Pages

Total Pageviews

Tuesday, December 25, 2012

कारण तो सचिन होता



 ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला  'तो' ह्या विषयावर  बोलता येणार नाही म्हणून  तर कुणाला  'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू!  कुणाला 'पण तो देव नाही आहे...'  असं सारखे  म्हणता येणार नाही म्हणून तर ' तो ग्रेट वगेरे असेल ... पण बाबा लोकांच्या  मागे का फिरतो'  हा आक्षेप घेता येणार नाही म्हणून कडू! आमच्यासारख्या लोकांना मात्र तो आता खेळणार नाही ह्या एकाच कारणासाठी ही बातमी कडू आहे! 


 सचिन केव्हातरी निवृत्त होणार होताच. प्रश्न फक्त आमच्या सारख्या लोकांचा होता जे ह्या बोचऱ्या सत्यापासून सतत लांब पळत होते.  तरी अधून मधून विचार डोकवायचा. पण काही क्षण  हृदयाचे ठोके चुकवून परत जाण्यापलीकडे ह्या विचाराने काहीही केले नाही.  आणि आज मात्र ह्या अनपेक्षित बातमीने धक्का तर दिलाच पण मनात मिश्र भावनांचे वादळ देखील उठले.  उद्यापासून  सचिनला निळ्या जर्सी मध्ये बघता येणार नाही ही कल्पना तरी कशी करायची? २३ वर्ष लागलेली सवय अचानक मोडणार! 'माझं नाव आशय आहे' हे समजण्याची अक्कल आली त्या वयापासून ज्या व्यक्तीचे नाव आयुष्याशी जोडले गेले आहे ती व्यक्ती आता फक्त टेस्ट क्रिकेट खेळताना आणि ते सुद्धा काही दिवसच आपल्याला दिसणार?

कामावर आलो. रात्रपाळी सुरु असताना लॉबी मध्ये सचिनचा विषय निघालाच. आणि साक्षात्कार होत गेला की इतर खेळाडू हे खेळाडूच  आहेत आणि सचिन मात्र  'आपला सचिन' आहे. माझ्या कलीग ने विषयाला वाचा फोडून दिली.
" तुम्हाला सांगतो...आमच्या गावी रेडियो वर आम्ही सामने ऐकत असू. आमच्या गावी ही बोचरी थंडी... अंगावर गोधडी घेऊन रेडियोला  मध्ये ठेऊन गोल करून बसायचो... सचिन जेव्हा चौकी किंवा छक्की मारायचा तेव्हा अंगावरची गोधडी आम्ही हातात घेऊन नाचत नाचत गोल  फिरवायचो! तेवढ्यापुरती थंडी-बिंडी  काही नाही... मग पुढे काय होतंय हे ऐकायला आम्ही परत गोधडी पांघरून बसायचो... थंडी होती ना... काय ते दिवस होते.. " - सचिनसाठी अंगावरच्या थंडीची देखील परवा न करणारा हा माझा मित्र! आणि ते सुद्धा रेडियो वर ऐकताना.. टी . वी बघताना वगेरे नाही!  ह्या खेळाडूने सर्वांच्या मनात घर कसं केलं होतं  हेच ह्या उदाहरणातून दिसून येतं.


 माझे मन लगेच बरीच वर्ष मागे सरकले. १९९३ हे वर्ष असावं. इंग्लंडचा संघ भारतात आला होता आणि त्यातील एक टेस्ट मुंबईच्या वानखेडे स्टेडीयम मध्ये होती. आई- बाबांनी मला क्रिकेटची match दाखवायचे ठरवले.  त्यावेळेस पनवेल वरून लोकल वगेरे काही नसल्याने मुंबईला जाणे कठीण होते. पण तरीही 'आपण आज सचिनला बघणार' हे मला सकाळपासून सांगितले गेले होते आणि त्यामुळे मी आनंदाने तयार देखील झालो होतो. पण स्टेडीयम मध्ये पोहोचेपर्यंत समजले की  सगळी तिकिटे संपली होती! आता काय करणार?  शेवटी बाबांनी एका पोलिस हवालदाराला विचारून बघितले. " मुलगा लहान आहे.. पनवेल वरून आलो आहोत आम्ही... ह्याला सचिनला बघायचंय!" आणि आश्चर्य म्हणजे 'सचिन' हे नाव ऐकल्यामुळे आम्हाला विना तिकीट आत प्रवेश मिळाला! आणि आम्ही तो सामना 'टी - टाइम ' पासून खेळ संपेपर्यंत बघितला. त्यावेळेस मी होतो ६ वर्षांचा आणि सचिन तेंडुलकर ह्या व्यक्तीने खेळायला आरंभ केलेल्याला ४ वर्ष झाली होती.  केवळ ४ वर्षात नावाभोवती हे वलय!  त्या संध्याकाळी सचिन आणि कांबळी खेळत होते. सचिनने मारलेला तो 'कवर ड्राईव' मात्र मला अजून स्वच्छ लक्षात आहे... एखाद्या रंगलेल्या मैफलीत कलाकार चांगली जागा घेतो आणि आपल्याला ती आयुष्यभर लक्षात राहते तसं! आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा तो गजर ऐकला - ' सचिन, सचिन ...( तीन  वेळा टाळ्या)'. त्या अनोळखी लोकांमध्ये ओरडण्यात  मी देखील सामील झालो. आता मात्र  ते त्याच्या नावाने ओरडणं यु -ट्यूब वरच  बघायला मिळेल!
  
लगेच मला एक दुसरे उदाहरण आठवले. आता बऱ्यापैकी इतिहासजमा झालेल्या 'ऑर्कुट' ह्या वेबसाईट वर मी ते वाचले होते.  एका अगदी छोट्याशा खेड्यात तो ऑर्कुटवर लिहिणारा  इसम गेला होता. तिकडे  त्याने पाहिले  की त्या खेड्यात फक्त एका टपरीवाल्याकडे एक छोटा रेडियो होता. त्यादिवशी नेमका  क्रिकेटचा सामना सुरु होता. एक म्हतारा शेतकरी तिकडे आला. तो मुका असल्यामुळे त्याने खुणेने काहीतरी विचारायचा प्रयत्न केला. टपरीवाल्याने सचिन आउट झाल्याचे त्याला सांगितले आणि तो म्हातारा चक्क जमिनीवर पाय आपटत रडू लागला! आणि वरती आकाशाकडे इशारे करीत निघून गेला. टपरीवाला नंतर स्वतः म्हणाला, " ह्या म्हाताऱ्याचे लांब ६-७ किलोमीटर वर शेत आहे. पण क्रिकेटचा सामना असला की केवळ सचिनने किती केले हे ऐकायला तो इथपर्यंत येतो." ही म्हणजे कमाल झाली. ह्या माणसाचा स्कोर ऐकायला ( बघायला नव्हे ) कुणाला एवढे श्रम घेण्यात सुद्धा काहीच वाटत नाही. मला एकदम आठवलं. दुकानात रेडियो सुरु असायचा. येणारी जाणारी लोकं दोन प्रश्न विचारायची. " कितना हुआ?" आणि "सचिन का कितना हुआ?"


असाच एक घरचा किस्सा आठवतो. कुठलासा सामना सुरु होता. सचिन नेहमीप्रमाणे बहरत होता. रात्रीची ९ ची वेळ असेल. तो साधारण ८५-८६ पर्यंत गेला असताना समोरच्या इस्त्रीवाल्याचा मुलगा इस्त्री केलेले कपडे घेऊन आमच्याकडे आला. माझ्यापेक्षा फक्त एक वर्षाने मोठा. त्यावेळेस मी  १२-१३ वर्षांचा असीन. त्याने दारात कपडे देताच टी. वी  वर स्कोर झळकला. सचिन तेंडुलकर - ९०. आता काय करायचं ह्या प्रश्नाने तो मुलगा अस्वस्थ झाला. दुकानात तर टी .वी नाही आणि सचिनचे तर शतक होत आहे! त्याच्या चेहऱ्यावरचा अस्वस्थ भाव माझ्या आईच्या लक्षात आला. आणि तिने त्याला सचिनचे शतक होईपर्यंत घरी थांबायला सांगितले. हे ऐकून प्रथम वाटणारा संकोच समोर सचिन असल्यामुळे निघून गेला आणि तो आमच्या बरोबर सामना पाहत बसला. मात्र ९० चे  १०० होईपर्यंत सचिनला थोडा वेळ लागला. तोपर्यंत आपला मुलगा कुठे गेला ह्या काळजीत इस्त्रीवाला आमच्या घरी आला आणि बघतो तर मुलगा जमिनीवर बसून टी. वी बघतोय! इतकेच नव्हे तर आईने दिलेली बिस्किटे पण खातो आहे. " देखने दो उसको.. सचिन की  सेंच्युरी हो रही  है....", बाबा म्हणाले. इस्त्रीवाला पण थांबला. शेवटी सचिनचे शतक झाले आणि त्याचे भाव टिपण्यासारखे होते! एवढेच काय नंतरची एक ओवर सचिनने मारलेले चौकार एन्जोय करत तो त्याच्या बाबांबरोबर परत गेला. त्यादिवशी आम्हाला सर्वांना खिळवून ठेवणारा घटक हा 'सचिन तेंडुलकर' होता. अशा किती लोकांना - बऱ्याचद एकमेकांना ओळखत नसून सुद्धा - त्याने जोडून ठेवले असेल ह्याला गिनती नाही! बस मध्ये जा, ट्रेन मध्ये जा, टपरी वर उभे रहा, नाक्यावर फेरफटका मारा... त्याचा विषय निघाला की सगळे एकमेकांचे मित्र होऊन जायचे!
   
आठवून बघा ना! तुमच्या शहरातील किंवा गावातील टी. वी शोरूम. सचिन खेळतो आहे. १०० गाठायच्या जवळ आहे. समोर तोबा गर्दी. शोरूम चा मालक पण आनंदाने हे सारे बघू देतोय. आणि शतक झालं की टाळ्या! माझ्या लहानपणापासून मी हे सारे बघत आलो आहे. तुम्ही देखील अनुभवलं असेलच!


आमचे आई-वडील किंवा आजी-आजोबा आमच्या पिढीतील गोष्टींची सतत त्यांच्या पिढीशी तुलना करायचे. अजूनही करतात. म्हणजे, रफी आणि किशोर सारखं तुमच्याकडे कोण आहे? आमच्या पिढीत  लेखक झाले तसा एक तरी आहे का तुमच्यात? सिनेमे, संगीत, अभिनेते, साहित्य, महागाई, शिस्त काहीही घ्या! सगळ्यांची तुलना होते! पण एक घटक आम्हाला ह्या सर्व पिढ्यांशी जोडून ठेवून होता - सचिन. मग चेंबुरला राहणाऱ्या माझ्या एका आजीचे, " सकाळी लवकर उठव ग.. सचिन आला आहे खेळायला ( ऑस्ट्रेलिया आणि न्यू-झीलंड मधल्या त्या सकाळी लवकर उठून बघितलेल्या टेस्ट्स आठवा..).. ", असे माझ्या आईला सांगणे असो किंवा " सचिनची सेन्चुरी झाली", अशी मी शाळेतून घरी येताना दारात उभं राहून माझ्या आजोबांनी केलेली घोषणा असो! मामाकडे गेलो आणि सामना सुरु असेल तर सचिनला दाद देताना माझ्या आजीचे भाव अजून लक्षात आहेत! पण सचिन आउट झाला की आजीला चेहऱ्यावरची नाराजी लपवता यायची नाही! मग किंचित हसून, जराशी मान हलवून ती आत निघून जायची की मग बाहेर यायचीच नाही! आई, बाबा सुद्धा घरी आले की दारातच उभं  राहून टी. वी  कडे बघत . , " सचिन आहे ना ... हुश्श " असं म्हणून त्या क्षणी निश्चिंत होऊन आत शिरायचे. प्रत्येक घरातील, प्रत्येक घटकाच्या आणि प्रत्येक पिढीच्या अपेक्षांचे ओझे वाहत हा माणूस गेली २३ वर्ष स्पर्धा करतो आहे - अर्थात स्वतःशी! आणि ह्या स्वतःची असलेल्या स्पर्धेमुळे तो आज क्रिकेटचा ध्रुव झाला आहे. १३-१४ वर्षांच्या वयापासून प्रोफेशनल आयुष्य सुरु केलेल्या ह्या व्यक्तीला ना कधी मित्रांबरोबर पाणीपुरी खायला मिळाली असेल ना मित्रांबरोबर पिक्चर बघायला जाण्याचा योग आला असेल! प्रसिद्धी मिळाल्या नंतर तर बायकोला साधे फिरायला घेऊन जाणे सुद्धा कर्मकठीण! लोकांसाठी समर्पित आयुष्य हे आतून किती एकाकी असते ह्याचेच हे उदाहरण आहे! अशावेळेस ह्या 'माणसाला' मानसिक स्थैर्य कुठे मिळत असणार? सचिन अमुक एका बाबाचा भक्त आहे ह्यावर त्याचा वारंवार समाचार घेणाऱ्यांनी त्याची ही बाजू जरूर विचारात घ्यावी. 

सचिनला आंतरराष्ट्रीय लोकप्रियता किती लाभली आहे हे देखील आपण अनुभवले आहेच. म्हणूनच तो जेव्हा ऑस्ट्रेलियात खेळायला मैदानात उतरायचा तेव्हा तिकडचे लोक ' you are a legend ' असे कोरस मध्ये गायचे. जगातील प्रत्येक मैदानात तो आला की लोकं उभी राहून टाळ्या वाजवतात. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला आहे. अमेरिकेत असताना मॉटेल मध्ये काम करतानाचा अनुभव घ्या! दोन ऑस्ट्रलियन मुली मॉटेल मध्ये आल्या. बोलता बोलता मी कुठून आलो आहे हे विचारले आणि भारत हे कळताच त्यातील एक एकदम उद्गारली, " Ohh .. from the land of Sachin Tendulkar!" आणि नंतर तिने मला सचिन तिला का आवडतो.. त्याचा खेळ किती 'handsome ' आहे वगेरे सांगितले. ' पण तो आमच्या विरुद्ध खूप चांगला खेळतो...' अशी खंत पण व्यक्त केली! पण शेवटी गंभीर आवाजात हे देखील म्हणाली, " But his conduct ... exemplary !" असाच अनुभव आत्ता सुरु असलेल्या 'Hyatt ' च्या नोकरीत पण आला. एक इंग्लिश पाहुणा घाई घाई ने ऑफिस मधून  IPL चा सामना बघायला आला आणि '  I started my day early today so that I could come back early and watch Sachin bat ' असं आल्या आल्या घोषित केलं! एका दक्षिण आफ्रिकन पाहुण्याने स्वतःच्या मुलाला, " This is Mumbai ...the city of Sachin Tendulkar ' असे सांगितल्याचे आठवतंय! किंवा एकदा एक ऑस्ट्रेलियन पाहुणा बिल भरायला आलेला असताना आणि  मी त्याच्या क्रिकेट टीम ची स्तुती करताना, " But you have Sachin Tendulkar ' असं म्हणाल्याचे स्मरते!  


अशी किती उदाहरणे देऊ? त्याच्या रेकॉर्ड्स बद्दल काय बोलावे? ते तर तो सर्वश्रेष्ठ आहे हे पटवून देतातच. जगाच्या प्रत्येक देशात जाउन आणि प्रत्येक संघाविरुद्ध त्याचे शतक आहे हे मी कितव्यांदा सांगू? त्याच्या कारकिर्दीत सर्वात बलाढ्य असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध त्याचा सर्वात चांगला रेकोर्ड आहे ह्यातच सारे आले! पण हा झाला बऱ्यापैकी 'राजमान्यतेचा' भाग! क्रिकेटचे पंडित ह्या गोष्टीवर बरेच 'चघळकाम' सुरु ठेवतील. खुद्ध विस्डेन आणि ब्रॅडमन ह्यांनी घोषित केले असलं तरीही तो श्रेष्ठ कसा नाही असले 'पुरावे' मांडणारे लोक पण आपल्याला भेटतील! पण तो 'लोकमान्य' कसा आहे ह्याचीच ही उदाहरणं आहेत! मी, वानखेडे मधला तो हवलदार, आमच्या आजी-आजोबांची पिढी, इस्त्रीवाला आणि त्याचा मुलगा, त्या अनोळखी ऑस्ट्रलियन मुली, पान टपरी वर 'स्कोर कितना' असं  विचारणारे आणि सार्वजनिक ठिकाणी 'त्याची' चर्चा करणारे ह्यात काय  समान आहे? तर आम्ही सर्वांनी सचिन अनुभवलाय! आणि त्यात आम्हाला असीमित आनंदाचे दालन उघडे करून  मिळाले आहे! 
         
माझ्याच काय पण त्या वेळेस जन्म झालेले सर्व जण मोठे होत असताना त्याची फलंदाजी साथीला होती. नव्हे, आयुष्यातला एक घटक होती! आमचे वय वाढत होते... तो मात्र तरुण होत होता. वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने २०० धावा काढून  रेकोर्ड बनवले ह्यातच मी काय म्हणतोय ते आले.  माझ्या शाळेतल्या प्रत्येक वाढत्या वर्गात त्याच्या कुठल्या न कुठल्या शतकाची किंवा विक्रमाची चर्चा झाली आहे.  मी १९९६ साली श्रीलंके विरुद्ध वर्ल्ड कपच्या  उपांत्य  फेरीत त्याची एकाकी अपयशी झुंज बघून खूप रडल्याचे आठवते. १९९८ साली सहावीत असताना शारजाला त्याला वॉर्नला नमवताना कसे विसरणार?  मी दहावीची परीक्षा दिली तेव्हा त्याने २००३ च्या वर्ल्ड कप  मध्ये पाकिस्तानला नमवून अख्तर, अक्रम आणि वकार ह्या तिघांना लोळवले. २००५ मध्ये बारावीत असताना पाकिस्तान मध्ये जाउन तिथे ठोकलेली शतकं  विसरणं तर निव्वळ अशक्य!  अशी किती उदाहरणं  देऊ? कुठल्याही सामन्यात तो खेळला, त्याचे  शकत झाले की संध्याकाळी बिल्डींगच्या खाली क्रिकेट खेळताना आम्ही अधिक प्रसन्न आणि अति उत्साहात असू!  आम्हीच काय, सगळ्या देशाची अशी परिस्थिती होती! म्हणूनच अमिताभ बच्चन म्हणतो ना - " जेव्हा सचिन खेळतो तेव्हा बँकेचा कॅशियर सुद्धा खुश असतो आणि आपल्याशी चांगला व्यवहार करतो." पानवाल्याच्या टपरीवर कुणी स्कोर विचारी, " सचिन का कितना हुआ?" तेव्हा शंभर हे उत्तर असले तर उत्तर देणाऱ्या पानवाल्याचे आणि ते ऐकणाऱ्याचे एक्स्प्रेशन्स आठवा! असा सर्वांना आनंद देणारा कलाकार होता हा! हो, कलाकारच! कारण, जसे पु. लं  म्हणतात की , ' १००% लोकांना एकाचवेळी दिव्यत्वाचा साक्षात्कार करून देते ती कला!'


