Pages

Total Pageviews

Sunday, November 13, 2011

बांग्लादेशचे प्राध्यापक डॉ. बरुण चौधरी

आपल्याकडे गुरूची किंवा शिक्षकाची तुलना ब्रह्मा, विष्णू , महेश ह्यांच्याशी जरी केली असली तरीही त्यावर विश्वास बसेल असे फार थोडे गुरु माझ्या नशीबात आले आहेत. खरं सांगायचं तर, शाळेत आणि नंतर कॉलेज मध्ये माझे मार्क हे पी चिदंबरम ह्यांच्या बजेट सारखे असायचे! एका विषयात जास्त मार्क मिळाले की दुसऱ्या विषयात कमी मिळून त्याची भरपाई होयची. एकूण काय, तर मार्कांच्या बाबतीत आम्ही मध्यमवर्गीय - खूप जास्त नाही आणि खूप कमी देखील नाही! आणि त्यामुळेच मध्यमवर्गीय लोकांसारखे आम्ही दुर्लक्षित! कधी कौतुक नाही आणि कधी निंदा देखील नाही. कौतुक व्हावं असं आम्ही काही करत नव्हतो असं नाही. पण ते 'मार्कांच्या पलीकडले' असल्यामुळे त्याची विशेष दाखल कधी घेतली गेली नाही. तरीही गुरुबद्दलची प्रार्थना मात्र न चुकता आमच्याकडून म्हणवून घेत असत. आणि मुलांची काळजी घेणारा गुरु हा फक्त 'व्यक्ती आणि वल्ली' ह्या पुस्तकात 'चितळे मास्तर' नावाने आहे असेच मी इतके दिवस समजत होतो.
  पण २००९ साली अमेरिकेच्या ह्युस्टन शहरी शिकत असताना डॉ. बरुण ह्यांनी ह्या समजुतीला तडा दिला. मी ह्युस्टनच्या त्या विद्यापीठात फक्त चार महिने होतो. पण त्या चार महिन्यात डॉ. चौधरी ह्यांच्यातील संवेदनशील शिक्षकाचे पुरेपूर दर्शन झाले. डॉ.चौधरींशी माझा अप्रत्यक्ष परिचय त्या विद्यापीठातील दुसरे प्राध्यापक डॉ. रशीद ह्यांनी करून दिला. डॉ. रशीद हे माझ्याशी अनेक वेळेला गप्पा मारायचे. आणि त्याचे कारण देखील तसेच होते. एका लेक्चर मध्ये त्यांनी आम्हाला प्रश्न केला -
Who is the poet who wrote the national anthem of two  countries ?
 ह्या प्रश्नाचे उत्तर कुणालाच आले नाही. त्याचे उत्तर त्यांनी सांगितले - रवींद्रनाथ टगोर. भारत आणि बांग्लादेश ह्या देशांचे राष्ट्रगीत ह्या व्यक्तीने लिहिले म्हणे. पुढे ते म्हणाले टागोर हे बांग्लादेशी होते. त्यावर मात्र मला रहावले नाही. " टागोर १९४३ साली वारले आणि तुमचा देश १९७१ साली निर्माण झाला ", असे मी बोलून दाखवले. वर्गातील मोजकेच अमेरिकन विद्यार्थी हसू लागले. भारतीय विद्यार्थी मात्र मला गप्पं बसायला सांगू लागले. ' जाऊ दे न .....कशाला बोलतोस.' हा त्यांचा पवित्रा! वर्गातील तेलगु, तमिळ, मराठी  अशा
categories असलेल्या मुलांना एकूण 'भारताबद्दल' का असेल आस्था? असो, ह्या प्रसंगाने डॉ. रशीद ह्यांच्या नजरेत मी आलो आणि  त्यांच्याशी अधून -मधून गप्पा होऊ लागल्या. कारण त्यांनी मात्र हे सारे हसत-खेळत स्वीकारले!
