Pages

Total Pageviews

Friday, November 18, 2011

अमेरिकेतील आजी-आजोबांची कहाणी - भाग -१

वॉल-मार्ट - अल्लादिनच्या राक्षसालादेखील लाज वाटेल अशी 'मागाल ते पुरवू' तत्व वापरणारी अमेरिकेतील जागा. जागाच ती! त्याला 'दुकान' वगैरे शब्द वापरले तर त्याच्या भव्यतेचा अपमानच होईल. भल्या मोठ्या आवारात प्रचंड प्रमाणात येथे वस्तू ठेवल्या जातात. आणि हो! अगदी स्वस्त दरात वस्तू प्राप्त होणे ही ह्या जागेची विशेषता आहे. आणि म्हणूनच वस्तूंच्या दर्जेकडे विशेष लक्ष न देता , भारतीय विद्यार्थ्यांचा कल इथेच खरेदी करण्याचा असतो. महिन्याची अगर पंधरा-पंधरा दिवसाची खरेदी इकडून केली जाते. साहजिकच इकडे जाणे नित्याचे असते. आणि असे असूनसुद्धा एका गोष्टीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ही गोष्ट म्हणजे दाराशी उभं राहून आपलं स्वागत करणारे आजी-आजोबा. ही कामगिरी फक्त त्यांनाच दिलेली असते असं नाही, परंतु बहुतेकदा  इथे आजी अथवा आजोबाच असतात. ( अमेरिकेत 'ग्राहक-सेवा' ह्या हेतूने काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या जातात. मोठ्या दुकानांमध्ये ग्राहकाच्या स्वागतासाठी दारात उभं राहणे ही त्यातली एक. भारतातही ह्या गोष्टी आता येत आहेत असं दिसतंय....अर्थात कटाक्षाने हा शब्द मी वापरात नाही!) येणाऱ्या-जाणाऱ्यांना 'वॉल- मार्ट मध्ये आपले स्वागत आहे' वगैरे म्हणायचे, नवीन असलेल्या माणसाला शक्य तितके मोठे स्मितहास्य चेहऱ्यावर ठेवून आत कुठे काय आहे ह्याची ओळख करून देणे, काही अडचण असेल तर त्याची माहिती देणे आणि खरेदी करून घरी परत चाललेल्या लोकांना ' गुडबाय' आणि 'पुन्हा जरूर या' अथवा 'तुमचा दिवस/ तुमची संध्याकाळ/ रात्र  शुभ जावो' असे सांगायचे ही त्यांची कामं असतात. भारतीय विद्यार्थी आणि अमेरिकेतील काम करणारे हे आजी-आजोबा ह्यांची पहिली भेट ही अशी स्वस्त दराच्या 'दारात' होते! त्यावर भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया देखील ऐकण्यासारख्या असतात. " च्यायला, हे काय वय आहे काम करायचे? गप घरी जाऊन झोप काढा की," ही एक. दुसरी प्रतिक्रिया अशी की ' अमेरिकेतील लोक हे खूप कष्टाळू आहेत. ह्या वयात देखील काम करतात बघ.....नाहीतर आपले लोक." उगीच आपल्या लोकांना चित्रात खेचले जाते.     
मी मोटेलमध्ये काम करीत असताना मला ज्या अनेक वल्ली भेटल्या त्यातील पॉल आणि लिंडा हे आजी-आजोबांचे जोडपे खूप प्रभावित करून गेले. तसे बरेच ज्येष्ठ नागरिक मोटेलमध्ये यायचे. पण ह्या दोघांची गोष्टच निराळी होती. एकमेकांना घट्ट धरून, उरलेल्या संसाराची गाडी ते चालवत होते. कष्ट करीत होते. आणि आयुष्यात शक्य तितका आनंद मिळवायचा प्रयत्न करीत होते. त्यांच्याशी बोलताना जाणवले की अमेरिकेतील समस्त ज्येष्ठ नागरिकांचे ते जणू  प्रतिनिधित्व करीत होते.