आणि कला हरण्याच्या आणि जिंकण्याच्या पलीकडे असते. त्यामुळेच बघा ना! भारत हरला आणि सचिनने शतक मारलं तरी आत मनातून  'तो खेळला' ह्याचे समाधानच  आपल्याला वाटत आलेलं  आहे. कारण त्याचे खेळणे ही  निव्वळ एक आनंदाची स्थिती होऊन जाते. त्याच्या इतके प्रेम त्यामुळे इतर कुणालाच मिळालेले नाही. आणि मिळेल असे वाटत देखील नाही. कारण तो सचिन होता!   


- आशय गुणे :)

Wednesday, December 5, 2012

A Letter to the Prime Minister

This article was published in 'Viewspaper' - the leading online youth paper. Glad to share it here...
 


6, Shri Balaji Society,
Pioneer Area,
Panvel – 410206
Maharashtra

Dear Mr. Prime Minister
My chest swells with pride as I write to a leader of your stature and also to the leader of the largest and arguably, one of the most diverse democracies of the world!

I was born in 1987 and started my life much around the same time when you opened up the economy of this country. And that is the reason I relate my growing up with the growth of this country. Having lived in a bubbling town near Mumbai, I have witnessed the landline telephone getting installed in my house as well in all the houses around me! I have seen multi-national brands setting their feet in this country. I saw the decline of bicycle riders and the surge of motor cycles and two-wheelers on the streets.  As I grew up I saw my little town setting its sight to become a city and cities setting their aims for a Metropolis!

However in this rapid surge towards development we also experienced an extreme neglect in terms of city/ town planning. Haphazard acquisition of land resulted in a complete mismanagement in terms of housing projects. Buildings were constructed almost everywhere, at times forcing the roads to be trimmed! Many open spaces were hijacked. Playgrounds vanished. Gardens are on the verge of getting extinct! The landscape of the city today mostly constitutes vehicles parked on both sides of the road. A poorly planned and carelessly space-crunched city – this was not the concept of the city/ town with which we grew up!  The cities in most of the developed countries are planned to the extent of having lawns along the road side, along the buildings and around every possible raised structure.  These lawns help in absorbing the dust in the air and as a consequence further help in keeping the air clean! Unfortunately in our country, this is not the case. A large quantity of dust always occupies the Indian landscape. A frequent construction activity, owing to the developing nature of the cities, adds a heap to this every minute. An average urban Indian commuter is thus exposed to dust every single minute he spends on the road. As a result, we are generating a tired workforce for the nation. Lack of proper infrastructure adds to the exertion! Is the Indian workforce more tired and health-compromised than the other counterparts?  If we wish to increase the productive output of this country, we should not compromise with the health of the country’s workforce! Unfortunately in India and especially in the cities, the workforce at the end of the day is a tired lot. On the other hand, a constant decline in the playgrounds and gardens of the city would result in discouraging the attitude of sports in the children. How strange would it be for a kid to practice in an indoor sports academy and all of a sudden represent his country in an outdoor stadium? A growing city should have enough lawns, gardens, libraries, playgrounds, auditoriums. However what we are seeing in our city is a surge in housing projects and nothing more than that! I first request to you, Honourable Prime Minister, is to look into generating planned cities. How will a city without playgrounds, gardens, libraries, auditoriums, museums contribute in the all round development of its citizens? It will just be, I am afraid, a hub of monetary transactions!

As I grew up, I must admit, there was a huge change in the connectivity across cities. A journey from my place to Pune began taking 3 hours from the previous duration of 4-5 hours. Train services improved. And we began going places. Our visits were not only restricted to nearby cities for a cool vacation but they also included some distant villages. Our textbooks said that India’s life lay in its villages! But the experience of village life in most (if not all) villages was that of a delusion, disappointment and utter embarrassment! Whenever our car approached a steep turn, I could see some hurried movement of people around that turn. A close look at those people made us realize that they were defecating in public! My head hung in shame when I conversed with one of villager about this. There is no adequate toilet facility in most of the villages in India. And even if they have some, no drop of water is made to reach those. Bluntly speaking, these villagers pray that no vehicle negotiates ‘that turn’ during their turn. And this ‘alertness’ is a part of their life now!  One of your ministers rightly said that India needed more toilets than temples. But he was criticized for hurting the sentiments of people in India, making it clear how this issue is handled in India! This example is just a start to stress on the extreme urban-rural divide this nation faces today! And this is my second request to you, honourable Prime Minister! Bridge the gap between these two Indias!

We entered college when there were talks of India becoming the next big thing in the world!  These talks made us happy. We felt proud of the stature this country was going to attain after 60 years of its independent existence!  India had a global presence. The World listened to her voice. Our brands bravely acquired foreign brands. Our industrialists expanded their bases and crossed the Indian shore. However, we at college were clueless about how we could contribute in this modern India! Colleges and Universities for us continued to be ‘degree- churning’ institutes and places where the education we took was in no relevance to the existing market around us!  Every talk of higher studies made us think of either the United States or the United Kingdom! Australia and Russia also entered the Indian higher education landscape but we never believed in our own country – neither have we done it now! Also, a scarcity of quality research institutes and a lack of innovative education and research exposure at the college level is the main reason for this brain drain! Like my fellow countrymen, I too wonder how India could be called a superpower when most of its talent pool is not in the country. Current superpowers do not have their talent outside the nation, do they? In fact they attract a lot of talent from outside. When will India reach this stage? Or is India destined to become a superpower based on its purchasing power and per capita consumption san the innovation and talent? Ground level reform in the education system is thus my third request to you!

And today as youth of this country, we see a second phase of transition in India. Your government is soon to allow 49% FDI in India. A second wave of economic reforms will sweep the nation. Will India be more globalized? Will the landscape of Indian market change completely? While the details of economics are not known to commoners like me, I am aware that most of the Indian population still thrives on the local market. This market, though at times largely unregulated as per market standards otherwise, has been a support system for the nation since time immortal! Breaking this will result in breaking the backbone of this country. Moreover, the world has seen a collapse of the middle class in the developed countries due to exceeding ‘global tending’ policies! And we would definitely not want that to happen in this country. Imagine the country with only the ‘haves’ and the ‘have nots’!  Hence I request you, Mr. Prime Minister, to have a global – local equilibrium in all the economic policies henceforth. Because it is ‘now or never’ for India in this phase of transition! And I have faith in the economist in you.

I am aware that the points I have presented cannot magnify to the larger picture of the problems of this country. But I am sure, we all will relate these problems somewhere to the problems we encounter daily.


Jai Hind !

Aashay Gune


This article can also be viewed at : http://theviewspaper.net/aashay-gune-writes-a-letter-to-prime-minister/

डॉ . प्रभुणे

ही  कथा 'मायबोली' ह्या दिवाळी अंकात (online) प्रकाशित झाली होती! 

बरोबर एक मोठा बुके आणि थोडी चॉकलेट्स घेऊन मी, माझी पत्नी, आणि माझा ८ वर्षांचा मुलगा ड्राईव करत चाललो होतो. बाल्टिमोर काऊंटीमधील शांत परिसरात गाडी वेगात पळत होती. तितक्याच वेगात आमचा उत्साह आणि आनंद देखील वाहत होता. प्रसंगच तसा होता. नुकतेच नोबेल पारितोषिक विजेते घोषित झाले होते. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जगातील मान्यवरांची ओळख हळू हळू होऊ लागली होती. अमेरिकेत जे थोडे लोक पेपर वाचतात, त्यांच्यात आम्ही देखील असल्यामुळे रोजचे लेख आम्हाला काय ती माहिती पुरवीत होते. ह्या सार्‍या यादीत एका त्रिकुटाचा समावेश होता. हे त्रिकुट होते शास्त्रज्ञांचे. जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीमधील मेडिकल सायन्स शाखेतील एका मोठ्या प्रयोगाने मागच्याच वर्षी जगाचे लक्ष वेधून घेतले होते. मानवी शरीरातील पेशींमधील (cells) 'डीएनए'वर हे संशोधन होते. पेशींच्या एका विशिष्ठ भागात, ज्याला न्युक्लिअस म्हणतात, हे डीएनए असते. या डीएनए चे प्रोटीन नामक सत्वात रुपांतर होते आणि पुढे हेच प्रोटीन आपली शारीरिक वाढ किंवा जडणघडण होण्यास कारणीभूत ठरते. परंतु इतके दिवस पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असू शकते याचा कोणालाच पत्ता नव्हता. शास्त्रज्ञांच्या या त्रिकुटाने एका मोठ्या प्रयोगाची मदत घेऊन हे शोधून काढले की पेशींच्या अन्य भागात देखील डीएनए असते आणि त्याचे रुपांतर शरीरातील महत्त्वपूर्ण प्रोटीनमध्ये होते. या त्रिकुटात एक भारतीय नाव झळकल्याचे आमच्या ऐकण्यात आले होते. आणि सहज त्या दिवशी पेपर उघडला तर काय आश्चर्य! दोन अमेरिकन शास्त्रज्ञ मंडळीत एक नाव "तिचे" होते. लगेच येणार्‍या शनिवारचा मुहूर्त धरला. ( इकडे मुहूर्त ही कल्पना म्हणजे विकेंड! आणि केवळ विकेंडच..) आणि आम्ही सारे तिच्या घरी तिचे अभिनंदन करायला निघालो.

सहा वर्षांपूर्वी शिकागो सोडून आम्ही बाल्टिमोरला स्थाईक झालो. नवीन शहरी जातानाची एक सवय अमेरिकेत पाऊल ठेवल्यापासून कायम होती. तिकडे असलेल्या भारतीय लोकांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळवायची. आपला एकूण देश अनेक राज्यात विभागला गेल्याचे आपल्या भूगोलाच्या पुस्तकानेच लहानपणी मनात ठसवल्यामुळे या भारतीयांमध्ये मराठी कोण हे सुद्धा बघणे आलेच. आमचा मुलगा, त्याचा जन्म इकडे झाल्यामुळे अनेक 'रंगांमध्ये' लीलया मिसळू शकत होता! आमचे तसे नव्हते. तर सहज लिस्ट चाळत होतो तर हिचे नाव त्यात! नाव वाचून आश्चर्याचा धक्काच बसला. हीच का ती ह्याची खात्री करायला इ-मेल पाठवला तर तीच निघाली! आणि मुख्य म्हणजे तिने मला ओळखले होते. बाल्टिमोर मध्ये कधीही येशील तेव्हा घरी ये असा संदेश तिने लगेच पाठवला! आणि पुढे वाचले तर 'सिनिअर सायंटिस्ट, जॉन हॉपकिन्स' असे तिचे डेसिग्नेशन वाचले तेव्हा थक्क झालो! खूप प्रगती केली होती तिने. स्वतःचे क्षेत्र गाजवले होते!

वास्तविक मी हिचा विद्यार्थी. बायोटेक हे क्षेत्र भारतात नवीन आले तेव्हा ह्यात खूप स्कोप आहे असे ऐकून आम्ही त्यात उडी घेतली होती. दुसर्‍या वर्षी शिकत असताना ही आमच्या कॉलेज मध्ये शिकवायला जॉईन झाली. पीएचडी संपवून आणि थोडा फार रिसर्च करून ती प्रोफेसर म्हणून रुजू झाली होती. तिचे वय तेव्हा २६ होते. एक अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय प्रोफेसर अशी तिची ख्याती होती. त्यामुळे आम्हा मुलांचं (आणि मुलींचं सुद्धा!) तिच्याशी काही फार जमायचं नाही. मुली देखील तिच्या समोर नोट्स काढायचा आव आणत असल्या तरी तिच्या मागे (आणि मागेच!) तिचा समाचार घ्यायच्या. काही मुलांची तर तिच्याशी वादावादी झाली होती. वर्गात जोरजोरात भांडण होणे बाकी ठेवले होते काहींनी! हिने तिच्या आयुष्यात शिस्तीला खूप महत्त्व दिले होते पण आमच्यावर ती शिस्त लादताना गफला व्हायचा!

"हिचे अजून लग्न झाले नाही ना! म्हणून ही सदैव रागात असते... हिला कुणीतरी नवरा आणून द्या रे!" - तिच्या शिस्तप्रिय स्वभावाचे आणि तो आमच्यावर लादल्याचे खापर तिच्या अविवाहित राहण्यावर फोडले जायचे. तिचा विषय निघाला की हे वाक्य हमखास बोलले जायचे. संभाषणात सर्वप्रथम तिच्या उच्च शिक्षणावर जोर दिला जायचा. आश्चर्य व्यक्त केले जायचे... क्वचित आदरभाव सुद्धा! पण तिचे लग्न नाही झाले ह्या विषयावर येऊन सगळं संपायचं! काळजीच होती जणू सार्‍या मुलांना हिच्या लग्नाबद्दल! पुढे आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि आमच्यापैकी बर्‍याच लोकांना असा साक्षात्कार झाला की आम्ही निवडलेल्या क्षेत्राला अजिबात स्कोप नाही! आणि सर्व क्षेत्रांचा शेवट ज्या एका पदवीने होतो तेच आम्ही केले - एमबीए! पुढे नशीबाने चांगले दिवस दाखवत एक चांगली नोकरी दिली. आणि त्याचे पेढे द्यायचे म्हणून मी आमच्या या आधीच्या कॉलेज मध्ये गेलो. तेव्हा समजलं की ही अमेरिकेला जायचे म्हणून प्रोफेसरगिरी करून पैसे जमवत होती. पोस्ट-डॉक करण्यासाठी. आम्ही थक्कच झालो होतो!

"अजून किती शिकायचे माणसाने! आता बास ना", इथपासून, "लग्न काय अमेरिकेत जाऊन करणार काय? नक्कीच कुणीतरी गोरा पकडेल... दिसते तर माल एकदम" इथपर्यंत सारी वाक्यं बोलली गेली होती.
अजून काही वर्ष गेली आणि मला अमेरिकेत पाठवले गेले. २८ व्या वर्षी ही संधी आल्यामुळे घरचे एकदम खुश होते. आता मला कुणीही मुलगी देईल ही त्यातली एक भावना. आणि झालेही तसेच. लग्न करून मी अमेरिकेत गेलो.

बाल्टिमोर मध्ये आल्यावर लगेच काही हिची भेट झाली नाही. तिकडच्या महाराष्ट्र मंडळात गेलो तेव्हा मात्र तिच्याबद्दल थोडे ऐकले. "तिचे काय... नाव भारतीय आहे फक्त... बाकी काय भारतीय आहे तिच्यात?" असे एक वाक्य एका गृहस्थाने बोलून दाखवले होते आणि सर्वांनी एकमताने हसून त्या माणसाला दाद दिली होती. ती ज्येष्ठ शास्त्रज्ञ असल्यामुळे खूप व्यस्त असायची. त्यामुळे आल्यापासून २-३ आठवडे काही भेट होऊ शकत नव्हती. शेवटी तिनेच एकदा रविवारी बोलावले. आणि जवळ जवळ १५-१६ वर्षांनी डॉ. सुलभा प्रभुणे हिला भेटलो. जवळ जवळ ४५ वर्षांच्या डॉ. प्रभुणे मध्ये लक्षणीय बदल झाला होता. पंधरा वर्षांपूर्वी खांद्यापर्यंत येणार्‍या केसांचा बॉय-कट झाला होता. चेहर्‍यावरचा चष्मा जाड भिंगांचा झाला होता. केस बर्‍यापैकी पिकले होते. आणि चेहरा थोडासा का होईना सुरकुतलेला दिसत होता. तिची इकडची प्रगती ऐकून आणि पंधरा वर्षांनी परत एकदा थक्क होऊन मी घरी गेलो. पोस्ट-डॉक करायला आलेल्या तिने खूप चांगला परफॉर्मन्स देऊन आणि अनेक रिसर्च पेपर प्रकाशित करून बढती मिळवली होती. आणि ५ वर्षांपूर्वी स्वतःची प्रयोगशाळा सुरु केली होती.

"मग, या कधी आमच्याकडे!" मी म्हणालो. "या म्हणजे कोण आता?" तिने एकदम विचारले. "म्हणजे तुम्ही सगळे..." मी पुढे बोलणार इतक्यात तीच म्हणाली. "फॅमिली वगेरे कुणीही नाही इकडे... मी एकटीच राहते... मी लग्न नाही केलं!" थक्क होण्याचे कारण फक्त तिचे उच्च शिक्षण एवढेच नव्हते हे वेगळं नको सांगायला!
आल्यापासून ३-४ वर्षात मी मात्र जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस तिला विकेंडला घरी बोलवायचो. ओळख अजून वाढू लागली. आणि ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये कसे झाले कळले देखील नाही. इतके दिवस 'अहो-जाहो' करणार्‍या मला शेवटी तिने 'अरे-तुरे' ने हाक मारायला सांगितली. कॉलेज मध्ये तशी हाक आम्ही मारत होतोच... अर्थात तिच्या पाठीमागे. आता मात्र तिला अशी हाक मारायची परवानगी खुद्द तिनेच दिली.

क्वचित कधीतरी ती महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना किंवा माझ्या घरी ठेवलेल्या कार्यक्रमांना यायची. तेव्हा सुद्धा स्वारी एकटीच. जास्त कुणी तिच्याशी बोलायचे नाही. मंडळाचे कार्यक्रम झाले की ही एकटीच निघून जायची. मी माझ्या मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यात उभा असलो तर आमच्यात न येता एकटीच घरी जायची. जर मी एकटा असलो तर मात्र मला भेटून, चार शब्द बोलून घरी जायची. क्वचित हिच्याशी आणि माझ्या मुलाशी पण बोलायची. पण एकूण सगळं एकट्यानेच! खरं तर तिचे रुटीन खूप व्यस्त असायचे. सकाळी लवकर लॅबमध्ये जायची. आणि रात्री यायला ९-१० वाजायचे. कधी कधी विकेंडला पण जावे लागायचे. त्यामुळे एकूण बिझीच!

