१०-११ पर्यंत मी फेसबुक वर माझ्या मित्रांसाठीच होतो. क्वचित काही लोक होते ज्यांना     मी 'फ्रेंड रिक़्वेस्ट पाठवली होती आणि ती एकाच करणासाठी … संगीत! संगीत क्षेत्रातील विषयांवर चर्चा व्हावी आणि त्यासंदर्भात ओळखी वाढाव्यात ह्या उद्देशाने मी सक्रिय होतो. नुकताच लिहू लागलो होतो. मनात जे विषय होते ते हळू-हळू मांडू लागलो होतो. तेव्हा मी आणि माझ्या मित्रांनी मिळून सुरु केलेल्या ब्लॉगची दाखल लोकसत्ता ने घेतली आणि त्यावेळेस इंटरनेट ह्या माध्यमाचे महत्व मला पटायला लागले. माझे वाचक वाढले होते. आणि तेवढ्यात माझ्याकडे एक प्रस्ताव आला …. अमेरिकेत एक लेखक आहेत ज्यांनी महाभारत युद्धाची तारीख शोधली आहे.. त्यासंदर्भातले त्यांचे पुस्तक इंग्लिश मधून मराठीत भाषांतरासाठी! मी उडालोच! इंटरनेट वर सक्रिय असणे हे ह्या पातळीवर मला घेऊन जाईल हे मला माहिती नव्हते… अनपेक्षितच होते!"
" आणि तुम्ही तो प्रस्ताव स्वीकारला?" मी विचारलेला प्रश्न आणि त्यामागचे आश्चर्य त्याने बरोबर हेरले होते.
" हो… महाभारत, रामायण ह्या विषयांवर संशोधन व्हावं असं मला मनापासून वाटतं … माझे आवडतेच विषय आहेत ते! हं … आता सोशल मिडियाच्या काही लोकांनी मला हिंदू-विरोधी वगेरे म्हणून टाकलंय … त्यांना अर्थात माझी ही बाजू माहिती नाही. कारण समोर लिहिलेल्या राजकीय पोस्ट बाहेर ते मला ओळखत नाहीत", असं म्हणून तो जोराने हसला!
तो बोलला ते काही खोटं नव्हतं. मला देखील हेच वाटलेलं की काँग्रेसच्या बाजूने लिहिणारा हा माणूस… ह्याला काय हिंदू धर्म वगेरे बद्दल आस्था  असणार! परंतु लागेच मी तो पुढे काय म्हणतोय हे ऐकू लागलो.
" मी भाषांतर करायचे ठरवले. पण फेसबुकमुळे मला हा फायदा झाला हे ध्यानात ठेवूनच! आणि मी फेसबुकवर मित्र वाढवायचे ठरविले. वेगवेळ्या क्षेत्रातील लोकांना add केले. लिखाण वाढवले. ब्लॉग फेसबुकवर शेअर करू लागलो… it was wonderful … खूप छान वाटत होतं. बरेच विचार वाचायला मिळत होते… मतं कळत होती …आणि काही वेळेस माझे कौतुकही होत होते. आम्ही सगळेच एकाच विचाराचे नव्हतो… परंतु चर्चा वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्तींशीच होते ना?"
हे मात्र खरं होतं. सगळेच सारखा विचार करत असले तर जगात चर्चा हा प्रकार घडलाच नसता. एकदम साधी गोष्ट परंतु ऐकून काहीतरी नवीन ऐकल्यासारखं वाटलं.
" पण मग अडलं कुठे? एवढे असताना तुम्ही फेसबुक वरून आता निवृत्ती का घेतलीय?" मी हे विचारताना जरा घाईच केली होती. कारण माझ्या ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून त्याने पुढे सांगणे सुरुच ठेवले.
" ह्या ज्या लोकांशी चर्चा होत होती त्यातील बऱ्याच … बहुतांश rather … लोकांना मी अजून प्रत्यक्ष भेटलो देखील नाही. आणि सोशल मिडियाची ही मजा सर्वात श्रेष्ठ आहे … आता तुम्हाला गंमत सांगतो…  मी जे राजकीय विचार पोस्ट करतो …त्यात माझ्या विरोधी मत असलेला माझा एक मित्र ….          ह्याला मी प्रत्यक्ष एकदाच भेटलोय … केवळ ५ मिनिटांसाठी …ट्रेन मध्ये! परंतु रोज आमची चर्चा रंगते… अगदी मुद्द्यांना धरून! ही मजा आहे फेसबुकची! परंतु झालं असं की नंतर नंतर मला ज्या लोकांनी add केलं किंवा फ्रेंड रिक़्वेस्ट पाठवली … त्यांना प्रत्यक्ष चर्चा करण्यात काहीही रस नव्हता … त्यामुळे अशा लोकांची भरती वाढत गेली. अर्थात हे माझ्या नंतर लक्षात आले!"