मोटेलमधला सकाळचा नाश्ता हा सर्व पाहुण्यांना न्याहाळायची संधी द्यायचा. तिथल्या जनतेशी कितीतरी विषयांवर माझ्या गप्पा ह्या ठिकाणी झाल्या आहेत. अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरातून आलेली ही माणसं एकमेकांशी गप्पा मारायची. आणि बऱ्याचदा मला सामावून देखील घ्यायची.  त्यांचा मुख्य विषय असायचा 'तापमान'. सदैव जाणारी वीज, आज फक्त सकाळीच पाणी येईल अथवा 'च्यायला, किती खड्डे आहेत रस्त्यात' असले विषय नाहीत! त्यामुळे उत्तरेकडली मंडळी " टेक्सास मध्ये किती उकडतं हो तुमच्या", असे शेरे मारायची. तापमान झाले की विषय यायचा राजकारणाचा. हे दोन्ही विषय चघळायला मिळो म्हणून आम्ही नाशत्याच्या ठिकाणी टी.व्ही चालू ठेवायचो.  वास्तविक माझी रात्रपाळी. पहाटे ४ ते ६ ही वेळ अत्यंत कंटाळवाणी आणि झोपेला जवळ येऊ न देण्याच्या प्रयत्नात जायची. पण एकदा ६ वाजता नाश्ता सुरु झाला आणि मंडळी जमू लागली की सारी झोप उडून जायची आणि आम्ही गप्पा मारायला तयार! ह्या गप्पा माझी 'शिफ्ट' सकाळी ८ वाजता संपेपर्यंत चालायच्या. मला ती जागा अजूनही अगदी स्वच्छ आठवते!
खूप लवकर उठून नाश्ता करायला येणारी मंडळी सहसा एकटीच असायची. त्यांच्या बरोबर जास्त गप्पा होत असत. पॉल आणि लिंडा हे असेच लवकर उठणारे होते. लिंडा सुरुवात करायची आणि पॉल तिला २०-२५ मिनिटांनी जॉईन होत असे. हे दोघे बऱ्याचदा  मोटेलमध्ये राहायला यायचे. त्यामुळे आमची बऱ्यापैकी ओळख झाली होती. पण एकदा असेच ते ३ दिवस सलग आले होते. तेव्हा झालेल्या गप्पा काय ते प्रभावित करून गेल्या. " आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. आमचा दिवस नेहमी लवकर सुरु होतो", बरोबर ६ वाजता टेबलवर येत लिंडा म्हणाली. मी टी.व्ही सुरु करून दिला आणि लिंडाने मला स्थानिक बातम्या लावायला सांगितल्या.
"नाही नाही, आम्ही आज राष्ट्रीय बातम्या बघणार आहोत", मागून तेवढ्यात पॉल आला. पॉलने आल्या आल्या मला आणि त्याच्या बायकोला (देखील!) 'गुड मॉर्निंग' विश केले. " आज सी. एन .एन  वर एक महत्वाचा मुद्दा चर्चेत येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन बद्दल होणार आहे चर्चा", पॉल मला सांगत होता. " जसं की आपल्याला खूप काही मिळणार आहे", लिंडाने त्याचे वाक्य तोडले. आपल्याला हवे ते बघू न देणाऱ्या पॉलकडे तिने तक्रारीच्या नजरेत पाहिले. नंतर दोघांच्या हसण्यात मी २-३ सेकंद समाविष्ट झालो आणि परत 'डेस्क' वर निघून आलो. पण त्यादिवशी फार कमी लोकं मोटेलमध्ये आली होती आणि म्हणून मी परत ह्या आजी-आजोबांशी गप्पा