दरम्यान मला हिच्याबद्दल जे मत ऐकायला मिळत होते ते काही फार चांगले नव्हते. बाल्टिमोर काऊंटी मध्ये बर्‍याच वर्षांपासून राहणार्‍या एका गृहस्थाने हिला म्हणे वेगवेगळ्या गोर्‍या लोकांबरोबर फिरताना बघितले होते. लेट-नाईट पार्टी करताना ती बर्‍याचदा दिसली होती. हिच्या घरी बर्‍याचदा कोणीतरी यायचे. मला देखील हिच्यापासून सावध राहायला सांगितले गेले. मुलांना तर लांबच ठेवा असा पण सल्ला देऊन झाला होता! ही बाई एकेकाळी माझी शिक्षिका होती ही गोष्ट मी ह्यांच्यापासून लपवून ठेवली होती. तिने सांगायचा तर प्रश्नच नव्हता! तिच्याशी बोलताना एवढे सुद्धा समजले होते की ही बाई बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा भारतात गेली होती. तिने सांगितलेले साल म्हणजे ती साधारण ३३ वर्षांची वगैरे असली पाहिजे. त्यानंतर आजच्या दिवसापर्यंत काही ती भारतात गेली नव्हती. भुवया उंच करायला लावणारी केस होती हिची हे मात्र खरं!

मी इकडे आल्याच्या वर्षभरातच तिची स्वतःची प्रयोगशाळा सुरु झाल्यामुळे तिकडे होणार्‍या गोष्टी माझ्या कानावर यायच्या. आणि खूप वर्षांपूर्वी पदवी बायोटेक मध्ये मिळवल्यामुळे तेव्हा असलेल्या शिक्षिकेकडून त्याची उजळणी देखील होत असे. तिचे विचार संशोधनात अंमलात आणण्यासाठी एक चांगली टीम तिच्याकडे होती. पीएचडी करायला आलेले विद्यार्थी हुशार होतेच शिवाय पोस्ट-डॉक वाले लोक सुद्धा खूप मेहनती आणि सर्जनशील होते. त्यामुळे संशोधनातील हिच्या विचारांना चांगले पाठबळ होते. आणि त्यामुळे परिणाम चांगले मिळायचे. डॉ. प्रभुणे हे एक प्रभावी नाव झाले होते. दर वर्षी रिसर्च ग्रँट मिळणार्‍या शास्त्रज्ञ मंडळींमध्ये हिचे नाव होते. पण आमच्या लोकांकडून एकूण हिच्या कामगिरीची तेवढी दाखल घेतली जायची नाही एवढे मात्र खरे. कुठल्यातरी गाण्याच्या किंवा वाजवण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन जिंकलेल्या लोकांचा सत्कार होत असे. मात्र मी ३ वेळा सत्कारासाठी हिचे नाव पुढे केले तेव्हा तिन्ही वेळेस मला वेड्यात काढून तो प्रस्ताव फेटाळण्यात आला होता!

मात्र तिच्यामुळे जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटी बघायची संधी मात्र मिळाली. नुसती नाही तर अगदी आतून. एरवी, जगाला जवळ जवळ ४० नोबेल पारितोषिके मिळवून देणारी ही 'पवित्र' वास्तू अगदी आतून बघायचे भाग्य कुणाला मिळेल? सतत काहीतरी नवीन शोधण्याच्या मागे असलेले हे इथले शास्त्रज्ञ बघितले की आपण एका वेगळ्याच विश्वात आहोत ह्याची नक्कीच खात्री पटते! बाहेर जगात काय चालले आहे ह्याची फारशी पर्वा न बाळगता, एकाग्रतेने इकडे काम सुरु असते. सतत त्याच विश्वात राहून आणि त्याच विश्वात राहण्यासाठी पोषक अशा वातावरणात नांदून उत्कृष्ट शोध लागतात! आणि त्यामुळे एका अर्थाने जग चालते. ती पण त्याच जगातली. भारतातून एक ध्यास मनात बाळगून आली होती. आणि तिने ठरवलेल्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल केली ह्यावर, मिळालेल्या नोबेल पारितोषिकाने शिक्कामोर्तबच केले होते!

घराची बेल वाजवली. आणि पुढच्या अर्ध्या तासात एका आश्चर्यचकित करणार्‍या उत्तराला मला सामोरे जावे लागले. बुके दिला. आनंदाने चॉकलेट्स देखील दिली. आणि अभिनंदन करणे सुरु केले. बोलताना पुढे म्हणालो. "घरी फोन केलास की नाही? खूप खूष असतील ना सगळे?" उत्तर निर्विकारपणे नाही असं आल्यावर मात्र मी एकदम आश्चर्य व्यक्त केले. आणि "फोन कर गं" असं तिला एक-दोनदा सांगितले. शेवटी तीच म्हणाली.
"मी माझ्या घरच्यांशी संबंध तोडून टाकले आहेत. त्यांना माझ्या यशाविषयी किंवा एकंदर आयुष्याविषयी काहीही घेणंदेणं नाही!"
"अगं पण का? असं कसं?"
TichiKatha.gif
"हो मग काय... त्यांना काहीच पडलेली नाही. मी त्यांच्यासाठी मेले आहे. भारतात अजून पुरुषच शास्त्रज्ञ होत असतात. सर्वांचा विरोध पत्करून मी इकडे पोस्ट-डॉक करायला आले. बाबांनी शेवटी एका अटीवर परवानगी दिली. २ वर्षात घरी परत येऊन लग्न करायचे. दोन वर्षाच्या पोस्ट-डॉक ने काय होणार आहे? ती तर शास्त्रज्ञ बनण्याची सर्वात पहिली पायरी आहे... त्यांना कुठे माहिती होते की पोस्ट-डॉक निदान पाच वर्ष केलं की पुढे असोसिएट प्रोफेसर होता येतं... आणि मग पुढे बढती मिळवत मिळवत सायंटिस्ट होतो माणूस! भारतात एवढेच वाटते की पीएचडी केली की माणूस शास्त्रज्ञ होतो! त्यामुळे... ह्या असल्या प्रस्तावाला काहीही अर्थ नव्हता... मला शास्त्रज्ञ व्हायचे होते... आणि मी अजिबात भारतात गेले नाही. परंतु काही वर्षांनी एकदा मी सर्वांना भेटायला परत घरी गेले... तेव्हा माझ्या नावावर ४ रिसर्च पेपर होते... आणि नामांकित जर्नल्स मध्ये माझे नाव छापून आले होते. मला हे सर्व घरी सांगायचे होते... पण घरी गेले तर ... लग्न... लग्न आणि केवळ लग्न! जर्नल वगैरे ठीक आहे... पण आता लग्नाचे बघा जरा, अशी सूचना मिळायची. नातेवाईकांमध्ये ह्याच्या आधी मुलगी किती हुशार आहे म्हणून मला मिरवले जायचे... पण आता त्यांच्याकडून सुद्धा लग्न करा लवकर... अशा सूचना!! शेवटी बरीच भांडणं करून... मी परत इकडे आले... ह्यावेळेस मात्र खूप त्रासले होते. वैतागले होते... रागावले होते. कुणालाच माझ्या कामाची कदर नाही हे मी जाणले होते... आणि त्याचाच सर्वात जास्त त्रास होत होता! त्यामुळे सुरुवातीचे काही महिने रिसर्च मध्ये लक्ष नव्हतं लागत... रिझल्ट नव्हते येत... कधी कुणी कौतुक केले की घरी सांगावेसे वाटायचे...परंतु ... काहीही उपयोग होणार नव्हता हे देखील माहिती होते! दरम्यान मला थोडेफार समजून घेणारे माझे कलीग्स होते माझ्या बरोबर... त्यांच्या बरोबर वेळ चांगला जाऊ लागला... ते मला समजू शकत होते... कारण ते सुद्धा शेवटी शास्त्रज्ञ होते... आणि ह्या एकटेपणाला सरावले होते. त्यामुळे त्यांच्यापैकी एकाशी मी काही वर्ष रिलेशनशिप मध्ये पण होते... काही वर्ष परत एकटीने घालवली... परत एक कलीगशी ओळख वाढली... तो माझ्याने १५ वर्ष मोठा होता... परंतु मला समजून घ्यायचा... रिझल्ट आले नाही आणि मानसिक ताण वाढला की प्रोत्साहन द्यायचा... जवळ जवळ वर्षभर आम्ही एकत्र होतो... पण नंतर तो देखील पुढे दुसरीकडे निघून गेला... आम्ही आहोत अजून टच मध्ये म्हणा...! पण एवढ्यात झाले काय... की बाल्टिमोर मध्ये आमच्या ओळखीच्यांच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत... त्यांनी कुणामार्फत तरी हे सारं घरी सांगितलं! बर्‍याच वर्षांनी घरून फोन आला... मी उचलला तर हे ऐकायला आलं... तुला असले धंदे करायला पाठवले नव्हते अमेरिकेत... पुन्हा आम्हाला तोंड दाखवू नकोस... तू आमच्यासाठी मेलीस! ज्या लोकांना मी केलेल्या कामाचे कौतुक नाही... केवळ निंदाच करता येते... त्यांच्याशी मी तरी संबंध का ठेवू? परिस्थितीने मला अजून कठोर बनवले... आज मिळालेले नोबेल मी माझ्या परिस्थितीला समर्पित करते!"

घरी आलो होतो. बायको मुलाला झोपवून स्वतः कधीच झोपून गेली होती. माझ्या मनात मात्र विचारचक्र सुरूच होते. एका साच्यात आयुष्य जगणार्‍या आपल्यासारख्या लोकांना कळेल का हिची व्यथा? माणसाने शिकावे, मोठे व्हावे, योग्य त्या वयात लग्न करावे, संसार सुरु करावा... सर्व मान्य! परंतु हे आयडियल जगणे झाले. प्रोटोकॉल प्रमाणे! उद्या जर कुण्या एका ध्येयनिष्ठ व्यक्तीने एक अद्वितीय काम करण्यासाठी ही चौकट ओलांडली तर? त्या कामात झोकून देताना हे नियम बाजूला सारले तर? मनाने तो सज्ज होईल देखील! पण त्या वयात असलेल्या शारीरिक गरजा? किंवा कुणासमोर आपण केलेले काम व्यक्त करण्यासाठी त्यावर अवलंबून राहावे लागले तर? त्यातून रिलेशनशिप्स निर्माण झाल्या तर दोष कुणाचा? आणि ह्याला केवळ दोष मानून त्या माणसाला नाकारायचा अधिकार आपल्याला आहे? त्याला वाईट ठरवून वाळीत टाकणारे आपण कोण? घड्याळाच्या काट्याप्रमाणे जीवन जगणारी माणसं! त्यांना वेळ काळ झोकून काम केलेल्या लोकांबद्दल का असेल मग आस्था? इतर लोकांसाठी माहिती नाही... पण डॉ.प्रभुणे माझ्या नजरेत एकदम वरच्या शिखरावर आहे. स्वतःचे ध्येय प्राप्त केलेली एक यशस्वी स्त्री!


 (काल्पनिक)