" म्हणजे? हे लोक कोण? आणि काय करतात हे?" मी विचारले.
" आता हे बघा … तुम्ही मी लिहितो ते वाचता असं म्हणता … तर तुम्हाला हे जाणवलं असेल की मी बऱ्याच विषयांवर लिहितो … संगीत असो, व्यक्तीचित्र असो, भावनाप्रधान विषय असो ... human relationships असो … रोजचे अनुभव … थोडे विनोदी संदर्भ.. अगदी सगळं! परंतु मी जी राजकीय मतं मांडतो त्यावरून आणि त्यावरूनच माझे व्यक्तिमत्व कसे आहे हे तपासले जाते … केवळ हा एकाच निष्कर्ष! आणि ह्या गोष्टीला ही लोकं जबाबदार आहेत. ही ती लोकं आहेत ज्यांना चर्चेत अजिबात रस नसतो … पण त्यातील जय-पराजय त्यांना बघायचा असतो! किती बालिश आहे ना? आता माझ्या लिस्ट मध्ये एक मराठे म्हणून कुणीतरी आहे … त्याला मी प्रत्यक्षात बघितले देखील नाही… परंतु mutual friends पाहून मी त्याला माझ्या लिस्ट मध्ये समाविष्ट केले होते. आता हा जो कुणी आहे तो …. आत्तापर्यंत प्रत्यक्षात चर्चेत कधीच सामील झाला नाही. परंतु माझ्या विरोधात कुणी काही कमेंट केली तर ती लाईक करण्यात धन्यता मानतो! मग माझ्या लिस्ट मध्ये येण्याचे प्रयोजन काय?"
" पण मग तुम्ही त्यांना लिस्ट मधून काढून का नाही टाकले? आणि त्यांनी असं केलंच तर काय होतं … how does it affect you?" मला त्याला नेमकं काय म्हणायचय हे लक्षात येत नव्हतं!
" मागे वळून पाहिले तर वाटते असं करण्यात काही हरकत नव्हती. परंतु खरं सांगू … मला लोकांना ब्लॉक करणं , त्यांच्या प्रतिक्रिया उडवणं वगेरे गोष्टी   लोकशाही विरोधी वाटतात! माझ्या स्टेटसवर कुणी माझ्या विरोधात लिहित असेल … वैयक्तिक नाही हं … तर ते मला वाचणं गरजेचं आहे. कारण आपल्याला दुसरी बाजू इथून तर कळत असते! पण ही जी लोकं आहेत ना हे मी काय लिहिलंय ते पूर्ण न वाचता लगेच प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांना पुरेपूर सहाय्य करतात… आता एक कुलकर्णी म्हणून कुणीतरी आहे … कॉलेज मध्ये ज्युनियर होती तेवढीच ओळख… परंतु ह्या अशा गोष्टी करण्यात पटाईत!"
माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह अजून टिकून होते हे त्याला लक्षात आले आणि त्याने विस्तारित सांगणे पुन्हा सुरु केले.
" हे बघा … मी कोणताही स्टेटस टाकतो … तो योग्य शब्द वापरून आणि योग्य तो सावधपणा मनात ठेवूनच … त्यात सर्वव्यापी विचार आढळला पाहिजे हा माझा प्रयत्न असतो… परंतु जर माझ्याकडून हे झाले नाही तर लोकांनी ते लक्षात आणून द्यावे ह्यासाठी मी प्रतिक्रिया कधीच नाकारत नाही! परंतु एवढी अपेक्षा मात्र ठेवतो की प्रतिक्रिया देणाऱ्यांनी मी काय लिहिलंय ते पूर्ण नीट वाचावे. परंतु काही लोक असे  आहेत जे मी काय लिहिलंय ते पूर्णपणे वाचत नाहीत. एक ओळ वाचून काहीतरी मला नावं ठेवणारी प्रतिक्रिया देतात … आणि मग येते ही मराठे, कुलकर्णी टाईपची फौज! ह्यांना पूर्ण वाचण्यात रस नसतोच … परंतु माझ्या विरोधात काही लिहिलंय ह्याचा आनंद असतो आणि म्हणून ते ती प्रतिक्रिया 'लाईक' करून मोकळे होतात. पुढे अशाच प्रकराची लोकं येतात आणि त्यांना ती प्रतिक्रिया दिसते आणि चर्चेचा 'फ्लो' नाहीसा करत ते