विद्यापीठात भरपूर मुलं असल्यामुळे २ नव्या batches  कराव्या लागणार होत्या. आणि ह्या batches  साठी डॉ. चौधरींना नियुक्त करण्यात आले होते. तर डॉ. रशीद ह्यांनी मला त्या batch जॉईन करण्याबद्दल विचारले. डॉ. चौधरी शिकवायला कसे आहेत हे विचारायला मी गेलो होतो ( होय! असे करू शकतो!) भारतात नाही तरी अमेरिकेत तुम्ही शिक्षकाला तपासून घेऊन शकता. खुद्द विवेकानंदांनी त्यांच्या गुरूच्या उशीखाली पैसे ठेवून त्यांची परीक्षा घेतली होती त्या संस्कृतीतला मी! मी देखील चौधरींच्या चांगल्या शिकवण्याबद्दल खात्री करून घेतली आणि त्यांच्या batch मध्ये सहभागी झालो. आता मागे वळून पाहतो तर असे करण्यात शहाणपण होते हेच जाणवते! माझी batch शनिवारची निघाली. दुपारी १ ते संध्याकाळी ५-६ पर्यंत ती चालायची.
डॉ. चौधरी हे बांग्लादेशचे होते. जर मला माझी स्मरणशक्ती साथ देत असेल तर, ते ८० च्या दशकात कधीतरी जपानला गेले. तिकडे त्यांनी 'post - doc '  केले आणि नंतर अमेरिकेत आले. त्यांनी नंतर ह्युस्टनच्या एका प्रतिष्टीत संशोधन संस्थेत स्वतःचे संशोधन सुरु केले. आणि आता देखील तेच करीत आहेत. डॉ. रशीद ह्यांना ते बांग्लादेशला असताना 'senior ' होते आणि म्हणून आमच्या विद्यापीठातील प्राध्यापकाच्या जागेसाठी त्यांची नेमणूक केली गेली.  पहिल्याच क्लास नंतर माझी आणि  त्यांची ओळख झाली. मला चांगले आठवतंय. त्या शनिवारी आमचा प्रयोग लवकर संपला आणि साधारण ५ च्या दरम्यान मी खाली आलो. बाहेर बघतो तर ढग दाटून आले होते. लहर आली आणि मला समजून घेणाऱ्या माझ्या मित्राकडे गेलो....पियानोकडे! आणि ' 'मल्हार' वाजवायला सुरुवात केली. वाजवता वाजवता पहिल्या मजल्यावर नजर गेली - शांतपणे ऐकत डॉ. चौधरी एका बाकावर बसले होते. आणि वादन संपल्यावर खाली आले आणि माझे कौतुक केले.
 " तू फार छान वाजवतोस रे. राग-संगीत होते का?" मी होकार सांगितला. "मला वाटलेच. आणि मला आवडले देखील. कुठला राग होता हा?" मी मल्हार असे उत्तर दिले. आणि पुढे मी स्वतःच म्हणालो, " तुम्ही बंगाली ना...मी तुम्हाला मला आवडणारे बंगाली गाणे वाजवून दाखवतो." ते किंचित हसले आणि मी पियानो वर 'एकला चोलो रे' वाजवले. वाजवून झाल्यावर किंचित भावूक स्वरात ते मला म्हणाल्याचे आठवतंय - " तू तुझ्या देशाशी जोडलेला आहेस. ही फार चांगली गोष्ट आहे रे. देशापासून इतक्या लांब राहताना तुला ह्या 'connection ' चा फायदा होईल. तुला कधी कंटाळा येणार नाही. असेच वाजवत राहा." मला माझ्या वाजवण्याबद्दल जाहीर पाठींबा देणारे डॉ. चौधरी हे पहिलेच...आणि ते सुद्धा पहिल्या भेटीत. आनंद ह्या गोष्टीचा झाला की त्यांनी माझे वादन ऐकून घेतले आणि मगच येऊन शाबासकी दिली. उगीच येता-जाता ऐकून ' छान' वगैरे म्हणाले नाहीत.  ह्यावरून हा माणूस विद्यार्थ्यांमध्ये आपले मन गुंतवणारा आहे असा अंदाज मला त्यादिवशी आला. आणि त्याचा प्रत्ययच आला पुढे.