-आशय गुणे


This story can also be read here:  http://vishesh.maayboli.com/node/1228

Image Credits: 'Maayboli - http://vishesh.maayboli.com/node/1228 

Monday, December 3, 2012

फिझिओथेरापिस्ट - भाग २


नीलमची डॉ. नीलम झाल्यापासून तिची ओळख आणि कदर ह्या दोन्ही गोष्टी वाढल्या होत्या. आता ती आमच्यात मिसळू लागली होती, गप्पा-गोष्टीत सामील होऊ लागली होती, चर्चा करू लागली होती आणि भारतातील ताजे किस्से देखील सांगू लागली होती. ( ती तशी हल्लीच भारताहून आली होती त्यामुळे देशात नेमके काय सुरु आहे हे तिच्याकडून ऐकण्यात मजा यायची.) सुरुवातीला एकटीने दिवस काढणाऱ्या नीलमला आता बोलायला माणसं मिळाल्यामुळे ती अगदी भरपूर बोलायची. कधी कधी दुसऱ्याचे वाक्य तोडून स्वतः मध्येच बोलायला लागायची आणि तिला हे लक्षात येताच खजील होऊन माफी मागायची. ग्रुप मध्ये राहणारी मंडळी इथलीच. त्यामुळे त्यांना तिची मनःस्थिती समजत होती. त्यामुळे ह्या सर्वांना त्याचे काहीच वाटायचे नाही. उलट, हसून सोडून द्यायचे सगळे! साधारण भारतीय ( मराठी म्हणूया आपण हवं तर..) ग्रुप्स मध्ये बोलले जाणारे विषय
आम्ही बोलायचो. त्यात राजकारण, क्रिकेट, भारतीय लोकांचं भारताबाहेर वागणं ( ह्यात प्रत्येकाकडे त्यांचे सोडून इतर सर्व भारतीय लोकांच्या बहुतांश वाईटच अनुभवांचे गाठोडे उघडले जायचे!) , संगीत,
महाराष्ट्र मंडळ ( आणि त्यातले रुसवे-फुगवे...) , नवीन सिनेमे, भारतीय सण, खाद्यपदार्थ आणि साजरे केलेले वीकेंड्स हे विषय प्रमुख्याचे. त्यातून ज्या कपल्स ना नुकतेच मुल झाले होते त्यांची ह्या मुला/मुली बद्दलची असंख्य कौतुकं आमच्या वाटेला यायची. त्यातून एकीच्या मुलाने काहीतरी करून दाखवले हे 'माझ्या मुलाने केव्हाच केले होते' असे सांगण्यात काही माता रमायच्या! पण ह्या साऱ्यांमध्ये डॉ. नीलम तिच्या मतांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घ्यायची. तिचे तरुण असल्यामुळे नवीन विचार बरीच वाहवा मिळवून जायचे.
मला आठवतंय, तेव्हा नुकताच क्रिकेटचा वर्ल्ड कप संपला होता आणि तो भारताने जिंकला होता. तेव्हा डोक्यावरचे केस पांढरे आहेत ह्याची साक्ष पटवून देणारे एक विधान ग्रुप मधल्या एका गृहस्थाने केले. " झाला वाटतं वर्ल्ड कप... आता मात्र त्या तुमच्या तेंडुलकर ने रिटायर व्हावे!" एवढे वाक्य पुरं व्हायच्या आधीच नीलम पेटून उठली. आणि तिने शेवटपर्यंत असे काही मुद्दे काढले की बोलणाऱ्या गृहस्थाला आपले विधान मागेच घ्यावे लागले! असाच एकदा 'आपल्या लोकांना शिस्त नाही' हा सर्वांचा आवडता विषय सुरु होता.
विषय रंगात आला होता. तेच ते नेहमीचे, आपण रस्त्यावर एका लेन ने कशी गाडी चालवत नाही इथपासून सार्वजनिक ठिकाणी आपण कसे आवाज कमी न करता बोलतो इथपर्यंत साऱ्यावर चर्चा झाली! इथे देखील डॉ. नीलम ने आपली मतं सांगायला सुरु केली.
" मला असं वाटतं की आपल्या बेशिस्ती चे मूळ आपल्या रोजच्या दिनक्रमात आहे. आपल्यापैकी किती लोक सकाळची सुरुवात लवकर उठून करतात? माझ्या पाहण्यात तरी इकडे फार म्हणजे फार कमी भारतीय लोक सकाळी लवकर उठताना दिसतात. भारतातले तर विचारूच नका.... त्या उलटं तुम्ही चाइनिज़, जपानी किंवा अमेरिकनच बघा ना! आमच्या शेजारी दोन चीनी विद्यार्थी राहतात... दुपारी १२:३० म्हणजे १२.३० ला जेवण झालेच पाहिजे. सकाळी लवकर उठून नाश्त्याच्या वेळेस नाश्ता होतो...आणि पुढे सारा दिनक्रम व्यवस्थित! इकडचे भारतीय विद्यार्थी जेवढे माझ्या ओळखीचे झालेत ...सर्व १० ला उठतात.... मग नाश्ता....दुपारचे जेवण ३ च्या सुमारास... आणि रात्री उशीरा पर्यंत कॉलेजच्या lab मध्ये काम करत बसतात... मग उशिरा झोपल्यामुळे परत दुसऱ्या दिवशी उशिरा... ..अहो, पण का? विशालला सुद्धा हि वाईट सवय आहे...रात्री रात्री पर्यंत कंपनीत बसावे लागते...मान्य....पण दिवसाची सुरुवात लवकर केली तर? काही बिघडणार आहे का? उलट कामं लवकर होतील सगळ्यांची. इतर गोष्टींना देखील वेळ मिळू शकतो ", ती म्हणाली.
"तू म्हणतेस ते काही चूक नाही... पण तुला एक सांगू...इकडे आपल्या लोकांकडून काम पण तितकेच केले जाते...भारतीय आणि चीनी तर ह्यांचे आवडते.. एवढ्या कमी पगारात अमेरिकन थोडी कामं करणार आहेत? " - एक अनुभवी गृहस्थ उद्गारला.
"कमी पगार! अहो काका, ५००० डॉलर काय कमी पगार आहे?" - नीलम.
" अगं, तू इथे हल्ली हल्ली आली आहेस .. कॅलिफोर्निया मध्ये ५००० पर्यंत पगार काहीच नाही... इकडची महागाई अनुभव.. मग तुला कळेल...अगदी छान आयुष्य जगायचे असेल ना... वीकेंडला मज्जा करायची असेल ना .. तर एवढा पगार अजिबात पुरेसा नाही...म्हणून अमेरिकन लोकं ह्या नोकऱ्या करत नाहीत... म्हणून मग ह्या लोकांना चीनी आणि भारतीय लोकांना नोकऱ्या द्याव्या लागतात ... आपलं कसं.. गुणिले ५० सदैव डोक्यात ... त्यामुळे आपण इकडे लाखभर रुपये दर महिन्याला कमावतो ह्याच मनःस्थितीत आपण काम करत असतो... हे सगळं असंच चालत राहणार... सर्वांच्या गरजा वेगळ्या... ", इकडे आयुष्य काढलेल्या त्या व्यक्तीने तिला समजावले.
नीलमला नंतर मी शहरातल्या एका लायब्ररीबद्दल सांगितले. बस ने अर्ध्या तासावर होती. त्यामुळे जाणे येणे सोपे होते. तिने देखील लायब्ररीबद्दल उत्सुकता दर्शवली. आणि काही महिन्यांमध्ये मला कळले की तिने ती लायब्ररी जॉईन सुद्धा केली आहे.
" बरं झालं तुम्ही मला लायब्ररीबद्दल सांगितलं ते.. आता माझा वेळ थोडा चांगला जाऊ लागला आहे... नाहीतर रोज सकाळी उठून घरातली कामं करायची, फेसबुकवर वेळ घालवायचा, जेवण करायचे मग दुपारी कधी डुलकी....कधी नेटवर पिक्चर बघणे....संध्याकाळी थोडा फेरफटका किंवा कुणाला काही दुखापत असेल तर त्यांची ट्रीटमेंट आणि घरी येऊन विशालची वाट बघणे ह्यात दिवस संपायचा ...आता निदान वाचायला तरी मिळते आहे... तेवढाच वेळ सार्थकी जातो ", नीलम म्हणाली. आज ती मला ग्रोसरी स्टोर मध्ये भेटली होती. माझ्यासारखीच भाजी घ्यायला आली होती.
" अरे वा... ट्रीटमेंट देणे सुरु आहे तर...चांगलं आहे.. चांगलं आहे... पण मग तू हे वाढवत का नाहीस? एवढी डॉक्टर झाली आहेस... तुझ्या ह्या फीजियोथेरपीचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ दे की...", मी सहज म्हणालो. माझ्या फिरतीच्या नोकरीमुळे मला काही विषयात कसे अज्ञान आहे हे मला पुढच्या काही सेकंदात कळले.
" अहो, मला बाहेर नोकरी करायला अलावूड नाही... कायद्याने त्याला परवानगी नाही... माझा dependent विसा आहे ना... विशाल नोकरी करतो आणि मी dependent !" तिला मग मी फेरफटका मारून यायच्या अजून काही जागा सांगितल्या. ४० मिनिटांवर असलेला zoo बघायला सांगितला किंवा तासाभरावर असलेले विद्यापीठाचे कॅंपस बघून ये असा सल्ला दिला. विशाल कामात बुडालेला असल्यामुळे गेले बरेच वीकेंड सुद्धा त्याला वेळ नव्हता मिळत. नीलम त्यामुळे एकटी फिरण्यात तशी एक्स्पर्ट झाली होती - सवयीने आणि परिस्थितीने! तिने लगेच होकार दिला. आणि एका शुक्रवारी बाईसाहेब डब्यात sandwiches भरून आणि हातात कोकची बाटली मिरवत university बघायला गेल्या देखील! त्याचा सविस्तर वृत्तांत मला दोन आठवड्यानंतर एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या आधी मिळाला. सुरुवातीला धन्यवाद वगेरे देऊन झाला आणि मग मीच विचारलं.
" काय, कशी वाटली university ?"
" खूप छान! मला वाटलं नव्हतं इथल्या मुलांना एवढं बागडायला मिळत असेल.... ह्यांच्याकडे बघून वाटतं आपण काहीच केलं नाही आयुष्यात! चार भिंतीच्या आड शिक्षकांच्या धाकात शाळेचं आयुष्य गेलं माझं! कधीतरी आठवड्यातून एकदा खेळायला घेऊन गेले तर गेले... कॉलेज मध्ये तर साधं मैदान सुद्धा नव्हतं आमच्या इथे! कधीतरी लहर आली की लायब्ररीत घेऊन जायचे.... तिकडे सुद्धा आमच्या समोर एक पुस्तक ठेवले जायचे... आणि नंतर ते परत घेतले जायचे! खेळायची आणि वाचायची सवय लागणार तरी कशी? आणि इकडे मी बघते काय... मुलं, मुली जिम मध्ये जात आहेत..कुणी सायकल चालवत आहे... कुणी सायकल चालवत आहे... कुणी खेळत आहे... आणि कुणी चक्क गात आहे! नशीबवान पोरं आहेत इकडची!" नीलम हे इतकी तावातावाने बोलली की समोरच्या रांगेत बसलेल्या एक-दोन लोकांनी मागे वळून आमच्याकडे बघितले.
" पण तू देखील डॉक्टर आहेसच! एवढी चांगली फिजिओ झाली आहेस ते... ", मी आपलं उगंच सांत्वन करायचे म्हणून तिच्या डिग्रीची आठवण करून दिली!
" अहो.. कसली डॉक्टर...ती नुसतीच एक जबरदस्ती होती... मला कुठे माहिती होते मी डॉक्टर होणार आहे? आणि झालेच आहे... पण आता त्याचा काही उपयोग आहे का?"
"म्हणजे?" - मी विचारले.
" अहो, दहावीच्या मार्कांनी सर्वात मोठा घोळ घातला आयुष्यात! मला ९०% मिळाले. घरी कुणीतरी डॉक्टर व्हायला हवे होतेच कारण माझ्या आधी घरी कुणीही डॉक्टर झाले नव्हते. तेव्हाच माझे करिअर निश्चित झाले. बारावी होईपर्यंत माझं कल मिडियाकडे जात होता... त्यामुळे टक्केवारी घसरली देखील...८४ वर आली...पण घरचे ठाम होते. माझ्या आईनी बोलून दाखवले होते... माझ्या मुलीच्या नावा मागे डॉक्टर लिहिलेले बघणे हे तिचे स्वप्न आहे म्हणून! माझ्या स्वप्नाची कुणालाच परवा नव्हती.... पण एम.बी.बी.एस करायला तेवढी टक्केवारी पुरेशी नव्हती... बी.डी.एस ला पण नाही मिळू शकला प्रवेश! मी मिडियाचा प्रस्ताव परत एकदा पुढे ठेवला...पण आमच्या आईसाहेबांचे स्वप्नं होते ना.... मग शेवटी फिजियोला प्रवेश मिळाला! आणि अशाप्रकारे मी डॉक्टर नीलम झाले", हसत हसत ती म्हणाली.
"पण मग तू इकडे कधी आलीस?"
" तो म्हणजे बाबांचा साक्षात्कार! फिजियो झाल्यावर तुम्हाला लगेच लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या नाही आहेत... खरंतर त्या कुठेच नाहीत.. .. पण मी स्वतः ५००० च्या नोकरीने सुरुवात केली. वर्ष झालं आणि बाबांनी निष्कर्ष काढला - ह्या अशा पाठी चोळून काहीही होणार नाही... तू सेटल कधी होणार? पण मुलगा डॉक्टरच हवा ह्या अटीने स्थळ शोधणे सुरु झाले... आता ५००० रुपये महिना पगार असलेल्या डॉक्टर मुलीला कुठला डॉक्टर मुलगा भाव देईल? शेवट विशाल दांडेकर हे स्थळ समोर आले. माझ्या एका आत्याच्या बिल्डींग मध्ये ह्याची काकू राहायची...तिकडून कळले! हा काही डॉक्टर वगेरे नव्हता...पण अमेरिकेचा होता ना...लगेच बाबांनी होकार कळवला... मी इकडे येऊन नोकरी करू शकणार नाही हे माहिती असून सुद्धा!"
"पण मग तू काही बोलली नाहीस?" - मी विचाले.
" काय बोलणार? बाबंनी शब्द दिला होता ना.. आणि त्यांच्यामते मी सेटल होण्यासाठी ह्यापेक्षा जास्त चांगली संधी येणे शक्य नव्हते. पण कसली सेटलमेंट... इकडे येऊन समजले की वास्तव निराळेच आहे! विशाल ओहायोला असताना त्याने कसली तरी कन्सलटनसी जॉईन केली होती. ह्याच्यात म्हणे त्याला कुठलेसे software शिकवले गेले आणि नंतर त्याला त्यात ७ वर्षांचा अनुभव आहे असे त्याच्या resume मध्ये लिहिले गेले. आता ज्या मुलाला अमेरिकेत शिकायला येऊन ५ पेक्षा जास्त वर्ष झाली नव्हती त्याला ७ वर्षांचा कुठला आला अनुभव? पण नोकरी देणाऱ्या कंपनीतील recruit करणारा माणूस भारतीय...आणि हा consultant सुद्धा भारतीय! अशी ही अमेरिकेत मोठी साखळी आहे असं कळल्यावर मला धक्काच बसला! आणि नोकरी मिळाल्यावर ह्याच्या बॉसला खरच वाटतं की हा ७ वर्ष अनुभव घेऊन आला आहे.... ते बसलेच आहेत...काम करवून घ्यायला...त्यामुळे शनिवारी आणि रविवारी सुद्धा काम! त्यादिवशी काका म्हणाले होते ते अगदी बरोबर आहे..."
" पण हा तर नोकरी मिळवायचा illegal प्रकार झाला...तुझ्या बाबांना माहिती आहे ह्याबद्दल?"
" अहो, त्यांना तरी किती गोष्टी सांगू मी? त्यांना काय मला देखील वाटले होते आम्ही लगेच सेटल होऊ..... पण apartment मधल्या एका अमेरिकन परिवाराने फेकलेले सोफे आणि खुर्च्या नव्या कोऱ्या परवडत नाहीत म्हणून रात्री बारा वाजता हळूच उचलून आम्ही जेव्हा घरी आणल्या ना...तेव्हा मला इकडची लाईफ काय आहे ते समजले...हे काय मी बाबांना सांगू? विशालला विचारले असता त्याने हेच सांगितले - इकडे असे करावे लागते. बहुतांश भारतीय लोकं हे असंच जगतात! "
गाणे सुरु झाले. आणि डॉ. नीलम अगदी काही क्षणातच ते ऐकण्यात इतकी एकरूप झाली की जणू काही झालेच नाही. जणू काय ती मला काही बोललीच नाही. अर्थात, समोर आलेल्या प्रसंगात अशीच एकरूप होऊन जायची सवय तिला होतीच! अगदी दहावी पासून.
आशय गुणे स्मित

Thursday, October 18, 2012

सुरेश

समोर उभ्या असलेल्या शाळेच्या इमारतीच्या साक्षीने दामोदर हॉटेलच्या छोट्याशा जागेने तिशीत पदार्पण केले. शाळेची इमारत ह्या जागेपेक्षा १० वर्ष मोठी. आणि म्हणून कदाचित मोठेपणाचा आव आणीत त्या छोट्या जागेकडे सदैव डोळे वटारून बघत असते. शाळेच्या इमारतीला माहिती आहे - मोठी होऊन होऊन किती मोठी होणार ही जागा? मोठेपणाचा हक्क आणि ठेका आपल्याकडेच असणार आहे - सतत! शाळेची इमारत दहा वर्षांची होती तेव्हा समोरच्या जागी, जिथे काहीही नव्हतं, थोडी हालचाल सुरु झाली. 'शाळेच्या ठिकाणी हे काय?' अशी बऱ्याच जणांची भावना त्या दिवसात होती. पण शेवटी थोडा संघर्ष करून दामोदर हॉटेल ह्या इमारतीने आपले अस्तित्व मिळवले. हॉटेल म्हटल्यावर साहजिकच मुलं-मुली तिकडे जाऊ लागली. अधून मधून गप्पा मारायला तिकडे बसू लागली. शाळा संपली की खाऊ-पियू लागली. शाळेला मात्र हे खटकू लागलं. तिने हॉटेलला शक्य तितके वाळीत टाकायचे ठरवले. मुलांच्या तिकडे जाण्यावर बंदी घातली गेली. शेवटी कुणाचाही आधार मिळत नाही हे लक्ष घेता त्या हॉटेलने स्वतः प्रगती करायचे ठरवले. शाळेच्या सतत असलेल्या वाकड्या तोंडाकडे लक्ष न देता त्या जागेने आपली व्याप्ती थोडी थोडी का होईना वाढवली. आणि ह्या तीस वर्षात थोडीफार कीर्ती देखील मिळवली. शाळेची इमारत मात्र हे मानायला अजिबात तयार नव्हती.

आज हॉटेल दामोदरच्या तीन टेबलांना एकत्र करण्यात आलं होतं. सर्व बाजूंनी खुर्च्या मांडल्या होत्या. थोडी दिव्यांची आरास होती. हॉटेलकडून जितकं काही करता येऊ शकत होतं तितकं त्यांनी केलं होतं. कारण आज एकदम २५-२८ लोकं हॉटेल मध्ये जेवायला येणार होती. समोरच्या शाळेत बऱ्याच वर्षांपूर्वी शिकून गेलेली अशी ही लोकं होती. पंधरा वर्षांपूर्वी 'पास आउट' झालेली batch ! म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी १५-१६ वय असलेली ही मुलं आता तिशीत पदार्पण करणार होती. ह्यांचे 'reunion ' व्यवस्थित हाताळण्याची जबाबदारी हॉटेल दामोदरच्या सर्वात अनुभवी वेटर वर होती! पंधरा वर्ष अनुभव असलेला वेटर होता तो. असे प्रसंग त्याने ह्याच्या आधी अगदी समर्थपणे हाताळले होते.

संध्याकाळचे सात वाजताच त्या टेबल-मांडणीकडे लोकांची वर्दळ वाढू लागली. आणि ७:४५ पर्यंत तिकडे २७ लोकं हजर होती. वेटरने पाणी सर्व केले आणि त्यांच्या सर्वांच्या ऑर्डरप्रमाणे तो 'कोक' आणायला आत गेला.
" अरे यार! कोक कसले पिताय! असली ड्रिंक्स पिण्याचे वय निघून गेले आपले! " प्रत्येक ग्रुप मध्ये एक तरी 'आपण किती आणि कसे पितो' हे सांगणारा नमुना असतोच!
" अबे ए...मुली पण आहेत आपल्याबरोबर. पितोस कसला!" ग्रुप मध्ये उगीच सावध होणारी पात्र पण असतातच की!
" प्या की! आम्ही देखील देऊ कंपनी!" - एक इतर मुलींचा रोष ओढवून घेत उगीचच बिनधास्त मुलगी. एकूण काय, सर्व प्रकारच्या नमुन्यांनी भरलेला हा ग्रुप जवळ जवळ १५ वर्षांनी एकत्र आला होता. पण हॉटेल दामोदर हे साधे हॉटेल होते. शाळेसमोर बऱ्याच वर्षांपूर्वी उघडलेले एक साधे भूक आणि तहान भागवायचे ठिकाण! तिकडे दारू-बिरू मिळत नव्हती.

" हो रे. ते विसरलोच मी! कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये राहून राहून ह्या गोष्टींची इतकी सवय झाली आहे ना. काही विचारू नकोस. दर वीकेंडला आम्ही पार्टी करतो. त्यात भरपूर दारू प्यायली जाते. आणि नोमुरा मध्ये आमचा बॉस आमच्याहून जास्त पितो आणि दंगा करतो." दारू मागणाऱ्याला त्याने चुकीच्या ठिकाणी दारू मागितल्याचे लक्षात आले. पण बोलता बोलता तो नोमुरा ह्या कंपनीत कामाला आहे हे त्याने सांगून टाकले!
" हो! आमच्या इन्फी मध्ये देखील आम्ही धम्माल करतो. साला मंडे ते फ्रायडे कुत्र्यासारखं काम करावं लागतं. पण त्यामुळे आम्ही शनिवारी-रविवारी सगळं वसूल करून घेतो....तो बघ ...रेडा आला ...साला अजून पण तितकाच ढोल्या आहे...बडे बाप का साला", इन्फी मध्ये काम करणारी व्यक्ती वेटरने 'सर्व' केलेल्या स्टार्टर मधील एक तुकडा तोंडात टाकत म्हणाली. आणि सगळे 'रेड्याकडे' बघू लागले.
"हेलो गाईज ...कसं काय चाललंय? किती वर्षांनी इकडे येतो आहे! आज पण मी तितकाच खाणार आहे.... सुरुवात पण झाली वाटतं तुमची... स्टार्टर आहेत...मागवा अजून", रेडा उद्गारला.
" साला हा बघ... अजून तसाच आहे.. तेवढंच खातोस का रे अजून? तेव्हा पण हाणायचास... बाप पैसेवाला ना तुझा...आम्हाला वाटायचं...आता थांबेल, मग थांबेल...अख्ख्या बिल्डींग मधील एक घर विकण्याचे पैसे तुझा बाप तुला खायला म्हणून द्यायचा वाटतं", एकाने तेव्हा बिल्डर बाप असलेल्या रेड्याला उद्देशून शेरा मारला आणि सगळे हसू लागले.
" ए. काय रे...", उगीचच एका मुलीने हसून घेऊन नंतर भाषा किती विचित्र वापरली असं दर्शवून टाकलं. लगेच मोर्चा मुलीकडे वळलाच.
" तू तरी कुठे बदलली आहेस.... च्यायला.. पुस्तकी पोपटीण नुसती... आई शिक्षिका होती तुझी... घरून सगळा आभ्यास त्यामुळेच पूर्णपणे तयार असायचा तुझा. आता काय करतेस? शिक्षिकाच झाली असशील तू!"
" नाही रे... मी लॉ केलं आहे रे.... वकील झाली आहे मी ... आणि मयूर... पोपटीण नाही...मैना असतं....मराठी सुधारा स्वतःच... शाळेपासून तसंच आहे", त्या मुलीने लगेच चिडवणे परतवले आणि मंडळी अजून हसू लागली.
" नाही गं...इंजिनिअर आहे ना तो... मराठीची सवय सुटली असेल... आणि आपल्याला करायचंय काय...पोपटीण असो वा मैना...समजलं ना तुला तो काय बोलतोय ते?" एकाने व्याकरणाच्या चिंद्या फाडणाऱ्या त्या इंजिनिअर मुलाची बाजू घेतली लगेच!
" तुम्ही इंजिनिअर लोकं एकमेकांची बाजू घ्या फक्त", एकजण उद्गारला.
" ए पण तू लॉ कसं काय केलंस गं? किती तरी वर्ष आपण एकमेकांना बघितलंच नाही ...आणि मी नंतर अमेरिकेतच होते ना.. लग्न झाल्यापासून वी लिव इन ह्युस्टन...फॉर द फर्स्ट कपल ऑफ यर्स वी वर इन न्यू यॉर्क. ए वेटर .... अजून तीन प्लेट चिकन लॉलीपॉप... आणि लवकर आण प्लीज.. ", एका मुलीने संभाषण पुढे ढकलले. ती अमेरिकेत असते आणि कुठल्या शहरांमध्ये राहिली आहे ह्याचा उल्लेख मात्र इंग्लिश मध्ये झाला. " डोंट यु थिंक ...हा वेटर उगीचच आपल्याकडे बघतोय... ह्याला कामाला लावलं पाहिजे... उभं राहून बघायची काय गरज आहे?" त्या मुलीने पुढे हळूच सर्वांना विचारले.
" काही नाही गं ...टीप मागायला पुढे पुढे करतात ही लोकं...तू लक्ष देऊ नकोस...आणि तुझं लग्न झालं आहे... टेन्शन नको घेउस...अमेरिकेतला गोरा बघत असता तर ठीक होतं गं ...इकडचे लोकं म्हणजे तुझे डिमोशन!" एका मुलाने आपले एक मत व्यक्त केले आणि लोकं परत हसू लागली. मग थोडक्यात तिने ग्राजुएट झाल्यानंतर लग्न ठरलं आणि नवऱ्याच्या बरोबर अमेरिकेला कशी गेले ही कथा सांगायला सुरुवात केली. ही कथा लोकांनी बऱ्यापैकी शांततेत ऐकली. चिकन लॉलीपॉप आली तेवढ्यात. आणि पुढे गाडी मेन कोर्स कडे वळली. तोपर्यंत कोण काय करतंय, कुठे आहेत, नोकरी, धंदा ह्या सर्व गोष्टींची चर्चा झाली होती. स्टार्टरची मजा घेतल्यानंतर ही डॉक्टर, इंजिनिअर, वकील, एन.आर.आय आणि तत्सम मंडळी इतर चर्चांमध्ये गुंतली. आणि वेटरला परत बोलावले गेले आणि ऑर्डर दिली गेली.