मारायला आलो. राष्ट्रीय बातम्या सुरु होत्या पण अजून पेन्शनची एकही बातमी आली नव्हती. " ह्या राजकारणी लोकांनी परत एकदा हा मुद्दा पुढे ढकलला आहे", मी काहीही बोलायच्या आत पॉलने मला संभाषणात ओढून घेतले. सातासमुद्रापार सामान्य माणसं जशी एक तसे राजकारणीसुद्धा एक आहेत ह्या गोष्टीचा मला उलगडा झाला तेवढ्यात! "तुमच्या देशात पेन्शनचा प्रॉब्लेम आहे का? तू भारताचा ना?" पॉलच्या  ह्या प्रश्नाने मी एकदम भानावर आलो.  खरं सांगायचं तर मला ह्याबद्दल काहीच माहिती नव्हते. मला पेन्शन हे सरकारी अधिकाऱ्यांना मिळते एवढेच माहिती होते. काही काही बँका पेन्शन देतात असेही ऐकले होते. आणि सरकारी कर्मचारी नसतात त्यांना प्रोविडेंत फंड असतो एवढे थोडे ज्ञान! " अरे वा! तुमचा देश कामगारांची खूप काळजी घेतो असं दिसतंय." आता ह्या उद्गाराचे मी काय उत्तर देणार? " तुझे आजी-आजोबा कसे काय सांभाळतात त्यांचे पेन्शन?"  " माझे आजोबा एका सरकारी ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होते. पण त्यांना पेन्शन नव्हते. माझी आजी हाउस-वाइफ' होती. म्हणून तिला सुद्धा पेन्शन नाही", मी उत्तरलो. " बाप रे! मग ते त्यांच्या घराचे भाडे कसे भरतात?" पॉलने अमेरिकन वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून प्रश्न केला होता.  "त्यांना भाडे भरावे लागत नाही! ते आमच्या बरोबर राहतात", मी म्हणालो.  " मग तुझ्या आई-वडिलांना सर्वांचा खर्च करायला कसा काय जमतो? भारत खूप स्वस्त देश आहे की! किती लोकं आहात तुम्ही घरी?" मी आमच्या परिवाराबद्दल सांगितल्यावर पॉलचा विश्वासच बसेना. लिंडा आमचा संवाद ऐकत होती. ती मध्येच म्हणाली, " आमचा मोठा मुलगा नॉर्थ डाकोटा मध्ये असतो आणि धाकटा ओरेगोनला. आम्हाला एक मुलगी आहे जी डेनवरला राहते. ३ वर्ष झाली आम्ही त्यांना बघितले नाही."  हे मी अमेरिकन लोकांबद्दल बऱ्याचदा बघितले होते. त्यांना बरेच काही सांगायचे असते. वास्तविक आमचा विषय घरखर्च हा होता. पण लिंडा मधील 'आई' आता बोलत होती. तिला तिच्या मुलांची होत असलेली आठवण तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होती.
"मग तुम्ही जाता का त्यांच्याकडे?" कॉफी बनवता बनवता मी विचारले.
" नाही रे! मनी इस अ बिग प्रॉब्लेम! आमची मुलं आधी यायची. पण आमची नातवंड आता मोठी झाली आहेत. त्यांचे स्वतःचे वेकेशन प्रोग्राम असतात."  तेवढ्यात माझ्या बॉसचा फोन आला आणि मला एक तास आधी निघायचे आहे असे त्याने सांगितले.  सकाळी जाता जाता दोघांना सांगून गेलो. त्यांच्या पेन्शनची बातमी काही आली नव्हती!