त्या प्रतिक्रियेला उत्तर म्हणून आपली प्रतिक्रिया देतात …. आणि अशाप्रकारे वर लिहिलेलं राहतं बाजूला आणि चर्चा वेगळीच वळणं घेत राहते! आता त्यात देखील काही अपवाद आहेत जे रीतसर माझ्या स्टेटस मधली त्यांना खटकलेली वाक्य मला दाखवतात आणि त्यांना त्यावर काय वाटते हे कळवतात …. पण मला हे आवडतं … कारण त्यांनी ते वाचलंय हे त्यातून दिसतं! आणि ह्या अशा लोकांना मी बऱ्याच वेळेस दाद देखील दिली आहे. परंतु इतरांच्या अशा वागण्यामुळे एकंदर असे होत असेल तर हे ह्या माध्यमाचे मोठे अपयशच मानले पाहिजे!"
आता मला हळू हळू लक्षात येऊ लागले होते. त्याच्या बोलण्यात तत्थ्य नक्कीच होते.
"परंतु ह्या माझ्या स्टेटसमुळे तुम्ही जर माझ्यावर वाट्टेल ते आरोप करणार असाल …. किंवा चला आरोप पण चालतील … पण मी न केलेल्या गोष्टी माझ्यावर खपवणार असाल तर मात्र मला मी फेसबुक वर काय लिहावे ह्याचा विचार करावा लागेल! कारण माझे २०% ऑनलाईन जीवन मी प्रत्यक्ष कसा आहे हे दर्शवत नाही … आणि तुम्ही ते तसं करू ही शकत नाही!"
आणि हळू हळू हा मुद्द्यावर येतो आहे ह्याची चाहूल मला लागली. आणि मी आणि माझ्या मित्राने एकमेकांकडे पाहिले. किंचित हसून आम्ही पुढे ऐकू लागलो.
" गेल्या दोन-तीन वर्षांपासून ज्या एका आणि एकाच गोष्टीसाठी सोशल मिडिया गाजत आला होता तो क्षण शेवटी आला. निवडणूका पार पडल्या आणि त्याचा निकाल आला. आता ह्या दिवसापर्यंत जो तो आपापली बाजू मांडत होता. साहजिक आहे मला ज्या पक्षाची बाजू मांडायची होती ती मी मांडली - कॉंग्रेसची! लोकांना हे कळत नाही की दोन बाजूंपैकी ही एक बाजू आहे. तुम्ही दुसऱ्यावर तो काँग्रसची बाजू घेतो आहे म्हणून विरोध करू शकत नाही ….तर ती बाजू तुम्हाला चूक वाटते आणि पटत नाही म्हणून विरोध करायचा असतो! पण आपल्यातील बऱ्याच लोकांना ही गोष्ट पटत नाही. आपण ज्या बाजूने बोलतोय तीच बरोबर आहे हे असं गृहीत धरून कधीही चर्चा होत नाही. माझं तेच झालं.  बहुतांश लोकं मी काँग्रेसला समर्थन देतो म्हणून मी जे काही लिहायचो त्यावर प्रतिक्रिया द्यायची. परंतु एक सांगतो … मी जे काही लिहायचो ती बातमी खरी आहे की नाही ह्याची खात्री करूनच लिहायचो. एक-दोन वेळेस माझी माहिती चुकीची आहे हे मला कळले तेव्हा मी रितसर माफी देखील मागितलेली.… परंतु हा प्रसंग मी माझ्यावर कधी येऊ दिला नाही. मात्र बऱ्याच वेळेस मी मांडलेल्या मुद्द्यांना उत्तरं द्यायचे सोडून लोक वैयक्तिक टीका जास्त करू लागले. अर्थात मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्याला फार कमी अपवाद देखील होते  … पण बहुतांश लोकं काहीही नीट न वाचता टीका करायचे…. असं करीत बरेच दिवस गेले आणि  निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी मी सहज गेल्या काही वर्षांच्या घडामोडींवर विचार करीत बसलेलो. आणि त्यावर मी एक छोटा लेख लिहिला. आता हा लेख कोणत्याही पक्षाशी किंवा संघटनेशी related नव्हता …. तर त्याचा संबंध मी भारतीय समाजाशी लावला होता. परंतु तिथे देखील तेच झाले. सबंध स्टेटस न वाचता काही ठराविक वाक्यांवर अवलंबून राहून माझ्यावर टीका झाली. इतकेच काय की नवे सरकार अयशस्वी व्हावे अशी माझ्या मनात इच्छा आहे असा देखील निष्कर्ष त्यातून काढण्यात आला", तो हसत हसत हे सारे सांगत होता.