" इकडे आपल्या वेळेस चिकन लपेटा खूप फेमस होते.... मला अजून आठवतंय ... आहे का ते इकडे अजून?"
" हो साहेब, आहे ना", वेटर बोलला. ऑर्डर दिली गेली आणि मंडळी ती येई पर्यंत गप्पा पुढे वाढवीत बसले. " तुला बरं आठवतंय रे सगळं... चिकन लपेटा वगेरे... सर्वात आधी तूच आणलं होतास बहुतेक मला इकडे... आठवत नाही मला एवढं... पण तुला बराच माहिती होतं इकडे काय मिळतं वगेरे"
" अरे... मी इकडे आलो ते आपल्या ...हम्म...सुरेश बरोबर... मला तरी कुठे काही माहिती होतं.. त्याने मला आणलं इकडे", ती व्यक्ती म्हणाली.
" कोण सुरेश?" एक दोन लोकांनी हा प्रश्न विचारला. " अरे तो ...आपल्या शाळेच्या शेजारच्या गल्लीत राहत होता ..रिक्षावाल्याचा मुलगा.."
"ओह्ह ...तो! अरे हां... तोच तो...एकदा मला आठवतंय.. आपले बाबा काय करतात हे सर्वांना विचारलेले असताना...रिक्षावाला आहेत असं म्हटल्यावर आपण हसलो होतो तोच", एक मुलगी आपली एक आठवण सांगू लागली आणि वातावरण एकदम हसरे झाले. " आपण पुढे त्याला मार्केट मध्ये जायचे झाले तर तुझ्या बापाला बोलवू असं सांगितलं होतं...", रेडा उद्गारला. इतका वेळ तो खाण्यात गुंतला होता.
" साल्याचा नेहमी अभ्यास अपूर्ण असायचा. रोज मार पडायचा. एकदा कॅलेंडर वर सही आणायला सांगितली होती त्याला.. घरी कुणाला सही करता येत नाही असं म्हटल्यामुळे जाम झोडपून काढलं होतं ....साला मी त्याचा बेंच पार्टनर...हसूच आवरत नव्हते...सातवी-आठवीची गोष्ट असेल ही."
" परश्या आणि सुरेश ह्यांची जोडी अजब होती पण...मी त्यांच्या एक बेंच मागे तर बसायचो. परश्या एकदम युनिफॉर्मला कडक इस्त्री मारून यायचा...आणि ह्याचा अवतार बघण्यासारखा असायचा. इस्त्री तर सोडा ...कपडे सुद्धा कधी कधी न धुतलेले घालायचा... मला तर वाटतं अंघोळ पण नेहमी नव्हतं करत."
"ईईई... खरंच का? एकदा मला आठवतंय ही मुलं खूप बोलतात तेव्हा मुला-मुलींना एका बेंचवर बसवायचे ठरवले. आणि ही आणि तो उरले होते फक्त....बाकी सर्वांची जागा नक्की झाली होती....आणि तेव्हा हिच्या चेहऱ्यावरचे भाव....आय मीन ...एक्स्प्रेशन्स....त्या दिवसात आपल्याकडे कॅमेरे नव्हते...फोनच नव्हते म्हणा ...नाहीतर नक्कीच फोटो काढला असता मी तुझा... ", एक मुलगी एन. आर. आय मुलीला उद्देशून म्हणाली. " हो ना", तिने लगेच सुरुवात केली. " त्याच्याबरोबर कोण बसेल बाबा!"
" पण पुढे भेटला की नाही तो कुणाला? मला तर साधारण दहावी नंतर काहीच आठवत नाही त्याबद्दल. तसा मी त्याच्याशी जास्त बोलत नव्हतो...पण शाळेनंतर कधी कधी दिसायचा."
" काही कल्पना नाही म्हणा.... पुढे त्याने काय केले ..कुठे शिकला...आता काय करतोय...कुणाला काहीच माहिती नाही... अरे...तो वेटर परत आला रे...त्याला सांग काहीही नको आहे...असल्यास सांगू...उगीच इकडे येऊन आमच्याकडे बघत बसू नकोस..."
" ते जाऊ दे... त्याच्यामुळे आज चिकन लपेटा खायला मात्र मिळाला.. तुझ्यामुळे वगेरे ठीक आहे...पण तुला त्याने सांगितले...हे मान्य करावे लागेल... बिल आण रे...लवकर! "
" अरे यार...आपण सगळे असं मधून मधून भेटलं पाहिजे रे.. मजा आली आज...जुने दिवस आठवले... अरे..पाचशे चे सुट्टे आहेत का....नाहीतर सोड... नंतर दे... नीलम...तुला सोडतो मी...आणि हां, तू....परत यु.एस वरून येशील तेव्हा नक्की कळव गं... परत सगळे तेव्हाच भेटू...काय म्हणता सगळे! असो...हां...परश्या ....पन्नास रुपये दे रे...ह्याला टीप देऊया.." पोट जड होऊन सुद्धा त्यातल्या त्यात उत्साही असलेल्या एकाने बिलाचा हिशोब करायची जबाबदारी घेतली!
" हे घे रे...५० आहेत...चांगली सर्विस दिल्याबद्दल...आणि अधून मधून आमच्याकडे बघण्याबद्दल...आणि आमच्या टेबल जवळ सतत ये-जा केल्याबद्दल!" सारी मंडळी परत जोरजोरात हसू लागली. वेटर काही न बोलता त्यांच्याकडे बघू लागला.
" अरे... बघत काय बसला आहेस...घे ना...घे...काय नाव तुझं?"
" सुरेश."
मंडळी टीप देऊन निघून गेली. आणि ह्या साऱ्या लोकांना आपापल्या यशस्वी वाटेवर चालत जाताना त्याने परत एकदा पहिले. पंधरा वर्षांनंतर.



- आशय गुणे स्मित

Thursday, September 20, 2012

ह्युस्टनच्या गणपतीची क(व्य)था


नारद मुनी त्यांच्या आयुष्यात ( कधी न संपणाऱ्या ) ज्या ज्या ठिकाणी हिंडले नसतील त्या त्या ठिकाणी जाण्याचा योग मला ह्या दहा दिवसात येतो. मी कुठे कुठे जातो ह्याची यादी सांगायला गेलो तर हे पान कमी पडेल. कधी मी असतो मोठमोठ्या मंडळांच्या गादीवर समोर असलेला भक्तसमुदाय आणि मागे ओतलेला पैसा बघत. कधी मी असतो लहानशा घरात समोर येणाऱ्या भक्तांची निरागसता आणि समर्पण बघत. वेगवेगळ्या प्रार्थना स्वीकारत आणि चित्रविचित्र इच्छांना सामोरे जाता जाता दहा दिवस कसे जातात समजत देखील नाही. खायला देखील निरनिराळ्या पद्धतीचं मिळतं. थोडक्यात काय माझं भारत भ्रमण ह्या दहा दिवसात होत असतं.

परंतु आपली लोकं भारताच्या बाहेर जाऊ लागल्यापासून मला तिकडून सुद्धा आमंत्रणं येतात. मी अर्थात स्वीकारतोच! उंदीर मामा आहेतच मला घेऊन जायला. मामांची एकंच तक्रार होती इतके दिवस - जग फिरायला मिळत नाही. बाकी त्यांची तरी काय चूक? जग पहायची मिळालेली एक संधी तर मी गमावून बसलो. लहानपणी भाऊ कार्तिकेय बरोबर स्पर्धा ठरवली आणि तो बिचारा मोरोपंतांवर बसून जगाच्या तीन चक्रा मारून आला. मामांना वाटलं आपल्यालाही जायला मिळेल. पण मी कंटाळा केला आणि शेवटी आई-वडिलांभोवती तीन चक्रा मारायची पळवाट शोधून काढली. पण आता बदलत्या काळात मला देखील बाहेर जावे लागते. त्यातील प्रमुख शहरं आहेत अमेरिकेत आणि युरोपात. इथे आपली मंडळी मंडळ स्थापन करतात. मोठ्ठं जेवण ठेवतात. आपल्या मुला-मुलींना लॉर्ड गणेशा बद्दल सांगतात. माझ्या 'स्टोरीज' ऐकवतात. गाणी म्हणतात. शब्द इंग्रजी असले तरीही मनातून उमटणाऱ्या भावनांच्या भांडवलावर मी इथे आनंदाने मुक्काम करतो. ह्याच अमेरिकेतील माझ्या मुक्कामात एक शहर आहे जे माझ्यावर वर्षानुवर्षे प्रेम करीत आले आहे - ह्युस्टन! पण गेल्यावर्षी मला ह्युस्टनच्या अजून एका ठिकाणून आमंत्रण आलं. सहज उत्सुकता म्हणून पत्र बघितलं तर पत्ता होता एका विद्यार्थ्याचा. हा विद्यार्थी तिथल्या एका विद्यापीठातील भारतीय विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. आपल्याला मोठ्यांच्या सहवासातून जरा ब्रेक मिळणार आणि तरुणांमध्ये जायला मिळणार ह्या आनंदात मी होकार कळवला! माझ्या सेक्रेटरीला विचारले असता त्याने मला सांगितले की स्वतंत्र दिन, दिवाळी, गणतंत्र दिवस आणि होळी ह्या सांस्कृतिक कॅलेंडर मध्ये आता माझी देखील स्थापना करायचे ठरले होते. तरुण मंडळी म्हणजे तरुण विचार आणि जुनाट विचारांचे विसर्जन! ठरलं तर मग! मी ह्यांच्या घरी जायचे ठरवले.
ठरलेल्या दिवशी मी तिकडे गेलो आणि विराजमान झालो. पण वातावरणात एक प्रकारची धुसफूस जाणवली. हे बिचारे विद्यार्थी ठरलेल्या वेळेत आपले शिक्षण सांभाळून माझी स्थापना करतात ह्या गोष्टीचा थोडा तणाव असेल असं मला वाटलं. पण तणाव काही वेगळाच होता. माझी आणि भक्तांची भाषा जरी भावनिक असली तरीही मला 'शाब्दिक भाषा' सुद्धा येतात! त्यामुळे ही मुलं काय बोलत होती हे कळायला आणि चकित होयला मला वेळ नाही लागला. संघटनेचा अध्यक्ष हा तेलगु भाषिक होता. ह्या मुलाने स्वतःच्या भाषेतील मुला-मुलींना माझ्या स्थानाभोवती होणाऱ्या सजावटीसाठी बोलावले होते. त्यांच्या बोलण्यावरून इतकेच कळले की 'ते' येण्याच्या आधी आपली सारी सजावट झाली पाहिजे. पूजेला पण आपलाच माणूस बसणार आहे. उगीच 'ते' येतील आणि 'त्यांची' माणसं त्यांच्या भाषेला पुढे करतील. पूजेचे पुस्तक बाहेर काढले गेले. सर्वांसमोर उशीर नको होयला म्हणून त्यातील एका विद्यार्थ्याने पूजेचा मजकूर वाचायला घेतला आणि त्याचा सराव करायला सुरुवात केली. दुसऱ्या एकाने इंटरनेट सुरु केले आणि laptop वर गाणी लावली. ही गाणी होती त्यांच्याच भाषेची. आणि तीच सुरु राहतील ह्याची दक्षता घेतली गेली पाहिजे असा आदेश देण्यात आला. तर अशाप्रकारे तेलगु भजनांच्या संगतीत माझ्या आजूबाजूला सजावट सुरु झाली. पण एक उत्सुकता नक्कीच होती. 'ते' कोण आहेत? आणि ते येण्याच्या आधी कसली ही एवढी घाई आहे तयारी करण्याची? पण माझे कान हत्तीचे असल्यामुळे ते टवकारल्यावर मला खूप लांबचं ऐकू येतं. आणि लांबून कुणीतरी येण्याची मला चाहूल लागली. बहुदा 'ते' हेच असावेत.
" आपल्याला यायला उशीर तर नाही झाला? ह्यांनी आपण यायच्या आधीच सारी तयारी केली असेल बघ. मी तुला सांगत होतो ना लवकर आवर! च्यायला आपल्या टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला आणि तयारी मात्र हे करणार!" ही तर मराठी भाषा होती. चार-पाच मराठी भाषिक मुलं येत होती. आल्या आल्या त्यांनी सजावटीचा ताबा घेतला.
" अरे हे बरोबर सजवलेलं नाही. ह्यांना काही आरास येत नाही. पुण्याचा मी. गणपती सजावट मला नाही तर कुणाला येणार!" असं म्हणून तो मुलगा आहे त्या गोष्टींमध्ये बदल करू लागला. तेवढ्यात तेलगु गटातून एकाने आवाज दिला.
" दिस इज नॉट लुकिंग नाईस!" संभाषण एकदम इंग्रजीत होऊ लागलं.
" इट इज नाईस. वी हाव गणपती इन माय हाउस", ह्याने प्रत्युत्तर दिले. ह्यावर त्या तेलगु मुलीने नाक मुरडले आणि ती तिच्या आजूबाजूला असलेल्या तेलगु मुलामुलींना काहीतरी बोलली. उगीच ह्यांना बोलावले असं काहीसा ऐकू आलं मला पण माझं लक्ष दुसऱ्या एका संभाषणाने वेधून घेतलं. दोन मराठी मुलांनी आता laptop चा ताबा घेतला होता.

" च्यायला हे काय लावलाय बे अंडू-गुंडू. ह्याने काय बाप्पा प्रसन्न होणार आहे? आपण आपली गाणी लावूया!" असं म्हणून आता तेलगु गाण्यांची जागा मराठी गाण्यांनी घेतली. इकडच्या लोकांची नाकं अजून मुरडली गेली. दरम्यान, हळूहळू गर्दी वाढत होती. त्या घरी आता बरेच लोकं येऊ लागले होते. सारे विद्यार्थीच. त्यातील काही मुलामुलींनी माझ्या बाजूला उभं राहून फोटो काढायला सुरुवात केली. संध्याकाळचे पाच वाजून गेले होते. मला तर संध्याकाळी चार चे आमंत्रण होते. मी आधी येऊन बसलो होतो पण ह्यांचे फोटो काही आवरत नव्हते. शेवटी बरोब्बर सहा वाजता सगळ्यांना खाली बसायला सांगितले गेले. आणि अध्यक्ष महोदय बोलायला लागले. आता हा भाषण करतोय की काय ह्याची मला भीती वाटू लागली. सुदैवाने तसं काही झालं नाही.
" नाऊ वी विल स्टार्ट द पूजा. ही विल डू द पूजा....इन तेलगु लांगुएज". शेवटच्या शब्दामुळे मराठी मुलं-मुलींनी नाकं मुरडली!
आता त्या घरच्या हॉल मध्ये दोन गट पडले होते. एका बाजूला पूजा सांगणारा गट होता, अर्थात तेलगु. दुसरीकडे पूजा ऐकणारा आणि नाक मुरडणारा गट होता, अर्थात मराठी. आणि तिसरीकडे पूजा न ऐकणारा आणि केवळ नाक मुरडणारा गट, अर्थात हे दोन्ही सोडून अन्य सर्व भाषा बोलणाऱ्या मुलांचा गट!
"च्यायला, काहीही काळात नाही आहे. काय चाललाय बे. कधी संपणार हे", अशा प्रकारची वाक्य अधून मधून दुसऱ्या गटातून ऐकू येत होती. आणि मुळात पूजा स्वतःचे शक्ती प्रदर्शन व्हावे म्हणून होत असल्या कारणाने इतक्या जोरात म्हटली जात होती की माझे एवढे मोट्ठे कान असूनसुद्धा मला तिसऱ्या गटातील मंडळी काय म्हणतायत हे ऐकू येत नव्हतं! अशा ह्या वातावरणात ती पूजा एकदाची संपली! आणि मंडळी प्रसादाचे ताट पुढे करणार तेवढ्यात...
" वेट वेट.. वी हेव आरती नाऊ! इन आवर प्लेस वी ऑलवेज सिंग आरती... इन मराठी!" नाक मुरडण्याची धुरा आता दुसर्यांकडे होती हे वेगळं सांगायला नको.
" येते का कुणाला आरती... लवकर... आपल्याला पण दाखवून द्यायचे आहे...चला मंडळी... "
" अरे.. laptop घे तो...गुगल वर मिळतील बघ आरत्या... कशाला काळजी करतोस.... सापडलं बघ!" आणि अशाप्रकारे आरत्या म्हणणे सुरु झाले.
सुखकर्ता दुःख हर्ता वार्ता विघ्नाची ....
..................................................
लंबोदर पीतांबर फणी वरवंदना
सरळ 'तोंड' वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे 'सजना'
'संकष्टी' पावावे निर्वाणी रक्षावे ....
..............................................