" We have a talent hear!" पुढच्या आठवड्यातील क्लास मध्ये माझे असे वर्णन केले गेले. माझ्या सर्व वर्गमित्रांसमोर माझे हे असे कौतुक होईल हे मला अगदी अनपेक्षित होते. " मी ह्या मुलाचे वादन मागच्या आठवड्यात ऐकले. तुम्ही पण नंतर जरूर ऐका", असा सल्ला त्यांनी माझ्या वर्गमित्रांना दिला. शिक्षक सांगतो ते एका कानाने ऐकून दुसऱ्याने सोडून द्यायचे असतेच की....त्या सर्वांनी तेच केले! ;)
पण डॉ. चौधरी हे मुलांना समजावण्यात आणि समजून घेण्यात किती वेळ खर्च करू शकतात ह्याचा अनुभव आम्हाला नंतरच्या दिवसात येऊ लागला. शनिवार म्हटलं की अमेरिकेत आनंद-दिवस! मजा करायचा दिवस...आणि आरामही करायचा दिवस. आमचा क्लास संध्याकाळी ५ पर्यंत तरी चाले. कुठला प्रयोग मोठा असला तर कधी कधी ६.३० पर्यंत वेळ जाई. मग कधी कधी त्यांच्या घरून फोन येई. पण चौधरी सर अगदी प्रत्येकाला समजेपर्यंत कॉलज मध्ये थांबायचे. जाता जाता मुलांशी गप्पा मारत घरी जायचे. अगदी २-३ क्लास मध्येच ते आमच्यात असे काही बेमालूम मिसळून गेले की प्राध्यापकाची आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली दरी केव्हाच नाहीशी झाली. शुक्रवार असेल तर अमेरिकन लोकं सारे काम लवकर आटपून ४ पर्यंतच घरी पळतात आणि शनिवारी- रविवारी काम करणं तर सोडाच  पण कामाबद्दल बोलत देखील नाहीत. पण इथे हा माणूस सारे काही बाजूला ठेवून आम्हा विद्यार्थ्यांना समजावण्यात धन्यता मानायचा. त्याची काही मुलांमध्ये टिंगल देखील होयची. मला मात्र ह्या सगळ्यात त्यांना विद्यार्थ्यांबद्दल वाटणारी आपुलकीच दिसली. आणि ह्या गोष्टीचा पुढच्या वर्षी अनुभव देखील आला. तो पुढे लिहीनच!
डॉ. चौधरी ह्यांचे स्वतःचे संशोधन असल्यामुळे आम्ही खूप प्रश्न घेऊन त्यांच्याकडे जायचो.अमेरिकेत आलो तर होतो, परंतु पुढे नक्की काय करायचे...'PhD ' करण्यात काय फायदे-तोटे आहेत...संशोधन केल्याने किती पैसे मिळतात वगैरे-वगैरे. त्याची देखील डॉ. चौधरी अगदी शांतपणे उत्तरं द्यायचे. अर्थात ते देखील ह्या स्थितीतून गेले होतेच. मला एकदा सांगितलेले आठवते. " जर तुला संशोधनात करिअर करायचे असेल तर तुला गाणे-वाजवणे जरा दूर लोटावे लागेल. आणि मला वाटते तुला जर वाजवण्यात काही करता आले तर ते तू नक्कीच केले पाहिजेस. अशावेळेस नोकरी शोध आणि तुझ्या आवडी जोपास."