" आणि मग निकालाच्या दिवशी?" मी विचारले.
" निकालाच्या दिवशी … म्हणजे शुक्रवारी … मला ऑफिस होते. त्यामुळे माझा पूर्ण दिवस तिकडे गेला. त्यादिवशी निकाल अगदीच अपेक्षे पलीकडला निघाला … माझ्यामते सर्वांसाठीच! भाजप ला एवढ्या जागा मिळतील हे खरंच अपेक्षित नव्हते. …. आम्ही सारे whatsapp वर त्याबद्दल चर्चा करीत होतोच … आणि माझ्या स्वतःच्या प्रतिक्रिया त्यादिवशी काय होत्या? काँग्रेसचे माजोरडे नेते जे जनतेशी संवाद साधत नव्हते त्यांचा पराभव झाला हे फार चांगलं झालं…. महाराष्ट्रातील power centres पडली हे फार चांगलं होतं इथपासून … अमित शहा ह्यांचे management हे किती कुशल होतं वगेरे स्तुतीच तर करत होतो! अगदी मुक्तकंठाने… त्यादिवशी मी फेसबुक वर केवळ एक स्टेटस टाकला! तो देखील विचार करून … भाजप हा उजव्या विचारसरणीचा पक्ष मानला जातो …. शिवाय त्यांना कॉर्पोरेट फंडिंग खूप आहे … बऱ्याच कॉर्पोरेटना त्यांचे सरकार हवंय वगेरे अशा बातम्या येत होत्या. तर देशाचा मूड हा capitalist झाला आहे का? ह्यापुढे आपला देश कॉर्पोरेट चालवणार का असा सवाल विचारणारा स्टेटस होता तो! … म्हणजे 'हे असेच होईल' असं नव्हतं लिहिलं मी … कारण माझ्यामते निकालाच्या दिवशी असे म्हणणे बरोबर नव्हते… एवढी खबरदारी मी नक्कीच घेतली होती. परंतु ह्या स्टेटस वरच्या कमेंट पाहून मी हैराण झालो.  ' तू तुझ्या नेत्यांप्रमाणेच अपयश पचविण्यात अयशस्वी ठरला आहेस' असे त्यात लिहिले होते. आता ह्या प्रश्नात्मक स्टेटस मध्ये मी काँग्रेसी नेत्यांसारखा कुठे वागत होतो? आणि तेव्हा माझ्या लक्षात आले!"
त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि पुढे बोलू लागला.
" मी इंटरनेट विश्वाच्या बाहेर कसा वागतो, माझी भूमिका काय आहे  हे माहिती नसताना माझ्याबद्दल निष्कर्ष काढायला सोशल मिडीयाचा स्टेटस पुरेसा आहे काय? असे असेल तर सोशल मिडिया माझ्याबद्दल संपूर्ण माहिती देऊ शकत नाही आहे … नव्हे हा त्याचा उद्देशच नाही! त्याचा उद्देश मत मांडणे, चर्चा करणे एवढाच आहे…! म्हणजे मी काहीतरी लिहिणार, त्याचा एक ओळी एवढा भाग कुणीतरी वाचणार आणि त्यावर मला उद्देशून प्रतिक्रिया देणार …आणि त्या प्रतिक्रियेला उद्देशून लोक पुढे प्रतिक्रिया देत बसणार! ह्यातून तयार काय होते तर आपली नसलेली छवी! त्यामुळे ठरवलं की एका अधिक चांगल्या माध्यामाकडे वळावे. लिहिण्यासाठी कुठलातरी वेगळा platform शोधावा… बघतोय त्यामुळे! फेसबुकवर संगीत, साहित्य, व्यक्तीचित्र वगेरे लिहिले तरी चालेल ….सुदैवने ह्या विषयांवर अजून वाद होत नाहीत.... आणि म्हणून मी थोबाडपुस्तकाच्या थोबाडीत मारली ", तो म्हणाला.

" पण तरीही लोक अस म्हणतायत की तुम्ही ज्या व्यक्तीला विरोध करीत होतात तो पंतप्रधान झाला म्हणून तुम्ही फेसबुक सोडलं?"

" हे पहा .... आपल्या ह्या गप्पा झाल्यावर तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा वाटेत भेटलेल्या माणसाला मी सांगितलेलं हेच सांगणार का? ह्याची काही खात्री आहे? ते माझ्या हातात आहे का?"

चहा झाला. आणि आम्ही आमच्या घराकडे जायला निघालो.  
 
आशय गुणे :)    
     
   

No comments:

Post a Comment