त्या रात्री परत मीच येणार होतो शिफ्टवर. त्यामुळे घरी जाऊन लगेच झोपलो. आणि संध्याकाळी ७ च्या सुमारास बस पकडून स्वारी ९ च्या दरम्यान मोटेलमध्ये हजर! माझा 'manager ' वरतीच राहायचा. मी एवढ्या लांबून कामाला येतो म्हणून प्रत्येक शिफ्टला माझ्यासाठी रात्री जेवायला वेगळं ताट राखून बनवून ठेवायचा. त्या एकट्याने काढलेल्या रात्रपाळीत ह्या जेवणाची चव खूप काही देऊन जायची! तिथे खाल्लेल्या त्या घरगुती, गुजराती जेवणाची चव अजूनही माझ्या लक्षात आहे! "पॉल आणि लिंडा आहेत त्यांना हवं-नको ते बघ रे.....ते आपले ठरलेले गिऱ्हायिक आहेत", डाळढोकळी हातात देत 'manager ' मला म्हणाला. "हो. मी बऱ्याच वेळेला पाहिले आहे त्यांना", मी म्हणालो. " एक वर्षापासून येत आहेत. इथे जवळच राहतात. एका तासावर घर आहे. असेच मधून मधून येतात." मी मनात विचार करू लागलो. एक तास! मग मोटेलमध्ये कशाला येतात? काय माहिती, असतील एकेकाचे वेळ घालवायचे उद्योग! पण माझ्या मनातील 'rational ' बाजू मला सांगत होती - 'काहीतरी कारण नक्कीच असणार'.
मी खाऊ लागलो तेवढ्यात लिंडाचा आवाज आला. " आम्हाला ५.३० वाजता चा 'wake - up call ' मिळेल काय?  " जरूर मिळेल!" मी हसत हसत उत्तरलो.  " पॉल अंघोळ करतोय. आम्ही पिझ्झा मागवला आहे त्यामुळे जेवायचं सगळं तयार आहे. मी सहज एक चक्कर मारायला खाली आले. थोडी ताजी हवा खाते."
" हो! आज वेदर खूप छान आहे ना", मी उद्गारलो.  तेवढ्यात हा विषय डावलून लिंडाने स्वतःच बोलायला सुरुवात केली. " आज माझ्या मोठ्या मुलाचा फोन आला होता. माझा नातू शाळेचा बेसबॉल टीम मध्ये सिलेक्ट झाला. तो चांगलाच खेळतो."
" वा! छानच," मी दाद देऊन मोकळा झालो. ती पुढे म्हणाली, " हो ना! माझी नात...म्हणजे माझ्या धाकट्या मुलाची मुलगी चांगली गाते. तिच्या शाळेच्या 'कोईर' मध्ये असते. चार वर्षांपूर्वी ते आमच्याकडे आले होते. तेव्हा रोज रात्री जेवल्यानंतर ती गायची आणि मगच आम्ही झोपायला जायचो. खूपच सुंदर!" मला उगीचच आमच्या घरातील जेवणानंतरची मैफल आठवली. मामाकडे बऱ्याच वेळेला माझे पेटी वादन आणि माझ्या भावाचे तबला वादन झालेले आहे! जेवणानंतर होणाऱ्या मैफलींची परंपरा सातासमुद्रापारसुद्धा आहे ह्या गोष्टीची मला मजा वाटली! " माझ्या मुलीचा मुलगा देखील बेसबॉल मध्ये रस घेतो. आमच्या फेमिलीमध्ये सर्वच लोकं तसे talented  आहेत.....अरे .....सॉरी, सॉरी, मी बघितलेच नाही. तू जेवण करतोयस ना. असो, मी जाते. ५.३० विसरू नकोस", तिने माझे डाळढोकळीचे ताट बघितले होते. बाकी, लिंडा ही एका भारतीय आजीसारखीच होती. हसतमुख चेहरा, किंचित वाकलेला कणा, सोनेरी आणि पांढरे मिश्रित केस, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि स्वतःच्या नातवांचे अखंड वाहणारे कौतुक! तिला त्यांची सर्वांची वारंवार होणारी आठवण तिच्या बोलण्यातून स्पष्ट दिसून यायची.
"गुड मॉर्निंग!" बरोबर सकाळी ६ वाजता लिंडाचा परिचित सूर कानी पडला. ती आज एकटी नव्हती. पॉलसुद्धा लवकर उठून तिच्याबरोबर आला होता. " आज आम्हाला राष्ट्रीय बातम्या हव्या आहेत परत! आज पेन्शन वर निर्णय होणार आहे असं कळलंय", पॉल मला म्हणाला. " All is  yours ", म्हणत मी डेस्क वर आलो.                   

No comments:

Post a Comment