प्राध्यापक असून सुद्धा आवडी जोपासायचे सल्ले देणारा हा माझ्या नजरेतला पहिला माणूस! पण ह्यातूनच त्यांची विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याची वृत्ती दिसून यायची.  पीएचडी बद्दल असंच एकदा गमतीने ते म्हणाले होते. " पीएचडी दिल्ली के लड्डू की तरह है! खाया तो भी पछताओगे ....नही खाया तो भी पछताओगे!" ;)
"तुम्हाला सर्वांना बांग्लादेश बद्दल काय माहिती आहे?" प्रयोग संपवून घरी जाताना एकदा असंच त्यांनी आम्हाला विचारले. वर्गातील एका अमेरिकन मुलीने बांग्लादेश 'जपानच्या आजू-बाजूला आहे का' असे विचारून उत्तरांना सुरुवात केली! माझ्या वर्गातील इतर काही भारतीय मुला-मुलींनी काही विशेष उत्तरं दिली नाहीत.मी मात्र तेव्हा नुकत्याच चर्चेत आलेल्या 'ग्रामीण बँक' ह्या विषयाबद्दल त्यांना सांगितले. मुहम्मद युनुस ह्या बांग्लादेशी माणसाने काढलेल्या त्या अद्भुत संकल्पनेबद्दल आणि त्यावरून त्याला मिळालेल्या शांतीच्या 'नोबेल' पारितोशिकाबद्दल  डॉ.चौधरी अगदी भरभरून बोलले.  आपल्या बांग्लादेशबद्दल जगात थोडी तरी माहिती आहे ह्या बद्दलचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेला होता! त्यानंतर विषय 'टागोर' वर आला. आत्ता पर्यंत माझे अनेक बंगाली मित्र झाले आहेत. पण टागोर ह्यांच्याबद्दल जास्त आत्मीयतेने बोलणारे मला त्यांच्यापेक्षा सीमारेषेच्या पलीकडले बांग्लादेशीच जाणवले. टागोर ह्यांनी बंगाली भाषा सोपी कशी केली, गाणी कशी लिहिली, त्यांच्या कविता आणि 'शांतिनिकेतन' हे विषय लगेच आलेच मग! माझ्या बरोबर असलेल्या भारतीय मुलांचे चेहरे कंटाळा दर्शवायला लागले होते. वास्तविक डॉ.चौधरी हे एका भारतीय माणसाबद्दल तर सांगत होते. पण आम्ही आमचे विचार आमच्या 'राज्या'पुरते मर्यादित ठेवले आहेत हेच खरे. ह्याच टागोरांचा फोटो आम्ही १५ ऑगस्टला विद्यापीठातील computer  lab  मधून प्रिंट केला आणि चिकटवला होता. 'विधी-संस्कृती' म्हणतात ना ती ही अशी!  पण डॉ.चौधरींच्या चेहऱ्यावरचा आनंद मी न्याहाळत होतो. आपल्या देशाबद्दल सांगताना त्यांना किती धन्यता वाटत होती. १५ ऑगस्टला भारतीय मुलं विद्यापीठात 'ऐसा देस है मेरा' किंवा तत्सम गाणी ऐकून नुसत्या शिट्या वाजवतात त्या कृत्रिमतेपेक्षा हे नक्कीच पाहण्यासारखे होते! नंतर मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीपर्यंत चालत आलो आणि एक नवीन विषय सुरु केला. 'भटियाली' नावाचा एक बंगाली लोकसंगीत प्रकार आहे. हा प्रकार नावाडी लोक गातात. त्यांची नाव जेव्हा प्रवाहाबरोबर वाहत जाते तेव्हा हा गानप्रकार गायची पद्धत आहे. विलायत खान आणि निखील बानेर्जी ह्यांनी सतारीवर ह्या धुना वाजवल्या देखील आहेत. ह्या एवढ्या भांडवलावर मी त्यांच्याशी ह्या विषयावर बोलायला गेलो. हेतू एकच. बोलणं व्हावं आणि थोडी वैचारिक देवाण-घेवाण!  पण ह्याबद्दल त्यांना फार माहिती नव्हते. "बांग्लादेश मध्ये काही ठिकाणी हा प्रकार गायला जातो. मी फार नही ऐकले. तुझी कमाल आहे रे! तुला भटियाली देखील माहिती आहे?" त्यांना फार आश्चर्य वाटले. मी त्या एका धुनेच्या भांडवलावर होतो हे मी कशाला सांगतोय! लगेच पियानोकडे आम्ही गेलो आणि त्यांना ती धून वाजवून दाखवली. घरी जाताना माझी पाठ थोपटून गेल्याची आठवण अजून माझ्या मनात आहे! :) नंतर अधून-मधून आमची चर्चा चालू असायची. रबिंद्र
-संगीत, नझरुल- गीती, कधी शास्त्रीय तर कधी टागोर ह्यांची तत्व!