मी मूर्ती रुपात नसतो तर ह्या चुका नक्कीच ओरडून सांगितल्या असत्या. अहो, मी काय फक्त संकष्टीच्या दिवशी पावतो? मी तर संकटाच्या समयी पावतो. पण स्पर्धा होती अस्तित्वाची. आधीच्या गटाने माझ्या हत्तीच्या कानांना सुद्धा पेलवणार नाही इतक्या आवाजात पूजा सांगितली आणि ह्या गटाने मात्र माझ्या आरतीच्या अर्थाचा अनर्थ केला! एकदा अस्तित्वाची स्पर्धा सुरु झाली की दाखवायचे असते फक्त अस्तित्व. तिथे नाद नसतो, आवाज असतो; अर्थ नसतो, शब्द असतो! इथे माझ्याच नाही तर माझ्या नंतर म्हटल्या जाणाऱ्या सर्व आरत्यांची हीच तऱ्हा होती. शेवटी एक एक जण नमस्काराला मात्र येत होता.
मला H 1 विसा मिळू दे इथपासून मला विद्यापीठाच्या कॅमपस मध्ये जॉब मिळू दे आणि मला scholarship मिळू दे इथपासून अमुक अमुक मॉटेल किंवा gas station मध्ये मला नोकरी मिळून काही दिवसातच गाडी घेता येऊ दे इथपर्यंत सर्व प्रार्थना माझ्या समोर केल्या गेल्या. पण मला अपेक्षा होती एका मनापासून येणाऱ्या नमस्काराची. मुलं नमस्कार करत होते, माझा फोटो काढत होते, नमस्कार करताना फोटो काढत होते आणि माझ्या बरोबर पण फोटो काढत होते. तेवढ्यात मला एक-दोन वाक्य ऐकू आली.
" हीच ती. आपल्या विद्यापीठाच्या ऑफिस मध्ये काम करते. तिला इंडिया बद्दल जाणून घ्यायचे आहे. फार क्रेझ आहे तिला आपल्याबद्दल. त्यामुळे आज मुद्दाम गणपती फेस्टिवल बघायला आली आहे."
कुणीतरी त्या स्त्रीला आणि तिच्या लहान मुलीला गणपती बद्दल समजावून सांगत होते. " दिस इस आवर elephant headed god ! यु हेव टू जॉईन युवर hands लाईक दिस.." त्या स्त्रीला आणि तिच्या मुलीला नमस्कार कसा करायचा हे शिकवले जात होते. त्यांना हे नवीन असल्यामुळे खूप उत्सुकतेने त्यांनी हे शिकून घेतलं आणि माझ्यासमोर आल्या. दोन्ही हात जोडले. त्या स्त्रीने तिच्या मुलीला सांगितले.
" Thank You God for this day .... because of You I met new people .... i could know them ....learn new things ....and flourish my life . Let these people who have come from their
country get whatever they want . " त्या मुलीने देखील ही प्रार्थना अगदी मनापासून म्हटली. मला मनापासून उमटलेली प्रार्थना ऐकायला मिळाली. माझे त्या घरी येणे सार्थक झाले.
शेवटी ह्या भारतीय विद्यार्थी संघटनेचा गणेशोत्सव संपला. जाता जाता ती अमेरिकन स्त्री अगदी मनापासून सर्वांना धन्यवाद देत म्हणाली:
" Thank You guys for such a wonderful experience ....we came to know about the wonderful Indian culture because of You ". विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाने घोषित केले, " संघटनेचा गणेशोत्सव यशस्वीरित्या पार पडला!"
हे ऐकल्यावर मी माझ्या तीन हातांपैकी कुठला हात कपाळावर मारू ह्याचा विचार करू लागलो. कारण चौथा हात नेहमी आशीर्वाद देण्यासाठी असतोच. शेवटी भोलेनाथांचा मुलगा ना मी!
- गणपती शंकर .... ( नको! आडनाव कशाला सांगू माझं. उगीच 'राज्या'भिषेक कराल माझा!)
आशय गुणे स्मित




Friday, September 14, 2012

फिझिओथेरापिस्ट - भाग -१

नवीन शहरात किंवा गावी गेलात तर तिथे जाऊन काय करायचे ह्याचे बरेच तोडगे आहेत. खादाडीचा शौक असलेल्यांना त्या शहराचे ( किंवा गावचे ) खाद्यपदार्थ अनुभवता येतात. काहींना ऐतिहासिक वास्तू पाहण्यात रस असतो तर काहींना फक्त खिडकी पलीकडील वस्तू न्याहाळण्यात! ( ह्या दुसऱ्या वर्गातील लोकांची मला भयंकर दया येते! अहो, दुकानात टांगलेला शर्ट घेण्यासाठी कुणी यात्रा करतं का? तसले शर्ट तर आपल्या गावी असतातच की! असो...) काही लोकांना तिथल्या मातीचा, दगडांचा संग्रह करायची हौस असते! ( आता असते बाबा...काय करणार त्याला...) अगदीच लांबची यात्रा असेल तर तिथली जीवनपद्धती पाहण्यात काही लोक रमतात.( ह्यात मात्र मजा असते!) काही लोकांचा ( विशेषतः मुलींचा) तर असा समज असतो की पाच दिवसांपेक्षा जास्त त्यांचा कॅमेरा चालला नाही तर तो कायमचा बंद पडेल! त्यामुळे जातील तिथे शक्य तितके फोटो काढणे ह्या उद्योगात (?) ही लोकं रमतात! थोडक्यात काय, यात्रा आपल्या संग्रहात भर पाडते. आता माझा संग्रह कोणता ह्या प्रश्नावर माझे एकच उत्तर असते - माणसांचा! आत्तापर्यंत अनेक माणसं संग्रही करून ठेवलेली आहेत. काहींची कथा आहे तर काहींची व्यथा. पण प्रत्येकाने माझ्या मनावर त्यांचा एक ठसा उमटवला आहे एवढे नक्की! मग एखाद्या रेंगाळत जाणाऱ्या रविवारच्या दुपारी कुणीतरी काहीतरी बोलतं, किंवा कुठला तरी प्रसंग आठवतो आणि त्या प्रसंगाशी निगडीत असलेली व्यक्ती आठवते. मागच्याच आठवड्यात माझ्या पायात लचक भरली. 'होईल बरा आपोआप' हा माझा पवित्रा ह्या वेळेस मात्र मला महाग पडला. ह्याच अवस्थेत चालणे, पळणे सुरु ठेवल्याने सूज वाढू लागली आणि शेवटी ती इतकी झाली की माझ्या पायाने माझ्यापुढे हात जोडले - आता पुढे नाही चालू शकणार! मग काय, फिझिओला बोलवावे लागले. आणि त्याची ट्रीटमेंट उपभोगताना माझ्या माणसांच्या संग्रहातील एक वल्ली माझ्यासमोर येऊन उभी राहिली! लॉस -अन्जेलीस ह्या शहरी भेटलेली डॉ. नीलम दांडेकर.

माझी नोकरी ही फिरतीची आहे हे किती चांगलं आहे! म्हणजे फिरणे स्वखर्चाने होत नाही हा एकमेव विचार नाही त्यात! ( एकमेव नाही म्हणजे अनेक मधला एक नक्कीच आहे!) पण ह्या नोकरीमुळे अनेक शहरं बघायला मिळतात. आता इतकी शहरं बघितली की ती सारी स्वभावाने एक वाटायला लागली आहेत. प्रत्येक शहर हे सकाळी १०-११ पर्यंत मनसोक्त पळून घेतं. दुपारी जांभया देतं. किंचित डुलकी घेतं. ४ च्या आस पास चहा प्यायल्यावर परत ताजे-तवाने होऊन १० पर्यंत धावून परत एकदा झोपी जातं. हां, आता काही शहरं लवकर उठतात आणि उशीरा झोपतात हे खरं असलं तरी मूळ स्वभाव हा! एखाद्या गजबजलेल्या भागात एका न गजबजलेल्या bus stop वर बसून शहराची हालचाल न्याहाळण्यात जी मजा आहे ना ती कशात नाही! माझ्या कंपनीने मला कामानिमित्त लॉस- एन्जेलेसला पाठवले तेव्हाचा प्रसंग. अशाच एका शनिवारी bus stop वर बसलेलो असताना बाजूला थोडी कुजबुज ऐकू आली. शनिवार असल्यामुळे त्या जोडप्याचे बोलणे ग्रोसरी बद्दल असावे म्हणून मी फार काही लक्ष दिले नाही. पण सहज कान टवकारले तर मराठी भाषा! आता महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी कुटुंबातील एक अशा संख्येने जरी लोकं अमेरिकेत आली तरी भर रस्त्यात मराठी? त्यामुळे हे जोडपे नुकतेच लग्न करून आले असावे असा अंदाज मी बांधला आणि तो पुढे खरा देखील निघाला! आणि ह्यांच्या मराठीचे इंग्लिश होण्याआधी आपण ह्यांच्याशी ओळख करून घेऊ आणि मराठीत बोलून घेऊ म्हणून मी पुढे सरसावलो. हे होते श्री व सौ. दांडेकर. नुकतेच लॉस-एन्जेलेसला आले होते. आणि आश्चर्य म्हणजे मी राहतो तिकडेच जवळपास राहत होते.

आमची बस आली आणि आम्ही घराकडे जाऊ लागलो. जाता जाता इतके समजले की श्री. दांडेकर - म्हणजे विशाल - हा ओहायो मधून ग्रेज्यूएट झाला होता आणि गेली चार वर्ष एल.ए मध्ये राहून काम करतो आहे.
सौ. दांडेकर अर्थात नीलम हिला अमेरिकेला येऊन नुकतेच सहा महिने झाले होते. तिचे अमेरिका दर्शन हे कॅलिफोर्निया ह्या सुंदर राज्यातून सुरु झाल्यामुळे ती अत्यंत खुश होती. म्हणजे भारतातील त्रुटी तिला आठवत होत्या इतकी प्राथमिक पायरी तिची होती! आज शनिवार असल्यामुळे दोघांना बाहेर पडायला वेळ मिळाला होता आणि नवीन ओळख निघाली म्हणून नीलम जरा आनंदी वाटली. विशाल मात्र बरीच वर्ष इकडे राहत असल्यामुळे त्याला माझ्याशी झालेल्या ओळखीने फार काही आनंद झाला होता असं मला वाटलं नाही.
" आम्ही सहसा बसने प्रवास करत नाही. तिकीट काय महाग आहे हो इकडे. मी ओहायोला होतो तेव्हा मात्र परवडायचं. कॅली म्हणजे प्रचंड महाग", विशाल मला म्हणाला. त्यांची अवस्था मी समजू शकत होतो. नुकतेच लग्न झाल्यामुळे त्याला आता दोघांचा खर्च उचलायला लागत होता. इतके दिवस रूम-मेट्स बरोबर खर्च विभागला जायचा. पण आता कसले रूम-मेट्स! आता अमेरिका नावाच्या त्या संधी-राज्यात ह्या दोघांना चालायचे होते. पुन्हा भेटत जाऊ असं म्हणून ते दोघे घरी गेले. मी काही अमेरिकेत विद्यार्थी म्हणून आलो नव्हतो. त्यामुळे माझी परिस्थिती 'शून्यातून निर्माण करणे' अशी नव्हती. त्यामुळे ह्यांचं चांगलं होऊ दे असाच विचार मनात ठेवून मी घरी आलो.

आता कॅलिफोर्निया म्हटलं तर माझ्यामते तरी सर्वात जास्त भारत-प्रेम असलेलं राज्य! ह्याचा अर्थ खूप भारतीय इकडे आहेत म्हणून नव्हे! आणि भारतीय आहेत म्हणून भारत प्रेम आहे हा समज तरी कुठे बरोबर आहे? पण ह्या राज्यातील भारतीयच नव्हे तर अमेरिकन आणि इतर देशातून आलेले लोक सुद्धा भारतीय संगीत आणि कलांच्या प्रचंड प्रेमात आहेत! रवी शंकर, झाकीर हुसैन, अली अकबर खान, आशिष खान, स्वपन चौधरी ही सगळी मंडळी इकडेच तर राहतात! आणि आली अकबर खान ह्यांनी आपली म्युसिक स्कूल ह्या राज्यात उभारल्या पासून तर ह्या राज्याचं भारतीयत्व अजून वाढलं आहे! त्यामुळे झाकीर हुसैन ह्यांच्या तबला वादन कार्यक्रमात मागे तंबोरा वाजवायला चीनी माणूस बसला तरी कुणाला त्याचे विशेष वाटत नाही. किंवा आली अकबर खान ह्यांना तंबोरा साथ कुण्या एका युरोपीय माणसाने केली तरी त्यात काही विशेष नाही! इकडे लोकांना ह्याची सवयच झाली आहे. त्यामुळे वीकेंडला होणाऱ्या कार्यक्रमात बहुतांश कार्यक्रम हे भारतीयच असायचे! सुदैवाने दांडेकर जोडप्याला भारतीय संगीतात थोडा रस होता.

" अरे काय म्हणताय! बऱ्याच दिवसांनी! कसे आहात?" गुरुवारी रात्री ग्रोसरी स्टोर मध्ये पोळ्या घेताना नीलम मला भेटली.
" बरा आहे. मग अमेरिकेत दिवस खूप पटापट जातात. जवळ जवळ महिना झाला आपल्याला भेटून. लक्षात आलं असेल ना एव्हाना", मी म्हणालो.
" हो ना! पण आता मी पण थोडी रुळायला लागली आहे. इकडे येऊन ग्रोसरी विकत घेईपर्यंत किंवा थोडंफार फिरायला जाईपर्यंत मला आता माहिती झाली आहे", ती म्हणाली.
" ह्म्म्म ...बरं ते जाऊदे... शनिवारी केन झुकरमनचे सरोद वादन आहे. आपल्या इकडच्या चर्च मध्ये. येताय का दोघे?
" नाही हो. आवडले असते. पण विशालला नाही वेळ. तो उशीरा घरी येतो. जेवणाचं पण बघावे लागले ना त्यादिवशी", ती म्हणाली.
" शनिवारी पण नाही?" मी थोडासा चकित झालो. " अहो, मागच्या महिन्यात आपण भेटलो होतो ना तेव्हा कुठे जवळ जवळ दोन महिन्यांनी त्याला माझ्या बरोबर थोडा वेळ फिरता आलं होतं. त्यानंतर परत तो बिझी आहे तो आहेच!"
" कुठे आहे तो नोकरीला?"
" चेझ बँक ", ती म्हणाली. अमेरिकेत माणसं वीकेंडला मज्जा करतात एवढेच संस्कार मनावर कोरलेला मी, मला हे अगदीच नवीन होते. माझ्या ऑफिस मध्ये सुद्धा सर्व अमेरिकन शुक्रवारी दुपारी ४ लाच ऑफिस मधून पळताना मी पाहत होतो. हा प्रकार निराळाच होता! पण घरात एकट्याने बसून दिवस घालवणाऱ्या नीलमची मात्र मला थोडी कीव आली. आपण हिला सुद्धा आपल्या ग्रुप मध्ये जमवून घेतलं पाहिजे असं मला त्या दिवशी कुठे तरी वाटलं.

आमचा ग्रुप हा वीकेंडला कुणाच्या तरी घरी भेटायचा. ४-५ तास मनसोक्त गप्पा मारायचो. क्वचित कुठेतरी फिरायला जात असू. कधीतरी कुठल्या मैफलीला हजेरी लावत असू. ग्रुप मधले बरेच भारतीय हे तिकडचेच नागरिकत्व मिळवलेले. पण मनात अधून मधून भारताची चक्कर मारून येणारे! त्यांची मुलं ही वीकेंड असल्यामुळे बाहेर भटकायला जायची. आणि आमच्या ग्रुपने एका शनिवारी उस्ताद आशिष खान ह्यांचे सरोद वादन ठरवले! जवळपास खांसाहेबांचा एक शिष्य राहायचा. त्याच्या ओळखीने हा योग जमला! आणि ठरलं... शनिवार १० ऑक्टोबरला खांसाहेब ह्यांचे वादन!

आम्ही सर्वांनी खूप उत्साहाने काम केले. आमंत्रणं दिली. तिकिटे विकली. अर्थात आशिष खान हे नाव आमचे काम सोपे करत होतं. खांसाहेब नुस्क्तेच युरोपचा दौरा करून आले होते. विमानतळावर त्यांना आणायला गेलो तेव्हा गेले दोन महिने त्यांचे वादन कुठे कुठे झाले हे ऐकून थक्क होत होतो. गर्दी जमली होतीच. बरोबर वेळेत खांसाहेब तयार झाले आणि स्टेज चढणार एवढ्यात.....
त्यांच्या पाठीत दुखायला लागले. त्यांनी 'आ....' अशी जोरात आरोळी ठोकली. त्यांना उभं राहता येईना. कळवळत, विव्हळत ते खाली बसले. आम्हाला काय करायचे काही कळेना. लगेच एकाने डॉक्टरला फोन करायला सुरुवात केली. पण आमचा हा एरिया थोडासा शहरापासून बाहेरच्या बाजूला होता. त्यामुळे डॉक्टर यायला वेळ लागणार होता. खांसाहेब काही कळवळायचे थांबत नव्हते. आणि अचानक एक मुलगी पुढे आली. तिने खांसाहेबांना हळुवारपणे पोटावर झोपवले. कुणीही काहीही बोलायच्या आत चटकन लचक भरलेला भाग शोधून काढला. आणि हळुवार मसाज द्यायला सुरुवात केली. खांसाहेब हळू हळू शांत होऊ लागले. आणि तो मसाज इतका चांगला जमला की डॉक्टर येईपर्यंत खांसाहेब उठून उभे राहिले.
" तुम्हाला ए.सी मध्ये वारंवार वावरल्यामुळे असं झालाय. थोड्याशा स्ट्रेचिंगची गरज आहे", नीलमने अगदी आत्मविश्वासाने आणि ठामपणे खांसाहेबांना समजावले. आणि तिने त्यांना हलके व्यायाम पण करून दाखवले. खांसाहेब प्रचंड खुश होते. आलेल्या डॉक्टरांनी देखील नीलमचे खूप कौतुक केले. ह्या मुलीने आम्हाला काहीच काम नाही करू दिले....स्वतः खूप चांगले हाताळले वगेरे तारीफ केली. आम्ही सारे अर्थात अवाक होऊन बघत होतो.
" यह लडकी कमाल है! जिस बारीकी से हम हमारे आलाप बजाते है ठीक उसी बारीकी से इसने हमारा इलाज कर दिया!" खुद्द खांसाहेब असं म्हणाल्यावर आम्ही काय म्हणणार? त्यादिवशी खांसाहेबांनी इतके उत्कृष्ट वादन केले की अजून सुद्धा ते माझ्या तंतोतंत लक्षात आहे! आणि मुख्य म्हणजे नीलम वर खुश होऊन त्यांनी आमच्याकडून बिदागी पण घेतली नाही. मैफलीनंतरच्या खांसाहेबांच्या घेरावानंतर आता नीलमचा घेराव झाला. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मी देखील त्यात सामील होतो.
"हे सगळं तुला कसं काय सुचलं? कमाल आहे तुझी!" मी आनंदाने म्हणालो.
"अहो, जमायचे काय...माझे ते क्षेत्र आहे", ती हसत हसत म्हणाली.
"म्हणजे?"
"अहो! मी डॉक्टर आहे. भारतात फिजियोथेरपी केली आहे. डॉ. नीलम दांडेकर!"
त्या गर्दीत आश्चर्य वाटणाऱ्या लोकांपैकी मी काही एकटा नव्हतो!