त्यांची कधी आठवण झाली की अजून एक प्रसंग मला आवर्जून आठवतो. त्यांचा कॉम्पुटर बिघडला होता आणि माझ्या मित्राला तो दुरुस्त करता येत होता. त्यामुळे त्यांच्या गाडीतून आम्ही तो आमच्या घरी आणला होता. आणि डॉ.चौधरी त्यादिवशी आमच्या घरी आले होते. आम्ही सारेच नवीन लोक! धड नोकरी पण लागली नव्हती. त्यामुळे आमच्या घरी सोफा, खुर्ची वगैरे तर सोडाच पण साधे चप्पल ठेवायचे कपाट पण नव्हते. तेव्हा फार खजील होऊन मी डॉ.चौधरींची माफी मागितली. घरी आलेल्या माणसाला, ते सुद्धा प्राध्यापकाला, बसायला काही देऊ न शकणे ह्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय असेल?
" काळजी करू नका! मी तुमच्या स्थितीतून गेलो आहेच की. विद्यार्थी दशेत, ते सुद्धा अशा  देशात खर्च हे जपूनच करावे लागतात. माफी तर मुळीच मागू नका ", त्यांनी आम्हाला धीर दिला. आमच्या त्या घरी वरच्या मजल्यावर जायला जिना होता. त्या जिन्याच्या दुसऱ्या पायरीवर बसून त्यांनी मी केलेली कॉफी प्यायली. एवढेच काय तर माझ्या एका मित्राला थोडे जपानी येत होते त्याच्याशी जपानी भाषेत सुद्धा बोलण्याचा कार्यक्रम झाला. एकूण काय, 'श्रीहरी विदुराघरी पाहुणा' सारखाच हा प्रसंग होता!
विद्यापीठात आम्ही दिवाळी साजरी करणार होतो. अमेरिकेतील प्रत्येक विद्यापीठातील भारतीय मुलं आपल्यापरीने दर वर्षी दिवाळी साजरी करत असतात. ती तशी साजरी करण्याने अमेरिकन लोकांना भारताचे काय दर्शन प्राप्त होते हा परिसंवादाचा विषय आहे म्हणा! ;) त्या वर्षीच्या दिवाळीत मला पियानो वाजवायचा होता. डॉ.चौधरींना माझे वादन ऐकायची खूप उत्सुकता होती पण नेमकं त्यांना कुठे तरी जावं लागलं आणि मी वाजवलेला 'मालकंस' ते ऐकू शकले नाही!
आणि त्या दरम्यान मी एक निर्णय घेतला. मी ह्युस्टन सोडून दुसऱ्या एका शहरी जायचे ठरवले. त्या शहरातील विद्यापीठात मला प्रवेश मिळणे निश्चित झाले होते आणि मी डिसेंबर महिन्यात तिकडे जायचे ठरवले. इकडची शेवटची परीक्षा झाली की मग थोड्या दिवसांनी निघायचे होते. आणि शेवटच्या परीक्षेतील शेवटचा पेपर होता डॉ. चौधरींच्या विषयाचा! पेपर झाला आणि मी डॉ.चौधरींना भेटायला गेलो. " तुला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा! तुला तुझ्या करिअर संबंधीच्या प्रश्नांची उत्तरं लवकर मिळो आणि तुला तुझ्या आयुष्याचा रस्ता व्यवस्थित सापडो! एक गोष्ट आहे पण.....आम्ही तुझा पियानो मिस करू रे!"  शेवटचे वाक्य ऐकून माझे मन भरून आले! माझ्या छोट्याश्या वाजवण्याने केवढ्या मोलाची प्रतिक्रिया ऐकायला मिळत होती मला. अगदी अनपेक्षित होते हे!  मला ज्या थोड्या लोकांनी पियानोद्वारा समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यात डॉ. चौधरींना मी प्रथम स्थान नक्कीच देईन. आणि नंतर डॉ. चौधरींनी स्वतः माझ्या बरोबर फोटो काढून घेण्याची इच्छा व्यक्त केली. मी, माझा एक मित्र आणि त्यांचा असा एक फोटो अजून माझ्याकडे आहे. त्यांना नंतर मी e -mail करून पाठवला देखील. एक शिक्षक स्वतः विद्यार्थ्याबरोबर फोटो काढून घेण्याची इच्छा व्यक्त करतोय....आपण कुठेतरी डॉ. चौधरींच्या मनात थोडी जागा मिळवू शकलो ह्या आनंदातच त्या दिवशी मी घरी गेलो. ' keep in touch ' त्यांनी मला सांगितले होते.