आशय गुणे स्मित

Wednesday, August 29, 2012

लग्न

कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?
तो तर 'पद' बघून मांडलेला एक खेळ असतो!

हौशी आत्या आणि लांबच्या मावश्या,
हुडकून आणणार उमेदवारी नाती!
" अहो, जोश्यांचा मुलगा लग्नाचा आहे",
" अहो ह्यांची मुलगी लग्नाची आहे ",
ह्याचसाठी तर त्यांचा जन्म असतो ..
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?



आई म्हणे ताईने आणलं स्थळ,
बाबा म्हणे दादाने सुचवले नाते
' रेफर' करण्यात कधी चुकतील का ते?
हेच नातं योग्य हा 'मान' त्यांचा असतो
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

मग सुरु होते विचारपूस, चालू होते चौकशी,
काय करतो मुलगा, 'काही करते की नाही' मुलगी!
मुलगा असतो डॉक्टर किंवा असतो इंजिनिअर,
क्वचित असतो सी. ए, मुलगी मात्र पदवीधर!
पण मुलीच्या बापास हाच जवाब पुरेसा असतो
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

एक तारीख ठरते, येतात मुलाकडले घरी,
किचन पासून 'ट्रे' घेऊन, घडते अभिनयाची वारी!
" आज तुम्ही येणार म्हणून हिने केले पोहे",
" अहो, नोकरी सांभाळून स्वयंपाक देखील करते हो!"
मुलाकडले निश्चिंत, मुलगा आपला स्थिर,
कारण 'पगार' हा त्याचा एकमेव निकष असतो
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

पण तरीही होते थोडीशी चौकशी, मुलाची.
"हा बनवतो प्रोग्राम, पुढच्या वर्षी परदेश गमन नक्की! "
पण ह्याचा आनंद मुलीकडल्यांच्या चेहऱ्यावर अधिक असतो.
शिवाय प्रोग्राम टी.व्ही चा की कॉमप्युटर चा ह्याचाच त्यांना पत्ता नसतो!
कारण 'एन. आर. आय' शिक्क्याचा आनंद त्यांच्यासाठी मोठा असतो  
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

मग प्रश्न येतो मुलीच्या इतर आवडींचा, तिच्या छंदांचा.
"ही गाते चांगली, चित्रकलेत प्राविण्य आहे!"
" हो, शिवाय स्वयंपाक देखील उत्तम करते...."
पण मुलाला हा प्रश्न असतो 'ऑप्शन' ला!
कारण येताना तो 'गाडी' चालवत आला ह्याचा वेध घेतलेला असतो
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

शेवटी मुलगी बसते बाजूला,
तिचेच ठरणारे नाते बघत.
आणि मुलगा असतो तिथे,
आधीच 'ठरलेल' नाते ठरवत!
आपली मुलगी तिकडेही बहरेल का हा सवाल नसतो,
कारण आपण 'मुलगी देतो आहे' हाच सतत विचार असतो!
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो?

पुढील वर्षात चित्र असे काही असते:
मुलगा राबतो अमेरिकेत, होतो गोऱ्यांचा गडी!
मुलगी बसते फेसबुकवर,
घेते 'फार्मविले' मध्ये उडी!
तिचे कधी काळचे गाणे होते आता अंगाई,
घरात असतो पाळणा, होते त्याची सरबराई!
कारण 'arrange marriage ' हा कधीच झालेला ठराव असतो,
कोण म्हणे लग्न दोन जीवांचा मेळ असतो? 

- आशय गुणे  :)

Sunday, August 26, 2012

इच्छा

इच्छा

ऋषीतुल्यातला ऋषी मी
साऱ्यातला तारा मी       
गर्दीतला दर्दी मी                                         
आयुष्यात असे स्थैर्य
सतत सदैव मागतो मी

साहित्याचे पांघरूण असू दे,
संगीताची कुशी मिळू दे,
आयुष्यात अशी ऊब
सतत सदैव मागतो मी!

भाषांचे आसन असू दे,
ज्ञानाचे छत्र असू दे,
आयुष्यात अशी सावली
सतत सदैव मागतो मी!

दिग्गजांचा लोभ असू दे,
सामन्यांची ओढ असू दे,
आयुष्यात अशी मंडळी
सतत सदैव मागतो मी!

नम्रतेची काठी असू दे
विचारांच्या कुबड्या असू दे
अदृश्य हा असा आधार
सतत सदैव मागतो मी!


- आशय गुणे :) :)

Wednesday, August 15, 2012

Independent India's First Cabinet of Ministers

Yes, I chose the internet to put my views before you all. Not ( only) because I have a blog here but because of the pessimists I see on the internet these days! The views that arise from these minds is a matter of grave concern! I see India being compared to Cuba, Pakistan and Bangladesh when it comes to Petrol Prices.( that they being  dictatorial countries is tactfully neglected!) I see a photo shop technique being employed to portray Gandhi kissing a lady, a smoking Jawaharlal Nehru is displayed and his patriotism is questioned ( Smoking and patriotism? Maybe, Winston Churchill was also not a patriot then!) I see messages targeting our political leaders without acknowledging a single good deed that they have done for this country so far! I see people claiming that this country has no developed even a bit in the past 66 years of its independent existence.

Yeah! These people have the Indian National Flag as their profile picture every 15th August and 26th January. ( Sorry not to acknowledge your patriotism guys!)

But what has made these people such pessimists? Have they not acknowledged the fact that every country around India has failed to implement Democracy since the end of British imperialism? Have they forgotten the fact that barring a few ( by no means insignificant) instances, Indian Democracy has sailed a great journey? Don't they know that from a stage where for India it was impossible to feed its own people, it has now achieved complete self-sufficiency? Or maybe they don't see the telecom revolution which has connected every corner of the country with telephones. Maybe for them India's ability to defend its own people goes unnoticed. These people are unaware of the fact that from a point in history where it was thought that India ( with its 5000 years history of monarchy and hierarchy) will ultimately be a failed state, it has in fact made a stride to become the largest democracy of the world! India's views are taken rather seriously in World Affairs and it is soon to be a key ( or maybe it already is) player in the United Nations! I firmly believe that India's economic policies, foreign policies, defense diplomacy have made it a key player in World Affairs - the roots of which lie in her own people, imbibed through a supremely drafted constitution!  So who were the people who made these things possible? I firmly believe it was the first cabinet ministry of Independent India who brought such a sweeping change in the minds of we Indians. I won't say that we were not fit for a democratic government! But modern democracy was a new phenomenon for us! We Indians owe a lot to these people for rooting the spirit and values of democracy in the common Indian mind.

Thursday, August 2, 2012

माझा मित्र डेविड रामोस

परवाच माझ्या फेसबुकच्या भिंतीवर एक नवीन 'पोस्टर' लावले गेले. ( wall वर post करणे ह्याचा मराठीतला वापर म्हणा हवं तर - 'पोस्टर' लावणे! आणि 'wall ' असल्यामुळे व्यावहारिक देखील! असो.. ) एरवी गुलाबातून रक्त सांडणारा किंवा अश्रू ढाळणाऱ्या एखाद्या सदैव उदास मुलीचा फोटो किंवा गुढीपाडवा, बैल-पोळा,दिवाळी,ईद, क्रिसमस ते पार 'thanks giving ' पर्यंत तुम्हाला शुभेच्छा देणारा एखादा फोटो अगर एखाद्या राजकीय नेत्याची नसलेली कारकीर्द उगीच उजळणारा संदेश किंवा एका पक्षामुळे आपला देश कसा लुटला जातोय आणि आपल्या देशात काडीमात्र प्रगती कशी झाली नाही असले 'पुरावे' देणारे माहितीपत्र - ह्यांच्यापैकी त्या 'पोस्टर' मध्ये काहीही नव्हते ही खरच एक सुखद बाब होती! उलट त्यात होती एक बातमी. अमेरिकेत स्थायिक असलेल्या काही उगवत्या कलाकारांनी प्राचीन भारतीय संगीत आणि 'jazz ' संगीत ह्यांचे 'फ्युजन' करायचा प्रयत्न केला आहे. त्यातील 'शंकर टकर' हे नाव बऱ्याच जणांनी ऐकले देखील असेल. हा एक अत्यंत प्रयोगशील ग्रुप आहे आणि इंटरनेट विश्वात बरीच प्रसिद्धी पावलेला देखील! तर ह्या ग्रुपची एक रचना असलेला 'video ' होता आणि त्यात काम करायची संधी मिळाली आहे हे सांगणारी एक बातमी! 'पोस्टर' माझ्या मित्र डेविडने लावले होते आणि ही बातमी म्हणजे त्याने संगीत क्षेत्रात किती प्रगती केली आहे ह्याची साक्ष!

डेविड म्हणजे डेविड रामोस. हा 'ओकारीना' नावाचे एक दुर्मिळ वाद्य वाजवतो. तशी त्याला बाकी वाद्य देखील वाजवता येतात. पण मुख्य वाद्य हे. माझी आणि डेविडची पहिली भेट लगेच मला आठवली. माझ्या विद्यापीठाच्या ( university ) संगीत विभागात मी 'भारतीय संगीत' ह्या विषयावर एक तासभर लेक्चर दिले होते. त्यात सुरुवातीला जवळ-जवळ २० मिनिटं माझे पियानो वादन झाले होते आणि नंतरची ४० मिनिटं लेक्चर. ( पहा : http://www.relatingtheunrelated.blogspot.in/2011/11/blog-post.html ) ह्या लेक्चरच्या आधी वर्गाचा अंदाज यावा आणि प्रोफेसर डॉ. ब्रील ह्यांच्या शिकवण्याची शैली कळावी म्हणून त्यांच्या एका लेक्चरला मी हजेरी लावली होती. मी जरी बायोलॉजीचा विद्यार्थी असलो तरीही अख्ख्या विद्यापीठात कोणत्याही लेक्चरला बसायला परवानगी होती.ज्ञान-दान ह्या विषयी अमेरिकेत खूप आस्था आहे. ( आता ह्या लोकांनी विद्यापीठाची लायब्ररी शहरातल्या सर्वांसाठी 'फ्री' ठेवलेली आहे तर कुणालाही कुठल्याही लेक्चरला बसायची परवानगी देणे ह्यात काही खूप आश्चर्य वाटायचे कारण नाही! असो... ) तर ह्या लेक्चरला डॉ. ब्रील ने माझी ओळख करून दिली. " हा आशय. भारतातून आला आहे....आपल्याला भारतीय संगीताबद्दल पुढे लेक्चर देणार आहे...आणि आपल्या कॅम्पस मध्ये एक 'world music group ' स्थापन करायची ह्याची इच्छा आहे. तर इच्छुक व्यक्तींनी त्याला प्रतिसाद द्यावा...खरं तर तुम्ही सर्वांनी त्याला प्रतिसाद द्यावा अशी माझी इच्छा आहे." 'मेक्सिकोचे मरियाची संगीत' हा विषय असलेले ते लेक्चर संपले पण नंतर कुणीही माझ्या प्रस्तावाकडे फारसे लक्ष दिले नाही. सारे घरी जायच्या घाईत होते. कदाचित इकडे आपल्याला फार प्रतिसाद मिळणार नाही असा निष्कर्ष काढून मी निघायच्या तयारीत असतानाच मागून एक आवाज आला. " अशय... is that how you pronouce your name ?" मी त्याला 'आशय' हे माझे नाव समजावले आणि आमची चर्चा सुरु झाली. ( पुढे मी अमेरिका सोडेपर्यंत त्याने मला 'अशय' च म्हणणे सुरु ठेवले!) डेविडला माझा प्रस्ताव आवडला होता. त्याला एकूणच 'world music ' बद्दल उत्सुकता आहे हे समजले. वर्गात मी आणि तो बोलत बसलो होतो. मी पियानो वाजवतो हे समजल्यावर वर्गात ठेवलेल्या पियानोकडे इशारा करत त्याने मला वाजवायची विनंती केली. मी पियानोवर बोटं ठेवली आणि वर्गातल्या अतिउच्च दर्जाच्या 'sound system ' चा अनुभव घेतला. संगीताचा वर्ग असावा तर असा! जवळ जवळ २० मिनिटे चाललेला 'राग यमन' त्यादिवशी डेविडने मन लावून ऐकला. 'काहीतरी वेगळं ऐकू येतंय' म्हणून कदाचित ८-१० लोकं पण जमली. सगळेच विद्यार्थी. त्या दिवशीपासून माझी आणि डेविडची मैत्री सुरु झाली. आज देखील सुरु आहे. स्मित

त्यानंतर आम्ही फेसबुकवर 'connect ' झालो. अमेरिकेत शक्यतो मित्र होण्याची ही प्रथम पायरी असते. भारतासारखे ' अरे ...नंबर दे रे...तुला मिस कॉल देतो...आला का मिस कॉल...हो, माझाच नंबर आहे...सेव कर...मला मिस कॉल दे...' हे शक्यतो लगेच होत नाही. privacy जपणारा देश आहे न हा. विद्यापीठात मुलांचे 'कळप' फार क्वचित दिसतात ( मुलींचे नाही म्हणत...त्यांचे 'कळप' तर भारतात सुद्धा दिसत नाहीत.. त्यात विशेष काहीच नाही म्हणा...) ह्याचे कारण हे इथपासून सुरु होत असावे. दरम्यान फेसबुकवर थोडी चर्चा होत होती. 'World Music Group ' साठी काय करता येईल ह्याबद्दल थोडा विचार केला जायचा. तो त्याच्या मित्रांना देखील सांगणार होता. पण मी ठरलो बायोलॉजीचा विद्यार्थी. सतत lab मध्ये काम करावे लागत होते. शिवाय त्याच वेळात मला मोटेल मध्ये जॉब लागल्यामुळे त्याचा वेळ सुद्धा जमवावा लागत असे. सप्टेंबर महिन्यातील दिवस ह्या गोष्टींमुळे भरभर जात होते आणि अचानक डेविडने मला एका शुक्रवारी भेटण्याबद्दल विचारले. परीक्षा वगेरे आटोपल्या होत्या आणि त्या दिवशी मोटेलची शिफ्ट पण नव्हती. मी लगेच होकार कळवला. शुक्रवारी दुपारी आम्ही लंच एकत्र करायचे ठरवले. आणि आमचे laptops सामोरा-समोर ठेवून आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली. तेव्हाच त्याने मला त्याचे 'ओकारीना' हे वाद्य प्रथम वाजवून दाखवले. " मी तुला हे वाद्य दाखवतो. तुला पहायचं आहे....इकडे २ मिनिटात कशी शांतता पसरते? थांब मी वाजवतो...". आणि त्याच्या वाजवण्याने खरोखर २ मिनिटात आजूबाजूच्या टेबलवरच्या मुला-मुलींचे लक्ष आमच्याकडे गेले. हा मुलगा त्याच्या क्षेत्रात किती मुरला आहे हेच दिसून येत होते. आणि हे सांगताना त्याचा पाय जमिनीवर ठेवून देहबोलीतून ( body language ) वाहणारा आत्मविश्वास सुद्धा! त्या दिवशी त्याच्याबद्दल प्रथम कळले. हा मुलगा 'san antonio ' ह्याच शहरात राहत होता. रोज बसने प्रवास. क्वचित सायकल आणत असे. कधी गिटार वगेरे आणायचे झाले तर सायकल आणणे रद्द! अत्यंत धार्मिक. सदैव देवाचे ( Jesus Christ ) आभार मानणारा. मी आज जो काय आहे तो त्याच्या कृपेमुळे वगेरे म्हणणारा. पण धार्मिक ह्याचा अर्थ आपलेच मूळ जपणारा असं नव्हे. नाहीतर एवढ्या उत्सुकतेने भारतातील संगीत ऐकायला तो आला नसता. चर्च मध्ये वाजवणे, बाहेर ग्रुप मध्ये वाजवणे हे सगळं सुरु होतंच. पण ' I want to know more about music all over the world ' हे त्याने बोलून दाखवले. आणि ह्याच दिवशी त्याच्या आवडीच्या कलाकारांमध्ये एक भारतीय नाव सामील झाले - उस्ताद झाकीर हुसैन! लंच झाल्यावर त्याने भारतीय संगीताचे काही नमुने ( म्हणजे ' samples ' ...'नमुना' नव्हे! ) ऐकायची इच्छा व्यक्त केली आणि लगेच मी तबला ऐकवायला सुरुवात केली. 'You Tube ' वर झाकीर वाजवू लागला.

" मी आतापर्यंत बरीच तालवाद्य ऐकली आहेत. पण त्यात एकतर 'sticks ' वापरतात किंवा अख्खा हात. हा माणूस तर नुसती बोटं वापरतोय. how is it possible ? आणि ह्या पाच बोटांच्या जोरावर अख्खा rhythm तयार होतोय! This must be really great . मला ह्या माणसाला ऐकायला नक्कीच आवडेल. हा कुठे राहतो? अमेरिकेत perform करतो का? " त्याने बऱ्याच उत्साहाने हे विचारले. पण हा उस्ताद लॉस-अन्जेलेस मध्येच राहतो हे ऐकल्यावर त्याला अजून आश्चर्य वाटले. मला कधीतरी ह्याच्या कार्यक्रमाला घेऊन जा अशी विनंती त्याने त्या दिवशी केली. मी अर्थात होकार दिलाच. पुढच्या महिन्यात झाकीरभाईंच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्युस्टनला जायचा योग आला. तेव्हा काही डेविडला माझ्या बरोबर येणे जमले नाही. पण मी तिकडून परत आल्यावर मैफल कशी होती हे विचारायला तो विसरला नाही. मी उस्ताद बरोबर काढलेल्या फोटोबद्दल माझे अभिनंदन पण केले. पण ह्याच महिन्यात ह्युस्टन वरून आल्यावर वर सांगितल्याप्रमाणे ह्याच्या 'world music ' च्या वर्गात माझे लेक्चर आयोजित केले होते. आधीच झाकीरभाईंना भेटल्यामुळे उत्साह द्विगुणीत होता. लेक्चर खूप छान झालेच. माझे वादन पण मुलांना आवडले आणि मी दाखवलेली भारतीय वाद्य पण मुलांना खूप आवडली. त्यात शेवटी झाकीरभाईंची 'video clip ' दाखवताना तर पोरांनी बाक वाजवणे बाकी ठेवले होते. कुणी हवेत बोटांचे इशारे करीत होते तर कुणी डोलून तालाला दाद देत होते. आणि ह्या दिवसानंतर डेविड ने झाकीरभाईंना नीट ऐकायला सुरु केले. मी फेसबुकवर 'share ' केलेल्या तबल्याच्या चित्रफिती ( videos ) तो आता ऐकू लागला होता. आणि माझ्या लेक्चरच्या जवळ जवळ आठवड्यानंतर मला फेसबुकवर डेविडने झाकीर हुसैन चे पेज
'लाईक' केल्याचे आढळले. आपले लेक्चर सार्थक झाल्याची थोडीफार भावना त्यादिवशी माझ्या मनात निर्माण झाली.
डेविड नंतर कॅम्पस मध्ये भेटायचा. अमेरिकन विद्यापीठाचे कॅम्पस एक उत्साही ठिकाण असते. कुणी skate board वरून मुक्त विहार करत असतं तर कुणी सायकल चालवत चालवत वर्ग असलेल्या बिल्डींग पर्यंत जात असतं. काही मुलं छोट्या घोळक्यात पुस्तकं घेऊन जात असतात तर काही कृष्णवर्णीय मुलं नाचणे आणि चालणे ह्यांचा समन्वय साधत बर्यापैकी आवाज करीत स्वतःच्ता अस्तित्वाची जाणीव करून देत असतात. काही मुलं सदैव काहीतरी चरत असतात तर काही मुलं खाण्या-पिण्याचे stall टाकून उभी असतात. ( ह्यातील पदार्थ विकून कुणालातरी मदत म्हून निधी जमविण्यासाठी). काही मुलांना आपापल्या 'students organization ' चा प्रचार करायचा असतो तर काही मुलं विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत असतात. कुठे 'आज रात्री ९ वाजता अमुक अमुक सिनेमा आहे....फुकट आहे....जरूर या' ही पाटी...तर कुठे तरी ' अमुक अमुक मुलाला/ मुलीला अध्यक्ष म्हणून निवडून आणा हा बोर्ड ( banner नव्हे!). काही मुलं हवामान चांगले असल्यास 'flying dish ' ची मजा लुटत असतात तर काही मुलं चक्क रग्बी खेळत असतात. कुणी जॉग्गिंगच्या प्रेमात तर कुणी चालण्याच्या. ह्याच भारतीय मुलाला विश्वास न बसणाऱ्या वातावरणात अजून एका गोष्टीचा समावेश असतो. ती म्हणजे मुक्त कंठाने गाणारी किंवा वाद्य वाजवणारी मुलं. आणि ह्या सर्वांकडे बघून जाणारी नाकाचा केवळ मुरडण्यासाठी वापर न करणारी अमेरिकन मुलं! डेविड हा बऱ्याचदा मला गिटार वाजवताना आणि गाताना दिसायचा. आजूबाजूच्या लोकांकडे त्याचे अजिबात लक्ष नसायचे. आपल्याच कलेत गुंग! देवाची स्तुती करत गाणी म्हणणे त्यात प्रामुख्याने. त्याच्या बाजूला जाऊन उभे राहावे लागायचे. मग काही सेकंदाने त्याला लक्षात यायचे. " वो देख तेरा दोस्त...येडे माफिक बजाते बैठा है...", अशी वाक्य माझे मित्र मला बऱ्याच वेळेस बोलून दाखवायचे.

पण डेविडची हीच कला जवळून अनुभवायची संधी आम्हाला त्या दिवसात मिळाली. प्रत्येक अमेरिकन विद्यापीठात Indian Students Association ही संस्था आहे. विद्यापीठात येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांना airport वरून आणायचे ( बहुतेक वेळेस विनामुल्य) , त्यांची तात्पुरती राहण्याची सोय करणे ( त्यांना स्वतःची भाड्याची apartment मिळेपर्यंत) इथपर्यंत ही संस्था खूप चांगलं काम करते. पण ह्याच्या व्यतिरिक्त होळी साजरी करणे, दिवाळी साजरी करणे आणि १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ह्या दिवशी भारताचा झेंडा उभारणे हे सोडून ह्या संस्थेत काही विशेष होत नाही. ह्याचा अर्थ ह्या गोष्टींना माझा विरोध आहे असं नव्हे. परंतु लहानपणी भूगोलात ' भारत हा अमुक इतक्या राज्यांमध्ये विभागलेला आहे' हे वाक्य जेव्हा आपली पोरं खरं करून दाखवतात तेव्हा ह्या गोष्टींबद्दल विशेष आस्था वाटत नाही. आणि २१ व्या शतकातील परदेशातल्या भारतीय मुलांची ही 'कर्म-कांड' होऊन बसतात. तर ह्याच संस्थेच्या दिवाळी सोहळ्याची तयारी आम्ही करीत होतो. कार्यक्रम कुठले ठेवायचे हा विचार सुरु असतानाच एकदम डेविडच्या 'ओकारीना' ह्या वाद्याची आठवण झाली. एरवी 'फक्त बॉलीवूड' ( किंवा त्या त्या राज्यातील चित्रपट संगीत) असलेल्या ह्या सोहळ्यात काहीतरी वेगळं करण्याचा आमचा मनसुबा होताच. डेविडने माझे आमंत्रण अगदी एका क्षणात स्वीकारले आणि त्याच्या वाजवण्याने धम्माल आणली. कार्यक्रम बरोब्बर संध्याकाळी ६:३० वाजता सुरु होणार होता. डेविड ६:१५ लाच हॉल वर हजार! आणि प्रत्येक भारतीय कार्यक्रम असल्याप्रमाणे आमचाही कार्यक्रम ७:२० वाजता सुरु झाला! अधून -मधून माझे लक्ष डेविडकडे जात होते. पण त्याला कसलाही त्रास वाटत नव्हता. उशीर झाला आहे ह्याबद्दल नाराजी नव्हती. एवढेच काय, तर नंतर बऱ्याच गोष्टींना तो अगदी मनापासून दाद देत होता. बॉलीवूडची नृत्य, गाणी हे मस्त एन्जॉय करीत होता. पण त्याची वेळ आली तेव्हा मात्र अगदी आत्मविश्वासाने त्याने आपली कला सादर केली. त्या छोट्या वाद्यावर त्याने अमेरिकन लोकधुना वाजवून लोकांची दाद मिळवली. इतकेच नव्हे, तर 'हा कोण मुलगा...आणि हे कुठलं वाद्य' अशी भावना मनात ठेवून नुसता आरडा-ओरडा करणारे प्रेक्षक (?) सुद्धा शांत बसून त्याच्या वादनाला दाद देऊ लागले. आणि खरी धमाल तर पुढे आली. माझ्या एका मित्राने एका गिटार वाजवणाऱ्या त्याच्या अमेरिकन मित्राला वाजवायला बोलावले होते. डेविड आणि ह्या मुलाची अजिबात ओळख नव्हती. पण दोघांचे 'solo ' वादन झाल्यावर त्यांनी ५ मिनिटं ( हो फक्त ५! ) एकमेकांशी चर्चा केली आणि स्टेजवर जाऊन सह-वादन केले! जुगलबंदीच म्हणा ना! आम्हाला सर्वांना पर्वणीच होती ही. त्यांचे 'co - ordination ' अगदी जबरदस्त होते. दिवाळी सोहळ्यातील ह्या दोघांचे वादन नक्कीच सर्वोत्कृष्ट ठरले. " सॉरी...मला फेमिली बरोबर डिनरला जायचं आहे...मी पूर्णवेळ नाही थांबत...पण मला खूप मजा आली...मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद!" शेवटी जेवायचा आग्रह करताना डेविड मला आनंदाने म्हणाला.

बाकी डेविड बराच family -attached ' होता. त्याच्या फेसबुकच्या 'status message ' मध्ये बऱ्याच वेळेस परिवाराचा उल्लेख असायचा. एकंदर त्याचा परिवार बराच 'conservative christian ' असावा. बऱ्याच वेळेस jesus christ ची स्तुती असायची. किंवा family dinner चा एखादा उल्लेख असायचा. म्हणूनच कदाचित मी 'las vegas ' ला जाणार आहे हे कळल्यावर इतरांनी दिलेले सल्ले किंवा मी तिकडे काय करू शकतो ह्याबद्दल केलेल्या कल्पना ह्यापेक्षा वेगळा संदेश डेविड ने पाठवला होता. " स्वतःची काळजी घे. I wish you a safe journey and I pray to God that you do not fall for any unwanted and unethical temptations ' असं त्यात लिहिलं होतं.

पुढे पुढे नवीन संगीत आत्मसात करताना डेविड ने तबला आणि झाकीर हुसैन ह्यांना मात्र एक स्वतंत्र स्थान दिले होते. अधून मधून माझ्या posts ना 'likes ' येत होत्या. मला अगदी व्यवस्थित आठवतंय. उस्ताद अल्लारखा आणि उस्ताद झाकीर हुसैन ह्यांचा एक 'video ' मी फेसबुक वर टाकला होता. ' newton and einstein of Tabla ' असं मी त्याचं वर्णन केलं होतं. प्रत्येक तबला वादनासारखं ह्या दोघांनी पण काही बोल तोंडाने बोलून नंतर वाजवले होते. डेविडला ह्याबद्दल फार उत्सुकता होती. लगेच संदेश पाठवला गेला ( फेसबुक वर). मला ह्या तबल्याची 'divine ' भाषा शिकायची आहे. माझी खूप इच्छा आहे. शिकवशील? ' आता मला कुठे तबला वाजवता येतो? पण ह्या दिवसानंतर मला भेटून संगीत-चर्चा करायचा बेत तो आखू लागला. आपण कधीतरी भेटून एकत्र वाजवले पाहिजे आणि दिवसभर फक्त संगीत ऐकले पाहिजे असं तो मला बऱ्याच वेळेस म्हणू लागला. वेळ काही जमत नव्हती. आणि असं घडण्यासाठी मी अमेरिका सोडायच्या आधीचा एक आठवडा उजाडला. आपण दुपारी मित्राकडे खेळायला जावं किंवा गप्पा मारायला जावं असाच तो प्रकार होता. अगदी एका भारतीय मित्रसारखाच....
फेसबुक वर ह्याचा संदेश आला. 'गेले बरेच दिवस आपण ठरवतोय.....एकत्र मैफल करायची आहे...कधी करूया? आता तर तू चालला आहेस!'
" ह्या एका आठवड्यात कधीतरी जमवुया", मी उत्तर पाठवले.
"शुक्रवारी दुपारी जमेल का? माझा सकाळी क्लास झाला, की मी मोकळा आहे...दुपारी दोन वाजेपर्यंत आहे...तू ६०३ नं ची बस पकड....माझ्या घराच्या समोर थांबते! जाताना ८.०० वाजता तुला परत घरी जायला बस आहेच!" दुसऱ्या दिवशी लगेच उत्तर. आणि खाली त्याने त्याचा पत्ता पाठवला. मी लगेच होकार कळवला.
मी लगेच 'गुगल' वर नकाशा सुरु केला! ह्याचा पत्ता शोधला आणि तो bus stop सुद्धा. शुक्रवारी ठरल्याप्रमाणे मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि तिकडून मला त्याच्या घरी न्यायला तो स्वतः आला. मी त्याला लांबूनच ओळखले! रस्त्यावरच्या सगळ्या गाड्यांमध्ये एक स्वारी सायकलवरून येत होती.
त्याच्या घरी आलो.हा एका छोट्याश्या घरात एकटा राहतो! समोर आल्या आल्या वेगवेगळ्या प्रकारची वाद्य ठेवलेली दिसतात. समोरच 'केसियो' आहे. एक गिटार आहे. आणि ह्या सगळ्याच्या बाजूला त्याचा laptop . त्याने मला बसायला खुर्ची दिली. सुरुवातीला इकडचे-तिकडचे विषय निघाले. त्याच्या बोलण्यावरून इतकेच कळले की ह्या मुलाचा परिवार त्याच शहरात राहत होता. परंतु खर्च खूप होत असल्यामुळे ह्याने नवीन apartment मध्ये आपले बस्तान बसवले. संगीताचा अभ्यास व्यवस्थित होतो हे देखील एक कारण होतेच. सबंध घर हे ' 1BHK ' होते. त्यामुळे भाडे कमी. हा बाहेर नोकरी करून स्वतःचा खर्च भागवायचा. आणि ओकारीना ह्या वाद्याचे 'video ' youtube ' वर अपलोड करून त्या बरोबर advertisement च्या सहाय्याने अधिक डॉलर्स कमवायचा. इतर अमेरिकन लोकांसारखे मिळकत आणि बचत हे विरुद्धार्थी शब्द त्याच्याही आयुष्यात होते.
अशाच थोड्या गप्पा झाल्यावर त्याने लगेच 'यु-ट्यूब' सुरु केले. आणि मग आमची चर्चा सुरु! त्याने मला त्याच्या आवडत्या सगळ्या कलाकारांची गाणी ऐकवली! अमेरिकन संगीत काय असतं, जाझ , पॉप्युलर संगीत ह्या सगळ्यांवर चर्चा झाली. त्याने ऐकवलेले संगीत खरच खूप चांगले होते. पण त्याला जास्त उत्सुकता होती ती आपल्या संगीताची.

" त्यादिवशी तुझ्या लेक्चरला सर्वात काय जर आवडले तर 'झाकीर हुसैन' चा तबला! मला तबला काय असतो....कसा असतो...कसा वाजवतो ते सांग ना! त्याची भाषा मला खूप divine वाटते." त्याने ही गोष्ट मला परत सांगितली. मी तबला वाजवत नाही हे प्रथम त्याला सांगून त्याला असंख्य 'चित्रफिती' दाखवायला सुरुवात केली. संगीतात दर्दी असलेल्या सगळ्या अमेरिकन लोकांसारखे ह्याला 'रवी शंकर' नवीन नव्हते. पण त्यांच्याबद्दल सुद्धा त्याला अजुन थोडे सांगितले. वेग-वेगळी वाद्य दाखवली. आणि मग शेवटी विषय गायनाकडे आला! त्याला गायन कसे करतात ह्याच्यावर जास्त माहिती हवी होती.
माझ्या मनात काय आले काय माहिती. मी त्याला 'beatles ' चे norwegian wood हे लावायला सांगितले. आम्ही दोघांनी ते ऐकले आणि त्याला नंतर 'पवन दिवानी' हे लता चे गाणे ऐकवले. तो संगीत शिकत असल्यामुळे साहजिकच त्याला दोन्हीत साम्य जाणवले. मग त्याला 'राग' ह्या विषयाकडे मी घेऊन आलो.
"हे आपण ऐकले....तो राग बागेश्री." मी सांगितले. त्याला समजत होतं! काहीतरी नवीन शिकतोय ह्याचा आनंदसुद्धा होत होता. मग त्याला त्यादिवशी सगळे प्रकार ऐकवले....अभंग, ठुमरी,कवाल्ली, ख्याल, सिनेमा-संगीत... इतकेच काय, तर लोकसंगीत सुद्धा!

"हे सगळं तुमच्या एका देशात कसं काय? एवढा वेगवेगळ्या प्रकाराने नटलेला आहे तुमचा देश?" त्याला हे चमत्कारिक वाटत होतं. पण सारखा सारखा तो 'झाकीर हुसैन' कडे वळत होता! त्याच्या तबल्याने त्याला वेड लावले होते आणि ते उतरणे शक्य नव्हते. साहजिकच आहे म्हणा. आमचे कुठे उतरले आहे अजुन?
मग विषय आत्ताच्या संगीताचा सुरु झाला. "अमेरिकन संगीतात आणि एकूण पॉप्युलर संगीत म्हणजे 'पॉप' मध्ये एकेकाळी melody म्हणजेच 'चाल' हा प्रकार होता! एकेकाळी म्हणजे अगदी ५-६ वर्षांपूर्वी! आता सगळं rhytm वर आधारित आहे! त्यामुळे तेवढी मजा येत नाही!" डेविड ने आपले प्रामाणिक मत दिले. आश्चर्याची गोष्टं म्हणजे आपल्याकडे देखील हेच निरीक्षण मी करत आलोय. असो...
"तू लाइव कार्यक्रम ऐकायला जातोस का? " मी सहज विचारले
"आज-काल जेव्हा 'पॉप म्युसिक' गातात, तेव्हा 'माईक' च्या आधी एक software ठेवलेले असते. ते तुमचा आवाज सुधारते आणि मग तुम्ही आपोआप सुरात येत. त्यामुळे असे कृत्रिम कार्यक्रम मी का बघू? त्याच्यात डॉलर का खर्च करू?" डेविड ने परत एकदा प्रामाणिक पण थोडे धक्कादायक विधान केले.
"मग 'एन्रिक इग्लेसिअस', ब्रिटनी स्पिअर्स', 'लेडी गागा' सर्व असंच करतात का?" मी विचारले. त्यावर त्याचे उत्तर अगदी स्पष्टं होते - 'होय!'
मला हे कलाकार माहिती नसणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे असं तो समजत नव्हता. माझ्या देशात अगदी उलटी परिस्थिती आहे. हे कलाकार जणू आपलेच आहेत ह्या थाटात आपण मिरवतो. आणि मग त्याने गिटार काढले आणि समोर ठेवलेल्या केसिओ वर मला बसायला सांगितले! आणि आमचे वादन सुरु झाले. कुणीही काहीही ठरवले नव्हते! त्याक्षणी वाजवायला सुरुवात केली आणि हे वादन २० मिनटे चालले. त्याने ते 'रेकॉर्ड' केले आहे.....आणि मी त्याला ते 'यु -ट्यूब' वर 'उपलोड' करायला सुद्धा सांगितले आहे! वाट बघतोय...
.
शेवटी बस ची वेळ झाली. दुपार कशी गेली काही कळलेच नाही. डेविड मला बसपर्यंत सोडायला आला. जाता जाता एक मिठी मारली आणि आपण 'टच' मध्ये राहू असे निश्चित केले! स्मित डेविड अजुन माझ्या 'friends list ' मध्ये आहे. मधून मधून बोलणे होते. संगीताची देवाण-घेवाण होते. आता ह्या सुरेल दुपारला वर्ष होईल. अधून-मधून अमेरिकेची आठवण येते. मन विद्यापीठाच्या कॅम्पसची हळूच एक चक्कर मारून येते. आणि दिसतो गिटार वाजवत गात-गात जीवनाचा आनंद घेणारा डेविड. देवाचे आभार मानणारा डेविड. काहीतरी नवीन शिकायला उत्सुक असणारा डेविड. फेमिली बद्दल आत्मीयतेने बोलणारा डेविड. माझा मित्र डेविड!


- आशय गुणे