आणि अचानक २०१० सालच्या दिवाळीत, म्हणजे बरोबर एक वर्षाने ह्युस्टनची वारी करण्याचे  निश्चित झाले. निमित्त होते 'झाकीर हुसैन' च्या तबल्याच्या कार्यक्रमाचे. माझा एकदम जवळचा मित्र ह्युस्टनच्या विद्यापीठातील भारतीय विद्यार्थी संघटनेचा ( राजकीय नव्हे!) अध्यक्ष झाला होता आणि दिवाळी साजरी करण्याची जबाबदारी त्यावर होती. त्याने मला पियानो वाजवण्याची गळ घातली आणि केवळ त्याने सांगितल्यामुळे मी मान्य देखील केले. डॉ. चौधरी येणार होते. दुर्दैव असे की त्यांना यायला उशीर झाला आणि मी वाजवलेला पियानो त्यांना ऐकायला मिळाला नाहीच! पण आल्या आल्या थेट माझ्याच शेजारी बसले आणि जणू काय दोन मित्र वर्षभरानंतर भेटत आहेत अशा थाटात माझ्याशी गप्पा मारल्या! माझे वादन हुकल्यामुळे त्यांना प्रचंड हळहळ वाटत होती. मी झाकीरच्या कार्यक्रमासाठी इतक्या लांबून आलो ह्याबद्दल पहिले माझे कौतुक केले. नंतर बऱ्याच विषयांवर बोलणे झाले. त्यांना अलीअक्बर खान ह्यांच्या सरोद वादनाच्या रेकॉर्ड्स हव्या होत्या. आणि अलीअक्बर खान ह्यांच्या  बरोबर आशा भोसले ह्यांनी गायलेल्या शास्त्रीय चीजा सुद्धा! मी उद्या माझ्या मित्राबरोबर पाठवून देतो असे काबुल केले. नंतर आमच्या batch मधल्या साऱ्या मुलांना त्यांनी एकत्र बोलावलं आणि आमच्या सर्वांबरोबर जेवण केलं. आणि विशेष म्हणजे फोटो देखील काढून घेतला.
 " आज माझे सारे विद्यार्थी एकत्र दिसत आहेत. किती आनंद वाटत आहे मला ", असे देखील सांगितले. आठवड्यातून एकदाच आमचा क्लास असायचा. पण त्यातसुद्धा हा माणूस विद्यार्थ्यांशी किती एकरूप झाला होता. मग ते विद्यार्थी एका वर्षानंतर भेटले होते तरीसुद्धा! तुझे पियानो वादन एकदा नीट ऐकीन असे सांगितले आणि ते घरी गेले. जाता जाता मी त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला.
एका वर्षानंतर ह्युस्टनला आलो होतो. माझ्या ह्युस्टनच्या मित्र परिवारात खूप बदल झाला होता. २-३ लोकं सोडले ( ज्यांनी मला अगदी घरच्या सारखे वागवले ) तर  सारे आपापल्या कामात गर्क होते. काहींना भेटायची गरज वाटली नाही तर ज्या मित्राच्या घरी मी उतरलो होतो तो मला एकटे टाकून बाहेर जेवायला गेला. तर काहींना मी परत जाताना ५ मिनिटे मला दर्शन देण्यात धन्यता वाटली. एकूण सर्वांचा स्वभाव बदलला होता. माझ्याच वयाची ही मुलं माझ्यशी असे का वागत होती मला कळत नव्हतं! फक्त एक स्वभाव बदलला नव्ह्ता. तो म्हणजे डॉ.चौधरींचा! कदाचित त्यात 'स्व' चा अभाव होता म्हणून!

No comments:

Post a Comment